दूरदेशीचा फकीर कोणी

Primary tabs

आरती रानडे's picture
आरती रानडे in दिवाळी अंक
25 Oct 2019 - 6:00 am


मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका
दूरदेशीचा फकीर कोणी

दूरदेशीचा फकीर कोणी
वाटा अनवट चालत राही
आयुष्याचे गूढ चित्र अन
सावल्यांतुनी रेखीत जाई।।

भकास माळावरती एका
जीर्ण एकले मंदिर पाही
कोनाड्यातील पागोळीगत
उरात फडफड, काहूर काही।।

कळसावरचा अंध पिंगळा
दु:ख मुक्याने साहत राही
कानी पडते आर्त साद जी
उगम तयाचा उमगत नाही।।

माथ्यावरती सूर्य तळपतो
तप्त दाह अन लाही लाही
खुळ्या स्मृतींचा मंद गारवा
परि जिवाला शमवत राही।।

दूरदेशीचा फकीर कोणी
वाटा अनवट चालत राही….


20191016-122815

अनुक्रमणिका

प्रतिक्रिया

मायमराठी's picture

26 Oct 2019 - 10:58 am | मायमराठी

कानी पडते आर्त साद जी
उगम तयाचा उमगत नाही

खुळ्या स्मृतींचा मंद गारवा
परि जिवाला शमवत राही
- आवडल्या या ओळी
आपण तसे सगळेच फकीर कुठले ना कुठले प्रवास डोईवर घेऊन निघालेलो; नाही का? थांबलोय असे दिसले तरी आत खोलवर वाटा शोधत राहतो.
आपल्या शब्दांनी एक चित्र रेखाटून दाखवलं.

मनिष's picture

26 Oct 2019 - 11:38 am | मनिष

कानी पडते आर्त साद जी
उगम तयाचा उमगत नाही।।

दूरदेशीचा फकीर कोणी
वाटा अनवट चालत राही….

If a man does not keep pace with his companions, perhaps it is because he hears a different drummer. Let him step to the music which he hears, however measured or far away.

Henry David Thoreau

डोळ्यांसमोर चित्र उभं राहिलं वाचता, वाचता.

चौकटराजा's picture

26 Oct 2019 - 7:31 pm | चौकटराजा

काव्य आवडले .. खास करून ...माथ्यावरती ... पुढच्या चार ओळी . पण फकीर याचा जो रूढ अर्थ आपल्याला महीत आहे त्याला प्रवासी ,भटक्या, पान्थस्थ असा वास आहेच का ? की याचक , साधू असा वास आहे ..... ?

श्वेता२४'s picture

8 Nov 2019 - 5:58 pm | श्वेता२४

आवडली

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Nov 2019 - 2:37 pm | ज्ञानोबाचे पैजार

अर्थवाहि कविता आवडली
पैजारबुवा,

पिवळा डांबिस's picture

9 Nov 2019 - 8:37 pm | पिवळा डांबिस

कविता मनाला भिडली.
तसं म्हंटलं तर आपण सगळेच तो फकीर,
आयुष्याची अनवट वाट चालत रहाणारे
तप्त दाह अन लाहीलाही मध्ये खुळ्या स्मृतींच्या गारव्यावर हायसं होणारे...

अलकनंदा's picture

19 Nov 2019 - 1:52 pm | अलकनंदा

काय सुरेख!