माझं खोबार... भाग ५

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं
9 Nov 2008 - 2:49 am

माझं खोबार... भाग १ , ... भाग २ , ... भाग ३ , ... भाग ४ , ... भाग ५ , ... भाग ६ , ... भाग ७ , ... भाग ८

*************

मित्रहो, आत्तापर्यंत मी माझ्या खोबारपर्यंतच्या प्रवासाबद्दल (जो माझा पहिला परदेश प्रवास होता) लिहिलं. 'केल्याने देशाटन...' या उक्तिची सत्यता पटायला खरं म्हणजे हा एक प्रवासच पुरेसा होता. सौदी अरेबिया मधे वास्तव्य करताना तर खूपच अनुभव आले, माणसं भेटली. निरनिराळ्या विचारधारा जवळून बघायला मिळाल्या. लोक कसे विचार करतात, त्यांच्या विचारांमागची भूमिका काय असते हे कळले. आता मी काही अनुभव सांगत पुढे जाणार आहे. हे अनुभव केवळ विचित्र (आपल्या दृष्टीने) समजूती आणि चालीरिती वगैरे तुमच्या पुढे मांडायचे म्हणून नव्हे तर तेथिल जीवनावर किंवा त्यांच्या विचारपद्धतीवर थोडा प्रकाश पडावा म्हणून लिहिणार आहे. मागेच लिहिल्या प्रमाणे मी जे काही लिहिणार आहे ते संपूर्ण पणे सत्य असेल, आपल्या भारतिय मनाला त्यातल्या काही गोष्टी 'सुरस आणि चमत्कारिक' वाटतील नक्कीच, पण हेच तर आहे 'अरबस्तान'... सुरस आणि चमत्कारिक.

चला तर मग...

*************

.... मस्त पैकी आंघोळ केली आणि बेडवर येऊन पडलो. मनात विचार चालू होते, कसं असेल ऑफिस? कसे लोक भेटतील? बाजूलाच खिडकी होती. सहज लक्ष गेलं, आकाश निरभ्र होतं. छान चांदणं होतं. चंद्राची सुंदर कोर दिसत होती. खूपच प्रसन्न वाटलं... मी त्या उबदार अंथरूणात सुखावत होतो, सगळा शीण जात होता. डोळे कधी मिटले ते कळलंच नाही....

*************

सौदी अरेबिया प्रमाण वेळ आणि भारतिय प्रमाण वेळेत फक्त अडिच तासाचाच फरक असल्याने (सौदी वेळ मागे) जेट लॅग वगैरे तसा फारसा जाणवत नाही. पण थोडा फरक जाणवतोच. सकाळी तशी लवकरच जाग आली. उजाडायला अजून थोडा वेळ होता, मिट्ट काळोख होता. थंडी मात्र खूप होती. मला आश्चर्यच वाटलं. आपली अशी समजूत असते की अरबस्तानात वाळवंटंच आहेत सगळीकडे त्या मुळे कायम गरमी असणार. पण तसे नाही. इथे ऋतू दोनच. उन्हाळा आणि थंडी. आणि दोन्ही अत्यंत भयानक, एक्स्ट्रीम. उन्हाळ्यात तापमान ५०डिग्री सेंटिग्रेडच्या वर गेलेले मी अनुभवले आहे. तसेच हिवाळ्यात तापमान ५ डिग्री सेंटिग्रेडच्याही खाली जातं. पण थंडीची खासियत म्हणजे वारा. भयानक वेगाने हा वारा वाहत असतो. रस्त्यावरून चालताना वार्‍याच्या विरूद्ध दिशेला चालणं जवळपास अशक्य. मग एखाद्या इमारतीच्या आडोश्याला उभं राहायचं थोडा वेळ. आणि जर का २ इमारती खूप जवळ जवळ असतील तर त्या चिंचोळ्या चॅनेल मधून जाताना तर त्या वार्‍याला भयानक जोर यायचा आणि आवजही चढायचा त्याचा.

हिवाळ्यात अजून एक वाईट प्रकार म्हणजे 'वारा'. आणि त्यामुळे उठणारं 'सँडस्टॉर्म'. कुठल्यातरी एका चित्रपटात दाखवल्याचं आठवतंय की नायक वाळवंटातून जात असतो आणि प्रचंड वारा वगैरे सुटतो. वाळूचं वादळ वगैरे होतं. अगदी तसंच नाही पण बर्‍यापैकी जवळपास जातं हे शहरातलं सँडस्टॉर्म. खरं तर ही वाळूची वादळं १२ महिने मधून मधून चालूच असतात (आणि साली नेमकी गुरूवारी / शुक्रवारीच होतात, वीकेंड सगळा नासतो :( ). तिथे सगळ्या खिडक्या अगदी पॅकबंद असतात, धूळ आत येऊ नये म्हणून आणि घरात सतत एसी किंवा हीटर चालू असतात त्यामुळे. पण एकदा का असं वादळ सुरू झालं की, अतिशय बारीक धूळ घरात शिरतेच शिरते. संपूर्ण घरात एक तलम असा धुळीचा थर जमतो. बाहेर रस्त्यांवर व्हिजिबिलिटी खूपच कमी होते. तरी सुध्दा सौदी लोक आपापल्या गाड्या जोरात पळवत असतात. अश्या वातावरणात खूप आणि भयंकर असे अपघात होत असतात. सोसाट्याचा वारा सुटलेला असतो. मी जेव्हा गाडी चालवायला लागलो तेव्हा अश्या वातावरणात गाडी कशी बघताबघता नियंत्रणाबाहेर जाते याचे खूप अनुभव घेतले आहेत. म्हणजे, आपण असे हायवेवरून १००-१२० कि.मी. वेगाने जात असतो. अचानक वारा सुटतो, धूळ उडते आणि १-२ मिनिटांच्या आत काही दिसेनासं होतं. त्यातच वार्‍याच्या प्रचंड झोतामुळे (जर का तो वारा गाडीच्या डावी-उजवी अश्या दिशेने असेल तर) गाडी सारखी एका बाजूला ढकलली जाते. स्टीअरींग व्हील गच्च धरून ठेवावं लागतं. नाहीतर क्षणात गेलीच गाडी रस्त्याच्या बाहेर. वार्‍याचा जोर प्रचंड असतो, विशेषतः शहराबाहेर पडलं आणि मोकळा भाग सुरू झाला की वार्याणने घातलेला धुमाकूळ सहज लक्षात यायचा. एकदा मी एक खूपच खतरनाक दृश्य बघितलं. हायवे वरून जात होतो आणि एका ठिकाणी जाहिरातींची होर्डिंग्ज लावायला मोठे मोठे स्टीलचे खांब उभे केले होते. एक दिवस जोराचं वादळ झालं आणि दुसर्‍या दिवशी ते खांब जागोजागी वाकलेले होते. दिवसच्या दिवस सूर्यदर्शन होत नसे. मी पुढे जेव्हा माझ्या स्वतःच्या घरात राहायला गेलो तेव्हा काढलेली छायाचित्रं खाली देत आहे.


दुपारी बारा - साडेबाराला काढलेला सूर्याचा फोटो.


असंच एक वादळ ऐन भरात असताना बल्कनीतून काढलेले फोटो. वेळः भर माध्याह्नीची.


वरील ४ फोटोंपैकी पहिल्या फोटोत जी मशिद अंधुक दिसते आहे तिचा स्वच्छ सूर्यप्रकाशात काढलेला फोटो.

*************

तर मी असा जागा होऊन अंथरूणात लोळत होतो. खूपच फ्रेश वाटत होतं. तेवढ्यात एक खतरनाक रामसे चित्रपटांसारखा भयानक आवाज यायला लागला. एखाद्या भयाण निर्मनुष्य अश्या जागी एक भूतबंगला असतो आणि तिथे कसा एक प्रकारचा शिट्टी मारल्या सारखा भेसूर आवाज येतो थेट तसा. माझी झोप पूर्ण उडाली. (त्या वेळी प्रियालीला ओळखत नव्हतो, नाही तर तिचीच आठवण आली असती ;) ) काही केल्या कळेना. थोड्या वेळाने एक सहकारी उठला तेव्हा त्याला पहिला हाच प्रश्न केला. तो खूप हसला. म्हणाला, 'अरे या खिडक्या एकदम एअरटाईट नसतात रे. त्या मधे कुठेतरी गॅप राहते आणि मग बाहेर हवेचा वेग खूपच असल्याने ती हवा या फटीतून आत घुसत राहते त्या मुळे असा आवाज येतो'. बाप रे.... असला आवाज? कधी एखाद्या ठिकाणी एकटं रहावं लागलं तर आफतच आहे, (दैवयोगाने तो पण प्रसंग आला माझ्यावर २-३ वेळा. तेव्हाची माझी अवस्था पूर्ण आठवते आहे अजूनही.)

लगेच आंघोळ वगैरे करून तयार झालो. इथे आयता नाश्ता मिळणार नव्हता. घरी म्हणजे कपडे वगैरे करुन तयार झालं की तो पर्यंत आई / बायको ब्रेकफास्ट समोर ठेवत असे. इथे सगळे तयार होऊन एकदम बाहेर पडत असत. जवळच एक 'कॅफेटेरिया' होता. तिथे चहा / सँडविच वगैरे खाऊन मग सगळे आपाआपल्या कस्टमरकडे जात असत. काही लोक ऑफिसमधे जात. कंपनीने एक गाडी आणि ड्रायव्हर ठेवला होता सगळ्यांच्या दिमतीला. बाकीच्यांचं आटोपेपर्यंत वाट बघत बसलो. समोरच पेपर पडला होता. रोज सकाळी मस्त ब्रेकफास्ट करत करत पेपर वाचायची सवय होतीच, इथे आधीच पेपर पडला होता हातात. इथले पेपर कसे असतात हे कुतूहल होतंच. अरब न्यूज हे तिथलं एक प्रसिद्ध वर्तमानपत्र. सहज चाळता चाळता एक बातमी नजरेस पडली. आदल्या दिवशी विमानतळावर बघितलेल्या सुरक्षेचा आणि एका पाकिस्तानी कुटुंबाला पकडून नेताना पाहिले होते त्या घटनेचा उलगडा झाला.

अंमली पदार्थांच्या बाबतीत सौदी अरेबियाचे कायदे फार म्हणजे फारच कडक आहेत. अंमली पदार्थ देवन करणार्‍याला किंवा त्यांची तस्करी करणार्‍याना 'देहांत' हे एकमेव शासन आहे. आणि या शिक्षेची अंमलबजावणी अगदी पुरेपूर होते. अजिबात हयगय होत नाही. या प्रकारामुळे तस्करी करणारे नविन नविन युक्त्या वापरतात. असाच एक प्रकार आदल्या दिवशी घडला होता. अफगाणिस्तानात अंमली पदार्थांचं उत्पन्न खूप होतं आणि तो देश संपूर्ण जगात या बाबतीत पहिल्या तीन क्रमांकात आहे हे तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. तिथे गरिबी पण खूप आहे. त्याचाच फायदा हे तस्कर घेतात. ज्या माणसाला आयुष्यात कधीही पोटभर खायला नाही मिळालं त्याला जर काही रकमेची लालूच दाखवली तर तो कितीही धोकादायक कामं करायला सहजी तयार होतो. जिवंत सहीसलामत आलाच परत तर पैसा मिळतो. पकडला गेला आणि मेला तर कमीत कमी आई बाप / बायकापोरं तरी सुखात जगतील असा हा साधा सोपा पण भयानक हिशेब असतो.

तर झालं होतं असं. सौदी अधिकार्‍यांचं पाकिस्तान / अफगाणिस्तान कडून येणार्‍या प्रवाश्यांकडे तसं विशेष लक्ष असतंच. तसंच या वेळीही होतं. एक मोठं कुटुंब उतरलं होतं विमानातून. बरीच विमानं थोडीफार आगेममागेच आल्यानं विमानतळावर झुंबड उडाली होती. तशातच विमानतळावरच्या एका भागातलं वातानुकूलन बंद पडलं होतं. या कुटुंबातल्या सगळ्या बायका प्रथेप्रमाणे नखशिखांत काळ्या बुरख्यामधे झाकलेल्या होत्या. त्यातल्या एकीकडे एक अगदी छोटं असं लहान मूल होतं आणि तिने त्याला हातात आडवं धरलं होतं. इमिग्रेशन वगैरे चालू होतं. वातानुकूलन बंद पडल्यामुळे थंडी असून सुद्धा आत मधे बर्याधपैकी उकडत होतं. मुलं रडत होती. पण एका अधिकार्यानच्या लक्षात आलं की त्या बाईच्या हातातलं मूल अजिबात रडत नाहिये आणि काही हालचालपण करत नाहिये. तो मुद्दाम तिच्यावर पाळत ठेवून राहिला. बराच वेळ तसाच गेला मुलाची काहीच हालचाल नाही आणि त्या बाईने पण त्याला दूध पाजणे वगैरे काही नाही. त्याला काहितरी संशयास्पद वाटले. अजून बराच वेळ गेल्यावर त्या पूर्ण कुटुंबाला एका बाजूला नेण्यात आलं आणि पूर्ण झडती घेण्यात आली. तेव्हा कळलं की ते मूल मेलेलं होतं आणि त्याच्या शरिरात आत मधे अंमली पदार्थ भरण्यात आले होते. (पेपर मधे असे आले होते की तो इतका निर्ढावलेला अधिकारी सुद्धा टॉयलेट मधे जाऊन ओकला होता!!!) त्या पूर्ण कुटुंबाला अटक करण्यात आली. (पुढे असे कळले की त्या बायका आणि इतर मुले यांना काही काळ तुरुंगात टाकून मग डीपोर्ट करण्यात आले. पण त्या सगळ्या पुरूषांना मात्र देहदंड झाला. मारून टाकलं.) पहिल्याच दिवशी सकाळी असलं काही वाचून खरं तर थोडी खिन्नता आली मनाला. पण हळू हळू सवय झाली पुढे असलं काही तरी वाचायची. मी पण निर्ढावलो. :(

नंतर सगळे बाहेर पडलो. पोटभर न्याहारी झाल्यावर ऑफिसकडे निघालो. पहिलाच दिवस असल्याने ऑफिस मधे काही सोपस्कार पार पाडायचे होते. क्लायंट कडे दुसर्‍या दिवसापासून जायचे होते. गाडी ऑफिसच्या दिशेने निघाली. सगळ्यात पहिल्यांदा मनात काय भरलं असेल तर मोठे रस्ते, एक प्रकारचा 'मोकळेपणा' आणि रस्त्याच्या मधोमध दुभाजकावर असलेली हिरवळ आणि फुलझाडं. पूर्ण रस्ताभर जांभळ्या, निळ्या, पिवळ्या फुलांचे ताटवेच्या ताटवे पसरले होते. जेवढी हिरवळ मी भारतात नाही बघितली तेवढी सौदी अरेबिया सारख्या वाळवंटात बघितली. छान प्रसन्न वाटत होतं. मला प्रश्न पडला की या वैराण भागात अशी हिरवळ आणि ताटवे बनवायचे आणि त्यांची निगा राखायची म्हणजे किती पाणी लागत असेल. थोडं पुढे गेलं तर एक भला मोठा पाण्याचा टँकर दुभाजकाच्या बाजू बाजूने अगदी हळू हळू जाताना बघितला. त्याच्या मागोमाग एक माणूस हातात पाईप घेऊन त्या टँकर मधलं पाणी त्या झाडांना आणि हिरवळीला घालत होता. आपल्या कडे लाखो लोकांना साधे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नाही. आणि इथे वाळवंटात या लोकांनी अक्षरशः नंदनवन फुलवले होते. मी आमच्या ड्रायव्हरला विचारले की हे पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर येतं कुठून? उत्तर ऐकून मी अजूनच चाटच पडलो. सौदी अरेबियाला खूप मोठा समुद्र किनारा लाभला आहे. इथे बर्‍याच ठिकाणी 'वॉटर डीसॅलिनेशन प्लँट्स' आहेत. तेल आणि नॅचरल गॅस मुबलक आणि अतिशय स्वस्त प्रमाणात उपलब्ध असल्याने असे प्लँट्स चालवणे खूपच सोपं आणि किफायतशीर पडतं. तर अश्या प्रकारे पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होतं. एका क्षणात पेट्रोडॉलर्सची ताकद समजली. शिवाय हेही लक्षात आलं की भले तिथे लोकशाही नसेल पण येणार्‍या पैश्यामुळे सरकारने प्राथमिक सुविधा म्हणजे रस्ते, पिण्याचे पाणी वगैरे खूपच उत्तम रितीने पुरवले आहे. त्या बाबतीत तरी कोणाला नावं ठेवायचा काहीच चान्स नाही लोकांना.

आमचं ऑफिस 'पेट्रोलियम सेंटर' नावाच्या कमर्शियल सेंटर मधे होतं. बर्यारच मोठ्या मोठ्या तेल धंद्याशी निगडीत कंपन्यांची कार्यालयं या इमारतीत आहेत. ऑफिस अगदी प्रशस्त होतं पण तिथे भयानक शांतता असायची. क्वचित कधी एखादा माणूस दिसायचा. ऑफिसातले बहुतेक लोक बाहेरच असायचे. दर गुरूवारी मात्र सगळे ऑफिसमधे असायचे. त्या दिवशी नुसतं गजबजून जायचं. सगळे सोपस्कार पूर्ण करे पर्यंत दुपार उलटून गेली. पहिलाच दिवस असल्यामुळे काम काहीच नव्हतं. मस्त आरामच चालला होता. कुठल्या प्रोजेक्टवर मला काम करायचं हेही ठरलं होतं त्या मुळे त्या बद्दल थोडी माहिती वाचत होतो. निवांत गेला दिवस. एक गंमतीची गोष्ट घडली. तिथला एक सहकारी खूपच चांगला होता. छान गप्पा वगैरे मारत होता. त्याने खूप गंमतिदार चित्र दाखवलं. म्हणाला "मला अजून दोनच वर्षं झाली आहेत. तू किती दिवस रहायचं ते, हे चित्रं पाहून ठरव." :)

संध्याकाळी लवकरच हॉटेलवर परत आलो. एक एक जण येत होता परत. जेवायला एका जवळच्याच ठिकाणी गेलो. खरं तर नॉन व्हेज खात नसल्यामुळे मला इथे आपल्या जेवणाची कशी सोय होईल अशी एक शंका होतीच मनात. पण जिथे जेवायला गेलो होतो त्या भागात बरीच भारतिय रेस्टॉरंट्स दिसली. आणि बहुतेक ठिकाणी थाळी आणि शाकाहारी पदार्थ मिळतात हे ऐकून बरे वाटले. मस्त जेवून वगैरे हॉटेलवर आलो परत. आत्ताशी कुठे ८.३० / ९ च वाजले होते. हॉटेलच्या लॉबीत जरावेळ गप्पा मारत बसलो. रिसेप्शनवर पण कालचा इजिप्शियन नव्हता. एक कोणीतरी हैद्राबादीच दिसत होता. आमच्याच वयाचा पोरगा होता. तो पण आमच्यात येऊन गप्प मारयला लागला. बोलता बोलता तो आमच्या बॉसला म्हणाला, 'क्या मियां, इत्ते दिनो से बोल रहा हूं, कुछ अच्छासा जॉब दिलाओ. आप कुछ नाही कर रे.' आमचा बॉस म्हणाला त्याला, 'अरे हमारा सॉफ्टवेअर डेवलपमेंट इधर नही है, वो सब इंडिया मे है. फिर भी ट्राय करता हूं.' मी विचार करत होतो की हा रिसेप्शनिस्ट पोरगा, सॉफ्टवेअर डेवलपमेंट मधे काय करणार?" त्यालाच विचारले. त्याची हकिकत ऐकल्यावर मात्र नसते विचारले तर बरे झाले असते असे वाटले. कमीतकमी पहिल्या दिवशी तरी नको.

त्याची कहाणी अशी. तो राहणारा हैद्राबादचा. घरची गरिबी. ६-७ भावंडं. घरी कमावणारे वडिल एकटे. हा शिकला. पदवीधर झाला. ओरॅकलचे वगैरे कोर्स केले आणि एका छोट्या कंपनीत नोकरी पण मिळाली. पण डोक्यात गल्फ मधे जायचे वेड घुसले. पैसा कमवायचा, बस्स्स. एक एजंट भेटला. म्हणाला १ लाख रुपये लागतील, तुला सौदी अरेबियाचा व्हिसा आणि नोकरी देतो. याच्या डोक्यात तर पक्कंच घुसलं. पण एक लाख रुपये आणायचे कुठून? याची तळमळ बघून त्याच्या बापालाही वाटलं, पोरगं जाईल तिकडे तर कमवेल व्यवस्थित आणि पैसा दिसेल आपल्याला पण. बापने घर गहाण टाकलं आणि उभे केले पैसे. त्या एजंटने व्हिसा मिळवला. आणि नोकरी पण. एका मोठ्या हॉटेलमधे काँप्यूटरशी संबंधित काम करायचे. हा खूष झाला. त्याच धुंदीत आला इथे. पहिल्याच दिवशी दणका बसला. इथल्या पध्दतीप्रमाणे त्याचा पासपोर्ट काधून घेतला त्याच्या मालकाने आणि सरळ एक बांधकाम चालले होते (तेच ते मोठे हॉटेल जिथे हा काँप्यूटरचे काम करणार होता :) ) तिथे नेऊन लाद्या बसवायच्या कामावर लावला. हा पोरगा अक्षरशः कोलमडला. खूप रडला भेकला. २-३ दिवस अन्नपाणी सोडलं त्याने. काही उपयोग झाला नाही. शेवटी चूपचाप तेच काम केलं २-३ महिने. नंतर अजून असंच काही. हळूहळू त्या मालकाशी नीट वागून संबंध नीट बनवले आणि मग या हॉटेलला रिसेप्शनिस्ट म्हणून ठेवला त्याला. त्याच दिवशी माझा पण पासपोर्ट काढून घेतला होता कंपनीत. आज ते सगळं आठवून हसायला येतंय. तेव्हा हादरलो होतो. तरी बरं आमचे सगळे सहकारी भारतिय होते आणि तशी काही भिती नव्हती. पण त्या दिवशी अस्वस्थ झालो होतो हे नक्की.

*************

दुसर्‍या दिवसांपासून काम नियमित सुरू झालं. हळू हळू मी पण रूळलो. काही दिवसांनी हॉटेल सोडलं आणि एका भारतिय कुटुंबात पेइंग गेस्ट म्हणून राहू लागलो. तेवढंच जरा घरच्या सारखं वाटायचं. रुटिन आयुष्य सुरू झालं. एक प्रकारचा सरावलेपणा आला माझ्यात. जी काही अलिखित बंधनं असतात ती सगळी अक्षरशः 'सेकंड नेचर' सारखी अंगात भिनली हळूहळू. सौदी अरेबिया बद्दल जी एक भिती वाटत होती ती गेली.

बंधनं म्हणाल तरी तशी ती फारशी जाचक नव्हती. पण अडचण मात्र नक्कीच व्हायची. दिवसातून पाच वेळा प्रार्थना होते. आपल्या कडे याला नमाज़ म्हणतात, पण खरा अरबी शब्द आहे 'सलाह'. तर ही सलाह ५ वेळा असते आणि प्रत्येक वेळी आधी 'अझान' (मूळ अरबी शब्द 'अधान') होते. ही अधान झाली की पटापट दुकानं बंद होतात, माणसं रस्त्यावरून गायब होतात. सगळीकडे सुनसान शांतता पसरते. प्रार्थना संपली की सगळं पूर्ववत्. सुरूवातीला सवय नसल्याने जरा विचित्र वाटायचं पण नंतर सवय इतकी झाली की प्रार्थनेच्या वेळा सहज लक्षात राहू लागल्या. प्रार्थनेच्या वेळा लक्षात ठेवाव्या लागत कारण, त्या सतत बदलत असतात. नमाजाची वेळ ही आकाशातल्या सूर्याच्या स्थानावर अवलंबून असते. म्हणजे सूर्योदयाच्या आधी केली जाते ती 'फजर', सूर्य बरोबर डोक्यावर आला की 'धुहर', सूर्य कलायला लागला की 'असर', सूर्य मावळला की 'मघरिब' आणि सूर्यास्तानंतर १-१.५ तासांनी 'इशा'... अश्या त्या पाच प्रार्थना. पूर्ण वर्षात दिवस लहान मोठा होत जातो. त्यामुळे या प्रार्थनांच्या वेळा पण बदलत जातात. उन्हाळ्यात खोबारला खूप लवकर म्हणजे सकाळी ४ वगैरे वाजताच उजाडायचे. साहजिकच त्या वेळी सकाळ्ची प्रार्थना ३.३० ला वगैरे व्हायची. आणि संध्याकाळी ७-७.३० ला सूर्यास्त व्हायचा तर त्या वेळी 'मघरिब' आणि मग 'इशा' रात्री ९ वाजता वगैरे. हिवाळ्यात सूर्योदय ६.३० च्या सुमारास आणि सूर्यास्त मात्र संध्याकाळी ४.३० वाजताच. साहजिकच प्रार्थनेच्या वेळा पण पुढे मागे होत, आणि तेवढ्या वेळात बाहेर काहिही करता येत नाही म्हणून त्या वेळा लक्षात ठेवून त्या प्रमाणे सगळे आखावे लागायचे. बरं या वेळी तिथले संस्कृतिरक्षक (मुतव्वा) सगळीकडे फिरत असतात. एखादा मुसलमान प्रार्थनेला न जाता नुसताच उभा असलेला आढळला तर त्याला पायावर वेताच्या छडीचे २-४ फटके मारून जवळच्या मशिदीत पिटाळत. :) (मुसलमान नसलेल्यांना काय करत ते सांगेनच पुढे ;) )

अर्थात ही बंधनं पण स्थळाप्रमाणे कमी अधिक जाचक व्हायची. सौदी अरेबिया हा एक अतिप्रचंड देश आहे. त्यामुळे स्थानिक चालींमधे फरक असणारच. त्यामानाने खोबारला फारसं कर्मठ वातावरण नव्हतं. पण १५ किमी वरील दम्मामला त्या मानाने वातावरण जास्त कडक होतं. रियाध मधे तर खूपच कर्मठपणा आहे आणि अगदी अंतर्भागात काही ठिकाणी कल्पनातीत कर्मठ लोक आहेत.

अर्थात एक प्रकारचा दबले पणा असायचा सतत पण मित्र वगैरे झाले आणि तेवढ्या वर्तुळात आयुष्य सिमीत पण एकंदरीत मजेत जाऊ लागलं. पण तेवढ्यात एक अशी घटना घडली की त्या मुळे मी परत 'सौदी अरेबिया काय चीज आहे' या वास्तवात परत आलो.

एका शुक्रवारी, सुट्टीचा दिवस असल्याने, आमच्या कंपनीच्या ड्रायव्हरला पटवून एका मित्राकडे जायचा बेत बनवला होता. तो जरा लांब राहायचा म्हणून लवकरच निघालो. शुक्रवारी संपूर्ण सौदी अरेबिया पूर्ण पणे बंद असतं. तो अतिशय महत्वाचा प्रार्थनेचा दिवस. इतर दिवशी नमाज न पढणारे (सौदी अरेबियात असा मुसलमान विरळाच) लोक सुद्धा त्या दिवशी न चुकता नियमाने नमाज पढत. दुपारचा नमाज हा अत्यंत महत्वाचा असतो. त्या नमाजाच्या आधी एखादे लांबलचक प्रवचन (अरेबिक शब्द - खुत्बा) असतं. तर आम्ही निघालो सकाळचे लवकरच आणि थोड्या वेळात नमाजाची वेळ झाली. आमचा ड्रायव्हर एके ठिकाणी गाडी उभी करून गेला नमाज पढायला. मी शांतपणे गाडीत एसी लावून बसून राहिलो. नमाज वगैरे झाला तब्येतीत, मी म्हणलं आता येतील चालकसाहेब. तेवढ्यात त्या मशिदी समोरच्या मोकळ्या मैदानात सायर्न वाजवत ५-६ पोलिस व्हॅन्स आल्या. त्यांच्या मागोमाग एक ऍम्ब्युलन्स. मला प्रचंड टेंशन आलं. काय भानगड झाली आहे काही कळेना. सलाह संपवून बाहेर येणारे लोक मात्र त्या व्हॅन्स पाशी जमा होत होते. थोड्या वेळाने एका व्हॅन मधून एका माणसाला बाहेर काढले. तो अर्धवट बेशुद्ध होता, म्हणजे त्याला गुंगीचे औषध देण्यात आले असावे असे वाटत होते. माझी ट्यूब पेटली एकदम. हा काहीतरी फटके वगैरे देण्याची शिक्षा अंमलात आणण्याचा कार्यक्रम असावा. मी गाडीतून उतरलो आणि तिथे थोडा मागे जाऊन उभा राहिलो. माझी उत्सुकता पार ताणली गेली होती. हे असं काही होतं इथे असं खूप ऐकलं होतं पण अचानक बघण्याचा योग आला होता. थोडा वेळ तसाच गेला. गर्दी पण वाढली. त्या गुन्हेगाराला खाली गुडघे टेकून बसायला लावले. त्या पोलिसांपैकी एकाने एक लांबलचक फर्मान उघडले आणि वाचले. (नंतर कळले की ते त्याच्यावरचे आरोप आणि शिक्षेबद्दलचे न्यायपत्र होते). त्या नंतर जवळ जवळ ५-१० मिनिटे परत काहीच नाही. सगळे शांत उभे होते. पोलिस सुद्धा. कोणीच काही बोलत नव्हते. (हे पण नंतर कळलं की न्यायपत्र वाचनाच्या शेवटी असं म्हणलेलं असतं की या गुन्ह्याचा जो कोणी बळी असेल तो / ती किंवा त्यांचे वारस या माणसाला माफ करून किंवा काही पैश्याच्या मोबदल्यात मरणापासून वाचवू शकतात. त्या साठी तो ५ मिनिटांचा वेळ. आणि असे बरेच वेळा घडते की गुन्ह्यात बळी ठरलेले त्या गुन्हेगाराला काही पैसे घेऊन किंवा तसेच माफ करतात. अश्या पैशाला 'दिया' म्हणतात, इंग्लिश मधे 'ब्लड मनी' असा शब्द प्रचलित आहे.) आणि एकदम एका दुसर्‍या व्हॅन मधून एक माणूस बाहेर आला त्याच्या हातात होती एक तलवार. एका क्षणात मी समजलो. हा फटके बिटके मारण्याचा कार्यक्रम नव्हता. मी चक्क एक देहांत शासन अंमलात आणण्याचा कार्यक्रम बघत होतो. मला घाम फुटला. या प्रकाराबद्दल बोलणं सोपं असतं, कल्पना करणं सोपं असतं.... अवचितपणे असं समोर दृश्य उभं ठाकलं तेव्हा मात्र मी हादरलो. डोळे मिटून घेतले. हे सगळं लवकर आटपावं म्हणून देवाची प्रार्थना करत होतो. एक मोठा 'सप्प्प' असा आवाज आला... एक सेकंद सगळेच शांत होते. तेवढ्यात टाळ्या वाजवल्याचा आवाज आला. डोळे उघडले. समोर रक्ताचं थारोळं, एक धड आणि एक मुंडकं. पोलिस आणि काही मुतव्वा टाळ्या वाजवत होते. जगातला एक पापी नष्ट केल्याचा आनंद व्यक्त करत होते. मी काहिही विचार न करता मागे वळलो, धावत धावत गाडीपाशी आलो. ड्रायव्हर आत बसला होता. गाडी चालू होती. तो म्हणाला, "कशाला गेलास तिथे? मी पहिल्यांदा हे बघितलं तेव्हा १५ दिवस जेवलो नव्हतो. काही खाल्लं की उलटी व्हायची. मी तुला जाताना बघितलं, हाका मारल्या तुला पण तुझं लक्षच नव्हतं." मी कसाबसा एवढंच बोललो, "आधी गाडी सुरू कर. इथनं नीघ." आम्ही तिथून निघायच्या आत सगळं मैदान रिकामं झालं होतं आणि दोन माणसं एका मोठ्या टँकर मधलं पाणी टाकून ती जागा साफ करत होते. दुसर्‍या दिवशी तिथनं गेलो तर काल इथे असं काही घडलं असेल अशी शंका सुद्धा येत नव्हती.

http://lh6.ggpht.com/_ES5F-Hw1Gmg/SRX69ehf-cI/AAAAAAAAAX8/Rf4PBORuZR8/s4...

(संपादक - इथे दिलेले चित्र हे बघणार्‍याचे मन विचलित करणारे भयावह असे असल्याकारणाने संपादित करुन काढून टाकले आहे. सत्य असले तरी सर्वसामान्य वाचकाला इतक्या भयावह पद्धतीने ते बघणे नकोसे वाटते. लेखकाने संपादनामागच्या भावना लक्षात घ्याव्यात!)

मूळात मला वेगवेगळ्या धर्मांबद्दल, संस्कृतिंबद्दल, लोकांबद्दल कुतूहल फार आहे. पण त्या दिवशी हा प्रकार बघितल्यावर मनात आलं, "नक्की कसे आहेत हे लोक? काय म्हणतो यांचा धर्म? खरंच का असं काही आहे त्याच्यात? जाणून घेतलंच पाहिजे." आणि हळूहळू मी त्याबद्दल वाचायला लागलो. लोकांना प्रश्न विचारायला लागलो.

क्रमशः

(संपादक मंडळासाठी सूचना: या लेखातील काही छायचित्रे आंतरजालावरून घेतली आहेत. धन्यवाद.)

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

घाटावरचे भट's picture

9 Nov 2008 - 3:03 am | घाटावरचे भट

नेहेमीप्रमाणे उत्तम जमलेला भाग. देहांतशासनाचे वर्णन आणि फोटो पाहून हादरलो.

टारझन's picture

9 Nov 2008 - 3:44 am | टारझन

बिपीन भौ .. ते लिहीलय भारी हे परत परत सांगायला नको हो .. अरब कंट्रीज विषयी बर्‍याच शंका न विचारता दूर झाल्यात ...

पण ते एडिट करून फोटू काढा आधी ... आम्हाला रक्तदानाला गेलो तरी सुई पाहून भोवळ येते .. इथे मुंडीछाटाछाटीची चित्र .... अबब ...

(अंमळ हळवा)टारूबाळ

सहज's picture

9 Nov 2008 - 7:05 am | सहज

बिपीनभौ सुरस व चमत्कारिक.

पुढच्या भागाची खुप उत्सुकता आहे.

ही लेखमाला लैच भारी होत चालली आहे.

प्रमोद देव's picture

9 Nov 2008 - 9:58 am | प्रमोद देव

सहजरावांशी सहमत आहे.

गणा मास्तर's picture

9 Nov 2008 - 7:41 am | गणा मास्तर

तिसरा फोटो काढुन टाकावा अशी संपादक मंडळाला विनंती.
बिपिन भाउ हवी तर फक्त लिंक द्या आणि तिथे एक बघणार्याचे मन विचलीत करणारे दृश्य अशी सुचना लिहा.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)

ऋषिकेश's picture

9 Nov 2008 - 10:08 am | ऋषिकेश

अप्रतिम भाग!!!!!
बिपीनभौ.. तुझ्या लेखणीला जबरदस्त बहर आला आहे .. एकदम मस्त.. लेखनाची लांबी, कंटेंट, मुद्देसुदपणा आणि लालित्य सगळंच आवडलं.. लगे रहो!!! :)
शेवटच्या सत्याने हादरलो.. तरी हे सत्यच आहे हे स्वीकारायला हवे..

फक्त काहि ठिकाणी एका बैठकीत न लिहिल्याचं जाणवलं

-(वाचक) ऋषिकेश

यशोधरा's picture

9 Nov 2008 - 10:44 am | यशोधरा

छान लिहिले आहेत बिपिनदा.
एखाद्याचा जीव घ्यायचा इतक्या सहज रीत्या!! :( :( किती अमानुष!

जैनाचं कार्ट's picture

9 Nov 2008 - 12:29 pm | जैनाचं कार्ट (not verified)

हेच म्हणतो !

अमानुषतेचा कळस आहे हा :(

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

सायली पानसे's picture

9 Nov 2008 - 12:02 pm | सायली पानसे

एकदम छान ! मजा आली वाचताना. भाग ६ लवकर येउदे.

सुरुवातीचा वादळांचा भाग एकदम मनोरंजक आहे... आणि सचित्र असल्यामुळे अगदी "आंखो देखा हाल"...

पण त्यानंतरचं सगळं लेखन सुन्न करणारे... (हिंसा पाहवत नाही म्हणून कितीतरी तेलुगू चित्रपट अर्धवट पाहून सोडून दिले आहेत... अपवाद "पोकिरी"चा... असो...)

बिपिनदा, लेख उत्तम जमला आहे हे सांगण्याची गरज नाही... पक्त तेव्हढं कापाकापीचं काही असेल तर जरा "डायल्युट" करुन लिहत जा बाबा...

सतीश गावडे
मी शोधतो किनारा...

मदनबाण's picture

9 Nov 2008 - 1:30 pm | मदनबाण

वल्ला बहोत खुबसुरत लिखा है...

मदनबाण.....

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर

रामदास's picture

9 Nov 2008 - 3:28 pm | रामदास

चुलत भाऊ सौदीत गेला होता नोकरीसाठी.पासपोर्ट जमा करायला नकार देऊन दुसर्‍या दिवशी परत आला होता त्या प्रसंगाची आठवण झाली.लेख आवडला हे वेगळे सांगायला नकोच.
(म्हणजे दृश्य आणि अदृश्य दोनी लेख आवडले.)

स्वाती दिनेश's picture

9 Nov 2008 - 4:39 pm | स्वाती दिनेश

सुरुवातीची वाळूच्या वादळाच्या सचित्र वर्णनांनी डोळ्यासमोर वादळ उभे केलेस ,जयश्रीने लिहिलेला वाळूच्या वादळाचा लेख आठवला.वार्‍याचा घोंघावणारा आवाज कोबेत पण यायचा ,ती आठवण करून दिलीस.
शेवट लिहिलेलले देहांत शिक्षेचे अमानुष वर्णन.. शहारे आले रे..
छान लिहितो आहेस.. पुलेशु.
स्वाती

वल्लरी's picture

9 Nov 2008 - 4:52 pm | वल्लरी

खुप छान...हा भाग सुध्दा अफ्लातुन
सौदीचे कायदे फार कडक आहेत...:(

वल्लरी's picture

9 Nov 2008 - 4:52 pm | वल्लरी

खुप छान...हा भाग सुध्दा अफ्लातुन
सौदीचे कायदे फार कडक आहेत...:(

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Nov 2008 - 12:21 am | बिपिन कार्यकर्ते

फोटो संपादित केल्याबद्दल माझी काही हरकत नाही. ते दृश्य असतंच भयंकर.

वर बर्‍याच जणांनी देहदंडाच्या शिक्षेबद्दल अमानुष वगैरे शब्द वापरले आहेत. सौदी मधले कायदे फार कडक आहेत असे लिहिले आहे. खरंच आहे. आणि मी कुठल्याही प्रकारचे समर्थन करत नाहिये त्या शिक्षांचे. पण आपण आपले संस्कृतिबद्दलचे निकष लावतो आणि आपल्याला ते अमानुष वाटते. पण त्या लोकांसाठी ही पूर्वापार चालत आलेली एक प्रथा आहे.

मी नविन असताना एका मित्राशी असंच या बाबतीत बोलत असताना अश्याच प्रकारच्या भावना व्यक्त केल्या. तो तेव्हा बरीच वर्षं तिथे राहिलेला होता. तो म्हणाला, 'इथले लोक मूळचे वाळवंटातले भटके लोक. आत्ता आत्ता कुठे या लोकांना कायम स्वरुपी वस्ती म्हणजे काय ते कळते आहे. अश्या समाजांमधे साधारणतः बळी तो कान पिळी असाच कायदा असतो. आणि या लोकांची मूळ प्रवृत्ति बंडखोर आहे. त्यांना काबूत ठेवायचे म्हणजे असे कडक कायदे आणि शिक्षा पहिजेतच. ज्या दिवशी हा वचक संपेल त्या दिवशी लोक अक्षरशः रस्त्यावर नागडे नाचतील. अराजक माजेल.' इतकी वर्षे तिथे राहिल्यावर मला पण थोडंफार ते पटतं आता.

बिपिन कार्यकर्ते

तिसरं चित्र लगोलग एडिट केल्यावर वाचायची हिम्मत नव्हती!
आज दुपारी सर्व धैर्य गोळाकरुन वाचायला बसलो. लिखाण तितकेसे भयप्रद नाहीये असे शेवटी समजले.
सौदीची ओळख चांगली करुन देताहात बिपिनभौ.
(एकूण प्रकार बघून मी आयुष्यात कधी जाईन असे वाटत नाही!)

चतुरंग

शितल's picture

10 Nov 2008 - 5:54 am | शितल

छान लिहिले आहे,
शेवटच्या चित्राने आणि त्या देहांतशिक्षेच्या परिच्छेदाने मनाला वेदना झाल्या.
तुम्हाला त्यावेळी कसे वाटले असेल ह्याची कल्पना करू शकते.

अनिल हटेला's picture

10 Nov 2008 - 8:59 am | अनिल हटेला

बिपीनदा!!
खोबार ची ही लेखमाला वाचायला मजा येतीये...
मुळात प्रत्येक गोष्ट आपण आपल्या इवल्याशा आयुष्यात अनुभवु शकत नाही..
पण खोबार वाचताना अगदी आखो देखा हाल वाचायला ,अनुभवायला मिळतोये...
त्याब्द्दल धन्यवाद ...
आणी २ भागा मध्ये जास्त अंतर ठेउ नका ही विनंती...
पू भा.प्र......

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

ब्रिटिश's picture

10 Nov 2008 - 10:33 am | ब्रिटिश

लय भारी !!! आजुन येवदे

खारपाड्यावरन खोबारला यस्टी चालु झाल्यावर यकदा येउन जाईन म्हन्तो

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)

अभिरत भिरभि-या's picture

10 Nov 2008 - 11:42 am | अभिरत भिरभि-या

खारपाड्यावरन खोबारला यस्टी चालु झाल्यावर यकदा येउन जाईन म्हन्तो =))

अभिरत भिरभि-या's picture

10 Nov 2008 - 11:41 am | अभिरत भिरभि-या

ठाऊक नसलेल्या वेगळ्या चालीरीतींचे दर्शन घडवणारा हा लेख मनाला भावला.
भारतात जन्माला आलो हे किती मोठे भाग्याचे याची जाणिव काही प्रमाणात झाली.

नमाज हा शब्द फारसी आहे. आपल्याकडे बरेचसे प्रचलित असणारे बरचसे शब्द फारसी आहेत.
मुस्लिमेतरांना एकूण कशी वागणूक मिळते हे जाणून घ्यायला आवडेल.

बिपिन-भाऊ,
बुरख्याला अरबी शब्द काय ?

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Nov 2008 - 12:07 pm | बिपिन कार्यकर्ते

धन्यवाद भिरभिरभाऊ.

बुरख्याला तिकडे 'अबाया' असा शब्द आहे. त्या बद्दल पण लिहिनच. :)

बिपिन कार्यकर्ते

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

10 Nov 2008 - 2:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि अभिरतच्या मताशी सहमत.
भारतात जन्माला आलो हे किती मोठे भाग्याचे याची जाणिव काही प्रमाणात झाली.
नुसतंच भारतात नाही, मोठ्या शहरात,...... यादी फार लांब आहे ...

चांगलं लिहिता, हे आता मी पुन्हा-पुन्हा सांगणार नाही आहे. :-)

मनिष's picture

10 Nov 2008 - 11:52 am | मनिष

बिपिनदा - छान लिहिता आहात, सुरू ठेवा. देहांत शासनाबद्द्ल वाचून अंगावर काटा आला.

नंदन's picture

10 Nov 2008 - 4:09 pm | नंदन

असेच म्हणतो. लेख आवडला. शेवटचा भाग सुन्न करणारा आहे. अर्थात, स्त्रियांनी बुरख्यातून दोन्ही डोळे उघडे ठेवण्याची गरज नाही - एकानेच काम भागेल असा फतवाही इथूनच निघाला असल्याने विशेष आश्चर्य वाटले नाही.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

वारकरि रशियात's picture

10 Nov 2008 - 4:32 pm | वारकरि रशियात

मुक्तसंगः अनहंवादि
चित्तचक्षुचमत्कारिक अनुभवांचे सुरेख शब्दांकन
बाहेरचे वादळ चित्रांतून पाहतो तोच मनात वादळ उभे करणारे अनुभव - वर्णन
पुढील भागाच्या प्रति़क्षेत .....

सुनील's picture

10 Nov 2008 - 4:57 pm | सुनील

खोबार वर्णन भागागणिक रंगतदार होत चालले आहे. अजून येऊद्यात.

मेलेले मूल घेऊन अंमली पदार्थाची तस्करी हा प्रकारच भयानक. आणि भर रस्त्यात सर्वांसमोर देहांत शासन? मती कुंठीत होते.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आनंदयात्री's picture

10 Nov 2008 - 5:19 pm | आनंदयात्री

असेच म्हणतो. खोबार लेखमाला वाचतांना एखाद्या प्रथितयश लेखकाच्या लेखणीतुन उतरलेले शब्द वाचतोय असे वाटते. अभिनंदन ... अरेबियन नाईट्स चालु राहु द्या अश्याच.

प्राजु's picture

10 Nov 2008 - 11:48 pm | प्राजु

काय रे बिपिनदा... या लेखात त्या पाकिस्तानी कुटुंबाची गोष्ट, त्या हैदराबादी मुलाची गोष्ट आणि शेवटची ती देहांत प्रायश्चित्ताची गोष्ट..! फारच भयानक.
सगळं हे एकाच भागांत का रे लिहिलंस?? सगळ्यात घृणास्पद त्या पकिस्तानी कुटुंबाची गोष्ट होती.
हे असं वाचलं की, डोकं सुन्न होतं. तुझं काय झालं असेल याची कल्पना करू शकते.
पण एक नक्की तू खूपच खंबीर आहेस.
लेख आवडला. नेहमी प्रमाणेच अतिशय प्रवाही आहे. कंटाळवाणा अजिबात नाहि झाला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

वाटाड्या...'s picture

11 Nov 2008 - 1:29 am | वाटाड्या...

एकदम डॅशिंग आहात राव तुम्ही...एखाद्याचा वध वगैरे पहाताना बघणं म्हणजे जरा अमंळ डेंजर नाय का?? बाकी लेख छान झालाय...

मुकुल

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Nov 2008 - 1:34 am | बिपिन कार्यकर्ते

कसलं डॅशिंग? मला त्या गॅदरिंगचा खरा अजेंडा कळे पर्यंत खूप उशिर झाला होता. :( आणि कळलं तेव्हा तिथून निघणं धोक्याचं ठरलं असतं. मजबूरीका नाम...

बिपिन कार्यकर्ते

खरा डॉन's picture

11 Nov 2008 - 8:44 am | खरा डॉन

पाहाताना बघण म्हंजी काय रं मुकुलभाउ?

खरा डॉन's picture

11 Nov 2008 - 8:43 am | खरा डॉन

बिपिनभाऊ मला तो फोटो कुठ बघायला मिळेल? माझी असल्या फोटोंनी फाटत नाही कृपया माझ्या खरडवहीत तो फोटो डकवा.

अर्र्,भारीच मालिका दिसतेय,!
😀
वाखु साठवली आहे.निवांत रविवारी वाचते!!