जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): १. चाकण ते केडगांव चौफुला

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
29 Nov 2018 - 1:06 pm

जे सत्य सुंदर सर्वथा.... : १. चाकण ते केडगांव चौफुला

नमस्कार! नुकतीच १४ दिवसांची व ११६५ किलोमीटरची सायकल मोहीम पूर्ण केली. आता त्याचे अनुभव आपल्यासोबत शेअर करणार आहे. ह्या सायकल मोहीमेची योजना कशी बनली, हे थोडक्यात सांगतो. मे २०१८ मध्ये योग प्रसारासाठी ५९५ किलोमीटर सायकल प्रवास केला होता. तेव्हा एक सामाजिक माध्यम म्हणून सायकलची क्षमता काय आहे, हे जाणवलं होतं. तेव्हा अशी आणखी सायकल मोहीम करायची इच्छा मनात होती. आणि सायकल चालवायची आहे तर एखादा सामाजिक संदेश व सामाजिक उद्दिष्ट असावं, असं वाटत होतं. परभणीचे माझे सायकल मित्र डॉ. पवन चांडक अनेक वर्षांपासून एचआयव्ही विषयाला घेऊन सायकल प्रवास करतात, ते अनेक बाल गृहांना मदतही करतात. तसंच माझी पत्नी आशा दहा वर्षांपासून एचआयव्ही क्षेत्रात काम करते. ह्या दोन्ही गोष्टी जोडून ह्या सायकल मोहीमेची योजना बनवली. १ डिसेंबर जागतिक एड्स निर्मूलन दिन आहे. त्या पार्श्वभूमीवर ह्या प्रवासाचं नियोजन केलं. ह्या मोहीमेची उद्दिष्टे व स्वरूप ह्याविषयी आपल्याला आधीच्या लेखात बोललेलो आहे.

माझी पत्नी आशा ज्या रिलीफ फाउंडेशनमध्ये काम करते, त्या संस्थेने ह्या मोहीमेचं समन्वयन केलं. म्हणजे त्या त्या ठिकाणी असलेल्या टीमसोबत संवाद व त्यांना भेटणं ह्याचं नियोजन केलं. थोडक्यात रिलीफ फाउंडेशनच्या कामाविषयी सांगतो. रिलीफ फाउंडेशन मुख्यत: आरोग्याच्या क्षेत्रात काम करतं. त्यांचा मुख्य फोकस एचआयव्हीवर आहे. त्यासाठी ते आरोग्य शिबिर आयोजित करतात. तसंच एसटीआय व एचआयव्ही टेस्टिंग शिबिर आयोजित करतात. एचआयव्हीची जोखीम असणा-या अनेक गटांबरोबर काम करतात- त्यांची जागरूकता वाढण्यासाठी काम करतात, तसंच त्यांना मदत करून त्यांच्यासोबत कार्यशाळा घेतात. स्थलांतरित कामगारांच्या आरोग्यावर विशेष प्रकारे संस्था काम करते. त्यांच्या कुटुंबांसोबतही संस्था काम करते. कौटुंबिक हिंसा, व्यक्तिगत आरोग्य, वैवाहिक समुपदेशन अशा विषयांवरही संस्थेचं काम चालतं. ह्या सगळ्यासाठी त्यांना हाय रिस्क असलेल्या फिमेल सेक्स वर्कर्स, होमो सेक्सुअल्स, ड्रग्ज घेणारे लोक अशा गटांमध्ये जाऊन अतिशय कठीण परिस्थितीत हे काम करावं लागतं.

आशा जरी ह्या विषयावर दहा वर्षांपासून काम करत असली तरी मला ह्या विषयाचा इतका परिचय पूर्वी नव्हता. सुरुवातीला तर मला वाटायचं की समाजात इतक्या गंभीर समस्या आहेत- बेकारी आहे, गरीबी व शाश्वत विकासाचा अभाव आहे, तेव्हा खरंच एचआयव्हीवर काम करणं गरजेचं आहे का. पण हळु हळु मला हा विषय कळत गेला. एचआयव्ही ह्या विषयाची माहिती होत गेली. माझ्या अनुभवांमधून मी आपल्याशी त्याविषयी बोलेन. एचआयव्ही म्हणजे बहुतांश लोकांना माहित असलेल्या चार गोष्टीच नाही, तर त्यात इतरही अनेक समस्या व गुंतागुंती आहेत. एचआयव्ही असलेल्या मुलांचे वेगळे प्रश्न आहेत; शिक्षणापासून नोकरी व पुनर्वसनापर्यंत अनेक मुद्दे आहेत. आणि सगळ्यांत मोठी गोष्ट म्हणजे एचआयव्ही आणि एड्स समानार्थी शब्द नाही आहेत. एचआयव्ही संक्रमित व्यक्तीसुद्धा योग्य उपचार व योग्य जीवनशैलीद्वारे सामान्य जीवन जगू शकते. एचआयव्हीचं एड्समध्ये रुपांतर होण्याचा कालावधी दीर्घ काळ लांबवता येऊ शकतो. अशा अनेक गोष्टी मला ह्या प्रवासात शिकायला मिळाल्या. आणि व्हायरसबद्दल तर एका ठिकाणी हेही सांगण्यात आलं की, खरा एचआयव्ही व्हायरस तर मनात असलेले चुकीचे गैरसमज हा आहे. समाजाच्या मनात पसरलेला भेदभावाचा व्हायरस हा जास्त हानीकारक आहे... असो.

११ नोव्हेंबरला चाकणला एका छोट्या कार्यक्रमात रिलीफ फाउंडेशनच्या सदस्यांनी मला ह्या मोठ्या सायकल मोहीमेसाठी शुभेच्छा दिल्या. १२ नोव्हेंबरच्या पहाटे चाकणवरून निघेन. अशी सोलो सायकल मोहीम माझ्यासाठी अजिबात नवी नाही. तरीही रात्री शांत झोप लागली नाही. पहाटे उजाडत असताना सव्वा सहाला निघालो. सायकल मोहीमेत पहिले तीन दिवस नेहमीच कठीण जातात. कारण शरीर व मनाला सायकल मोहीमेच्या लयीत यायला वेळ लागतो. आज ८४ किलोमीटर सायकल चालवायची आहे. कोणतीही सायकल मोहीम एक प्रकारे अनिश्चिततेच्या अंधारात मारलेली उडी असते. पण ही अनिश्चितता स्वीकारूनच पुढे जायचं असतं. चाकणवरून निघाल्यावर तुळापूर मार्गे लोणीकंदला पोहचलो. वाटेत छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीला मनातून वंदन केलं. लोणीकंदच्या पुढचा रस्ता माझ्यासाठी पूर्ण नवीन आहे. ह्या प्रवासात जिथे ब्रेक घेईन, नाश्ता करेन, तिथे ह्या विषयावर लोकांशी बोलेन. मी आरोग्य व एचआयव्हीविषयी जागरूकतेसाठी ही सायकल मोहीम करतोय.

केसनंदवरून लवकरच थेऊरला पोहचलो. हे तीर्थ स्थान तर आहेच पण मराठा इतिहास व भारतीय इतिहासामध्ये एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व असलेल्या माधवराव पेशव्यांची समाधीही इथे आहे. पानिपतच्या युद्धानंतर मराठा सत्तेला सावरण्यात त्यांची मोलाची भुमिका होती. छत्रपतींचे अतिशय मोठे वीर सेवक असूनही त्यांचं कार्य आज कमी लोकांनाच माहिती आहे. इथून रस्ता हळु हळु सोलापूर हायवेकडे जातोय. एका ठिकाणी नदीजवळून जाणारा रस्ता बघून माझ्या लदाख़मधल्या सायकल प्रवासाची आठवण झाली.

खूप वेळ इंटेरिअरमधल्या रस्त्यांवर सायकल चालवल्यानंतर हायवे आला. जवळजवळ अर्धं अंतर पूर्ण झालं आहे. उरुळी कांचनला दुसरा ब्रेक घेतला व पुढे निघालो. हायवेवर मस्त वेग मिळतोय. सोबतीला दूरवर डोंगर दिसत आहेत. पुणे- सोलापूर हायवेवर कधीच सायकल चालवलेली नाही. त्यामुळे त्याचा मस्त आनंद घेतोय. अनेक जण माझी सायकल बघून स्लो होतात, जवळ येऊन विचारपूसही करतात. माझ्या टी शर्टवर लिहिलं आहे, 'मी एचआयव्ही तपासणी केली आहे. तुम्ही?' हा प्रश्न वाचून व एचआयव्ही शब्द बघून स्लो झालेले काही जण लगेच फास्ट होऊन निघूनही जात आहेत. मुलं जेव्हा मला सायकल चालवताना बघतात, तेव्हा त्यांच्या डोळ्यात आश्चर्य दिसतं! आरामात पुढे जात राहिलो. पण मध्ये इंटेरिअरच्या रस्त्यावर जास्त वेळ लागला होता. त्यामुळे केडगांव चौफुल्याला पोहचायला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. ८४ किलोमीटर पूर्ण झाले. आज इथेच मुक्काम करेन व उद्या पुढे जाईन. माझी ही सायकल मोहीमही मी माझं रूटीन ऑफीस वर्क- लॅपटॉपवरचं काम करतच करणार आहे. त्यामुळे एका अर्थाने सायकल चालवायला वेळेची मर्यादा आहे. पहाटे उजाडल्यापासून ते दुपारी १२ पर्यंतच सायकल चालवायची आहे. त्यानंतर तिथल्या लोकांना भेटेन, नंतर आराम करेन व माझं कामही करेन. आता चौदा दिवस असंच वेळापत्रक असेल.


पहिल्या दिवशी ८४ किलोमीटर सायकल चालवली.

केडगांव चौफुला अगदीच छोटं गाव असल्यामुळे इथे ह्या विषयावर काम करणारी कोणी संस्था नाहीय. रिलीफ संस्थेच्या एका मित्रांच्या घरी मुक्काम केला आहे. एखाद्या दुकानात किंवा हॉटेलात जाऊन ह्याविषयावर कोणाशी बोलता येईल का, असं त्यांना विचारलं. तेव्हा ते म्हणाले की, इथे ह्या विषयावर बोलता येईल अशी परिस्थिती नाहीय. इथे ट्रक ड्रायव्हर्सचे काही स्पॉट आहेत, पण ते जरा लांब आहेत (एचआयव्हीच्या परिभाषेत ट्रकर्स हाय रिस्क ग्रूपमध्ये येतात). त्यामुळे पहिल्या दिवशी कोणत्या गटासोबत संवाद करता आला नाही. उद्या इंदापूरात एखाद्या कार्यक्रमात कदाचित भाग घेईन. बघूया कसं होतं. पण आज ह्या मोहीमेचा पहिला दिवस छान जातोय. थोडा वेळ जास्त लागला, पण शरीर हळु हळु लयीत येतं आहे. आणि सायकल चालवण्याचा आनंद तर आत्ता फक्त सुरू होतोय. अजूनही अनेक गोष्टी अनिश्चित आहेत- योजनेनुसार पुढे सायकल चालवू शकेन की कुठे बदल करावा लागेल, ठिकठिकाणी लोकांसोबत मला बोलता येईल का नाही. पण रिलीफ फाउंडेशन व आशा त्यासाठी समन्वयन करत आहेत. आणि सायकल हे माध्यम लोकांपर्यंत पोहचतंच पोहचतं. सायकलवर लिहिलेले प्रश्न- 'आपण आपल्या व सर्वांच्या आरोग्याबद्दल जागरूक आहात का?' आणि टी- शर्टवर लिहिलेला प्रश्न- 'मी एचआयव्ही तपासणी केली आहे, तुम्ही?' हे शेकडो लोकांनी नक्कीच वाचले असणार. दुपारी चांगला आराम केला. आजचा थकवा आजच भरून काढायचा आहे. तरच अनेक दिवस सलग सायकल चालवू शकेन. आता उद्या इथून इंदापूरला जाईन.

पुढचा भाग: जे सत्य सुंदर सर्वथा.... (एचआयव्ही व आरोग्य जागरूकता सायकल प्रवासाचे अनुभव): २. केडगांव चौफुला ते इंदापूर

अशा इतर सर्व लेखांसाठी- माझा ब्लॉग

समाजजीवनमानअनुभवआरोग्य

प्रतिक्रिया

चांगल्या उद्देशाने हे काम करता आहात. अत्यंत कौतुकास्पद.

मार्गी's picture

2 Dec 2018 - 10:45 am | मार्गी

धन्यवाद! :)

ट्रम्प's picture

4 Dec 2018 - 7:45 pm | ट्रम्प

खूपच छान !!!!
निस्वार्थी मनाने समाजात आरोग्याबाबत जनजागृती करणाऱ्या आपणास साक्षात दंडवत .