गुळपापडीच्या वड्या

Primary tabs

पद्मावति's picture
पद्मावति in दिवाळी अंक
6 Nov 2018 - 12:00 am

H

गुळपापडीच्या वड्या

नमस्कार मिपाकर मंडळी,
बघता बघता दिवाळी आलीसुद्धा! घरोघरी फराळाचा खमंग सुगंध दरवळत असेल ना! गोड-तिखट फराळाच्या यादीत मी आज आणखी एका गोडाची भर टाकतेय. म्हटली तर सोपी, म्हटली तर कठीण अशी एक पाककृती आपण बघणार आहोत. सोपी यासाठी की घरात हमखास असलेल्या पदार्थांमधून ही पाककृती बनवता येते. कठीण यासाठी की ही पाककृती बर्‍याचदा आपल्या संयमाची परीक्षा बघते. घाईघाईत बनवण्यासारखे हे प्रकरण नाही.

साहित्य
कणीक - एक वाटी
तूप - पाऊण वाटी
गूळ - पाऊण वाटी
बारीक रवा - एक चमचाभर
वेलदोडा पूड - स्वादानुसार

.

कढईमध्ये कणीक टाकून भाजायला सुरुवात करा. वरून तूप टाका.

.

एकदम सगळे तूप टाकण्यापेक्षा भाजण्याच्या एकूण प्रक्रियेत हळूहळू लागेल तसे टाका. ह्या वड्यांमध्ये तूप आपल्याला हवे तसे कमी-अधिक प्रमाणात घालता येते.
अगदी मंद आचेवर कणीक भाजा आणि मिश्रण सतत हलवत राहा. ही भाजण्याची कृती खूप वेळ घेते.

.

कणीक साधारण भाजत आली की त्यातच रवा टाका, म्हणजे कणकेबरोबर तोही भाजला जातो. रव्याने वड्यांना छान टेक्श्चर येते.
कणीक नीट खमंग भाजली गेली की तूप सुटून साधारण अशी सैलसर होते.

.

आता त्यात वेलदोडा पूड आणि चिरलेला गूळ टाका आणि मिश्रण एकत्र किंचित आणखी भाजा, पण अगदी मिनिटभरच. फार नाही. लगेच गॅस बंद करा.

.

एका थाळीला तुपाचा हात लावा आणि कणकेचे मिश्रण थाळीत ओता.
आता हाताला चटके बसत असले तरी मिश्रण गरम असतानाच थापून घ्या. थापून झाले की सुरीने लगेच वड्या पाडा.

.

मग थंड झाल्यावर हळुवार हातांनी प्लेटमध्ये काढून घ्या किंवा डब्ब्यात भरा. नाजूक असतात या वड्या, त्यामुळे जरा जपून.

.

आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा __/\__

.

H

दिवाळी अंक २०१८पाककृती

प्रतिक्रिया

कसल्या भारी दिसताहेत वड्या! पटकन उचलून तोंडात टाकावी वाटतेय :)

अत्रुप्त आत्मा's picture

10 Nov 2018 - 11:46 am | अत्रुप्त आत्मा

प्ल्स वन ! मनोमन हातच गेला थाळीत!

तुषार काळभोर's picture

6 Nov 2018 - 12:54 pm | तुषार काळभोर

नाजूक असतात या वड्या, त्यामुळे जरा जपून.

बरं झालं नाजूक असतात, नाहीतर गुळाचे पदार्थ दाढीची परीक्षा घेऊ शकतात!

अभ्या..'s picture

7 Nov 2018 - 10:57 am | अभ्या..

दाढीची परीक्षा नाही हिंदकेसरी, दाढेची परिक्षा.
दाढीत कण अडकायाचा फिल्टर असेल तर माहीत नाही

तुषार काळभोर's picture

7 Nov 2018 - 12:41 pm | तुषार काळभोर

गुगलचा शहाणपणा!

ही पाककृती बर्‍याचदा आपल्या संयमाची परीक्षा बघते. घाईघाईत बनवण्यासारखे हे प्रकरण नाही.

+१००
जरा इकडे तिकडे झालं तर एकतर अगदी मउ किंवा हातोडीने फोडून खाव्या अशा कडक होतात असा अनुभव कित्येकवेळा घेतला आहे :)

स्वाती दिनेश's picture

6 Nov 2018 - 3:14 pm | स्वाती दिनेश

खूप आवडत्या वड्या.. फारच छान झालेल्या दिसत आहेत ग..
ही पाककृती बर्‍याचदा आपल्या संयमाची परीक्षा बघते. घाईघाईत बनवण्यासारखे हे प्रकरण नाही.
हे मात्र अगदी खरे.. तू मात्र भरपूर वेळ, शांतपणा आणि संयम हाताशी ठेवून वड्या केलेल्या अगदी दिसतच आहेत.
स्वाती

समीरसूर's picture

6 Nov 2018 - 4:07 pm | समीरसूर

अतिशय सुंदर पाककृती आणि फोटोदेखील! मजा आली.

माझी आई अतिशय सुंदर गूळपापडी करते. लहानपणी माझे आजोबा मला भूक लागली तर झटपट गूळपापडी करून द्यायचे. पदार्थ साधाच पण चव मिठ्ठास आणि तोंडभर रेंगाळणारी असते...

सविता००१'s picture

6 Nov 2018 - 6:53 pm | सविता००१

खूप छान दिसताहेत वड्या.

नूतन सावंत's picture

7 Nov 2018 - 10:12 am | नूतन सावंत

वड्या सुरेख झाल्या असतील हे रंग नि पोतच सांगतोय.

अभ्या..'s picture

7 Nov 2018 - 10:59 am | अभ्या..

मस्त इझी पिझझि रेसिपी.
ह्याप्पी दिवाळी पदमाक्का

इझी पिझ्झी ही नाही ओ.. ती दुसरी आहे ;)

वड्या सुंदर दिसत आहेत!

माझी आई या वड्या खूप छान बनवते, पण मी कधीच बनवून पाहिल्या नाहीत. तुझी पाकृ बघून करुन बघेन एकदा.

यात आईचं व्हेरिएशन म्हणजे, ती यात थोडा तुपावर तळलेला डिंक, किसलेले खोबरे घालते आणि वेलचीऐवजी सुंठ पावडर घालते. खास करुन थंडीत डिंकाचे लाडू खाऊन कंटाळा आला तर चांगला पर्याय होतो.

माझीही शॅम्पेन's picture

8 Nov 2018 - 12:55 pm | माझीही शॅम्पेन

आधी तोंपासु कि आधी वारल्या गेलो हे कळेना आता __/\__

जुइ's picture

10 Nov 2018 - 11:06 pm | जुइ

आहाहाहा फारच सुंदर दिसत आहेत वड्या. लगेच तोंडात टाकाव्यात अशा. नक्कीच करून पाहणार. फोटोही खूप सुंदर काढलेत.

निशाचर's picture

11 Nov 2018 - 2:58 am | निशाचर

गुळपापडी आवडते, पण बरीच वर्षं झाली खाऊन. आता करून बघायला हवी.

मस्त झाल्यात वड्या. मी नेहमी लाडू करते वड्या जमतील की नाही खात्री वाटत नाही आता तुझ्या युक्तीने करून पाहते . रूपीच्या आईची ॲडीशन करते...

श्रीरंग_जोशी's picture

18 Nov 2018 - 6:26 am | श्रीरंग_जोशी

वाह, एकदम दिलखेचक आहे ही पाककृती. गुळपापडी एकदम निगुतीने बनवायचा पदार्थ दिसत आहे.
फोटोज अप्रतिम आहेत. फूड फोटोग्राफी दिसते तितकी अजिबात सोपी नसते ही मी नुकतेच शिकत आहे :-) .

अनिता ठाकूर's picture

27 Nov 2018 - 12:45 pm | अनिता ठाकूर

वड्यांचं टेक्श्चर खूप छान दिसतं आहे. ह्यासाठी किती वेळ कणिक भाजावी लागेल ?

सस्नेह's picture

27 Nov 2018 - 2:55 pm | सस्नेह

मुलायम दिसताहेत वड्या !
चव माहिती नाही. कधी खाल्ल्या नाहीत. सवडीने करून पाहते.

पद्मावति's picture

27 Nov 2018 - 6:47 pm | पद्मावति

सर्व प्रतिसाद्कर्त्यांचे मनापासून आभार.
श्रीरंग --तुमच्यासारख्या उत्तम छायाचित्रकाराकडून मिळालेली दाद हि माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे.
अनिता ठाकूर- कणिक भाजायला बराच वेळ लागतो. अंदाजे अर्धा पाऊण तास नक्कीच. भाजतांना आच मंद असावी.
रुपी- वाह, हे आईंचं व्हेरिएशन नक्की करून पाहीन.

पियुशा's picture

30 Nov 2018 - 1:20 pm | पियुशा

शाब्ब्बास लगे रहो :)

मीअपर्णा's picture

2 Dec 2018 - 8:16 am | मीअपर्णा

आवडली रेसिपी आणि फोटो. मी आत्ता करुन पाहिली. अजिबातच जमली नाही. सगळीच फुटली. एक दोन वड्या पडल्या फक्त. तूप घातले त्यापेक्षा जास्त घालू शकणार नाही. त्यामुळे पुन्हा करेन का शंका आहे. :)

धन्यवाद.

हे असले पदार्थ खाउन दिवस काढतोय. त्यामुळे तब्येत रोडावत चालली आहे॥
( फार छान जमल्या आहेत वड्या हे त्याच्या कडांवरून लक्षात येतं.)
सोळा सोमवारचे लाडुसुद्धा छान लागतात.)