Skip to main content

गुळपापडीच्या वड्या

लेखक पद्मावति यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H
गुळपापडीच्या वड्या
नमस्कार मिपाकर मंडळी, बघता बघता दिवाळी आलीसुद्धा! घरोघरी फराळाचा खमंग सुगंध दरवळत असेल ना! गोड-तिखट फराळाच्या यादीत मी आज आणखी एका गोडाची भर टाकतेय. म्हटली तर सोपी, म्हटली तर कठीण अशी एक पाककृती आपण बघणार आहोत. सोपी यासाठी की घरात हमखास असलेल्या पदार्थांमधून ही पाककृती बनवता येते. कठीण यासाठी की ही पाककृती बर्‍याचदा आपल्या संयमाची परीक्षा बघते. घाईघाईत बनवण्यासारखे हे प्रकरण नाही. साहित्य कणीक - एक वाटी तूप - पाऊण वाटी गूळ - पाऊण वाटी बारीक रवा - एक चमचाभर वेलदोडा पूड - स्वादानुसार . कढईमध्ये कणीक टाकून भाजायला सुरुवात करा. वरून तूप टाका. . एकदम सगळे तूप टाकण्यापेक्षा भाजण्याच्या एकूण प्रक्रियेत हळूहळू लागेल तसे टाका. ह्या वड्यांमध्ये तूप आपल्याला हवे तसे कमी-अधिक प्रमाणात घालता येते. अगदी मंद आचेवर कणीक भाजा आणि मिश्रण सतत हलवत राहा. ही भाजण्याची कृती खूप वेळ घेते. . कणीक साधारण भाजत आली की त्यातच रवा टाका, म्हणजे कणकेबरोबर तोही भाजला जातो. रव्याने वड्यांना छान टेक्श्चर येते. कणीक नीट खमंग भाजली गेली की तूप सुटून साधारण अशी सैलसर होते. . आता त्यात वेलदोडा पूड आणि चिरलेला गूळ टाका आणि मिश्रण एकत्र किंचित आणखी भाजा, पण अगदी मिनिटभरच. फार नाही. लगेच गॅस बंद करा. . एका थाळीला तुपाचा हात लावा आणि कणकेचे मिश्रण थाळीत ओता. आता हाताला चटके बसत असले तरी मिश्रण गरम असतानाच थापून घ्या. थापून झाले की सुरीने लगेच वड्या पाडा. . मग थंड झाल्यावर हळुवार हातांनी प्लेटमध्ये काढून घ्या किंवा डब्ब्यात भरा. नाजूक असतात या वड्या, त्यामुळे जरा जपून. . आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा __/\__ . H
दिवाळी अंक वर्ष

वाचने 27228
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

नाजूक असतात या वड्या, त्यामुळे जरा जपून. बरं झालं नाजूक असतात, नाहीतर गुळाचे पदार्थ दाढीची परीक्षा घेऊ शकतात!

In reply to by तुषार काळभोर

दाढीची परीक्षा नाही हिंदकेसरी, दाढेची परिक्षा. दाढीत कण अडकायाचा फिल्टर असेल तर माहीत नाही

ही पाककृती बर्‍याचदा आपल्या संयमाची परीक्षा बघते. घाईघाईत बनवण्यासारखे हे प्रकरण नाही.
+१०० जरा इकडे तिकडे झालं तर एकतर अगदी मउ किंवा हातोडीने फोडून खाव्या अशा कडक होतात असा अनुभव कित्येकवेळा घेतला आहे :)

खूप आवडत्या वड्या.. फारच छान झालेल्या दिसत आहेत ग.. ही पाककृती बर्‍याचदा आपल्या संयमाची परीक्षा बघते. घाईघाईत बनवण्यासारखे हे प्रकरण नाही. हे मात्र अगदी खरे.. तू मात्र भरपूर वेळ, शांतपणा आणि संयम हाताशी ठेवून वड्या केलेल्या अगदी दिसतच आहेत. स्वाती

अतिशय सुंदर पाककृती आणि फोटोदेखील! मजा आली. माझी आई अतिशय सुंदर गूळपापडी करते. लहानपणी माझे आजोबा मला भूक लागली तर झटपट गूळपापडी करून द्यायचे. पदार्थ साधाच पण चव मिठ्ठास आणि तोंडभर रेंगाळणारी असते...

मस्त इझी पिझझि रेसिपी. ह्याप्पी दिवाळी पदमाक्का

वड्या सुंदर दिसत आहेत! माझी आई या वड्या खूप छान बनवते, पण मी कधीच बनवून पाहिल्या नाहीत. तुझी पाकृ बघून करुन बघेन एकदा. यात आईचं व्हेरिएशन म्हणजे, ती यात थोडा तुपावर तळलेला डिंक, किसलेले खोबरे घालते आणि वेलचीऐवजी सुंठ पावडर घालते. खास करुन थंडीत डिंकाचे लाडू खाऊन कंटाळा आला तर चांगला पर्याय होतो.

आहाहाहा फारच सुंदर दिसत आहेत वड्या. लगेच तोंडात टाकाव्यात अशा. नक्कीच करून पाहणार. फोटोही खूप सुंदर काढलेत.

गुळपापडी आवडते, पण बरीच वर्षं झाली खाऊन. आता करून बघायला हवी.

मस्त झाल्यात वड्या. मी नेहमी लाडू करते वड्या जमतील की नाही खात्री वाटत नाही आता तुझ्या युक्तीने करून पाहते . रूपीच्या आईची ॲडीशन करते...

वाह, एकदम दिलखेचक आहे ही पाककृती. गुळपापडी एकदम निगुतीने बनवायचा पदार्थ दिसत आहे. फोटोज अप्रतिम आहेत. फूड फोटोग्राफी दिसते तितकी अजिबात सोपी नसते ही मी नुकतेच शिकत आहे :-) .

मुलायम दिसताहेत वड्या ! चव माहिती नाही. कधी खाल्ल्या नाहीत. सवडीने करून पाहते.

सर्व प्रतिसाद्कर्त्यांचे मनापासून आभार. श्रीरंग --तुमच्यासारख्या उत्तम छायाचित्रकाराकडून मिळालेली दाद हि माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. अनिता ठाकूर- कणिक भाजायला बराच वेळ लागतो. अंदाजे अर्धा पाऊण तास नक्कीच. भाजतांना आच मंद असावी. रुपी- वाह, हे आईंचं व्हेरिएशन नक्की करून पाहीन.

आवडली रेसिपी आणि फोटो. मी आत्ता करुन पाहिली. अजिबातच जमली नाही. सगळीच फुटली. एक दोन वड्या पडल्या फक्त. तूप घातले त्यापेक्षा जास्त घालू शकणार नाही. त्यामुळे पुन्हा करेन का शंका आहे. :) धन्यवाद.

हे असले पदार्थ खाउन दिवस काढतोय. त्यामुळे तब्येत रोडावत चालली आहे॥ ( फार छान जमल्या आहेत वड्या हे त्याच्या कडांवरून लक्षात येतं.) सोळा सोमवारचे लाडुसुद्धा छान लागतात.)