श्रीगणेश लेखमाला - || केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे ||

शंकर उणेचा's picture
शंकर उणेचा in लेखमाला
22 Sep 2018 - 8:52 am

.

|| केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे ||
अर्थातच
'DIY' ## Do It Yourself ##

हे बडी!!
व्हॉट्स अ‍प ड्यूड!!
गोइंग कूल!!
ओह शिट यार!!

इंग्लिश शब्दांच्या या अतिक्रमणाला जरी 'वेळेची गरज' असं म्हणून आपण 'वेळ मारून नेली',
तरी एक खंत कायमची मनात राहते...
खंत आपल्यातील अस्सलपणा हरवत चालल्याची,
खंत मातीच्या धुंद करणाऱ्या वासाची जागा कुठल्यातरी इंपोर्टेड बॉडी स्प्रेने घेतल्याची,
खंत अस्सल देशीपणाचा खमंग वास देणाऱ्या शब्दांना केवळ गावठी वाटतात म्हणून सोडून दिल्याची.

कदाचित हीच 'खंत' टोचत असेल आणि म्हणूनच की काय # 'मिसळपाव' # म्हणजेच # मि.पा.#
नावाचं अस्सल मराठी संकेतस्थळ सुरू केलं.
'मिसळपाव' या नावातच एक वेगळा खमंगपणा आहे. एक वेगळा अस्सलपणा आहे.
नुसतं नाव घेतलं, तरी कट्ट्यावरची तर्री, ताज्या पावाची लादी, फरसाणाची वाटी, बारीक चिरलेला कांदा आणि
या सगळ्यावर आडवा हात मारताना
चवीला असणारे चर्चेचे अनेक विषय...

तिथे त्या कट्ट्यावर जी चर्चा व्हायची, जे निर्णय घेतले जायचे, जे नियोजन ठरायचं, ते जगात कुठेच एवढ्या अस्सलपणे ठरणार नाही अथवा घेतलं जाणार नाही,
पण त्याकरिता मॅकडी, पिझा, कॅफे आणि बर्गर सोडून 'मिसळपाव'वर आडवा हात मारायलाच जायला पाहिजे.

कदाचित संसाराच्या तथाकथित जबाबदार्‍या सांभाळताना अथवा पेलताना ह्या कट्ट्यापासून आपण जर दूर दूर जाऊ लागलो, मनात असूनही मिसळीवर ताव मारतानाचा चर्चेचा आडवा हात फिरेना,
त्यामुळेच मिसळपाव ही कट्टा संस्कृती जिवंत राहण्यासाठी ती चर्चा, तो अनुभवांचा फड घरबसल्या सगळ्यांना मिळण्यासाठी 'मिसळपाव' हे अद्ययावत मराठी संकेतस्थळ सुरू केलं असावं.

महाराष्ट्रातीलच नव्हे, तर संपूर्ण जगभरातील अनेक नामवंत व्यक्ती आज 'मिपा'वर आहेत आणि विविध विषयांवर त्यांचे लेख, माहिती आणि चर्चा मिपावर सढळ हाताने वाढलेली मिळते.

आज १२व्या वर्धापनदिनानिमित्त मलाही माझा अनुभव लिहायची संधी मिळाली, हे माझं भाग्यच आहे .

मिपाबद्दल प्रशांतकडून माहिती मिळाली. प्रशांतची आणि माझी ओळख ICCमध्ये - म्हणजेच इंडो सायकलिस्ट क्लबमध्ये एक इव्हेंटमध्ये झाली.
ICCने आयुष्यात खूप काही दिलं, त्याची गणना खरोखर शब्दामध्ये करणं अशक्य आहे.
त्यातलाच एक हिरा म्हणजे प्रशांत तायडे!
अत्यंत मितभाषी आणि सदा हसऱ्या चेहऱ्याने कोणालाही मदत करायला तयार असणार प्रशांत पहिला की याच्यासारखा आपला मित्र - किंबहुना भाऊ - आहे, हे पाहून अभिमान वाटतो.
त्याचं प्रत्येक काम अगदी परफेक्ट असतं, म्हणूनच त्याच्या सायकलिंगची पोस्ट पाहिली की "आला परफेक्ट प्रशांत" असं म्हणत त्याचं नामकरणच 'परफेक्ट प्रशांत' असं करून टाकलं आणि त्यानेसुद्धा दादाने दिलेलं नाव हसत हसत स्वीकारलं.

हां, तर सायकलिंगवरून मुद्दाम सांगावंसं वाटतं, ते म्हणजे आमच्या प्रेमाचं चाक सायकलीने फिरवलं अगदी जोरात आणि असं की आता ते काही थांबेल असं मला तरी वाटत नाही.

२०१७ साली १४५ किलो वजन घेऊन ICCच्या 'हाइक एन बाइक'च्या इव्हेंटमध्ये मी शरीराचा सगळा डोलारा संभाळात कसाबसा साधारण दहा ते पंधरा किलोमीटर सायकल चालवीत घोरवडेश्वर सर केला.

1

आणि तेव्हापासून ICCच्या परिवारात सामील झालो. सगळ्यात जाड माणूस म्हणून मी सगळ्यांच्या लक्ष्यात राहिलो होतो. आता परिवारात - म्हणजेच व्हॉट्स अ‍ॅप ग्रूप, फेसबुकवरचे ग्रूप यात सामील होणं आलंच ना. आणि मग या परिवारातील सगळ्यांनीच मला आपलंसं करून घेतलं. म्हणजे माझ्यासारख्या जाड माणसाला.

मग ठरवलं - आपणही फिट होऊ, किमान स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवण्याइतपत तरी सायकल चालवू. आणि मग सुरू झालं सगळं.
मग या ग्रूपमधून रोज सगळ्यांचे अपडेट बघायचे आणि मग आपण आपल्या स्वतःलाच प्रेरणा देत पॅडल मारत राहायचं.
मग जशी जशी तुमची इच्छा प्रबळ होत जाते,
तसं तसं तुमचं ज्ञान आणि विषयाची भूक वाढत जाते. मग तुम्हाला आणखी काही तरी पाहिजे असतं. पुढचं काहीतरी हवं असतं आणि ही भूक असणं अत्यंत उत्तम आणि गरजेचं आहे.

माझी ती भूकच मला ICC अ‍ॅटिव्ह ग्रूपपर्यंत घेऊन गेली. या ग्रूपवर तुमचं वर्क आउट तुम्ही पोस्ट करायचं आणि मग तुम्ही केलेल्या सायकलिंग, स्विमिंग आणि रनिंग यावर एक पॉइंट सिस्टिमनुसार पॉइंट मिळत जाऊन तुमचा त्या त्या महिन्याचा रँक, म्हणजेच नंबर ठरतो. आणि मग तीन महिन्यांचा एकत्रित डेटा घेऊन त्या त्रैमासिकाचा विजेता घोषित केला जायचा.

हे सांगण्याचा उद्देश हा की जोपर्यंत तुम्ही तुमच्या फुटबॉल ग्राउंडवरचा 'गोल पोस्ट' ठरवत नाही,
तोपर्यंत 'मेरेडोना' असो नाहीतर 'मेसी' असो, गोल मारणार कुठे ???? गोल पोस्टच नाही!
तर मग अशा पद्धतीने प्रथम उत्तम आरोग्याचे गोल ठरवून मी माझी वाटचाल चालू केली.

माझ्याकडे अत्यंत साधी सायकल होती. म्हणजे आजही अत्यंत साधी MTB आहे. मला खरोखर अगदी बेसिक कन्सेप्टही माहीत न्हवत्या,
मला सायकलबद्दल तर काहीच माहिती नव्हती.
माझ्या रोजच्या सरावात, माझ्याएवढ्या वेगाने मागे राहणारं कोणी नव्हतं,
फक्त माझ्याकडे होती ती एक जिद्द आणि एक ध्यास की हे करायचंच.
तुम्ही असं तुमच्या मनात ठरवलं ना, की मग जगातली कुठलीच शक्ती तुम्हाला रोखू शकत नाही.
आणि जोपर्यंत तुमच्या मनात तुम्ही ठरवत नाही, तोपर्यंत जगातली सगळी शक्ती तुमच्याकडे असूनही ती व्यर्थ आहे.

मग काय, आधी 'वेळ' मोजायचो........
आज अर्धा तास चालवली, उद्या चाळीस मिनिटं, परवा पन्नास मिनिटं...
मग भूक वाढत गेली.
मग स्ट्रवावर किलोमीटर मोजले जाऊ लागले,
मग स्पीड बघितला जाऊ लागला,
मग एलिव्हेशनकडे नजर फिरू लागली,
आणि मग एक ना दोन, रोज वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी होऊ लागल्या. सुट्टीच्या दिवशी मग लांबच्या सफरी होऊ लागल्या आणि आपोआपच १४५चा काटा १४०, १३५मार्गे १२५वर येऊन थांबला.
2
जेव्हा तुम्ही केलेल्या प्रयत्नांना यश येतं ना, तेव्हा प्रयत्नांची ताकद वाढते आणि अपयशाची चिंता आणखी खोल जाऊन पडते आणि मग तुम्ही सुटता आणखीनच भन्नाट.

पण हे सगळं करताना मी दोन गोष्टींची खूप काळजी घेतली.
एक म्हणजे या गोष्टीतून खूप आनंद घेत राहिलो, कारण त्याशिवाय जगात हीच काय, कुठलीच गोष्ट करू नये

3
9

5
आणि दुसरं म्हणजे कधीच कोणाशीही स्वतःची तुलना नाही केली. पण स्वतःबरोबरची स्पर्धा कधीच सोडलीही नाही!
मी माझी स्वतःबरोबर स्पर्धा सुरू केली. रोज स्वतःला जिंकायचं.
आदल्या दिवशीच्या मला रोज, मी दुसऱ्या दिवशी मागे टाकायचो.
कालच्या तुम्ही केलेल्या कामापेक्षा आजचं तुमच थोडं तरी जास्त असावं.
बस, या अत्यंत साध्या अशा या दोन तत्त्वांची कास धरून मी आज १०० किलोपर्यंत पोहोचलो.
12
दीड वर्षांचा हा प्रवास अत्यंत मोहक,
घामाने भिजलेला ,
आनंदाने ओथंबलेला,
यशाने भारावलेला,
अनुभवाने रंजक झालेला, आणि कदाचित इतराना एखाद्या काजव्याप्रमाणे छोटीशी वाट दाखवणारा ठरेल.

दीड वर्षाच्या या प्रवासात आख्खा महाराष्ट्र पालथा घातला - अष्टविनायक केले, गोव्यापर्यंतही जाऊन आलो, सेंच्युरी राइड, डबल सेंच्युरी राइड, सगळे घाट आणि आता आता एक दिवसात ३५० किलोमीटरचा टप्पा पार पाडत जवळपास १२००० किलोमीटरचा प्रवास केला.
10
वर सांगितलेल्या 'हाइक अन बाइक' इव्हेंटच्या वेळी चिंचवडहून भक्ती शक्ती चौकात मी सायकल अ‍ॅक्टिव्हावर घेऊन गेलो होतो. अंतर होतं '४' किलोमीटर. का? तर पुढच्या १० किलोमीटरला दमायला नको. तिथून इथपर्यंत आलो, अजून दमलो नाही.

ऋणी आहे सगळ्यांचा.
माझा परिवार,
ICC परिवार,
स्वानंद परिवार,
सगळे मित्र आणि मैत्रिणी, जे कायम पाठराखण करायला येतात.

ऋणी आहे त्या परमेश्वराचा की त्याने इतकं सुंदर आयुष्य दिलं आणि ते नीट ठेवण्याची योग्य बुद्धी योग्य वेळी दिली.
ऋणी आहे या निसर्गदेवतांचा.
हे कायम आमच्या स्वास्थ्यासाठी ठाण मांडून उभे आहेत एकदम 'स्वस्थ'!!!!!
ते पर्वत, त्या टेकड्या, ते समुद्र, त्या नद्या, ते डोंगर, त्या दर्‍या, ते रस्ते, त्या वाटा, ज्या म्हणतात - "या, आम्ही आपलेच आहोत!!"
7 8

9
फक्त तुम्ही ठरवा आणि करा
कारण तुमचं तुम्हालाच करायचं आहे.
आम्ही पाणी देऊ शकू, पण तहान नाही देऊ शकणार. ती तुमची तुम्हालाच लागली पाहिजे.
आम्ही पाण्याजवळ नेऊ, पण पाणी नाही पाजू शकणार. ते तुमचं तुम्हालाच प्यावं लागेल.
मग करून तर बघा होतंय की नाही ते!
कारण झाल्यानंतर तुम्ही लिहिलेला तुमचा लेख, यापेक्षाही उत्तम असेल, यापेक्षाही पुढचा असेल,
आणि
यातून जसे तुम्ही एकटे करायला लागला, तसं त्यातून हजारो करायला लागतील. हे वाचून तुम्ही एकाने जरी आठवड्यातून एकदा तरी स्वतःसाठी उत्तम व्यायाम केला, सायकल चालवली अथवा मस्त पाण्यात डुबकी मारली, तरी मला माझी 'रॉयल्टी' नक्की मिळेल!!

चला तर, मग वाट बघतोय तुमच्या अभिप्रायाची!!
आणि हो, माझ्या 'रॉयल्टीची'!!

13

धन्यवाद!
शंकर उणेचा
९८२२४५६५९५
१९.०९.२०१८.

श्रीगणेश लेखमाला २०१८

प्रतिक्रिया

Abhay Khatavkar's picture

26 Sep 2018 - 2:54 pm | Abhay Khatavkar

खुपच छान आणि दुसऱ्यांना उत्साही करणारा लेख

साबु's picture

26 Sep 2018 - 3:53 pm | साबु

खुप भारी.._/\_

नाखु's picture

28 Oct 2018 - 2:26 pm | नाखु

आजच्या सकाळमध्ये दहा हजार किलोमीटर पूर्ण केले याबद्दल बातमी आली आहे छायाचित्र सह , पुन्हा एकदा शुभेच्छा

पिंपरी-चिंचवड मिपाकर नाखु पांढरपेशा