कथा पाचवी - बहादुर शाह ज़फ़र व नानासहेब पेशवे

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
7 Aug 2018 - 5:17 pm

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

कथा पहिली - "कुलसूम ज़मानी बेगम...."
दुसरी कथा - गुलबानो
कथा तिसरी - शहजादी
चवथी कथा - नर्गिस नजर

बहादुर शाह ज़फ़र व नानासाहेब पेशवे

माझ्या स्वर्गवासी आईने आपल्या वडिलांकडून म्हणजे हजरत शाह गुलाम हसन साहेब यांच्याकडून ऐकलेली ही हकिकत आहे.

ज्या दिवशी बहादुर शाह दिल्लीच्या लाल किल्ल्यातून निघाले ते सरळ हजरत निजामुद्दीन औलियाच्या दरग्यावर आले. त्यावेळी बादशाहाला फारच नैराश्य आले होते. ते भयंकर घाबरलेले होते. काही बाजारबुणगे आणि पालखी उचलणारे भोई हे सोडल्यास इतर कोणी स्वार ही बरोबर नव्हते. त्यांचा चेहरा उतरला होता आणि त्यांच्या पांढर्‍याशुभ्र दाढी वर माती आणि धूळ जमा झाली होती.

बादशाह तेथे आल्याची बातमी ऐकून नानासाहेब तेथे हजर झाले. त्यांनी पाहिले की मजारच्‍या दरवाजाला डोके टेकवून बादशाह बसले आहेत, चेहरा पडलेला, डोळ्यात चिंता आहे. ते दृष्‍य पाहून त्‍यांच्‍या जिवाची घालमेल झाली..डोळ्‍यात अश्रू तरळले पण आता वेळ नव्हता...पण त्यांना पाहिल्यावर त्‍यांच्‍या चेहर्‍यावर नेहमीप्रमाणे हसू पसरले. मग म्हणाले,

‘‘ मी तुला पहिल्यांदाच सांगितले होते की हे नालायक बंडखोर शिपाई अडेलतट्टू आहेत आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणे चूक आहे. स्वत: तर बुडतीलच पण मला घेऊन बुडतील. शेवटी तेच झाले. निघून जा... मी जरी मोह माया त्याग केलेला एक फकीर असलो तरी माझ्यात तेच रक्त आहे ज्याच्यात शेवटपर्यंत लढण्याची हिंमत आहे. माझ्या बापजाद्यांवर यापेक्षाही वाईट प्रसंग कोसळले पण त्यांनी हिंमत सोडली नाही. पण मला तर माझ्या समोरच माझा अंत दिसतोय. दिल्लीच्या तख्तावरील मी तैमुरचा अखेरचा वंशज आहे यात आता काही शंका उरली नाही. मुघलांची सल्तनत शेवटचे आचके देत आहे...काही काळाचाच काय तो प्रश्न. मग मी विनाकारण खूनखराबा का करायला सांगू ? म्हणूनच मी किल्ला सोडून इथे निघून आलो. शेवटी हा मुलुख खुदाचा आहे, त्याला पाहिजे त्याला देईल नाहीतर बरबाद करेल. त्याची मर्जी. अनेक दशके आमच्या वंशाने हिंदुस्थानवर आपले चलन चालवले आता दुसर्‍याची पाळी असेल तर तसे होऊ देत. ते हुकमत चालवतील स्‍वत:ला बादशाह म्हणवून घेतील. ठीक आहे. त्यात वाईट वाटण्यासारखे काही नाही. नाहीतरी आम्हीही दुसर्‍यांचे राज्य खालसा करून आमचे राज्य स्थापन केले आहे ना !’’

अत्यंत निराश मनाने हे उद्‌गार काढून त्यांनी एक पेटी नानासाहेबांच्‍या हातात दिली आणि म्हणाले,

‘‘ ही दौलत आता तुमच्या हवाली करतोय !’’

‘‘ अमीर तैमूरने जेव्हा कॉन्‍स्‍टनटाईनवर विजय मिळवला तेव्हा सुलतान जलदरम बायजीदच्‍या खजिन्‍यातून ही वस्तू त्‍यांच्‍या हातात पडली. याच्यात हुजूर हजरत मुहम्मदाच्‍या मुबारक दाढीतील पाच केस आहेत. हे आजवर आमच्‍या खानदानात अत्यंत पवित्र म्हणून सांभाळले गेले आहेत. आता माझ्याकडे ना जमिनीवर जागा आहे ना आकाशात ! आता ही पवित्र वस्तू घेऊन कुठे हिंडू? तुमच्या शिवाय आता यावर कोणाचा हक्क असेल असे मला वाटत नाही. तुम्हीच याचा सांभाळ करू शकता आणि तो तुमचाच हक्कही आहे. दिवस भयंकर आहेत, माझ्या प्राणापेक्षाही प्रिय अशी ही वस्तू मी तुमच्या स्वाधीन करतोय. ती वस्तू आजवर आमच्या खानदानापासून कधीही दूर गेलेली नाही. त्याचा सांभाळ करा.’’

नानासाहेबांनी ती पेटी घेतली आणि दर्गा शरीफच्या खजिन्यात ठेऊन दिली. ती पेटी आजही तेथे आहे आणि इतर पवित्र वस्तूंप्रमाणे दर वर्षी सन हिजरीच्या तिसर्‍या महिन्यात श्रद्धाळूंसाठी दर्शनासाठी बाहेर काढली जाते.

बादशहा नानासाहेबांना म्हणाले की तीन दिवसांपासून जेवायला वेळच मिळाला नाही. तुमच्या घरी काही असेल तर घेऊन या. नानासाहेबांनी उत्तर दिले,

‘‘ आम्हीही मृत्यूच्या जबड्यात उभे आहोत. कुठल्याही क्षणी आमची कत्तल होऊ शकते. अन्न तर आता तयार करता येणार नाही. घरी जाऊन पाहतो काही आहे का ते. असल्यास लगेचच हजर करतो. मी तर म्हणतो तुम्हीच माझ्याबरोबर चला. जोपर्यंत मी आणि माझी मुले जिवंत आहेत तोपर्यंत तुमच्या केसाला बोटही लावण्याची कोणाची हिंमत होणार नाही. आम्ही मेल्यावरच ते संभव आहे.’’

बादशाह म्हणाले,
‘‘ आपण हे म्हणताय हे आमच्यावर उपकार आहेत पण या जर्जर शरीरासाठी तुमच्या तरुण मुलांची कत्तल होणे हे मला बिलकूल मान्य नाही. दर्शन झाले आहे, अमानत तुमच्याकडे सोपवली आहे. आता औलियाच्या कृपेनेच त्याच्या लंगरमधे दोन घास मिळतात का ते पाहातो. मग हुमायुंच्या मकबर्‍याला जाईन म्हणतो. तेथे नशिबात जे असेल ते होईल.’’

नानासाहेब घरी आले आणि त्यांनी काही खाण्यास आहे का हे विचारले. त्यांना उत्तर मिळाले,

‘‘ पिठले व सिरका घातलेली चटणी आहे.''

त्यांनी एका तबकात रोटी, पिठले व चटणी घेतली. एका मखमली कापडात ते अन्न झाकले व बादशहाकडे घेऊन आले. बादशहाने पिठल्‍याबरोबर व चटणीबरोबर चण्याची रोटी खाल्ली व तीन तासाने पाणी प्राशन केले आणि त्या अन्नासाठी परमेश्वराचे आभार मानले.

त्यानंतर हुमायुंच्या मकबर्‍यावर गेले जेथे त्यांना अटक झाली.

दुसर्‍याच दिवशी त्यांची रवानगी रंगूनला झाली. तेथेही त्यांनी उरलेले आयुष्य दर्वेश्‍यासारखे व्यतीत केले...

अनुवाद : जयंत कुलकर्णी
मूळ लेखक : शम्सुल-उलेमा ख्वाजा हसन निज़ामी दहेलवी

कथालेख

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

7 Aug 2018 - 6:05 pm | तुषार काळभोर

इंग्रजांच्या आक्रमणानंतर ज्यांनी त्यांचे मांडलिकत्व स्वीकारले नाही, अशा बहुतेकांची अशीच गत झाली असेल.

मराठेशाही आणि मोगलशाही च्या शेवटच्या राजांची अखेर हृदयद्रावक झालेली दिसतेय , पण कुलकर्णी सर ही कथा खूपच आटोपशीर वाटली .
जमलं तर नाना साहेब पेशव्याचं पुढे काय झालं ते पण येऊ द्या .

जेम्स वांड's picture

7 Aug 2018 - 10:18 pm | जेम्स वांड

मन हेलावून गेलं, कुठं एक दख्खनी ब्राह्मण एका मुगल मुसलमानासाठी आसवं घेऊन पिठलं भाकरी घेऊन पळतोय, कुठे औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्याच्या कुळातील शेवटला वंशज "राज्य बळकावून घेतलं होतं ते तसंच जाणार होतं" हे हताश पण शांतपणे कबूल करतोय, सगळंच न्यारं. हा देश अजब आहे राव! मानलं तुमच्या अनुवादाला खूपच अप्रतिम. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर विश्वास पाटलांच्या महानायक मधली बहादूरशहाच्या अटकेची वाक्य आठवली अन भडभडून रडायलाच आलं. ती वाक्य खालीलप्रमाणे (काहीशी)

जाण्यापूर्वी एकदा वळून त्याने आपल्या प्रजेकडे पाहिले, सगळेच लाचार, शस्त्रहीन झालेले होते, बहादूरशहाच्या मनातला बंडखोर शायर जागा झाला आणि त्याच्या तोंडून वाक्ये निघाली

"गाझीओ में खुशबू जब तलक रहेगी इमान की
तख्त ए लंदन तक चलेगी तेग हिंदोस्ता की"

बबन ताम्बे's picture

7 Aug 2018 - 10:25 pm | बबन ताम्बे

इंग्रजांनी महाराष्ट्रातले किल्ले उध्वस्त केल्याच्या घटनेला 200 वर्षे झाली.
पडके किल्ले पाहून खूप दुःख होते.
श्री. जयंत कुलकर्णी,
आपल्या आत्ता पर्यंतच्या सर्व कथा वाचल्या. खूप छान वर्णन . जे विरुद्ध गेले त्यांचं ब्रिटिशांनी नामोनिशाण मिटवलं. नशीब ताजमहाल तसाच ठेवला.

ताज महाल तिकडे न्यायचा विचार होता त्यांचा
आपल्या सुदैवाने ते घडले नाही

प्रसाद_१९८२'s picture

8 Aug 2018 - 12:06 pm | प्रसाद_१९८२

हे कसे काय शक्य झाले असते इंग्रजांना?
--
संपूर्ण ताजमहाल बोटीत टाकून नेणार होते की काय !

जेम्स वांड's picture

8 Aug 2018 - 1:51 pm | जेम्स वांड

एक प्रकरण होतं इंग्लंडात. ह्या बेंथमला 'उपयोगीतावादाचा' जनक मानलं जातं. इंग्रजीत त्याला 'युटीलिटेरियनिझम' असे सणसणीत नाव आहे, ह्याचं मूळ तत्व एकच, प्रत्येक गोष्ट फक्त तिच्या "उपयोगात आणता येण्याच्या शक्यतेनुसारच महत्वाची का कुचकामी, हे ठरवणे" , अश्या ह्या बेंथमचे शिष्य बेंथमाईट्स म्हणवत. असाच एक इंग्रजी गव्हर्नर जनरल होता (बहुतेक वॉरन हेस्टिंगच, कालौघात नाव विसरलोय) त्याच्या मते ताजमहालची 'उपयोगिता' शून्य होती , तसंही उपयोगीतावादात सौंदर्यशास्त्र, सौंदर्य रसग्रहण वगैरेंना स्थान नसते, ज्यामुळे ह्या साहेबांचे मत असे होते की ताजमहाल पाडून टाकावा, त्यातील उत्तम मकारणा खाणीतील संगमरवर मात्र नीट लादी बाय लादी काढून घ्यावा आणि त्याचा रीतसर लिलाव करून पैका करावा (इतकाच काय त्या इमारतीचा(?) उपयोग)

जेम्स वांड's picture

8 Aug 2018 - 1:55 pm | जेम्स वांड

थोडे गूगल कार्य करता तो गव्हर्नर जनरल "विल्यम बेंटिक होता" असे समजते.

अनिंद्य's picture

8 Aug 2018 - 12:05 pm | अनिंद्य

ही कथाही उत्तम. _/\_

दिल्लीतील शेवटच्या दिवसात बादशाह बहादुरशहा तासनतास निझामुद्दीन औलियाच्या कबरीजवळ बसून अश्रू ढाळत असे, अनेकदा ओकसाबोक्षी रडत असे असे वाचलेय. पुढे त्याला रंगून आणि नानासाहेबांना नेपाळ असा विजनवास मिळाला.

पुढील कथांच्या प्रतीक्षेत.

अनिंद्य

मराठी कथालेखक's picture

8 Aug 2018 - 12:46 pm | मराठी कथालेखक

कथा आवडली. पण कधीची आहे , म्हणजे इसवी सन काय ?

जेम्स वांड's picture

8 Aug 2018 - 1:44 pm | जेम्स वांड

१८५७ हो १८५७

जयंत कुलकर्णी's picture

8 Aug 2018 - 1:50 pm | जयंत कुलकर्णी

:-(

चौथा कोनाडा's picture

8 Aug 2018 - 4:45 pm | चौथा कोनाडा

एक अनोखा पदर उलगडून दाखवणारी ही कथा आवडली.

ह्या साऱ्या कथा वाचताना फार खिन्न वाटते.
तुम्ही उत्तम अनुवाद करत आहात पण हे सारे फार उद्वेग देणारे आहे खरेच..

एकेका व्यक्तीच्या पातळीवर ह्या गोष्टी शोकात्म वाटतात पण राजा म्हणून ऐश्वर्य भोगण्याची लायकी मुघलांनी कधीच गमावली होती. आधी मराठ्यांच्या आणि नंतर इंग्रजांच्या मेहेरबानीवर हा मुघल राजपरिवार जगत होता. त्यांनी संपूर्ण भारत आपले राज्य आहे वगैरे समजणे तर हास्यास्पद होते. स्वतःच्या महालाचेदेखील संरक्षण करण्याची त्यांची शक्ती नव्हती. अगदी १८०२-१८०३ मध्ये इंग्रजांपासून लाल किल्ल्याचे रक्षण करण्यासाठी शिंद्यांचे मराठी सैन्य लढले. बहादूरशहाने जर इंग्रजांच्या विरुद्ध बंडात भाग घेतला तर त्याची किंमत चुकवणे भाग होते. जर मनाविरुद्ध भाग घेतला असेल, तरी स्वतःच्या मर्जीने बंडात भाग न घेण्याचेही सामर्थ्य ज्याच्यात नव्हते अशा व्यक्तीला आणि त्याच्या परिवाराला राजाचे ऐश्वर्य भोगण्याचा काय अधिकार? मुघलांनी सिंहासन मिळवताना अगदी आपल्या भावांच्या कुटुंबांच्या ज्या कत्तली केल्या त्यापेक्षा इंग्रज ह्यांच्याशी बरेच बरे वागले. अगदी साक्षीपुरावे करून मगच शिक्षा दिल्या. बायकांना काही केले नाही. त्यांच्या परिवारातल्या कित्येकांना दरमहा दहा रुपये (त्या काळात ही चांगलीच रक्कम होती) पेन्शन दिली. तरीही काम करून सामान्य सुखकर आयुष्य जगण्याची ह्या लोकांना संधी होती. आम्ही फक्त राजपरिवारातले असल्यामुळे आम्हाला काही न करता सुखासीन जगायला मिळावे अशी अपेक्षा कशी पूर्ण होणार?
ही मंडळी लायकी नसताना हस्तिदंती मनोऱ्यात राहत होती आणि धाडकन जमिनीवर आली. सामान्य लोकांप्रमाणे सुखाचा चरितार्थ करण्यासाठी जी कौशल्ये लागतात ती कधी ह्यांनी संपादन केली नव्हती. स्त्रियांची परिस्थिती मात्र पूर्णपणे दैवाधीन होती. ऐश्वर्य भोगणे हे सुद्धा वडील किंवा नवऱ्यावर अवलंबून आणि जमिनीवर आल्यावर सुद्धा स्वतः काही उद्योगधंदा करण्याच्या संधी स्त्रियांना नव्हत्या. त्यांनी पूर्वायुष्यात मिळालेल्या ऐश्वर्यासाठी नशिबाला धन्यवाद द्यावे की उत्तरायुष्यातल्या परवडीसाठी बोल लावावा हा पेला अर्धा भरलेला आहे की रिकामा अशासारखा प्रश्न आहे.

शलभ's picture

12 Aug 2018 - 9:01 pm | शलभ

+1

पुंबा's picture

13 Aug 2018 - 2:03 pm | पुंबा

++११११

अभ्या..'s picture

12 Aug 2018 - 4:16 pm | अभ्या..

स्ट्रीट सिंगर मध्ये कुंदनलाल सैगलनी म्हणलेले "बाबुल मोरा नैहर छुटो जाय" हे अवधच्या नबाब वाजिद अलि शाहनी लिहिलेले शब्द आठवले.
त्या गाण्याचे कुणीसे रसग्रहण केलेले वाचले होते. त्या लेखात हा असाच प्रसंग होता बहुतेक.

सतिश गावडे's picture

12 Aug 2018 - 7:48 pm | सतिश गावडे

मन खिन्न झाले ही कथा वाचताना. परकीय आक्रमकांनी आपल्या देशातील दोन राजसत्तांची ज्या पद्धतीने अखेर केली ती वाचून वाईट वाटले.