✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मा.ल.क.-४

श
शाली यांनी
गुरुवार, 06/21/2018 - 21:19  ·  लेख
लेख
प्रवासात रस असल्याने त्याच्या आयुष्यातला बराचसा कालखंड हा प्रवासातच व्यतीत झाला होता. अनेक भुभाग, अनेक देश, त्यांचे रितीरिवाज, संस्कृती, भाषा, कला पहात तो बराच फिरला होता. आज मात्र दिवसभर चालूनही त्याला थकवा आला नव्हता. कारण आजुबाजूचा सधन शेती, निसर्ग असलेला भाग, त्या भागातून जाणारा रस्ता, रस्त्यातील विश्रांती स्थळे, पाणपोया या सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेतलेली दिसत होती. तो शहराच्या प्रवेशद्वारावर पोहचला तेंव्हा पहारेदारांनी अत्यंत नम्रपणे पण कसोशीने त्याची चौकशी करुन त्याला शहरात प्रवेश दिला होता. “राजधानीचे शहर असल्याने काटेकोर चौकशी करावी लागते” असे सांगत त्यांनी दिलगीरी व्यक्त केली होती. सोबतच शुभेच्छा द्यायलाही ते सैनिक विसरले नव्हते. हे सौजन्य तो प्रथमच अनुभवत होता. राजा अत्यंत कर्तव्यदक्ष होता. त्यामुळे “जशी राजा, तशी प्रजा” या न्यायाप्रमाणे सगळीच प्रजा आनंदी, सुखी होती. शेतीत अनेक प्रयोग सुरु होते. ऊत्पादनात वाढ होत होती. दर्जा सुधारत होता. ऊत्तम दळण-वळणामुळे व्यापार चढता होता. शस्रशाळेत वेगवेगळी शस्रे तयार होत होती. अश्वांच्या वेगवेगळ्या जातींचे संकर घडवून अधिक दमदार अश्वांचे बिज तयार केले जात होते. त्याबरोबरच साहित्यीक, गायक, चित्रकार, मुर्तीकार आणि ईतरही कलांना राजाश्रय असल्याने सगळ्याच कला आणि कलाकार बहरत होते. कधी काळी निर्माण होणारा एखादा वाद सामान्य सरकारी अधिकाऱ्याच्या मध्यस्थीतीने मिटत होते. आणि या सर्वांवर राजाचे वैयक्तिक, बारकाईने लक्ष होते. त्याला शहराच्या रस्त्यावरुन फिरताना हे सगळे जाणवत होते, दिसत होते. असेच फिरताना त्याला दोन व्यक्तिंचे संभाषण ऐकायला मिळाले. लाल वस्त्रे परिधान केलेली एक व्यक्ती पांढरे शुभ्र वस्त्रे परिधान केलेल्या व्यक्तीच्या कमरेला बांधलेल्या तलवारीचे कौतुक करत होता. “अप्रतिम शस्र आहे आपले” “हो. मी हे खास लक्ष घालून, माझ्या गरजेप्रमाणे शस्रशाळेत बनवून घेतले आहे. तुमचीही तलवार पल्लेदार दिसते आहे” पांढरे वस्त्र घातलेला ऊत्तरला. “होय. ही मी एका परकी व्यापाऱ्याकडून १००० सुवर्ण मुद्रा देऊन खरेदी केली आहे” असे म्हणत त्याने तलवार म्यानातुन बाहेर काढली आणि दोन बोटांवर तोलली. मुठ आणि पाते यांचे अचुक संतुलन असलेल्या स्वतःच्या तलवारीकडे त्याने मोठ्या कौतूकाने पाहीले. लाल वस्त्रे असलेल्याने दुसऱ्याला विचारले “दोघांचीही शस्त्रे विलक्षण आहेत. दोन दोन हात करुयात का?” पांढरे वस्त्रे असलेल्या व्यक्तीने आनंदाने मान हलवत सांगीतले “का नाही! दोघांच्याही शस्रांची आणि युद्धकौशल्याची परिक्षा होईल.” पहाता पहाता दोघांनीही पवित्रा घेतला. आजुबाजूच्या लोकांच्याही काय होतेय हे लक्षात आले. त्यांनी आपसूक दोघांनाही जागा करुन दिली. रस्त्याच्या मधोमध ऊभे असलेल्या त्या दोघांभोवती नकळत पहाणाऱ्यांचे एक वर्तूळ तयार झाले. प्रवासीही ऊत्सुकतेने पुढे काय होते ते पाहू लागला. दोघेही तलवारबाज कधी एकमेकांच्या डोळ्यात तर कधी पायांच्या हालचालीवर लक्ष ठेवून अंदाज घेत होते. दोघांच्याही चेहऱ्यावर मंद स्मित आणि डोळ्यात प्रचंड सावधपणा दिसत होता. क्षणभर दोघांनीही एकमेकांचा अंदाज घेतला आणि काही कळायच्या आतच लाल वस्र घातलेल्या व्यक्तीने डोळ्याचे पाते लवायच्या आत पहिला वार केला. समोरच्याने तो तितक्याच सफाईने चुकवला आणि परत पवित्रा घेतला. आता खरे तर दुसरा वार पांढरे वस्र परिधान केलेल्या व्यक्तीने करायला हवा होता. पण त्याच्या बचावात्मक हालचाली पाहून तसे काही वाटत नव्हते. पुन्हा पहिल्याने वार केला. या वेळी त्याने पहिला वार करुन स्वतःभोवती एक गिरकी घेतली आणि लगोलग दुसराही वार केला. शुभ्र वस्राने अतिशय चपळ हालचाली करत वार चुकवले आणि पुन्हा पवित्रा घेतला. लाल वस्राने यावेळी अगदी ठेवणीतला वार केला जो वर्मी बसायलाच हवा होता. पण शुभ्र वस्राने अत्यंत सहजतेने तो वार आपल्या तलवारीवर झेलला. दोघांच्या तलवारीच्या आघाताने काही तेजस्वी ठिणग्या ऊडाल्या. शुभ्र वस्राने हसत दोन पावले मागे घेत पुन्हा पवित्रा घेतला. दोघांचे ते डावपेच पहात असलेल्या प्रेक्षकांना काही वेळातच त्या दोघांचे युध्दकौशल्य लक्षात आले आणि सुवर्णमुद्रांची पैज लावायला सुरवात केली. कोणी लाल वस्रावर मुद्रा लावल्या तर कोणी शुभ्र वस्रावर. प्रवासीही आता ऊत्कंठतेने पाहू लागला. लाल वस्राचे चार वार झाल्यावर शुभ्र वस्राचा एखादाच वार व्हायचा पण तो फार विचारपुर्वक केलेला असायचा. लाल वस्राला त्यातून वाचणे कठीण व्हायचे. पहाता पहाता दोघांच्याही अंगातुन घामाच्या धारा वहायला लागल्या होत्या. शुभ्र वस्राने एक वार असा शिताफीने केला की लाल वस्राला मोठ्या मुश्कीलीने तो अडवता आला. पण तो वार अडवून लाल वस्राने प्रत्युत्यर म्हणून अतिशय त्वेषाने वार केला. विज कोसळावी तशी त्याची तलवार काडकन समोरच्याचे वर्म पाहून कोसळली. पण व्यर्थ. शुभ्र वस्राने लिलया तो वार परतवला. लढत आता रंगत होती. प्रवासीही ऊत्सुकतेने पहात होता. दोघांचेही लढण्याचे कौशल्य पाहून तो चकीत झाला होता. पुढे काय होते याची त्याला ऊत्कंठा लागली होती. पण त्याचे आजुबाजूला लक्ष गेले तर प्रेक्षकांचे वर्तुळ मोडत चालले होते. काही पहाणारे आपापल्या मार्गाला लागले होते. ज्यांनी पैजा लावल्या होत्या ते सुवर्णमुद्रांचे देणेघेणे करत होते. सगळ्यांचे वागणे “लढत निकाली” लागल्यासारखे होते. पहाता पहाता रस्ता मोकळा झाला. प्रवाशाला काही कळेना. नुकतीच कुठे लढाई रंगात आली होती आणि हे सगळे असे काय वागत होते. त्याने न रहावून परत जाणाऱ्या शेवटच्या वृध्द व्यक्तीला विचारले “अहो, आता कुठे तलवारबाजीला रंग चढतोय आणि तुम्ही सगळे निघाला कुठे? काय झाले?” तो वृद्ध म्हणाला “लढाईचा निकाल लागला मघाशीच. आता थांबून काय करायचे येथे” प्रवाशाला काही कळेना. त्याने विचारले “निकाल लागला? कधी? कोण जिंकले?” वृध्द ऊत्तरला “ईतका वेळ संयमीत लढाई खेळताना जेंव्हा त्या लाल वस्र परिधान केलेल्या व्यक्तीने त्वेषाने वार केला तेंव्हाच तो हरला आणि लढाई संपली.” मार्मिक लघु कथा (कथासुत्र-बहुधा झेनकथा, शब्दांकन-माझे)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वावर
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार
लेख

प्रतिक्रिया द्या
6767 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

व्वा. खूप सुंदर मार्मीक कथा.

विजुभाऊ
Fri, 06/22/2018 - 10:28 नवीन
व्वा. खूप सुंदर मार्मीक कथा. अनवट रचनांचा खजिना आहे हो तुमच्या कडे
  • Log in or register to post comments

थँक्यू विजुभाऊ!

शाली
Fri, 06/22/2018 - 10:52 नवीन
थँक्यू विजुभाऊ!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

नाही समजली

एकनाथ जाधव
Fri, 06/22/2018 - 12:01 नवीन
,
  • Log in or register to post comments

कसं सांगू?

शाली
Fri, 06/22/2018 - 12:43 नवीन
कसं सांगू? आयुष्यात जे कराल ते अत्यंत शांतचित्ताने करा. कधी कधी भांडावे लागते, विरोध करावा लागतो, कधी कोणाची समजुत काढावी लागते, कधी समजुन घ्यावे लागते. पण हे करताना तुम्ही चिडलात, वैतागलात की सगळे मातीत जाते. त्वेष, द्वेष, राग ही हरण्याची पहिली पायरी आहे.
  • Log in or register to post comments

चांगली कथा

हेमंतकुमार
Fri, 06/22/2018 - 12:46 नवीन
चांगली कथा
  • Log in or register to post comments

उत्तमच

श्वेता२४
Fri, 06/22/2018 - 13:07 नवीन
.
  • Log in or register to post comments

छान मालक :)

शलभ
Fri, 06/22/2018 - 13:58 नवीन
छान मालक :)
  • Log in or register to post comments

मस्तच!

चांदणे संदीप
Fri, 06/22/2018 - 15:35 नवीन
कथा उत्तम! Sandy
  • Log in or register to post comments

मस्त कथा . बाहुबली -१ मधल्या

सिरुसेरि
Fri, 06/22/2018 - 17:51 नवीन
मस्त कथा . बाहुबली -१ मधल्या कटप्पा आणी अस्लमखान यांच्या तलवारबाजीची आठवण झाली .
  • Log in or register to post comments

कुमार, श्वेता, सँडी, सिरुसेरि

शाली
Fri, 06/22/2018 - 18:24 नवीन
कुमार, श्वेता, सँडी, सिरुसेरि सगळ्यांचे धन्यवाद!
  • Log in or register to post comments

तुमच्या पोटेन्शिअलनुसार खूप

Ram ram
Fri, 06/22/2018 - 20:56 नवीन
तुमच्या पोटेन्शिअलनुसार खूप इंटरेस्टींग लिखाणाच्या अपेक्षा आहेत. परमहंस पासून तुमच्या लिखाणाचा पंखा झालोय. त्रोटक लिहीण्याऐवजी जास्त लिहा.पुलेशु.
  • Log in or register to post comments

हो नक्कीच. धन्यवाद!

शाली
Fri, 06/29/2018 - 18:07 नवीन
हो नक्कीच. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Ram ram

छान कथा.. विचाराला प्रवृत्त

आनन्दा
Fri, 06/22/2018 - 22:30 नवीन
छान कथा.. विचाराला प्रवृत्त करणारी
  • Log in or register to post comments

छान लिहीता...

उगा काहितरीच
Mon, 06/25/2018 - 07:08 नवीन
छान लिहीता...
  • Log in or register to post comments

कथा आवडली.

एस
Tue, 06/26/2018 - 10:31 नवीन
कथा आवडली.
  • Log in or register to post comments

मस्त कथा....

शित्रेउमेश
Fri, 06/29/2018 - 08:16 नवीन
मस्त कथा....
  • Log in or register to post comments

अप्रतिम

कपिलमुनी
Fri, 06/29/2018 - 13:45 नवीन
कथा खुप आवडलि
  • Log in or register to post comments

सगळ्यांचे धन्यवाद!

शाली
Fri, 06/29/2018 - 18:08 नवीन
सगळ्यांचे धन्यवाद!
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा