लेखणी का कीबोर्ड ? (पूर्वार्ध)

Primary tabs

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
19 Jun 2018 - 7:45 am

पंधराव्या शतकात लागलेला छपाईयंत्राचा शोध हा खरोखर क्रांतिकारक होता. त्यापूर्वी उपलब्ध ज्ञान हे केवळ हस्तलिखित स्वरुपात साठवता येत असे. त्यामुळे त्याच्या समाजप्रसाराला खूप मर्यादा होत्या. छपाईचे तंत्र जसे विकसित झाले, तसे अधिकाधिक माहिती व ज्ञान बहुसंख्यांपर्यंत पोचू लागले. त्यातूनच समाजात लेखनपरंपरा विस्तारली. शिक्षणाच्या प्रसारातून अनेकजण लेखन करू लागले. त्याला छपाईची जोड मिळाल्याने छापील मजकुराची निर्मिती होऊ लागली. अशा प्रकारे ज्ञानप्रसार वेगाने आणि दूरवर होऊ लागला.

निरनिराळ्या प्रकारची माहिती जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी विविध छापील माध्यमे निर्माण झाली. गरजेनुसार अगदी एक पानी माहितीपत्रकापासून ते हजारो पानांच्या ग्रंथापर्यंत छापील माध्यमांचा विस्तार झाला. सध्या जर आपण उपलब्ध छापील माध्यमांवर नजर टाकली, तर आपल्याला दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक आणि वार्षिक या प्रकारची नियतकालिके आणि विविध पुस्तकांचा समावेश करता येईल.

अशा प्रकारे गेल्या साडेपाचशे वर्षांत छापील माध्यमांचा अवाढव्य विस्तार झालेला आहे. त्यातून एक लेखनपरंपरा स्थिरावली आहे. या परंपरेत लेखक हा हाताने मजकूर लिहितो, मग त्यावर विविध मुद्रणसंस्कार होतात व त्या लिखाणाची छापील प्रत तयार होते. ती प्रकाशक व विक्रेता यांच्या माध्यमातून शेवटी वाचकापर्यंत पोचते.

गेल्या शतकाच्या साधारण मध्यापर्यंत ‘वाचन’ या शब्दाचा अर्थ हा कुठलाही छापील मजकूर हातात घेऊन पाहणे एवढाच मर्यादित होता. किंबहुना, सर्व साक्षर समाज याच प्रकारच्या वाचनाला सरावला होता. लेखक म्हणजे लेखणीने कागदावर काही मजकूर लिहिणारा आणि वाचक म्हणजे तो छापील मजकूर हातात घेऊन वाचणारा अशी समीकरणे दृढ झाली होती. लेखन-वाचनासाठी याव्यतिरिक्त अन्य कुठले माध्यम भविष्यात निर्माण होऊ शकेल हे कोणाच्या गावीही नसावे !

विसाव्या शतकातील सर्वात क्रांतिकारी शोध ज्याला म्हणता येईल तो म्हणजे संगणकाचा उदय. जर छपाई तंत्राने ज्ञानप्रसाराचा पाया घातला असे म्हटले, तर संगणक तंत्रज्ञानाने त्यावर कळस चढवला असेच म्हणावे लागेल. इतिहासाच्या दृष्टीने आधुनिक लेखनाचा विचार करता आधी हस्तलेखन, मग टंकलेखन आणि शेवटी संगणकलेखन असे तीन टप्पे पडले. त्यामुळे लेखन फक्त कागदावरच करता येते, या कल्पनेला सुरुंग लागला.

आता लेखनासाठी एक सशक्त असे इ-माध्यम उपलब्ध झाले. त्यानंतर संगणकशास्त्राचा अफाट विकास झाला. कालांतराने त्याला आंतरजालाची जोड मिळाली. हळूहळू सुशिक्षितांची संगणक साक्षरता वाढत गेली आणि मग या नव्या माध्यमातून माहितीचे आदानप्रदान विलक्षण वेगाने सर्वदूर होऊ लागले. नंतर शालेय जीवनापासूनच संगणक व जालाचे शिक्षण घेतलेली नवी पिढी उदयास आली. या पिढीत जे लेखक निर्माण झाले त्यांनी लेखनासाठी पारंपरिक लेखणी ऐवजी संगणकाचा कळफलक वापरणे अधिक पसंत केले.

जगभरात आज लेखन-वाचनासाठी छापील व इलेक्ट्रॉनिक(इ) या दोन्ही माध्यमांचा वापर होतो. विकसित देशांत इ-माध्यमाचा वरचष्मा जाणवतो तर अविकसित देशांत अजूनही छापील माध्यम वरचढ असल्याचे दिसते. जेमतेम अर्धशतकाचा अनुभव असलेले इ-माध्यम साडेपाचशे वर्षे जुने असलेल्या छापील माध्यमाला हद्दपार करेल का, अशी शक्यता अधूनमधून व्यक्त होते. तूर्तास तरी ही दोन्ही माध्यमे एकमेकांशी स्पर्धा करीत आपापले अस्तित्व व्यवस्थित टिकवून आहेत. साहित्यविश्वात या दोन्हींतून लिहिणारे लेखक उपलब्ध आहेत. त्यामुळे वाचकांना दोन माध्यमांचे पर्याय मिळालेले आहेत.

लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे साहित्यविश्वाचे चार स्तंभ आहेत. या चौघांच्या दृष्टीकोनातून छापील व इ माध्यमांची तुलना करण्याचा या लेखाचा उद्देश आहे. आज या दोन्ही माध्यमांतून विविध प्रकारची नियतकालिके व पुस्तके प्रकशित होत आहेत. नियतकालिकाचे दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक हे मुख्य प्रकार आहेत. बऱ्याच पुस्तकांचा जन्म हा संबंधित लेखनाच्या नियतकालिकातील पूर्वप्रसिद्धीतून होत असतो. अशा नियतकालिकांना केंद्रस्थानी ठेवून या लेखातील तुलना केली आहे. ती करताना खालील मुद्द्यांचा आधार घेतला आहे:

१. नियतकालिकाचे धोरण
२. त्याचा कारभार
३. लेखकाच्या दृष्टीने माध्यमाचे फायदे/तोटे
४. वाचकाच्या दृष्टीने माध्यमाचे फायदे/तोटे
५. प्रकाशित साहित्याचे जतन आणि
६. माध्यमाचे भवितव्य

वरील मुद्द्यांच्या आधारे आता दोन्ही माध्यमांचा स्वतंत्रपणे आढावा घेतो.

छापील माध्यम:

नियतकालिकाचे धोरण:
काही नियतकालिके मुक्त साहित्य स्वीकारतात. त्यांना कोणताही विषय वर्ज्य नसतो. याउलट काही फक्त विशिष्ट विषयांना अथवा कल्पनांना वाहिलेली असतात. लेखक-निवडीबाबतसुद्धा यांत भेद असतो. काही फक्त प्रथितयशांनाच अंकात स्थान देतात. त्यांना आपल्या अंकासाठी अनाहूत साहित्य नको असते. त्यांच्या अंकांमध्ये साहित्य पाठविण्यासंबंधीचे आवाहन कधीच केलेले नसते. तेच ते प्रस्थापित लेखक हाताशी धरून त्यांचा साहित्यप्रपंच चालू असतो. एकप्रकारे अशी नियतकालिके त्यांची ‘पाळीव लेखकांची’ फौज पदरी बाळगून असतात. अशा धोरणामुळेच आपले प्रकाशन ‘दर्जेदार’ असल्याचा त्यांचा समज असतो.

याउलट काही नियतकालिके मात्र प्रस्थापितांबरोबरच नवोदितांनाही आवर्जून संधी देतात. त्यांच्या अंकांमध्ये साहित्य पाठविण्यासंबंधीचे आवाहन वेळोवेळी केलेले असते. असे धोरण नवे लेखक घडविण्यासाठी अत्यंत गरजेचे असते. ही नियतकालिके नवोदित व हौशी लेखकांना वरदान ठरतात.
नियतकालिकांचा अजून एक प्रकार दिसतो तो म्हणजे विशिष्ट समूहापुरतीच मर्यादित असलेली. त्यांचे वर्गणीदार हेच फक्त त्यांचे वाचक व लेखक असतात. त्यांचा उद्देशच कोषात राहण्याचा असतो आणि साहित्यप्रसार हे त्यांचे ध्येयही नसते.

कारभार :

काही नियतकालिके संस्था वा समूहाच्या मालकीची असतात. त्यांनी जो संपादक नेमलेला असतो तो कामकाजाच्या बाबतीत पूर्णतः स्वतंत्र नसतो. अंकाच्या साहित्य निवडीबाबत त्याच्यावर मालकाचा अंकुश असतो. ज्याप्रमाणे एखाद्या चित्रपटाचा नेता हा खरेतर त्याचा दिग्दर्शक असतो पण, त्याच्या डोक्यावर बसलेल्या निर्मात्याच्या इच्छेप्रमाणे त्याला वागावे लागते. तसाच काहीसा प्रकार इथे असतो. त्यामुळे मुक्त साहित्य व लेखक-निवड ही काहीशी बंधनात असते.

काही नियतकालिके मात्र एकखांबी तंबू असतात. इथे मालक, प्रकाशक व संपादक सबकुछ एकच व्यक्ती असते. असा संपादक स्वयंभू असतो आणि तो खऱ्या अर्थाने दिग्दर्शकाची भूमिका वठवतो. त्याचबरोबर इथल्या साहित्यनिवडीबाबत मनमानीही होऊ शकते.
जी नियतकालिके अनाहूत साहित्य स्वीकारतात त्यांचा लेखकांशी व्यवहार वेगवेगळा असतो. जबाबदार संपादक लेखकाला पसंती अथवा नापसंतीचा निर्णय योग्य वेळेत कळवतात. त्यापैकी काही जण नापसंतीची कारणेही देतात. तर काही संपादक फक्त पसंतीचाच निर्णय कळवतात व नापसंत लेखनाची बोळवण करतात. अशाने नवोदित लेखक नाउमेद होतो. काही मोजकेच संपादक लेखकाशी चर्चा करण्यास उत्सुक असतात जेणेकरून त्याच्या लेखनाचा दर्जा उंचावू शकतो.

नियतकालिकांकडून लेखकांना दिले जाणारे मानधन हा एक संवेदनशील विषय आहे. याबाबतीत बऱ्याच तऱ्हा आढळतात. लेखकाला मानधनाची आगाऊ कल्पना देणे आणि त्याप्रमाणे नंतर खरोखर देणे, पूर्वकल्पना न देता एकदम अंकाबरोबर मानधन देणे, अथवा ते अजिबात न देणे असे सर्व प्रकार दिसतात. एकंदरीत पाहता मराठी साहित्यविश्वात मानधनाची रक्कम ही ‘मान’ अधिक व ‘धन’ कमी या प्रकारात मोडते ! जिथे मानधन दिले जात नाही त्यांनी लेखकाला भेटअंक पाठवला तरी अगदी धन्य वाटते.

थोडक्यात काय, तर छापील माध्यमांत साहित्यव्यवहार हा ‘संपादककेंद्री’ असतो. त्यामुळे काही अपवाद वगळता लेखक हा काहीसा याचकाच्या भूमिकेत असतो. संपादकाने एखादे लेखन नाकारण्यामागे लेखनाच्या दर्जाबरोबरच संपादकाच्या नावडीचा भाग मोठा असतो.

लेखकाच्या दृष्टीने माध्यमाचे फायदे/तोटे :
या माध्यमातील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे लेखन प्रकाशनापूर्वीचे त्यावरील संपादकाचे नियंत्रण. त्यामुळे लेखकाला जे काही व ज्या काही तीव्रतेने लिहायचे असते त्यावर काहीसे बंधन येते. अर्थात, ज्या नियतकालिकांतून सवंग व भडक लिखाण जाणीवपूर्वक प्रसिद्ध केले जाते तिथे मात्र संपादक लेखकाला त्यासाठी उद्युक्तही करू शकतो !

या माध्यमाची एक महत्वाची मर्यादा म्हणजे त्याच्या वितरणाला येणाऱ्या भौगोलिक मर्यादा. त्यामुळे लेखनप्रसार हा एका परिघातच होतो. भारतात हिंदी व इंग्लीशमधील साहित्य वगळता अन्य भाषांतील साहित्य हे साधारणतः ज्या त्या राज्यापुरते मर्यादित राहते. अर्थात गेल्या अर्धशतकात अनेक साहित्यप्रेमी भारतीय परदेशात स्थायिक झालेले असल्याने काही नियतकालिके अल्प प्रमाणात का होईना परदेशी पोचतात. परंतु असे अंक हे सामान्य टपालाने जात असल्याने त्यात पोचण्याची अनियमितता असते.

लेखकासाठी अजून एक मुद्दा म्हणजे त्याच्या प्रकाशित लेखनावर येणाऱ्या वाचक-प्रतिक्रिया. लेखक हा त्यासाठी आसुसलेला असतो. यासाठी लेखाबरोबर लेखकाची संपर्क माहिती (फोन, इ.) प्रसिद्ध करावी लागते. याबाबत नियतकालिकांची वेगवेगळी धोरणे असतात. काही संपादक लेखकाची कोणतीही संपर्क माहिती देत नाहीत. काही जण फक्त त्याच्या गावाचे नाव देतात, तर मोजकेच जण पूर्ण संपर्क माहिती देतात. या धोरणांमागे संपादकांचे अंतस्थ हेतू असतात.

तसेच संपादकास वाचकांकडून आलेल्या प्रतिक्रिया किती प्रमाणात प्रसिद्ध करायच्या हेही संपादकाच्या मनावर आणि उपलब्ध जागेवर ठरते. त्यामुळे, एखाद्या लेखावर आलेल्या एकूण प्रतिक्रिया आणि त्यतल्या लेखकापर्यंत पोचणाऱ्या प्रतिक्रियांत बराच फरक पडतो. लेखकाला आनंद देणाऱ्या या गोष्टीवरही संपादकाचे नियंत्रण राहते. म्हणजेच, इथे लेखक व वाचकांदरम्यान संपादकीय चाळणीचा मोठा अडसर असतो. एका बाबतीत मात्र या चाळणीचा लेखकाला फायदा होतो. जर का एखाद्या वाचकाची प्रतिक्रिया जहाल किंवा विनाकारण लेखकाला नाउमेद करणारी असल्यास संपादक तिला सरळ केराची टोपली दाखवू शकतो. यातून लेखक व वाचकादरम्यान वैयक्तिक शत्रुत्व होत नाही. हा या माध्यमाचा फार मोठा फायदा आहे.

वाचकाच्या दृष्टीने माध्यमाचे फायदे/तोटे:

सध्याचे मध्यमवयीन व ज्येष्ठ वाचक वर्षानुवर्षे छापील वाचनाला सरावले आहेत. आज जरी इ-माध्यमाचा प्रसार वाढता असला, तरी या पिढीतील वाचकांचे छापील माध्यमावर अतोनात प्रेम आहे. या वाचनाचे बरेच फायदेही असतात. मुख्य म्हणजे ते डोळ्यांना सुखद असते. त्याच्या दीर्घ वाचनातूनसुद्धा डोळे, मान इ.च्या व्याधी सहसा जडत नाहीत. ते दिवसा वाचताना त्यासाठी वेगळी उर्जा (वीज) लागत नाही.

तसेच एखादा छापील अंक प्रत्यक्ष हाताळण्याचा व त्याच्या मुखपृष्ठाकडे मनसोक्त बघण्याचा आनंद काही औरच असतो. तसेच वाचताना आपल्याला आवडलेल्या परिणामकारक मजकुराची स्मृती दीर्घकाळ राहते. हे वाचन खऱ्या अर्थाने नैसर्गिक असते. एकच गोष्ट वाचकाच्या दृष्टीने रसभंग करणारी असते. ती म्हणजे वाचताना मध्येमध्ये येणाऱ्या रंगीबेरंगी जाहिरातीच्या पानांचा व्यत्यय. आर्थिकदृष्ट्या समृद्ध नियतकालिकांत त्याचे प्रमाण कधीकधी (उदा. दिवाळी अंक) साहित्य मजकूराच्या बरोबरीचे असते !
फक्त छापील वाचनावर विसंबून असलेल्या वाचकांचे बाबतीत संबंधित अंकांचे सुलभ व नियमित वितरण ही महत्वाची बाब आहे. त्यातील त्रुटीमुळे वाचकांचा विरस होतो.

साहित्याचे जतन :
चोखंदळ वाचकांना आवडीच्या वाचनाचे जतन करण्याची सवय असते. यामध्ये एखाद्या मजकुराचे कात्रण काढून ठेवण्यापासून ते पूर्ण अंक जतन करण्यापर्यंत प्रकार असतात. वैयक्तिक पातळीवरचे जतन एका मर्यादेपर्यंतच शक्य असते. घरामध्ये जुन्या पुस्तकांचा साठा करणे आणि त्यांची निगा राखणे हा कटकटीचा विषय असतो. बऱ्याच कुटुंबियांच्या मते तो जागेचा अपव्यय असतो. त्यामुळे हे ‘अतिक्रमण’ हटवण्यास ते उत्सुक असतात ! तेव्हा आयुष्याच्या नियमित टप्प्यांवर अशा जुन्या साहित्याला कठोरपणे रद्दीत घालावे लागते.

सार्वजनिक पातळीवरचे जतन हे ग्रंथालयांचे काम. जागेच्या उपलब्धतेनुसार ते कमी अधिक प्रमाणात होते. परंतु त्यालाही कधीतरी मर्यादा पडतातच. जतन केलेल्या अतिजुन्या पुस्तकांची अवस्था बऱ्याचदा दयनीय असते. वाचकाने एखाद्या भल्या मोठ्या ग्रंथालयातून जर ५० वर्षांपूर्वीचे पुस्तक बाहेर काढले, तर ते वाचण्यापूर्वीच त्यात साठलेल्या धुळीमुळे फटाफट शिंका येऊन तो बेजार होतो ! हे सर्व त्रास बघता आता छापील साहित्याचे इ-स्वरुपात जतन करण्याची गरज निर्माण झाली आहे.

माध्यमाचे भवितव्य :
साधारणपणे समाजात कुठलेही नवे तंत्रज्ञान आले व रुजले की ते जुन्याला मोडीत काढते. जसे की, वाहतुकीसाठी रिक्षा आल्या अन त्यामुळे टांगे नामशेष झाले; प्रत्येकाच्या हाती चलभाष आला आणि त्यामुळे स्थिरभाष-बूथ्स कालबाह्य झाले. तेव्हा साडेपाचशे वर्षे जुन्या छापील माध्यमाला जेमतेम पन्नाशीतले इ-माध्यम भविष्यात हद्दपार करणार का असा प्रश्न मनात येतो.

जरी ‘इ’ चे वर्चस्व वाढत गेले तरी छापील पूर्णपणे संपणार नाही असे वाटते. आज विकसित देशांत ‘इ’ चा वरचष्मा दिसतो. पण, विकसनशील देशांत तरी छापील वरचढ आहे. इ-माध्यम तळागाळात पोचण्यासाठी साक्षरता, संगणक-साक्षरता, पुरेशी वीज, जालाची व्यापक उपलब्धता व त्याचा पुरेसा वेग असे अनेक अडथळे आपल्याला अजून पार करायचे आहेत. त्यामुळे आपल्याकडे या शतकाखेर तरी छापीलचे वर्चस्व राहील असे दिसते.

यासंदर्भात आकाशवाणी व दूरचित्रवाणी या माध्यमांचे उदाहरण देतो. दूरचित्रवाणीच्या व्यापक प्रसारानंतर असे वाटले होते की आता आकाशवाणी संपली. पण, वस्तुस्थिती तशी नाही. आकाशवाणीने कात टाकल्याने आजही ती ऐकणारे चोखंदळ श्रोते आहेत. त्यांना हे श्राव्य माध्यम दूरचित्रवाणीपेक्षा अधिक प्रिय व विश्वासार्ह वाटते. याच धर्तीवर लेखनात जरी ‘इ’ चे वर्चस्व वाढत गेले, तरी छापील त्याच्या काही खास वैशिष्ट्यांमुळे नक्कीच टिकून राहील.
* * * * * * * * * * * * * * * * * * * * * * * *
(क्रमशः)
पूर्वप्रसिद्धी : ‘अंतर्नाद’ मासिक

साहित्यिकविचार

प्रतिक्रिया

जयन्त बा शिम्पि's picture

19 Jun 2018 - 9:00 pm | जयन्त बा शिम्पि

सांगोपांग माहिती दिल्याने लेख उत्तम लिहिला गेला आहे. काळासोबत संवयी बदलत राहिले पाहिजे हे जेव्हढे खरे त्याचबरोबर जुन्यातील जे जे चांगले ते ते निव्वळ " जुनाट " म्हणुन टाकून देणे ही अयोग्य. त्यामुळेच किमान आम्हा ज्येष्ठांना अजुनही छापील पुस्तकांचा मोह असतोच.छापील पुस्तके हाताळण्याचा आनंद हा वेगळाच असतो.

कुमार१'s picture

19 Jun 2018 - 9:09 pm | कुमार१

अनेक आभार आणि सहमती .

चौकटराजा's picture

20 Jun 2018 - 10:01 am | चौकटराजा

पुस्तकाचा सर्वात मोठा फायदा की त्यात शब्द हेच माध्याम असल्याने आपल्या मनाला कल्पनाशक्ती वापरून त्यातील मजकूर अनुभवावा लागतो. चित्रात हे काम तितकेसे नीट होत नाही . पण त्यात दृश्य माध्यमातील काही सामर्थ्याशाली गोष्टी जसे ... पहाण्याचा कोन, प्रकाश योजना , पार्श्वसंगीत ई नसल्याने परिणामकारक अनुभवात साहित्य कमी पडते . वैचारिक उहापोह साहित्य या माध्यमातच अधिक स्पष्टपणे करता येतो. मिपा चा हा तर खास उपयोग आहे !!

कुमार१'s picture

20 Jun 2018 - 10:04 am | कुमार१

दोन्ही माध्यमांत काही गोष्टी अधिक / उणे आहेत.प्रत्येकाची आपापली मजा आहे खरी

लई भारी's picture

20 Jun 2018 - 12:25 pm | लई भारी

संपादक-लेखक संबंधाबद्दल नवीन माहिती मिळाली.
इ-माध्यमांचे फायदे असले तरी पुस्तक/नियतकालिक/वर्तमानपत्र हातात घेऊन वाचण्याची मजा औरच आहे. त्यामुळे रेडिओ सारखं हे पण टिकून राहील असं वाटत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jun 2018 - 12:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

लेखनपरंपरेचा सुंदर धावता आढावा !

सचिन काळे's picture

20 Jun 2018 - 4:23 pm | सचिन काळे

छान लिहिलंय. आवडलं. पुढील भागाच्या प्रतीक्षेत.

कुमार१'s picture

20 Jun 2018 - 4:43 pm | कुमार१

लई भारी, डॉ सुहास व सचिन,
अभिप्रायाबद्दल आभार

नाखु's picture

20 Jun 2018 - 10:10 pm | नाखु

पुस्तकांबाबत काही आठवणी,प्रसंग निगडित असतात आणि पुस्तकांचे पुन्हा वाचन नव्या जागा अर्थ लावून देतात,डीजीटल मध्ये तितकेच पुनर्वाचन होत नाही.
मोबाईल वरती तर कंटाळवाणे वाटत असतं.

अर्थात दोन्ही बाजूंनी फायदे तोटे आहेत हेच खरे.

दिवाळी अंक नियमित हुकुमी वाचक नाखु

पुस्तकांचे पुन्हा वाचन नव्या जागा अर्थ लावून देतात,>>>> सहमत.
दिवाळी अंकांची मजाही वेगळीच

चौथा कोनाडा's picture

21 Jun 2018 - 10:58 am | चौथा कोनाडा

सुंदर आढावा घेतलाय. लेख आवडला.

शेवटी ज्या त्या माध्यमांची वेगवेगळी बलस्थानं असतात !

सुबोध खरे's picture

21 Jun 2018 - 12:00 pm | सुबोध खरे

आज भ्रमणध्वनीचा आकार लहान आहे आणि टॅबलेट अजून तरी जड आहेत. उद्या ( कदाचित एक दोन वर्षातही) मासिकाच्या आकाराचे आणि वजनाचे टॅबलेट बाजारात आले तर छापील पुस्तकांची गरज अजूनच कमी होईल. निदान पुढच्या ३० वर्षात तरी छापील पुस्तके पूर्णपणे जाणार नाहीत कारण दोन पिढ्या ज्या छापील पुस्तके वाचून मोठ्या झाल्या आहेत त्यातील बहुसंख्य लोक अजूनही कागदावरच विश्वास ठेवून आहेत. त्यामुळे हि पिढी आजही राष्ट्रीयीकृत बँकेत रांग लावून पासबुक भरून घेण्यात धन्यता मानते.
माझ्या सारखे लोक आता राष्ट्रीयीकृत बँक हि नको आणि पासबुकही नको म्हणत केवळ संगणकावर खाजगी बँकेत व्यवहार करतात. अगदीच गरज असेल तेंव्हा पीडीएफ वर पासबुक डाउनलोड करून घेतात( उदा गृह कर्ज घ्यायचे असेल तर गेल्या तीन वर्षाचे बँक स्टेटमेंट लागते)
पण त्यानंतरची पिढी मात्र इलेक्ट्रॉनिक माध्यमावरच जास्त विसंबून असतील. ज्या तर्हेने एल पी रेकॉर्ड, त्यानंतर टेप नंतर सीडी कालबाह्य झाल्या होत आहेत हीच स्थिती छापील पुस्तकांची होणार आहे यात मला शंका नाही.
कि बोर्डचा सगळ्यात मोठा फायदा काय तर कोंबडीचे पाय हस्ताक्षर असलेल्या लोकांचे लेखन वाचावे लागत नाही नि अत्यंत सुंदर आणि कलात्मक फॉन्ट मध्ये आपल्याला पाहिजे ती गोष्ट लिहिता/ वाचता येते.

कुमार१'s picture

22 Jun 2018 - 11:58 am | कुमार१

'चौ को' यांनी म्हटल्याप्रमाणे :

शेवटी ज्या त्या माध्यमांची वेगवेगळी बलस्थानं असतात !

यावर या चर्चेचा समारोप करतो.
लवकरच उत्तरार्ध प्रकाशित करत आहे.

कुमार१'s picture

22 Jun 2018 - 2:28 pm | कुमार१
Dr Ravi Prayag's picture

27 Jun 2018 - 12:41 pm | Dr Ravi Prayag

खूपच छान लेख आहे नेहेमीप्रमाणे! भ्रमणभाषाच्या यंत्रावर मराठी बोललेलं टंकलेखीत करता येते हा एक फायदा असावा.

कुमार१'s picture

27 Jun 2018 - 12:55 pm | कुमार१

मराठी बोललेलं टंकलेखीत करता येते >>>>>
होय, अजून शिकायचे आहे मला .

वन's picture

11 Nov 2018 - 6:40 pm | वन

तेच ते प्रस्थापित लेखक हाताशी धरून त्यांचा साहित्यप्रपंच चालू असतो. एकप्रकारे अशी नियतकालिके त्यांची ‘पाळीव लेखकांची’ फौज पदरी बाळगून असतात. >>>>

छापील दिवाळी अंकांवर नजर टाकली तर हा मुद्दा अगदीच पटतो. त्या तुलनेत फक्त online प्रकाशित होणाऱ्या अंकांत अनेक अप्रसिद्ध पण चांगले लेखक वाचकाला भेटतात.

लांब कशाला, यंदाचा आपला मिपाचाच दिवाळी अंक पाहाना !

कुमार१'s picture

21 Mar 2021 - 1:51 pm | कुमार१

एक वाचनीय व रोचक लेख :

वाचकाच्या शोधात लेखक-प्रकाशक!

https://maharashtratimes.com/editorial/ravivar-mata/dinkar-gangal-articl...

त्यातील हे भारीच :

'निर्णयसागर'च्या जावजी दादाजी यांनी मराठी मुद्रणाचे आरंभकार्य केले, त्यांनी तुपाच्या शाईचा शोध लावला.

‘छपाईसाठी तुपाची शाई’ हे भलतेच रोचक !