ग्रामीण आणि इतर वाद्य

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
15 Jun 2018 - 5:28 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

तीस चाळीस वर्षांपूर्वी गावात बँड हा प्रकार फोफावला नव्हता. बँड अस्तित्वात असला तरी तो फक्‍त जिल्ह्याच्या ठिकाणी आणि तालुक्याच्या गावी पोचला होता. तरीही अतिश्रीमंत घरातल्या लग्नात दूरवरून गावात बँड बोलवला जायचा. म्हणून अशा बँड ‍लावल्या गेलेल्या लग्नाची मजा पाहण्या- ऐकण्यासाठी आख्‍खा गाव जमा व्हायचा. बँडची नवलाई आख्या गावाला भुरळ घालायची.
अन्यथा गावात गुरवचा वाजा वा सांबळचा वाजाच लग्नात वाजवले जायचे. आता तर सगळीकडे डीजेचा आवाज धुमाकूळ घालू लागला. तेव्हा सांबळाचा वाजा गावकुसात लोकप्रिय होता. सांबळाच्या वाजावर कोणालाही कोणत्याही चालीवर सहज नाचता येत असे. सांबळवाल्यांकडे लोकगीतांच्या शेकडो चाली असायच्या. खेडोपाडीच्या भोवाड्यात या सर्व चाली उपयोजित झाल्या आहेत. कुठे कुठे आजही होत आहेत. लग्नातल्या फुलकं आणि गाव मिरवणुकीत, रात्री बत्तीच्या उजेडात सांबळाच्या चालीवर ग्रामीण लोक गावभर गल्लींतून नाचत असत. सारखं नाचत असूनही नाचाची चाल बदलली तरी नाचणार्‍यांना विश्रांती मिळायची.
पोळ्याला बैलांच्या मिरवणुकीला, गणपती विसर्जनाला, कानबाई मिरवणुकीसाठी, भोवाड्यासाठी सांबळ – पिंगाण्यांचा वाजा लावला जाई. पोळ्याच्या बैलांना मिरवण्यासाठी ढोल ताश्या पोटझोडेचा वाजाही लावला जाई. चिरा बसवणे, काठीकवाडी मिरवणे, खंडोबाचे आडीजागरण अशा कार्यक्रमांना डफ वाजवला जायचा.
लग्न लागण्याच्या आधल्या रात्री वराला स्त्रीचे कपडे नेसवून गावभर जी मिरवणूक काढली जाते तिला फुलकं काढणं असं म्हणतात. लग्न लाऊन आल्यानंतर रात्री गावभर नवरदेव- नवरीला लोकांच्या खांद्यांवर बसवून बत्तीच्या उजेडात गावभर नाचवलं जातं. त्याला लग्नाची गाव मिरवणूक म्हणतात. या मिरवणुका पिंगाणी- सांबळांच्या वाजावर नाचवल्या जायच्या. गुरवाचा वाजा तर आज ऐतिहासिक होण्याच्या मार्गावर आहे. याचे कारण गुरवाच्या वाज्यात काही प्रमाणात अभिजात गायकी असते. उडत्या चालीवरची गाणी नसतात. गायनात कुठलाही भडकपणा नसतो. या वाद्यावर कोणाला धांगडधिंगा करून नाचता येणं दुरच पण पायाचा ठेकाही धरता येत नाही.
आज आपण मांडवचा दिवस आणि लग्नाचा दिवस बँडच्या- डिजेच्या घणघणाटाच्या ध्वनी पदुषणात झाकाळून टाकतो. लोकपरंपरेपेक्षा प्रदर्शनाचा उत्साह आता वाद्यांच्या दणदणाटात उतू जातो. दिखाऊपणासाठी आधुनिक(?) वाद्यांवर भरमसाठ पैसा खर्च होतो. लग्नात खोट्या प्रतिष्ठेसाठी अनावश्यक गर्दी जमवली जाते. मानपान, हुंडा, सोनंनाणं, खानपान हे प्रकार कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस प्रतिष्ठेचे होत वाढत चाललेत. आणि अशी तथाकथित प्रतिष्ठा मिरवण्यासाठी कार्यक्रमात आवाज करणारा बँड- बेंजो हवाच.
ढोल (ढोलकं), ढोलकी, पोटझोडे, नगारा, ताशा (धतड पतड), रणशिंग (शिंगडं), पावरी, खंजिरी, डफ, तुणतुणे, टिंगरी (किंगरी), सारंगी, घांगळी, थाळी, सांबळ (सामळ- धुमडं), पिंगाण्या, मृदंग, गुरवाची पिंगाणी, पोवा (बासरी), बाजाची पेटी, चिपळ्या, झांजर्‍या (टाळ), तंबोरा, वीणा, एकतारी, नंदीबैलवाल्याचं गुबु गुबु आदी वाद्य आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. या वाद्यात काही आदिवासी वाद्य आहेत तर काही लोकवाद्य. बासरीचे भारतभर वेगवेगळे प्रकार अजूनही अस्तित्वात आहेत. तबला सोडला तर सगळीच वाद्य आज दुर्मीळ झालेली दिसतात. डोंगर्‍या देवाच्या उत्सवात पावरी हे प्रमुख वाद्य असतं. तर खंडोबाच्या मिरवणुकीत खंजिरी, तुणतुणे, डफ ही वाद्य असतात. दुर्गम भागातील आदिवासीत ही वाद्य अजूनही टिकून आहेत, ही जमेची बाजू असली तरी ही वाद्य गावागावातून आजच लुप्त झालेली दिसतात, हे भयावह आहे.
(या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)

– डॉ. सुधीर रा. देवरे
ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

जावई's picture

15 Jun 2018 - 5:55 pm | जावई

सध्या अकलूजचे हलगी ग्रुप व लेझीम ग्रुप गाजतायेत महाराष्ट्रात.

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Jun 2018 - 5:53 pm | डॉ. सुधीर राजार...

हो ना

Nitin Palkar's picture

15 Jun 2018 - 8:38 pm | Nitin Palkar

सांबळ – पिंगाण्यांचा वाजा लावला जाई. पोटझोडे, टिंगरी (किंगरी), वाद्यांची ही नावे माहित नाहीत. यांचे फोटोज देता आले तर बघा...
"लग्न लागण्याच्या आधल्या रात्री वराला स्त्रीचे कपडे नेसवून गावभर जी मिरवणूक काढली जाते तिला फुलकं काढणं असं म्हणतात" या बद्दलही कधी ऐकले वाचले नाही, त्याची अधिक माहिती दिलीत तर तीही नक्की वाचनीय होईल.
खूप छान लिहिलंयत... खूप लिहित रहा...
पुलेशु..

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture

16 Jun 2018 - 5:54 pm | डॉ. सुधीर राजार...

हो. प्रयत्न करतो. धन्यवाद.