द टाईमब्रिज अर्थात कालसेतू – १

Primary tabs

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
6 Apr 2018 - 4:08 pm

नमस्कार मिपाकर्स !
फार दिवसांनी पुन्हा एकदा या लेखनप्रकाराला हात लावला आहे. वैज्ञानिक फँटसी किंवा काल्पनिका. यात काही शास्त्रीय सत्ये, बेसिक गृहीतके म्हणून आली आहेत. तथापि ही संपूर्णपणे काल्पनिक कथा आहे. इतकी काल्पनिक की योगायोगानेसुद्धा यासारख्या घटना कुठे घडल्या असण्याची शक्यता नाही. त्यामुळे याला डिस्क्लेमरची गरजच नाही. फक्त आणि केवळ मनोरंजनबुद्धी जागृत ठेवून वाचणे. :)

द टाईमब्रिज अर्थात कालसेतू

‘माणसाचे अ‍ॅव्हरेज जीवनमान जर एक हजार वर्षे असते, तर मी म्हणतो ती थिअरी अनुभवासह सिद्ध करता आली असती. सध्या तरी ती कागदावरच आहे...’ पद्या, उर्फ डॉ. प्रद्युम्न मुकुंद सहस्त्रबुद्धे, हातातल्या काडीने जमिनीवरच्या पावशा किड्याला टोचत म्हणाला. काडी टोचताच पावशाने अंग गुंडाळून घेतले.
‘पण काळ आणि प्रकाश या दोन स्वतंत्र एंटिटीज आहेत ना ? मग त्यांच्या गुणधर्मात साम्य कसे असेल ?’ पावशाने अंग गुंडाळून घेतल्यामुळे तयार झालेल्या गोल छोट्या कॉईनसारख्या वर्तुळाकडे पहात मी सवाल केला.
‘होय, त्या स्वतंत्र आहेत. पण दोन्ही युनिडिरेक्शनल आहेत, अनिकेत. त्यांच्यात इतरही गुणसाध्यर्म असणे शक्य आहे. जसे की क्वांटम स्ट्रक्चर. आणि विश्व हे जर एकाच मॅटरपासून बनले आहे, हे सत्य असेल तर त्या इझिली कन्व्हर्टिबल आहेत. एकीचे दुसरीत रुपांतर होणे कमी प्रयासात शक्य आहे.’
‘क्वांटम ..हं ? म्हणजे प्रकाश हा जसा उर्जेच्या पुंजक्यांपासून बनला आहे, तसाच काळ पण ?? जरा कठीण वाटतंय मान्य करायला..किंवा कल्पना करायला.’ मी जरी इतिहासाचा प्राध्यापक असलो तरी सायन्सही माझे अगदीच कच्चे नाही.
‘कल्पना नाहीच ती.’ पद्या शांतपणे म्हणाला, ’सर्व पुराव्यानिशी सिद्ध करतोय मी ते. पुढच्या आठवड्यात हाच पेपर मी जपानच्या युनिक सायंटिस्ट्स कॉन्फरन्समधे मांडणार आहे. जगातील टॉप हंड्रेड सायंटिस्ट्स तिथे उपस्थिती लावणार आहेत.’
प्रद्युम्न उर्फ पद्या माझा बालमित्र. पद्या पहिल्यापासूनच जिनिअस. तो शास्त्रज्ञ झाला, मी विद्यापीठात प्राध्यापक. पद्या भौतिकशास्त्राचा डॉक्टर आणि भारतातील आणि इतर देशांतील सुमारे सात वैज्ञानिक संस्थांचा सल्लागार किंवा डायरेक्टर. पण वेगवेगळ्या व्यवसायात जाऊनही आमची घनदाट मैत्री अभंग होती. गावाकडच्या आमच्या वाड्यावर दोन-तीन महिन्यातून एकदा आमचा मुक्काम असे. आताही चार दिवस सुट्टी मिळताच आम्ही दोघे वाड्यावर मुक्कामाला आलो होतो. गावाबाहेरच्या शेताच्या बांधावरून चालत आमच्या गप्पा सुरु होत्या. पावसाळा सुरु होऊन महिना झाला असेल. तांबूस तपकिरी पावशा किड्यांच्या झुंडी धीम्या गतीने बांधावरून वाटचाल करत होत्या. डबल डेकर बसप्रमाणे ते तीन-तीन चार-चार किडे एकमेकांच्या अंगावरून आणि एकमेकांना चिकटून प्रवास करत होते.
‘म्हणजे तुला असं म्हणायचंय का, की हे पावशे किडे जसे गठ्ठ्यागठ्ठ्याने प्रवास करतात, तसाच काळसुद्धा गठ्ठ्यागठ्ठ्याने आपला मार्ग आक्रमत असतो ..? ‘ मी कपाळाला सुरकुती चढवून विचारले.
‘गठ्ठा इज करेक्ट बट आक्रमत ? नो . काळ प्रवास करत नाही. तो तिथेच असतो. काळाच्या अवकाशात आपण प्रवास करतो. इट इज इन फॉर्म ऑफ डिस्क्रीट पल्सेस..ऑफ इर्रेगुलर इंटरव्हल्स अँड डिफरंट डेन्सिटीज..! प्रकाशाप्रमाणे काळाची घनता नेहमीच सारखी नसते. कधी काळ दाट होतो, तर कधी विरळ ! पण ते आपल्याला जाणवत नाही, याची दोन कारणे आहेत. एक तर काळ सापेक्ष असल्यामुळे एकाच काळातल्या दोन व्यक्ती जर एक भारतात आणि दुसरी अमेरिकेत राहत असेल तर त्यांना काळाच्या गतीमधला बदल जाणवत नाही. दुसरे म्हणजे दोन बदलांमधले अंतर कमीतकमी चारशे ते आठशे वर्षे असते. माणसाचे आयुष्य इतके प्रदीर्घ नसल्यामुळे तुलनेसाठी माप उपलब्ध नाही.’
‘हम्म..! कागदावर कदाचित हे सत्य असेल पण प्रत्यक्षात कसे सिद्ध करणार ?’
‘त्यासाठीच मला तुझी मदत हवी आहे.’
‘माझी ? पण मी शास्त्रज्ञ नाही ! मी आपला गरीब बापडा इतिहासाचा मास्तर आहे ! माझी काय मदत होणार ?’ मला हसू आले.
‘असं बघ, या दोन्हीशिवाय तिसरेही एक परिमाण काळाच्या गतीवर परिणाम करते. ते म्हणजे स्थळ !’
‘यू मीन, लोकेशन ?’
‘होय. काळ हा स्थळ-सापेक्षही आहे. तू जर अन्तरिक्षात जाऊन पृथ्वीला, तिच्या परिभ्रमणाच्या उलट दिशेने एक फेरी घातलीस, तर तुझे आयुष्य एक दिवसाने वाढेल ! ‘
‘काय सांगतोस ?’ मला आता एखादे सायन्स फिक्शन वाचत असल्यासारखे वाटू लागले.
‘इव्हन पृथ्वीवरसुद्धा अशी काही ठिकाणे असण्याची शक्यता आहे, की जिथे काळाची गती नेहमीपेक्षा जलद किंवा मंद झालेली आहे. हा त्या क्वांटम्सचा परिणाम आहे. तिथे काळाच्या गतीमधे एक फ्लॉ किंवा भोवरा तयार होतो.
..आणि इथेच इतिहासाचा, म्हणजेच तुझा संबंध येतो !’
‘तो कसा ?’
‘तू कधी असा अनुभव घेतला आहेस का की इतिहासात ज्या स्थळी मोठमोठी युद्धे झाली आहेत, किंवा प्रचंड घडामोडी घडल्या आहेत, अशा रिकाम्या जागी गेल्यावर एक विचित्र फीलिंग येते ? अनोख्या जाणीवा झाकळून टाकतात ? ...कधीतरी तिथे काळप्रवाहाची गती, म्हणजे रिलेटिव्ह गती, जी आपल्याला जाणवते, ती.. प्रमाणापेक्षा absurd झालेली होती. आणि आता ती काहीशी सुस्त झालेली आहे. म्हणून गतकाळाची अल्पशी जाणीव तिथे गेल्यावर होते.
..आता अशी काही इतिहासकालीन ज्ञात-अज्ञात स्थळे असतील जिथे एके काळी काही नाट्यमय उलथापालथ झाली आहे आणि त्यानंतर तिथे मानवाचा वावर जवळजवळ शून्य होता. अशा ठिकाणी आपल्याला असे एखादे पॉकेट, एखादा फ्लॉ किंवा भोवरा मिळू शकेल !
...आणि इथेच मला तुझी मदत होणार आहे.’
‘ती कशी ?’
‘तुला असे एखादे ठिकाण माहिती आहे का , मी सांगतोय तसे ? तिथे मला एखादा फ्लॉ नक्की मिळेल...’
‘आणि त्या भोवऱ्यातून तू काळात मागे जाऊ शकशील, असेच ना ? तुझ्याकडे टाईम मशीन आहे की काय ?’
‘खरं तर अशा ठिकाणातून काळात मागेपुढे जाण्यासाठी टाईम मशीनची गरज नाही. भोवऱ्याजवळ गेलेली काडी जशी आपोआप मध्ये खेचली जाते तसे आहे ते.’
‘म्हणजे तू असंच बागेत फिरून यावं तसा काळात फिरून येणार ? हा: हा: ! पद्या , स्वप्नरंजनाची तुझी सवय अजून गेली नाही ना ?’
प्रद्युम्नही हसला. ‘नाही ना ! म्हणूनच संशोधनात अजून रस आहे !
‘एकदा का लग्न कर लेका ! मग स्वप्नरंजन वगैरे गेलंच बाराच्या भावात !’ मी त्याच्या खांद्यावर एक दणका दिला.
माझे एकाचे दोन होऊन दोनाचे चार व्हायच्या मार्गाला लागले, तरी प्रद्युम्न अजून संशोधनातच रमला होता. त्याच्या घरचे लोक उठाठेव करून कंटाळले, पण हा अजून सडाच होता. त्याची स्वप्नसुंदरी अजुनी त्याला भेटली नव्हती. अन भेटेल कशी ? हा हापिसात वेळेपेक्षा जादा काम करत बसणार ! कधी कलीग्जमधे झोकून होणाऱ्या पार्ट्यांना हजरी लावणार नाही. ऑफिसातल्या एकूणएक पोरी त्याच्यावर खुश असूनही त्यांना ‘हेलो’ आणि ‘गुड मॉर्निंग’ पलीकडे चारा घालणार नाही.
..पद्याची आई माझ्याकडे येऊन पोरींच्या फोटोची पाकिटे त्याला दाखवण्यासाठी ठेवून जायची. हा पठ्ठ्या ती न उघडताच परत घरी पार्सल करायचा. मोबाईलवर आई आणि नातेवाईकांनी पाठवलेले मुलींचे फोटो न बघताच डिलीट करायचा. तेव्हा आम्ही आता त्याला या बाबतीत डिवचायचे सोडून दिले होते.
नाही म्हणायला कधीतरी चांदण्यात बसून ड्रिंक घेताना तो मोकळा होऊन बोलायचा.
‘अन्या, मला या अलीकडच्या पोरी थिल्लर वाटतात. लव म्हणे ! प्रीती आणि लव ! अर्थ एकच असला तरी दोन शब्दांमागची परंपरा फार वेगळी आहे. सलीम-अनारकली, अकबर-जोधा बाजीराव-मस्तानी यांच्या कहाण्यांपेक्षाहि प्रीती ही भावना फार गहिरी आहे. भावनांची खोली, समर्पण, स्वच्छ चारित्र्य, दृढ नैतिकता, खंबीर निश्चय, पर्वतावरून दरीत कोसळणाऱ्या नदीच्या प्रपाताइतकी ओढ यातलं काहीच मला आजवर एखाद्या मुलीच्या डोळ्यात दिसलं नाही.
..मला जुनाट विचारांचा म्हण, पण मला ती झाशीची राणी, चितोडची पद्मिनी, जिजाबाई, अगदी इतक्या थोर नाही, तरी आपल्या आजीच्या किंवा त्यामागच्या पिढीतली एखादी करारी मुलगीच कदाचित भावली असती....’
‘हायला, येडाच हैस ! असली मुलगी तुला आता खेड्यातपण मिळायची नाही !’
असे याचे विचार.
......बुरसटलेले ?? असतील कदाचित ! पण आजूबाजूच्या यच्चयावत होतकरू पोरी त्याच्यावर मरत होत्या हे मी छातीठोकपणे सांगू शकतो !
असा हा प्रद्युम्न नामक भन्नाट प्राणी सध्या चार दिवसासाठी माझ्या गावाकडच्या वाड्यावर हवाबदल म्हणून आलेला होता आणि आपल्या शास्त्रीय थिअर्‍यांनी माझे डोके भंजाळत होता.
त्याच्या डोक्यातल्या सगळ्याच भन्नाट आयड्याच्या कल्पना काही माझ्या डोक्यात शिरल्या नाहीत, पण त्याला हवे तसे ठिकाण शोधून देण्याचे किचकट काम मी अंगावर घेतलं, एवढं खरं !
..पुण्यात परत येऊन कॉलेजातले प्राध्यापकी रुटीन सुरु झाले तरी तो विषय माझ्या ध्यानात होता. संध्याकाळी घरी आल्यावर मी आपल्या भागातील जुन्या वास्तूंसंबंधी कागदपत्र कुठे उपलब्ध आहेत का यांचा शोध घेतला. काही संग्रहालयात होते, काही खाजगी. काही वास्तूंच्या फोटो कॉपीज आणि संबंधित माहिती गुगलवर मिळाल्या. शोध स्पेसिफिक होण्यासाठी आणि लक्ष्याबद्दल काही शंका आल्या तर विचारायला प्रद्युम्नचा फोन होताच. काही दिवसांच्या परिश्रमानंतर आणि बऱ्याच जुन्या चोपड्या धुंडाळल्यानंतर माझ्या लक्षात आले की असे ठिकाण माझ्या गावाजवळच आहे !
भुलीची कोठी !
( क्रमश: )

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

बबन ताम्बे's picture

6 Apr 2018 - 4:43 pm | बबन ताम्बे

सुंदर सुरुवात. चांगलेच खिळवून ठेवले पहिल्या भागाने. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत.

राघव's picture

6 Apr 2018 - 6:23 pm | राघव

चांगली सुरुवात!

बाकी कथा वाचत असतांना नारळीकर सरांच्या कृष्णविवर कथेची आठवण झाली..! :-)

जब्बरी स्टोर्री वाटतेय सुरुवातीवरून .. पुलेशु आणि पुभाप्र

सिद्धेश्वर विलास पाटणकर

उगा काहितरीच's picture

6 Apr 2018 - 8:22 pm | उगा काहितरीच

खाली क्रमशः अजिबात आवडलेलं नाही. इतकी मस्त लिंक लागत होती अन् मधेच क्रमशः ! आता पुढील भाग प्लिज लौकर लौकर टाका.

संजय पाटिल's picture

10 Apr 2018 - 12:57 pm | संजय पाटिल

सहमत!!!

उगा काहितरीच's picture

6 Apr 2018 - 8:23 pm | उगा काहितरीच

खाली क्रमशः अजिबात आवडलेलं नाही. इतकी मस्त लिंक लागत होती अन् मधेच क्रमशः ! आता पुढील भाग प्लिज लौकर लौकर टाका.

इष्टुर फाकडा's picture

7 Apr 2018 - 1:38 am | इष्टुर फाकडा

पुढचा भाग थोडा मोठा टाका. मिपावर सध्या चंगळ आहे. डेड मॅनस हॅन्ड आणि हि कथामाला. मज्जा येतीये. पुभाप्र.

प्रचेतस's picture

7 Apr 2018 - 8:27 am | प्रचेतस

भारी लिहिलंय.

सुखीमाणूस's picture

7 Apr 2018 - 3:45 pm | सुखीमाणूस

उत्सुकता ताणली गेली आहे.
पुढच्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहे

पैसा's picture

7 Apr 2018 - 4:24 pm | पैसा

मस्त सुरुवात!!

दीपक११७७'s picture

8 Apr 2018 - 12:32 am | दीपक११७७

मी पुर्ण वाचणार आहे पण शेवटचा भाग आल्यावर, एकदमच सगळे भाग वाचणार.
उगच लिंक तुटते.

बाकी सुरुवात छान आहे

सभालटा

पद्मावति's picture

9 Apr 2018 - 12:12 pm | पद्मावति

मस्तं सुरुवात. पु.भा.प्र.

श्वेता२४'s picture

9 Apr 2018 - 1:20 pm | श्वेता२४

याची खूप उत्सुकता आहे. मस्त सुरुवात

पंतश्री's picture

9 Apr 2018 - 1:25 pm | पंतश्री

मस्तच.
इथे माग काढण्यासाठि काहि सुविधा हवी होती.
पटापट येउदेत आणि जरा मोठे पण