मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग १.

Primary tabs

अरविंद कोल्हटकर's picture
अरविंद कोल्हटकर in जनातलं, मनातलं
23 Feb 2018 - 10:09 am

मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने - भाग १.

मराठी भाषेत संस्कृत भाषेतून घेतलेले शेकडो शब्द आणि तशीच वचने दैनंदिन वापराची झाली आहेत. ती इतकी सरावाची आहेत की त्यांचा उगम बहुधा विस्मृतीत गेलेला असतो. असे काही शब्द आणि वचने खाली देऊन त्यांचे उगम शोधण्याचा प्रयत्न मी केला आहे. प्रस्तुत लिखाणात असे २० शब्द आणि वचने आहेत. पाळीपाळीने आणखी अनेक शब्द आणि वचने मी एकूण सहा भागांमधून सदस्यांपुढे ठेवणार आहे.

प्रथम शब्द किंवा वचन, नंतर त्याचा स्रोत आणि अखेरीस सरल अर्थ असे ह्या लिखाणाचे स्वरूप आहे.

ह्या लेखनाचे एकूण सहा भाग ह्यापूर्वी 'उपक्रम'मध्ये प्रकाशित केले होते आणि तेथे सदस्यांना ते आवडल्याचे दिसले. त्याच अपेक्षेने ते येथेहि प्रकाशित करीत आहे. 'उपक्रम'मध्ये वाचकांनी वेळोवेळी ज्या सूचना प्रतिक्रियांमधून केल्या होत्या त्यांपैकी मला मान्य असलेल्यांचा आवश्यक तसा उपयोग येथे साभार करीत आहे. येथील जाणकार वाचकांकडूनहि सूचनांची आणि चर्चेची वाट पहात आहे.

१) हातचा मळ.

माझ्या समजुतीनुसार सहजप्राप्य, totally under control, अशा अर्थाचा जो 'करतलामलकवत्' (करतल+आमलक+वत्) हा शब्दसमूह आहे त्याचे हे अपभ्रंशरूप आहे. 'करतलामलकवत्' म्हणजे हाताच्या तळव्यावरील आवळ्याइतके कह्यात असलेले.

विद्यारण्यस्वामीकृत 'ब्रह्मविद्-आशीर्वाद' येथे 'असंभावनाविपरीतभावनारहितत्वेन करतलामलकवत् अहं ब्रह्मास्मीति अप्रतिबद्धापरोक्षब्रह्म- साक्षात्कारो दृढीभूयात्' (संक्षिप्त भाषान्तर: 'ब्रह्मसाक्षात्कार हा करतलामलकवत् अडसर नसलेला आणि प्रत्यक्ष असावा' असा ह्या संस्कृत शब्दसमूहाचा वापर आढळला. मूळ शब्दाची जाणीव विसरल्यामुळे ’करतला’तून हात आणि ’आमलका’तून मळ असे बदल करून 'हातचा मळ' हा त्याच अर्थाचा मराठी शब्दसमूह निर्माण झाला असावा. 'हस्तामलक' अशा स्वरूपातहि हा शब्द आपल्याला भेटतो. आदि शंकराचार्यांच्या पहिल्या शिष्यांमध्ये हस्तामलकाचार्य नावाचे एक शिष्य होते.

ज्ञानेश्वररचित हरिपाठाच्या अभंगामध्ये पुढील अभंग आहे.
भावबळे आकळे | एर्‍हवी नाकळे | करतळी आवळे | तैसा हरी||

२) जितं मया.

महाभारताच्या सभापर्वात युधिष्ठिराकडून द्यूतामध्ये एकेक गोष्ट जिंकल्यावर प्रत्येक वेळी शकुनि उन्मादाने 'जितं' असे ओरडतो. त्यावरून विजयाच्या स्वैर उन्मादाचे वर्णन म्हणून 'जितं मया' ह्या शब्दसमूहाचा वापर होतो असे वाटते.

३) बाष्कळ.

ऋग्वेदसंहितेच्या शाकलशाखेसारखेच ऋग्वेदसंहितेचे अन्य एक रूप अशी बाष्कलशाखा आहे. बाष्कलशाखेमध्ये सूक्तांची संख्या थोडी कमी आहे आणि त्यांचा क्रमहि काहीसा वेगळा आहे. शाकलशाखेचे वैदिक बाष्कलशाखेला हीन आणि अग्राह्य मानतात. ह्यावरून बाष्कळपणा, बाष्कळ बडबड असा बाष्कळ ह्या शब्दाचा हीनत्वदर्शक वापर सुरू झाला. जुन्या मराठीतील ह्या शब्दाच्या अशा अर्थाच्या वापराचे उदाहरण म्हणून तुळपुळे-फेल्डहाउस कोशामध्ये 'पुराणे सकळिक बाष्कळिक' असा ज्ञानेश्वर अभंगातील उतारा दिला आहे.

४) सव्यापसव्य.

श्रावणीच्या आणि श्राद्धाच्या वेळी अनेक वेळा जानवे डाव्या खांद्यावरून उजव्या खांद्यावर आणि पुनः उलटे असे करावे लागते. 'सव्य' म्हणजे डावा आणि 'अपसव्य' म्हणजे उजवा. (’सव्यसाची’ म्हणजे डाव्या हातानेहि प्रत्यंचा ओढून बाण मारू शकणारा ambidextrous धनुर्धारी.) ह्यावरून ’सव्यापसव्य’ 'निष्कारण वेळखाऊ उद्योग' असा शब्द प्रसारात आला. (असाच 'hocus pocus' निरर्थक मंत्रतंत्र अशा अर्थाचा इंग्रजी वाक्प्रचार कॅथलिक यूखरिस्टमधील 'hoc est corpus meum' 'हे माझे (ख्रिस्ताचे) शरीर' ह्यावरून निर्माण झाला.)

५) पंचपंच उषःकाली.

(पंचपंच उषःकाली रविचक्र निघो आले - 'घनश्याम सुंदरा' भूपाळी). भारतीय ज्योतिषानुसार एक दिवस म्हणजे ६० घटिका आणि दोन घटिकांचा एक मुहूर्त. घटिका आजच्या सूर्योदयापासून उद्याच्या सूर्योदयापर्यंत मोजतात. दिवसाच्या तीस
मुहूर्तांना स्वतंत्र नावे आहेत आणि काही मुहूर्त शुभ आणि काही अशुभ अशीहि विभागणी आहे. ब्राह्ममुहूर्त म्हणजे २९वा मुहूर्त आणि हा सर्वोत्तम मानला आहे. हा मुहूर्त ५७व्या घटिकेपासून सुरू होतो. त्या मुहूर्तामध्ये ईश्वरप्रार्थनेसारखे काह पुण्यकार्य करावयाचे असल्यास ५६व्या घटिकेमध्ये किंवा ५५ घटिका झाल्यानंतर झोपेतून उठावयास हवे. ५५ म्हणजे पञ्चपञ्चाशत्'. ह्यातील 'शत्' हा तुकडा गळून पडून 'पंचपंच' एव्हढेच उरले असा माझा तर्क आहे.

६) छप्पन्न.

'तुझ्यासारखे छप्पन्न शहाणे पाहिलेले आहेत' हे वितंडवादातले नेहमीचे वाक्य आहे. 'षट्प्रज्ञ' म्हणजे 'सहा शास्त्रे जाणणारा विद्वान'. त्याचेच साध्या मराठीत रूपान्तर 'छप्पन्न'!

७) षट्कर्णी होणे.

षट्कर्णो भिद्यते मन्त्रश्चतुष्कर्णः स्थिरो भवेत्।
द्विकर्णस्य च मन्त्रस्य ब्रह्माप्यन्तं न गच्छति॥
काश्मीरी कवि वल्लभदेवाने केलेला संग्रह 'सुभाषितावलि'.

सहा कानांमध्ये गुप्त गोष्ट फुटते, चार कानात ती गुप्त राहते, आणि दोन कानातच असली तर ब्रह्मदेवहि ती शोधू शकत नाही.

षट्कर्णो भिद्यते मन्त्रश्चतुष्कर्णः स्थिरो भवेत्।
तस्मात् सर्वप्रयत्नेन षट्कर्णं वर्जयेत्सुधीः॥
पंचतंत्र मित्रभेद १०८

सहा कानांमध्ये गुप्त गोष्ट फुटते, चार कानात ती गुप्त राहते. म्हणून शहाण्या माणसाने सर्व प्रयत्न करून गोष्ट सहा कानांपर्यंत पोहोचणार नाही असे पहावे.

वर दाखविलेल्या दोन स्रोतांहून अधिक जुना वाटतो असा स्रोत म्हणजे चाणक्याच्या नावाने प्रसृत असलेली चाणक्यसूत्रे. ह्यांमध्ये क्र. ३४ वर 'षट्कर्णाद्भिद्यते मन्त्र:' असा सूत्ररूपाने हाच विचार सांगितला आहे.

८) वचने किं दरिद्रता.

हस्तादपि न दातव्यं गृहादपि न दीयते ।
परोपकारणार्थाय वचने किं दरिद्रता ॥
शार्ङ्गधरपद्धति.

परोपकार करतांना याचकाला हातानेहि काही द्यायचे नाही आहे आणि घरातूनहि काही द्यायचे नाही आहे. अशा स्थितीत तोंडापुरते बोलण्यामध्ये दारिद्र्य दाखविण्याची काय आवश्यकता?

प्रियवाक्यप्रदानेन सर्वे तुष्यन्ति जन्तवः ।
तस्मात्तदेव वक्तव्यं वचने किं दरिद्रता ॥
चाणक्यनीति १६.१४.

सर्व माणसांना हवे ते बोललेले आवडते, त्यांना तेच द्यावे. बोलण्यामध्ये दारिद्र्य दाखविण्याची काय आवश्यकता?

९) महाजनो येन गत: स पन्थाः.

तर्कोऽप्रतिष्ठः श्रुतयो विभिन्ना
नैको मुनिर्यस्य मतं प्रमाणम्।
धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां
महाजनो येन गतः स पन्था: ।।
महाभारत वनपर्व (यक्षप्रश्न) ३१४.११९.

तर्काला मजबूत पाया नाही, वेद वेगळेवेगळे सांगत असतात, असा एकहि ऋषि नाही की ज्याचे वचन प्रमाण मानले जाते. धर्माचे गूढ गुहेत लपल्यासारखे आहे. अशा स्थितीत आदरणीय व्यक्ति ज्या मार्गाने गेल्या तो मार्ग चोखाळावा.

श्रुतिर्विभिन्ना स्मृतयश्च भिन्ना नैको मुनिर्यस्य वच: प्रमाणम्।
धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां महाजनो येन गत: स पन्थाः॥
सुभाषित.

श्रुति वेगळेवेगळे सांगत आहेत, स्मृतीहि वेगळेवेगळे सांगत आहेत. असा एकहि मुनि नाही की ज्याची शिकवण सर्वमान्य आहे. धर्माचे गूढ गुहेत लपल्यासारखे आहे. अशा स्थितीत आदरणीय व्यक्ति ज्या मार्गाने गेल्या तो मार्ग चोखाळावा.

१०) युद्धस्य कथा रम्याः.

दूरतः पर्वता रम्या वेश्याश्च मुखमण्डने।
युद्धस्य च कथा रम्यास्त्रीणि रम्याणि दूरतः॥
सुभाषित.

दुरून डोंगर साजरे भासतात, मुखप्रसाधनानंतर वेश्या चांगल्या दिसतात, युद्धाच्या गोष्टी मनोरंजक असतात. ह्या तीनहि गोष्टी दुरून चांगल्या वाटतात.

११) समानशीलव्यसनेषु सख्यम्.

मृगा मृगैः सङ्गमनुव्रजन्ति गावश्च गोभिस्तुरगास्तुरङ्गैः।
मूर्खाश्च मूर्खै: सुधियः सुधीभिः समानशीलव्यसनेषु सख्यम्॥
पंचतंत्र लब्धप्रणाश.

हरिण हरणांसह, गाई गाईंसह, घोडे घोडयांसह, मूर्ख मूर्खांसह आणि शहाणे शहाण्य़ांसह असतात. ज्यांच्यात स्वभाव आणि सवयी जुळतात त्यांच्यात मैत्री होते.

१२) मौनं सर्वार्थसाधनम्.

आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिकाः।
बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थसाधनम्॥
पंचतंत्र लब्धप्रणाश ५०.

आपल्या तोंडाळपणामुळे पोपट आणि सारिका पिंजर्‍यात पडतात. (न बोलणारे) बगळे मोकळे राहतात. मौनामुळे सर्व घडून येते.

१३) अव्यापारेषु व्यापार.
अव्यापारेषु व्यापारं यो नरः कर्तुमिच्छति।
स एव निधनं याति कीलोत्पाटीव वानरः॥
पंचतंत्र मित्रभेद २१.

संबंध नसलेल्या बाबीत जो मनुष्य लुडबुड करतो तो पाचर उपसून काढणार्‍या माकडाप्रमाणे मृत्युमुखी पडतो. (लाकूडतोडया दूर गेला आहे असे पाहून एक अतिचौकस माकड झाडावरून उतरून लाकडावर बसून पाचर उपसून काढण्याचा प्रयत्न करतो. पाचर निघाल्यामुळे लाकूड पुनः सांधले जाऊन माकडाचे वृषण त्यात सापडून तो मरतो. मुलांसाठी हीच कथा देतात तेथे वृषणाऐवजी शेपटाचा उल्लेख असतो.)

१४) मनःपूतं समाचरेत्.

दृष्टिपूतं न्यसेत्पादं वस्त्रपूतं पिबेज्जलम्।
सत्यपूतं वदेद्वाचं मनःपूतं समाचरेत्॥
मनुस्मृति ६.४६.

डोळ्यांनी पाहून पाय टाकावा, वस्त्राने गाळून पाणी प्यावे, सत्याची कसोटी लावून बोलावे आणि मनाला (विवेकाला) पटेल तेच करावे. ('मनःपूतं समाचरेत्' हे वचन सध्या 'घोडया, तुला लागेल तसा तू चाल!' अशा अर्थाने वापरले जाते पण त्याचा मूळचा अर्थ अगदी उलटा आहे.)

१५) जीवो जीवस्य जीवनम्.

अहस्तानि सहस्तानामपदानि चतुष्पदाम्।
फल्गूनि तत्र महतां जीवो जीवस्य जीवनम्॥
भागवत १.१३.४६.

हात असलेले हात नसलेल्यांवर, चार पायाचे पाय नसलेल्यांवर आणि मोठे लहानांवर पारध करतात. एक जीव दुसर्‍याचे जगण्याचे साधन असतो.

१६) कामातुराणां न भयं न लज्जा.

अर्थातुराणां न गुरुर्न बन्धुः कामातुराणां न भयं न लज्जा।
विद्यातुराणां न सुखं न निद्रा क्षुधातुराणां न रुचिर्न वेला॥
विक्रमचरित(?) हस्तलिखित.

पैशासाठी लोभी असलेल्यांना कोणी मोठा नसतो आणि कोणी नातेवाईक नसतो. कामेच्छेच्या अधीन झालेल्यांना भीति नसते आणि लाजहि नसते. विद्याप्राप्तीसाठी झटणारे सुख आणि निद्रेची पर्वा करीत नाहीत. भुकेलेल्यांना चव नसते आणि मर्यादाहि नसते.

१७) छिद्रेष्वनर्था बहुलीभवन्ति.

यथैव पुष्पं प्रथमे विकासे समेत्य पातुं मधुपाः पतन्ति ।
एवं मनुष्यस्य विपत्तिकाले छिद्रेष्वनर्था बहुलीभवन्ति ।।
(मृच्छकटिक ९.२६)

फूल उमलत आहे असे पाहून भुंगे त्यावर तुटून पडतात. तसेच मनुष्याच्या संकटकाली एका अडचणीतून अनेक अडचणी निर्माण होतात.

एकस्य दुःखस्य न यावदन्तं गच्छाम्यहं पारमिवार्णवस्य।
तावद्द्वितीयं समुपस्थितं मे छिद्रेष्वनर्था बहुलीभवन्ति॥
हितोपदेश १९३.

समुद्र पार केल्यासारखा मी एका दुःखातून बाहेर पडतो तोंच दुसरे माझ्यापुढे उभे राहते. एकदा छिद्र निर्माण झाले की त्यातून संकटे गुणित होऊ लागतात.

१८) सन्तोष एव पुरुषस्य परं निधानम्.

सर्पाः पिबन्ति पवनं न च दुर्बलास्ते।
शुष्कैस्तृणैर्वनगजा बलिनो भवन्ति।
कन्दैः फलैर्मुनिवरा गमयन्ति कालम्।
सन्तोष एव पुरुषस्य परं निधानम्॥
पंचतंत्र मित्रसम्प्राप्ति १५९.

साप वारा पिऊन जगतात पण ते दुर्बल नसतात. सुके गवत खाऊन अरण्यातले हत्ती बलवान् होतात. ऋषिमुनि कन्दफळांवर दिवस काढतात. आनंदी वृत्ति हाच माणसाचा सर्वोत्कृष्ट ठेवा आहे.

१९) अरसिकेषु कवित्वनिवेदनम्.

इतरतापशतानि यदृच्छया वितर तानि सहे चतुरानन।
अरसिकेषु कवित्वनिवेदनं शिरसि मा लिख मा लिख मा लिख॥
सुभाषित.

हे ब्रह्मदेवा, अन्य शंभर त्रास माझ्या मागे लाव, मी ते सहन करीन. पण अरसिकापुढे काव्यवाचन एव्हढे मात्र माझ्या कपाळावर लिहू नकोस.

२०) बालादपि सुभाषितम्.

विषादप्यमृतं ग्राह्यममेध्यादपि काञ्चनम्।
अमित्रादपि सद्वृत्तं बालादपि सुभाषितम्॥
मनुस्मृति २.२३९.

विषामधून अमृत घ्यावे, अपवित्र गोष्टींमधून सोने घ्यावे, वैऱ्यापासून चांगली वर्तणूक घ्यावी आणि लहानापासून योग्य बोललेले घ्यावे.

संस्कृतीलेख

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

23 Feb 2018 - 10:45 am | आनन्दा

अवांतर

गांगल आठवले उगाचंच

sagarpdy's picture

26 Feb 2018 - 10:59 am | sagarpdy

ह्या ह्या ह्या :D

बिटाकाका's picture

23 Feb 2018 - 12:51 pm | बिटाकाका

व्वा, छान माहिती! काही माहिती होते, काही नवीन कळले. त्यातला छप्पन हा विशेष. आतपर्यंत मी हा आकडाच समजत होतो. म्हणजे थोडक्यात तुझ्यासारखे खूप पाहिले अशा अर्थाने.

प्रचेतस's picture

23 Feb 2018 - 2:26 pm | प्रचेतस

षट्प्रज्ञ' म्हणजे 'सहा शास्त्रे जाणणारा विद्वान'

ह्याच अर्थी शब्द असणारा दिवेआगरचा ताम्रपट आठवला.
'षडंगवि रिसियप घैसास अर्थात सहा अंगांचा (शास्त्रांचा) जाणकार असणारे रिसियप घैसास.

रमेश आठवले's picture

23 Feb 2018 - 9:55 pm | रमेश आठवले

चेष्टा आणि शासन हे दोन मुळातले संस्कृत शब्द. आपण ते मराठीत तसेच्या तसे वापरतो , पण अर्थ बदलून.चेष्टा या शब्दाचा संस्कृत मध्ये अर्थ प्रयत्न अथवा प्रयास असा केला जातो तर मराठीत हा शब्द थट्टा अथवा मस्करी या अर्थाने वापरतात. तसेच संस्कृत मध्ये शासन म्हणजे ( अपराधासाठी ) दण्ड किंवा शिक्षा या अर्थाने वापरतात तर मराठीत त्याचा उपयोग सरकार किंवा कारभार (प्रशासन ) या अर्थि वापरतात.

श्री. कोल्हटकर यांनी एक सुरेख धागा चालू केला आहे. या संदर्भात एका संग्राह्य पुस्तकाची येथे नोंद करावी असे वाटते. भाऊ धर्माधिकारी यांचे " मराठी भाषेची संस्कृत लेणी " हे पुस्तक पुणे विद्यार्थी गृहाने प्रकाशित केले आहे. त्यात सुमारे 625 संस्कृत भाषेतील लेणी (अलंकार) मराठी भाषेने कशी स्विकारली व त्यांचा उपयोग कसा केला ते सोदाहरण दिले आहे. मराठीत कसे वापरले जाते, मूळ संस्कृत स्त्रोत, त्याचे भाषांतर इत्यादी महिती सुलभपणे मिळते. मात्र तेथे फक्त संस्क्रुत लेणी दिली आहेत. मराठी शब्दाची व्युत्पत्ती संस्कृत शब्दापासून झाली असावी का हा भाग तेथे मिळणार नाही.
शरद

अरविंद कोल्हटकर's picture

27 Feb 2018 - 1:04 am | अरविंद कोल्हटकर

संस्कृतमध्येहि शास् (२ प) ह्या धातूचे ’to chastise, correct, censure, punish' आणि 'to restrain, control, rule, govern' असे दोन छटांचे अर्थ मोनिअर विल्यम्सने दाखविले आहेत. साकुन्तलाच्या पहिल्या अंकात पुढील श्लोक आहे, ज्यात दोन्ही छटा दिसतात:
क: पौरवे वसुमतीं शासति शासितरि दुर्विनीतानाम् ।
अयमाचरत्यविनयं मुग्धासु तपस्विकन्यासु॥ १.२२
अन्वय - दुर्विनीतानां शासितरि पौरवे वसुमतीं शासति क: अयं मुग्धासु तपस्विकन्यासु अविनयं आचरति?
विनयाच्या मार्गाने न चालणार्‍यांना शिक्षा देणारा राजा (दुष्यन्त) पृथ्वीवर राज्य करीत असतांना भोळ्या तपस्विकन्यांना छळणारा कोण आहे हा?

sagarpdy's picture

26 Feb 2018 - 10:59 am | sagarpdy

पु भा प्र

पैसा's picture

26 Feb 2018 - 10:46 pm | पैसा

'तारांबळ' ची आठवण झाली.

अरविंद कोल्हटकर's picture

27 Feb 2018 - 12:40 am | अरविंद कोल्हटकर

येणार आहे त्याचा नंबर लागला म्हणजे....

arunjoshi123's picture

27 Feb 2018 - 11:31 am | arunjoshi123

भारी धागाय राव.