1

सायकोसोशल

Primary tabs

वनफॉरटॅन's picture
वनफॉरटॅन in जनातलं, मनातलं
19 Feb 2018 - 10:17 am

Jason, you're too fucking metal man
Too metal for your own good
You guys want some more don't ya
we're just getting warmed up now man

कुठल्याही समाजाचे आखणीबद्ध नियम, संकेत, परंपरा ह्यांचा दरवेळी बऱ्याच लोकांना त्रास होत असतो. संगीताचंही तसंच आहे. आत्तापर्यंतच्या सर्वमान्य असलेल्या संगीतातले बरेचसे नियम पायदळी तुडवून एक प्रकार निर्माण झालेला आहे. रॉक नवीन होतं तेव्हाही तेच. रॅप, हिप-हॉप, फंक आणि ब्लूजचंंही बरचसं तसंच. फरक इतकाच, की समजाची 'अमान्यता' ह्यांनी फाट्यावर मारली. 'आम्ही शोषित/वंचित म्हणून आमचं विचित्र संगीत खपवून घ्या', किंवा 'आम्ही तुमचं आवडून घेतलं, आता तुम्हाला आमचं संगीत आवडायला काय झालंय', 'आम्ही यंग, तुम्ही आऊटडेटेड' असा अभिनिवेश ह्यांच्यात कधीच नव्हता. हे संगीत आवडणं-न आवडणं हा सर्वस्वी व्यक्तिगत आवडींचा भाग आहे. एखादं गाणं तुम्ही ऐकलंच पाहिजे, आणि नाही ऐकलंत तर तुमचं हे करु अन् ते करु असलं काही सांगायला कोणी इथे बसलेलं नाही. हे वर्षानुवर्षे गाजलेलं आहे. एकाएकी यंत्रणेला जाग आणणारा निर्बुद्ध खेळ नाही, की आईवडलांपरोक्ष चालणारी बुवाबाजी संस्कृती नाही. इथे सगळ्यांना स्वत:चं स्ट्रगल वाढून ठेवलेलं आहे.

प्रसंग १:
काही लोकांना ह्यात्या ओळखी काढून/कोट्यातून चांगल्या ठिकाणी नोकरी/चांगल्या महाविद्यालयांत प्रवेश मिळतो. सीव्ही/गुण बरेच चांगले, भाषांवर चांगली पकड, बाकी बऱ्याच अचिव्हमेंट्स असतानाही तुम्हाला बऱ्याच चपला झिजवाव्या लागतात. क्षणोक्षणी तुम्हाला तुमच्या आणि 'त्यां'च्या आयुष्यातली तफावत दिसत राहते. तुम्हाला तुमच्या ह्या भाकड व्यथेचाही कंटाळा आलेला असतो. शिवाय तुमचं तोंड ह्याबाबतीत चांगलंच बंद केलं गेलेलं असतं.

I push my fingers into my eyes
It's the only thing that slowly stops the ache

प्रसंग २:
तुमच्या घराजवळ काहीतरी मिरवणूक असते. भयानक डॉल्बी सिस्टीम. तुमची उद्या परिक्षा आहे. तुमच्या खिडकीची तावदानं, दरवाजे भन्नाट थरथरत असतात. पोलिस ती मिरवणूक सुखरूप पार कशी पडेल ह्याच फंदात. परत एकदा तुमचं भविष्य, ह्या एखाद-दोन तासांवर दोलायमान.

Jesus, it never ends, it works its way inside
If the pain goes on...!

प्रसंग ३:
उगीच एक नातेवाईक, स्वत:चा फायदा नसताना फक्त मत्सरापायी तुमच्या कामात काड्या घालतो. तुम्ही त्याचं वय तुमच्या दुप्पट असल्याने काही फार करु शकत नाही. हे चालत नसेल तर एक आर्बिट्ररी प्रेमभंग वगैरेचा प्रसंग घालावा.

असेच आणखी काही प्रसंग. सभोवतालच्या गोंधळात, स्वत्व हरवल्याचा भास क्षणोक्षणी होत असतो. अगतिकता, नैराश्य, हतबलता वगैरे सगळं फालतू आहे, स्वत:वर विश्वास असला पाहिजे, तो कशातही डळमळीत झाला नाही पाहिजे इत्यादी बच्चन लहानपणापासून मिळत असतंच. किंबहुना, तुम्हीही ते कोणालातरी दिलेलंच असतं कधी ना कधी. पण. दरवेळी, सभोवतालचे हजारो लोक त्यांचं नैराश्य इथे तिथे काढत असताना पाहून तुम्ही पराकोटीचे शांत/संयमी; एकदम मर्यादापुरुषोत्तम (किंवा मर्यादास्त्र्यौत्तमा) बनायचा प्रयत्न करत असता. त्यामुळे, 'नकारात्मक भावना'वगैरे ज्या असतात त्यांचा निचरा फक्त रौद्र रुप धारण करतो. एक भयानक राग - तो अर्थ/समाज/राजकीय अशा कुठल्याही व्यवस्थेविरोधात, नातेसंबंधांत, अक्षरश: कुठेही; असू शकतो, जो साचत राहतो.

I've screamed until my veins collapsed
I've waited last, my time's elapsed
Now all I do with live with so much fate

तुमचा एक मित्र असतो. कमअस्सल अशाच प्रसंगांमधून जाणारा. पण त्याचं डोकं बरंच ताळ्यावर असतं. तो रांगांमध्येही शांत असतो बऱ्यापैकी. त्याचे हेडफोन/इअरफोन कानात कायम अडकवून तो जोरजोरात डोकं हलवत असताना तुम्ही त्याला कमीत कमी दररोज एकदातरी पाहता. मग त्याला विचारलं की तो तुम्हाला तो इअरफोनचा एक जॅक सोपवतो. त्याने आधी तीनदा तरी सांगितलेलं असतं की हे तुम्हाला आवडणार नाहीये म्हणून.
किंवा,
एखादा मारधाड चित्रपट पाहताना/गेम खेळताना/जिम मध्ये/बॉक्सिंग क्लास मध्ये कुठेही तुम्ही 'ते' ऐकता. छान वाटतं. ग्रिपींग. जोरकस. जबरी. जरा शोधाशोध करून तुम्हाला 'ते' काय आहे ते कळतं.

I wished for this, I bitched at that
I left behind this little fact
you cannot kill what you did not create

शब्द तुम्हाला प्रचंड आवडतात. संगीत तर भन्नाटच. एखादी चांगली फुगलेली जखम कापावी आणि भळाभळ रक्त वाहत असावं, आणि ते बरेच दिवस अंगावर वागवलेलं; कमी कमी होत गेल्यासारखं वाटावं. अगदी तुम्ही स्वत:च ते गाताय, ड्रम अगदी मनापासून झोडताय असं तुम्हाला वाटतं. एकाएकी तुमच्यातही पाशवी शक्ती आहे, आणि परिस्थिती अगदीच काही हाताबाहेर नाही गेलीये असं काहीसं वाटू लागतं.
तुम्ही अधिक कान देऊन ऐकता. काही बँड्जची तुम्हाला नावं कळतात. तुम्ही यूट्यूबवर जाऊन ती गाणी ऐकता. युट्यूब तयारच असतं अजून माल घेऊन. तुम्ही आता अधिकृतरित्या 'मेटलहेड' झालेले असता. ह्या कलाप्रकाराबद्दल (genre) तुम्ही भलभलतं काहीतरी नेहमीच ऐकलेलं असतं. हे सैतानाचं संगीत आहे, हे म्हणजे विकृत अत्याचारी माणसांचं संगीत आहे, सगळ्यात वर म्हणजे हे तर संगीतच नाहीए.. हेही ऐकलेलं/वाचलेलं असतं. नंतर इथेतिथे लोक अजून लिहीतात,

प्रचंड गोंगाट असलेले हे संगीत ऐकून एक तरुण मुलगा आत्महत्येला प्रवृत्त झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.

हे कुठे काय, खरंच झालं का, नक्की ते संगीत ऐकल्यानेच झालं का वगैरे प्रश्न ह्या लोकांच्या मते वादातीत असतात. प्रचंड गोंगाट असतो. पण तो 'तुमचा' असतो. तुमच्यापुरता. आजूबाजूला चालू असलेले नसते गोंगाट, ते गोंगाट नाहीतच अशी धारणा असलेल्या, कधीही हे संगीत न ऐकलेल्या लोकांची आपल्या संगीत आवडी-निवडींवर भाष्य करायची क्षमता आहे का, हे प्रश्न तुम्हाला पडतात.

'Bout time I set this record straight
This needle nose punchin' is makin' me irate

मेटल हे संगीत नाही. किंबहुना, सर्वमान्य संगीताच्या निकषांवर अजिबात आधारित नसलेलं ते काहीतरी आहे, अशी आपली धारणा आहे. पण तेच त्याच्या यशाचं द्योतक आहे. कधीकधी त्या संगीतात ताल व्यवस्थित असतो. एसीडीसी, रॅमस्टिन, फाईव्ह फिंगर डेथ पंच. ह्याचे शब्द बरेचदा व्यवस्थेविरोधात असतात. ह्यांच्या गाण्यांत क्रांतीची नसली, तरी बंडाची, उठावाची भाषा असते. शांतपणे बसू न देण्याची भाषा असते. बाकी मृत्यूतर सोकावलेला आहेच की इथेतिथे घास घ्यायला, त्याचं इतकं स्तोम कशाला?

'क्रांतीकारक' वगैरे तर साधारण संगीतही कधीच नव्हतं, किंबहुना, असे जुनेच निकष लावून जर हे संगीत पहायचं असेल तर त्याच्याकडून क्रांती वगैरेच्या अपेक्षा कशाला?

मेटल संगीत(?) हे एक युद्ध आहे. व्यवस्थेविरोधातलं. हे अंगात भरपूर जोम, ॲड्रेनॅलिन असलेल्या तरुणांचं संगीत आहे. समाजातल्या मुळात असलेल्या-नसलेल्या सगळ्याच चौकटी उद्ध्वस्त करणारं हे संगीत आहे. मग त्या काहीही असोत- संधींचा अभाव, समाजातली असमानता ('असहिष्णुता' लिहीलं तर बोनस पॉइंट्स मिळतील का?) अपंग न्यायव्यवस्था, सुमारांची सद्दी ह्याविरोधातलं हे बंड आहे. ह्याबाबतीत एकवाक्यता आणायची असेल, तरुण मनं (शरीरं नाही, मनंच!) एकत्र आणायची असतील तर त्यांना भिडणारं, त्यांना भावणारं, उर्जादायक असं गीत लिहीलं जाणं अपरिहार्य आहे, आणि हेच प्रत्येक संगीतकाराचं अंतिम ध्येय असतं. त्यामुळे जर तरुण मनं तिथे ओढली जात असतील, तर तेच त्याचं यश आहे, आणि ते 'कालौघा'त बदलायला वेळ लागणार नाही.

विकसित देशांमध्ये साधारण सुखसोयी सहज मिळत असल्याने एखादी भावना तिच्या अत्युच्च, आदिम रुपात प्रगटणं जास्त शक्य आहे. म्हणून संपूर्ण संगीतप्राकाराला काही हिडीस घटनांमुळे रद्द ठरवणं हा रुचीहीनतेचा कळस आहे. खरंतर विकसनशील देशांना, त्यांतल्या तरुण, कर्तबगार पिढीला मात्र किंबहुना अशाच अस्वस्थ, आक्रमक संगीताची गरज आहे. तो त्यांचा आवाज आहे, आणि स्वघोषित संगीतज्ज्ञ हा कालौघ रोखू शकणार नाहीत.

राहता राहिला प्रश्न नैराश्याचा. मृत्यू, रडारड ही अनेकानेक 'क्लासिक' गाण्यांतून दिसलेली आहे. गज़ल हा जवळपास अख्खा प्रकार मृत्यू, दारु (अमली पदार्थ!) ह्यांवर आधारित आहे. अतिशय संथ आणि नैराश्यातून बंड न करता, ते नैराश्य चक्क साजरं करणारं, त्या नैराश्यातच दारू इत्यादींचं सेवन करत बसून रहा असं उपदेश करणारं हे संगीत अगदी दर्दींची आवड, 'अभिजात', सर्वमान्य, 'एलिट' म्हणून ओळखलं जातं.

हम ना करेंगे प्यार, तेरे बिना जिंदगी से शिकवा, हंगामा हैं क्यूं बरपा पासून
भरे नैना, तनहाई, जरुरी था ह्या गाण्यांत ते ठासून भरलेलं आहे. पण ही गाणी अप्रतिम म्हणून गणली जातात; आणि त्यांच्या जागी ती आहेतही.

I gotta say what I gotta say, then I swear I'll go away
But I can't promise you'll enjoy the noise

ह्या भाकड रडारडीला कंटाळून, जगाचे सगळेच नियम पायदळी तुडवून बनलेलं ते संगीत आहे. त्यात भाषा नैराश्याची असली, तरीही संगीत धगधगतं, त्या नैराश्यातून पेटून उठणाऱ्या माणसांचं, अशाच उष्ण रक्तांच्या माणसांसाठी आहे. स्लिपनॉट, अव्हेंज्ड सेव्हनफोल्ड, मेटॅलिका, स्लेअर ही त्यांच्यातली काही नावं. त्यांचं संगीत हे बंडखोर आहे. ते फक्त आणि फक्त, ह्याच माणसांसाठी बनवलेलं आहे.
सरसकट ते टीनएजर्सवर प्रभाव पाडण्यासाठी केलेलं आहे ह्या आरोपात काहीही तथ्य नाही. खरंतर त्याचा अपप्रचारच इतका होत असतो की हे संगीत आवडणं, ही एक चॉईस असते. परत सामान्य गाणी ऐकत असलेल्या कोणत्याही माणसाला ते चटकन आवडण्यासारखं नाहीच. एखाद्या संस्कृती किंवा नियमबद्ध खेळासारखं ह्यात अडकायचं बंधन नाही. तुमचा फोन, तुमचा म्युझिक प्लेअर. नाही आवडलं की करा डिलीट. इथे तुमचं आयुष्य बरबाद करायची धमकी नाही, की डिलीट बटण दाबायला तुमच्या बोटांना मनाई नाही.
जाता जाता इतकंच;
नैराश्यासाठी हे संगीत क्रांतिकारक न वाटता काहीतरी तालमात्राबद्ध विलापिका ऐकणाऱ्यांनी ह्याच्या वाटेला जाऊ नये. वाटेला गेलात, तर ते ऐकणाऱ्यांबद्दल काहीतरी अवाजवी टोकाचं मतप्रदर्शन करु नये. तुम्हाला जी गोष्ट आवडत असेल, तिच्याबद्दलही लोकांची इतकीच टोकाची मतं असू शकतात ह्याचं भान ठेवावं.


Can you read between the lines?
Or are you stuck in black and white?
Hope I'm on the list of people that you hate
It's time you met the monster that you have helped create

(उद्धृत ओळी ह्या मेटॅलिका, स्लिपनॉट आणि फाईव्ह फिंगर डेथ पंच ह्यांच्याच व्हिप्लॅश(!), ड्युॲलिटी, स्पिट इट आऊट आणि मीट द मॉन्स्टर ह्या गीतांतून साभार.
प्रस्तुत लेख हा ह्या लेखावरच्या मेटल म्युझिकबाबत भागाबद्दलची प्रतिक्रिया आहे. सरसकट एका चांगल्या कलाप्रकाराला उगीच काळिमा फासणे, त्याच्याबद्दल टोकाचा अपप्रचार करणे, आणि अनिष्ट प्रकारांशी त्याची तुलना करणे ह्याबाबत.)

पूर्वप्रकाशित: ऐसीअक्षरे, १५/०९/२०१७

संगीतभाषाप्रतिसादप्रतिक्रियाआस्वादवाद

प्रतिक्रिया

पैसा's picture

19 Feb 2018 - 3:03 pm | पैसा

मेटॅलिक संगीत मला आवडेल असे वाटत नाही. पण तुमचे लिखाण आवडले.

जेम्स वांड's picture

19 Feb 2018 - 4:15 pm | जेम्स वांड

अर्थात नॉर्वेजियन मेटल ही एक अकवायर्ड टेस्ट आहे हे ही खरे

तुषार काळभोर's picture

19 Feb 2018 - 9:12 pm | तुषार काळभोर

बद्दल इतकं विस्तृत लेखन मराठीत कधीच वाचलेलं नाही. बाकी किर्तनाने समाज सुधारत नाही आणि तमाशाने बिघडत नाही, हेच मेटल/हेवीमेटल विषयी म्हणता येईल.
मला मेटलची ओळख झाली ती xXx पिच्चरमुळे. त्यात सुरुवातीलाच रॅमस्टेनचं Feuer frei! येतं. पुढे xXx एका ऑर्थोडॉक्स खासदाराची (ज्याचे रॉक/मेटल संगीताविषयी पारंपारिकविचार आहेत) गाडी पळवतो त्याला धडा शिकवण्यासाठी.
नंतर मग रॅमस्टेनचं सगळं ऐकलं. तिथून पुढे मग असे सगळे रॉक, मेटल, हेवीमेटल, इत्यादी प्रकार असतात हे कळलं.
पण इंग्रजी संगीतातली रुची खूप मर्यादित राहिली.

अप्रतिम लेख
बहुधा वाचलेला वाटतोय पुर्वी
तुमच्या लेखातील हे निरीक्षण जबर अचुक आहे.
मेटल संगीत(?) हे एक युद्ध आहे. व्यवस्थेविरोधातलं. हे अंगात भरपूर जोम, ॲड्रेनॅलिन असलेल्या तरुणांचं संगीत आहे. समाजातल्या मुळात असलेल्या-नसलेल्या सगळ्याच चौकटी उद्ध्वस्त करणारं हे संगीत आहे. मग त्या काहीही असोत-

तुमच्या एकुण सुचनेग]वणीविषयी Bob Dylan च्या खालील ओळी पुरेशा असाव्यात

Come mothers and fathers
Throughout the land
And don't criticize
What you can't understand
Your sons and your daughters
Are beyond your command
Your old road is
Rapidly agin'
Please get out of the new one
If you can't lend your hand
For the times they are a-changin'