ऑस्ट्रेलियन ओपन चा अंतिम सामना आणि शैलीदार फेडरर...

ss_sameer's picture
ss_sameer in जनातलं, मनातलं
31 Jan 2018 - 6:46 pm

काही माणसे कायम चिरतरुण राहावीत अन त्यांच्या कलाकृती सतत येत राहाव्यात अस वाटत राहतं. ज्यांचं मन चिरतरुण असत अशा रसिकांची ही भावना देखील तितकीच चिरतरुण.

ऑस्ट्रेलियन ओपन चा २०१८ चा अंतिम सामना संपल्यावर रडणारा फेडरर पाहून ही रसिक मंडळी अशीच पुटपुटली. सर्वकालीन महान खेळाडूंत ज्यांच्याबद्दल आत्यंतिक आदर राहील आणि शेवटपर्यंत लोकप्रियतेच्या शिगेला असलेला हा खेळाडू.

वयामुळे खेळाला मर्यादा येतात खऱ्या. जुन्यांनी ते ओळखून नव्यांना संधी द्याव्यात. परंतु ही व्याख्या सांघिक खेळाची. वैयक्तिक खेळात निवृत्तीचे वय जो तो ठरवतो. अशांना टीका करून घालून पाडून बोलून सक्तीची निवृत्ती देणारी आजकालची समाज माध्यमी मंडळी. समाजमाध्यमे किती घातक आहेत ते लिहिण्याचा हा लेख नव्हे. परंतु ज्या समाज माध्यमांनी फेडरर संपला अशा हाकाट्या २०१७ च्या आधीच्या ४-५ वर्षे सतत हाणल्या, त्यांना रॉजर भाऊंनी सडेतोड उत्तर दिलंय.

रॉजर चा खेळ पाहिला, नेत्रदीपक, नयनरम्य वगैरे नेत्रसुखदादी विशेषण योग्य कालावधी होता. मरिन चिलीच ची हतबुद्धता पाहून मन सुखावत होते अन त्याच्या चौथ्या सेट मधली "वापसी" काळजाचा ठोका चुकवणारी होती. असो, अखेरीस अपेक्षित निकाल लागला आणि बऱ्याच कालावधी नंतर ऑस्ट्रेलियात रडणारा - चषक उंचावणारा - विलोभनीय रॉजर दिसला. आनंदी वातावरण करून गेला.

ऑस्ट्रेलियन ओपन चा ड्रॉ जाहीर झाल्या झाल्या "फेड" च्या भक्त गणांनी हुश्श केले. सोपा ड्रॉ, समोर नदाल, जोकोविच कोणीच नाही. आलेच तर थेट उपांत्यपूर्व किंवा उपांत्य फेरीत. पुढे नादाल जखमी झाला, जोकोविच चा चुन्गने काटा काढला. अन फेडरर चुन्ग समोर उपांत्यफेरीत आला. चुन्ग ची वाटचाल स्वप्नातीत होती. त्याची आणि नोवाक ची लढत खरेच लढाईच होती. शेवटी त्याने चढाई केली आणि बाजी मारली. आम्हाला वाटले - झाले आता - देतो तो 'फेड' ला धक्का, पण..... नियतीला अजून संधी द्यायची होती 'फेड' ला. पहिल्या सेट नंतर निमित्त झाले पायाचा स्नायू दुखवण्याचे, बस... फेडला थेट अंतिम सामन्यात प्रवेश.

कोणी म्हणेल what a lucky fellow! पण त्याच्या नशिबावर बोट ठेवू नका, अंतिम सामन्यापूर्वी पठ्ठ्या फेडरर एकही सेट हरलेला नव्हता आणि त्याला बर्डीच सारखा तुल्यबळ प्रतिस्पर्धी देखील भेटलेला. यशाच्या नंतरच्या फुलांचे गुच्छ स्वीकारणारा जे काटे तुडवून आलेला असतो त्या काट्यांचे मूल्य फक्त त्या यशवंतासच कळते आणि त्याच्या पाठीराख्यांना.

अंतिम सामना मात्र अगदीच सुरेख झाला. मरीनच्या लढतीला देखील सलाम. त्याने दिलेली झुंज कौतुकास्पदच होती. अन फेडरर ने जिंकलेले सेट शैलीदार.

फेडरर ने फ़ुस्कॉविकस बरोबर जिंकलेली चौथी फेरी केवळ अनुभव आणि स्टॅमिना च्या बळावर जिंकली. प्रतिस्पर्ध्यास पळवून पळवून पॉईंट काढले. अन मरीनही फक्त अनुभवापुढेच हरलाय.

फेडरर बरोबरच्या मागच्या नऊ लढतीत एकच जिंकलेला तो - त्याचं दडपण स्पष्ट दिसत होतं पहिल्या सेट मध्ये. फेडरर ने पहिलीच सर्विस ब्रेक केली त्याची. मग निराश नाही होणार का तो? फेडरर चा फॉर्म इतका भन्नाट की त्या सेट चा एक गेम त्याने 1 min 21 सेकंदात पूर्ण केला. 15-0, 30-0, 40-0, गेम फेडरर. इतका सोपा. अवघ्या 22 मिनिटात पहिला सेट रॉजरमय झालेला.

कॉमेंटेटरने तर पुकारा पण केला, "This match is already in pockets of Rojer. I think, if I left the chair for small toilet break, I may see him with packed trophy in his bags." इतका सहज. 6-2

पण दुसऱ्या सेट ला मात्र रंगत आणली क्रोएशियाच्या योद्ध्ध्याने. दोघांनी आपापल्या सर्विस राखल्या, अन टाय ब्रेकर मध्ये मरिन ने पहिल्यांदाच फेडरर ची सर्विस भेदली. बस, फेडरर ची एकच चूक, एकच पॉईंट, चिलीच चा सेट खिशात. 7-6(7-5).

मरिन परतला असा विश्वास बसेस्तोवर फेडरर ने त्याची सर्विस भेदून तिसरा सेट जिंकला. एक गेम तर 1min 02सेकंदचा. 6-3

निवांतपणा भेटणार म्हणून विकत आणलेले किलोभर पॉपकॉर्न घरी पार्सल करून न्यावे लागणार अशी वेळ आणली त्याने. त्याचा झपाटाच कोण कौतुकास्पद. विचारू नका. लोकांनी पाण्याच्या बाटल्या शोधल्या, आपापल्या बॅगांत भरल्या. पॉपकॉर्न भरण्यासाठी प्लास्टिक बॅगा पर्स च्या छोट्या कप्प्यातून बाहेर आल्या. चौथा सेट सुरू झाला अन.....

हर हर, चिलीच ने सर्विस भेदली फेडरर ची. सुरुंगच लावला त्याच्या विजयरथाच्या मार्गात. ओझं वहावं लागणार नाही म्हणून पोरांच्या बापांनी आनंदाने पॉपकॉर्न बाहेर काढले परत. बायकांनी पाण्याच्या बाटल्या तोंडाला लावल्या. अन कारण भेटलं, पाणी प्यायच्या निमित्त करून लिपस्टिका लावून घेतल्या. पोरांना कळलं, बाप अजून एखाद घंटा काही निघत नाही, त्यांनी भोकाड पसरलं, हळूच शेजारच्या पोराला चिमटे काढले, त्याच्या टोप्या ओढल्या. अन त्यांचे बाप आता फेडरर च्या भविष्यावर लॉटरीचा आकडा लावू लागले. सेट चिलीचच्या खिशात, 7-5.

दोलायमान सामना बास झाला आता - जाम टीवटीव पाहिली. फेडरर ने घेतली रॅकेट हातात, सटासट ऐसे टोले लगावले की चिलीच एका कोपऱ्यात आणि चेंडू दुसऱ्या कोपऱ्यात. थैमान घातलं फेडरर ने कोर्ट वर. आखरीस मेलबर्न ला जल्लोष एवढा की त्याचे पडसाद थेट अंटार्क्टिका पर्यंत गेले. ग्रेट बॅरियर रिफ चे प्रवाळ आनंदाने थयथयाट करत नाचू लागले. कोण एल्गार होता तो. विचारू नका. 20 मिनिटात ऐसी तैसी. क्रोएशिया नवव्यान्दा दुःखात बुडविला फेडरर ने. ऐसा सेट पुन्हा होणे नाही. 6–2, 6–7(5–7), 6–3, 3–6, 6–1..

तसा विचार केला तर सामना वर वर्णन केल्याप्रमाणे दोलायमानच झाला. चढ उतार रंगत सर्वच होत त्यात. अन तसे पाहता सामना एकतर्फी देखील होता याचे कारण फेडरर ची शैलीदार फटकेबाजी. त्याच्या मनगटाची नजाकत काही और होती. मंडळी - तुम्हाला ही नजाकत मी कितीही रंगवून सांगितली तरी तुम्ही स्वतः पाहिलेला ताजमहाल हा कायम जास्तच सुंदर दिसतो. तुम्ही सामना पहिला असेल तर उत्तमच, पण जर नसेल तर you missed it. दोन्ही खेळाडू प्रयत्न करीत होते. लांब खोल फटके, बेस लाईन वरून परतवलेले, बॅक हँड, फोर हँड, सरळ सर्विस, नेट जवळचे, नेट वरचे, सगळं सगळं होतं.तरी पण सामन्यात फेडररला सर्व अस्त्र वापरायची गरज पडली नाही. त्याचे ड्रॉप शॉट्स अभावानेच दिसले. फसवे (pseudo/fake) फटके दिसले नाहीत. नेटजवळ फार गेला नाही, ना स्मॅश पाहिले. ना त्याचा आवडता - दोन टांगांमधून मारावयाचा झटक्याचा फटका, त्याचा signature शॉट दिसला. त्याच्यात तंत्र शुद्धता लय एकाग्रता याबरोबरच एक जास्तीची गोष्ट दिसते जी इतर खेळाडूंत त्याच्या मानाने कमी वाटते, ती म्हणजे दडपणरहित खेळाचा आनंद घेण्याची वृत्ती.

त्याच्या खिलाडू वृत्तीचे प्रसंग भरपूर आहेत. माहिती जालावर फेडरर च्या अमर शॉट्स चे कित्येक विडिओ आहेत.

वर्षभरात त्याने 3 ग्रँडस्लॅम जिंकल्या. अन येणाऱ्या वर्षात अजून 3 बाकी आहेत. शैलीदार टेनिस खेळणाऱ्या या खेळाडू समोर ताकदीने (शैलीचा नव्हे) खेळ खेळणारा नदाल हा(च) प्रतिस्पर्धी नसता तर फेडरर च्या ग्रँडस्लॅम ची संख्या तीन एक डझन सहज झाली असती. आमच्या साठी आनंदाची गोष्ट म्हणजे नुकतीच त्याने 'खेल अभि बाकी है' ची नांदी दिली आहे.

मार्गारेट कोर्ट च्या 24 ग्रँडस्लॅम चा विक्रम अजून दूर आहे. कोणी पुरुष तेथपर्यंत पोहोचलेला नाहीय. फेडरर ला ते स्वप्न पडू लागलंय आता. मध्ये सेरेना विलीयम्स अडथळा ठरू शकेल पण सध्या ती ममा झालीय. तिच्या कमबॅक पर्यंत रॉजरच राजा आहे.

सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या पहिल्या तीन महिलाच आहेत. अन चौथा फेड.
असे म्हणतात की पुरुषांचा खेळ जास्त दमछाक करणारा असतो. सामन्यांची लांबी दीर्घ असते. प्रतिस्पर्धी दमदार असतात. त्यामुळे अतिरिक्त स्टॅमिना लागतो. म्हणून अजून कोणी पुरुष मार्गारेट पर्यंत पोचला नाही. पण 'कल किसने देखा है.....?' आणि स्त्री पुरुष समानतेच्या जगात या सर्व गावगप्पा आहेत असे समजतात. तरी हे मात्र अंतिम सत्य आहे की पुरुषांचे सामने अधिक "चुरशींचे" असतात आणि महिलांचे "प्रेक्षणीय".....!

क्रीडाप्रकटनविचारलेखप्रतिभा

प्रतिक्रिया

पैसा's picture

31 Jan 2018 - 8:04 pm | पैसा

एकच वादा, फेडरर दादा!

लेख मॅच बद्दल आहे तोपर्यंत आवडला. शेवटचा परिच्छेद वाचून जरा भुवया उंचावल्या आहेत. तो नसता तर लेखाला ८/१० गुण दिले असते.

ss_sameer's picture

31 Jan 2018 - 8:36 pm | ss_sameer
ss_sameer's picture

31 Jan 2018 - 8:38 pm | ss_sameer

मार्गारेट ची बाजू वरचढ दाखवलेली खटकली की अजून काही?

पैसा's picture

31 Jan 2018 - 9:02 pm | पैसा

>>>>>तरी हे मात्र अंतिम सत्य आहे की पुरुषांचे सामने अधिक "चुरशींचे" असतात आणि महिलांचे "प्रेक्षणीय".....!

हे तुमचे मत आहे का? की अजून कोणाचे? हे विधान तुम्हाला योग्य आणि बरोबर वाटते का?

ss_sameer's picture

31 Jan 2018 - 9:41 pm | ss_sameer

वैयक्तिक मत नाही राव, स्त्रियांचे टेनिस चे सामने हे त्यांच्या खेळाबरोबरच त्यांच्या कपड्यांवरून आणि अंगकाठीवरून चर्चिले जातात. आणि हे जगजाहीर आहे. मारिया शरपोवा, स्टेफी, ऍना कुरनिकोवा, यादी वाढतच जाइल. शिवाय तुम्ही आक्षेप घेण्यासारखे तर हे बिल्कुलच नाहीय. ते खेळाडू हे सगळं खिलाडू वृत्तीने स्वीकारताय मग आपण कशाला विचारांना वक्रीभूत करावे?