अजून एक कप, 'हमेशा तुमको चहा'

सरनौबत's picture
सरनौबत in जनातलं, मनातलं
8 Jul 2017 - 10:42 am

स्मार्टफोन वर लांबलचक पोस्ट्स लोकं वाचत नाहीत. म्हणून 'हमेशा तुमको चहा' मध्ये मोजक्याच गोष्टी लिहिल्या. जिव्हाळ्याचा विषय असल्याने लेखाबद्दल बरेच अभिप्राय आले. ‘आधण शिल्लक आहे आणि गॅस गरम आहे’ तोवर अजून एक कप टाकू म्हणून हा 'दुसरा कप'

अजून एक कप, 'हमेशा तुमको चहा'

"रत्नांग्रीच्या समस्त म्हयशी तूर्तास गाभण काय रे झम्प्या"! हा चहाच्या रंगावर मारलेला पुलंच्या अंतू बर्व्याचा शेरा. रत्नांग्रीच्या मधल्या आळीएवढे 'लोकोत्तर' पुरुष पुण्यात नसतील. पण 'लोकांना निरुत्तर' करणारे बऱ्याचदा भेटतात. एखाद्याने हौसेने 'खास दार्जिलिंग चा चहा आहे' असं सांगितल्यास 'तरीच एवढा थंड आहे' असा टोमणा. टपरीवर चहा आणायला वेळ लागल्यास 'आसाम ला गेला होतास काय रे बारक्या'!

इस्ट इंडिया कंपनी मुळे ब्रिटिशांबरोबर चहा देखील भारतात आला. पूर्वी केवळ मोजक्या श्रीमंतांसाठी असलेलं हे पेय इंग्रजांनी सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणलं. इंग्रजी भाषा, रेल्वे, पोस्ट इ. प्रमाणे चहा आणल्याबद्दल आपण इंग्रजांचे कायम ऋणी असलं पाहिजे. अर्थात त्यांच्या इंग्रजीत आपण जेवढे बदल केले तेवढे चहात देखील केले. इंग्लिश टी अतिशय लाईट, दूध न घालता केलेला. आपण मात्र 'कडक, मीठा, खुशबूदार' करून टाकला.

चहा करायला सोपा असूनही प्रत्येकाच्या चहाची चव वेगळी. मूळ पाण्याची आणि दुधाची चव, चहापत्ती हयामुळे चवीत फरक पडणारंच म्हणा. पण अगदी सगळे पदार्थ एकाच दर्जाचे घेतले तरी चहा करण्याच्या पद्धतीनुसार चवीत जमीन-अस्मानाचा फरक पडतो. पाणी आणि दूध एकत्र करून उकळणे, वेगवेगळं उकळून शेवटी एकत्र करणे, उकळताना कोणत्या वेळी चहा पावडर आणि साखर घालायची, इतर गोष्टी जसं आलं, वेलदोडा इ. आणि ह्या सर्व गोष्टींचे प्रमाण ह्या बाबी देखील महत्वाच्या आहेत. चहाचे आधण वेगळे उकळताना चहा जसा 'मुरतो' तसा आधीच दूध मिक्स केल्यास मुरत नाही. कमी मुरला कि पांचट लागतो. जास्त मुरल्यावर स्ट्रॉंग आणि गार देखील होतो. ह्या दोन्हीतला मध्यबिंदू पकडायला स्वतः 'मुरलेलं' चहाबाज असणं गरजेचं आहे. अर्थात 'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती' नुसार हा प्रत्येकाच्या आवडी-निवडीचा प्रश्न आहे. चहा उकळताना बघायला जशी मजा येते तशी 'एखाद्याकडून उकळायला' देखील येते.

चहा करण्याच्या पद्धती अनेक तसेच चहा पावडरीचे प्रकारही अनेक. ताजमहाल, सपट परिवार, रेड लेबल वगैरे ब्रॅण्ड्स जाहिरातींमुळे घराघरात जाऊन पोचले. सोसाय’टी’ पिणाऱ्यांची देखील एक स्वतंत्र सोसायटी आहे. इतक्या ब्रॅण्ड्स च्या गर्दीत 'गिरनार चहा' मुंबईत स्वतःची पत सांभाळून आहे. 'वाघांसारख्या मर्दांसाठी' लिप्टन चहा पासून आत्ताच्या 'वाघ-बकरी' चहा च्या डरकाळ्या टीव्ही वर ऐकू येतात. पिढ्यानपिढ्या घराण्याची परंपरा चालू ठेवणारे चहाबाज टी डेपो मधून खास फॅमिली मिक्शर घेऊन येतात. इकडे गेल्यावर CTC म्हणजे चहाच्या प्रोसेसिंग चा एक प्रकार (Crush,Tear, Curl) आहे हे समजलं. ह्यापूर्वी फक्त Cost to Company हाच फुलफॉर्म माहिती होता.

'चहा न आवडणारे लोक आणि भुतं-खेतं ही निव्वळ अंधश्रद्धा आहे’ ह्या मताचा मी. त्यामुळे चहा न आवडणारा इसम कधी भेटलाच तर त्याकडे मी केवळ 'भूतदयेने' बघतो.

अनेकदा 'माहोल' मुळे चहा प्यावासा वाटतो. सिंहगडावरील धुक्यात, लोणावळ्यातील पावसात चहा हवाच अशी 'हवा' असते. अश्या वातावरणात उभ्या-उभ्या चहा पिणाऱ्यापासून; उभ्या आयुष्यात कधीही चहा न पिणारे देखील पितात. अमृततुल्ये शहराच्या मध्यवस्तीत असल्याने असला काही रोमँटिक माहोल नसतो. तो माहोल चहा बनवणाऱ्याच्या साधनेतून निर्माण होतो. कपाळाला गंध लाउन, खांद्यावर उपरणे वजा फडके ठेउन, स्पेशल बैठकीवर बसुन चहाकडे लक्ष ठेवणारे ते दुकानदार. चहा मुरल्यावर एका ओगराळ्याने पातेल्यामधुन किंचीत चहा हातात घेउन, त्याचा भुरका मारुन चहाची अमृततुल्य चव जमली आहे का हे पारखुन बघणारे ते महाभाग पाहिले कि धन्यता वाटते.

फर्ग्युसन कॉलेज रोडवरील कुलकर्णी पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल टाकलं कि बऱ्याचदा समोरच्या 'तृप्ती टी सेंटर' ला माझं पेट्रोल भरून येतो. संतुष्ट गिऱ्हाईक चहा पिऊन 'तृप्तीचा' ढेकर देताना दिसतात. तिथेच पहिल्यांदा 'मारामारी' हा प्रकार वाचला. अगदी जवळ मॉडर्न कॉलेज आणि पोलीस वसाहत असल्याने शारिरीक मारामारी अनेकदा पाहिली होती. सिग्नल वरील ट्रॅफिकमध्ये शाब्दिक मारामारी सुद्धा बऱ्याचदा ऐकली. इथे चहा पिण्याआधी 'संतोष बेकरी'चा क्रीमरोल खावा का ममता स्वीट्स’ चा सामोसा अशी वैचारिक मारामारी मनात चालू असतानाच; मनाचा हिय्या करून एकदा 'मारामारी' मागितली.
सुरुवातीला मला तर चहा बरोबर मारीचे बिस्कीट (मारी चा मारा) म्हणजे मारामारी असावे असेच वाटले. दुकानाचे मालक शंकर जाधव ह्यांनी मारीचे बिस्कीट न देता एका ग्लासात मस्त पैकी चहाच दिला. चौकशीअंती समजले कि पूर्ण दुधाचा चहा आणि साधा चहा मिक्स करून मारामारी बनते. काही ठिकाणी चहा आणि कॉफी एकत्र करून देखील मारामारी बनवतात म्हणे. हा प्रकार प्यायचे भाग्य अजून तरी लाभले नाही.

डेक्कन वरील ‘गुडलक’ मध्ये सुद्धा नेहमीच्या चहा खेरीज 'इराणी ब्लॅक टी' मिळतो. काचेच्या ग्लासात टी बॅग, साखर आणि लिंबाची स्लाइस घालून देतात. तो चव-बदल म्हणून कधीतरी प्यायला बरा आहे. जागेचे भाव बघता डेक्कन भागात प्रॉपर्टी घेणे शक्य नाही; तर निदान 'प्रॉपर-टी' तरी प्यावा म्हणून पावले गुडलककडे वळतात.

कलकत्त्याला कामानिमित्त गेलो असताना तिथला चहा प्यायला. ऑफिस मधील मित्राने 'चल, लिकर चाय पाजतो तुला' असे आमंत्रण दिले. बडा बाजार मधल्या त्या सुप्रसिद्ध दुकानात केवळ ५ रुपयात लिकर चहा! कलकत्त्यात स्वस्ताई आहे पण इतकी; हे माहिती नव्हतं. मोठ्या उत्साहाने 'पेग' मारला तेव्हा कळलं कि ('च्या'मायला) साधा कोरा चहा आहे. ‘औषधालादेखील लिकर' ह्यात नाही. ह्या चहावर GST कोणत्या रेट ने लावतात (दारू का चहा) ह्यावर जेटलींने खुलासा करावा.
चहा बरोबर लोणी-ब्रेड अनेकांनी खाल्लं असेल. तिबेटी लोकं चक्क चहातंच लोणी, मीठ इत्यादी घालतात. काश्मीर मध्ये फक्त मीठ घालतात. तिबेटी-काश्मिरी यजमान नुसता चहा पाजून 'खाल्ल्या मिठाला जागा' असं पाहुण्यांना म्हणू शकतात.

मराठीतील आधण, फक्कड, फर्मास, तरतरी, तल्लफ हे शब्द खास चहासाठीच आले असावेत. 'च्यायला' हा 'चहा आईला' चा अपभ्रंश असावा. एकसारखी बडबड करणाऱ्यास 'चहाटळ' हा शब्द कुठून आला असावा? खरं तर चहाची वेळ असूनही चहा 'टाळ'णाऱ्या यजमानांना 'चहा'टळ म्हणणे अधिक बरोबर वाटते.

चहा ह्या कर्त्याबरोबर 'पिणे, घेणे, मारणे, टाकणे, ढोसणे, पाजणे' अशी अनेक क्रियापदं प्रसंगानुसार वापरतात. मुंबईतील सीकेपी आणि गोवेकर मंडळी 'चाय पिली' असं स्त्रीलिंगी उच्चारतात. च'हा' असूनदेखील पुल्लिंगी असण्याचा अजून काय पुरावा हवाय? कन्नड लोकं तर सगळ्यालाच नपुसकलिंगी करतात. 'ती' ला 'ते' म्हणतात तर मग 'टी ' ला 'टे' म्हणत असावेत. गमतीचा भाग सोडा, पण चहासाठी चिनी भाषेत जे वर्णाक्षर वापरलं जातं ते आहे 'टे'!

चहा न पिणारे 'चहात टॅनिन नावाचं विष असतं' इथपासून ते अगदी 'चहा पिऊन त्वचा काळवंडते' इतपर्यंत (वाट्टेल ते!) बोलत असतात. फेअर अँड लव्हली मुळे गोरे झाल्याचं आणि चहामुळे काळे झाल्याचे माझ्या माहितीत एकही उदाहरण नाही! चहात असणारी अँटीऑक्सिडंट्स शरीरास अतिशय गुणकारी असतात असं संशोधनाद्वारे सिद्ध झालंय. सवयीनुसार दिवसातून २-३ कप चहा आरोग्यास उत्तम असं कुठेतरी (मीच लिहिलेलं!) वाचलंय.

हा चहा चीन मध्ये शेकडो वर्षांपूर्वी जन्मला, जगभर लोकप्रिय झाला; तरी अजूनही त्याचं रूप खुलून येतं ते 'चिनी मातीच्या' कपात. 'मातीशी नातं' घट्ट जोडून ठेवावं ते असं....

धोरणवावरविचार

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

8 Jul 2017 - 10:49 am | मुक्त विहारि

मस्त....

अरिंजय's picture

8 Jul 2017 - 10:59 am | अरिंजय

खतरनाक बेश्ट लिहिलंय

ह्यात एक अ‍ॅड करा. खेचराच्या दुधाचा चहा. थोडासा तुरट, खारट असा हा चहा अतिशय चविष्ट असतो.

मुक्त विहारि's picture

8 Jul 2017 - 2:40 pm | मुक्त विहारि

ते पुणेकर आहेत.

त्यांनी जर खेचरीच्या (खेचराची बायको ती खेचरी) दूधाचा चहा घेतलाच नसेल, तर ते मूद्दामहून कशाला लिहितील?

अपुणेकरच पुणेकरांना बरोब्बर ओळखून असतात.

(सरनौबत साहेब, तुम्ही हा प्रतिसाद (माझा) मनावर घेवू नका. त्या यशोधरा ताई आमच्या डोंबोलीला ओळखून आहेत आणि आम्ही पुण्याला....त्यांच्या बरोबर आमचे हे पुणेकर आणि अपुणेकर, असे वाद-विवाद नेहमीच चालतात.)

मुविकाका, आता नवीन विषय शोधा. ह्याच्या चोथ्याचाही गाळ झाला. ;)

मुक्त विहारि's picture

8 Jul 2017 - 11:13 pm | मुक्त विहारि

बरे झाले तुम्हीच सांगीतलेत ते.....

आम्ही तर कधी पासूनच म्हनतोय की, पुणे परीघाबाहेर आहे पण .......

असो,

सरनौबत's picture

8 Jul 2017 - 3:23 pm | सरनौबत

याक च्या दुधाचा बनवतात चहा तिकडे. खेचराचे दूध काढण्याचा प्रयत्न केल्यास (खेटर न घालता) लाथा मारेल बहुधा.

सुबोध खरे's picture

8 Jul 2017 - 2:45 pm | सुबोध खरे

खेचर दूध देतं? खेचर हा संकरित प्राणी असल्याने प्रजोत्पादनास असमर्थ असते. त्यामुळे खेचर की (खेचरिण) गाभण राहत नाही मग दूध कसे देईल?
कुठे दुवा असतील तर द्याल का?

किल्लेदार's picture

8 Jul 2017 - 4:39 pm | किल्लेदार

दुआ देऊन पण दूध देणार नाही हो खेचरी.......

जस्ट किडींग !!!☺

यशोधरा's picture

8 Jul 2017 - 4:44 pm | यशोधरा

दुवा नाहीये माझ्यापाशी खरेसाहेब. एका हिमालयीन ट्रेकवर मिळाला होता - नाही, याक - की याकीण म्हणू? - च्या दुधाचा नव्हता. धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

8 Jul 2017 - 4:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

चटकदार चहापुराणामुळे मिपावर तुमचे खूप चहा'ते झालेले आहेत. लिहित रहा. पुलिप्र.

माम्लेदारचा पन्खा's picture

8 Jul 2017 - 4:12 pm | माम्लेदारचा पन्खा

पण आधीच्या भागाएवढी मजा नाही आली . . .

तरीही तुम्हाला "मिपाचे एकमेव कोट्याधीश (शाब्दिक)"ही पदवी बहाल करावी अशी इच्छा याठिकाणी मी व्यक्त करतो !

दशानन's picture

8 Jul 2017 - 4:34 pm | दशानन

हा चहा देखील आवडला!

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Jul 2017 - 5:09 pm | ज्ञानोबाचे पैजार

कालच एका तथाकथित उच्च हाटेलात चहा प्यावा लागला. एका किटलीत कोरा चहा, दुसर्‍या किटलीत दुध, आणि साखरेचे चौकोनी खडे मिळाले. बाकिच्यांचे पाहून आधी एकच खडा कपात टाकला आणि पहिल्याच घोटाला तोंड वाकडे झाले मग कमीत कमी सात ते आठ खडे कपात टाकल्यावर चहाला जरा चव आली.

हा लेख आठवत हळहळत कसातरी तो चहा प्यायला. मग त्यावर उतारा म्हणून मिटींग संपे पर्यंत मी साखरेचे सगळे खडे संपवून टाकले.

मिटींग संपल्यावर त्याच हाटेलाच्या बाहेरच्या टपरीवर एक कटींग प्यायलो मग जरा बरे वाटले.

पैजारबुवा,

गामा पैलवान's picture

8 Jul 2017 - 7:38 pm | गामा पैलवान

ज्ञापै, अशा वेळेस सरळ बिनसाखरेचा चहा घ्यावा. निदान चहाचा स्वाद तरी अनुभवता येतो.
आ.न.,
-गा.पै.

ज्ञानोबाचे पैजार's picture

10 Jul 2017 - 11:14 am | ज्ञानोबाचे पैजार

गापै, चांगली आयडीया आहे, पुढच्या वेळी नक्की असेच करेन.
नुसता कोरा चहा देखील चांगला लागतो हे माझ्या आधीच लक्षात यायला हवे होते.
पैजारबुवा,

बबन ताम्बे's picture

8 Jul 2017 - 5:39 pm | बबन ताम्बे

मजा आली .

जेम्स वांड's picture

8 Jul 2017 - 5:51 pm | जेम्स वांड

लेख माहितीपूर्ण आहे, पण ओढूनताणून कोट्या केल्याच पाहिजेत असा काही मिसळपाववर नियम नसावा. थोडक्यात उद्बोधक माहिती आवडली पण इस बार कोट्या नय जम्या, ऐसा अपना खासगी मत हय.

सचिन काळे's picture

8 Jul 2017 - 8:57 pm | सचिन काळे

लेख आवडला.

ज्योति अळवणी's picture

8 Jul 2017 - 11:18 pm | ज्योति अळवणी

मस्त. आवडला तुमचा लिखित चहा

योगेश लक्ष्मण बोरोले's picture

10 Jul 2017 - 2:14 pm | योगेश लक्ष्मण बोरोले

मी असे ऐकलेय की पुण्यामध्ये कोणा साहेबांस भेटण्यासाठी कार्यालयात गेले तर साहेब दोन प्रकारची चहा मागवु शकतात. चपराश्याला जर 'आण्णांची चहा' आणरे म्हटले की काही मिनिटांच चहा येते व जर 'नानाची चहा' आणरे म्हटले कि चपराशी गायब पण चहा काही येत नाही, कंटाळुन भेटायला येणारा कटतो. खरे काय हें? अमृृततुल्यचे बोर्ड दिसतात, आण्णा व नाना च्या चहा सिक्रेटीत असतात काय?

सिरुसेरि's picture

10 Jul 2017 - 3:57 pm | सिरुसेरि

हा भागही छान झाला आहे . या निमित्ताने चहावर आधारीत "इक गरम चायकी प्याली हो " , " इसिलिये तुम्हे चायपें बुलाया है " , " गरम गरम चाय , बस एक कप और .." अशी गाणी आठवली . यो यो हनीसिंगला चहाची चव , आवड नसावी , अन्यथा त्याने " चार बोतल वोडका.... " च्या ऐवजी " चार कप गर्रम चाय .. काम मेरा हो जाय.." असे एखादे गाणे बनवले असते . आपला चहा लोकांना आवडेल असा मसालेदार बनावा म्हणुन चकचकीत खलबत्त्यामधे वेलदोडा , लवंग असा मसाला तन्मयतेने कुटत असलेला चहावाला बघितला की एखाद्या निष्काम कर्मयोग्याचीच आठवण येते . आणी असा टेसदार चहा पिला की हात आपोआप श्रद्धेने जोडले जातात .

पु. ल . देशपांडे यांनी "पानवाला" च्या धर्तीवर "चहावाला" असा लेख लिहिला असता तर कदाचीत त्याची सांगता अशी केली असती .

" कृष्ण चालले वैकुंठाला , राधा विनवित पकडुन बाही ...
इथे अमृततुल्य पिउनी जा हो ... कन्हैया ... तिथे अमृततुल्य मिळणार नाही ."

खरोखरच स्वर्गात काय किंवा वैकुंठात काय , तिथे एकवेळ अमृत मिळेल .. पण अमृततुल्य ? नाही .. कारण त्यासाठी मर्त्यलोकामधेच जन्म घ्यावा लागतो .