आताशा.. असे हे.. मला काय होते

संजय क्षीरसागर's picture
संजय क्षीरसागर in जनातलं, मनातलं
5 Feb 2017 - 1:25 am

संदीपची कविता रसग्रहणापलिकडे आहे कारण त्याला जे सांगायचंय ते सहज, सोपं आणि समोर आहे. प्रत्येक शब्द बोलका आणि प्रत्यकारी आहे. शब्द वाचताक्षणी आपण त्या अनुभवाशी एकरुप होतो, मग अजून रसग्रहण काय करणार ? तरीही त्याच्या या कवितेला एक दाद म्हणून हा रसास्वाद सादर केल्याशिवाय राहावत नाही.

संदीप म्हणतो की त्याची कविता गाणं होऊनच प्रकटते. म्हणजे अनुभव व्यक्त होण्यापूर्वीच त्याचा मनात अनुरुप सांगितिक माहौल तयार झालेला असतो. ही गोष्ट केवळ दुर्लभ आहे. कारण त्याला शब्दांची जुळवाजुळव करायला लागत नाही. त्याचा संवेदनाशिल अनुभव प्रवाही होऊन प्रत्ययकारी शब्दांन्वये कविता होतो. आणि प्रस्तुत कविता ही त्या सर्व प्रक्रियेची एक सुरेख साक्ष आहे.

मनाच्या विष्ण्ण अवस्थेत जर कुठली एक गोष्ट हरवत असेल तर ती म्हणजे गाणं. आणि दुसरी म्हणजे सृजनात्मकता. विन्मुखतेचा असा काही आलम तयार होतो की शब्द साथ सोडून जातात. संदीपचं कौतुक असं की तो या विष्ण्णतेची कविता करतो !

आताशा.. असे हे.. मला काय होते
कुण्या काळचे, पाणी डोळ्यात येते.....
बरा बोलता बोलता, स्तब्ध होतो...
कशी शांतता, शून्य शब्दांत येते.......

तिसर्‍या ओळीपर्यंत आपण संदीपबरोबर असतो पण चवथी ओळ मात्र आपल्याला खोल कुठेतरी लपलेल्या आणि मुश्कीलीनं विसरलेल्या, आपल्याच दु:खाशी जोडून जाते. ‘कशी शांतता , शून्य शब्दांत येते....... केवळ सुन्न करणारं शब्द संयोजन. बहाद्दूर शहा ज़फरचा क़लाम आहे ‘बात करनी मुझे मुश्कील, कभी ऐसी तो न थी....जैसी अब है तेरी महेफ़िल कभी ऐसी तो न थी’. अशा स्तब्ध अवस्थेला मन येतं.

पाऊस कोसळायला लागला की मन सैरभैर होतं पण संदीप ते अनोख्या अंदाज़ानं शब्दात उतरवतो, ...`कसा सावळा रंग, होतो मनाचा !'. आणि पुढे तर कमाल करतो : असे हालते आत हळूवार काही...जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा.... हे केवळ झेन आहे. उरात अनामिक अस्वस्थता दाटून येते, ती एका क्षणात झुगारुन द्यावीशी वाटते पण तिचा स्वभाव इतका नाजूक आहे की तो दुखावणारा स्पर्शही मनाला मोहून टाकतो. त्या अस्वस्थततेच रमावंसं वाटतं ! ते दुर्लभ दु:ख मनात आणखी खोल उतरावंस वाटतं.

कधी दाटू येता, पसारा घनांचा....
कसा सावळा रंग, होतो मनाचा...
असे हालते आत हळूवार काही...
जसा स्पर्श पाण्यावरी चांदण्याचा....

या ओळीत संदीपची प्रतिभा कमालीची उंची गाठते. मृत्यू ही हरेक प्रतीभावंताला वेळीअवेळी भान देणारी उत्कट जाणीव आहे. ज्या क्षणी मृत्यूच्या अनिवार्यतेची जाणीव होते त्या क्षणी, एका झटक्यात, सगळं जग शून्य होऊन आपण स्वत:प्रत येतो. संदीप तो अनुभव अत्यंत तरलतेनं व्यक्त करतो, `क्षणी व्यर्थ होतो दिशांचा पसारा'... आणि त्यानंतर त्यानं जे काही लिहीलंय ते केवळ अध्यात्मिक अनुभवाची परिसीमा आहे. ‘नभातून ज्या रोज जातो बुडोनी...नभाशीच त्या मागू जातो किनारा ! जस्ट इंपॉसिबल अ‍ॅस्थेटीक्स ! नभाला अंतही नाही आणि मृत्यूही नाही ते सनातन आहे. ते सर्व प्रकटीकरणाचा स्त्रोत आहे आणि तरीही कायम अव्यक्त आहे. अस्तित्वातली सर्वात रहस्यमयी गोष्ट म्हणजे आकाश आहे. ते नक्की कुठे आहे ते दर्शवता येत नाही पण ते दर्शवणार्‍यालाही सर्वांगानं व्यापून, त्याच्या आरपार आहे. संदीप म्हणतो, त्या नभात मी रोज बुडून जातो आणि त्याच्याशी एकरुप होऊन जातो पण ही विमनस्कता त्या नभाला सुद्धा मात करुन जाते... इतकी की त्या नभाला अंत नाही हे माहिती असून सुद्धा, मी त्याचा किनारा गाठायला निघतो !

असा ऐकू येतो , क्षणाचा इशारा ...
क्षणी व्यर्थ होतो दिशांचा पसारा...
नभातून ज्या रोज जातो बुडूनी..
नभाशीच त्या मागू जातो किनारा....

संदीपचा मनाचा अभ्यास अफाट आहे. तो मनाच्या अंतरंगात फार खोलवर उतरला आहे. मनाच्या महालाचे सर्व कानेकोपरे त्याच्या परीचयाचे आहेत. मनाच्या विमनस्कतेचं वर्णन तो अनेक अंगानी आणि कलात्मकतेनं करु शकतो. न अंदाज कुठले न अवधान काही....कुठे जायचे, यायचे भान नाही.. पण इथून पुढे त्याच्या अनुभवाच्या उत्कटतेला केवळ सलाम आहे. कविता समेवर आणतांना तो भल्याभल्यांना मात करुन जातो : जसा गंध निघतो, हवेच्या प्रवासा, न कुठले नकाशे, न अनुमान काही....

न अंदाज कुठले न अवधान काही....
कुठे जायचे , यायचे भान नाही..
जसा गंध निघतो, हवेच्या प्रवासा
न कुठले नकाशे न अनुमान काही....

शेवटच्या कडव्याबद्दल तर काय लिहावं असा प्रश्न आहे. पहिल्या दोन ओळीत संदीप विमनस्कतेची नेहेमीची अवस्था मांडतो : कशी ही अवस्था कुणाला कळावे..कुणाला पुसावे कुणी उत्तरावे... मनाच्या डोहात अत्यंत खोलवर उतरलेली व्यक्तीच केवळ हा पेच अनुभवू शकते. जवळातल्या जवळच्या जीवलगाशी सुद्धा ही विमनस्कता शेअर करता येत नाही. कारण एकतर ती अकारण आहे आणि दुसरं म्हणजे दुनियेतल्य़ा कुणाकडेही ती सोडवण्याचा मार्ग नाही.

शेवटच्या दोन ओळीत मात्र संदीप स्वत:लाही पार करुन जातो. आकाश जेवढं वर आहे तेवढंच खालीही अनंत आहे. सिद्धाची जाणीव केवळ सहस्त्रारातून मस्तकाच्यावर असणार्‍या आकाशाचा वेध घेत नाही तर पृथ्वीच्या खाली असणार्‍या तितक्याच खोल अनंततेशी समरुप झालेली असते. त्यामुळेच तर सिद्ध स्थिर असतो. पण संदीप संवेदनाशिल व्यक्तीचा हळवेपणा कमालीच्या प्रतिभेनं शब्दबद्ध करतो. तो म्हणतो : किती खोल जातो, तरी तोल जातो...असा तोल जाता कुणी सावरावे.... आणि इथे त्याची कविता अध्यात्माला पार करुन जाते !

कशी ही अवस्था कुणाला कळावे..
कुणाला पुसावे कुणी उत्तरावे...
किती खोल जातो, तरी तोल जातो...
असा तोल जाता कुणी सावरावे....

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर म्हणजे वादविवादाचा बादशहा. बहुप्रसवा लेखणी असणारा आय डी. पण हल्ली ज्यात वादविवाद असणार नाहीत असे नाजुक धागे टाकण्यात ते मग्न आहेत...... आताशा असे काय .. झाले आहे ?

तिमा's picture

5 Feb 2017 - 12:54 pm | तिमा

संजय क्षीरसागर म्हणजे वादविवादाचा बादशहा. बहुप्रसवा लेखणी असणारा आय डी. पण हल्ली ज्यात वादविवाद असणार नाहीत असे नाजुक धागे टाकण्यात ते मग्न आहेत...... आताशा असे काय .. झाले आहे ?

कारण ते एक हाडाचे रसिक आहेत.
उत्तम रसग्रहण.

कारण ते एक हाडाचे रसिक आहेत.
उत्तम रसग्रहण.

सहमत.
संजयजी एकदम दिलदार अन रसिक व्यक्तिमत्व आहेत. जीवनातला आनंद उपभोगायचे रहस्य त्यांना कळलेले आहे.

झेन's picture

5 Feb 2017 - 4:05 pm | झेन

सुरेख रसग्रहण

अभिजीत अवलिया's picture

5 Feb 2017 - 7:32 pm | अभिजीत अवलिया

मस्त हो संक्षी.

असंच जे काही भावेल ते तुमच्याशी नक्की शेअर करीन.

आनन्दा's picture

6 Feb 2017 - 10:37 am | आनन्दा

ते वाद घालायचे ते देखील स्वांतःसुखाय.. आता ते सुख त्यांना तेव्हढे मिळत नसेल.

ह. घ्या हो.

बाकी रसग्रहण मस्तच.!. संदीपचे स्वतःचे या कवितेबद्दल काय मत आहे हे पण जाणून घ्यायला आवडेल.

जाता जाता.. अत्यंत सोप्या शब्दात अत्यंत गहन आशय मांडणे हे हल्लीच्या काळात फक्त संदीपकडेच पाहिलेय.

संजय क्षीरसागर's picture

6 Feb 2017 - 11:04 am | संजय क्षीरसागर

आनंद वादात आहे, गाण्यात आहे आणि कवितेच्या रसग्रहणातही आहे.

संजय क्षीरसागर's picture

6 Feb 2017 - 11:20 am | संजय क्षीरसागर

क्रेडिट कार्ड वापरणं खरंच फायदेशीर आहे का? इथे तुफानी वाद झालायं.

मेरी दुनिया मे तुम आई, क्या क्या अपने साथ लिए इथे गाण्याचा आनंद आहे.

नव गृहाचे कर्जही, फेडणे आता उभ्याने इथे विडंबनाची मौज आहे.

आणि सांप्रत रसग्रहाणात कवितेच्या छंदात रमण्याचा आनंद आहे.

अनन्त्_यात्री's picture

6 Feb 2017 - 11:01 am | अनन्त्_यात्री

एका सुन्दर कवितेचा तितकाच सुन्दर रसास्वाद!!

संजय क्षीरसागर's picture

6 Feb 2017 - 11:24 am | संजय क्षीरसागर

मिपासाठी संदीपची एक मस्त मुलाखत घ्यायची इच्छा आहे.

नक्की घ्या. वाट पाहू आम्ही.

सुंदर लिहिलंय! पाऊस, कॉफी आणि संदीप खरेच्या कविता हे कॉम्बिनेशनचं भन्नाट आहे!

संजय क्षीरसागर's picture

6 Feb 2017 - 1:22 pm | संजय क्षीरसागर

पुन्हा एकदा आभार्स !

पाटीलभाऊ's picture

6 Feb 2017 - 1:33 pm | पाटीलभाऊ

संक्षीसाहेब...सुंदर कवितेचं अत्यंत सुंदर रसग्रहण...!

तिरकीट's picture

7 Feb 2017 - 10:04 pm | तिरकीट

सुंदर रसग्रहण संक्षी!!

काही दिवसांपूर्वी संदीप खरे आणी वैभव जोशी यांचा 'ईर्शाद' ऐकला. तोही असाच सुंदर अनुभव होता....

फेदरवेट साहेब's picture

7 Feb 2017 - 10:10 pm | फेदरवेट साहेब

मस्त वाटले वाचून, मोरपीस धागा.

निष्पक्ष सदस्य's picture

7 Feb 2017 - 10:13 pm | निष्पक्ष सदस्य

निवळ्ळ भन्न्नाट

समीर_happy go lucky's picture

19 Feb 2017 - 9:44 pm | समीर_happy go lucky

सुरेख रसग्रहण