काटा रुते कुणाला…..

Jabberwocky's picture
Jabberwocky in जनातलं, मनातलं
5 Nov 2016 - 3:11 pm

शुक्रवारची संध्याकाळ म्हणजे उत्साहाला उधाण असायचं, शनिवार रविवार कॉलेज ला सुट्टी. आम्ही सगळे जिगरी सोबत. आमची कॉलनी पुण्याच्या थोडीशी बाहेर, आणि आम्ही सगळे जिगरी म्हणजे अगदी लहानपणापासून ते आजवर नेहमी सोबत. तशी प्रत्येकाची शाळा कॉलेज वेग वेगळी, पण आमचा हा जो कॉलनी चा चमू होता त्याच्यापुढे आमचे कॉलेजचे ग्रुप आणि ते कॉलेजचे कट्टे झक मारायचे. म्हणूनच आम्ही सगळे आठवडाभर वाट पाहायचो ते या तीन दिवसांची. मग हे तिन्ही दिवस आम्ही सगळे सोबतच, मग दमून जाईपर्यंत क्रिकेट, रात्री कुणाच्यातरी घरी वस्ती, जागरण, खोड्या आणि प्रत्येकाची जगाच्या वेगळी फिलॉसॉफी.
तर त्या दिवशी म्हणजे शुक्रवारी संध्याकाळी उन्हे थोडीशी कललेली असताना, आम्ही सगळे एका मित्राच्या घरासमोर रस्त्यावर गल्ली क्रिकेट खेळण्यात मग्न होतो. आमच्यातच चार चार जणांची टीम करून आम्ही खेळायचो. खेळ जरी गल्लीतला असला तरी जिंकन आणि हरण म्हणजे जणू काही जीवन मरणाचा प्रश्न, आपल्यातल्या बहुतेकांचा देखील हाच अनुभव असणार यात मला अजिबात शंका नाही.
पंक्या बॉलिंग करत होता आणि आमचा रुश्या बॅटिंग करत होता. पंक्यानी त्याच्या पहिल्याच बॉल वर रुश्याचा कॅच घेऊन त्याचा खेळ संपवला. बॅट आपटत रुश्या ड्रेससिंग रूम म्हणजे एका घराच्या कंपाऊंड वॉल वर स्थानापन्न झाला. आता मी क्रीज कडे मोर्चा वळवला. मागंन रुश्या बोंबलला पाच बॉल मध्ये आठ रन पाहिजेत, जिंकून ये नाहीतर....(पुढचे शब्द केवळ लिखाण शक्य तितकं सोज्वळ असावं म्हनुन वगळावे लागत आहेत याची मला खंत आहे, परंतु सुज्ञ वाचकांनी ते ओळखले नाहीत तर नवलच).
तर मी ऐकून न ऐकल्यासारखं त्वेषाने आधीच नावापुरत्या डांबरी उरलेल्या रस्त्याला पूर्ण ताकतीनिशी आणखी एक खड्डा बहाल करत पंक्या कधी एकदा बॉल टाकतो आणि मी कधी त्या बॉल चा जीव घेतोय याची वाट पाहत उभा राहिलो. पंक्याने टाकलेला बॉल मला दिसलाच नाही आणि मी तसाच ढिम्म उभा राहिलो. ड्रेससिंग रूम मधून अनेक विशेषणांच्या वर्षावाने भान पुन्हा जागेवर आलं. पुन्हा मी पवित्र घेतला आणि बॉल दिसताक्षणी सडकून हाणला, बॉल तीन ताड सरळ बॉउंडरीपार. आता विशेषणाचा वर्षाव पंक्याच्या नशिबी.
पुढच्या बॉल वर मी एक रन काढला त्याच्या पुढच्याच बॉल वर देव्याने एक रन काढला. आता शेवटचा बॉल आणि जिंकण्यासाठी हवे होते दोन रन आणि तो बॉल खेळणार होतो मी, म्हणजे नाही निघाले रन तर बोंबला....
आता समोरच्या टिमवाली पोर पंक्याला प्रोत्साहन देत होती तर आमच्या टीमची पोर शांत पाहत होती. ते पिनड्रॉप सायलेन्स म्हणतात ना तसच.
मी माझं सगळं लक्ष बॉल वर केंद्रित केलं, अगदी या क्षणी मला कुणी विचारलं असत कि तुला आत्ता काय दिसत आहे तर मी महाभारतातल्या कर्णासारखं उत्तर दिल असत कि आत्ता मला फक्त बॉल दिसतोय आणि मी स्वतः एक बॅट झालोय (तुम्हाला अर्जुनासारखं वाटलं असेल पण कर्णाचं हे उत्तर तुम्हाला ऐकायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला मृत्युंजय वाचावं लागेल ज्यांनी वाचलं असेल त्यांच्या स्मृती जाग्या होतीलच) अर्जुन मला कधी आवडलाच नाही. महाभारतामधल्या माझ्या आवडत्या दोनच व्यक्ती, खरतर त्यांना व्यक्ती म्हणणं बरोबर नाही, त्यांना लावावं असं कोणताही विशेषण कुठल्याही भाषेमध्ये सापडेल असं मला वाटत नाही. पहिले म्हणजे सर्वांच्या ह्रुदयांवर राज्य करणारे भगवंत श्रीकृष्ण् आणि दुसरा कर्ण. असो तर मी उभा राहिलो, पंक्यानं बॉल टाकला आणि त्याच क्षणी मोठ्यानं माझ्या मागणं कुणीतरी आवाज दिला ए सागऱ्या...
ऐन मोक्याच्या क्षणी रंगभूमीवर स्वतःच कौशल्य सादर करत असताना आणि एक महान धनुर्धर म्हणून स्वतःला सिद्ध करू शकणारा शेवटचा शब्दवेधी बाण जेंव्हा कर्णाने त्याच्या धनुष्यावर चढवलेला होता, आणि डोळे बंद करून तो कुत्र्याच्या भुंकण्याकडे कान लावून बसलेला असताना, ते कुत्र भुंकण्याआधी एक क्षण एका झाडावर बसलेल्या कुठल्यातरी पक्ष्याचा मंजुळ आवाज कर्णाच्या कानी पडला आणि त्याच्या बाणाने त्या पक्ष्याचा चोचीचा अचूक वेध घेतला. तो वेध जरी अचूक होता तरीही त्याच आद्य लक्ष्य म्हणजे ते कुत्र मात्र अजूनही केकाटत होत, म्हणजे इतरांच्या दृष्टीने कर्णाचा वेध चुकला होता.
मी त्या कर्णाइतका महान नाही याची मला जाणं आहे, पण माझाही तेच झालं त्या ए सागऱ्या...या हाकेने माझी समाधी भंग पावली आणि त्या कुत्र्याने म्हणजे पंक्याने नाही तर त्या बॉल ने माझ्या स्टंप चा अचूक वेध घेतला.
शब्दवेध चुकल्याच्या जाणिवेने जसे कर्णाच्या हृदयामध्ये असंख्य बाण टोचले असतील तसे इथे माझ्या हृदयावर ते तीन स्टंप रोवले गेल्यासारखी हताश जाणीव मला झाली. आणि हो सूतपुत्र म्हणून जस त्या सभेत इतर लोकांनी कर्णाला हिणवलं तसंच आमच्या टीममधली पोर पण मला हिनवायला विसरली असती तर नवलच.
पोरांनी एकचं गोंधळ सुरु केला, जिंकलेली टीम नाचत मुद्दाम चिडवायला लागली आणि आमची हरलो तरी त्यांच्यात मिसळून नाचायला लागली. मैत्र जीवांचे म्हणजे ते हे. हि मजाच वेगळी. असो पण माझं या सगळ्याकडे अजिबात लक्ष नव्हतं, मी ऐन मोक्याच्या वेळी ती हाक देणाऱ्या आवाजाचा जनक कुठे आहे हे शोधात होतो. थोड्याच अंतरावर मला ती थोर व्यक्ती माझ्याकडे येत असल्याची दिसली.
विशल्या....तू
विशल्याच्या चेहऱ्यावर छद्मी हास्य प्रगट झालं.
इकडे कसा काय आज तू, आणि साल्या तुला दिसत होत ना मी बॅटिंग करतोय दोन मिनिट थांबायला काय झालं होत रे तुला, हरलो ना रेड्या तुझ्यामुळं.
पुन्हा एकदा तेच छद्मी हास्य.
मी विशालच्या पोटात गुद्दे घालायला पुढे झालो तोच तो म्हणाला, अरे थांब मी तुझ्याशी काही म्हत्वाच बोलायला आलो आहे, ते बोलू मग काय घ्यायचाय तो बदला घे.
बोल काय एवढं महत्वाचं काम काढलंय. मी म्हणालो
इथे नको चल दुसरीकडे जाऊ. विशाल म्हणाला.
तो हे बोलत असताना त्याचा चेहरा कमालीचा काळजीत पडल्यासारखा झाला. मी मनाशीच म्हणालो हे काय नवीनच. काही कल्पना येत नव्हती.
बर चल तिकडे उद्यानाच्या बाकड्यावर बसून बोलूयात. मी म्हणालो, आणि आम्ही तिकडे चालू लागलो.

कथा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Nov 2016 - 3:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रोमहर्षक क्रिकेटचा सामना संपला आता पुढे .. ?

बाय द वे, काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी मज फूल ही रुतावे हा दैव योग आहे. या गण्यावर लिहिलं की काय असं वाटलं.

-दिलीप बिरुटे