दिवाळी अंक २०१६

यशोधरा's picture
यशोधरा in जनातलं, मनातलं
28 Oct 2016 - 9:57 pm

फटाके, फराळ, रांगोळ्या, आका़शकंदील, गोडधोड इत्यादिंबरोबरच मराठी घरांमधून दिवाळीचा अजून एक अविभाज्य भाग म्हणजे दिवाळी अंक. कमीत कमी ३-४ दिवाळी अंक घरात आल्याशिवाय दिवाळी पूर्णपणे साजरी झाल्यासारखी वाटत नाही! परदेशात राहणारी मराठी मंडळीही ह्याला अपवाद नाहीत.

आता तर नेहमीच्या पारंपारिक दिवाळी अंकांसोबत ऑनलाईन दिवाळी अंकही निघत आहेत. वेगवेगळ्या मराठी संस्थळेही दिवाळी अंक काढतात. उद्या पहाटे ५ (भाप्रवे बहुधा) नंतर मिपाचा दिवाळी अंकही दणक्यात प्रकाशित होईल आणि तो वाचायचीही उत्सुकता आहे.

इथे तुम्ही वाचलेल्या दिवाळी अंकांबद्दल, त्यातींल आवडलेल्या साहित्याबद्दल लिहा, ही विनंती. मी सुरुवात करते.

ह्या वर्षी खूप अंक विकत घेतले नाहीत, किंमती खूपच वाढल्यात. हंसचा अंक ३००/- रुपयांना आहे!
लोकसत्ताचा अंक घेतलाय आणि खूप आवडलाय. संग्रही ठेवण्यासारखा आहे. भटकंतींवरचे लेख, देशोदेशींच्या "ट्रंप" मानसिकतेच्या नेत्यांबद्द्लचे लेख, काही कंपन्यांच्या कार्य संस्कृतीवरचे लेख, नेताजींच्या फाईल्ससंबधित लेख. त्या शिवाय शेक्स्पिअरचा शोध हा माधव वझेंचा लेख, शैलेंद्र आणि त्याच्या तीसरी कसमबद्दलचा लेख, गिरिश कुबेर ह्यांच्या पुतिन युगावरील आगामी पुस्तकातील काही भाग, अजूनही काही लेख... आणि अर्थात वार्षिक राशिभविष्य!

त्याशिवाय डिजिटल दिवाळी हा ऑनलाईन दिवाळी अंक अतिशय सुरेख आहे, खादाडीसारख्या जिव्हाळ्याच्या विषयाला वाहिलेला हा अंक जरुर वाचा- https://digitaldiwali2016.com/

तसंच अजून एक अक्षरनामा म्हणून अजून एक ऑनलाईन अंक आला आहे - http://www.aksharnama.com/client/diwali_2016

मेहता ग्रंथजगतचाही दिवाळी अंक आजच घरी येऊन पोचलाय, त्याबद्दल वाचल्यावर. तोवर तुम्हीही आपल्या आवडत्या अंकांबद्दल आणि त्यातील साहित्याबद्दल लिहा.

साहित्यिकसमाजआस्वादमाध्यमवेधमतमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

प्रियाजी's picture

4 Dec 2016 - 6:01 pm | प्रियाजी

गेले दोन दिवस ग्राहकहितचा दिवाळीअंक वाचत आहे. अर्धा जाहिरातींनीच भरला आहे. उरलेल्यात "असे वक्ते अशी भाषणे", "माय होममिनिस्टर" व "ध्यास गाथा" असे तीन विभाग आहेत. असे वक्ते मधे मला वासुदेव बळवंत फडके, हुतात्मा भगतसिंह, डॉ.केशवराव हेडगेवार, डॉ. बाबासाहेब आंबेड्कर, सी.डी. देशमुख याची भाषणे विशेष आवडली. अर्थात अजून पुष्क्ळच वाचन बाकी आहे. विभागात एकूण २४ भाषणे आहेत. होम मिनिस्टर या विभागात के.एम. संचेती, नितिन गडकरी, प्रकाश जावडेकर, आदेश बांदेकर, सुबोध भावे अशा राजकारण व मनोरंजन क्षेत्रातील १४ व्यक्तींनी पत्नीबद्दल लिहिलेले लेख आहेत.ध्यास या विभागात रा.चि. ढेरे, शि.द.फडणीस, अरुण टिकेकर व पं. मधुकर धुमाळ यांच्याबद्दल लेख आहेत जे मी अजून वाचले नाहीत. जे काही वाचले आहे त्यावरून हा अंक मला संग्राह्य वाटत आहे. आता अर्थातच अंक मिळेल ह्याची खात्री नाही. मीही वाचनालयातूनच आणला आहे. गंभीर व विचारप्रव्रुत्त वाचकांना हा अंक जरूर आवडेल.

प्रदीप's picture

4 Dec 2016 - 7:53 pm | प्रदीप

नक्कीच वाचनीय दिसतोय. पुढेमागे वाचला पाहिजे ह्याची नोंद केली आहे. धन्यवाद.

आज लोकमत दि अं घेतलाय वाचायला. रस्किन बाँड बद्दल शर्मिल फडकेंनी लिहिलेला लेख आणि गिरिजादेवींची, वंदना अत्रेंनी घेतलेली लेखवजा मुलाखत वाचून झाली. पैकी गिरिजादेवींना त्यांच्या गायन प्रवासाबद्दल अधिक बोलकं करायला हवं होतं, असं वाटून गेलं.

लोकमतच्या अंकाचं मुख्यपृष्ठावरील सायकलीचा हाय अ‍ॅंगलने घेतलेला फोटो भारी आवडला. कल्पकतेला दाद.

आदूबाळ's picture

9 Dec 2016 - 7:52 pm | आदूबाळ

रस्किन बाँड बद्दल शर्मिल फडकेंनी लिहिलेला लेख

कशाबद्दल आहे लेख? (मी रस्किन बाँडचा फ्यान आहे...)

यशोधरा's picture

9 Dec 2016 - 7:54 pm | यशोधरा

मी पण :) शर्मिला त्यांना भेटायला गेली होती, त्यांची मुलाखतवजा लेख आहे.

लोकमतमधील अजून एक वाचनीय लेख म्हणजे एन एच ४४. लोकमतची टीम आसेतूहिमाचल- कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सामान्य भारतीयाचे आयुष्य न्ह्याहाळत/ वेगवेगळे अनुभव घेत फिरली, त्यावर आधारीत लेख.

ह्याशिवाय क्यों - कांझा जावेद, फिक्सर्स - शची मराठे, रानोमाळ - वैशाली करमरकर हे लेख आवडले.

वरुण मोहिते's picture

9 Dec 2016 - 8:23 pm | वरुण मोहिते

ऑल्वेज रॉक्स . बाकी ग्राहकहित चा अंक वाचण्यात येईल

प्रदीप's picture

10 Dec 2016 - 10:33 am | प्रदीप

कालनिर्णयच्या अंकाचे वैशिष्ट्य म्हणता येईल अशी लेखमाला म्हणजे सिनेमावरील लेख. ह्यात संजय छाब्रिया ह्यांनी प्रचलित मराठी सिनेमाच्या अर्थशास्त्राविषयी माहिती दिली आहे. राजन जयकरांनी मूकपटांविषयी लिहीले आहे, नरेंद्र बंडबे ह्यांचा स्टॅनली क्युब्रिकवरील लेख आहे. ह्याव्यतिरीक्त अंकामधे आरती कुळकर्णींनी केलेले इजिप्तच्या अनोख्या प्रवासाचे वर्णन आहे. न्या नरेंद्र चपळगांवकरांचा वल्लभभाई पटेलांच्या राजकीय व सामाजिक कारकीर्दीचा आढावा घेणारा प्रदीर्घ लेख आहे. पुणेकरांना आवडावा असा तेथील पूर्वीच्या एका कट्य्ट्याच्या दिवसांची आठवण काढणारा 'कट्य्ट्याचे दिवस' हा श्रीरंग गोडबोलेंचा लेख आहे. एकंदरीत अंकाची मांडणी, विषयांची निवड ह्यात फारसे सुसूत्र ह्या अंकात दिसत नाही.

'ऋतुरंग' एकाच विषयाला वाहिलेल्या लेखांनी भरलेला आहे. विषय कुणालाही अतिशय जिव्हाळ्याचा वाटावा असा आहे-- आपला बाप. ह्यांत आपापल्या वडिलांविषयी, त्यांच्या व स्वतःच्या नातेसंबंधांविषयी समाजातील अनेक क्षेत्रांतील, व अनेक प्रवृत्तिच्या व्यक्तिंनी लिहीले आहे-- गुलजार, लता मंगेशकर, शरद पवार, यशवंतराव गडाख, सुशिलकुमार शिंदे, जवेद अख्तर, राजीव खांडेकर, विद्या बालन, जॉनी लिव्हर, नागराज मंजुळे, सिसिलिया कार्व्हालो, संदीप वासलेकर, सतीश भावसार, सदानंद मोरे, तौफिक कुरेशी, ज्ञानेश्वर मुळे, अमृता सुभाष, तसेच कलबर्गी, पाणसरे व नरेंद्र दाभोळकरांच्या मुलांनीही त्यांच्या वडिलांवर लिहीले आहे. ह्यातील काही लेख अतिशय उत्कट आहेत, ज्यांतून लेखक्/लेखिका व वडिल ह्यांच्या नातेसंबंधावर बरावाईट प्रकाश पडतो-- लताबाई, सदानंद मोरे, ज्ञानेश्वर मुळे, संदीप वासलेकर, यशवंतराव गडाख ही ह्यांतील ठळक उदाहरणे. इतर काही लेख तर निराशा करणारे आहेत. उदा. गुलजार सरळच सांगतात की त्यांचा व त्यांच्या वडिलांचा फारसा संबंध आलाच नाही, विद्या बालनांचा लेख थोडा ओढूनताणून लिहीलला वाटतो. आणि हो, ह्याच मालिकेत शोभा डे ह्यांचाही त्यांच्या वडिलांच्या आठवणी सांगणारा लेख आहे !