चॉकलेट - ४

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
3 Jul 2016 - 11:17 pm

चॉकलेट-१

चॉकलेट-२ (क्लिक!)

चॉकलेट-३ (डबलक्लिक!)

≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈

क्लिक!

हे काय?
मी अजून दरवाज्यात उभा?
शंकेची पाल चुकचुकली.
बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. दरवाज्यात मी उभा होतो. न्यू सेंट्रलवरुन रेल्वे निघाली तसं मी आणि पक्यानं जागेची शोधाशोध करायला सुरु केली. एक भिकारी त्याचं बोचकं उचकाटून मध्येच बसला होता. पायच घसरला. आपटलोच. "अबे, च्युते बिचमे क्या बैठा है" पक्या त्याला लाथच घालणार होता. मी म्हटलं जाऊंदे सोड.
डब्यात गर्दी तशी कमीच होती. मोकळी जागा पण दिसत होती. पण ताणून द्यायला आख्खं बाकडंच पाहिजे होतं.

डब्याच्या मधोमध एक बाकडं सापडलही. त्याच्या पुढचं बाकडंही तसं मोकळंच होतं. फक्त एकच बाई बसली होती. बाई कसली पोरगीच. मस्त पॉश वाटत होती. आम्हाला बघितलं आणि दचकलीच. मग आम्हीही दचकलो. च्यायला हे काय? उगाचच?
खिडकीपाशी सॅक ठेवून तिच्यासमोरच बसलो. पक्याला म्हटलं, वर जावून झोप. मी आपला खालीच तंगड्या पसारतो.
खिडकी घट्ट लावली होती. इव्हन काचपण खाली केली होती. मादक सुगंध दरवळत होता. कोणता परफ्युम मारलाय हिनं?

तेवढ्यात एक भिकारी आला, तोच तो मगाचा अन माझ्याच बाकड्यावर बसला. बोचकं मांडीवर घेऊन. डोक्यात सणकच गेली. दाणकन लाथ घालून त्याला खालीच पाडला. साल्याला उठतापण येईना. उठून त्याला अजून एक लाथ घालायला गेलो. मग खुरडत दुसरीकडं निघून गेला. साला घाणेरडा.

परत जागेवर आलो. डबा सगळा झोपला होता. मलाही थकवा आला होता. पडावं म्हटलं जरा, पण समोरचा मादक सुगंध वेडावून सोडत होता. पांढराशुभ्र चुडीदार. मखमली ओढणी. जिवंत डोळे. जरा गांगरुनच गेले होते. कुठून आली असावी ही?

छ्या, कसला विचार करतोय मी? आपल्याकडे एवढे गच्च पैशे असताना असल्या शंभर भेटतील. तसंही ही वेळ काय पोरगी पटवायची नाही. दिवस एवढा उलथापालथीत गेल्यावर आता अजून एक लफडं नकोच.
मग झोपलोच. मस्त तंगड्या पसरल्या. उशाला सॅक घेतली. सॅकमध्ये तर पैसे आहेत. सावध झोपावे लागणार. साले भिकारडे खूप आहे इथे.

डुलत डुलत रेल्वे पळत होती. सुपरफास्ट. अखंड खडबडाट. मध्येच एखाद्या पुलावरुन जाताना घरंगळत गेल्यासारखी वाटायची. आता पडते की काय नदीत? पावसाचा काय अंदाज लागत नव्हता. बंदही झाला असावा. काय सांगावे.
शेवटी डोळ्यावर झापड आलीच.

रात्री कधीतरी कोमल स्पर्श झाला हाताला. आहाहा. मोरपीसच फिरले. मग हिसडाच बसला डोक्याला. आपटलोच बाकड्यावर. डोळे तारटवून जागा झालो. काही कळेचना कुठे आहोत ते. गुंगीत असल्यासारखा डोळे फाडफाडून बघतच राहिलो. कुठे? समोरच्या रिकाम्या बाकड्याकडे? झोप एवढी अनावर झाली की पुन्हा पसरलो. उशाला सॅक घ्यावी म्हटलं तर हाताला काही लागेचना. काय? सॅक गायब?
आत्ता कुठे मी भानावर आलो. सीटच्या खाली इकडेतिकडे बघितलं. वर पक्याच्या बर्थवर बघितलं. कुठेच नाही?
तेवढ्यात भोंगा वाजवत रेल्वे हलली. म्हणजे एवढ्या वेळ थांबली होती की काय? आणि समोरची पोरगी? व्हाट द फक? तीही गायब?

धावतच दरवाज्यात गेलो. दरवाजा उघडून बाहेर बघितलं, कुठलं स्टेशन होतं देवजाने. कुत्रंही नव्हतं तिथे. अंधारात बुडून गेलेलं स्टेशन मागे पडत चाललं. रेल्वेनं वेग घेतला. आता उडी मारायचीही पंचाईत.
सगळी मेहनत पाण्यात?
साली चोर! माझं पैशं घेऊन पळाली. एवढ्या सहजासहजी? रडकुंडीलाच आलो.

डोकं गच्च धरुन तसाच उभा राहिलो.
दरवाज्यापाशीच कोणीतरी बसलेलं दिसलं. साला भिकारी. तोच तो मगाचा. पाय आखडून माझ्याकडेच बघत होता. एकाकी हसतच सुटला. अगदी पोट धरुन. गडाबडा लोळायलाच लागला. च्यायला, यांना होतं तरी काय?

अचानक खिशातल्या मशीनची आठवण झाली अन एकाकी मलाही हसूच फुटले. अगदी गडाबडा लोळावे वाटले. छद्मी हास्य करत मी नॉब ऍडजस्ट केला

क्लिक!

बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. दरवाज्यात मी उभा होतो. न्यू सेंट्रलवरुन रेल्वे निघाली तसं पक्यानं जागेची शोधाशोध करायला सुरु केली. मी मात्र सरळ चालत भिकाऱ्याचं बोचकं चुकवून डब्याच्या मधोमध आलो. दोन बाकडी दिसली. रिकामी.
रिकामी?
तिथे कुणीही नव्हतं.
आणि मागे पक्या पाय घसरुन पडला होता. दाणदिशी.

क्रमश:

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

किसन शिंदे's picture

3 Jul 2016 - 11:26 pm | किसन शिंदे

विंट्रेस्टींग!!

रातराणी's picture

4 Jul 2016 - 10:46 am | रातराणी

पुभाप्र.

राजाभाउ's picture

4 Jul 2016 - 11:08 am | राजाभाउ

च्यायला जबरा. कुठलीही चुक सुधरुन घ्या.

आनंद कांबीकर's picture

4 Jul 2016 - 11:49 pm | आनंद कांबीकर

टाका लवकर पुढचा भाग

ब़जरबट्टू's picture

5 Jul 2016 - 9:02 am | ब़जरबट्टू

बेस्टच.. बाकी क्लिक करून स्वसंपादन झाले तरी खूप आम्हा पामरांना.. :)