शिकलेल्या पोरांमध्ये सगळ्यात जास्त वाईट परिस्थिती असते ती वीस ते पंचवीस वर्षाच्या पोरांची.
ह्या वयात पोरांची डिग्री पूर्ण झालेली असते पण अजुन नोकरी मिळालेली नसते. फक्त घरी बसता येत नाय म्हणून बिचारे पोस्ट ग्रेजुएशन किंवा तसलेच काही शिक्षण चालू ठेवतात. आता तर इंजीनियरिंग वाली पोरंपण दूसरीकडे नोकरी नाय म्हणून MPSC किंवा UPSC कडे जास्त वळायला लागलेत.
.
.
आजकाल वर्गात कायम टॉपर राहणारी चश्मिश पोरंपण ज्यांनी अभ्यास सोडून दूसरे काहीच केले नाही ती पोरंपण Army आणि Police च्या भरती मध्ये पळताना दिसतात. ज्यांची B.Sc, M.Sc झालेय ते दहावी-बारावीच्या पोरांला ट्यूशन शिकवतात. त्यांच्यापेक्षा जास्त हाल इंजीनियरिंग झालेल्या पोरांचे होतात. बापानी घरी पार ओढताण करुन,तेवढी कमाई पण नसताना लाखो खर्च करुन पोराची इंजीनियरिंग पूर्ण केलेली असते आणि हे कंपनीवाले काष्टीच्या बाजारात शेळ्या विकल्याप्रमाणे आठ-दहा हजार द्यायलापण नाक मुरडतात.
.
.
ह्या वयात जेवढि मनाची घालमेल होत असेलना तेवढी कधीच होत नाय. शिक्षण पूर्ण करून नोकरी नाय. घरी बापाला पैशे सुद्धा मागायची लाज वाटते. हे कमी म्हणून गावातले अडानी त्याला विचारणार,"व्हंय रं अजुन किती राह्यलेय तुझं शिक्षण?तुला नोकरी कधी लागणार?आयला तू तर साहेब व्हणार ब्वा." किती डोकं फिरत असेल अशे टोमणे मारल्यावर?आणि त्याच्यातुन जर असा दुष्काळ पडला तर विचारुच नका.
.
.
दहावी-बारावी बळचं काठावर पास झालेला एखादा आर्मीत भरती झालेला कुणी सुट्टीला आल्यावर त्याला ही पोरं म्हणतात,"मजा आहे ब्वा तुमची"काळीज तुटंत ही अगतिकता बघुन. शिकलेल्या पोरींचे तरी बर आहे नोकरीचे नाय जमलं कुठ तरी निदान लग्न तरी लावता येतं पण शिकलेली पोरं काय करणार?
.
.
कुठंच काय नाय जमलं तर मोबाइल शॉपी काढ,कसले पॉलिसी एजेंट हो,MIDCमध्ये कामाला जा,एखांद्याच्या हाताखाली कामाला जा किंवा तसलेच काही सटर फटर उद्योग करावे लागत्यात ह्या सुशिक्षित पोरांना.'आई जेवु घालीना आणि बाप भिक मागु देईना' पार अशी अवस्था होते त्यांची.
.
.
मला वाटते मानसिक पाठबळाची सगळ्यात जास्त गरज ह्याच वयात असते. त्यांना पालकांनी नक्कीच समजुन घेतले पाहिजे. सगळं काही ठीक होईल असा विश्वास त्यांना दिला पाहिजे. बाकी पोरांनीपण सरकारला,मंदीला,दुष्काळाला शिव्या देण्यापेक्षा ह्यातून कसा उपाय निघेल हे बघितले पाहिजे. एक ध्यानात ठेवा सगळं ठीक होईल पण फक्त तुम्ही खचुन जावु नका.
प्रतिक्रिया
26 May 2016 - 9:24 pm | खटपट्या
या अवस्थेतून गेलोय. माझ्यामते मुलांनी सर्व इगो बाजूला ठेउन पडेल ते काम (पात्रतेनुसार नसले तरी) करण्याची तयारी ठेवायला हवी. त्याच बरोबर पात्रतेनुसार काम/धंदा शोधण्याचा प्रयत्न चालू ठेवला पाहीजे. भारतात श्रमांना मोल नाही त्यामुळे अशा मानसिक समस्या उद्भवतात. एमआयडीसी मधे काम करण्यात कमीपणा कसला? पोलीसात भरती होण्यात कमीपणा कसला? आत्मसन्मानासाठी काहीतरी करावेच लागणार.
परदेशात नोकरी गेल्यावर बरेच आयटीवाले गोरे लोक्स जे पडेल ते काम करतात. ड्रायव्हर, हेल्पर अशी कामे करण्यात कमीपणा नसावा.
26 May 2016 - 9:39 pm | दत्ताभाऊ गोंदीकर
विश्वास नांगरे पाटील साहेबांचा लेख आहे ना...
26 May 2016 - 9:45 pm | डॉ सुहास म्हात्रे
भारतात श्रमांना मोल नाही त्यामुळे अशा मानसिक समस्या उद्भवतात.
+१००
"नोकरी एके नोकरी" या मानसिकतेला मागे टाकून पुढे जाणे हेच व्यक्तिगत हिताचे आणि देशहिताचेही आहे.
पाश्चिमात्य देशांमधील सर्वसामान्य लोकांच्या सधनतेला जेवढा त्यांच्या मोठ्या आंतरराष्ट्रिय कंपन्यांनी हातभार लावला आहे तेवढाच (किंवा काकणभर जास्तच) हातभार तेथिल लहान उद्योगधंद्यांनी (स्मॉल एंटरप्रायजेस)* लावला आहे. यामध्ये छोटेमोठे कारगीर, छोटी दुकाने व इतर प्रकारचे लहान उद्योगधंदे येतात. हे एकांड्या शिलेदारालाही करता येते, ते करण्यासाठी फार मोठे भांडवल लागत नाही आणि नोकरीपेक्षा तुलनेने जास्त फायद्याचे ठरू शकते. पण, त्यासाठी लागणारी व्यक्तिगत मानसिक तयारी व सामाजिक समज (समाजात छोट्या /स्वतंत्र उद्योगाना समाजात दिला जाणारा मान) यात आपण कमी पडतो. त्यामुळे "केवळ नोकरी हेच ध्येय समोर ठेवणे आणि ती नसली तर वेळ फुकट घालवत बसणे" यापेक्षा वेगळा विचार मनातच येत नाही... आणि मग असे करून "दाक्षिण्यात्य आणि उत्तरेकडील लोक महाराष्ट्रात येऊन छोटे-मोठे उद्योग बळकावतात" असा पुकारा करण्यातही आपण पुढे असतो !!! :)
======
* हे स्मॉल एंटरप्रायजेस पाश्चिमात्य देशांत इतके प्रचलित आहेत व (आर्थिक व राजकिय दृष्ट्या) इतके महत्वाचे समजले जातात की जेव्हा जेव्हा अर्थव्यवस्था आणि करप्रणालीबद्दल चर्चा होते तेव्हा या स्मॉल अँड हाऊसहोल्ड एंटरप्रायजेसचा उल्लेख अमेरिकन राष्ट्रपतीलाही करावा लागतो.
26 May 2016 - 9:49 pm | खटपट्या
+१००
26 May 2016 - 10:08 pm | चतुरंग
श्रमप्रतिष्ठा ही आपल्याला शिकावीच लागणार आहे!
एखादा माणूस काही साधे काम करतो आहे म्हणजे तो हुषार नाही किंवा कमी लायकीचा आहे असे नसतेच. काही कारणाने त्याला सध्या ते काम करावे लागते आहे इतकेच.
गेल्या काही वर्षात अमेरिकेतले छोटे उद्योग हे बाहेर जाऊ लागल्याने आता मेड इन अमेरिका असे उल्लेख आवर्जून केलेली उत्पादने बाजारात आणणे सुरु झाले आहे कारण छोटे उद्योग हा अर्थव्यवस्थेचा फार मोठा भाग असतो.
26 May 2016 - 10:04 pm | चतुरंग
अडचणी येणारच आणि त्यावर मात करण्यातच खरं कौशल्य आहे हे लहानपणीच मनावर ठसणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
अडचणींमधून मार्ग कसा काढायचा हे मुलं उदाहरणानं आणि अनुभवानं शिकतात.
तथाकथित कॉलेजचे शिक्षण संपल्यावरती जीवनाच्या शाळेत शिकायचे आपण नावच घेत नाही आणि खरा प्रश्न तिथे सुरु होतो. जे काम मिळेल ते सुरु करणे आणि स्वतःची लायकी सिद्ध करणे हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत प्रगतीचे दरवाजे उघडणे अवघड. मला अमूक तमूक डिग्री आहे म्हणून लगेच त्या क्षेत्रातले उच्च दर्जाचे काम मिळेल असे नसते. उमेदवारी अत्त्यावश्यकच.
कंपनीत देखील प्रमोशन्स कशी होतात? एखाद्याने मॅनेजरच्या लेवलचे किंवा डायरेक्टरच्या लेवलचे काम अगोदर सुरु केलेले असते. स्वतःत तशा क्षमता निर्माण केलेल्या असतात, बदल घडवलेला असतो. वर्षभर त्या व्यक्तीने ते काम वरिष्ठांना दाखवले की मग त्यांची खात्री पटते की ही जबाबदारी घ्यायला ती व्यक्ती लायक आहे आणि मगच प्रमोशन होते. आधी डायरेक्टर बनवा मग काम दाखवतो असे नसते! :)
अजून एक मुद्दा खटकला - "शिकलेल्या पोरींचे तरी बर आहे नोकरीचे नाय जमलं कुठ तरी निदान लग्न तरी लावता येतं पण शिकलेली पोरं काय करणार?"
ही फारच जुनी आणि घातकी मानसिकता आहे. पोरी म्हणजे फक्त लग्न करुन उजवायला निर्माण केलेली संतती आहे असं काहीसं. आज दिवस बदललेले आहेत. मुली घरी आणि दारी अशी कित्येक कामं सांभाळून पैसा कमवत आहेतच शिवाय उगीच वाटेल त्या सोम्यागोम्याशी त्या लग्न करतील असेही दिवस आता राहिले नाहियेत. त्यामुळे हा विचार बदलल्या खेरीज आपल्या समाजाची प्रगती ठेचकाळत राहणार हे नक्की!
8 Jun 2016 - 10:31 pm | धुरंधर
सध्या याच्यातूनच जातोय..... म्हणून जणू मनातलंच लिहलय असं वाटलं..
पण पोरींबद्दल चतुरंग शी सहमत.