उनाड दुपार - भाग १
झोप... छे!
झोप वगौर म्हातारे लोक्स घेतात! झोपेची वेळ तर फार महत्वाची वेळ, अक्ख गाव झोपलेलं आणि तुम्ही मस्त जेवण जिरवायला मोकळे, ताकाची चूळ भरून... दातात अडकलेले लोणी दातांच्या फटीतून खेचत उनाडगिरीला सुरुवात! पहिली भेट विहिरीला.. त्या अर्धमेल्या छोट्या बादलीला पायाने ढकलून बळजबरी 'आत्महत्या' करायला लावत माझे स्वार्थी दोन हात तिला जीवदान देण्यासाठी परत वर खेचत, का तर तांब्यातले पाणी पुरले नाही म्हणून! आणि अश्या ताज्या थंड पाण्याला कोण सोडणार, त्यातच ते पाणी अर्ध अंगावर, मग ते सुखवण्यासाठी उन्हात काठी आणि टायर घेऊन सुसाट ह्या वाडीतून त्या वाडीत. घाबरायचो नाही कोणालाच भीती मात्र वाटायची त्या भल्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक खांबाची, किर्रर्रर्रर्रर्र असा अखंड आवाज, आणि त्यावर वायरांच ते जंजाळ! तिथे आलो की माझा वेग कमी असेल तर वाढायचा आणि जास्त असेल तर कमी व्हायचा! कायतरी विचित्र जागा होती ती... कोकणातलं सूक्ष्म बर्मुडा ट्रायांगल म्हणा ना!
असो, रस्त्यावर पडलेल्या आणि गाड्यांच्या चाकांमुळे चिरडल्या गेलेल्या शहीद चिंचा आणि जांभळं पाहून मन कसं जड व्हायचं, वेग तिथेही कमी व्हायचा, कधी कधी तर तंद्री लागायची त्या चिंचा, जांभळांकडे पाहून. मग रस्त्यावर येणारे जाणारे मला बघत हसायचे, मग मी जसा त्या ठिकाणी नव्हतोच अश्या आवेशाने माझी यात्रा परत सुरु करायचो, अनवाणी चालताना सावलीचे महत्व खूप हो... मग झाडांच्या मधून येणारं ऊन जिथे स्थिरावेल तो भाग ही कमालीचा तापलेला असायचा, मग तो ही एक खेळच, उन्हाचा भाग चुकवत जायची मजा! त्यात ते गावाचं डांबर, थंड दुधाच्या साईवर पाय पडल्यावर जसं वाटेल त्याच्या नेमका उलटा अनुभव, जिथे जिथे ऊन अखंड तिथे तिथे ते डाम्बर अमिबा सारखे वागायचे, आपली जागा सोडून इथे तिथे त्यावर अनवाणी पाय पडला की संपलच! त्यावर गाड्यांचे टायर, बैलगाडीची चाके अशी ठळक उठायची की पोस्टांच्या तिकिटावरचे स्टँपच जणू!
क्रमशः
#सशुश्रीके १९ मे २०१६
प्रतिक्रिया
22 May 2016 - 4:05 pm | उगा काहितरीच
वातावरण निर्मिती झकास ...पण लहान वाटला भाग. येऊ द्या पुढील भाग लवकर .
23 May 2016 - 8:26 am | शित्रेउमेश
सुरुवात मस्त...
पण भाग खूपच लहान वाटला...
पुभाप्र....
23 May 2016 - 9:24 am | बोका-ए-आझम
पण पकड घेईस्तोवर संपलं.
23 May 2016 - 1:45 pm | कविता१९७८
छान लेखन