कलिंगडाचे धोडक

उल्का's picture
उल्का in पाककृती
7 Apr 2016 - 1:04 pm

उन्हाची झळ बसायला सुरुवात झाली की गारम गार काय काय खाता येईल ह्याचा विचार सतत चालू असतो. खादाडीची आवड असणाऱ्यांचा (माझ्यासारख्यांचा) जरा जास्तच.
त्यातलेच एक सर्वांचेच प्रिय कलिंगड. बाजारात गेल्यावर जड कलिंगड वाहून आणल्यावर ते कधी एकदा कापून मस्त गार करून खातो/ते असे प्रत्येकालाच होत असते. खर्र की नाही? पण मग त्याचा तो जाड जाड सालींचा पसारा उचलून टाकताना अर्धे पैसे वाया गेले म्हणून वाईट वाटत असेल तर आता मी त्यावर एक उपाय सांगते जो तुम्हाला नक्की आवडेल.

१. किसणी घेऊन त्या सालींचा सगळा पांढरा गर किसून घ्या.
२. आता त्यात अर्धी वाटी नारळाचा चव + एक चमचा हिरव्या ओल्या मिरच्यांचे भरड + अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर + चवीपुरते मीठ आणि थोडीशी साखर घालून सगळे एकजीव करा.
३. आता त्यात मावेल इतका बारीक रवा (नसल्यास तांदळाचे पीठ चालेल पण रव्यामुळे कुरकुरीतपणा येतो तेव्हा शक्यतो रवाच) घाला. मावेल इतका म्हणजे हाताने मिश्रण उचलून तव्यावर थापता आले पाहिजे.
४. थालीपीठ करतो त्याप्रमाणे मध्यम आचेवर करावे. फरक इतकाच की थेट तव्यावर थापावे.

टीप -श्रावण महिन्यात बाजारात मोठी काकडी मिळते. तिचे पण अगदी असेच करावे. फक्त साले वापरू नयेत तर काकडी वापरावी. त्याला तवसोळी असे म्हणतात.

जातीचा डंका पिटायचा म्हणून नाही पण तरीही प्रत्येक पाकृचे वैशिष्ट्य आणि उगमस्थान असते म्हणून सांगते की हे सारस्वत घरांमध्ये खासकरून बनते. तुम्हाला आवड असल्यास खास सारस्वत पद्धतीच्या 'हटके' पाकृ मी लिहू शकेन.

फोटो
अ

प्रतिक्रिया

नीलमोहर's picture

7 Apr 2016 - 1:24 pm | नीलमोहर

वरती 'मदत पान' अशी लिंक आहे , त्यात बर्‍याच प्रश्नांची उत्तरे मिळतील.
फोटोसाठी http://www.misalpav.com/node/13573
येऊ द्या अजून :)

केला प्रयत्न पण नाही जमले. :(

फोटो फ्लिकर / पिकासा / गूगल फोटो यापैकी कशावर तरी लोड करा आणि त्याची लिंक मला किंवा साहित्य संपादकांना व्यनि करा.

छान,ज्वारीचे किंवा भाजणीचे पीठ नाही का चालणार?

आधी ह्या पद्धतीने करून बघा आणि मग पीठ वापरून पण बघा. रव्याचेच जास्त आवडेल असे मला वाटते.
कुरकुरीतचा अट्टाहास नसेल तर पीठ वापरायला हरकत नाही.

रामदास's picture

7 Apr 2016 - 1:38 pm | रामदास

उचलून टाकताना अर्धे पैसे वाया गेले म्हणून नाही. तरी पण करून /खाऊन बघायला हरकत नाही.

उल्का's picture

7 Apr 2016 - 1:56 pm | उल्का

:)
मला वटते हो :(
म्हणुन लिहिले तसे. जरुर करुन बघा. :)

पिलीयन रायडर's picture

7 Apr 2016 - 1:42 pm | पिलीयन रायडर

असेच धपाटे करते माझी आजी नेहमी..

नक्की टाका सारस्वत पद्धतीच्या पाकृ..

उल्का's picture

7 Apr 2016 - 1:57 pm | उल्का

बर्र नक्की :)

नूतन सावंत's picture

7 Apr 2016 - 2:30 pm | नूतन सावंत

माझी आईही करत असे हा प्रकार.अजून पाककृती येऊदेत.

उल्का's picture

7 Apr 2016 - 2:33 pm | उल्का

dhodak

हुश्श! :) :)

यशोधरा's picture

7 Apr 2016 - 2:34 pm | यशोधरा

गोडही बनवतात हे. दोन्ही प्रकारात चविष्ट्च!

माझ्या साबा तिखट-गोड बनवतात.
नक्की चव कळेपर्यन्त खाउन सम्पते. हाहाहा.
त्या खूप साखर घालतात.

यशोधरा's picture

7 Apr 2016 - 3:25 pm | यशोधरा

साखर नव्हे, गूळ घालून

सस्नेह's picture

7 Apr 2016 - 2:38 pm | सस्नेह

थेट तव्यावर न करता प्लॅस्टिकवर थापून केले तर काय होईल ?

तव्यावर सहज थापता येते. घाबरू नका.
प्लास्टिक वरून उचलताना तुटायची भीती आहे.
कलिंगड असल्यामुळे पाण्याचा अंश जास्त असतो त्या मिश्रणात.
जर खूप रवा घातला तर खुसखुशीतपणा नाही येणार. मिश्रण थोडे ओलसर हवे.

अखेरीस फोटो चढवला मी.

सस्नेह's picture

7 Apr 2016 - 3:12 pm | सस्नेह

घाबरत नाही.
तव्यावर करायचे म्हणजे स्पीड कमी पडेल. प्लॅस्टिकवर थापले तर एक भाजून होईपर्यंत दुसरे तयार करता येईल. झटपट होईल, नाही का ?
रच्याकने, धोडक नाव मजेशीर आहे.

मला वाटले भाजेल म्हणून भिती वाटतेय की काय? :)
फक्त थापताना विस्तव अतिमंद ठेवा. थापून झाल्यावर मग थोडा वाढवा.

स्वाती दिनेश's picture

7 Apr 2016 - 3:33 pm | स्वाती दिनेश

प्रकार वेगळाच दिसतो आहे, धोंडस (तौसाळं) माहित होते पण हे धोडक माहित नव्हते.
स्वाती

सस्नेह's picture

7 Apr 2016 - 3:40 pm | सस्नेह

मला माहिती असलेले तौसाळे हे थालीपीठ नसून काकडी घातलेले धिरडे आहे.

पूर्वाविवेक's picture

7 Apr 2016 - 3:51 pm | पूर्वाविवेक

अगदी अगदी, मलाही. हा पदार्थ मला माहित आहे पण त्याचे हे नाव मात्र पहिल्यांदाच ऐकले.
धोंडस म्हणजे रवा वापरून केलेला जुन्या पद्धतीचा केक. निखाऱ्यावर भाजतात.माझी आजी बनवत असे.

तवसाळ हे पदार्थाचे नाव नसून श्रावणात ज्या मोठ्या काकड्या मिळतात त्यांना म्हणतात.
हे कलिंगडाच्या सालीचा कीस किंव्हा तवसाळचा कीस किंवा पिकलेले केळे वापरून केळे जाते.

राही's picture

7 Apr 2016 - 9:41 pm | राही

मला वाटते श्रावण महिन्यात ज्या जून मोठ्या काकड्या मिळतात त्यांना तवसें (अनेक वचन तवशीं) म्हणतात. तवशापासून केलेला पदार्थ तो तवसाळें, तवसाळी, तवसोळी इ.
ह्या काकड्या चांगल्या जून खुडल्या तर बरेच दिवस टिकतात. लाल भोपळ्यासारख्या खुंटीला किंवा छताला टांगून ठेवतात. दसरा झाला की अंगणे करताना अंगणांत लावलेले पावसाळी वेल उपटावे लागतात. त्यावर असलेली उरलीसुरली तवशी काढून टांगून ठेवतात. दसर्‍यापर्यंत ती जून झालेलीच असतात.

पूर्वाविवेक's picture

7 Apr 2016 - 3:53 pm | पूर्वाविवेक

हे धोंडस कलिंगडाच्या सालीचा कीस किंव्हा तवसाळचा कीस किंवा पिकलेले केळे वापरून केले जाते.

पूर्वाविवेक's picture

7 Apr 2016 - 3:53 pm | पूर्वाविवेक

हे धोंडस कलिंगडाच्या सालीचा कीस किंव्हा तवसाळचा कीस किंवा पिकलेले केळे वापरून केले जाते.

मस्तंय पाकृ.सारस्वत पाकृ येऊ द्याच! एवढ्या एका बाबतीत जातपात मानली पाहिजे!

अनन्न्या's picture

7 Apr 2016 - 5:57 pm | अनन्न्या

थालिपीठ थापताना केळीच्या पानावर थापले तर पानासकट उचलता येते. थालिपीठ तव्यावर टाकून मग पान काढता येते.
त्यासाठी केळीचे पान मात्र मिळायला हवे.

चला फोटो आला, आता कवतिक करायला हरकत नाही. कलिंगड आणल्यास करुन बघण्यात येईल.

पैसा's picture

7 Apr 2016 - 7:05 pm | पैसा

कोंकणीत काकड्यांना तवशीं म्हणतात. रत्नागिरीकडे जून झालेल्या काकड्यांना तवसे म्हणतात. काकड्यांचा तांदूळ रवा (किंवा तांदूळ भिजवून वाटून), खोबरे, गूळ घालून उकडलेल्या सांदणांसारख्या पदार्थाला कोंकणीत तवसोळी म्हणतात.

हे धोड्डक म्हणजे थालिपिठाचा भाऊ आहे.

विवेकपटाईत's picture

7 Apr 2016 - 7:30 pm | विवेकपटाईत

कालच कलिंगड विकत घेतले होते. उद्या निश्चित करून बघेन (म्हणजे सौ. ला करायला सांगेन). मस्त पाककृती.

उल्का's picture

7 Apr 2016 - 9:11 pm | उल्का

तुम्हा सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
@ स्वाती, पूर्वा - अगदी खंर. धोंडस म्हणजे चवीला गोड. तांदळाचा रवा, काकडी, काजूचे तुकडे, गूळ याप्सून बनवतात. ते उकडून अथवा भाजून घेतात. आणि थंड झाल्यावर घट्ट रवाळ साजूक तुपाबरोबर हादडायचे. माझी आई करायची पण मी कधी केले नाही. आठवण आली.

@ पैसा - हे धोडक पण तांदळाचा बारीक राव घालून बनवतात मग तर खूपच कुरकुरीत होते. आणि आम्ही तिखट ह्याला तावसोळी आणि गोड ह्याला धोंडस म्हणतो. इथे रत्नागिरीकर बऱ्याच जणी आहेत वाटते. :)

आणखी पण एक पाकृ माझी आई बनवायची - खांतोळी.
दुधा तुपा विना वडी त्याचे नाव खांतोळी असे म्हंटले जाई. मला नीटपणे नाही आठवत पाकृ.
बहुदा तांदळाचा रवा, गूळ, खोबऱ्याचे काप, काजूचे तुकडे पाणी घालून मंद विस्तवावर शिजवायचे. घट्ट होत आल्यावर वड्या थापायच्या.
आणि थंड झाल्यावर घट्ट रवाळ साजूक तुपाबरोबर खायच्या. (हा शेवटचा भाग नीटपणे आठवतोय. मात्र.)

पैसा's picture

7 Apr 2016 - 9:42 pm | पैसा

त्याला खांडवी म्हणतात!

पूर्वाविवेक's picture

8 Apr 2016 - 5:52 pm | पूर्वाविवेक

हि घ्या रेसिपी. खांडवी
तांदुळाचा रवा किंवा वरी वापरून केले जाते.

राही's picture

7 Apr 2016 - 9:45 pm | राही

खांडटोळी, खांडपोळी, खाण्टोळी, खांडवी अशी अनेक नावे आहेत.

उल्का's picture

7 Apr 2016 - 10:07 pm | उल्का

खास नावांचाच एक धागा काढावा लागेल असे दिसतेय.

lgodbole's picture

8 Apr 2016 - 10:50 am | lgodbole

खांटोळी म्हणजे सांज्याची वडी

अग्ग बाइ हे अस पन असत का काही ? चविष्ट दिसतय प्रकरण :)

lgodbole's picture

8 Apr 2016 - 10:57 am | lgodbole

थोड बीट गाजर किसुन घातले तर छान रंग येइल