Skip to main content

कलिंगडाचे धोडक

लेखक उल्का यांनी गुरुवार, 07/04/2016 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाची झळ बसायला सुरुवात झाली की गारम गार काय काय खाता येईल ह्याचा विचार सतत चालू असतो. खादाडीची आवड असणाऱ्यांचा (माझ्यासारख्यांचा) जरा जास्तच. त्यातलेच एक सर्वांचेच प्रिय कलिंगड. बाजारात गेल्यावर जड कलिंगड वाहून आणल्यावर ते कधी एकदा कापून मस्त गार करून खातो/ते असे प्रत्येकालाच होत असते. खर्र की नाही? पण मग त्याचा तो जाड जाड सालींचा पसारा उचलून टाकताना अर्धे पैसे वाया गेले म्हणून वाईट वाटत असेल तर आता मी त्यावर एक उपाय सांगते जो तुम्हाला नक्की आवडेल. १. किसणी घेऊन त्या सालींचा सगळा पांढरा गर किसून घ्या. २. आता त्यात अर्धी वाटी नारळाचा चव + एक चमचा हिरव्या ओल्या मिरच्यांचे भरड + अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर + चवीपुरते मीठ आणि थोडीशी साखर घालून सगळे एकजीव करा. ३. आता त्यात मावेल इतका बारीक रवा (नसल्यास तांदळाचे पीठ चालेल पण रव्यामुळे कुरकुरीतपणा येतो तेव्हा शक्यतो रवाच) घाला. मावेल इतका म्हणजे हाताने मिश्रण उचलून तव्यावर थापता आले पाहिजे. ४. थालीपीठ करतो त्याप्रमाणे मध्यम आचेवर करावे. फरक इतकाच की थेट तव्यावर थापावे. टीप -श्रावण महिन्यात बाजारात मोठी काकडी मिळते. तिचे पण अगदी असेच करावे. फक्त साले वापरू नयेत तर काकडी वापरावी. त्याला तवसोळी असे म्हणतात. जातीचा डंका पिटायचा म्हणून नाही पण तरीही प्रत्येक पाकृचे वैशिष्ट्य आणि उगमस्थान असते म्हणून सांगते की हे सारस्वत घरांमध्ये खासकरून बनते. तुम्हाला आवड असल्यास खास सारस्वत पद्धतीच्या 'हटके' पाकृ मी लिहू शकेन. फोटो अ

वाचने 15570
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

In reply to by उल्का

फोटो फ्लिकर / पिकासा / गूगल फोटो यापैकी कशावर तरी लोड करा आणि त्याची लिंक मला किंवा साहित्य संपादकांना व्यनि करा.

In reply to by पिनू

आधी ह्या पद्धतीने करून बघा आणि मग पीठ वापरून पण बघा. रव्याचेच जास्त आवडेल असे मला वाटते. कुरकुरीतचा अट्टाहास नसेल तर पीठ वापरायला हरकत नाही.

उचलून टाकताना अर्धे पैसे वाया गेले म्हणून नाही. तरी पण करून /खाऊन बघायला हरकत नाही.

In reply to by यशोधरा

माझ्या साबा तिखट-गोड बनवतात. नक्की चव कळेपर्यन्त खाउन सम्पते. हाहाहा. त्या खूप साखर घालतात.

थेट तव्यावर न करता प्लॅस्टिकवर थापून केले तर काय होईल ?

In reply to by सस्नेह

तव्यावर सहज थापता येते. घाबरू नका. प्लास्टिक वरून उचलताना तुटायची भीती आहे. कलिंगड असल्यामुळे पाण्याचा अंश जास्त असतो त्या मिश्रणात. जर खूप रवा घातला तर खुसखुशीतपणा नाही येणार. मिश्रण थोडे ओलसर हवे. अखेरीस फोटो चढवला मी.

In reply to by उल्का

घाबरत नाही. तव्यावर करायचे म्हणजे स्पीड कमी पडेल. प्लॅस्टिकवर थापले तर एक भाजून होईपर्यंत दुसरे तयार करता येईल. झटपट होईल, नाही का ? रच्याकने, धोडक नाव मजेशीर आहे.

In reply to by सस्नेह

मला वाटले भाजेल म्हणून भिती वाटतेय की काय? :) फक्त थापताना विस्तव अतिमंद ठेवा. थापून झाल्यावर मग थोडा वाढवा.

प्रकार वेगळाच दिसतो आहे, धोंडस (तौसाळं) माहित होते पण हे धोडक माहित नव्हते. स्वाती

In reply to by स्वाती दिनेश

मला माहिती असलेले तौसाळे हे थालीपीठ नसून काकडी घातलेले धिरडे आहे.

In reply to by स्वाती दिनेश

अगदी अगदी, मलाही. हा पदार्थ मला माहित आहे पण त्याचे हे नाव मात्र पहिल्यांदाच ऐकले. धोंडस म्हणजे रवा वापरून केलेला जुन्या पद्धतीचा केक. निखाऱ्यावर भाजतात.माझी आजी बनवत असे. तवसाळ हे पदार्थाचे नाव नसून श्रावणात ज्या मोठ्या काकड्या मिळतात त्यांना म्हणतात. हे कलिंगडाच्या सालीचा कीस किंव्हा तवसाळचा कीस किंवा पिकलेले केळे वापरून केळे जाते.

In reply to by पूर्वाविवेक

मला वाटते श्रावण महिन्यात ज्या जून मोठ्या काकड्या मिळतात त्यांना तवसें (अनेक वचन तवशीं) म्हणतात. तवशापासून केलेला पदार्थ तो तवसाळें, तवसाळी, तवसोळी इ. ह्या काकड्या चांगल्या जून खुडल्या तर बरेच दिवस टिकतात. लाल भोपळ्यासारख्या खुंटीला किंवा छताला टांगून ठेवतात. दसरा झाला की अंगणे करताना अंगणांत लावलेले पावसाळी वेल उपटावे लागतात. त्यावर असलेली उरलीसुरली तवशी काढून टांगून ठेवतात. दसर्‍यापर्यंत ती जून झालेलीच असतात.

थालिपीठ थापताना केळीच्या पानावर थापले तर पानासकट उचलता येते. थालिपीठ तव्यावर टाकून मग पान काढता येते. त्यासाठी केळीचे पान मात्र मिळायला हवे.

कोंकणीत काकड्यांना तवशीं म्हणतात. रत्नागिरीकडे जून झालेल्या काकड्यांना तवसे म्हणतात. काकड्यांचा तांदूळ रवा (किंवा तांदूळ भिजवून वाटून), खोबरे, गूळ घालून उकडलेल्या सांदणांसारख्या पदार्थाला कोंकणीत तवसोळी म्हणतात. हे धोड्डक म्हणजे थालिपिठाचा भाऊ आहे.

तुम्हा सर्वांचे प्रतिसादाबद्दल धन्यवाद! @ स्वाती, पूर्वा - अगदी खंर. धोंडस म्हणजे चवीला गोड. तांदळाचा रवा, काकडी, काजूचे तुकडे, गूळ याप्सून बनवतात. ते उकडून अथवा भाजून घेतात. आणि थंड झाल्यावर घट्ट रवाळ साजूक तुपाबरोबर हादडायचे. माझी आई करायची पण मी कधी केले नाही. आठवण आली. @ पैसा - हे धोडक पण तांदळाचा बारीक राव घालून बनवतात मग तर खूपच कुरकुरीत होते. आणि आम्ही तिखट ह्याला तावसोळी आणि गोड ह्याला धोंडस म्हणतो. इथे रत्नागिरीकर बऱ्याच जणी आहेत वाटते. :) आणखी पण एक पाकृ माझी आई बनवायची - खांतोळी. दुधा तुपा विना वडी त्याचे नाव खांतोळी असे म्हंटले जाई. मला नीटपणे नाही आठवत पाकृ. बहुदा तांदळाचा रवा, गूळ, खोबऱ्याचे काप, काजूचे तुकडे पाणी घालून मंद विस्तवावर शिजवायचे. घट्ट होत आल्यावर वड्या थापायच्या. आणि थंड झाल्यावर घट्ट रवाळ साजूक तुपाबरोबर खायच्या. (हा शेवटचा भाग नीटपणे आठवतोय. मात्र.)

थोड बीट गाजर किसुन घातले तर छान रंग येइल