सायकलीशी जडले नाते १८: तोरणमाळ सायकल ट्रेक

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
9 Mar 2016 - 3:34 pm

सर्व मान्यवरांना नमस्कार. सायकल नव्याने शिकताना आणि सायकलीशी मैत्री करताना आलेले सोलो सायकलिंगचे गमतीदार अनुभव शेअर करत आहे. सायकलिंगचे वेगवेगळे टप्पे, सायकल चालवताना केलेला वेडेपणा आणि चित्रविचित्र अनुभव इथे लिहित आहे. त्यातून मिळालेला आनंद सर्वांसोबत वाटून घ्यावा, ही इच्छा. धन्यवाद.

सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक

सायकलीशी जडले नाते २: पहिलं शतक

सायकलीशी जडले नाते ३: नदीसोबत सायकल सफर

सायकलीशी जडले नाते ४: दूरियाँ नज़दिकीयाँ बन गईं. . .

सायकलीशी जडले नाते ५: सिंहगड राउंड १. . .

सायकलीशी जडले नाते ६: ऊँचे नीचे रास्ते और मन्ज़िल तेरी दूर. . . . . .

सायकलीशी जडले नाते ७: शहरामधील सायकलिंग. . . . . .

सायकलीशी जडले नाते ८: सिंहगड राउंड २!

सायकलीशी जडले नाते ९: दुसरे शतक. . .

सायकलीशी जडले नाते १०: एक चमत्कारिक राईड- नर्वस नाइंटी!

सायकलीशी जडले नाते ११: नव्या रस्त्यांवरील राईडस

सायकलीशी जडले नाते १२: तिसरे शतक- जीएमआरटी राईड

सायकलीशी जडले नाते १३: ग्रामीण रस्त्यांवर सायकल राईड

सायकलीशी जडले नाते १४: "नवीन सायकलने" नवीन सुरुवात

सायकलीशी जडले नाते १५: औंढा नागनाथकडे चौथे शतक

सायकलीशी जडले नाते १६: पाचवे शतक- लोअर दुधना डॅम

सायकलीशी जडले नाते १७: साक्री- नंदुरबार- एक ड्रीम माउंटेन राईड!

तोरणमाळ सायकल ट्रेक

सातपुड्याजवळ सायकल चालवण्याची खूप इच्छा आहे. लवकरच तोरणमाळ ट्रेक करायचा आहे. तो आजवरचा माझा सर्वांत मोठा माउंटेन ट्रेक असेल. आधी दोनदा सिंहगड केला आहे, पण हा त्याच्याहून जास्त असेल. ५० किलोमीटरचा चढ आणि ७-८ किलोमीटरचा मोठा घाट. मजा येईल आणि माझी तयारी कुठपर्यंत झाली आहे, हेही कळेल. तोरणमाळला जाण्याआधी नंदुरबारच्या जवळ आणखी एक छोटी राईड केली. जवळच असलेल्या गुजरातमध्ये जाऊन आलो सायकलवर! मी असलेल्या जागेपासून तोरणमाळ सुमारे ७६ किलोमीटर आहे. त्यामुळे डायरेक्ट जाणार नाही. आधी ह्या चढाच्या पायथ्याजवळ असलेल्या शहाद्यामध्ये हॉल्ट करेन व दुस-या दिवशी पुढे जाईन. हा निर्णय नंतर योग्य ठरला.

२४ ऑगस्टला प्रोजेक्टचं काम पूर्ण झाल्यावर संध्याकाळी सायकलवरून निघालो. शहाद्याला जायला ३० किलोमीटरसाठी दीड तास लागला. मस्त राईड झाली. तापी नदी ओलांदली. पहिल्यांदा एखाद्या राईडसाठी लॉजवर मुक्काम करेन. संध्याकाळ होता होता पोहचलो आणि लॉज घेतला. आता चांगला आराम करायचा आहे म्हणजे पहाटे निघेन तेव्हा शरीर अगदी ताजंतवानं असेल. पण चांगला आराम करणे, हीसुद्धा एक कला आहे आणि ती इतकी सोपी नसते. त्यामुळे रात्री उशीरापर्यंत चांगली झोप लागली नाही. त्यातच नवीन जागा आणि पहाटे उठण्याचा ताण. त्यामुळे झोप कमीच झाली. पहाटे ५ वाजता उठलो. द्विधा मन आहे- सामान इथेच सोडून जावं का सोबत घेऊन जावं? सोडण्यात अडचण अशी आहे की, लॉज इतका सेफ नाहीय. आणि जर नेलं तर घाट चढताना जास्त वजन असेल. लॅपटॉप आणि सामानाचं वजन सात- आठ किलो तरी असेलच. विचार करून सुरक्षित मार्ग घेतला आणि सामान सोबतच घेतलं व साडेपाचला बाहेर निघालो. सामान घेण्याचा निर्णयही नंतर बरोबर ठरला. पहाटे साडेपाचची वेळ आणि एका अज्ञात राईडची सुरुवात!

मॉर्निंग वॉक करणा-या लोकांना रस्ता विचारला आणि निघालो. हळु हळु उजाडलं आणि दूरचे डोंगर दिसू लागले. पहिले तीस किलोमीटर काही अडचण येऊ नये. अर्थात् अतिशय मंद चढ आत्ताच सुरू झाला आहे. शेवटचे दहा किलोमीटर खरी मजा येईल! दुसरी गोष्ट म्हणजे एकदा मुख्य रस्ता सोडून आतला रस्ता लागल्यानंतर हॉटेल आणि गावसुद्धा जवळजवळ लागणार नाहीत. म्हसावद नावाच्या गावात नाश्ता केला. ह्यानंतर तोरणमाळमध्येच बहुतेक ठीक नाश्ता मिळेल. हा सर्व आदिवासी बेल्ट आहे. नंदुरबार जिल्हा. पुढे जाताना दूरवरचे पर्वत आणखी जवळ येत गेले. अर्थात् आत्ता जे दिसत आहेत, ती फक्त पहिली रांग आहे. अशा अनेक रांगा लागतील. रस्ता उत्तम आहे. मध्ये मध्ये हॉटेल नाहीत, पण छोटे छोटे गावं लागत आहेत. एका ठिकाणी हापसाने पाणी भरून घेतलं. नागझिरी गावामध्ये छान तलाव आहे. आता वस्ती विरळ होते आहे. पहिल्या दोन तासांमध्ये २४ किलोमीटर आणि तीन तासांनंतर ३२ किलोमीटर पूर्ण केले.


तापी नदी आणि दूर सातपुड्याचे डोंगर

हळु हळु थकवा वाढतोय आणि वेग कमी होत जातोय. चढ एकदम तीव्र नाहीय, पण सतत चढत असल्यामुळे जास्त शक्ती खर्च होते आहे. हळु हळु तीव्र चढही लागतोय. आता अगदी हलक्या गेअर्सवर चालवतोय. निघून साडेतीन तास झाले आहेत आणि जेमतेम ३५ किलोमीटरपर्यंत पोहचलो आहे. गती अगदीच कमी होते आहे. लवकरच सायकल चालवणं अवघड झालं. चढही वाढला आणि आता पायी पायी जाण्याची वेळ आली. फक्त चार तास सायकल चालवता आली आणि तोरणमाळ अजूनही १५ किलोमीटर दूर आहे. आता पायी पायीच जावं लागेल. वेळ बराच लागेल. आत्ता सकाळचे साडेनऊच झाले आहेत. पण हेही कळतं आहे की, मी सलग इतका मोठा चढ चढू शकत नाही. कदाचित सामान नसतं तर चढू शकलो असतो. पण काही हरकत नाही, अशा रस्त्यावर पायी जाण्यामध्येही तितकीच मजा आहे.

सातपुड्याची एक एक रांग दिसत गेली तसं त्याचं भव्य रूप समोर आलं! पर्वतीय क्षेत्राच्या खुणा दिसायला सुरुवात झाली- खालून वाहणारा झरा, चढाचा रस्ता आणि ढगांमध्ये लपलेले पर्वत! कालापाणीला पोहचेपर्यंत अगदी थकून गेलो. इथे कळालं की, खरा घाट तर पुढे सुरू होतो आहे! शेवटचे आठ किलोमीटर. इथेच सात पाय-यांचा घाट सुरू झाला. इथून तोरणमाळ सेंक्चुरीसुद्धा सुरू झाली. खरा घाट आला! पण पायी जाताना विशेष अडचण आली नाही. सारखं थांबावं लागत होतं, पण चालत राहिलो. हळु हळु ढग जवळ आले. थोड्या वेळाने रस्ता ढगांमध्ये शिरला! एकदम अंधारून आलं आणि पाऊसही सुरू झाला! अद्भुत नजारा!

मला एकट्याला जाताना पाहून एक जण थांबले. तोरणमाळमध्ये काम करणारे. ते शॉर्ट कटने वर चढणारे आहेत. पण काही वेळ माझ्यासोबत चालले आणि मग सांगितलं की आता फक्त दोन- तीन किलोमीटरनंतर चढ पूर्ण होईल. आता इतका थकलोय की किती अंतर राहिलंय, हेही नीट कळत नाहीय. बस स्वत:ला ओढतोय. एक बोर्ड दिसला- महाराष्ट्रातलं क्रमांक दोनचं थंड हवेचं ठिकाण जवळच आहे! पण इतका थकलोय की, ते समोर तोरणमाळ आहे का लोणावळा आहे का महाबळेश्वर इतकीही शुद्ध मला नाहीय. म्हणतात ना की सजगतासुद्धा ऊर्जेचं रूप असतं. माझी ऊर्जा इतकी क्षीण झालीय की, ही सजगताच नाहीय की समोर येतंय ते नक्की काय आहे! हळु हळु दूरवर समतल जमीन दिसायला लागली. नागार्जुन गुहा लागली आणि घाट संपला! आता वळून बघितल्यावर कळतं आहे की, कुठे आलो आहे.


खाली रस्ता

पहाटे साडेपाच वाजता निघालो होतो आणि नऊ तासांनी तोरणमाळला पोहचलो! पुढे गावात जाताना थोडा उतार लागला आणि चार तासांनी सायकल चालवली! इथे बघण्यासारखं खूप आहे, पण माझं लक्ष्य सायकलवर जाणे हेच होतं. त्यामुळे जास्त फिरलो नाही. एक छोटं तळं बघितलं आणि आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घेतला. आता परत जाताना लिफ्ट घेऊनच जाईन. इथपर्यंत बस येते आणि इतर जीपही असतील. पण जेवण करताना कळालं की घाटात एका जागी रस्ता थोडा अरुंद असल्यामुळे मोठी बस सध्या येत नाही आहे. आणि आता दुपार होऊन गेल्यामुळे जीपही बहुतेक नसतील. दुपारचे दोन वाजले आहेत. थोडा वेळ जीप- टेंपोची वाट बघितली. कारण परत सायकलवर जाण्याचं त्राण अजिबातच नाहीय. शरीराची बॅटरी पूर्ण डिस्चार्ज झाली आहे. पण बराच वेळ वाट बघूनही जीप मिळाली नाही. एक जीप जात होती, पण सायकल घ्यायला तयार नाही झाली. मद अगदीच अशांत झालं. एकदा वाटलं की, इथेच मुक्काम करावा. पण ते खूप महाग होतं. म्हणून बराच विचार करून शेवटी सायकलीनेच निघालो. घाट उतरल्यावर पुढे कुठे लिफ्ट मिळेल अशी आशा आहे.


एकूण ११६४ मी क्लाइंब


घाट संपेपर्यंतचा चढ. सुमारे ४ तास सायकलवर ३६ किमी आणि सुमारे ४ तास पायी पायी- १४ किमी

पावसाने ओल्या झालेल्या रस्त्यावर इतक्या तीव्र उतारामध्ये उतरण्याची भिती वाटली. पण आधी दोनदा असाच तीव्र उतार- सिंहगड दोनदा उतरलो आहे. एक चांगलं आहे की, पाऊस थांबलाय आणि रस्त्यावरही ढग कमी झाले आहेत. आता खूप मोठा परिसर दिसतोय. इथून मध्य प्रदेश लागूनच आहे. आता मी म्हणू शकतो की, माझ्या सायकलने गुजरातनंतर मध्य प्रदेशही बघितला आहे! अगदी हळु हळु उतरत गेलो. मध्ये मध्ये थांबत गेलो. जसा मुख्य घाट संपला, एक नि:श्वास सोडला. चला, आता घसरण्याचा तरी धोका नाही. योगायोगाने घाट उतरल्यानंतर लगेचच एका रिक्षाने लिफ्ट दिली. शहादापर्यंत नेण्यासाठी ड्रायव्हर तयारही झाला!

शहादा बस स्टॅण्डवर उतरल्यानंतर परत जाण्यासाठी बसची चौकशी केली. इथून सरळ परभणीला तर बस नाहीच आहे. औरंगाबादला जाईन आणि तिथे मुक्काम करून दुस-या दिवशी परभणीला जाईन. औरंगाबादची बसही लगेच मिळाली. जर सामान लॉजवर ठेवलं असतं तर जास्त वेळ लागला असता व ही बस चुकली असती. सायकल बसवर ठेवण्याची व्यवस्थाही बरोबर झाली आणि मग मध्यरात्री औरंगाबादला सायकल सहजपणे खालीही उतरवता आली. मध्यरात्री उशीरा औरंगाबादमध्ये मामाच्या घरी गेलो. पहाटे दिड वाजता सायकल चालवण्याची मजा अनुभवली! आराम करून सकाळी परभणीला जायला निघेन. पण साक्रीपासून हा प्रवास अगदी मस्त झाला! काय रमणीय नजारे होते! आणि शिवाय आता ग्रेड १ चा मोठा क्लाइंब चढण्याचाही अनुभव मिळाला!

अधिक फोटो इथे पाहता येतील

पुढील भाग १९: उत्साह वाढवाणा-या राईडस

अशा इतर लेखांसाठी- माझा ब्लॉग

प्रवासविचारअनुभव

प्रतिक्रिया

sagarpdy's picture

9 Mar 2016 - 4:24 pm | sagarpdy

सही है! लगे राहो!

एस's picture

9 Mar 2016 - 4:59 pm | एस

सहीच!

बोका-ए-आझम's picture

9 Mar 2016 - 5:07 pm | बोका-ए-आझम

चलो!धन्यवाद मार्गीजी!

वेल्लाभट's picture

9 Mar 2016 - 5:22 pm | वेल्लाभट

जबराट्ट

मित्रहो's picture

9 Mar 2016 - 6:48 pm | मित्रहो

फारच सुंदर दिसतोय
मस्त झाला ट्रेक

बाबा योगिराज's picture

9 Mar 2016 - 9:34 pm | बाबा योगिराज

मार्गी भौ,
एक नंबर बर्का

मार्गी's picture

11 Mar 2016 - 10:15 am | मार्गी

वाचनाबद्दल व प्रतिक्रियेबद्दल सर्वांना धन्यवाद आणि हॅपी सायकलिंग ! :)

जगप्रवासी's picture

11 Mar 2016 - 3:33 pm | जगप्रवासी

तोरणमाळ चे फोटो बघून महाबळेश्वर ची आठवण आली. नेहमीप्रमाणे छान वर्णन आणि फोटो सुद्धा.

पैसा's picture

11 Mar 2016 - 7:49 pm | पैसा

जबरदस्त सुंदर लिहिलंय आणि फोटो बघूनच मन भरलं!

स्थितप्रज्ञ's picture

18 May 2016 - 6:16 pm | स्थितप्रज्ञ

या राईडचे फोटो बघून याड लागल....

स्थितप्रज्ञ's picture

19 May 2016 - 9:37 am | स्थितप्रज्ञ

बाय द वे, हे कुठल application वापरता सायकल राईड रेकॉर्ड करायला? मस्त आहे.

मार्गी's picture

19 May 2016 - 6:46 pm | मार्गी

धन्यवाद अभिजीत जी! हे एप्लिकेशन नाहीय; www.mapmyride.com वेबसाईटवर रूट मॅप घेतला आहे. मी एंडोमंडो कधी कधी वापरतो. तुम्हांला हॅपी सायकलिंग!