एखादी कलाकृती किती संभाव्यता निर्माण करु शकते यावर तिची कालातीतता ठरते. आणि त्याचं एक अनोखं उदाहरण म्हणजे अमीर खुसरोचा हा क़लाम आहे : छाप तिलक सब छीनी रे मोसे नैना मिलाइके !
मूळ क़लाम खाली दिलायं आणि त्याची अनेकानेक वेरिएशन्स एकेका दिग्गजानं आपल्या प्रतिभेनुसार केली आहेत.
अपनी छ्ब बनाइके जो मैं पी के पास गई
जो छब देखी पिहू की, तो अपनी भूल गई ।
इथूनच कल्ला सुरु होतो. कारण हा क़लाम सूफी़याना आहे. त्याला एका बाजूला संपूर्ण आध्यामिक रंग आहे आणि दुसर्या बाजूला इष्कबाजीचा तुफानी जल्लोष आहे.
प्रेससी स्वतःला सजवून सवरुन प्रियकराकडे गेली, पण जेंव्हा त्याचा चेहरा पाहिला तेंव्हा ती आपला चेहरा विसरुन गेली ! याचा सूफी़ अर्थ असा की प्रकृती तिचं सजवलेलं व्यक्तीमत्व घेऊन पुरुषाला भेटायला गेली आणि त्याचा कोणताही चेहरा नसलेली अनंतता पाहून त्यातच सामावून गेली. कशामुळे? तर केवळ त्याच्या एका नजर भेटीनं !
प्रियकराशी नजर भेट काय की दिगंत आकाशाशी नजर भेट काय, अंतीम परिणाम एकच : एकरुपता!
छाप तिलक सब छीनी रे मोसे नैना मिलाइके
बात अगम केहे दीनी रे, मोसे नैना मिलाइके |
ही अगम बात दोतर्फा आहे. नजरेशी नजर मिळाल्यावर खरं तर बातच संपते, शब्दांचं कामच उरत नाही. एक अंगोपांग व्यापणारी शांतता उरते. त्या संवादाला खुसरो `अगम बात' म्हणतो ! शांततेचा शांततेशी झालेला अपूर्व संवाद.
प्रेम भटीका मधवा पिलाइके,
मतवाली कर लिनी रे, मोसे नैना मिलाइके |
नैनांशी नैन मिळायचा आवकाश, प्रेमाची मधुरता मतवाली करते. आणि ही गोष्ट सुद्धा दोन्ही प्रेमात एकसमान आहे. प्रेयसी मतवाली होते तसा साधकही मस्त होतो. ओशो म्हणतात : ` परमात्मा एक मैखाना है, जिसने उसे पिया, सदाके लिए मतवाला हो जाता है' |
गोरी गोरी बैंया, हरी हरी चुरियां
बैंया पकर हर लिनी रे, मोसे नैना मिलाइके |
प्रेयसीचे गोरे बाहू आणि हिरवा चुडा...त्यानं फक्त तिला बाहू धरुन स्वतःकडे ओढलं आणि तिच्या व्यक्तिमत्त्वाची सिमा संपली. हिरवा रंग प्रकृती दर्शवतो आणि गोरे बाहू तीच्या स्त्रीत्वाची साक्ष देतात. ज्या क्षणी प्रकृती पुरुषात मिसळते त्या क्षणी क़यामत ओढवते. एक अथांग निराकारता पुन्हा प्रकृतीच्या प्रकटीकरणाचा माहौल बनवते.
बल बल जाऊं मैं तोरे रंग रजवा
अपनीसी रंगदिनी रे, मोसे नैना मिलाइके |
प्रेयसी म्हणते, माझ्या रंगरसिया मी तुझ्यावर कुर्बान आहे कारण तुझ्या नजरेनं, तू मला तुझ्या रंगात रंगवून टाकलयंस! आध्यात्मिक अर्थानं, साधक जेंव्हा आकाशाला भेटतो तेंव्हा तो सुद्धा आकाश होऊन जातो. आकाशाचा आणि त्याचा रंग एक होतो.
खु़सरो निजा़मके बल बल जाइये
मोहे सुहागन किनी रे, मोसे नैना मिलाइके |
या ओळींना तर अनेक रंग लाभले आहेत. जी प्रेयसी स्वतःला प्रियकराप्रती समर्पित करते ती सुहागन होते. खरं तर ती स्वतःतून प्रियकराला आकारात बांधायचा प्रयत्न करते. आध्यात्मिक अर्थानं साधक स्वतःचं व्यक्तिमत्त्व संपवून, स्त्रैण अर्थानं सुहागन होतो आणि स्वतःलाच पुनर्जन्म देतो... तो द्विज होतो.
बात अगम केहे दीनी रे मोसे नैना मिलाइके |
____________________________________________________
ही अफाट रचना अबिदा परवीन आणि राहत फतेहअली खाननी अशी काय धमाल गायली आहे की तुम्ही केंव्हाही ऐका, ती तुम्हाला मस्त करेल. अबिदा स्वतः सूफी गायिका आहे आणि राहत, उस्ताद नुसरत फतेहअली खानचा पुतण्या आहे. सुफीज़ममधे प्रत्येक आवाज अल्लाचा आवाज मानला गेलायं त्यामुळे अबिदाच्या आवाजाला कसलंही बंधन नाही. तिचं गाणं संपूर्ण इश्वर शरण आहे त्यामुळे ती प्रकटीकरणाचं केवळ एक माध्यम बनून गाते. राहतचा आवाज त्याच्या नांवाला साजेसा म्हणजे हृदयाला शांत करणारा आहे. त्याच्या आवाजाचा गोडवा केवळ मिस्टिकल आहे. इस्लाममधे निराकाराला समर्पण ही एकमेव साधना मानली गेलीये. तस्मात, राहत जेंव्हा गातो तेंव्हा अनंत स्पेसमधे तो विलीन झालेला असतो, उरतो तो फक्त त्याच्या आवाजाचा गोडवा. त्यानं नुसतर साहेबांची गायकी सहीसही उचलून तिला स्वतःचा रंग देण्याचं असंभव काम केलंय.
एकीकडे अबिदाच्या खर्जाची अदिम दरी तर दुसरीकडे त्या दरीच्या अथांगतेला लिलया पार करणारं राहतच्या आवजाचं जीवघेणं चांदणं अशी ही अनोखी मैफिल जमलीये.
या दोघा दिग्गजांनी खु़सरोचा क़लाम आपल्या प्रतिभेनं रंगवलायं. त्यात नवी शायरी गुंफली आहे आणि ती सुद्धा तितकीच सहज पण दिलकश आहे.
इथे सगळी वेरिएशन्स देत नाही, तुम्हाला ती ऐकतांनाच मजा येईल पण हे एक कडवं कमाल आहे :
खुसरो रैन सुहागकी, जो मैं जागी पी के संग,
ऐसी बाजी़ प्रेमकी, जो मैं खेली पी के संग,
जीत गयी तो पिया मोरे, जो मैं हारी पी के संग |
काय कमाल अंदाज़ आहे शायरीचा. अशी सुहागरात जी मी प्रियकरा बरोबर जागवली. अशी प्रेमाची शर्त जी प्रियकराशी लावली...की मी जिंकले तर तू माझा आणि हरले तर मी तुझी!
छाप तिलक सब छीनी रे, मोसे नैना मिलाइके |
प्रतिक्रिया
8 Mar 2016 - 3:34 pm | भाऊंचे भाऊ
प्रकृती परमात्मा ओशो सूफियाना तूफानी जल्लोष विलीनता निराकार.... वावावा
8 Mar 2016 - 3:40 pm | प्रमोद देर्देकर
मी तर अबिदा परवीनच्या मन लागो यार आणि सोऊ तो सपने सुनु या गाण्यांचा पहिल्यापासुनच पंखा आहे.
त्यात हे एक सुरेख गाणे जोडले गेले. सुंदर ओळख धन्यवाद विठा सर.
9 Mar 2016 - 5:04 pm | वेल्लाभट
निगाह-ए-दरवाईशां ऐका...
रांझण ऐका...
नहीं निगाह में मंजि़ल ही फैज़ ची ग़ज़ल ऐका...
8 Mar 2016 - 4:20 pm | बोका-ए-आझम
अबिदा परवीनजी आणि राहतजी हे दोघेही महान कलाकार आहेत. एक शंका - सूफी कलाकार म्हणजे काय? हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात घराणं हा शब्द ज्या अर्थाने मांडला जातो त्या अर्थाने हा शब्द वापरलेला आहे का?
8 Mar 2016 - 8:53 pm | आदूबाळ
मला समजलेला गाण्याचा अर्थ जरा वेगळा आहे.
खुसरो म्हणजे अर्थातच अमीर खुसरो. निजाम म्हणजे निजामुद्दीन औलिया, त्यांचे गुरू. बल बल जाईये म्हणजे आयुष्य समर्पण करणे. मोहे सुहागन किनी रे, मोसे नैना मिलाइके याचा अर्थ स्पष्टच आहे.
या पार्श्वभूमीवर बाकीची कव्वाली वाचली तर तो अर्थ कदाचित उलगडेल...
9 Mar 2016 - 6:27 am | विवेक ठाकूर
ही गाण्याची खुमारी आहे आणि तो आध्यात्मिक अनुभव आहे. एका सिद्धाच्या नजरेला नजर मिळवल्याशिवाय तो येणं असंभव. कारण एकतर असा सिद्ध भेटणंच दुर्लभ, कदाचित भेटला तर त्याला सामान्य बुद्धीचे लोक ओळखणं त्याहून मुश्कील आणि इतकं होऊन त्याची मेहेर नज़र होईल तर ते अपूर्व भाग्य ! अर्थात, इथे आध्यात्मिक चर्चेचा माहौल शून्य आहे म्हणून इतकंच सांगता येईल.
त्यामुळे, अमीर खुसरोचं निजामुद्दीन औलियाप्रती समर्पण हा पहिल्या ओळीचा अर्थ योग्य असला तरी `मोहे सुहागन किनी रे ' याचा अर्थ `मोसे नैना मिलाइके' हा व्यक्तिगत अनुभव असल्याशिवाय स्पष्ट होणं केवळ अशक्य आहे .
तस्मात, `या पार्श्वभूमीवर बाकीची कव्वाली वाचली तर तो अर्थ कदाचित उलगडेल...' असं नाही.
त्यामुळे व्यक्तिगत पातळीवर साधकाची स्त्रैण चित्तदशा किंवा रिसेप्टिवीटी आणि अस्तित्त्वाच्या बाजूनं पाहिलं तर प्रकृती आणि पुरुष ही अद्वैत संरचना अशा दोन्ही अंगांनी जाणारा हा क़लाम आहे.
उदाहरणार्थ :
गोरी गोरी बैंया, हरी हरी चुरियां
बैंया पकर हर लिनी रे, मोसे नैना मिलाइके |
या ओळींचा अर्थ अमीर आणि निजामुद्दिन यांच्या संबंधांना सरळ लागू होत नाही. अर्थात, तसा तो कुठेही स्पष्टपणे काढता येणार नाही.
9 Mar 2016 - 7:34 am | आदूबाळ
अध्यात्म हे टेशन माझ्या डोक्यात लागत नाही, त्यामुळे "प्रकृती आणि पुरुष" वर काही मत नाही.
पण खुसरोची स्त्रैण चित्तदशा आणि औलियाप्रति असलेले प्रेयसीसम कोवळे भाव इतर खुसरो साहित्यातही दिसतात.
उदा० मैं तो पिया से नैना लड़ाई आयी रे पहा:
मैं तो पिया से नैना लगा आयी रे
घर नारी कँवारी कहे सो कहे
अब जो होगा सो देखेंगे
सच कहती हूँ क्या डर मोहे
प्रीत करी कि मैं चोरी करी रे
सोहनी सुरतिया मोहनी मुरतिया
मैं तो हिरदय के बीच समा आयी रे
खुसरो निजाम के बल बल जैय्ये
मैं तो अनमोल चेली कहा आई रे
मैं तो अपनी छब बना के जो पी के पास गयी
छब देखी जो पीया के मोहे अपनी भूल गयी
9 Mar 2016 - 11:25 am | विवेक ठाकूर
पण ते सूफी़ असल्यामुळे त्याला समर्पणाचा एक वेगळा अंदाज़ लाभला आहे. म्हणजे एका अर्थानं ते प्रेयसी आणि प्रियकरामधलं नातं दर्शवतं, जसं की :
बल बल जाऊं मैं तोरे रंग रजवा
अपनीसी रंगदिनी रे, मोसे नैना मिलाइके |
हा होळीचा मूड आमीर पहिल्या ओळीत रंगवतो, रंगरजवा म्हणजे वस्त्र रंगवणारा. प्रेयसी म्हणते हे रंगरजवा तू माझी वस्त्रंच काय मला सुद्धा रंगव कारण मी तुला समर्पित आहे. आणि दुसर्या ओळीत तो कमालीची उंची गाठतो, कारण रंग रजवा तिला आपला सगळा रंग देऊन, आपल्या रंगात रंगवून टाकतो.... अपनीसी रंगदिनी रे, मोसे नैना मिलाइके |
आणि दुसर्या अर्थानं ते साधक आणि गुरु यातलं नातं आहे. गुरु ही व्यक्ती नाही, स्थिती आहे. साधक जेंव्हा गुरुप्रती समर्पित होतो तेंव्हा गुरुची त्याच्यावर मेहेर नजर होते आणि तो गुरुशी एकरुप होतो. त्याची `छाप तिलक' म्हणजे व्यक्तिमत्त्व गुरु दूर करतो आणि त्याला आपल्या आकाशी रंगात रंगवून टाकतो.
प्रियकर-प्रेयसी नात्यात, प्रेयसी रंगीली होते आणि गुरु-शिष्य नात्यात, साधक मस्त होतो !
पण सगळी कमाल फक्त एका गोष्टीची असते ती म्हणजे `मोसे नैना मिलाइके |'
9 Mar 2016 - 3:23 pm | सूड
आदूदादू, विठाकाका आध्यात्मिक म्हणाले ना? मग आध्यात्मिक...फार वाद घालत बसायचं नाही. (आपला) वेळ वाया जातो... ;)
9 Mar 2016 - 3:25 pm | आदूबाळ
ते दोर मी केव्हाच कापून टाकलेत सूडरांव, हे पहा:
9 Mar 2016 - 3:35 pm | सूड
तरीही किती चिकाटीने समजवतायेत बघ की राव... =))
9 Mar 2016 - 4:41 pm | चांदणे संदीप
तत्वज्ञान....आठवल....उगीच! ;)
(स्वारी ऑल...निघतो हळुच!)
9 Mar 2016 - 4:11 pm | आनन्दा
विठांशी सहमत - बहुतांश सूफी गीते ही ईश्वराला प्रियकर मानून लिहिलेली आहेत.. असे समजा की जशी हिंदू संतपरंपरेमध्ये कृष्णाला प्रियकर कल्पून गोपीभावात जाऊन बरेच अभंग लिहिले गेले, तसेच सूफीमध्ये निराकार ईश्वराला प्रियकर कल्पून लिहिली गेली. (विठा चुकले असेल तर सुधारा)
खाली विठांनी लिहिल्याप्रमाणे या गाण्यांमध्ये समर्पणाची एक वेगळीच उंची अनुभवायला मिळते. ती व्यावहारिक जगाला लावा किंवा आध्यात्मिक जगाला, त्यातले भाव, उत्कटता, आणि आस तीच राहते.
9 Mar 2016 - 6:46 am | अभिजितमोहोळकर
हेच बोल असलेलं गाणं लता आशा ने मै तुलसी तेरे आंगन की मध्ये मस्त गायलंय. एल.पी.चा ठेकाही मस्त आहे.
9 Mar 2016 - 7:36 am | पैसा
हेच लिहायला आले होते. मैं तुलसी तेरे आंगन की १९७८ चा. म्हणजे या गाण्याला ३८ वर्षे झालीत. आबिदा परवीन आणि राहत फतेह अलीखान ची गाणी फार नंतर प्रसिद्ध झाली.
9 Mar 2016 - 11:30 am | विवेक ठाकूर
त्यामुळे मी सुरुवातीला म्हटलंय :
एखादी कलाकृती किती संभाव्यता निर्माण करु शकते यावर तिची कालातीतता ठरते.
इथे स्वतः नुसरत फतेहअलींनी ते तितकंच धमाल गायलंय :
9 Mar 2016 - 4:59 pm | जयंत कुलकर्णी
//एखादी कलाकृती किती संभाव्यता निर्माण करु शकते यावर तिची कालातीतता ठरते/////
हे जरा समजाऊन सांगता का ?
9 Mar 2016 - 5:14 pm | पैसा
उदा, राशोमान! =)) ;)
9 Mar 2016 - 8:06 pm | सूड
चुकून 'रामोशान्' वाचलं =))
10 Mar 2016 - 4:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
ते सुद्धा बरोबरच्च आसेल ! प्रत्येक उच्च-गूढ काव्याला दोन तरी अर्थ असतातच !
9 Mar 2016 - 7:19 am | अर्धवटराव
मन प्रसन्न झालं.
धन्यवाद विठासेठ.
9 Mar 2016 - 8:21 pm | मूकवाचक
उ. शुजात हुसेन खाँ:
उ. विलायत खाँ:
विलायत खाँसाहेबांचे सुरूवातीचे भाष्य आवर्जुन ऐकण्यासारखे आहे.
9 Mar 2016 - 2:42 pm | मोदक
नेहमीपेक्षा वेगळ्या विषयावर धागा आल्याचे पाहून चांगले वाटले.
मला मुजीकमधले काही कळत नाही. सुफी, शास्त्रीय, विंल्गीश संगीत म्हणजे ग्रीक, लॅटिन, हिब्रू वगैरे वाटते.
रेहमान, अजय अतुल वगैरे मंडळींची कानाला सुखद वाटणारी गाणी आवडतात. त्यातही गाण्यातले शब्द वगैरे शोधून काढून अर्थाचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे हा प्रतिसाद म्हणजे तुमच्या गाण्याच्या छंदाचे कौतुक समजावे. :)
अध्यात्म वगैरे गोष्टी बाजुला ठेवून असलेच धागे काढावेत ही नम्र विनंती.
9 Mar 2016 - 4:16 pm | आनन्दा
सहमत.. विठा तुमचा सूफी वर अभ्यास असेल तर जरा "चढता सुरज" वर पण एक धागा काढा ना.. त्या गाण्याचे रसग्रहण करायची खूप इच्छा आहे. अर्थात ते गाणे सुफी आहे का हे माहीत नाही. पण माझ्या सार्वकालीन फेव्हरेट मध्ये तेआहेच आहे. https://www.youtube.com/watch?v=duFDy6Rwq9Q
9 Mar 2016 - 4:11 pm | राही
या सुंदर रसास्वादात्मक धाग्यावर काही लिहू जाणे म्हणजे नसते साहस. तरी माझे दोन शब्द. ईश्वराला प्रियकर आणि आपण स्वतः प्रेयसी असे कल्पून केलेल्या भक्तीला मधुरा भक्ती असे नाव आहे. ज्ञानेश्वरांच्या विराण्या याच प्रकारात मोडतात. अशा कवनांतून नेहमी 'पिया मिलन की आस' अगदी आर्तपणे व्यक्त होत असते. आणि ही विरहाची रात्र (शबाने हिजरा) प्रदीर्घ असते, अगदी मोकळ्या लांबसडक केसांसारखी प्रदीर्घ (दराज़े चुं ज़ुल्फ) आणि मिलनाचा दिवस (रोज़े वस्लत) मात्र क्षणभंगुर आयुष्यासारखा छोटा.(चुं उम्र कोता).पण हे क्षणभराचे मिलन देखील भक्ताला कायमचे 'परिणीता' बनवते. त्याचे कुँवारपण हरपते. कायिक अनुभव कितीतरी मोठ्या उंचीवर नेऊन ठेवला आहे येथे. (आमीर खुस्रोच्याच ज़ेहाले मिस्किन मकुम तगफुल मधलेच हे शब्द. कवी एकच आहे म्हणून थोडे अवांतर केले.)
अगम बात म्हणजे आगमविषयक ज्ञान असे असावे. निगम म्हणजे श्रुती. आगम म्हणजे पूर्वापार चालत आलेले, इष्टदेवतेच्या संकल्पनेमागचे तत्त्वज्ञान, साधना व पूजाविधी यांबद्दल मार्गदर्शन करणारे ग्रंथ. हे ज्ञान साधारणतः दोन सहस्रकांच्या संधिकालात संकलित केले गेले. आमीर खुस्रोच्या जीवन काळाच्या थोडेसेच आधी ते ग्रंथरूप पावून बर्यापैकी प्रसृत झाले होते.
विठांचे असे रसग्रहणात्मक लेख अतिशय आवडतात.
9 Mar 2016 - 6:50 pm | राही
कायिक अनुभव कायाविरहित अशा कितीतरी उच्च अनुभवपातळीवर नेऊन ठेवला आहे असे म्हणायचे होते.
9 Mar 2016 - 7:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विठांचे असे रसग्रहणात्मक लेख अतिशय आवडतात.
असेच म्हणतो.
-दिलीप बिरुटे
10 Mar 2016 - 12:00 am | अर्धवटराव
तुकारामंचा "राजस सुकुमार मदनाचा पुतळा" पण असाच.
10 Mar 2016 - 4:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१
10 Mar 2016 - 6:37 pm | विवेक ठाकूर
राहीजी, तुमच्या व्यासंगी प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
शब्द केवळ निर्देश आहेत, अनुभव नाही. त्यामुळे अर्थ लावण्यासाठी शब्दकोषापेक्षा अनुभव हवा. शब्द अनुभवाच्या पश्चात आहे. शब्दांचे रुढार्थ मला अनेक वेळा तितकेसे माहित नसतात, मी अनुभवानं अर्थ विशद करतो. त्या काव्याच्या भावविश्वात, त्या माहौलमधे उतरुन लिहीतो.
अगम बात ही खरं तर बात नाहीच, ती शब्द उमटण्यापूर्वीची शांतता आहे. एकदा शब्द उच्चारला की तत्क्षणी मनाचा आयाम सुरु होतो. अर्थांचं द्वंद्व सुरु होतं. शांतता एकसंध आहे. शब्द शिकायला लागतो, शांतता शिकता येत नाही. ती काहीही केलं नाही तरी आहे आणि काहीही केलं तरी तशीच राहील. ते आपलं स्वरुप आहे. म्हणून खुसरो म्हणतो :
बात अगम केहे दीनी रे, मोसे नैना मिलाइके |
य `अगम'ला सुद्धा किती सुरेख रंग आहेत. अगम म्हणजे :
१) : जो न चले।
शब्द प्रवाही आहे. शांतता कुठेही जात येत नाही. ती सतत तुमच्या समवेत आहे.
२) जो जल्दी समझ में न आवें।
`अगम बात' संवादातून कशी कळेल? म्हणून तर खुसरो म्हणतो .... मोसे नैना मिलाइके !
३) जो जल्दी प्राप्त न हो सके।
म्हणून तर गुरुची नज़र भेट व्हायला हवी. हा खुसरोचा सारा क़लाम तेच तर सांगतोयं.
४) जिसकी थाह न मिले।
शांततेचा अंत कसा शोधणार ? जिला सुरुवातच नाही तिला अंत कसा असेल?
५) जहाँ कोई पहुँच न सके।
म्हणून तर ओशोंनी म्हटलंय `पहुंचना हो तो रुको !' या ठहरावात ती अगम बात आहे. ती कोणत्याही ग्रंथात बद्ध होऊ शकत नाही कारण ती शब्दपूर्व आहे.
10 Mar 2016 - 6:47 pm | भाऊंचे भाऊ
शब्द निर्देश अनुभवाचा करतात भलेही अनुभव शब्दाच्या कक्षेत कधीही नसतो. याची सांगड़ आपण सत्याचा, अध्यात्माचा ओशोचा निर्देश करता पण हे आपल्या (निर्देशाच्या) कक्षेत नाहीत असेच व्यक्त होते ना ?
10 Mar 2016 - 6:58 pm | विवेक ठाकूर
तस्मात, तो कक्षेत आहे. शब्द म्हणजे अनुभव नाही हा मुद्दा आहे.
इथे `अगम बात' कडे केवळ निर्देश होऊ शकतो. ज्याला ती कळली, ज्याचा ती अनुभव झाली, तो अमीर खुसरोसारखी प्रतिभा असेल तर ती व्यक्त करेल, तिच्याकडे निर्देश करेल. पण अनुभव नेहेमी शब्दाला पार करुन जातो.
11 Mar 2016 - 2:10 pm | भाऊंचे भाऊ
दुर्दैवाने अनुभवी लोकांची कमी अन प्रतिभावान लोकांची चलती मात्र खुप आहे त्यातला कोणीही अनुभवी म्हणून खपून जातो कारण शब्द प्रतिभेचे रखेल असल्याने ते अनुभवाचा भास फार सुरेख रचतात अन लोकांना मुळातच प्रतिभेत अडकायाची सवय असल्याने अनुभव दुर्लक्षिला जातो...
मला एक विचार कायम पडतो आपला फेवरिट फेवरिट प्रवचनकार जे विवेचन ज्ञानेश्वारिचे करतो ते नेमकं असतं ? की आज प्रत्यक्ष जन्मुन ज्ञानेश्वर समोर आल्यास त्यात भेद असेल ? प्रत्यक्ष शुकाचार्य तीच भागवत कथा सानग्तिल जो अर्थ आवडते कथाकार सांगतात ? आज गीतेचा नेमका अर्थ श्रीकृष्ण तोच सांगेल जो आपल्या गुरुकडून आपण घोकलाय ? अथवा खुसरो उद्या मिपावर आला तर नेमका हां धागा असाच लिहेल जी शब्दयोजना तुम्ही करून त्याच्या अनुभवाकडे तुम्ही निर्देश करत आहात की तो म्हणेल अजुन काही वेगळेच आणि तुम्हाला सुनावेल हाय कंबख्त तूने तो पिच नई ?
11 Mar 2016 - 2:13 pm | भाऊंचे भाऊ
तुमचे अनुभव व्यक्त करताना तुम्हाला इतरांच्या शब्दांचा आधार घेताल्यावरच वाहवा का भेटते ?
11 Mar 2016 - 3:36 pm | विवेक ठाकूर
लोकांना मुळातच प्रतिभेत अडकायाची सवय असल्याने अनुभव दुर्लक्षिला जातो...
बरोबर.
खुसरो उद्या मिपावर आला तर नेमका हां धागा असाच लिहेल जी शब्दयोजना तुम्ही करून त्याच्या अनुभवाकडे तुम्ही निर्देश करत आहात की तो म्हणेल अजुन काही वेगळेच आणि तुम्हाला सुनावेल हाय कंबख्त तूने तो पिच नई ?
सत्य एकच आहे. किंवा खुसरोचा शब्द घ्यायचा तर `अगम बात' एकच आहे. आणि ती शांतता आहे. तस्मात, ज्यांना ती कळली त्यांचे अभिव्यक्तीचे ढंग वेगळे असतील पण निर्देश एकाच सत्याकडे असेल. उदाहरणार्थ, बुद्ध त्याला शून्य म्हणेल किंवा उपनिषदं त्याचा उदघोष ॐ शांती:, शांती: शांती: असा करतील किंवा तिला पूर्ण म्हणतील किंवा अनिर्वचनीय म्हणतील. पण शेवटी निर्देश एकाच सत्याकडे असेल.
तुमचे अनुभव व्यक्त करताना तुम्हाला इतरांच्या शब्दांचा आधार घेताल्यावरच वाहवा का भेटते ?
शब्दावर कुणाची मालकी नसते.
15 Mar 2016 - 12:18 pm | भाऊंचे भाऊ
तरीही आपण ते उधार का घेता ?
10 Mar 2016 - 11:37 pm | राही
अगम-निगम हे शब्द अनेकदा भजना-अभंगांतून येतात. 'गुरुभजनाचा महिमा न कळे अगमानिगमासी', किंवा 'कहत कबीरा सुन भई साधो, जाइ अगम की बानी रे' अशी अनेक उदाहरणे देता येतील. आगम-निगमज्ञानापेक्षाही गुरुभजनाचा महीमा श्रेष्ठ या अर्थाने, आणि उलटही म्हणजे अगमवाणी होते आहे, ऐकू येते आहे, ती ऐका अशा यौगिक अनुभवासाठीही हे शब्द वापरले गेले आहेत. अभंग, संतसाहित्यात येणारा अगम हा शब्द 'आगम'पासून आला आहे असे मानतात आणि त्याचा अर्थ 'आपल्याकडे (परंपरेने चालत) आलेले (ज्ञान) असा धरतात.
पण अर्थात आपण म्हणता तसाच अर्थ असणार.
11 Mar 2016 - 2:31 pm | sagarpdy
मस्त लेख आणि चर्चा. चांगली माहिती मिळाली.
15 Mar 2016 - 12:06 pm | कंजूस
माझ्याकडे एक असंच छापातिलक गाणं रेकॅार्डिंग केलेलं आहे.पुजा गायतोंडेने गायलेलं आहे.युट्युबवर नसेल तर देतो.कानाला बरं वाटलं म्हणून ठेवलंय.