बार्बारोसा अर्थात रशियन आघाडीवरचे युद्ध... भाग - ४

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
29 Feb 2016 - 12:56 pm

बार्बारोसा अर्थात रशियन आघाडीवरचे युद्ध... भाग - १
बार्बारोसा अर्थात रशियन आघाडीवरचे युद्ध... भाग - २
बार्बारोसा अर्थात रशियन आघाडीवरचे युद्ध... भाग - ३

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
.... आता धोका फक्त गॉमेल येथे असणाऱ्या रशियन सैन्याचा होता. मॉस्कोवर हल्ला चढविण्यापूर्वी २१ ऑगस्टला गॉमेलच्या रशियन सैन्याचा समाचार घेण्याचा त्याचा विचार होता.
यावेळी एक अतर्क्य गोष्ट घडली....

बार्बारोसा अर्थात रशियन आघाडीवरचे युद्ध... भाग - ४

हिटलर कडून मॉस्कोवरील हल्ला रोखण्याचा आदेश आला. त्याला म्हणे मॉस्कोचा समाचार नंतर घ्यायचा होता. त्या आदेशात असेही म्हटले होते की आर्मी ग्रुप सेंटरचे सर्व सैन्य हे दक्षिणेला वळवावे. खोलवर मुसंडी मारुन त्यांनी युक्रेन व क्रिमिया काबीज करावे.

अर्थात नेहमीप्रमाणे या आदेशाचे समर्थन करण्यासाठी हिटलरने अनेक कारणे दिली. त्याच्या विरुद्ध बोलण्याची पद्धतच नव्हती.
आर्मी ग्रुप सेंटरचा प्रमुख जनरल फेडॉर फॉन बॉक याने त्याच्या युद्धाच्या नोंदीत जे लिहिले आहे त्यावरून हिटलरने मॉस्कोवर धडक मारण्याचा निर्णय बदलण्यात किती महत्वाची भूमिका बजावली होती हे लक्षात येते. हिटलरच्या या विचाराचा अंदाज जेव्हा जनरल क्लूग आणि जनरल बॉक हे एका जेवणासाठी भेटले त्या दिवशी म्हणजे २८ जुलैला आला. त्याच दिवशी हिटलरचा एक श्मंट नावाचा सहाय्यक नॉव्ही बॉरिसॉव्ह येथे जनरल बॉकच्या कार्यालयात आला आणि त्याने जनरल बॉकला हिटलरचे विचार ऐकवले.

‘‘ सगळ्यात महत्वाचे होते लेनिनग्राडचा मुलूख नष्ट करणे. त्याखालोखाल डॉनेटस् बेसीन जेथून रशियाला कच्च्या मालाचा पुरवठा होतो ते नष्ट करायचे होते. त्याने पुढे असेही सांगितले की फ्यूररला मॉस्कोचे एवढे महत्व वाटत नाही व गोमेल येथील रशियाचे सैन्य पूर्णपणे नष्ट करणे पुढच्या मोहिमेसाठी अत्यंत आवश्यक आहे असे त्याचे मत आहे.’’

जनरल बॉकची अपेक्षित प्रतिक्रिया आली ‘‘हा विचार हिटलरच्या आदेश क्रमांक २१ शी विसंगत आहे.’ खरे तर हा आदेशच परस्परविरोधी आज्ञांनी भरलेला होता. यात मॉस्कोला लवकर पोहोचणे आणि डॉनेटस्ला सारखेच महत्व दिले होते.
आठवड्यानंतर हिटलर स्वत: नॉव्ही बॉरिसॉव्ह येथे अवतीर्ण झाला आणि म्हणाला
‘‘ क्रिमिया प्रथम काबीज केले पाहिजे नाहीतर तेथून रशिया रुमानियाच्या तेलक्षेत्रांवर लक्ष ठेवू शकतो.’’

त्याने जगाने कधीही न पाहिलेल्या आत्तापर्यंतच्या विजयासाठी जनरल बॉकचे अभिनंदन केले खरे पण जनरल बॉक ही बैठक संपल्यावर म्हणाला, ‘‘असे वाटते की बार्बारोसा आता पुढे कसे न्यायचे याविषयी तोच अनभिज्ञ आहे.’

दुसऱ्या पँझर ग्रुपचा कमांडर हाईन्झ गुडेरियन आणि तिसऱ्या पँझर ग्रुपचा कमांडर जनरल हॉथ या दोघांच्याही रणगाडा दलाने प्रचंड वेगाने हालचाली केल्यामुळे त्यांना आता विश्रांती आणि देखभालीची आवश्यकता होती. तशी त्यांनी विनंती केल्यावर ती हिटलरने मान्य केली. हिटलरने त्यानंतर पूर्वदिशेला आक्रमणाची कल्पना मांडली जी जनरल बॉकने लगेचच उचलून धरली कारण त्याला असे वाटत होते की येथे रशियाचे सर्व सैन्य एकवटले होते आणि हे युद्ध कार्ल फॉन क्लाऊजविट्झच्या सिद्धांताप्रमाणे निर्णायक असेल. दुर्दैवाने हाही समज चुकीचा होता.

कार्ल फॉन क्लाऊजविट्झ
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

१९ व्या शतकातील (१८२७) लष्करी डावपेचांचा सैंद्धांतिक कार्ल फॉन क्लाऊजविट्झ हा जर्मनीच्या उच्चस्तरीय समादेश (हाय कमांड) चा गुरू समजला जाई पण जर्मन सेनाधिकाऱ्यांनी त्याच्या डावपेचांचा सखोल अभ्यास केला होता का नाही याची शंका आहे. जनरल क्लाईस्ट्च्या मते ‘नाही.’ इतिहासकार लिडेल हार्ट याच्याशी नंतर बोलताना जनरल क्लाईस्ट म्हणाला,
‘‘त्याच्या सिद्धांताकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्याची वचने उद्धृत करण्यात येत असत पण त्यांचा खरा अभ्यास कोणीही केला नव्हता. त्याला पुस्तकातील किडा समजून सोयिस्कररित्या त्याच्या सिद्धांतांचा युद्धात वापर करणे शक्य आहे हे विसरण्यात आले.’’

क्लाईस्टच्या मते जनरल श्लिफेनच्या प्रबंधांकडे जास्त लक्ष पुरविण्यात आले.

जनरल श्लिफेन
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

हे हिटलरच्या बाबतीत तंतोतंत खरे होते. क्लाऊजविट्झच्या वचनांप्रमाणे ‘युद्ध हे राजकारणाचाच पुढचा अंक असतो फक्त त्याची साधने वेगळी असतात.’ क्लाईस्टच्या म्हणण्यानुसार नाझींच्या कारकिर्दीत ‘आम्ही क्लाउजविट्झच्या वचनाचा वेगळा अर्थ लावला. आम्ही युद्धनाट्याचा पुढचा अंक शांतता असायला पाहिजे असे धरून चाललो होतो.’ उदा. ग्रेट ब्रिटनने जर्मनीचे सगळे विजय पाहून तहाला तयार व्हावे अशी हिटलरची प्रामाणिक इच्छा होती. क्लाऊजविट्झने रशियावरील आक्रमणातील धोक्यांचा त्याच्या काळातच इशारा दिला होता. त्याने स्वत: नेपोलियनच्या सैन्याला रशियातून माघार घेताना भोगायला लागलेली घोर शिक्षा पाहिली होती. पण त्याच्या या इशाऱ्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले. याच थोर युद्धव्यूहनीतितज्ञाने त्याच्या इंटरडिपेंडन्स ऑफ एलिमेंटस् ऑफ वॉर या पुस्तकात, त्याने युद्धामधील सर्व घटक एकामेकांवर कसे अवलंबून असतात याची चर्चा केली आहे. त्यात तो म्हणतो,

‘‘सर्वंकष महायुद्धाच्या संकल्पनेमधे लढाया अटळ आहेत आणि त्यातील घटक युद्धांच्या विजयाला सर्वंकष विजयाच्या दृष्टिकोनातूनच पहायला पाहिजे. नेपोलियनने १८१२ साली मॉस्को आणि जवळ जवळ अर्धा रशिया जिंकले होते. जर फायद्याचा तह करून शांतता प्रस्थापित करायची हे त्याचे ध्येय होते तर ती प्रस्थापित झाली नव्हती आणि हे नेपोलियनला मुळीच फायद्याचे नव्हते. हे प्रदेश जिंकणे व हे विजय त्याच्या डावपेचांचा एक भाग होता पण रशियाचे सैन्य अजून शाबूत होते. हे सैन्यही जर नष्ट करण्यात त्याला इतर विजयांबरोबर यश आले असते तर मात्र त्याचे शेवटचे उद्दिष्ट पार पडले असते. पण त्याला उशीर झाला आणि त्याची संधी गेली. थोडक्यात पहिल्यांदा जे यश मिळते त्याने मूळ उद्दिष्ट जर साध्य झाले नाही तर त्या मोहिमेचा सत्यानाशच होणार हे निश्चित झाले.’’

क्लाउजविट्झच्या सिद्धांताने हा एक महत्वाचा इशारा दिला होता पण त्यावेळी (१९४१-१९४२) या इशाऱ्यावर कोणीही बोलले नाही अगदी क्लाईस्टही.

मला विस्मय वाटतो, त्याकाळी म्हणजे १८२७ साली या कार्ल फॉन क्लाऊजविट्झने थेअरी ऑफ कन्स्ट्रेंटचा सिद्धांत वेगळ्या शब्दात मांडला होता. अर्थात त्याचा वापर त्याने युद्धनीतिमधे केला होता. हा माझा एक अत्यंत आवडता युद्धनीतितज्ञ आहे. मला तरी त्याने लिहिलेले ७५ % टक्के तरी पटते. उरलेले २५ % पटत नाही कारण ते युरोपच्या भुमीला जास्त लागू होते.
टीओसी काय म्हणते ते बघुया...

प्रत्येक प्रणालीला/संस्थेला/पद्धतीला एक ध्येय असते व ते गाठण्यासाठी काही आवश्यक अटींची पुर्तता करावी लागते. पण दुर्दैवाने अनेक ठिकाणी आपण बघतो की त्यात भाग घेण्याऱ्या सर्वांना मान्य असे ठाम ध्येय ठरविले जात नाही....किंवा ध्येय ठरविलेले असले तरीही ते गाठण्यासाठी आवश्यक असलेल्या पूर्वअटी पुऱ्या केलेल्या नसतात...

स्थानिक कार्यक्षमता (येथे तात्कालिक विजय) ही त्या प्रणालिची कार्यक्षमता (पूर्ण विजय) नसते. हे फार महत्वाचे आहे. संस्थेच्या एकदोन विभागांच्या कार्यक्षमतेची बेरीज म्हणजे संस्थेची कार्यक्षमता नसते.

एखाद्या साखळीची ताकद ही त्या साखळीतील सर्वात कमकुवत साखळी इतकीच असते. उदा. येथे नंतर जर्मन सैन्याला पुरवठा करणारी प्रणाली कमालिची लांबली गेल्यामुळे तुटली व लाखो जर्मन सैनिक ठार झाले...

मला वाटते, युद्धाचा, त्याच्या पुरवठ्याचा, युद्धव्युहाचा थेअरी ऑफ कन्स्ट्रेंटप्रमाणे अभ्यास करणे हा डॉक्टरेटसाठी एक चांगला विषय होऊ शकेल व त्याचा आपल्या सैन्यदलाला चांगला फायदा होऊ शकेल. ‘‘थेअरी ऑफ कन्स्ट्रेंट अप्लाईड टू वॉर अँड स्ट्रॅटेजीज’’ असा विषय होऊ शकतो. असो. हे जरा अवांतर झाले खरे, पण हा विचार माझ्या मनात बराच काळ घोळत होता. मी टीओसी मराठीत नीट मांडू शकलो नसेल पण ते सैन्याला व युद्धाला लागू करता येईल याबद्दल माझ्या मनात कसलीही शंका नाही. टीओसीमधे असलेल्या पाच पायऱ्यांनी (स्टेप्स्) अडचणींवर मातही करता येऊ शकते.

मॉस्कोवर चढाई करण्याच्या प्राथमिकतेवर हिटलरच्या मनात शंकाच शंका होत्या. त्याच्या डोक्यात मॉस्कोपेक्षा महत्वाची (त्याच्या मताप्रमाणे) लक्ष्ये होती. त्याचे म्हणणे होते ,
‘‘आधुनिक युद्धे ही शेवटी अर्थशास्त्रावर आधारित आहेत व त्यात अर्थशास्त्राला जास्त महत्व द्यायला हवे याबद्दल माझ्या मनात शंका नाही.’’ आता या विचारातील विरोधाभास बघा. एकीकडे ब्लिट्झक्रीगने झपाट्याने विजय मिळवण्यासाठी त्याप्रकारची सैन्य दले तयार केली गेली तर हिटलर आर्थिक गळचेपी करुन विजय मिळविण्याचा प्रयत्न करीत होता. म्हणजेच सर्वांचे ध्येय/मार्ग एकच नव्हते.

युक्रेनमधून अन्नधान्य, कॉकेशसमधून तेल आणि डॉनेटस् प्रांतातून कोळसा घेऊन स्टॅलिनला अडचणीत आणायचे या कल्पनेने त्याने मॉस्कोवर धडक न मारण्याचा निर्णय घेऊन मोठीच चूक केली. त्याऐवजी त्याने दक्षिणेकडे किव्हला मोर्चा वळविला. त्याच्या लष्करी मुख्यालयातील जे अधिकारी क्लाऊजविट्झच्या युद्धनीतिवर विश्वास ठेवत त्यांना रशियाच्या सैन्याचा प्रथम नाश करून लवकरात लवकर मॉस्को ताब्यात घ्यायचे होते पण शेवटी हिटलरच्या अर्थशास्त्रावर आधारित युद्धनीतिचा विजय झाला. या विविध उद्दिष्टांवर लक्ष केंद्रीत केल्यामुळे त्याची सेना आता विखुरली गेली आणि मॉस्को काबीज करण्याची त्याची संधी हातची गेली. अर्थात हे त्याला त्यावेळी उमगले नव्हते कारण हे सगळे करूनही हिवाळ्याच्या आत मॉस्को ताब्यात येईल अशी त्याला खात्री होती. पण त्याने हे लक्षात घेतले नव्हते की मॉस्को हे उत्तर-दक्षिण वाहतुकीचे मुख्य केंद्र आणि उत्पादन क्षेत्रही होते आणि मॉस्को घेतले असते तर रशियन सैन्याचे मनोबल निश्चितच तुटले असते.

ऑगस्टमधे हिटलरने त्याचा अजून एक आदेश जारी केला. त्यात तो म्हणतो –
‘ लष्कराची मॉस्कोवर लक्ष केंद्रीत करण्याची सूचना ही माझ्या योजनेशी सुसंगत नाही...... मी खालील आज्ञा देत आहे...............हिवाळ्याआधी सगळ्यात महत्वाचे उद्दिष्ट मॉस्को ताब्यात घेणे हे नसून क्रिमिया, डोनेटस् विभागातील कोळशाच्या खाणी व कॉकेशसची तेलक्षेत्रे काबीज करणे हे आहे. उत्तरेला आपल्या सेनेने लेनिनग्राडला वेढा घालून फिनलँडच्या सेनेशी हातमिळवणी करावी.’ त्याने आर्मी ग्रुप नॉर्थचेही उद्दिष्ट बदलले.

हिटलरने केलेले हे बदल जर्मन सैन्यात बऱ्याच जणांना मान्य नव्हते पण उघडपणे बोलण्याची कोणाची ताकद नव्हती. उदा. जनरल हाल्डरच्या मते या आदेशामुळे या मोहिमेचा निकाल काय लागणार आहे हे स्पष्ट झाले. दुसऱ्याच दिवशी ओ.के.डब्ल्युमधून जनरल बॉकला आदेश मिळाला. ‘‘फ्यूररच्या आज्ञेनुसार दुसरी आर्मी आणि गुडेरियनच्या ग्रुपचा मोठा भाग दक्षिणेला हलवावा. पूर्वेला माघार घेणाऱ्या शत्रूच्या सैन्याला अटकाव करून आर्मी ग्रुप साऊथच्या सैन्याला नाईपर नदी पार करण्यास मदत करावी.’’

जनरल बॉकने लगेचच जनरल ब्रॉफिचजवळ दूरध्वनीवर हा निर्णय शहाणपणाचा आहे का अशी शंका प्रदर्शित केली. पण ते त्याने अर्थात स्पष्टपणे सांगितले नसणार कारण त्याच दिवशी ब्रॉफिच कोणाशी तरी बोलताना म्हणाला ‘‘बॉक ही योजना ठीक आहे असे म्हणाला.’’ मात्र बॉकने जनरल हाल्डरकडे फोनवर निषेध नोंदवला ‘‘ही नवी मोहीम दुर्दैवी आहे. यात मॉस्को महत्वाचे नाही एवढेच काय ते सांगितले आहे. मला माझ्यासमोर असलेले शत्रूचे सैन्य नष्ट करायचे आहे. दक्षिणेची मोहीम जरी मोठी असली तरी ती दुय्यम स्वरूपाची आहे. ही मोहीम अमलात आणली तर या मोहिमेचे मूळ उद्दिष्ट, जे रशियन सैन्य हिवाळ्याच्या आत नष्ट करायचे आहे त्यालाच सुरुंग लागेल.’’

त्याच दिवशी तो आदेश काहीही बदल न होता तसाच आला आणि बॉकने हाल्डरकडे परत निषेध नोंदवला ‘यातून काही चांगले निष्पन्न होणार नाही.’

जनरल गुडेरियनने व हाल्डरने हिटलरला भेटण्यासाठी विमानाने प्रस्थान ठेवले पण तेथे पोहोचल्यावर बाहेरच ब्रॉफिचने त्याचे स्वागत केले ‘सगळे ठरलेले आहे. आता चर्चा करण्यात काही अर्थ नाही.’ जनरल गुडेरियनने शेवटचा प्रयत्न म्हणून हिटलरला युद्धभूमिवर काय परिस्थिती आहे हे समजावून सांगितले राजिनाम्याची धमकीही दिली पण हिटलरने दक्षिणेचे युद्ध कसे निर्णायक असणार आहे हे समजावून सांगितल्यावर मात्र तो हिटलरला म्हणाला (ज्याचा बॉकला धक्का बसला) ‘२४ - पँझर कोअर आणि इतर चिलखती दले या मोहिमेसाठी केव्हाही तयार आहेत.’

हिटलरच्या ओ.के.डब्ल्यूच्या तुलनेत व्यापक व्यूहरचनेची आखणी करण्यासाठी दोस्त राष्ट्रांनी राबवलेल्या समितीची व्यवस्था सर्वोत्तम होती. यात काही दुर्गुण होते, नाही असे नाही. उदाहरणार्थ यात मोठमोठ्या चर्चेमधे फार वेळ जायचा आणि मतभेद तीव्र असायचे. हिटलरच्या येथे वेगळी पद्धत होती. सर्व सेनाधिकारी आपापली मते हिटलरला सांगायचे (जो ती ऐकत नसे) आणि शेवटी निर्णय वेगळाच असायचा. या पद्धतीपेक्षा दोस्तराष्ट्रांची पद्धत श्रेष्ठ होती असे म्हणावे लागेल.

जनरल बॉकची मॉस्को काबीज करणारा सेनाधिकारी अशी त्याची नोंद इतिहासात व्हावी अशी महत्वाकांक्षा होती. (दोस्तांच्या सैन्यातही जनरल्समधे अशा व्यक्तिगत महत्वाकांक्षा असायच्या व त्यासाठी ते कुठल्याही थराला जात याचे पुरावे उपलब्ध आहेत.) गुडेरियनची मोठी फौज त्याच्या मोहिमेतून दक्षिणेकडे वळविल्यास ते शक्यच नव्हते. त्याने २४ ऑगस्टला ओ. के डब्ल्युबद्दल लिहिताना नोंद केली ‘त्यांना, मला वाटते हिवाळ्याअगोदर रशियाचे सैन्य नष्ट करण्यात आता रस उरलेला नाही.’ पुढे तो म्हणतो, ‘ज्या उद्दिष्टासाठी मी जिवाचे रान करत होतो, रशियाच्या सैनिकी ताकदीचा नाश हे जे आमचे पहिले उद्दिष्ट होते तेच आता उरले नाही.’

हिटलरने त्याच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आणि तो म्हणजे त्याच्या लष्करातील अनुभवी व्यावसायिक सेनाधिकाऱ्यांच्या सल्ल्याविरुद्ध जायचे. पण त्याच्या या निर्णयामुळे दुसरे महायुद्ध लवकर संपले. ते जर त्याच्या व्यावसायिक सेनाधिकाऱ्यांच्या हातात असते तर ते अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने व अधिक कडवेपणाने लढले गेले असते.

जनरल गुडेरियनने नऊ पँझर डिव्हिजन आघाडीवर असलेल्या येल्नाच्या संरक्षणासाठी ठेऊन उरलेले सैन्य ९० अंशात वळवून दक्षिणेकडे कूच केले. गुडेरियनचे हे सैन्य मार्शल बुडेन्नीच्या दहा लाख सैन्यावर कोसळले. जनरल क्लिस्ट व जनरल राईशनाऊच्या फौजांनी या रशियन सैन्याला अगोदरच सतावले होते. या रशियन तुकड्या व पाचवी आर्मी गोमेलजवळ एकवटल्या.

गुडेरियनच्या या अचानक बदललेल्या दिशेने रशियन चमकले. कारण १० ऑगस्टला स्विट्झरलँडमधे असलेल्या त्याच्या एका अत्यंत कार्यक्षम व विश्वासू गुप्तहेराकडून स्टॅलिनला असा अहवाल मिळाला होता की जर्मन सैन्य (ाअर्मी ग्रुप सेंट्रल) मॉस्कोवर हल्ला चढविणार आहे. अर्थातच हा अहवाल खरा होता. खुद्द जर्मन सैन्याच्या मुख्यालयालाच हिटलरची योजना माहीत नव्हती. या अहवालामुळे स्टॅलिनने जनरल येर्मेंकोला मॉस्कोला जाणाऱ्या रस्त्यांवर सैन्य एकवटण्यास सांगितले होते पण हे भलतेच झाले. गुडेरियनचे रणगाडे आता डेस्नाच्या दिशेने पळू लागले. त्यांना किव्हच्या आसपास असलेल्या जनरल बुडेन्नीच्या सैन्याचा फडशा पाडायचा होता. त्या जंगली प्रदेशातून जर्मन सैन्य रशियन पाचव्या आर्मीच्या मागे उतरले. या प्रकाराने आश्चर्यचकित झालेल्या स्टॅलिनने युक्रेनच्या उत्तरेला मॉस्कोच्या रक्षणासाठी दोन आर्मी तैनात करण्याचा आदेश काढला.

इकडे फिल्ड मार्शल रुनस्टेडचा आर्मीग्रुप साऊथही या मोहिमेत सामील झाला. वेगवान रणगाड्यांनी वेगवान हालचाली करुन शत्रूच्या सैन्याला वेढा घालण्याचे या सेनानींचे कौशल्य वादातीत होते. येथेही क्लिस्टचा पँझर ग्रुप नाईपरच्या खालच्या बाजूस ती नदी पार करुन, उत्तरेकडे वळून गुडेरियनच्या फौजांना मिळणार होती. हे असे झाल्यावर रशियाची पाचवी आर्मी वेढ्यात सापडून नष्ट झाली असती व युक्रेन व डॉनेटचे सुपीक खोरे जर्मनीच्या ताब्यात आले असते. हिटलरला हेच पाहिजे होते.

क्लिस्टकडे फक्त ६०० रणगाडे होते तरीही त्याला नाईपरवर पोहोचण्यास १० सप्टेंबर उजाडला. मुसळधार, आंधळे करणाऱ्या पावसात त्यांनी दुसऱ्या दिवशी क्रेमेन्चुग येथे नदी पार केली. रशियाच्या अडतिसाव्या आर्मीच्या मधून या सैन्याने गुडेरियनच्या तिसऱ्या पँझर डिव्हिजनशी हात मिळवणी केली आणि वेढा पूर्ण झाला. जनरल बुडेन्नीचे सैन्य या वेढ्यात अचूक अडकले. स्टॅलिनने त्याला माघार घेण्याची परवानगी नाकारली त्यामुळे अडकलेल्या रशियन सैनिकांची कत्तल झाली. हे युद्ध म्हणजे संगिनींविरुद्ध रणगाडे असे झाले. रशियन सैनिकांनी फार म्हणजे फारच कडवेपणाने प्रतिकार केला. पाच दिवस आणि पाच रात्री हे एकतर्फी युद्ध चालले आणि त्यात लाखो रशियन सैनिक धारातिर्थी पडले किंवा कैद झाले. २६ सप्टेंबरला सगळे संपलेले होते. किव्ह पडले. युद्धांच्या इतिहासात सगळ्यात भिषण कत्तली या युद्धात झाल्या असे मानले जाते.

रशियन सैनिकांचे जर्मन सैन्याला शरण जाण्याचे प्रकार थांबविण्यासाठी धमक्यांचाही वापर करण्यात आला. जुलै २८ ला स्टॅलिनने त्याचा आदेश क्रमांक २२७ जो ‘एकही पाऊल मागे नाही’या नावाने प्रसिद्ध आहे, त्यात जो शरणागती पत्करेल त्याला देशद्रोही ठरविण्यात येईल व त्याच्या कुटुंबियांना तुरूंगात टाकण्यात येईल अशी धमकी देण्यात आली होती. या आदेशातून स्टॅलिनचा मुलगा व त्याचे कुटुंबीयही सुटले नाहीत. त्याचा मुलगा ले. याकोव्ह जुगाशव्हिली हा १४ आर्मर्ड डिव्हिजनमधे होता व जुलैच्या मध्यास व्हिटेब येथे युद्धकैदी झाला. त्याच्याही बायकोला दोन वर्षे तुरूंगात सक्तमजुरी करावी लागली व या याकोव्हलाही १९४३ मधे युद्धकैद्यांच्या तुरूंगाच्या तारांजवळ आल्यामुळे तेथील सुरक्षा सैनिकांनी गोळी घातली.

स्टॅलिनच्या विरोधात खदखदणाऱ्या असंतोषाचा फायदा हिटलरला उठवता आला नाही. तो जर उठवला असता तर पोलंड, युक्रेन व बाल्टिक प्रदेशातील नागरीक जर्मन सैन्याकडे त्यांचे मुक्तीदाते म्हणून मोठ्या आशेने पहात होते. पण झाले उलटेच. रशियाच्या एन्.के.व्हि.डीच्या अत्याचारापासून मुक्ती मिळेल अशी आशा वाटत असतानाच त्यांना जर्मनीच्या आईनझास्टग्रूपेनच्या अत्याचारांना बळी पडावे लागले. याला कारण हिटलरचे लेबेनस्रॉमचे धोरण होते. या धोरणानुसार युक्रेन ही जर्मनीची वसाहत होणार होती त्यामुळे तेथील मूळ नागरिकांना फक्त दोनच जागा होत्या...त्या म्हणजे स्वर्गात किंवा नरकात.

वेअरमाख्टच्या पाठोपाठ जिंकलेल्या प्रदेशात आईनझास्टग्रूपेन पोहोचायची आणि जिंकलेल्या मानवी वस्त्या बेचिराख करून या हीन स्लाव्ह वंशिय नागरिकांना गुलाम बनवायची किंवा ठार मारायची. त्यांचे कामच ते होते. कोण होते हे ?

आईनझास्टग्रूपेन
शुट्झस्टाफेल (एस एस)चे हे एक निमलष्करी दल होते. या दलावर ज्यूंचा नायनाट करण्याची जबाबदारी होती. ज्यूंबरोबर जे नको आहेत असे मानवसमूह नष्ट करण्याचेही यांनी काम केले. पोलंड, रशियामधे यांनी वंशसंहार घडवून आणला. एक दोन हत्यांपासून हत्याकांडापर्यंत यांची जबाबदारी असे. उदा. बाबी यार मधे त्यांनी दोन दिवस चालणारे ३३७७१ माणसांना मारणारे हत्याकांड घडवून आणले होते. अशा अनेक हत्याकांडांमधून त्यानी जवळजवळ १,०००,००० माणसे ठार मारली. जेव्हा ज्यू जमात या भूतलावरून नष्ट करण्याचे धोरण जर्मनीने आखले तेव्हा यांनीच ज्यूंची पहिली सामूहिक कत्तल केली. पण असल्या अत्याचारांमधे स्टॅलिनही काही मागे नव्हता. त्यांच्या ए.न.के.व्ही.डीबद्दल थोडे जाणून घेऊ. अर्थात फक्त या आघाडीच्या संदर्भात. नाही तर त्यांच्या कारवायांवर एक मोठे पुस्तकच होऊ शकेल.

रशियाने व्याप्त केलेल्या पोलंड, युक्रेन आणि बाल्टिक प्रदेशात जर्मनांचे अत्याचार कमी होते की काय म्हणून रशियाच्या एन् के व्हि डीने या प्रदेशात अत्याचारांचा धुमाकूळ घातला. ही संघटना तिच्या क्रौर्यासाठी जगभर कुप्रसिद्ध होतीच मात्र यावेळी तिच्या क्रौर्याला विकृतपणाची साथ लाभलेली होती. स्टॅलिनने एन्.के.व्ही.डी.च्या प्रमुखला, बेरियाला त्या प्रदेशाच्या शुद्धिकरणाच्या आज्ञा दिल्या व त्याने तेथे जे अत्याचाराचे थैमान घातले त्याच्या वर्णनाने निर्ढावलेल्या खुन्यांच्याही अंगावर काटा येईल. रशियन फौजांनी माघार घेतल्यावर जेव्हा या भागातील तुरुंग उघडले गेले तेव्हा वर्णन करू शकणार नाही अशी भयप्रद दृष्ये समोर आली. जगप्रसिद्ध इतिहासकार रिचर्ड ओव्हरी लिहितो, ‘हजारो कैद्यांचा आतोनात छळ करून त्यांना ठार मारण्यात आले होते व त्यांची विद्रूप केलेली प्रेतं तशीच टाकलेली होती. युक्रेनमधे एका तुरूंगात ज्या कोठडीत स्त्री कैद्यांना ठेवले होते त्या कोठडीला सुरूंग लावण्यात एन्.के.व्हि.डीने धन्यता मानली होती तर यापेक्षाही भयानक गोष्ट दुसऱ्या एका तुरूंगात पहायला मिळाली. या तुरुंगात एका कोठडीत जमिनीवर कापलेल्या जिभांचा आणि काढलेल्या डोळ्यांचा खच पडलेला सापडला.’ ओव्हरीने पुढे लिहितो, ‘एन्.के.व्हि.डीच्या तुरूंग रक्षकांना भीतीचे, निराशेचे आणि सूडाचे जणू झटके आले होते ज्यात त्यांनी ही क्रौर्यकर्म पार पाडली असावीत. एकट्या लुव्ह गावात ४००० नागरिकांना गोळ्या घालून ठार मारण्यात आले व नंतर ते गाव जाळून टाकण्यात आले.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
एन्.के.व्हि.डी : कोण होते हे ?
ही रशियाची कुप्रसिद्ध पोलिस यंत्रणा होती आणि हिचे पूर्ण नाव होते Narodnyi komissariat vnutrennikh del. स्टॅलिनच्या काळात रशियातील नागरिकांवर हिचाच अधिकार चालत असे. यात अंतर्गत सुरक्षादले, अग्निशामक दले, सीमारक्षक दले व तुरूंगदले अशी अनेक दले सामील होती. पण ही कुप्रसिद्ध होती तुरुंग, छळ छावण्या आणि सामुहिक कत्तलींसाठी. यातच एक अंतर्गत सुरक्षेचा विभाग होता ज्याचे नाव होते GUGB ज्यातून पुढे जगप्रसिद्ध KGB तयार झाली. स्टॅलिनला कुठलेही बेकायदा काम करायचे असेल तर ते हिच्यामार्फत होत असे.

जर्मन सैन्याच्या या विजयाने उत्साहीत होत अखेरीस हिटलरने जर्मन सैन्याला मॉस्कोवरील आक्रमणाची मुभा दिली. डी-डे ठरला २ ऑक्टोबर. हिटलरला व त्याच्या मुख्यालयातील सेनाधिकाऱ्यांना खात्री होती की एकदा का मॉस्को जिंकले की रशिया संपल्यात जमा होता. जर्मन मुख्यालयाच्या अंदाजानुसार आत्तापर्यंत रशियाचे जे नुकसान झाले होते ते खालीलप्रमाणे..
२५००,००० सैनिक – ठार किंवा जखमी किंवा युद्धकैदी
२२,००० तोफा - नष्ट किंवा काबीज
१८,००० रणगाडे - नष्ट
१४००० विमाने - नष्ट.
बार्बारोसामधे जे काही मिळवायचे होते ते जवळजवळ साध्य झाले होते.

अजून एका बाबीकडे सगळ्यांचे लक्ष वेधले पाहिजे ते म्हणजे अन्नधान्याची परिस्थिती..ज्यामुळे पुढे रशियामधे भयंकर प्रकार घडले....

जर्मनीच्या कैदेत एकूण ५० लाख ७० हजार रशियन सैनिक होते त्यातील तीस लाख ३० हजार मारले गेले म्हणजे जवळजवळ ५८%. जर्मनीने प्रारंभी जी योजना आखली होती त्यात त्यांनी हेच आकडे गृहीत धरले होते हे विशेष. वेअरमाख्टचा जो केंद्रीय अर्थशास्त्राचा विभाग होता त्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे बजावले होते की बार्बारोसामधे भाग घेणाऱ्या सैन्याच्या पोटाची व्यवस्था रशियामधे उपलब्ध असलेल्या अन्नानेच व्हायला पाहिजे......हे अन्न जर्मनीतून काढून आपल्या फौजांना पोसायला वापरले तर जर्मनीच्या १० दशलक्ष लोकसंख्येवर उपासमार कोसळेल. याला दुजोरा दिला नाझी तत्वांचा कट्टर पुरस्कर्ता अल्फ्रेड रोसेनबर्ग याने. जे अधिकारी पूर्वेचा भूभाग जिंकल्यावर तेथे प्रशासकीय सेवेत जाणार होते त्यांना रोसेनबर्ग म्हणाला, ‘दक्षिण प्रदेश आणि कॉकेशिया यांनी जर्मनीमधे पडलेला अन्नाचा तुटवडा भरून काढला पाहिजे. या अन्नसामग्रीतून रशियन जनतेची भूक भागवायची जबाबदारी आपली नाही हे लक्षात ठेवा.’

वास्तवात जे घडले ते याच्यापेक्षाही भयंकर होते. बार्बारोसा सुरू होण्याआधी झालेल्या एका मेजवानीत हिमलरने त्याच्या सहकाऱ्यांना सांगितले, ‘रशियावर आक्रमण करण्याचा प्रमुख हेतू, ३० दशलक्ष स्लाव वंशियांचा काटा काढणे हा आहे...........

क्रमश:
जयंत कुलकर्णी

इतिहासलेख

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

29 Feb 2016 - 1:48 pm | मुक्त विहारि

पुभाप्र

जेपी's picture

29 Feb 2016 - 2:07 pm | जेपी

वाचतोय..
पुभाप्र

आनन्दा's picture

29 Feb 2016 - 4:13 pm | आनन्दा

वाचतोय..

जाताजाता जगातील सर्वात मोठे महायुद्ध केवळ वंशश्रेष्ठत्वासाठी लढले गेले यावर अजूनही विश्वास बसत नाहीये.

जुबेर बिजापुरे's picture

29 Feb 2016 - 6:07 pm | जुबेर बिजापुरे

पुभाप्र

प्रचेतस's picture

29 Feb 2016 - 6:48 pm | प्रचेतस

हां भागही आवडला. बरीच नवीन माहिती मिळतेय.

नया है वह's picture

29 Feb 2016 - 8:00 pm | नया है वह

वाचतोय..
पुभाप्र

बोका-ए-आझम's picture

29 Feb 2016 - 9:11 pm | बोका-ए-आझम

हिटलरने त्याच्या सेनाधिका-यांवर विश्वास ठेवला नाही आणि उलट स्टॅलिन त्याच्या सेनाधिका-यांना जास्तीतजास्त मोकळीक देत गेला. त्यामुळे युद्ध लवकर संपलं. पण अफाट आणि अभूतपूर्व संहार करुन!

सटक's picture

29 Feb 2016 - 9:40 pm | सटक

सुंदर लेखमाला !

जव्हेरगंज's picture

29 Feb 2016 - 9:46 pm | जव्हेरगंज

+1

नवनवीन माहिती मिळतेय !!!

पैसा's picture

29 Feb 2016 - 10:44 pm | पैसा

!!!

वाचतोय...... महायुद्धाबद्दल सांगताना रशिया व स्टालिन यांच्याकडे केलेली detour सुद्धा आवडली. दुसर्‍या महायुद्धाला असलेल्या असंख्य कंगोर्‍यांपैकी असे काही समोर येत राहतील.
पुभाप्र.

अर्धवटराव's picture

1 Mar 2016 - 4:48 am | अर्धवटराव

कल्पनेच्या पलिकडे.