बार्बारोसा अर्थात रशियन आघाडीवरचे युद्ध... भाग -१

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
18 Feb 2016 - 8:17 am

मित्रहो,
कबूल केल्याप्रमाणे या विषयावरचा शेवटचा लेख लिहायला घेतला आहे. विषय मोठा व थोडासा कंटाळवाणा होण्याची शक्यता आहे पण दुसर्‍या महायुद्धातील वाचावेच असे हे एकंदरीत प्रकरण आहे. तेव्हा थोडा धीर धरुन वाचावे ही विनंती. किती भाग होतील हे सांगता येत नाही पण मधेच गायब होऊ नका.... :-)

भाग -१
१९४१ साली, जून महिन्यात जर्मनीचे १४६ डिव्हिजन सैन्य रशियाच्या आघाडीवर आक्रमणास तयार होते. त्यात जे सैन्य होते त्याची खालील यादी नजरेखालून घातल्यास त्यांच्या तयारीची कल्पना येते. मला स्वत:ला हे सैन्य त्या आघाडीवर कसे हलवले असेल याचा नेहमीच अचंबा वाटतो. सध्याच्या काळात आपण येथे भारतात पिकणारे धान्य देशाच्या सर्व नीट भागात पोहोचवू शकत नाही हे पाहता ही सैन्याची हालचाल मला तरी अमानवीच वाटते. ही तुलना नव्हे पण त्यांनी ते कसे केले असेल याची आपण फक्त कल्पनाच करु शकतो. असो.
सात आर्मी (१४६ डिव्हिजन सैन्य)
चार पँझर ग्रुप
तीन विमानदलाच्या डिव्हिजन्स (फ्लीट)
३५८० चिलखती गाड्या
६००,००० सामान वाहतुकीच्या गाड्या
७१८४ तोफा
१८३० लढाऊ विमाने
७५०,००० सामान वाहतुकीसाठी घोडे व खेचरे
३,०००,००० तीस लाख सैनिक
हे कमी होते की काय म्हणून दक्षिणेकडून आक्रमणासाठी रुमानियाच्या दोन (तिसरी आणि चौथी) आर्मी तयार झाल्या. या युद्धभूमीचा विस्तार (रुंदी) होता जवळजवळ १००० मैल. खोली तुम्ही किता आत जाता यावर अवलंबून होती. या सैनिकांची तोपर्यंत अशी समजूत करुन देण्यात आली होती की - फ्रान्स नंतर आता त्यांना फक्त एकच शत्रू नेस्तनाबूत करायचा आहे आणि तो म्हणजे ग्रेट ब्रिटन. ही जी पूर्वेकडील सैन्याची हालचाल केली जात होती तो एक गनिमी कावा होता. या हालचालींमुळे दोस्त राष्ट्रांना म्हणे असे वाटणार होते की हे सैन्य रशियातून पर्शियामधे उतरुन वाळवंटातील दोस्तांच्या सैन्यावर पिछाडीवरुन हल्ला करणार आहे.

अर्थात ही त्या बिचाऱ्या सैनिकांमधे पसरलेली अफवा होती. जर्मनी व रशियामधे २३ ऑगस्ट १९३९ रोजी अनाक्रमाणाचा करार झाला होता व ज्यात पोलंडची वाटणी ठरली होती, त्या पार्श्वभूमीवर रशियावरचे आक्रमण ही अशक्य गोष्ट होती असा या सैनिकांचा ठाम समज होता. सैनिकांचाच नव्हे तर कनिष्ट आधिकाऱ्यांचाही हाच समज होता. पण त्यांनी हिटलरचे माईन कांफ बहुधा नीट वाचले नसावे. हिटलरने त्यात फार पुर्वीच लिहून ठेवले होते ,

‘‘समजा रशियाशी आम्ही तह केला तर याचा अर्थ आम्ही त्यांच्याशी युद्ध पुकारणारच नाही असा होत नाही. किंवा युद्धाच्या तयारीला वेळ मिळावा म्हणून आम्ही हा तह करू असेही नाही. कुठल्याही तहाच्या मागे युद्ध व विस्तार ही उद्दिष्टे नसतील तर तो तह काय कामाचा ? हे तह दीर्घकाळ चालणाऱ्या संघर्षाची पहिली पायरी असते असे माझे ठाम मत आहे.'’

दुर्दैवाने हिटलरने आधी पश्चिमेचा समाचार घेण्याचे ठरविले ज्यामुळे स्टॅलिन सारख्या अत्यंत धोरणी व वस्ताद माणसाला युद्धाची तयारी करण्यास बऱ्यापैकी वेळ मिळाला. स्टॅलिन व हिटलर या दोघांनाही हे युद्ध होणार आहे अशी मनोमन खात्री होतीच. रशियाच्या भुभागाचा विशेषत: अन्न धान्य पिकविणाऱ्या प्रदेशांच्या बाबतीत हिटलरने फार पूर्वीच विचार करुन ठेवला होता. त्याने माईन कांफमधे लिहिले होते, ‘‘आपण जर युरोपच्या भूभागाचा विचार केला तर आपल्याला रशिया आणि तिच्या मांडलिक शेजारी राष्ट्रांचीच गरज आहे.’’

शिवाय, याआधी मे महिन्यामधे बेल्जियम आणि हॉलंडमधील विजय निश्चित होत होता त्यासुमारास हिटलरला एक पुस्तक भेट मिळाले होते. या नव्वद एक पानी पुस्तकात जनरल अल्फ्रेड काऊंट फॉन श्लिफन याचे विचार व आयुष्य याची मिमांसा करण्यात आली होती. पुस्तक तसे जुने होते. ह्युगो हॉक्स याने १९२१ साली ते लिहिले होते. हे पुस्तक हिटलरला भेट दिले त्याच्या खाजगी व्यवस्थापकाने, ज्याच्याकडे राईशस्टागमधे आल्यागेलेल्यांच्या स्वागताची जबाबदारी होती. त्याचे नाव होते कॅनेनबर्ग. हे पुस्तक अत्यंत योग्य वेळी हिटलरला मिळाले असे म्हणता येईल कारण याच जनरल श्लिफनने, (जो १८९१-१९०६ या काळात चीफ ऑफ जनरल स्टाफ होता), दोन आघाड्यांवरचे युद्ध ‘बेल्जियम’मधून उजव्या बाजूने विळखा घालून पॅरिस काबीज करण्याची योजना तयार केली होती. ही योजनाही त्याच्याच नावाने ओळखली जाते. ही योजना कार्यान्वित होण्याआधी एकच वर्ष १९१३ साली हा जनरल मृत्यु पावला पण मरण्याआधी त्याने एक बहुमोल सल्ला दिला होता की उजवी फळी ताकदवान ठेवा. या सल्ल्यानुसार पहिल्या महायुद्धात काळजी न घेतल्यामुळे ही उजवी फळी कमकुवत झाली तरी त्याकडे कोणी लक्ष दिले नाही व त्याचे रुपांतर त्या चार वर्षे चालणाऱ्या खंदक युद्धात झाले, ज्या युद्धात हिटलरने स्वत: भाग घेतला होता. शेवटी या दोन आघाड्यांवरील युद्धात जर्मनीचा पराभव झाला हे सर्वश्रूत आहे.

मूळ लेखकाने हे पुस्तक लिहिताना युद्धाचे डावपेच व जर्मन माणसाचा स्वभाव हे समोर ठेऊन लिहिले होते. आणि कुठल्याही सैन्यासाठी लिहिलेले डावपेचाचे पुस्तक हे त्या सैन्यातील सैनिकांना, त्या देशातील नागरिकांना समोर ठेऊनच लिहायला पाहिजे. त्याला प्रशियन पुरुषार्थाचा व सभ्यतेचा सार्थ अभिमान होता. त्यांची कष्ट करण्याची तयारी, त्यांची श्रेय लाटण्याचा प्रयत्न न करण्याची वृत्ती इत्यादि गुणांचा यात उल्लेख झाला होता. दुर्दैवाने नंतरच्या काळात हिटलरसकट अनेक जेष्ठ जनरल्सने त्याचे हे म्हणणे खोटे ठरविले ती गोष्ट वेगळी. हिटलरचा जो पुस्तकसंग्रह युद्धानंतर हातात आला त्यात हेही पुस्तक सापडले. या पुस्तकाच्या समासामधे ज्या असंख्य खुणा व नोंदी सापडल्या त्यावरून हे पुस्तक त्याने वाचून त्यामधे दिलेल्या योजनेचा गंभीरपणे विचार केला होता असे गृहीत धरण्यास हरकत नाही. पुस्तकातील ज्या २० पानांवर एकूण ३२ पेन्सिलीच्या खुणा होत्या ती पाने श्लिफनच्या या योजनेबद्दलच होती. कॅनेनबर्ग जो हिटलरचा एक नंबरचा खुशमस्कर्‍या होता त्यानेही एका परिच्छेदावर खूण केली होती व एक टाचण केले होते -
‘जोपर्यंत श्लिफन जर्मनीच्या सेनादलांचा प्रमुख होता तोपर्यंत राईशची सुरक्षा एका चांगल्या हातात होती. श्लिफनचा विश्वास होता की त्याचे सैन्य कुठल्याही संयुक्त फौजांना भारी पडेल....बरोबरच आहे !.... श्लिफनचा त्याच्या विजयावर एवढा ठाम विश्वास होता फक्त त्याला एखाद्या फ्यूररच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. एखाद्या दैवी शक्तीप्रमाणे फ्युररची ही शक्ती कुठल्याही विरोधाला नेस्तनाबूत करेल.’

या परिच्छेदाला तसा काही अर्थ नव्हता पण त्यात फ्यूररचा जो उल्लेख होता त्यामुळे हिटलरने फाजिल आत्मविश्वासाने परत तीच चूक केली जी हिंडेनबर्ग व कैसरने दोन आघाड्यांवर लढताना केली. इतिहासाचा एवढा अभ्यास करूनसुद्धा हिटलर इतिहासातून काही शिकला नाही हेच म्हणावे लागेल.

श्लिफनच्या पुस्तकातील चौथ्या प्रकरणात जो मजकूर अधोरेखित केला होता त्यात श्लिफनने लिहिले होते ‘एकदा का फ्रान्स आणि ब्रिटनच्या फौजांचा पराभव झाला की बाकीचे सगळे बरोबर वठणीवर येतील.’ हॉक्सने असेही लिहिले होते की रशिया नावाचा अजून एक शत्रू आहे व त्याच्या सैन्याचा विचार करावा लागणार याची श्लिफनला कल्पना होती. २९ जुलैला कायटेलला जेव्हा हिटलरने रशियाविरूद्ध युद्धाची तयारी करण्यास सांगितली तेव्हा त्याने याच वाक्याचे महत्व अधोरेखित केले. या ज्या पेन्सिलीच्या खुणा हिटलरने त्या पुस्तकात केल्या होत्या याला इतिहासकार हिटलरची रशियावर हल्ला करण्याची योजना त्या काळापासून होती याचा माईन कांफनंतरचा महत्वाचा पुरावा मानतात. थोडक्यात रशियावर हल्ला करण्याची कल्पना त्याच्या डोक्यात १९४० सालापासून होती आणि त्या पुस्तकातील उल्लेख होणारा दैवी शक्तीचा फ्यूरर म्हणजे आपण स्वत:च आहोत असा एक घोर भ्रम त्याने करून घेतला होता. या दोन्हीचा, म्हणजे सैनिकी शक्ती आणि दैवी शक्ती यांचा संगम कुठल्याही संयुक्त सेनेचा पराभव करू शकते हाही भ्रम त्याच्या पाठोपाठ आलाच. अर्थात ही अशक्य वाटणारी गोष्ट (रशियावरचे आक्रमण) आता प्रत्यक्षात येणार होते.

ब्रिटनला पराभूत न करता रशियावर आक्रमण करणे ही हिटलरने केलेली मोठी चूक मानली जाते, कदाचित असेलही. रशियावर अगोदरच आक्रमण करण्याची जी अनेक कारणे होती त्यातील पहिले होते ते म्हणजे त्याला रशियन माणसाच्या सहनशक्तीची कल्पना आली नाही व दुसरे म्हणजे त्याच्या मनात खोलवर कुठेतरी तो काही चिरतरूण नाही ही जाणीव, ही दोन कारणेही विचारात घेतली पाहिजेत. त्याच्या एका हुजर्‍याला तो सिगरेट व दारू का पीत नाही यावर बोलताना, त्याची ही भीती त्याने वेगळ्या शब्दात मांडली होती. तो म्हणाला,

‘मला माहीत आहे की मी सर्वसाधारण जर्मन नागरिकांसारखा म्हातारा होऊन मरणार नाही.’

१९४१ मधे १७ ऑक्टोबरला राईशचा एक मंत्री टॉड व साउकेल यांच्याशी रशियाच्या सीमेवरील गवताळ प्रदेशाबाबत बोलताना त्याने परत एकदा त्याच्या आयुष्याचा उल्लेख केला. ‘या प्रदेशांचे युरोपीकरण होणार हे निश्चित. अजून वीस वर्षांनी युक्रेनमधे बाहेरुन प्रचंड प्रमाणावर लोकसंख्या स्थायिक होईल. अर्थात हे सगळे बघायला मी नसेन.’ त्याचे लिबेनस्रॉमचे धोरण जे अंतिमत: जर्मनीच्या हिताचेच होते, ते राबवायला इतर कोणाला जमणार नाही असे त्याचे ठाम मत होते. शक्यतो स्वत:च्या मृत्युआधी या धोरणामधील जेवढे शक्य आहे तेवढे त्याला मार्गी लावायचे होते हेही रशियावरील आक्रमण पुढे ओढण्याचे एक कारण असावे. हे त्यांना सांगताना तो म्हणाला,

‘मी नशीबवान आहे की मी वयाच्या ३० व्या वर्षीच राजकारणात आलो, राईशस्टॅगचा चॅन्सेलर ४३व्या वर्षी झालो आणि आता माझे वय फक्त ५२ आहे. वाढत्या वयानुसार माणसाचा आशावाद कमी होत जातो. जेव्हा मी बीयर हॉलच्या उठावानंतर लँडस्बर्गच्या तुरूंगात पडलो तेव्हा मला कधी एकदा बाहेर जाऊन राजकारणात उडी घेतोय असे झाले होते. आज ते मला शक्य होणार नाही ही कल्पनाच मला असहाय्य वाटते.’

त्याच्या मनात खोलवर घर करून बसलेले त्याच्या आयुष्याबद्दलचे हे विचार व वयानुसार कमी होत जाणारा उत्साह व आत्मविश्वास हीही कारणे त्याने पन्नाशी ओलांडल्या ओलांडल्या रशियावर जे आक्रमण केले त्याच्या मागे होती.
इआन करशॉने म्हटल्याप्रमाणे ‘हिटलरच्या डोक्यात अशा काही मुलभूत कल्पना होत्या जणूकाही काळ्या दगडावरची रेघ. या कल्पनाच त्याला प्रेरणा देत असाव्यात’. हिटलरचा जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा जर्मनीचे युरोपीय साम्राज्य, त्याला लागणार्‍या पुरवठ्याच्या वसाहती व शेवटी ज्यूंचा प्रश्न सोडविणे यावर आधारित होता. त्याचा हा दृष्टिकोन १९२० सालापासून ते त्याच्या मृत्युपर्यंत कधीही बदलला नाही वा सौम्यही झाला नाही. या तीनही गोष्टी रशियावर आक्रमण करून साध्य होत होत्या

आणि यापैकी एकही रशियाचा पराभव न करता साध्य होणार नव्हती हे महत्त्वाचे !

वर उल्लेख केलेल्या कारणांव्यतिरिक्त अजूनही काही कारणे होती.
१ फेब्रुवारीला फिल्ड मार्शल बॉकला हिटलरने भेटण्यास बोलाविले होते. बॉकने युद्धाची सविस्तर रोजनिशी लिहिली होती त्यात त्याने लिहिले होते, ‘फ्यूररने माझे स्वागत केले आणि तो म्हणाला,

"‘इंग्लंडचे राजकारणी काही दुधखुळे नाहीत. ते फक्त तसे वागायचे नाटक करतात. रशियाचा अपमानास्पद पराभव झाल्यावरच त्यांना हे युद्ध पुढे चालू ठेवण्यात काही अर्थ नाही हे पटेल.

बॉकने जेव्हा विचारले "रशियाचा असा पराभव करणे खरेच शक्य आहे का?''

'‘समजा युक्रेन, लेनिनग्राड आणि मॉस्को काबीज करूनही जर तह झाला नाही तर आपल्याला कमीतकमी आपली चिलखती दले तरी पुढे न्यावी लागतील व येकाटेरीनबर्ग काबीज करावे लागेल.’

येकाटेरीनबर्ग मॉस्कोच्या पूर्वेला 880 मैल दूर उरलच्या रांगात आहे यावरून हिटलरला रशियावरील विजयाची किती खात्री होती हे कळते. नंतर त्याच्या चेहर्‍यावर एक हसू उमटले आणि तो म्हणाला,

‘अर्थात मला खात्री आहे की एखाद्या गारेच्या वादळाप्रमाणे आपले सैन्य त्यांच्यावर तुटून पडेल.’ दोस्तांच्या दुर्दैवाने ते खरे ठरले असे म्हणण्यास हरकत नाही. गारेचे वादळ आले पण हिटलरच्या दुर्दैवाने, जशा गारा पटकन वितळतात, त्याप्रमाणे या आक्रमणाचेही लवकरच बाष्पीभवन झाले.

१९३९ सालापासून १९४४ सालापर्यंत जर्मनीतील कामगारांच्या संख्येत प्रचंड घट होत होती. आकडेच द्यायचे तर २५.४ दशलक्ष कामगारांची संख्या कमी होऊन १३.५ दशलक्ष झाली. ही जी काम करणारर्‍या हाताची तूट होती ती जिंकलेल्या प्रदेशातील गुलामांकडून भरून काढता येईल असे जर्मनीला म्हणजे हिटलरला वाटत होते. १९४४ मधे ७.५ दशलक्ष कामगार जिंकलेल्या प्रदेशातून मिळणार होते व तोपर्यंत रशियातील जर्मन सैन्याचा मोठा भाग परत येणार होता. रशियातील बाकू तेलक्षेत्रे जर्मनीची तेलाची भूक भागवणार होती तर युक्रेन अन्नधान्न्याची. यामागचे तर्कशास्त्र हे असे होते. जेव्हढे रशियन सैनिक या युद्धात मेले त्या संख्येवरुन हे गणित अगदिच काही चुकीचे होते असे म्हणता येणार नाही. अर्थात त्याचा उपयोग होता ते युद्ध जिंकले असते तर्.....

हिटलरने अजून एक संधी हातची घालविली ती म्हणजे एप्रिल महिन्यात त्याला भेटायला जपानचा परराष्ट्रमंत्री आला होता तेव्हा. हिटलरने त्याला रशियावरील आक्रमणाचा बिलकूल सुगावा लागू दिला नाही. गंमत म्हणजे याच जपानसाठी पर्ल हार्बर नंतर त्याने अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राची शत्रुत्व पत्करले. त्याने हे असे का केले हे न स्मजता येण्यासारखे आहे. स्वतःच्या दोस्तराष्ट्रांपासून लपवून कारवाया करायच्या ही अ‍ॅक्सिस फळीतील पद्धतच होती. याउलट दोस्त रास्।ट्रांमधे भांडणे विकोपास जात, स्वार्थासाठी त्यांची कुठल्याही थराला जाण्याची तयारी होती पण शत्रुचा पराभवासाठी ते सगळे मतभेद वेळ आली की बाजूला ठेवत. त्याने जर रशियावरील आक्रमणात जपानला सामिल केले असते तर रशियाचे निम्मे सैन्य तेलविहीरींच्या प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी गुंतून पडले असते.

आजवरचे इतिहासप्रेमींचे असे मत आहे की हिटलरला ग्रीसवरील आक्रमणात इटलीच्या मदतीस जावे लागले म्हणून त्याला रशियावरील आक्रमणास उशीर झाला. पण यात एक असे मत दडलेले आहे की समजा हा उशीर झाला नसता तर जर्मनीला रशियामधे यश मिळाले असते. इतिहासकार करशॉच्या मते हे चूक आहे. बाल्कन राष्ट्रांवरील आक्रमणात जे रणगाडे नादुरुस्त झाले होते त्याच्या दुरुस्तीसाठी त्यांना अवधी पाहिजे होता. त्यामुळे त्यांना रशियावर आक्रमण करता येत नव्हते म्हणून ग्रीस, बाल्कन राष्ट्रे व क्रीटचे युद्ध त्यांनी शत्रुवर लादले. याउलट काही लोक दुसऱ्या टोकाची भुमिका घेताना दिसतात ती म्हणजे रशियाच्या आघाडीवरील पराभवाला हिटलरच जबाबदार होता. पण हेही चूक आहे. १४ जूनला झालेल्या एका महत्वाच्या बैठकीत एकाही जनरलने हे दोन आघाड्यांवरील युद्ध फार महागात पडेल किंवा एकदा या प्रकारात हात पोळलेला आहे हा सल्ला हिटलरला दिलेला दिसत नाही. म्हणजे तशी नोंद नाही. काही जणांनी नंतर मला असे वाटले होते इ.इ. असे म्हटले पण त्याला काही अर्थ नाही. सगळ्यात आश्चर्य म्हणजे १९१४ साली जर्मनीची शत्रुच्या तुलनेत जेवढी ताकद होती तेवढीही ताकद आत्ता नव्हती.

करशॉच्या म्हणण्यानुसार यात हिटलरला सल्ला देऊ शकेल असा एकच माणूस होता तो म्हणजे जनरल कायटेल पण हा एक नंबरचा चमचा होता. व हिटलरच्या हो ला हो म्हणणे याखेरीज तो काहीही करत नसे.

रशियावर आक्रमण करण्याच्या हिटलरच्या निर्णयावर इतर जनरल्सनी टीका केली नाही याचे अजून एक कारण इतिहासकार लिडेल हार्ट याने लिहिले आहे. हे मत त्याने अनेक जर्मन सेनाधिकार्‍यांशी या विषयावर चर्चा केल्यावर प्रकट केले आहे म्हणून महत्वाचे ठरते.

तो म्हणतो, ‘या सगळ्या सेनाधिकार्‍यांना त्यांच्या विशेष कार्यक्षेत्राच्या बाहेरचे जग फारसे माहीत नव्हते किंवा असे म्हणूया की त्यांना त्यात विशेष गम्य नव्हते. जेव्हा या अधिकार्‍यांना शंका येत तेव्हा हिटलर त्यांच्या शंकांची उत्तरे त्यांना सखोल ज्ञान नसलेल्या विषयात शोधून दाखवी. उदाहरणार्थ त्याने रशियावरील आक्रमणाचे समर्थन ‘राजकीय परिस्थितीत’ आहे हे त्यांना पटवून सांगितले. रशियातील अंतर्गत घडामोडींची इत्यंभूत माहिती असल्यामुळे तो या अधिकार्‍यांना रशियातील अंतर्गत कलहामुळे, सैन्यात दुफळी माजून रशिया सहज शरण येईल हे पटवून द्यायचा.’

चुकीची माहिती देऊन गोंधळात टाकण्यात हिटलर पहिल्यापासूनच वाकबगार होता आणि या वेळी त्याने हे अस्त्र त्याच्याच सेनाधिकार्‍यांवर वापरले हे जर्मनीचे दुर्दैवच म्हणावे लागेल. रशियाला आपण सहज चिरडून टाकू असा हिटलरला भ्रम झाला होता. रुनस्टेडला तो म्हणतो, ‘‘रशिया म्हणजे एक कुजलेली इमारत आहे. तुम्ही एक धक्का त्याच्या दरवाजावर मारा आणि ही इमारत कोसळेल.’’

मॉस्को घेतल्यावर सैनिकांना प्रदान करण्यासाठी हिटलरने दोन टन वजनाची पदके टंकसाळीतून ओतून घेतली होती, आज ती रशियामधे मॉस्कोच्या संग्रहालयात खोक्यात भरुन ठेवली आहेत. हिटलरला रशियावर विजय मिळविण्याबाबत एवढा फाजील आत्मविश्वास कुठून आला होता ? त्याला असे वाटत होते की स्टॅलिनच्या छळाला व अत्याचारांना कंटाळून रशियाची जनता कम्युनिझमचा द्वेष करायला लागली आहे व ते नागरीक जर्मनीच्या फौजांचे उत्स्फूर्त स्वागत करतील, त्याच्या या आत्मघातकी निर्णयाला रशिया-फिनलँड यांच्यातील युद्धाचाही हातभार लागला होता. त्याने फिनलँडमधे रशियाच्या फौजांची ससेहोलपटही त्याने बघितली होती त्यामुळे रशिया युद्धात मोडेल अशी त्याची ठाम कल्पना झाली होती. तथापि त्याने रशियन सैनिकाला पुरते ओळखले नव्हते. टुकार नेतृत्व, अपुरे प्रशिक्षण, अपुरी युद्धसामुग्री अशा परिस्थितीत या सैनिकाने अत्यंत कडवेपणाने जर्मनीच्या सैन्याला लढत देऊन इतिहासात आपले नाव कोरले. रशियन सैनिक मातृभूमीच्या रक्षणासाठी कुठल्याही टोकाला जाण्याच्या नेहमीच तयारीत असतो, मृत्युची तो त्यावेळेस तमा बाळगत नाही, शिवाय त्यांच्या प्रत्येक रेजिमेंटला एक राजनैतिक प्रतिनिधी जोडलेला असे. सैनिकांच्या स्थानिक परंपरा, त्यांच्या इतिहासातील कहाण्या, याचा वापर करून हे अधिकारी सैनिकांचे मनोबल नेहमीच उच्चदर्जाचे ठेवत असत. या सैनिकांच्या पूर्वजांनी रोमानॉव्हसाठी हालआपेष्टा काढल्या होत्या. यावेळी तर त्यांना त्यांच्या मातृभूमीसाठी त्या काढायच्या होत्या ज्या त्यांनी आनंदाने काढल्या. त्यांच्या दृष्टीने काहीच फरक पडत नव्हता.

समजा हिटलरच्या भोवती स्पष्टवक्ते सेनाधिकारी असते तर रशियावरचा हल्ला टळला असता का ? याचे उत्तर आहे - शक्यता फार कमी होती. कारण रशिया काबीज करायलाच पाहिजे हा विचार हिटलर आणि इतर नाझींमधे इतका खोलवर रुजला होता की रशियावरचे आक्रमण ही काळ्या दगडावरची रेघ होती. फ्यूररने रशियावर आक्रमण केले याचे कारण "रशियाला मांडलिक करण्यासाठीच देवाने त्याला पृथ्वीवर पाठविले आहे" असा त्याचा दृढ समज होता.

माईन कांफमधे त्याने लिहिले आहे, ‘आपल्या परराष्ट्रीय धोरणांत या पृथ्वीवर जर्मन वंशासाठी निर्माण झालेली रशियन जमीन व सुपीक माती जिंकणे हेच आपले इतिकर्तव्य आहे.’ हे धोरण फक्त रशिया व पोलंडपर्यंतच मर्यादित नव्हते. त्याच पुस्तकात त्याने लिहिले आहे ‘युक्रेनचे अन्नधान्य, उरलची खनिजे एवढेच काय सैबेरियातील लाकूड हे सर्व हातात आल्यावर जर्मनी सुबत्तेत लोळेल.’ १९४१ सालात जर्मनीने १४ देश अंकित केले होते ते पुरेसे नव्हते. हेच त्याने त्याच्या राजकीय आकांक्षांबद्दल सांगतानाही लिहिले आहे,
‘आज फ्रान्सचा हिशेब चुकता करायला पाहिजे याबाबतीत कोणाचेही दुमत नाही.........तो करण्यात येईल... पण त्याचा खरा फायदा जेव्हा आपण आपल्या वसाहतीसाठी वर घुसू, तेव्हा आपली पिछाडी सुरक्षित करण्यासाठी होईल.’

या सर्व कारणांनी हिटलरने/जर्मनीने ऑपरेशन बार्बारोसा आखले आणि अमलात आणले....

क्रमशः
जयंत कुलकर्णी
पुढच्या भागापासून ऑपरेशन बार्बारोसा सुरु करु....

इतिहासलेख

प्रतिक्रिया

नविन लेखमालिकेची मेजवानी..
वाचतोय..

एस's picture

18 Feb 2016 - 9:14 am | एस

वाचतोय.

दुर्दैवाने हिटलरने आधी पश्चिमेचा समाचार घेण्याचे ठरविले ज्यामुळे स्टॅलिन सारख्या अत्यंत धोरणी व वस्ताद माणसाला युद्धाची तयारी करण्यास बऱ्यापैकी वेळ मिळाला.

असहमत. स्तालिनने युद्धाची तयारी अजिबात केली नव्हती. जर्मन आक्रमणाच्या इशार्‍यांकडे त्याने दुर्लक्ष केले होते. आक्रमण सुरू झाल्याची बातमी आल्यावर त्याला इतका धक्का बसला की दोन दिवस त्याने स्वतःला कोंडून घेतले होते. रशियन सैन्याची युद्धसज्जता दयनीय होती. पण भानावर आल्यावर त्याने पश्चिम भागातले कारखाने हे कामगार, त्यांचे कुटुंबिय व अगदी नटबोल्टांसकट सायबेरियाला रेल्वेने हलवले. त्यामुळे ऐन युद्धातही रशियाचे युद्धसामग्री उत्पादन हे अक्ष राष्ट्रांपेक्षा जास्त होते..!

जयंत कुलकर्णी's picture

18 Feb 2016 - 9:38 am | जयंत कुलकर्णी

अहो त्याने कोंडून घेतले ते धक्का बसला म्हणून नव्हे. स्टॅलिनला धक्का बसेल असे वाटते का आपल्याला ? त्याला वेगळी कारणे होती.... त्यातील मुख्य कारण होते पॉलिटब्युरोची भिती...त्याबद्दलही येणार आहेच पुढे. युद्धसज्जता दयनीय असेल पण त्यांनी पहिल्यापेक्षा बरीच तयारी केली होती...इशार्‍याकडे दुर्लक्ष केले होते ते वेगळ्या कारणासाठी. तो बेसावध होता असा त्याचा अर्थ नाही... असो.
:-)

मघाशी टंकलेला दीर्घ प्रतिसाद प्रकाशित झाला नाही! असो. तुम्ही लिहिणार आहातच तेव्हा लेखमालेच्या शेवटी ही चर्चा करणे जास्त सयुक्तिक राहील.

बोका-ए-आझम's picture

18 Feb 2016 - 10:42 am | बोका-ए-आझम

त्याने जर रशियावरील आक्रमणात जपानला सामिल केले असते तर रशियाचे निम्मे सैन्य तेलविहीरींच्या प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी गुंतून पडले असते.

कदाचित नाही, कारण जपानला रशियावर आक्रमण करायचं तर चीनमधल्या मांचुरिया प्रांतामधून उत्तरेकडे करावं लागलं असतं. शिवाय जपानमध्ये असलेल्या रशियन हेर रिचर्ड साॅर्जच्या नेटवर्कमुळे स्टॅलिनला हे समजलं होतं की जपानला तुलनेने सोप्या असलेल्या दक्षिणेकडे डच ईस्ट इंडीज, मलाया, सिंगापूर, हाँगकाँग आणि फिलिपाईन्स या भागात जास्त रस होता. जर्मन राजदूत युजेन ओटवर नाझी नेते दबाव आणत होते की त्याने काहीही करुन जपानला रशियाविरूद्ध उतरवावं. पण जपानची एकाचवेळी दक्षिणोत्तर लढण्याची तयारी नव्हती. त्यामुळे जपानने तुलनेने सोप्या दक्षिण दिशेला हल्ला करुन साम्राज्य वाढवण्यावर भर दिला. जर जर्मन सैन्याने माॅस्को घेतलं तर जपान रशियावर आक्रमण करणार होता. हे स्टॅलिनला समजल्यावर त्याने मांचुरियाच्या सरहद्दीवर असलेली मोठी फौज पश्चिमेकडे माॅस्कोच्या संरक्षणासाठी बोलावली. हे सैन्य वेळेवर तिथे पोचलं आणि त्याने जर्मनांना पहिली माघार घ्यायला भाग पाडलं. पुढे हिवाळा सुरु झाल्यावर रशियन आणि जर्मन असे दोन्ही सैनिक खंदकांमध्ये बसून राहिले.

जयंत कुलकर्णी's picture

18 Feb 2016 - 2:56 pm | जयंत कुलकर्णी

माझ्या पर्ल हार्बर या लेखात मी जपानने दक्षिणेकडील प्रदेशात का लक्ष घातले हे सवीस्तर दिले आहे. तुम्ही म्हणता आही ते बरोबर आहे. जर जपानने आणि जर्मनीने एकत्र या हालचाली केल्या असत्या तर रशियाला मॉस्कोच्या रक्षणासाठी ते सैन्य हलविता आले नसते... असे माझे नाही काही इतिहासतज्ञांचे म्हणणे आहे.... :-)

जयंत कुलकर्णी's picture

18 Feb 2016 - 3:02 pm | जयंत कुलकर्णी

अर्थात हे कबूल केले पाहिजे की जरतर ला तसा अर्थ नसतो. दुसर्‍या महायुद्धातील अनेक निर्णय हे वादग्रस्त ठरले. व प्रत्येक इतिहासकार आपापल्या मगदूरी प्रमाणे व अभ्यासाप्रमाणे त्याचे विश्लेषण करत असतो...आणि मुख्य म्हणजे रशियातील व अनेक देशातील अजून कितीतरी कागदपत्रे खुली व्हायची आहेत. ती पूर्णपणे खुली झाली आहेत यावर माझा तरी विश्वास नाही. त्या पोतडीतून अजून कायकाय बाहेर येणार आहे हे परमेश्वरालाच माहीत.... :-)

आदूबाळ's picture

18 Feb 2016 - 12:08 pm | आदूबाळ

झकास! लेनिनग्राडबद्दल वाचण्यास उत्सुक आहे.

पिलीयन रायडर's picture

18 Feb 2016 - 12:25 pm | पिलीयन रायडर

इतिहास ना.. असा शिकवायला हवा होता आम्हाला. नुसते धडे वाचुन घेतले. आता तुम्ही लिहीत आहात तेव्हा खुप गोष्टी समजतात.

काका, कुठेही गायब होणार नाही.. लिहीत रहा!

मुक्त विहारि's picture

18 Feb 2016 - 1:57 pm | मुक्त विहारि

पुढचे सगळे भाग नक्कीच वाचणार...

स्वगत : हे असे पंचपक्वानाचे ताट सोडून कोण गायब होईल.

सुबोध खरे's picture

18 Feb 2016 - 7:38 pm | सुबोध खरे

पहिलाच भाग अप्रतिम...
अगदी अगदी हेच म्हणायचे होते

तुमचे महायुद्धाचे सर्वच लेख अतिशय उत्तम आहेत.
माहितीपूर्ण लेख आहेत आणि अंतर्जालावर असे मराठीत महायुद्धावर असे लेखन फार कमी आहे.
कृपया अशा लेखमाला चालू ठेवा,

नया है वह's picture

18 Feb 2016 - 3:13 pm | नया है वह

उत्तम लेखमाला होणार आहे.

जव्हेरगंज's picture

18 Feb 2016 - 7:41 pm | जव्हेरगंज

___/\___

चवीचवीने वाचतोय...

येऊ द्या अजून
कितीही मोठे भाग असोत... आवडीने वाचणार !!!

टिवटिव's picture

18 Feb 2016 - 8:25 pm | टिवटिव

पुभाप्र..

प्रचेतस's picture

18 Feb 2016 - 7:56 pm | प्रचेतस

उत्कृष्ट लेख.
प्रतिसादांमधूनही उत्तम माहिती मिळत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Feb 2016 - 11:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं माहितीपूर्ण विष्लेशणाने नटलेले लेखन. तुम्ही लिहा हो, काही कोणी पळून जात नाही, उलट दर पुढच्या लेखाची वाटच पाहतील !

लॉरी टांगटूंगकर's picture

18 Feb 2016 - 11:27 pm | लॉरी टांगटूंगकर

+१

भंकस बाबा's picture

19 Feb 2016 - 12:11 am | भंकस बाबा

छान लेख

निशदे's picture

19 Feb 2016 - 12:11 am | निशदे

लेखमालिका उत्तम होणार यात वादच नाही.... पुभाप्र...

रामपुरी's picture

19 Feb 2016 - 4:22 am | रामपुरी

आणखी एक मस्त लेखमाला वाचायला मिळणार
"मधेच गायब होऊ नका"
आता गायब व्हायचं म्हटलं तरी होता येणार नाही.

जयंत कुलकर्णी's picture

23 Feb 2016 - 11:54 am | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !