तमसो मा ज्योतिर्गमय - भाग १

भानिम's picture
भानिम in जनातलं, मनातलं
10 Dec 2015 - 12:41 pm

"तमसो मा ज्योतिर्गमय" (भाग १)

सूर्योदयापूर्वीच्या चाहुलीने पक्ष्यांनी किलबिलाट करायला सुरवात केली आणि कृष्णंभटना जाग आली. तांबडे फुटायला अजून काही अवकाश होता.

कंदिलाच्या क्षीण प्रकाशात त्यांनी आपली पत्नी रुक्मिणी आणि कन्या गार्गी यांच्याकडे एक कटाक्ष टाकला. त्या अजूनही साखरझोपेत होत्या. एक मंदसे स्मित करत कृष्णंभट तांब्या उचलून परसदारी आले. नेहमीच्या सवयीप्रमाणे मुखप्रक्षालनादी नित्यकर्मे करून त्यांनी उपरणे खांद्यावर टाकले. खडावा पायात सरकवून ते घराबाहेर पडले आणि " वक्रतुंड महाकाय …. " असे पुटपुटत झपाझप कुशावर्ताच्या दिशेने चालू लागले. बाजूलाच असलेल्या गुरुकुलातील विद्यार्थी जागे झालेच होते. तेही आपल्या गुरूंच्या वेगाची कशीबशी बरोबरी करीत त्यांच्या पाठोपाठ चालू लागले.

सूर्योदयापूर्वी गोदावरीमध्ये स्नान, अर्घ्य आणि सूर्य स्तोत्र, त्र्यंबकेश्वर मंदिरात संध्या, हिवाळ्यात तांबडफुटीला त्र्यम्बकेश्वराची काकड आरती, घरी जाऊन घरच्या देवांची पूजा हा कृष्णंभटांचा नित्यक्रम; उपनयन झाल्यापासून बालवयातील काही किरकोळ आजार वगळता कधीही चुकला नव्हता. बालवयात उपनयन झाल्यानंतर आपल्या पित्याचे बोट धरून त्यांनी हा नित्यक्रम अंगिकारला होता, आणि गेली बत्तीस वर्षे कुठलाही ऋतू असो; उन्हाळा, पावसाळा किंवा कठोर हिवाळा, यात कधीही खंड पडला नव्हता.

त्यानंतर गुरुकुलातील विद्यार्थ्यांना संथा, यजमानांकडे यज्ञयागादी कार्ये, माध्यान्ह संध्या, भोजन, दुपारी घरी येऊन झोप, मग पुन्हा गुरुकुलातील विद्यार्थ्यांचे शिक्षण, सूर्यास्तापूर्वी पुन्हा संध्या, आपली कन्या गार्गी हिच्याशी संवाद, तिच्या शैक्षणिक प्रगीतीची विचारपूस, अल्प भोजन, मग शास्त्र वाचन!

आज नदीतून स्नान करून बाहेर येत असताना घाट झाडणाऱ्याच्या झाडूचा त्यांना चुकून स्पर्श झाला. हे दृश्य लांबून पाहणारे विष्णूभट त्या झाडणाऱ्याच्या अंगावर धावले आणि घाटावर असलेल्या इतरांकडे पाहून याला चांगली अद्दल घडवा अशा अर्थाचे हातवारे करीत त्याला काही बोलणार; इतक्यात कृष्णंभटांनी त्यांच्याकडे असे पाहिले, की विष्णूभट आपल्या जागीच खिळून उभे राहिले.

दशग्रंथी व्युत्पन्न ब्राह्मण असलेल्या कृष्णंभटांबद्दल विष्णूभटांना भीतीयुक्त असूया होती, असे असूनही कृष्णभटांसमोर लांगुलचालन करण्याची एकही संधी ते सोडत नसत.

शास्त्रार्थात कृष्णंभटांचा हात धरू धरू शकेल असे उभ्या नाशकातच काय पण आजूबाजूच्या शंभर पंचक्रोशीत कोणी नव्हते असे चर्चिले जात असे. शास्त्रार्थ करण्यासाठी त्यांना अनेक संस्थानांकडून सादर निमंत्रण येत असे. अनेक संस्थानांच्या दरबारी त्यांचे सत्कार होत असत. त्र्यंबकेश्वर मंदिराचे परंपरागत उपाध्येपण त्यांच्याकडे नसले तरी त्र्यंबकेश्वर विश्वस्त मंडळात त्यांना आग्रहाचे आणि मानाचे स्थान असे. आणि मुख्य म्हणजे गंगाधरपंत जहागीरदार यांचे कृष्णंभट अत्यंत विश्वासू सल्लागार होते. गंगाधरपंतांच्या कारभारातील आणि घरातील पानही कृष्णंभटांच्या सल्ल्याशिवाय हलत नसे.

विष्णूभटांना त्यांच्याविषयी वाटत असलेल्या असूयेची ही काही मुख्य कारणे होती.

या अचानक घडलेल्या प्रसंगानंतर कृष्णंभट पुन्हा एकदा नदीच्या पात्रात शिरले आणि पुन्हा अंगावर पाणी घेऊन बाहेर पडले. विष्णूभट अजूनही तिथेच उभे होते.

"नुसतं कर्मकांडाचं अवडंबर करून चालत नाही विष्णूभट, चित्तही शुद्ध असावं लागतं !" कृष्णंभट म्हणाले. या त्यांच्या वक्तव्याने आलेला राग चेहऱ्यावरच्या लोचटपणाच्या मागे लपवित विष्णू भट त्यांच्या मार्गातून बाजूला झाले.

घराच्या पुढच्या पडवीत येताच त्यांनी सवयीप्रमाणे "अहो…." अशी हाक दिली. "पायावर घ्यायला पाणी आणा" अशी आज्ञा, आणि "पुजेची तयारी झाली का?" असा प्रश्न असे दोन अर्थ त्या हाकेमागे आहेत, हे रुक्मिणी वहिनींना सरावाने माहित होते. स्वत:ची आन्हिके उरकून त्यांनी केंव्हाच पुजेची तयारी करून ठेवली होती.

पायावर पाणी घेऊन कृष्णंभट देवघरात गेले आणि रुक्मिणी वहिनी त्यांच्या रोजच्या कामाला लागल्या. गार्गी त्याआधीच शाळेत निघून गेली होती. मुलांना, आणि मुलींनाही आधुनिक विद्या शिकवलीच पाहिजे असे स्वत: कृष्णंभटांचे मत होते आणि त्यानुसार त्यांनी गार्गीलाही कन्या शाळेत दाखल केले होते. ब्रह्मवृंदात याविषयी उपरोधिक कुजबुज असली तरी कृष्णंभटांसमोर शब्द काढण्याची कोणाची प्राज्ञा नव्हती.

घरातल्या देवांची पूजा आटोपून भट गुरुकुलात गेले. विद्यार्थ्यांना संथा देऊन आणि ठरलेली कार्ये उरकून ते जेंव्हा घरी आले तेंव्हा सूर्य चांगलाच डोक्यावर आला होता. अंगणात गार्गी एका लहानग्या मुलाला खेळवत बसली होती. "काय गं, कोणाचा हा? अनुसूयेचा का?" असे म्हणत ते घरात शिरले.

स्नानसंध्या आणि भोजन उरकून ते पुन्हा एकदा सोप्यात आले, तेंव्हाही गार्गी त्या लहानग्याला एका दुपट्यावर ठेऊन खेळवित पडवीत बसली होती. त्यांच्या पाठोपाठ रुक्मिणी वहिनी देखील पदराला हात पुसत पुसत बाहेर येत होत्या.

"गार्गी, कोणाचं मूल आहे हे? याची आई कुठे गेली? आणि तुला काही अभ्यास वैगरे नाही का?" - भटांनी विचारले.

गार्गी काहीच बोलत नाही असे बघून त्यांनी प्रश्नार्थक मुद्रेने रुक्मिणी वहिनींकडे बघितले. वहिनी सुद्धा काही न बोलता गार्गीकडे आणि मुलाकडे बघत राहिल्या. काही क्षण असेच गेले.

भटांच्या नजरेतली वाढती जरब लक्षात येताच वहिनी पटकन म्हणाल्या, "अहो, शाळेबाहेरच्या चौकात एक बाई; थोडा वेळ सांभाळ, मी इतक्यातच आले असं म्हणून याला गार्गीच्या हाती देऊन गेली. बराच वेळ ती आली नाही तेंव्हा ही त्याला घेऊन घरी आली."

"म्हणून त्याला काय घरी घेऊन यायचं का?" हे कोण कोणाचं मूल आहे कुणास ठाऊक?"

गार्गीचा रडकुंडीला आलेला चेहरा पाहून वहिनी पुढे म्हणाल्या, "अहो तिने विचारलं होतं त्या बाईला, ब्राह्मणाचीच होती ती बाई!"

भटांनी गार्गीकडे बघताच गार्गी रडत रडत म्हणाली, "हो बाबा !"

"काही झालं तरी हे मूल आपल्याला घरी ठेवता येणार नाही." शांत परंतु दृढ स्वरात भट म्हणाले, "त्याच्या आईचा ठावठिकाणा शोधावाच लागेल! आजचा दिवस राहू दे फार झालं तर! उद्याच मी फौजदारांना बोलावून याच्या आईचा शोध घ्यायला सांगतो."

दुसऱ्या दिवशी भटांनी फौजदारांना बोलावणे पाठविले; आणि फौजादारांशी चर्चा करून त्या मुलाच्या आईचा तातडीने शोध घेण्यासाठी त्यांना विनंतीवजा आज्ञा केली.

रोजच्या नित्य कार्यांमध्ये असेच काही दिवस गेले. बाळाचे दर्शन शक्यतो भटांना होऊ नये किंवा त्याचे रडणे त्यांच्या कानावर जाऊ नये याची मायलेकी कसोशीने काळजी घेत होत्या. कधी त्याचा विषय निघालाच तर कमीत कमी चर्चा होईल असे रुक्मिणीवहिनी बघत होत्या.

भट सतत फौजदारांकडे चौकशी करतच होते; परंतु बाळाच्या आईचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. भटांनी जेंव्हा फौजदारांना एखादं योग्य अनाथालय बघण्यास सांगितलं तेंव्हा मात्र रुक्मिणी वहिनींच्या काळजाचं पाणी पाणी झालं.

त्या दिवशी रात्री कृष्णंभटांचे पाय चेपून देत असताना रुक्मिणी वहिनींनी हलकेच विषय काढला.
"मी काय म्हणते आहे, बघा म्हणजे आपल्याला पटतं का? माझ्या आपल्या सुमार बुद्धीला काय वाटलं ते बोलते हो मी! आपणच नेहमी म्हणता ना, की प्रत्येक घटनेच्या मागे काही ईश्वरी प्रयोजन असतं म्हणून?"

भटांनी जरासे रागावूनच बघता त्यांनी प्रत्यक्ष विषयाला हात घातला, "बाळाला आपल्या गार्गीच्या हाती सोपवून तिला त्याला आपल्या घरी घेऊन येण्याची बुद्धी देण्यामध्ये सुद्धा काही ईश्वरी प्रयोजन नसेल कशावरून? आणि या मुलाला आपल्यासारख्या महापंडिताकडून शास्त्र ज्ञान व्हावे असा तर ईश्वरी संकेत नसेल ना?"

भट काहीच बोलत नाहीत असे बघून 'मौनं संमती दर्शनं' हे ताडून वहिनींनी आपले पालुपद पुढे चालूच ठेवले. "मी तर बाळाचे नावसुद्धा योजले आहे, 'कार्तिकेय'! ज्याला एकापेक्षा जास्त मातांची माया मिळाली, असा 'कार्तिकेय'!" असं म्हणून त्या कृष्णंभटांकडे प्रतिक्रियेसाठी बघू लागल्या; आणि प्रयत्न करून देखील भटांना आपल्या चेहऱ्यावर आलेले स्मित लपविता आले नाही, तेंव्हा त्या अगदी निर्धास्त झाल्या!

('धर्म' या हिंदी कलात्मक चित्रपटावर आधारित. मूळ चित्रपटातील कथा वाराणसी मध्ये घडलेली दाखवली असली तरी प्रस्तुत कथापट नाशिकमध्ये घडल्याचे कल्पिले आहे. नाशिकच्या वर्णनात आणि प्रत्यक्ष भौगोलिक तपशिलात; त्याचप्रमाणे धार्मिक विधींच्या तपशिलात काही तफावत आढळल्यास ते लेखकाचे कलात्मक स्वातंत्र्य समजावे)

कथा

प्रतिक्रिया

एस's picture

10 Dec 2015 - 3:52 pm | एस

वाचतोय. पुभाप्र.

कपिलमुनी's picture

10 Dec 2015 - 3:58 pm | कपिलमुनी

पुलेशु

सस्नेह's picture

10 Dec 2015 - 4:53 pm | सस्नेह

लेखनशैली सुरेख.

पैसा's picture

10 Dec 2015 - 5:23 pm | पैसा

कथा आवडली!

प्रचेतस's picture

10 Dec 2015 - 5:33 pm | प्रचेतस

उत्तम सुरुवात.
मात्र त्र्यंबकेश्वरासारख्या शैव ठिकाणी गुरुकुल असलेल्या भटांची नावे वैष्णव असणे जरा ऑड वाटले.

पुढिल भागाच्या प्रतिक्षेत.

बोका-ए-आझम's picture

10 Dec 2015 - 8:07 pm | बोका-ए-आझम

बाकी कथा पकड घेणारी आहे. पण स्पष्टीकरणात फार अडकू नका. पुभाप्र!

मितान's picture

11 Dec 2015 - 12:14 pm | मितान

शैली आवडली.
पुढील लेखनास शुभेच्छा !

भानिम's picture

12 Dec 2015 - 2:50 pm | भानिम

सर्वांच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!