"प्राचीन भारतीय संस्कृतीची जगव्याप्ती"

भानिम's picture
भानिम in जनातलं, मनातलं
23 Nov 2015 - 9:58 am

गेल्या काही दिवसांत भारतातील राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडींच्या निमित्ताने हिंदुत्व, सहिष्णुता, भारतीय संस्कृती, भारतीय संस्कृतीचा जगातील प्रभाव इत्यादी विषयांवरती पुन्हा चर्वित चर्वण झाले. प्रागैतिहासिक आणि पौराणिक दाखल्यांची देवाण घेवाण झाली.

पण केवळ प्रागैतिहासिक आणि पौराणिक दाखल्यांपलीकडे काही ऐतिहासिक आणि 'refereed' दस्तऐवज आहे का? या दिशेने चिकित्सक आणि नि:पक्षपाती दृष्टीने काही मर्यादित संशोधनाचा उहापोह केला. त्यातून जी माहिती मिळाली ती थोड्या रंजक आणि वाचनीय लेखमालेच्या स्वरुपात इथे मांडत आहे. वापरलेले संदर्भ आणि संदर्भ सूची इथे देत नाहीये याबद्दल अत्यंत क्षमस्व.

आपली भारतीय संस्कृती हीच "वसुधैव कुटुंबकम" म्हणजेच "हे विश्वची माझे घर" या संकल्पनेवर आधारलेली आहे. किंबहुना मी तर असं म्हणेन की "भारत साऱ्या विश्वाचे घर" असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल. पूर्व युरोप, मध्य आशिया, ग्रीस आणि आफ्रिका अशा विविध प्रांतांतून मानवसमूह भारतात स्थलांतरित झाले आणि त्यांनी भारत हीच आपली भूमी मानली. भारताच्या "सुजलाम सुफलाम" भूमीने सर्वांना प्रेमाने जवळ केलं आणि आपली जगावेगळी भारतीय संस्कृती जन्माला आली. (मुस्लिम धर्माच्या स्थापनेनंतरच्या कालखंडाचा यात समावेश आणि विचार केलेला नाही.)

आपल्या भारतीय संस्कृतीचा मध्य आशिया, दक्षिण पूर्व आशिया, चीन, जपान, कोरिया अशा दूरदूरच्या देशांपर्यंत प्रसार झाला. या लेखांमधून हाच रंजक प्रवास पुन्हा अनुभवण्याचा प्रयत्न आहे.

मुख्य म्हणजे अनेक प्रसंगी हा प्रसार कुठलेही राजकीय आक्रमण न करता झाला आणि अनेक वेळा देशोदेशींच्या राज्यकर्त्यांनीच भारतीय विद्वानांना आपल्या संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी निमंत्रण दिले असेही दिसून येते.

एक काळ असा होता की इतर देश आणि प्रदेशांबरोबर व्यापार हे भारतीयांच्या अर्थार्जनाचे व उपजीविकेचे एक मुख्य साधन होते असे दिसून येते. ख्रिस्तपूर्व ३०० ते १०० या काळापासून भारतीय व्यापारी पश्चिमेकडील आशियातील अरबस्तान, युरोपमधील रोम ते पूर्वेकडील चीनपर्यंत व्यापारासाठी ये-जा करीत असत.

कंबोडिया (कम्हुज किंवा कम्बोज), जावा (यव द्वीप), सुमात्रा आणि मलाया (मलेशिया) या ठिकाणी असलेल्या सोन्याच्या खाणी आणि त्यातून मिळणारे सोने हे मुख्य आकर्षण होते. त्यामुळेच या बेटांचा उल्लेख "सुवर्ण द्वीप" असा होत असे. हे व्यापारी काशी, मथुरा, उज्जयनी, प्रयाग आणि पाटलीपुत्र अशा त्याकाळच्या संपन्न शहरांतून येत असत आणि भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील मामल्लापुरम (तमिळनाडू), ताम्रलिप्ती (तामलूक - मेदिनीपूर पश्चिम बंगाल), पुरी (ओदिशा) आणि कावेरीपट्टणम (तमिळनाडू) या बंदरावरून जहाजांची वाहतूक होत असे. जिथे जिथे हे व्यापारी गेले तिथे तिथे त्यांनी भारतीय संस्कृतीची बीजे रोवली.

प्राचीन काळातील भारतीय विश्वविद्यालये ही सांस्कृतिक देवाण-घेवाणीची महत्त्वाची केंद्रे होती. या विश्वविद्यालयांमध्ये असलेल्या ग्रंथसंपदेमुळे देशोदेशींचे अभ्यासू आणि विद्वान येथे आकर्षित होत असत. नालंदा विश्वविद्यालयाचे ग्रंथालय ही सात मजल्यांची इमारत होती असे म्हंटले जाते.

अर्थात याबद्दल अतिगर्व करण्याची आपल्याला संधी नाही, कारण अशी विश्वविद्यालये इतर ठिकाणीही उपलब्ध होती. ती म्हणजे प्लेटोनिक अकॅडमी (अथेन्स, ग्रीस) - स्थापना ख्रिस्तपूर्व ३४७ – लय ख्रिस्त पश्चात ५२९ (९१६ वर्षे), प्लेटोचा शिष्य अरीस्टोटल याने स्थापन केलेले पेरीपॅटेटिक स्कूल (अथेन्स) -ख्रिस्तपूर्व ३३५, आलेक्झांड्रिया विश्वविद्यालय ही याची उदाहरणे आहेत. आलेक्झांड्रियाचे ग्रंथालय देखील असेच प्रचंड होते असे म्हणतात. हान राज्यकर्त्यांनी चीनमध्ये ख्रिस्तपश्चात ३०० मध्ये असेच राजविद्यालय चीनी शहर "ताई स्च (Tai xue)" येथे स्थापन केले होते. त्यापाठोपाठ कोरियामध्ये देखील ताएहाक (ख्रिस्त पश्चात ३७२) आणि गुकहाक (ख्रिस्त पश्चात ६८२) येथे देखील अशी विश्वविद्यालये स्थापन झाली होती. असेच विद्यापीठ इराणमधील गुंदिशापूर येथेही स्थापन झाले होते.

या सर्व विश्वविद्यालयांमधून तर्कशास्त्र, खगोलशास्त्र, राज्यशास्त्र, स्थापत्यशास्त्र, अर्थशास्त्र, गणित, विज्ञान, रसायनशास्त्र आणि वैद्यकशास्त्र अशा गहन विषयांवर अभ्यास आणि संशोधन चालत असे आणि अशा माहितीची देवाण-घेवाणही चालत असे. परंतु अशी ज्ञानकेंद्रे भारतात सर्वात जास्त प्रमाणात होती ती म्हणजे - नालंदा (बिहार), तक्षशीला (सध्या पाकिस्तानात), विक्रमशीला (बिहार), वल्लभी (सौराष्ट्र), पुष्पगिरी (ओदिशा), ओदन्तपुरी (ओदिशा).
बिहार आणि ओदिशा - जी भारताची सन्माननीय ज्ञानकेंद्रे होती - ती आज भारतातील सर्वात मागास राज्ये म्हणून गणली जातात हा दैवदुर्विलासच म्हणावा लागेल नाही का?

प्रख्यात चीनी विद्वान ह्यु एन स्चंग याने आपल्या ज्ञानार्जनासाठी दोन ठिकाणी वास्तव्य केल्याचे नमूद केले आहे - नालंदा आणि वल्लभी.

विक्रमशीला हे असेच प्रसिद्ध विश्वविद्यालय. त्याचे विस्तृत वर्णन तत्कालीन तिबेटी अभ्यासू आणि विद्वान "तारानाथ" याने केले आहे. या विश्वविद्यालयातील शिक्षक आणि विद्वान इतके प्रसिद्ध होते की तिबेटच्या राजाने आपले अभ्यासू प्रतिनिधी विक्रमाशीलेला पाठवून भारतीय संस्कृती आणि ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी विद्यापीठाच्या कुलगुरूंना आग्रहाचे निमंत्रण दिले. परंतु त्यांनी तसे केले नाही. अखेरीस तिबेटच्या राजाने नालंदा विद्यापीठाचे आचार्य कमलशील यांना निमंत्रण दिले आणि ते त्यांनी मान्य केले. ओदन्तपुरीचे विद्वान ज्ञानभद्र आणि त्यांचे दोन पुत्रदेखील तिबेटला स्थलांतरित झाले आणि त्यांनी ओदन्तपुरीच्या धर्तीवर ल्हासा येथील मठाची स्थापना केली.

नंतर अकराव्या शतकात बौद्ध धर्माच्या प्रभावाखाली विक्रमशीला विद्यापीठाचे तत्कालीन प्राचार्य, आचार्य अतिश (किंवा दीपंकर श्रीज्ञान) तिबेटला गेले आणि त्यांनी तिबेटमध्ये बौद्ध धर्माची स्थापना केली. तिबेटचा मंत्री "थोन्मी संभुत" याने नालंदा विद्यापीठामध्ये शिक्षण घेतले आणि तिबेटमध्ये जाऊन बौद्ध धर्माचा प्रसार केला. तिबेटच्या राजाने देखील बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि बौद्ध धर्म राजधर्म म्हणून घोषित केला.

चीन आणि इतर देशांची कहाणी पुढच्या भागांमधून …..

संस्कृतीप्रकटन

प्रतिक्रिया

वाचतोय. सध्या पुभाप्र.

पैसा's picture

23 Nov 2015 - 3:39 pm | पैसा

फक्त जंत्री स्वरुपात न देता काही चित्रे, संदर्भासाठीचे दुवे किंवा पुस्तके यांची यादी असे काही दिलेत तर ही मालिका जास्त विश्वासार्ह आणि वाचनीय होईल ना?

धन्यवाद....मिसळपाववर मी नवीनच लिहिता झाल्याने संदर्भखुणा कशा जोडाव्या आणि चित्रे कशी टाकावी याबद्दल मला माहित नाही. मार्गदर्शनाबद्दल आगाऊ आभार...

पैसा's picture

23 Nov 2015 - 4:26 pm | पैसा

http://www.misalpav.com/help.html इथे तुम्हाला पाहिजे त्या सर्व प्रकारची मदत पाने आहेत.

भानिम's picture

23 Nov 2015 - 4:53 pm | भानिम

बघतो...धन्यवाद...

'पैसा'.... आपल्यासाठी प्रश्न...प्रकाशित करत असलेले हे भाग एकमेकांना लिंक करणे शक्य आहे का? व ते कसे? म्हणजे वाचकांना सलग वाचनाचा आनंद घेता येईल. मार्गदर्शनासाठी धन्यवाद!

पगला गजोधर's picture

23 Nov 2015 - 4:39 pm | पगला गजोधर

मुस्लिम धर्माच्या स्थापनेनंतरच्या कालखंडाचा यात समावेश आणि विचार केलेला नाही.

तुमच्या परवानगीने विचारू शकतो का, ''का बरे नाही केला ?''

पूर्व युरोप, मध्य आशिया, ग्रीस आणि आफ्रिका अशा विविध प्रांतांतून मानवसमूह भारतात स्थलांतरित झाले आणि त्यांनी भारत हीच आपली भूमी मानली. भारताच्या "सुजलाम सुफलाम" भूमीने सर्वांना प्रेमाने जवळ केलं आणि आपली जगावेगळी भारतीय संस्कृती जन्माला आली.

या विविध समुहातले हिंदू कुठचे ? त्यांचा मूळ धर्म कोणता ?
हिंदू धर्म/ संस्कृती स्थापना कालखंड कोणता ? भारतीय संस्कृती जन्माला आली तो कालखंड कोणता ?

मुद्दा १ -

लेखमाला पूर्वीच लिहिली असून "मुस्लिम धर्म स्थापनेनंतरच्या" ही पुस्ती आज लेख मिपावर प्रकाशित करताना जोडली, त्यात थोडीशी चूकच झाली आहे. खरेतर "मुस्लिम धर्मप्रणीत आक्रमणानंतर…. " असे म्हणायला हवे होते. क्षमस्व. या आक्रमणांच्या आधी भारतातील सर्व सार्वभौम सत्ता लयाला गेल्या होत्या आणि भारत एकसंध न राहता तुकड्यातुकड्यांमध्ये विभागला गेला होता हे आपणा सर्वांना ज्ञात आहेच. त्यामुळे भारतीय संस्कृतीच्या 'प्रसारा'च्या दृष्टीने या काळाचे महत्व नाही हे लक्षात आले असेलच.

मुद्दा २ -

संशोधनाप्रमाणे 'हिंदू' ही आपल्या संस्कृतीला इतर संस्कृतींनी दिलेली उपाधी आहे. (सिन्धु… हिंदू उपपत्ती वैगरे…) आर्यांची संस्कृती 'वैदिक' म्हणता येईल, तर भारतातील आर्यपूर्व संस्कृतींमध्ये 'धर्म' अशी संकल्पना अस्तित्वात होती असे वाटत नाही. असो. हा एक वेगळा चर्चेचा विषय आहे. सध्या "हिंदू' म्हणजे कोण अशी स्फोटक चर्चा मिपावर आधीच चालू आहे, त्यामुळे या विषयाला हात घालण्याची माझी सध्या हिम्मत आणि इच्छा दोन्ही नाही, कसे? (दोन स्मायली) म्हणूनच माझ्या लेखमालेचे नाव "भारतीय संस्कृती" असे आहे… त्यात 'धर्म' हा केवळ एक आनुषंगिक 'annexe' आहे (अजून दोन स्मायली)

'पैसा' यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे नंतर संदर्भासाठी लिंक्स पेस्टीनच…… धन्यवाद

उगा काहितरीच's picture

23 Nov 2015 - 4:42 pm | उगा काहितरीच

मुळात प्रॉब्लेम असा आहे ना , काळ आहे 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर'. आणि आपल्या पुरातन संस्कृतीचा प्रॉब्लेम असा की पुरावे फार कमी उपलब्ध आहेत . याच्या अगदी उलट पाश्चात्त्य संस्कृतीत पुरावे (पुरातन वस्तू , लेखन इत्यादी ) फार चांगल्या प्रकारे जतन करून ठेवण्याची वृत्ती दिसते. सो आपल्याला खरंच आपल्या संस्कृतीच्या वैभवी काळाबद्दलच्या माहितीचा प्रसार व्हावा असे वाटत असेल तर आपण अभ्यास करून खात्रीलायक पुरावे शोधायला पाहिजेत असे प्रामाणिकपणे वाटते.
बाकी लेख चांगला झालाय हेवेसांनलगे ...

धन्यवाद....

काही लिंक्स माहितगार यांच्या धाग्यामध्ये पेस्टल्या आहेत …

प्रचेतस's picture

23 Nov 2015 - 4:58 pm | प्रचेतस

चांगली पण त्रोटक सुरुवात.

धन्यवाद....

माहितगार's picture

23 Nov 2015 - 5:29 pm | माहितगार

....काही ऐतिहासिक आणि 'refereed' दस्तऐवज आहे का? या दिशेने चिकित्सक आणि नि:पक्षपाती दृष्टीने काही मर्यादित संशोधनाचा उहापोह केला. त्यातून जी माहिती मिळाली ती थोड्या रंजक आणि वाचनीय लेखमालेच्या स्वरुपात इथे मांडत आहे. वापरलेले संदर्भ आणि संदर्भ सूची इथे देत नाहीये याबद्दल अत्यंत क्षमस्व.

असे का ? हे समजले नाही.

कारण आधी दिलेल्या प्रतिसादात म्हंटल्याप्रमाणे संदर्भ कसे द्यायचे माहित नव्हते… आणि संदर्भ मध्ये मध्ये देऊन वाचनाच्या प्रवाहात अडथळा येऊ नये असे मला वाटत होते….

'पैसा' यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे नंतर संदर्भासाठी लिंक्स पेस्टीनच…… धन्यवाद

काही लिंक माहितगार यांच्या धाग्यामध्ये पेस्टल्या आहेत …

भाऊंचे भाऊ's picture

23 Nov 2015 - 5:31 pm | भाऊंचे भाऊ

काय हो आपल्या पुरातन प्राचीन संस्कृतीमधे टाइम ट्रॅवलींग ची काही उदाहरणे आहेत काय ? म्हण्जे काळाच्या मागे जाउन घटनाक्रम बदलणे वगैरे वगैरे ?

वैज्ञानिक इतिहासाचे संशोधन केले नाही… फक्त ऐतिहासिक दृष्टीकोनातून वाचन केले… त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही…(हव्या तेवढ्या स्मायली कल्पू शकता)
क्षमस्व आणि धन्यवाद…

भाऊंचे भाऊ's picture

23 Nov 2015 - 9:15 pm | भाऊंचे भाऊ

मला स्वतःला अल्पमतीप्रमाणे टाइम ट्रावलींग संकल्पनेचे काही रेफरंस मिळाले नाहीत म्हणून विचारले. म्हणजे काळावर ज्याची सत्ता अथवा मायेचा प्रभाव दाखवायला स्वप्नातली गोष्ट प्रत्यक्षात घडुन गेलेली असणे अनुभवने वगैरे वगैरे उदा दिली जातात पण पुष्पक विमान प्रमाणे कधी कोणा मुनीने टाइम ट्रॅवलींग करुन भुतकाळातील घटना बदलुन एखाद्या राक्षसाचा काटा काढुन ते पुन्हा वर्तमान काळात आले अशा कथा कधी वाचायला मिळाल्या नाहीत. म्हणून आपली उत्सुकता होती, की याचा शोध आपल्या पुर्वजांनी तर लावला नसेल ? की संजय सरांप्रमाणे आपले पुर्वज वेळेला भौतीक एंटीटीच मानत नसावेत जी ट्रॅवल करायचा प्रश्न येतच नही ?

संदीप डांगे's picture

24 Nov 2015 - 6:28 pm | संदीप डांगे

शोल्लीड मुद्दा आहे. असं काही प्रथमच वाचत आहे. यावर अधिक चर्चा अपेक्षित आहे.

आपले पूर्वज वेळेला भौतीक एन्टीटी किंवा मिती मानत नसावेत. कारण बहुधा वेळ हा प्रकारच माया/भ्रम आहे असे मानत असावेत.

यासोबतच आजच्या काळात असलेल्या पण वेदपुराणात न उल्लेखलेल्या व त्याउलट गोष्टींची यादीही बनवता आली तर ब्येष्टच.

माहितगार's picture

23 Nov 2015 - 5:41 pm | माहितगार

कंबोडिया (कम्हुज किंवा कम्बोज), जावा (यव द्वीप), सुमात्रा आणि मलाया (मलेशिया) या ठिकाणी असलेल्या सोन्याच्या खाणी आणि त्यातून मिळणारे सोने हे मुख्य आकर्षण होते. त्यामुळेच या बेटांचा उल्लेख "सुवर्ण द्वीप" असा होत असे. हे व्यापारी काशी, मथुरा, उज्जयनी, प्रयाग आणि पाटलीपुत्र अशा त्याकाळच्या संपन्न शहरांतून येत असत आणि भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील मामल्लापुरम (तमिळनाडू), ताम्रलिप्ती (तामलूक - मेदिनीपूर पश्चिम बंगाल), पुरी (ओदिशा) आणि कावेरीपट्टणम (तमिळनाडू) या बंदरावरून जहाजांची वाहतूक होत असे. जिथे जिथे हे व्यापारी गेले तिथे तिथे त्यांनी भारतीय संस्कृतीची बीजे रोवली.

चिकित्साकरणे हा मिपाकर म्हणून आमचा आपद्धर्म आहे म्हणून हे जरा संदर्भासहीत इस्कटून सांगीतल्यास अभिमानाला विश्वासार्हतेची जोड मिळण्यास हातभार लागेल असे वाटते. बाकी लेखनशैली वाचनीय आहे. पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा)

sandarbha hava

'पैसा' यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे नंतर संदर्भासाठी लिंक्स पेस्टीनच…… धन्यवाद

विकिपीडिया लिंक - सुवर्ण द्वीप https://en.wikipedia.org/wiki/Suvarnabhumi

हे पुस्तक मिळाल्यास वाचा -

वाचा पाने १८६ पासून पुढे - मुख्यत्वे करून पान १८९ - http://ddceutkal.ac.in/Syllabus/MA_history/paper-12.pdf

https://bookshop.iseas.edu.sg/publication/1210 हे पुस्तक मिळाल्यास वाचा - Nagapattinam to Suvarnadwipa: Reflections on the Chola Naval Expeditions to Southeast Asia

माहितगार's picture

24 Nov 2015 - 10:08 am | माहितगार

धन्यवाद. पुभाप्र (पुढील भागाची प्रती़क्षा)

आढात नाही तर पोहर्‍यात कुठुन येणार ? जरी पुरावे मिळाले तरी त्या देशातल्या लोकांनी मानायला हवेना ? मला जगाच्या पाठीवर ( ऐकुन ) दोन देश माहित आहेत जे भारताला मानतात. भ्रारतीय संस्क्रुतीचा आदर करतात.

१) मॉरीशस
२) इंडोनेशीया

पैकी इंडोनिएशीयाने आता आपल्या सांस्क्रुतीक पॉलीसी बदलल्या आहेत.

पुर्वी त्यांना आस्था होती म्हणुन त्यांच्या देशात बँकेला कुबेर म्हणत. त्यांच्या देशात रामायणावर नाटके व्हायची. त्याच्या देशातल्या एअर लाईन्सचे नाव गरुडा एअर्लाईन्स आहे. पण आता त्यांना भारताचे किंवा भारतीय संस्कृतीचे फारसे आकर्षण राहिले नाही.

टवाळ कार्टा's picture

23 Nov 2015 - 7:38 pm | टवाळ कार्टा

नेपाळ, थायलंड, श्रीलंका यांना पण अ‍ॅडवा

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद….

धन्यवाद नितीनचंद्र....

माहिती त्रोटक वाटण्याची शक्यता आहे त्याबद्दल क्षमस्व. माहिती आवाका खूप मोठा आहे आणि मुळात ज्या माध्यमासाठी लेखमाला लिहिली, त्यामध्ये प्रत्येक भागात शब्दसंख्या बंधनाची मर्यादा होती…

धडपड्या's picture

24 Nov 2015 - 5:51 pm | धडपड्या

बरेच ठिकाणी असे वाचायला मिळते, की भारताबाहेरचे लोक त्यांच्या संस्कृति येथे घेउन आले. हे सत्य असेल, तर या संस्कृति त्यांच्या मूळ ठिकाणी, थोड्या प्रमाणात का होईना, अस्तित्वात असायल्या हव्या... अथवा, त्यांची संक्रमित रुपे तरी असतीलंच... आपण यावर प्रकाश टाकू शकाल का? कोठे कोठे अश्या पाउलखूणा आढळतात?

भारतात बाहेरुन आलेल्या संस्कृतींचा मिलाफ होऊनच तर आपली जगावेगळी भारतीय संस्कृती तयार झाली आहे. खूप चांगला आणि खूप व्यापक विषय आहे. पण ससंदर्भ आणि सुसूत्र लिहिण्यासाठी खूप अभ्यास आवश्यक आहे....

स्वच्छंदी_मनोज's picture

8 Dec 2015 - 8:48 pm | स्वच्छंदी_मनोज

मस्तच सुरुवात. पुढचे भाग वाचायचे आहेत पण उत्तम लेखमालीका वाचायला मिळेल अशी आशा आहे.

एक शंका -

परंतु अशी ज्ञानकेंद्रे भारतात सर्वात जास्त प्रमाणात होती ती म्हणजे - नालंदा (बिहार), तक्षशीला (सध्या पाकिस्तानात), विक्रमशीला (बिहार), वल्लभी (सौराष्ट्र), पुष्पगिरी (ओदिशा), ओदन्तपुरी (ओदिशा).

यात मगध विद्यापीठाचा उल्लेख कसा नाही? ओदन्तपुरी विद्यापिठ म्हणजेच मगध विद्यापिठ असे वाचले आहे. ह्याला काही आधार आहे काय?

तसेच ह्या विद्यापिठांच्या इतर शहरांमधून पण शाखा असाव्यात किंबहूना असल्या पाहीजेत कारण ह्याच मगध विद्यापिठाची एक शाखा आपल्यायेथील आगाशिव लेण्यात (सध्याच्या कराडजवळील जखीणवाडी लेण्या) कार्यरत होती असे पुरावे मिळाल्याचे स्मरते.

तसेच पुर्वापार गुरुकुल पद्धतीवर विश्वास आणी मान्यता असणार्‍या आपल्या देशात विद्यापीठ पद्धत केव्हा बनली असावी? की एखादे गुरुकुल एवढे मोठे होत असावे की त्याला विद्यापिठ म्हाणता येऊ शकेल?गौतम बुद्धांचा कार्यकाल, कार्यक्षेत्र व बुद्धधर्माचा जोराने प्रसार होण्याचा काल यांचा या विद्यापिठ स्थापनेशी संबंध लावता येउ शकतो काय?
यात निव्वळ योगायोग असावा की जाणून बुजून राजाश्रयाने विद्यापिठ स्थापनेला दिलेला पाठिंबा (कारण बहुतांश विद्यापिठे ही बौद्धधर्मप्रसार जेथे जास्त होता तिथे आहेत असे वाटते)?

असो, या आणी अनेक प्रश्नांची उत्तरे पुढील भागात मिळतील अशी आशा करतो.

पुभाशु.

भानिम's picture

8 Dec 2015 - 9:54 pm | भानिम

इतिहासाच्या अभ्यासानुसार असे कळून येते की प्रत्यक्ष मगध येथे विद्यापीठ नव्हते. मगधच्या जवळचे विद्यापीठ म्हणजे नालंदा. सध्याचे मगध विद्यापीठ स्वातंत्र्योत्तर काळात 1962 मध्ये स्थापन केले गेले. लेखमालेचे मुख्य प्रयोजन भारतीय संस्कृतीचा प्रसार असल्याने विद्यापीठांवर सविस्तर चर्चा केली नाही. पुढेमागे जमल्यास हा विषय घेऊयात.