वाडा- लोप पावत चाललेल्या सांस्कृतिक खुणा

pradnya deshpande's picture
pradnya deshpande in जनातलं, मनातलं
29 Oct 2015 - 4:44 pm

वाडा- लोप पावत चाललेल्या सांस्कृतिक खुणा
वाड्याचे प्रवेशद्वार

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील तालखेड हे छोटेशे गाव. निजामकालीन तालुका म्हणून त्याची ओळख आजही टिकवुन आहे. दहा हजार लोकवस्तीच्या या गावात नुकताच एका प्रोजेक्टच्या निमित्ताने जाण्याचा प्रसंग आला. शेतकर्‍यांची मिटींग घ्यावयाची होती. बोळातून जाणाऱ्या छोट्या रस्त्यावरुन आत शिरलो तसे समोर घडीव दगडात बांधलेला भला मोठा दरवाजा समोर आला. दगडाचा उंबरवठा ओलांडून आत शिरलो तसे दिडशे वर्ष जुन्या खाणा खुणा अंगावर खेळवत आणि समकालीन बांधकामाशी दोस्ती करत एक वाडा उभा होता.

तालखेड गावात अजूनही जुने वाडे दिमाखात उभे आहेत. त्यातले समोरासमोर तोंड करुन असलेले दोन वाडे सर्वात मोठे. वंशपरंपरेने गावात वडीलकीचा मान असलेल्या चांडक कुटुंबियांचे हे दोन वाडे. एक कुटुंब कायमस्वरुपी औरंगाबादला स्थायिक झाले असले तरी त्यांनी वाड्याचे घरपण आजही जपून ठेवलेले दिसले. दिवाळीच्या निमित्ताने चांडक कुटुंब वर्षातून एकदा येथे येत असल्याचे गावकऱ्यानी सांगितले. त्यांचेच चुलत बंधू असलेल्या हरिप्रसाद चांडक यांचा समोरच वाडा. दोन्ही वाडे जणू जुळे भाऊ. हरिप्रसाद आणि त्यांचा एक मुलगा आजही या वाड्यात राहतात.

उंबरवठा ओलांडताच समोरच घरातल्या कर्त्या पुरुषाची तसबीर टांगलेली होती. तसबीरिचे रंग फिके झालेले होते तरी चेहऱ्यावरचे कर्तृत्व अजूनही झळकत होते. ओसरीवरच पुरुषांची बैठक होती. येथे घरातील काही जणांचे पदवी हातात घेतलेले आणि काळा कोट घातलेले फोटो टांगले होते. भिंतीवर देवादिकांची चित्रे रेखाटलेली होती. ती किमान पन्नास वर्षापूर्वीची तरी असावीत. त्यांचे रंग फिके पडले होते तरी चित्रातील रेखीवता कायम होती. ओसरीवरच्या भल्या मोठया कोनाड्यातील जुनाट तिजोरी वाड्याने उपभोगलेल्या संपन्नतेचे दर्शन घडवीत होती. समोररासमोरच्या दोन पैकी एका ओसरीतून माडीवर जाण्याच्या दगडी पायNया होत्या. ओसरी ओलांडताच मोठ्ठे अंगण. त्यातून समोरच्या माडीवर चढणार्‍या दगडी पायर्‍या, अंगणाला लागून छोट्या छोट्या खोल्या होत्या. अंगणातच दहा बारा वर्षाचा मुलगा सहज लपून बसू शकेल असा पंचधातूचा हंडा, एका कोपर्‍यात घातलेले दगडी जाते त्याच्याच बाजूला लाकडी संदूक.

वाड्यात माणसांचा वावर नसला तरी त्याचे जागलेपण कायम होते. समोरच्या वाड्यात मात्र माणसांबरोबरच चिमण्यांचाही जोरात कालवा चालला होता. अंगणातील वृुंदावनातील हिरवीगार तुळस वाड्याच्या जिवंतपणाची साक्ष होती. गरजेनुसार या वाड्याच्या अंगाखांद्यावर आधुनिक सुखसोयीचे साज चढले होते तरी त्याची भव्यता आणि जुनेपण कायम होते. सिमेंटच्या जंगलांमधून अशा जुन्या वाड्यांमध्ये काही काळ जरी घालवला तरी मनाला आणि शरिराला शांत वाटते. आधुनिक सुखसोयींनी दैनंदिन आयुष्य सुखर होईलही कदाचित पण अशा वाड्यांमधून मिळणारी मनाची शांतता लाखो रुपये खर्चूनही मिळणार नाही हे मात्र खरे.

मांडणीअनुभव

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

29 Oct 2015 - 4:50 pm | प्रसाद गोडबोले

आमच्या सातार्‍यातलेही जवळपास सारे वाडे जमीनदोस्त झाले आहेत सोमण वाडा कान्हेरे वाडा सगळे पडले , बाकीचे हळु हळु नामशेष होत आहेत ... फक्त शनिवार पेठेतील परांजपे वाडा तेवढा काळाच्या कसोटीला पार पडुन अजुनही वाडा संस्कृती टिकवुन आहे .

बाकी आमच्या आजोबांचा वाडादेखील आता चारी बाजुंनी वेढलेल्या बिल्डींगींच्या कोनाड्यात अडकल्या सारखा झाला आहे ... बघुया किती दिवस तग धरुन रहातो अजुन ते !!

विजुभाऊ's picture

29 Oct 2015 - 6:42 pm | विजुभाऊ

मी सातार्‍यात वाड्यातच राहिलोय.
यादोगोपाळ पेठेतील "भोरकर वाडा" आठवतोय.
खूप जंगी इमारत होती.
भवानी पेठेत ( आराम हॉटेल समोर) चौकात दिवाण महाजनी वाडा ( सिटी लाईट दुकान त्यांचेच आहे) अजून शाबूत आहे. आतूनही तो फारसा बदलेला नाहिय्ये.

प्रसाद गोडबोले's picture

29 Oct 2015 - 6:47 pm | प्रसाद गोडबोले

महाजनी वाडा

खरेच इतक्या प्राईम लोकेशन ला असुनही तो वाडा अजुन टिकला आहे हे मोठ्ठे आश्चर्यच आहे !!

खरंय.याचसाठी गावातला ढासळता वाडा सांभाळतोय आम्ही.परंतु हे जुने स्ट्रक्चर सांभाळणे दिवसेंदिवस फार खर्चिक होत जाते.त्यात जरा दुर्लक्ष झाले आपण काही महिने गेलो नाही तर गाववाले चक्क चो-या करतात कड्या कोयंडे कुलपासह.असाही अनुभव घेतलाय.पण वाडा म्हणून राहू दिलाय.त्यातही दुरुस्तीचा खर्च करायला कोणीही तयार नसते पण विकायचे म्हंटले तर अनेक डोकी निघतात.कारण वडिलोपार्जित असतात वाडे.मग नको ती कटकट असे वाटून एकेकदा विकायचा विचार येतो खरा.

कविता१९७८'s picture

29 Oct 2015 - 5:45 pm | कविता१९७८

खरच आजकाल इथे वाडे दिसतच नाही, तारापुर ला अगदी बसस्टॉप वरच एक जुना वाडा होता , रोज बसने शाळेत जाता येता दिसायचा, दादिमहाल नाव होते त्याला, लहान असताना घाबरायचो भुत बंगला म्हणुन बोलायचे सगळे, नंतर मोडताना तेव्हा आतुन कसा आहे ते पहायला मिळायचा, या वाड्यातुन एक भुयारी रस्ता होता तो थेट वसईच्या किल्ल्याला मिळतो असे नंतर समजले, थोड्याजवळच तारापुरचा किल्ला आहे. खुपच वैभवशाली वाडा होता.

प्रचेतस's picture

29 Oct 2015 - 8:59 pm | प्रचेतस

लेख खूपच त्रोटक वाटला.

बाकी अलीकडेच मेणवलीचा नाना फ़डवणीसांचा सहा चौकी वाडा अगदी आतूनही पाहता आला.

जस्ट आजच एकाकडेच सेम ह्याच नावाचा (वाडा : लोप पावत चाललेल्या सांस्कृतिक खुणा) एक प्रबंध पाहिला. पदवीसाठी तयार केलेला. त्यात सोलापुर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील वाड्यांचे वर्णन आहे. बराच विस्त्रुत आणि फोटोग्राफ्सनी संपन्न वाटला. जवळपास १५० पानी होता. पानगावचा पानश्यांचा (पेशव्यांचे तोफची म्हणे) वाडा पाहायला भारी वाटले.

आदूबाळ's picture

30 Oct 2015 - 7:40 pm | आदूबाळ

तोफची नव्हे. तोफखान्याचे सरदार.

पुण्यात खडक / खडकमाळ नावाचा जो भाग आहे (जिथे सध्या मामलेदार कचेरी आहे) तिथे तोफांचा कारखाना होता. तिथले जुने वाडेहुडे पाडताना अजूनही तोफगोळे सापडतात.

उगा काहितरीच's picture

29 Oct 2015 - 11:39 pm | उगा काहितरीच

आमचाही "होता" वाडा ! कधीकाळी घोडा पण बांधल्या जात होता वाड्यात . पण आता पाहवत नाही पण वाड्याकडे ! कदाचित त्यामुळेही असेल पण १-१.५ वर्षात गेलोच नाहीये मुळगावी :-(

दिवाकर कुलकर्णी's picture

30 Oct 2015 - 1:06 am | दिवाकर कुलकर्णी

बंगले गेले वाडे गेले,चाळ वाजे ठणाणा
डोक्यावरच्या छपरासाठी फ्यैट चालेल म्हणाना

दिवाकर कुलकर्णी's picture

30 Oct 2015 - 1:07 am | दिवाकर कुलकर्णी

बंगले गेले वाडे गेले,चाळ वाजे ठणाणा
डोक्यावरच्या छपरासाठी फ्यैट चालेल म्हणाना

लोकमान्य टिळक यांचं बालपण जिथे गेलं तिथे त्यांचं स्मारक केलंय रत्नागिरीत. तो पण एक वाडाच आहे जुना. फक्त फोटो काढू देत नाहीत.

मित्रहो's picture

30 Oct 2015 - 4:10 pm | मित्रहो

कडू असले तरीही हे सत्य आहे. मोठ्या शहरात वाडे जवळजवळ बाद झालेत छोट्या शहहरातून बाद होताहेत. लहान गावात अजूनही वाडे आहेत. जुन्या वाड्याचा रखरखाव हा खर्चिक प्रकार आहे. मातीच्या भिंती, कौलारु छप्पर, मातीचे किंवा शहाबादी फरशीचे फ्लोअर, लाकडाचा ढाचा यामुळे वाडे शाबूत ठेवणे कठीण होत चालले आहे. काही वाड्यात जुने भाडेकरु हाही एक त्रास आहे. अजून एक कारण म्हणजे लयास चाललेली एकत्र कुटुंब पद्धती. अंशीच्या दशकातच एकाच वाड्यात एकापेक्षा जास्त चुली व्हायला लागल्या होत्या. आता तर बरेच वाडा सोडून गेले. बालपण म्हणजे दहावीपर्यंत वाड्यातच गेले. वाड्याविषयीच्या साऱ्याच आठवणी गोड होत्या, सुंदर होत्या असे म्हणता येनार नाही.