इंद्रध्वज आणि शक्रोत्सव; थोडी माहिती, थोडे प्रश्न

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
4 Sep 2015 - 2:17 pm
गाभा: 

विवीध भारतीय देवतांच्या संदर्भाने वेगवेगळ्या ध्वजस्तंभांचे उल्लेख येतात. त्यातील संस्कृत साहित्यातून मोठ्या प्रमाणावर उल्लेख येणारा एक ध्वजस्तंभ म्हणजे इंद्रध्वज होय. इंद्राचे पर्यायी नाव शक्र (पाली भाषा: सक्क) आणि ध्वज (पाली भाषा: धज?) चा पर्यायी शब्द 'केतु' मिळून इंद्रध्वजास शक्रध्वज, इंद्रकेतु, शक्रकेतु असे पर्यायी शब्द आहेत. बौद्ध वाङमयात या पर्यायांसोबतच सक्क आणि धज शब्दांसोबतसुद्धा अधिक शब्द बनवून वापरले जात असण्याची शक्यता वाटते. (दुजोरा हवा)

भारतीय देवतांच्या संदर्भाने येणारे ध्वज-स्तंभ जसे ध्वजांचे मुख्य काम करतात तसे ते विशेष प्रसंगी अथवा उत्सवांमधून काठी पूजा स्वरूपानेही भारतीय संस्कृतीत महत्वाचे राहीले आहेत.

अर्थात देवक-स्तंभ आणि काठी पूजा परंपरा या जगभरच्या मानवी संस्कृतीसोबत अतीप्राचीन काळापासून चालत आल्या आहेत. यातील बहुसंख्य काठी पूजा प्रकारांचे पुजन देवीस्वरूपात होत असावे पण भारतात इंद्रध्वजाप्रमाणे पुरुष देवतांच्या ध्वजस्तंभांचेही पुजन होतानाही दिसून येते. माझे मिसळपाव संस्थळावर आधीपासूनच गुढी उभारनी आणि महाभारतातील प्रक्षिप्त कथानकांची चर्चा असे दोन धागे आहेत. या धाग्यात त्या विषयाची अंशतः चर्चा असली तरी इंद्रध्वज हा स्वतंत्र धाग्याच्या रुपाने दखल घेण्या इतपत नक्कीच मोठा विषय असल्यामुळे वेगळा धागा काढण्याचा निर्णय घेतला आहे.

शक्रोत्सव: इंद्रध्वजपुजनाच्या सामुदायिक उत्सवास शक्रोत्सव असे म्हणत. महाभारतात आदिपर्वात शक्रोत्सव साजरा करण्यासाठी इंद्र चेदीराज उपरिचरास सुचवतो असे वर्णन आहे. महाभारतातच खिलपर्वात श्रीकृष्ण त्याच्या संवगड्यांना इंद्रकोपाची पर्वा न करता वार्षिक शक्रोत्सव (इंद्रोत्सव) बंद करण्याचा सल्ला आपल्या संवगड्यांना देतो. महाभारतातल्या आदीपर्वात हा उत्सव वर्ष प्रतिपदेस करण्यास सुचवले आहे तर खिलपर्वातून आणि इतर संस्कृत ग्रंथातून हा उत्सव साजरा करण्याच्या तिथी वेगवेगळ्या दिलेल्या दिसतात. तसेच इंद्रध्वज नेमका कसा दिसतो ते प्रतिमाविद्या (आयकॉनोग्राफी) च्या अनुषंगाने अभ्यासास उपलब्ध वर्णने कमी वाटतात जी उपलब्ध आहेत त्यात फरक जाणवतो. त्याशिवाय इतर ध्वजप्रकारांशी सरमिसळही उत्साहाने केली जाताना दिसते.

शक्रोत्सवाचे उल्लेख संस्कृत रघुवंश, भासांचे ‘मध्यमव्यायोग‘, शूद्रकाचे ‘मृच्छकटिकम्‌‘ नाटकांमधून येतात हि नाटके बहुधा सहाव्या शतकापुर्वी लिहिली गेली असावीत (दुजोरा हवा). उल्लेख रामायण, महाभारत आणि पुराणे असोत अथवा नाटके इंद्रध्वजाचे उल्लेख मुख्यत्वे उपमा अलंकाराच्या स्वरूपात (अगदी ठोकळेबाजपणा वाटेल एवढ्या मोठ्याप्रमाणावर) आले असावेत. हिरोंना तर इंद्रध्वजाची उपमा दिलेली दिसतेच पण युद्धांमध्ये धारातीर्तीपडणार्‍या व्हीलनपक्षाच्या नायकासपण इंद्रध्वजाची उपमा कुठे कुठे दिली आहे हे पाहून गंमत वाटते.

प्रामाणिकपणे सांगावयाचे झाल्यास मी मराठी विकिपीडियावर लिहिलेल्या संबंधीत लेखांना या निमीत्ताने भेट दिली जावी म्हणून, ह्या धागालेखाची रोचकता वाढवण्यासाठी इंद्रध्वजाची आणि शक्रोत्सवाची सर्व माहिती येथेच देणे शक्य असूनही टाळले आहे तेव्हा ती माहिती मराठी विकिपीडियावर वाचावी अथवा आवड आणि आवश्यकते प्रमाणे या धागा लेखाच्या प्रतिसादातून नकलवण्यास हरकत नाही.

इंद्रध्वज आणि शक्रोत्सव विषयक माहिती आंतरजालावरून शोधताना मला पडलेले काही प्रश्न असे:

१) महाभारत आदिपर्वातील शक्रोत्सवाचा उल्लेख या दुव्यावर संस्कृतातून उपलब्ध आहे. आणि हा मराठी अनुवादाचा वेगळा दुवा आहे. आंजावर अनुवाद उपलब्ध असूनही शक्रोत्सव विषयक श्लोकातील प्रत्येक शब्दाचे अर्थ वेगवेगळे लक्षात येत नाहीत. मला प्रत्येक संबंधीत श्लोकाचा शब्दवार अर्थ हवा आहे. किमान त्यातील मराठीत सध्या वापरात नसलेल्या, संस्कृत शब्दांचे मराठी अर्थ हवे आहेत. खास करून काही भाषांतरकार कोणत्यातरी संस्कृत शब्दाचा अनुवाद वेळू करत आहेत तर कोणत्या शब्दाचा अनुवाद वेळू केला जातो आहे ? वेळू आणि बांबू एकच का वेगवेगळ्या वनस्पती आहेत.

२) आदिपर्वातील शक्रोत्सवाचा आंतर्भाव भांडारकर प्राच्यविद्या संस्थेने प्रमाणीत केलेल्या आवृत्तीत आहे का ह्याची माहिती हवी आहे.

३) कृष्णाने शक्रोत्सव बंद करण्याचे सुचवले ते खिलपर्व प्रक्षिप्त असल्याचे आणि सौतीने लिहिले असण्याची शक्यता काही अभ्यासकांच्या लेखनातून दिसून आली पण एकुण आदिपर्वात चेदीराजास शक्रोत्सव चालू करण्याची सुचवणी वाचण्यासाठी कितीही रोचक असली तरी महाभारताच्या मुख्य कथानकाच्या अनुषंगाने, एकतर आदिपर्वात शक्रोत्सव उल्लेखाचे प्रयोजन समजत नाही. दुसरे असे कि खिलपर्वातील कृष्णाने शक्रोत्सव बंद करण्याचे सुचवले हा प्रक्षिप्त भाग सौतीकृत असेल तर आदिपर्वात शक्रोत्सव आरंभाचा उल्लेख प्रक्षिप्त असण्याची शक्यता असल्यास सौतीकडूनच आला असेल का त्या आधीच प्रक्षिप्त स्वरूपात आला असेल ?

४) रघुवंश, भासांचे ‘मध्यमव्यायोग‘, शूद्रकाचे ‘मृच्छकटिकम्‌‘ नाटकांमधून इंद्रध्वज आणि शक्रोत्सवाचे आलेले उल्लेख मुळसंस्कृत श्लोक आणि मराठी अनुवाद या स्वरूपात मिळाल्यास हवे आहेत.

५) खालील पुराणादी संस्कृत ग्रंथातून इंद्रध्वज आणि शक्रोत्सवाचे आलेले उल्लेख मुळसंस्कृत श्लोक आणि मराठी अनुवाद या स्वरूपात मिळाल्यास हवे आहेत.
पुराणादी संस्कृत ग्रंथातील उल्लेखांची यादी श्लोक क्रमांकासहीत आंजावर सापडली ती अशी:

* इन्द्रध्वज ब्रह्मवैवर्त्त ४.२१
* भविष्य ४.१३८.४९ , ४.१३९.१
* भागवत १०.४४.२३
* मत्स्य २४२.९, २४२.२४
* वराह १६४.३९ ,१६४.४०
* विष्णुधर्मोत्तर २.१५४.१३, २.१५५.५, २.१५६.१, २.१५७.१, २.१६०.१०
* हरिवंश २.१५.४ , २.१६.१+, ३.२६.१५
* वा.रामायण ४.१६.३७, ४.१७.२ , ५.४८.२४
* महाभारत आदि १७२.३ , वन ४२.८ , १४६.७० , उद्योग ५९.१५ , भीष्म ११९.९१ , द्रोण १०५.११ , शल्य ४.१६, १७.५३ , सौप्तिक ६.१६

६) बौद्ध वाङमयात इंद्र, इंद्रध्वज आणि शक्रोत्सवांचे उल्लेख असण्याची प्रथम दर्शनी शक्यता वाटते त्या दृष्टीने माहिती कुणास असल्यास हवी आहे.

७) जैन धर्मात इंद्र, इंद्रध्वज आणि शक्रोत्सवांचे सक्रीय उपयोजन आणि साहित्यातील उल्लेख असण्याची शक्यता आहे त्या संबंधी सुद्धा माहिती हवी आहे.

८) सातवाहन कालीन नाण्यावर इंद्रध्वजाचे चित्र असल्याचा आणि चित्तोढगढ येथील एका स्तंभावर इंद्रध्वजाच्या आयकॉनोग्राफीची माहिती असल्याचा उल्लेख वाचण्यात आला अशी पुरातत्व विषयक छायाचित्रे कुणास मिळाल्यास या धाग्यावर अवश्य द्यावीत

९) अजून एक शंका इंद्रास पर्यायवाची शब्द शक्र (पाली भाषा: सक्क) या शब्दाची व्युत्पत्ती काय आहे ? अथवा काय असू शकते ? इंद्राच्या विरोधी दानव गटाचे आचार्च शुक्र यांच्या नावात आणि शक्र या इंद्राच्या नावात बर्‍यापैकी साम्य आहे ते कसे काय ?

* मि.पा. सदस्य प्रचेतस यांच्या भाजे लेणीतील गूढ शिल्प लेखातून खालील छायाचित्र (त्यांच्या पुर्वानुमतीने त्यांचा कॉपीराइट असण्याची शक्यता) गजारूढ राजाच्या मागे एका सेवकाच्या हातात एक ध्वज दाखवला आहे. (मला हा ध्वज लक्षात येण्यास जरासा अवधी लागला :) ) स. आ. जोगळेकरांच्या हालाच्या गाथा सत्तसईवरील भाष्यात हत्तीवरील राजा इंद्र आणि मागील ध्वज इंद्रध्वज असण्याची शक्यता वर्तवली आहे. परंतु सदस्य प्रचेतस यांच्या भाजे लेणीतील गूढ शिल्प या लेखात या विषयावर तज्ञांमध्ये वेगवेगळी मते असल्याबद्दलची अधिक माहिती उपलब्ध आहे.

indradhvaja bhaje-prachetas

उपरोक्त प्रश्नातील क्रमांक ३ आणि ९ जनरल काथ्याकूटस्वरूपाचा आहे तो सोडून क्रमांक १, २, ४, ५, ६, ७ प्रश्नांच्या अनुषंगाने आलेले प्रतिसाद आणि प्रतिसादांश विकिप्रकल्पातून वापरले जाण्याची शक्यता असु शकते म्हणून प्रताधिकारमुक्त समजले जातील. क्रमांक ८ आणि छायाचित्रे नमुद करणार्‍याने प्रताधिकारमुक्ती विशेषत्वाने नमुद न केल्यास कॉपीराईट संबंधीत कॉपीराइट मालकाचा.

आपल्या प्रतिसादांसाठी आणि अनुषंगिकाव्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी आभार.

प्रतिक्रिया

स. आ. गाडगीळांच्या हालाच्या गाथा सत्तसईवरील भाष्यात हत्तीवरील राजा इंद्र आणि मागील ध्वज इंद्रध्वज असण्याची शक्यता वर्तवली आहे

स. आ. जोगळेकर असे म्हणावयाचे आहे काय?
बाकी त्या ध्वजावरील चिन्ह 'त्रिरत्न' हे आहे. बुद्द, धम्म आणि संघ ह्या तीन रत्नांचे ते प्रतीक.

माहितगार's picture

4 Sep 2015 - 4:02 pm | माहितगार

ओह सॉरी स. आ. जोगळेकर असेच म्हणावयाचे होते, दुरुस्ती करतो, लक्ष वेधल्याबद्दल खूप आभारी आहे.

माहितगार's picture

4 Sep 2015 - 4:07 pm | माहितगार

बाकी त्या ध्वजावरील चिन्ह 'त्रिरत्न' हे आहे. बुद्द, धम्म आणि संघ ह्या तीन रत्नांचे ते प्रतीक.

ग्रेट ! हे तर्कपूर्ण वाटते आहे. इंद्रध्वजाच्या क्लेम्स मध्ये भक्त मंडळींनी सॉलीड सरमिसळ केलेली दिसते. कथित इंद्रध्वजाचे बर्‍यापैकी उल्लेख आहेत म्हटल्यावर पुरातत्वीय अवशेष उपलब्ध होण्यास वाव असावा पण आयकॉनॉग्राफीतील सरमिसळ कमी झाल्यास ते शक्य होईल असे वाटते.

माहितगार's picture

21 Oct 2015 - 7:28 pm | माहितगार

@प्रचेतस

खालील चाफळ परिसरातील शिंगणवाडीचा मारुतीचे छायाचित्र बर्‍यापैकी मोठे करुन पाहील्या नंतर मारुतीच्या डाव्या बाजूस ध्वज पताका असावी आणि आपण चर्चा करतो आहोत तसे तिन टिंबांचे चिन्ह याही ध्वजपताकेवर असावे असे मला वाटले तसेच आपल्यालाही वाटते आहे का ?

छायाचित्र सौजन्य विकिमिडीया कॉमन्स

shinganwadi maruti

माहितगार's picture

21 Oct 2015 - 7:35 pm | माहितगार

मुर्तीच्या डोक्यावरची वक्राकार वस्तुसारखे काय दिसते आहे ?

प्रचेतस's picture

21 Oct 2015 - 7:37 pm | प्रचेतस

शेपूट :)

त्रिरत्न नक्कीच नाही. टिपिकल शिवकालीन मारुती आहे.
मला ती वस्तू कमळासारखी किंवा शालशाखेसारखी वाटतीय. शेंदूर काढल्यावर मुळ स्वरुप प्रकट व्हावे.

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Sep 2015 - 3:47 pm | कैलासवासी सोन्याबापु

प्रचंड खोल अभ्यास आहे आपला 'महितग़ार' _/\_

काठीपुजेसंबंधी मला माहिती असलेले क्षेत्र म्हणजे आमचे कुलदैवत श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग, वाड़ी रत्नागिरी, जिल्हा कोल्हापुर हे आहे.

तरीही, इंद्रध्वज अन ह्याच्यात काय कनेक्शन असेल ते ज़रा अजुन उलगडुन सांगू शकाल काय?

माहितगार's picture

4 Sep 2015 - 4:26 pm | माहितगार

प्रचंड खोल अभ्यास आहे आपला 'महितग़ार'

नाही अहो खरेच तसे काही नाही. केवळ दिड-दोनवर्षांपासून सखोल आंतरजालीय शोध घेऊन लिहितो आहे एवढेच.

काठीपुजेसंबंधी मला माहिती असलेले क्षेत्र म्हणजे आमचे कुलदैवत श्री क्षेत्र ज्योतिर्लिंग, वाड़ी रत्नागिरी, जिल्हा कोल्हापुर हे आहे.

या माहितीसाठी धन्यवाद. मराठी विकिपीडियावर सध्या ज्योतिबा नावाचा लेख आहे आपण बहुधा याच देवतेच्या संदर्भाने उल्लेख करत आहात असे वाटते. एक छोटासा प्रश्न या यात्रेतील काठींना सासन काठी असा उल्लेख विकिपीडियावर दिसतो आहे यातील सासन शब्दास काही विशीष्ट अर्थ असल्यास कल्पना द्यावी.

देवस्थाने असलेल्या गांवबद्दल उर्वरीत माहिती कमी येते तशी काही माहिती उपलब्ध असल्यास तीही द्यावी. आपल्याकडे अथवा अजून कुणाकडे काठी यात्रा आणि ज्योतिबा मंदिरासंबंधाने स्वत:काढलेली छायाचित्रे असल्यास प्रताधिकारमुक्त स्वरूपात या दुव्यावरून चढवून हवी आहेत. (लगोलग आमची हि जाहीरात विनंती :) )

कैलासवासी सोन्याबापु's picture

4 Sep 2015 - 4:41 pm | कैलासवासी सोन्याबापु

सासन काठी हा बहुतेक 'शासन काठी' चा अपभ्रंश असावा, अर्थात ही माहिती ट्रिवियल नाही तर ऐकिवातली अन तर्क लावलेली आहे, आमची आई असे मुळ सांगते ह्या शब्दाचे जे तार्किक वाटले मला कारण आदराने ज्योतिबांस "दख्खन चा राजा" असेही म्हणल्या जाते तस्मात् अश्या ह्या देवाचे रूप असलेल्या अवतार असलेल्या प्रजाहितदक्ष राजाची निशाणी त्याची फिरवलेली द्वाही म्हणजे "शासन उर्फ़ सासन काठी" हे पटते, प्रत्येक पंचक्रोशीत (सांगली सातारा कोल्हापुर जिल्ह्यात) गावांना आलटून पालटून मान असतो काठी चा बहुतेक.

(ही माझी ऐकिव अन परंपरागत चालत आलेली माहिती आहे आपण त्याचे ऐतिहासिक अन ट्रिविया फॉर्म मधे कोलेशन एंड कंपाइलेशन करालच, ह्याला एक लीड समजा वाटल्यास, part of a folks imagination)

गामा पैलवान's picture

4 Sep 2015 - 10:48 pm | गामा पैलवान

सोन्याबापू,

तुम्ही म्हणता तसा मूळ शब्द 'शासन काठी' असावा. इंद्राचं एक नाव पाकशासन आहे. तर त्यातला पाक कुठे गायबला ते शोधणे रंजक ठरावे.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

4 Sep 2015 - 11:06 pm | माहितगार

इंद्राचं एक नाव पाकशासन आहे.

रोचक हे माहित नव्हते

तरीही, इंद्रध्वज अन ह्याच्यात काय कनेक्शन असेल ते ज़रा अजुन उलगडुन सांगू शकाल काय?

कुणा जाणकारांकडून अधिक माहिती मिळते का बघू. अधिक माहिती अभ्यासताना मी सुद्धा लक्ष ठेवेन. कोणत्या तिथींना कोणत्या जत्रा होतात या कडे अधिक ल़क्ष ठेवल्यास आणि छोट्यामोठ्या सर्व जत्रांची माहिती मराठी विकिपीडियावर आल्यास अजून माहिती मिळू शकेल. असो.

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Sep 2015 - 4:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही विकिप्रकल्पावर घेत असलेल्या परिश्रमांबद्दल आणि तुमच्या अभ्यासू वृत्तीला सलाम !

तुमचे असे लेख वाचून आमचे अनेक गोष्टींबद्दलचे आपसूक ज्ञानवर्धन होत आहे. त्यासाठी खास धन्यवाद !

यावरून आठवलं "शुक्लकाष्ट मागे लागेल" ( त्रास सुरू होईल ) हा वाक्प्रचार खरा शक्रकाष्ट मागे लागेल असा असावा काय?

अरविंद कोल्हटकर's picture

5 Sep 2015 - 5:03 am | अरविंद कोल्हटकर

'शुक्लकाष्ठ' म्हणजे गायबैल पळून जाऊ नये म्हणून त्यांच्या गळ्याभोवती बांधलेले आणि पायमध्ये अडखळणारे लोढणे असे वाचले आहे. शक्रकाष्ठ - इन्द्राचे लाकूड ह्याला तसा काहीच अर्थ नाही

माहितगार's picture

5 Sep 2015 - 8:54 am | माहितगार

इंटरेस्टींगली एका ऑनलाइन तेलगु - इंग्रजी डिक्शनरीत गुढी ह्या शब्दाचा एक अर्थ लोढणे असाही दिलेला आढळला अर्थात तेलगुत गुढी हा शब्द लाकुड या अर्थानेच येतो. त्याच प्रमाणे लोढणे या शब्दासाठी नुसते काष्ठ पुरले असते हिंदीत शुक्ल हा शब्द एखाद दोन वनस्पतींसाठीही वापरला जात असेल असे दिसते अथवा शुक्र शब्दाचा अपभ्रंश शुक्ल होऊन विशेषण म्हणुन येत असेल अशी शक्यता असू शकेल का ?

अरविंद कोल्हटकर's picture

5 Sep 2015 - 10:34 am | अरविंद कोल्हटकर

वर लिहितांना विसरलो असे वाटते. मूळ शब्द 'शुक्लकाष्ठ' असा नसून 'शुष्ककाष्ठ' असा आहे असेहि वाचले होते.

मोल्सवर्थच्या १८३१ आवृत्तीमध्ये पृ.१००७ वर 'शुक्लकाष्ठ'चा अर्थ 'लोढणे' असा दिला असून त्यापुढे ’Perhaps by mistake from शुष्ककाष्ठ’ अशी टीपहि दिली आहे

जालावरील ह्या पानावर 'शुष्ककाष्ठ' ह्याचा 'लोढणे' हाच अर्थ दाखविला आहे.

माहितगार's picture

5 Sep 2015 - 11:16 am | माहितगार

शुष्ककाष्ठचा अपभ्रंश असणे शक्य आहे

एखादी ब्याद मागे लागणे अथवा एखादा माणूस सातत्याने मागे लागणे या अर्थछटा जरा वेगळ्या असूनही, शुष्ककाष्ठ>>लोढणे >>पिच्छा वरूनही येऊ शकतात नाही असे नाही परंतु अंधूकशी शंका शिल्लक राहते असे वाटते.

सतिश गावडे's picture

4 Sep 2015 - 11:07 pm | सतिश गावडे

भारतीय देवतांच्या संदर्भाने येणारे ध्वज-स्तंभ जसे ध्वजांचे मुख्य काम करतात तसे ते विशेष प्रसंगी अथवा उत्सवांमधून काठी पूजा स्वरूपानेही भारतीय संस्कृतीत महत्वाचे राहीले आहेत.

कोकणात चैत्र महिन्यात होणार्या विविध देवस्थानांच्या यात्रांमध्ये आजूबाजूच्या गावांमधून "जतरकाठी" येते.

जतरकाठी अर्थात जत्राकाठी हा पुर्ण वाढ झालेला पंधरा वीस फ़ुटांचा अखंड बांबू असतो. हा बांबू रंगीत कापड गुंडाळून झाकलेला असतो तसेच त्याला घुंगरू, फुलांचे हार इत्यादींनी सजवलेला असतो. जत्रेच्या आदल्या रात्री वाजत गाजत आणि नाचत ही "जतरकाठी" निघते आणि जत्रेच्या दिवशी देवस्थानाला पोहचते. तिथे या काठीची विधीवत पूजा होते.

माहितगार's picture

5 Sep 2015 - 8:58 am | माहितगार

इंद्रध्वजास घुंगरु बांधले असल्याचा एक उल्लेख कालच कुठेसा वाचला पुन्हा दिसला की संदर्भ देइन.

कोकणातील हि देवस्थाने आणि जत्रांविषयी जाणकारांनी आणखी माहिती द्यावी अशी विनंती आहे.

सोलापुरला गड्डा यात्रेत ७ काठ्यांची मिरवणूक असते. संक्रांतीला ही यात्रा भरते. पण या काठ्यांचा ईंद्राशी काही संबंध नाही. ह्या काठ्या श्री सिध्दरामेश्वराच्या योगदंडाचे प्रतिक असतात. एका कुंभारकन्येला श्री सिध्दरामेश्वरांशी विवाह करायची इच्छा होती. त्यासाठी तिने घोर तप केले. श्रींना तर विवाह करायचा न्व्हता तेंव्हा आपल्या योगदंडाशी विवाह करायला संमती दिली. त्यांनंतर ती कुंभारकन्या होमात सती गेली. हा विवाह सोहोळा दरवर्षी साजरा केला जातो. संमती, अक्षता, होम आदि सर्व विधी होतात. ह्या काठ्या पूर्ण सजवलेल्या आणि साधारणपणे ३०-४० फूट ऊंच असतात. एकेक व्रतस्थ मानकरी ती काठी पेलतो. हा मान वेगेवेगळ्या जातीतील लोकांना आहे.
solapur gadda

सतिश गावडे's picture

5 Sep 2015 - 12:20 am | सतिश गावडे

माझा वरील प्रतिसाद अशाच काठ्यांच्या संदर्भातील आहे.

माहितगार's picture

5 Sep 2015 - 8:28 am | माहितगार

काय दृश्य आहे (पुढच्या सती शब्दामुळे विशेषणे लावणे कठीण जाते आहे एवढेच). एवढी उंच काठी कशी बनवली आणि नेली जात असेल ? ते सती प्रकरण वाचून मात्र गलबलल्या सारखे झाले. बाकी आपण नमुद केलेले 'श्री सिध्दरामेश्वर' आणि इंग्रजी विकिपीडियावरील हे Siddharameshwar एकच का तसे असेल तर आपण दिलेली माहिती इंग्रजी विकिपीडियातील लेखात जोडण्यास हरकत नाही. इंटरेस्टींगली सिध्दरामेश्वरांवर मराठी विकिपीडियावर अद्याप लेख नसला तरीही इंग्रजी विकिपीडियाचा लेख अनुवादीत होऊन टर्कीश (तुर्की) विकिपीडियावर गेला आहे. (आपल तत्वज्ञान आणि संस्कृती दुसर्‍या भाषा आणि देशात नेण्यासाठी विकिपीडिया एक सशक्त माध्य्म असू शकत याचे एक उदाहरण)

प्रतिसादासाठी आभारी आहे.

माहितगार's picture

5 Sep 2015 - 8:35 am | माहितगार

काठ्यांसोबत फक्त बापेच का आहेत. स्त्रिया केवळ प्रेक्षकात दिसतात असे का असावे.

काठी नाय बे अभ्या, नंदीध्वज असतय गड्डा मधे.

आप्ल्याला म्हैते की बे. पुणे मुंबई आणि ऊस ह्या अखिल महाराष्ट्राला कसे कळायचे?
त्यांना काठ्याच कळतात. ;)

कैलासवासी सोन्याबापु's picture

5 Sep 2015 - 5:56 am | कैलासवासी सोन्याबापु

अभ्या,

धार्मिक कर्मकांड व चाली ह्यांच्या ईवोलूशन संबंधी विचार करता प्रत्येक समकालीन रीतीचा संबंध मागे कुठेतरी असणारच. आता काठ्यांबद्दल बोलायचे झाले तर इंद्रध्वज ही काठी परंपरा वैदिक काळी असण्याची शक्यता आहेच (कारण वैदिककालीन 'पॉपुलर पॅनथियन' मधला तो सर्वात महत्वाचा देव होता फॉलोड बाय रूद्र, मित्र, वरुण अन सवितृ (बहुतेक सुर्य)) त्या शिवाय ऋग्वेदात सर्वाधिक स्तुति असलेला देव म्हणजे इंद्र तस्मात् वेदकालीन इंद्रध्वज हा पुढे चालून जसा जसा हिंदुधर्म एवोल्व झाला तसे तसे ह्या न त्या रुपात (विजयस्तंभावर चिन्हांकित होणे ते लोकल देवतांच्या यात्रेत मिसळणे) पुढे चालत राहिला फ़क्त वैदिककालोत्तर फेज मधे जेव्हा वैदिक देवतांचे पूजन मागे पडले व आज आपण म्हणतो त्या सगळ्या देवता प्रसिद्ध झाल्या (सहसा गुप्तकालानंतर) तेव्हा काही काही वैदिक परंपरा मात्र बेमालुमपणे आपल्या धार्मिक क्रियाकलापात शोषल्या गेल्या असे भासते

माहितगार's picture

5 Sep 2015 - 9:08 am | माहितगार

तुम्ही म्हणता तसे असू शकते अर्थात काठी पूजा हा वेदपुर्व काळापासूनही चालत आला असू शकतो कारण अवैदीक संस्कृती आणि आदीवासींमध्येही काठी पूजांचे बर्‍यापैकी प्रचलन दिसते. या संदर्भात Dr. Bidyut Lata Ray यांचा The Concept of the Goddess Khambhesvari in The Culture of the Orissan Tribes. हा लेख वेगळा दृष्टीकोण मांडताना दिसतो.

माहितगार's picture

6 Sep 2015 - 5:38 pm | माहितगार

चेदीराज उपरिचर 'वसू'कडून शक्रोत्सवाची सुरवात होणे आणि श्रीकृष्णाकडून वेगळ्या पर्वात शक्रोत्सवाचा अवलंब न करणे हा महाभारत कालीन परस्पर विरोध समजून घेण्याचा एक रोचक विश्लेषण प्रयत्न या दुव्यावर (इंग्रजी मजकुर) दिसतो आहे. त्या लेखाच्या मते चेदीराज उपरिचर 'वसू' हा पुरु राजवंशातील असेल आणि श्रीकृष्ण यादव राजवंशातील. पुरु राजवंश इंद्राची बाजू घेणारा म्हणून इंद्रास समर्पित उत्सव करत असेल तर श्रीकृष्ण स्पर्धक राजवंशाकडून असल्यामूळे त्याचा विरोध करत असेल (उपरिचर 'वसू' आणि श्रीकृष्ण यांच्यात एखाद दोन पिढ्यांचे अंतर असेल हे लक्षात घ्यावयास हवे) या विश्लेषण कर्त्याने तिबेटम्हणजे देवांचे राज्य मानले आहे त्यास नेमक्या आधाराशिवाय वाचताना साशंकता वाटेल पण इतर विश्लेषण अंतीम म्हणून स्विकारता येत नसले तरी दखल घेण्या इतपत रोचक आहे हे नक्की.

रोचक चर्चा.वाचतेय.माहितगार तर माहितगार आहेतच! प्रतिसाद पण माहितीपूर्ण!

राही's picture

6 Sep 2015 - 11:55 pm | राही

बहुतेक सर्वत्र अशी प्रथा आहे की यात्रा जिथून सुरू होते, तिथे एक ध्वज, दंड, पताका असे काहीतरी यात्रेच्या अग्रभागी असते. यात्रा निघण्याअगोदर उगमस्थानावर या ध्वज/काठीला सजवले जाऊन तिची यथासांग पूजा होते, मग विधिवत इष्टदैवताच्या गजरात हा काठी/ध्वज उचलला जातो आणि यात्रा अधिकृतपणे प्रस्थान ठेवते. उत्तर भारतात या काठीला छडी म्हणतात आणि ती पवित्र असल्याने तिला नुसती छडी न म्हणता 'छडी मुबारक' असे म्हटले जाते. अमरनाथ यात्रेतही ही छडी-मुबारक असतेच. फाळणीपूर्वीच्या हिंगलाज देवी (आता पाकिस्तानातील मकारान प्रांतात हिग्लाज नदीच्या काठची नानी मा) यात्रेचे वर्णन वाचले आहे. त्या काळी कराचीहून ही यात्रा निघे. छडी मुबारकची पूजा होऊन छडी उठे आणि यात्रा सुरू झाली असे लोकांना कळून येई. मग जत्था बनत राही. ही छडीसुद्धा एका विशिष्ट झाडाची असे.
असेही शक्य आहे की जुन्या काळी कसल्याच सोयी नसताना दुर्गम ठिकाणी प्रवास एकट्यादुकट्याने करण्याऐवजी समूहाने करणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीने श्रेयस्कर असे. यात्रेकरू एखाद्या मुख्य ठिकाणी जमून मग दुर्गम ठिकाणाकडे कूच करीत. छडी उंच धरल्यामुळे ती मागच्यांच्या दृष्टिपथात राही. त्यामुळे मागे पडलेल्या लोकांनाही रस्ता कळू शके. त्यामुळे ही छडीची प्रथा आली असेल. आजही मोठ्या सहली नेताना सहल-नेता गर्दीच्या ठिकाणी हातांत एक फ्लॅग उंच धरतो, ज्यामुळे सहलसदस्यांना गर्दीत नेमकी दिशा कळते.
अर्थात शक्रध्वजाचा संदर्भही आहेच.
अवांतर : मराठीतल्या 'फडका' या शब्दाचा उगम 'पताका' या शब्दामध्ये असू शकेल का? आणि फाटके वगैरे शब्दही मागून येतीलच. आणि कपडा हा सुद्धा 'पताका'चा वर्णविपर्यास असू शकतो का? अर्थात कार्पास हा संस्कृत उगमशब्द आहेच.

माहितगार's picture

7 Sep 2015 - 8:27 am | माहितगार

पताका नंतर पटका ही शक्यता गृहीत धरल्यास त्यानंतर फडका, कपडा संभाव्य असू शकतील. (मी पिटक या शब्दाचा अर्थ महाभारतातील श्लोकासाठी शोधतो आहे, शक्यता कमी वाटते पण पिटक आणि पटका असाही संबंध शक्य असू शकेल का ? एनी वे पिटक शब्दासाठी खाली वेगळा प्रतिसाद देतो आहे.) फडका शब्द पडका (पडून असलेला) या अर्थावरूनही येण्याची संभावना असू शकेल का ? 'पडीक असणे' वाक्प्रचार वापरात असतो.

आपल्या माहितीपूर्ण प्रतिसादासाठी आभार.

राही's picture

7 Sep 2015 - 12:53 pm | राही

पडणे हे मराठी क्रियापद थेट संस्कृत 'पत्'-पतति वरून आलेले आहे. 'पत्' हा धातु संस्कृताच्या अगदी पहिल्या पायरीवर शिकवतात. मराठी जरी कदाचित संस्कृतातून उगम पावली नसली तरी मराठीवर संस्कृताचा फार मोठा प्रभाव आहे. मराठी शब्दांच्या व्युत्पत्ति शोधताना संस्कृतचे किमान अगदी प्राथमिक ज्ञान तरी आवश्यक आहे असे मला वाटते.
पिटक म्हणजे पेटी, कोश असा अर्थ बनला आहे. बौद्धांचे त्रिपिटक प्रसिद्ध आहेतच.
प्राकृतामध्ये पाली, अर्धमागधी, शौरसेनी यांचे थोडेफार ज्ञान असेल तर अधिकच बरे. त्यामुळे स्वतःचे गैरसमज लगेच स्वतःच्याच लक्ष्यात येऊ शकतात.
संस्कृति, प्रथा, परंपरा, बहुजनपरंपरा समजून घेताना त्या परंपरांचे आणि संस्कृतीचे किमान भाषिक ज्ञान हवे असे वाटते.
कारण त्यामुळे स्वतःचा जो इष्ट रसविषय, त्यात खोल अवगाहन करणे शक्य होते. पुरातत्त्व, मानववंश आणि प्राच्यविद्या यामध्ये काही मूलगामी निष्कर्ष मांडायचे असतील तर लिन्ग्विस्टिक स्टडीज़चे महत्त्व दुर्लक्षून चालणार नाही असे मला व्यक्तिशः वाटते.
स्पष्ट लिहिल्याबद्दल माफी असावी.

माहितगार's picture

7 Sep 2015 - 1:35 pm | माहितगार

स्पष्ट लिहिल्याबद्दल माफी असावी.

लहान तोंडी मोठा घास घेतला असेल तर क्षमा मी मागावयास हवी. पण शंका विचारताना आणि रूढी सोडून विचार मांडताना ज्ञानी लोक क्षमाशील असतात हे मी नेहमीच गृहीत धरून चालत असतो. नॉन कन्फर्मिटी रुढी सोडून विचारांची दखल घेणे मांडणी आणि शंका विचारणे, हॅट्स ऑफ ऑल मास्टर ऑफ नन (none) हे माझ्या स्वभावात वयाच्या ११व्या वयापासून तरी आहे, प्रत्येक विषयात पूर्ण गती मिळवणे शक्यही नाही. म्हणूनच सार्वजनीक विचारमंचावर शंका विचारून शंका निरसन करून घेत असतो.

शालेय संस्कृत विसरलो तसेच अनेक वाचलेले विषय विस्मरणातही टाकत असतो त्यामुळे चुकण्याची जोखीम उचलून रुढीत न आडकता आपला स्वतःचा वेगळा विचार करता येतो. माझी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आख्खी भूमिका ज्यावर अवलंबून आहे त्यात मी किती बदलू शकेन माहित नाही. कुणाच्याही दुखावले जाण्याबद्दल मी संवेदनशील असू शकतो भावूक होऊ शकत नाही, उद्देश कुणालाही जाणीव पुर्वक दुखावण्याचा नसतो पण शक्य तो प्रत्येक तर्क शक्य तो प्रत्येक पैलू तपासून घेण्याचा आग्रह करताना आजूबाजूचे दहा लोक माझ्या अज्ञानाबद्दल हसले तरीही मला त्याची निश्चितपणे पर्वा नसते.

जो पर्यंत पिटक शब्दाचा संबंध आहे बौद्ध धर्मीय संदर्भाने त्रिपिटक हा शब्द वाचनात अनेक वेळा येऊन गेला आहे तरीही पिटक किंवा इतर कोणत्याही शब्दाच्या वेगळे उगम असूच शकणार नाहीत अशा पुर्वगृहीता पासून मी संस्कृत किंवा पाली किंवा अर्ध मागधी यातील एका अथवा सर्व भाषात पंडीत असतो तरीही रुढीस सोडून विचार करून मांडून तपासून आणि झालेले खंडन (आणि प्रसंगी मानहानी) खुल्या मनाने स्विकारणे माझा स्वभाव गूण आहे. विकिपीडिया सोबत काम एवढ्या साठिच करतो की कुणाकडेही आणि माझ्याकडेही काही ना काही ज्ञान असू शकते या विचारावर अक्षूण्ण विश्वास आहे

राहता राहीला माझ्या उपरोक्त रुढीस सोडून शक्यता मांडणीचा माझे मुद्दे ससंदर्भ तर्कपुर्णपणे अद्याप तरी खंडण झालेले नाही. उपदेश करण्याच्या घाईत व्यक्तीगत लक्ष्य तर्कदोष होऊन मुख्य तर्क मांडणी करण्याचे विस्मरणात गेले असण्याची शक्यता वाटते. घाई नाही. मुख्य विषयास अनुसरून आपल्या सवडीने प्रतिसाद द्यावेत.

चाकोरीस सोडून विचारांबद्दल पुन्हा एकदा़ क्षमस्व

व्यक्तील़क्ष तर्कदोषात गुंतले की मुख्य उद्देशापासून भरकटावयास होते. फडके शब्दाची व्युत्पत्ती 'वार्‍याने कपड्याचा जो फड फड असा आवाज होतो. फड फड आवाज करणारे ते फडके अशी साधी सोपी व्युत्पत्तीही असू शकते. प्रत्येक शब्दाच्या व्युत्पत्तीसाठी रॉकेट विज्ञानाची आवश्यकता नसावी. आधी भाषा येतात व्याकरण आणि व्याकरणकार नंतर येतात. एनी वे संदर्भासाठी मोल्सवर्थातले शब्दः

फडकणी (p. 547) [ phaḍakaṇī ] f (Verbal of फडकणें) Fluttering, flapping &c.

फडकणें (p. 547) [ phaḍakaṇēṃ ] v i (फड! फड!) To flutter in the wind--a flag &c.: to rustle, flop, flap--clothes &c. जहाज अद्भुत श्रीरामचरण ॥ त्यावरी ध्वज विराजमान ॥ रात्र दिन फडकतसे ॥. 2 To shoot up vigorously, to flourish--corn &c.

फडका (p. 547) [ phaḍakā ] m A piece of cloth; a remnant, strip, slip; also a torn, old, or common piece; a rag, clout, tatter. 2 A garment of females,--a sort of घागरा or gown. 3 Flapping or a flap (of a wing, hand &c). फ0 फाडणें or फाडून देणें To reply or to say flatly, smack, outright, downright.

फडकाविणें or फडकविणें (p. 547) [ phaḍakāviṇē or mphaḍakaviṇēṃ ] v c (फडकणें) To make to flutter, flop, rustle &c. 2 (with an ellipsis of some word in the feminine gender for Slap or cuff, and in construction with some vulgar word for Face, cheek, or mouth) To slap or smack sound- ingly. Ex. त्यानें दोन थोबाडांत फडकाविल्या. 3 Commonly फरकाविणें.

फडकी (p. 547) [ phaḍakī ] f A colored shawl for children.

फडकें (p. 547) [ phaḍakēṃ ] n (Deprec. form of फडका) A common piece of cloth, a rag, a clout.

फडके आडनावाची व्युत्पत्तीचा अंदाज खालील मोल्सवर्थ एंंट्री वरुन यावा

फडकरी (p. 547) [ phaḍakarī ] m A man belonging to a company or band (of players, showmen &c.) 2 A superintendent or master of a फड or public place. See under फड. 3 A retail-dealer (esp. in grain).

अरविंद कोल्हटकर's picture

9 Sep 2015 - 9:51 pm | अरविंद कोल्हटकर

'कपडा' हा मराठी शब्द संस्कृत 'कर्पट'वरून आला असणे अधिक संभवनीय वाटते. मोनिअर विल्यम्स आणि आपटे हे दोन्ही कोश 'कर्पट' हा शब्द दाखवतात.

माहितगार's picture

9 Sep 2015 - 10:22 pm | माहितगार

कपडा' हा मराठी शब्द संस्कृत 'कर्पट'वरून आला असणे अधिक संभवनीय वाटते.

इंग्रजीतला कार्प्टेट शब्द आठवला.

माहितगार's picture

9 Sep 2015 - 10:24 pm | माहितगार

फेटा शब्द कसा आला असेल ?

पैसा's picture

9 Sep 2015 - 10:52 pm | पैसा

पताका > पटका > फेटा?

माहितगार's picture

7 Sep 2015 - 8:52 am | माहितगार

पिटक या शब्दाचा माहित असलेला अधिक प्रचलीत अर्थ 'पेटी' (बॉक्स) या अर्थाने आहे. खालील महाभारतात प्रयुक्त खालील श्लोकात तो शक्रध्वज सजावटी सोबत जसे की गंध आणि माळा या सोबत येतो आहे.

भांडारकर प्रमाणित प्रतीत हा श्लोक २०व्या क्रमांकावर येतो आहे तो खालील प्रमाणे

अपरेद्युस्तथा चास्याः क्रियते उच्छ्रयो नृपैः | अलङ्कृतायाः पिटकैर्गन्धैर्माल्यैश्च भूषणैः ||२०||
माल्यदामपरिक्षिप्ता विधिवत्क्रियतेऽपि च ||२०||

संस्कृत विकिस्रोतात बहुधा प्रमाणित न केलेल्या महाभारताच्या कोणत्यातरी प्रतीतून २३ आणि २४ क्रमांकाच्या श्लोकात पिटक शब्द येतो तो खालील प्रमाणे :

अलङ्कृताया पिटकैर्गन्धमाल्यैश्च भूषणैः। `माल्यदामपरिक्षिप्तां द्वात्रिंशत्किष्कुसंमिताम्।। 1-64-23a 1-64-23b

उद्धृत्य पिटके चापि द्वादशारत्निकोच्छ्रये। महारजनवासांसि परिक्षिप्य ध्वजोत्तमम्।। 1-64-24a 1-64-24b

पिटकै शब्दाच्या आधी अलङ्कृताया म्हणजे अलंकृत केले/करावे अशा अर्थाने येते आहे तर येथे पिटकै या शब्दात कोणता अर्थ अभिप्रेत असावा ?

उपरिचर वसु विषयक या पर्वाच्या संदर्भाने बरेच काही अभ्यसनीय असावे. त्यामुळे महाभारतातील संबंधीत श्लोकांच्या शब्दवार अनुवादातही जमल्यास साहाय्य हवे आहे.

माहितगार's picture

7 Sep 2015 - 11:32 am | माहितगार

पिटक हा शब्द ठिपका (गंधाचा) या अर्थाने वापरला गेला असू शकेल का ? किंवा ध्वज ज्याच्यावर उभाकेला जातो त्या आधाराला पिठ या अर्थाने पिटक आला असण्याची काही शक्यता जाणवते का ?

माहितगार's picture

9 Sep 2015 - 6:07 pm | माहितगार

हिंदी ऑनलाईन शब्द कोशात पीतिका शब्द आहे ज्याचे हळदी आणि सोनजूही असे अर्थ दिले आहेत. संदर्भ

माहितगार's picture

7 Sep 2015 - 11:41 am | माहितगार

कोणती इतर पुराणे महाभारताच्या आधीची आहेत आणि कोण्त्या आधीच्या पुराणात यज्ञेतर पुजा विधी नोंदवला आहे त्याची कल्पना नाही. वेदात 'युप' (कि यूप) हा शब्द वापरून स्तंभाचा उल्लेख देवक अथवा पूजना साठी आला असावा अर्थात संबंधीत जाणकार याबद्दल अधिक माहिती देऊ शकतील. यज्ञेतर पूजेच्या पहिल्यावहील्या उल्लेखांपैकी एक उल्लेख म्हणून उपरिचर राजाचे ह्या उपकथानक अभ्यासता येऊ शकेल का ? आणि प्रक्षिप्ततेच्या कालावधींचा अंदाज या अभ्यासातून येत गेला तर भारतातील मुर्तीपुजेच्या विकासाची माहिती अधिक नेमकी होण्यात साहाय्य होऊ शकेल हे एक उपकथानक महत्व वाटण्याचे कारण आहे.

भांडारकर प्रमाण महाभारत प्रतीत उपरिचर उपकथानकातील पाचवा श्लोक खालील प्रमाणे दिला आहे.

न सङ्कीर्येत धर्मोऽयं पृथिव्यां पृथिवीपते |
तं पाहि धर्मो हि धृतः कृत्स्नं धारयते जगत् ||५||

संस्कृत विकिस्रोतात भांडारकर प्रतीशी न जुळणार्‍या महाभारतातील याच श्लोकाची दुसरी ओळ जराशी वेगळी आहे. (त्यामुळे अर्थात काय फरक पडतो ते जाणकारच सांगू शकतील- आणखी एक मायन फरक या श्लोकासाठी संस्कृत विकिस्रोत प्रतीत देवा ऊचुः। हे दिलेले आहे तर भांडारकर प्रमाण प्रतीत )

न संकीर्येत धर्मोऽयं पृथिव्यां पृथिवीपते।1-64-5a
त्वया हि धर्मो विधृतः कृत्स्नं धारयते जगत्।।1-64-5b

उपरोक्त श्लोकाच्या पहिल्या ओळीत पृथ्वीवर (सङ्कीर्येत धर्मोऽयं) धर्मसंकर होण्याची भिती व्यक्त केली आहे. (अनुवाद संदर्भ) तर येथे धर्म शब्द निती याच अर्थाने येतो असे वाटते का धर्म हा शब्द आज आपण धर्म शब्द सहसा वेगवेगळ्या धर्मांसाठी वापरतो त्या अर्थाने येतो आहे. गीता आणि महाभारतात इतरत्र वर्ण संकराची चिंता अधिक आली असावी पण हा श्लोक सरळ सरळ धर्म संकराची चर्चा करतो. प्राचीन भारतीय साहित्यात अगदीच अपरिहार्य असेल तर दुसर्‍या धर्मांचे उल्लेख येत असावेत इतरवेळी त्यांना अनुल्लेखाने मारण्यावर सर्वच तत्कालीन धर्मपंथांचा भर असावा. आजच्या अर्थाने धर्म शब्द उपरोक्त श्लोकात येत असेल तर त्याकाळात वेगळे धर्म असावयास हवेत. मी वरच्या एका प्रतिसादात म्हणाल्या प्रमाणे हा वेगळ्या धर्माचा उल्लेख यदुवंशा बद्दल नसेल तर शैव जैन किंवा बौद्ध इतर कोणत्या दर्शन विषयक असण्याची शक्यता असू शकेल का ? हा श्लोक कुणी आणि कोणत्या संदर्भाने धर्म संकर शब्द वापरत लिहीला यावरून धार्मीक-राजकीय स्पर्धात्मकेची कल्पना येण्यास मदत होऊ शकते.

दुसरे तर या उपरिचर कथानकाच्या पुर्वार्धातून धर्म आणि राजकारण यांची सांगड घालण्याचा प्रय्त्न दिसून येतो.

तिसरा भाग असा की या उपकथानकाच्या उत्तरार्धात राजा शंतनूची पत्नी सत्यवती कोळ्याची मुलगी असूनही ती मुळची उपरीचर राजाचीच म्हणजे क्षत्रीय कन्या आहे हे दाखवण्याचाही खटाटोप या उपकथानकाच्या उत्तरार्धातून दिसून येतो असे वाटते का ? हा खटाटोप पश्चातबुद्धीने जोडला असू शकतो म्हणून प्रक्षिप्त असण्याची शक्यता जाणवते.

सत्यवती हि क्षत्रीय कन्या आहे हे दाखवणे एवढाच उद्देश असेल तर इंद्रध्वज उल्लेखाचे प्रयोजन उपकथानकाच्या दृष्टीने पुरेसे स्पष्ट होत नाही असे वाटते.

भांडारकर संस्थेच्या प्रमाणित महाभारत प्रतीत (संदर्भ)
भगवान्पूज्यते चात्र हास्यरूपेण शङ्करः |
स्वयमेव गृहीतेन वसोः प्रीत्या महात्मनः ||२१||

असा एक श्लोक आहे प्रमाणित न झालेल्या संस्कृत विकिस्रोतात हा श्लोक बदलून आणि दोन श्लोकात विभागला (वाढवला) गेला असावा तो खालील प्रमाणे

शङ्खभेरीमृदङ्गैश्च संनादः क्रियते तदा'। भगवान्पूज्यते चात्र यष्टिरूपेण वासवः।। 1-64-26a 1-64-26b

स्वयमेव गृहीतेन वसोः प्रीत्या महात्मनः। `माणिभद्रादयो यक्षाः पूज्यन्ते दैवतैः सह।। 1-64-27a 1-64-27b

इथे एका श्लोकात हास्यरूपेण आहे एका श्लोकात यष्टिरूपेण आहे तर आंजावर आढळलेल्या अजून एका आवृत्तीत हंसरुपेण असाही पाठभेद आढळला आहे. हंसरुपेण हा पाठभेद मिळवून देण्याचा प्रयत्न करेन. एकतर या संस्कृत श्लोकांचे अर्थ काय होतात आणि उपरोक्त पहिल्या श्लोकात शङ्करः शब्द कोणत्या अर्थाने अथवा प्रयोजनाने आला असावा. हे विचारण्याचे कारण इंद्र विषयक श्लोकांमध्ये शंकराचा उल्लेख समजून घेणे आहे.

पैसा's picture

8 Sep 2015 - 9:33 am | पैसा

उत्तम चर्चा! तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळायला वेळ लागेल. पण सगळ्यांनाच बरीच माहिती त्यातून मिळेल.