गुढी उभारनी

Primary tabs

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
5 May 2014 - 9:50 am

गुढी उभारनी (कवियत्री बहिणाबाई चौधरी )

गुढीपाडव्याचा सन

आतां उभारा रे गुढी

नव्या वरसाचं देनं

सोडा मनांतली आढी

गेलसालीं गेली आढी

आतां पाडवा पाडवा

तुम्ही येरांयेरांवरी

लोभ वाढवा वाढवा

.........उर्वरीत कविता: http://www.transliteral.org/pages/z70717225241/view
......... बहिणाबाईंची "गुढी उभारनी": एक आस्वाद - डॉ. सुधीर रा. देवरे: http://sudhirdeore29.blogspot.in/2014/05/blog-post.html

चैत्र शुद्ध प्रतिपदा ही चैत्र महिन्याच्या शुद्ध पक्षातील पहिली तिथी आहे. महाराष्ट्रीय दिनदर्शिकेनुसार वर्षाचा हा प्रथम दिवस आहे.
या दिवशी शालिवाहन शक प्रारंभ झाला. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस दक्षीण भारतात युगादी (युग+आदी = ज्या दिवशी कली युगाची सुरवात झाली तो http://en.wikipedia.org/wiki/Ugadi) हा महाराष्ट्रापेक्षा वेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो. सिंधी आणि मारवाडी समाजही त्यांच्या वेगळ्या पद्धतीने हा दिवस साजरा करतात. तर इतर उत्तर भारतात चैत्रा नंतर येणारा वैशाखी (बैसाखी) महिना साजरा केला जातो.

महाराष्ट्रातील चैत्र शुद्ध प्रतिपदाचे महत्वाचे सांस्कृतीक वेगळेपण म्हणजे गुढी. गुढी उंच बांबूपासून तयार केली जाते. बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुलिंब, फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर धातूचे भांडे, सहसा तांब्या बसविला जातो. गुढी नंतर पाटावर उभी केली जाते.
Gudhi
छायाचित्र सौजन्य

गुढी या विषयाबद्दल खरे म्हणजे मला गुढी पाडव्याच्याच दिवशी लिहिण्याची इच्छा होती. पण ऐनवेळी 'गुढी उभारनी' हि बहिणाबाई चौधरींची कविता वाचनात आली. 'गुढी उभारनी' कवितेतील बोली भाषेतील काही शब्द समजण्यास मला अडचण गेली तसे मी महाराष्ट्रातील लोककला आणि अहिराणी भाषेचे अभ्यासक डॉ.सुधीर देवरे यांना संपर्क करून माझी अडचण सांगितली. त्यांनी माझी विनंती मनावर घेऊन http://sudhirdeore29.blogspot.in/2014/05/blog-post.html या त्यांच्या ब्लॉगवर "बहिणाबाईची गुढी उभारनी: एक आस्वाद" या नावाने रसग्रहण आणि अर्थ सांगणारा चक्क लेखच लिहून दिला. (डॉ.सुधीर देवरे यांचे लेखन कॉपी राईटेड असते उधृत करण्यापुर्वी त्यांना कल्पना द्यावी).'गुढी उभारनी' या सुंदर कविते कडे आपण या लेखाच्या शेवटी अथवा वेगळ्या धाग्याच्या स्वरुपात येऊच. मी आता मला इतर ज्या माझ्या मुद्द्यांची नवी मांडणी करावयाची आहे तिकडे येतो.

आपण जर तेलगू भाषेचा अभ्यास केला तर गुढी या शब्दाचा अर्थ 'लाकूड अथवा काठी' असा आहे तसाच तो 'तोरण' असाही आहे. दाते, कर्वे लिखीत 'महाराष्ट्र शब्दकोशा'चा आधार घेतला तर (सौजन्य: खाप्रे.ऑर्ग) "गुढया घालुनया वनीं राहूं , म्हणा त्यातें । - प्रला १९" असे उदाहरण येते यातील गुढ्या या शब्दाचा अभिप्रेत अर्थ त्या शब्दकोशाने खोपटी ; झोंपडी ; अथवा पाल (रहाण्याची जागा) असा दिला आहे. हिंदीत कुडी या शब्दाचा एक अर्थ लाकूड उभेकरून उभारलेली कुटी अथवा झोपडी असाच होतो. इथे ग चा क (अथवा क चा ग) होऊ शकतो हि शक्यता लक्षात घेता येते तरीही राहण्याची जागा या अर्थाने 'गुडी' हा शब्द येऊन दक्षीणेतली (आंध्र,कर्नाटक,तामीळनाडू) खासकरून आंध्रातील स्थलनामांची (गावांच्या नावांची) संख्या अभ्यासली असता (संदर्भ सेंसस ऑफ ईंडिया गाव नावांची यादी) लाकूड या अर्थाने तेलगूतील गुढी या शब्दाचा अधिक वापर आणि जुन्या मराठीतील लाकूड बांबू/काठी ने बनवलेला वस्ती प्रकारा करता नाव पाहता हा शब्द महाराष्ट्र आणि आंध्र या प्रदेशात गुढी शब्दाचा प्रचार अधिक असावा. म्हणजे असा कयास बांधता येऊ शकतो की शालिवाहन पुर्व काळात कदाचित गुढीचा लाकूड बांबू/काठी हा अर्थ महाराष्ट्रीयांच्या शब्द संग्रहातून मागे पडला असावा पण आंध्रशी घनिष्ट संबंध असलेल्या शालिवाहन राजघराण्याच्या लाकूड बांबू/काठी या अर्थाने तो वापरात राहीला असण्याची शक्यता असू शकते.

कदाचित गुढी या शब्दाची व्युत्पत्ती आपल्या सर्वसामान्य अपेक्षेपे़क्षा प्राचीनतम असू शकते. जगभरातल्या भाषाशास्त्रज्ञांनी शब्दांच्या व्युत्पत्तींऐवजी व्याकरणावर अधिक लक्ष केंद्रीत केल्यामुळे शब्दांच्या व्युत्पत्तीं शास्त्राकडे बर्‍यापैकी दुर्लक्ष झाल असल तरी मानववंशशास्त्राच्या (अँथ्रॉपॉलॉजी) अंगाने मानवी इतिहासाचा शोध घेणार्‍यांची इच्छा उत्क्रांती अवस्थेतील मानवाने वापरलेली कोणती शब्दरुपे अजून मानवी भाषांमध्ये अर्काईव्ह होऊन राहीली आहेत का या बाबीचा भाषाशास्त्रज्ञांनी शोध घ्यावा अशी त्यांची इच्छा असते.

इंग्रजी विकिपीडियावर Marathi language हा लेख पुर्णावस्थेत येण्यापुर्वी सुरवातीच्या काळात, कुणीतरी 'काही सम-उच्चारी शब्द मराठीतून इंग्रजीत गेले', असे लिहून त्यांना वाटलेल्या शब्दांची छोटी यादीच त्या लेखात त्यांनी भरलेली, मी जेव्हा पाहिली (नंतर ती वगळली गेली) होती, तेव्हा ती यादी पाहून मी प्रथम चक्क हसलोच होतो.

त्यांची ती यादी बरोबर होती असे नव्हे. भारतीय आणि युरोपीय भाषांचे प्राचीन साम्य दाखवणारा प्रोटो इंडो युरोपीयन भाषांचा अभ्यासाची बाबही काही फार नवी नाही. पण आज आंतरजालामुळे पुर्वीपेक्षा, अधिक भाषांचा तुलनात्मक अभ्यासकरणे अंशत: अधिक सोपे झाले आहे. विकिपीडिया सारख्या प्रकल्पांमुळे माहिती एका ठिकाणी संकलीत होणे, माहितीतील तफावतीकडे/शक्यतांकडे अधिक लोकांचे लक्ष जाणे अधिक सोपे झाले आहे. मराठी विकिपीडियातील महाराष्ट्रातील स्थलनामे या लेखाचे लेखन करताना मराठीतील किमान काही शब्दांच्या व्युत्पत्ती प्राचीनतम काळापर्यंत, म्हणजे अशा काळापर्यंत की भारतातील लोक अजून शिकारीचे प्राथमीक जीवन जगत असतील अशा काळापर्यंत मागे जाऊ शकतील, आणि असे (बरेच?) काही शब्द मराठी भाषेत जतन असून अद्यापतरी वापरात असावेत असे विवीध शब्दकोश (आफ्रीकन लोकभाषांसहीत) ऑनलाईन चाळताना आणि शक्य व्युत्पत्तींबद्दल विचार करता जाणवले. संस्कृत लॅटीन अथवा ग्रीकादी भाषांना मध्ये कोणतीही मुख्य भूमीका न ठेवतासुद्धा,(खरेतर त्यांना कोणतीही भूमीका न ठेवता) अनेक मराठी आणि इंग्रजी शब्दांचे उच्चार साधर्म्य केवळ नोंद घेण्याजोगे नव्हे तर प्रोटो इंडो युरोपीयन भाषांच्या अभ्यासासच नव्हेत तर मानववंशशास्त्राच्या भूमीकेतूनसुद्धा महत्वाचे असू शकते असे म्हणताना आज मला मी अतीशयोक्ती करत असेन असे वाटत नाही. अर्थात या विषयावर जसा योग येईल तसे नंतर कधी लिहिन.

या धागा लेखात मी वरील पार्श्वभूमी मांडण्याचे मुख्य कारण, डोंगरी किल्यांचे अस्तीत्व इतिहासपूर्व प्राचीन असूनही त्यांच्या इतिहास पूर्वकाळाबद्दल उत्खननाकडे आणि संशोधनांकडे केवळ भारतातच नव्हे तर यूरोप आणि इतर आशियाई देशातही अद्यापही पुरेसे लक्ष दिले गेले असेल असे वाटत नाही. युरोप आणि आशियातील आज अशा अनेक प्राचीन डोंगरी किल्यांची माहिती विकिपीडियावर पुर्वीपेक्षा अधीक संकलीत प्रमाणात दिसून येते.
या डोंगरी किल्यांचे शेतीपुर्व शिकारी अवस्थेतील आदीम मानवास काही महत्व असू शकते का ? पूर्ण जंगलाने वेढलेल्या मानवी वस्तींची अत्यंत तुरळक शक्यता असलेल्या आडवळणाच्या जागी डोंगरी किल्यांचे अस्तीत्व बऱ्याचदा आश्चर्यकारक वाटते. इतर सर्व प्राणी आणि हिंस्रश्वापदे सहसा पाणी असलेल्या उताराकडे जाण्यात व्यस्त असताना हिंस्रश्वापदांपासून सुरक्षीत राहून परस्पर संवाद साधण्यासाठी परिसरावर नियंत्रण ठेवण्या साठी आदीम मानवांना डोंगरी किल्लेवजा जांगांचा उपयोग होत असावा का ?

मी जेव्हा पाळीव प्राण्यांवर वापरावयाचा अंकुश या अर्थाने इंग्रजीत येणाऱ्या goad या शब्दाकडे पहातो तेव्हा गुढी आणि goad या शब्दातले उच्चार साधर्म्य कदाचित निव्वळ योगायोग असू शकतो, अथवा कदाचित व्यूत्पत्ती एकही असू शकते तेलगूतही गुढी (म्हटली जाणारी काठी) पाळीवप्राण्यांच्या नियंत्रणासाठी वापरली जातेच. (भाषेत शब्दसंख्या मर्यादीत असण्याच्या प्राचीन काळात एकच शब्द सारख्या दिसणाऱ्या गोष्टींकरता वापरला जात असू शकतो का ?) भारतात गदा म्हणवले जाणाऱ्या प्राचीन शस्त्रही (संदर्भ http://en.wikipedia.org/wiki/Mace_(club) ) सुरवातीच्या काळाततरी काठी/लाकूडाचेच असावे अशी शक्यता असू शकते का ?

'गुदी' हा त्वचेवर येणारा छोटा उंचवटा ते धान्याच्या छोट्या राशीसही ते इतर उंच जागांना गढी म्हणणे (संदर्भ: महाराष्ट्रीय शब्दकोश) आणि डोंगरी किल्यांना 'गड' हा शब्द असणे या भाषिक योगायोगांकडे बारकाईने पहाता येईल. इंग्रजीतील gather आणि together या शब्दांमधील उच्चारणांचेही निरीक्षण केले असता गुढी (काठी) सारखी निशाणी लावलेल्या डोंगरी जागांवर प्राचीन मानव together आणि gather होत असेल का ?

महाराष्ट्रात ज्या सांस्कृतीक प्रतीकाच्या रूपाने हि गुढी पुढे येते तेव्हा ते महाराष्ट्रीय गुढीचे सांस्कृतीक प्रतीक बाकी भारतभराततर नाहीच पण गुढी शब्दाचा वापर असलेल्या तेलंगाणा/आंध्रातही नाही. आता इथे महाराष्ट्रीय गुढीचे लिखीत साहित्यिक संदर्भ केव्हा पासून समोर येतात हे पहाणे उद्बोधक होईल.

इ. स. १२७८च्या आसपास पंडित म्हाइंभट सराळेकर रचीत लीळाचरित्रात, लीळा २०८ : देमती तुरंगम आरोहणी मध्ये ".... तेथ बाइसाचे भाचे दाएनाएकू होते : तेयापूढें सांघीतलें : मग तेंही सडासंमार्जन करवीलें : चौक रंगमाळीका भरवीलीया : गुढी उभविली : उपाहाराची आइति करविली : आपण घोडें घेउनि साउमे आले :... " असा उल्लेख येतो. संत ज्ञानेश्वरांच्या (इ.स.१२७५–१२९६) ज्ञानेश्वरीत अध्याय ४, ६ आणि १४ मध्ये "अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥ ५० ॥" ; "ऐकें संन्यासी आणि योगी । ऐसी एक्यवाक्यतेची जगीं । गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरी ॥ ५२ ॥"; "माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगें गुढी । येरु जीवीं म्हणे सांडीं । गोठी यिया ॥ ४१० ॥" असे उल्लेख येतात. संत नामदेवजी नामदेव (इ.स. १२७० - जुलै ३, इ.स. १३५०) संत जनाबाई (निर्वाणइ.स. १३५०) आणि त्यांचेच समकालीन संत चोखामेळा (चोखोबा) (जन्म अज्ञात वर्ष - इ.स. १३३८) यां सर्वांच्या लेखनात, गुढीचे उल्लेख येतात. संत चोखोबा त्यांच्या अभंगात म्हणतात "टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥" १६व्या शतकातील संत एकनाथांच्या (१५३३–१५९९) धार्मीक काव्यात तर गुढी हा शब्द असंख्य वेळा अवतरतो. त्यांच्या वेगवेगळ्या काव्यातून संत एकनाथ हर्षाची उभवी गुडी, ज्ञातेपणाची ,भक्तिसाम्राज्य, यशाची, रामराज्याची रोकडी, भक्तीची, जैताची, वैराग्याची, भावार्थाची, स्वानंदाची, सायुज्याची, निजधर्माची इत्यादींच्या गुढ्यांची रुपके वापरताना आढळतात. संत एकनाथांना या गुढ्यांची अनुभूती त्यांच्या रोमांचात होते, कीर्तनीं होते, ते गुढी तिन्ही लोकीं , वैकुंठीं, उभारण्याचेही उल्लेख करतात पण मुख्य म्हणजे रणांगणी उभारली जाण्याचाही उल्लेख करतात.

आणि संत एकनाथांच्या लेखनातील गुढी रणांगणी वापरली जात असल्याचा उल्लेख महत्वाचा आहे. आपण महाराष्ट्रीय शब्दकोश पुन्हा एकदा अभ्यासल्यास गुढी उजवी देणें [ गुढी=कौल] म्हणजे विनंति मान्य करणें संमति देणें मान्यता देणें आणि गुढी डावी देणें म्हणजे विनंति अमान्य करणें नापसंत करणें नाही म्‍हणणें. असे संकेत शालिवाहन आणि त्यानंतरच्या रणांगणात महाराष्ट्रीयन सैन्याने वापरले असल्यास ते तत्कालीन युद्धाच्या व्यूहातील महपूर्ण कदाचित निर्णायक संदेश साधन (कम्यूनिकेशन टूल) ठरत असावे. शालिवाहनांच्या शकांवरील विजय ते त्यानंतरच्या काळातील महाराष्ट्रीय सैन्यांच्या लढवैय्येगिरीत हे साधन निर्णायकपणे साहाय्यभूत झाले असू शकेल का ? या उपलब्ध संदर्भांचा अभ्यास केल्या नंतर अजून एक वैशीष्ट्य या गुढीचे दिसून येते वारी असो अथवा रणांगण असो जाणाऱ्या समूहा पैकी चपळ माणूस पाहून त्याकडे हि गुढीची काठी दिली जात असे. 4529 गाथेत संत तुकाराम त्यांच्या अभंगात म्हणतात "पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥2॥"

जश्या या गुढ्या वारकऱ्यांसोबत जात, योद्ध्यांसोबत रणांगणावर जात तशाच या मराठवाड्यातील काही सहस्रके तलम कापडाची निर्यात करणाऱ्या प्रवासी व्यापाऱ्यांसोबतही गेल्या असतील का हे इतिहासासच सांगू शकेल पण सिमोल्लंगनाच्या वेळी गेलेली गुढी गावात वापस आल्या नंतर गृहींणींना होणारा आनंद चैत्रातल्या पहिल्या दिवशी गुढी उभारून साजरा केला जात असेल, कदाचित महाराष्ट्रातील तलम कापडाची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जाहीरात या गुढ्यांच्या रुपाने होत असेल कोण सांगावे. गावात वापस आलेली गुढी बहुसंख्य वेळा बहुसंख्य घरांमध्ये जसा आनंद आणत असेल तशीच काही घरांच्या मालकांना रणांगणावर वीरमरण अथवा यात्रा कालावधीतच नीधनही होत असेल. एकुण काय तर परतणारी गुढी बहुसंख्यवेळा आनंद आणि काही वेळा काही घरांकरता दुख्खाची झालर घेऊन येत असणार हे तत्कालीन साहित्य आणि मराठी शब्दकोशांच्या संदर्भांच्या साहाय्याने म्हणता येते. सर्व गावात आनंद असताना गावातल्या काही घरातील दुख्ख लक्षात घेऊन गुढीला कडूलिंबाचा पाला बांधणे, कडूनिंबाची पाने घातलेला पदार्थ जेवणात करणे या प्रथा आल्या असाव्यात का ?

ज्या पद्धतीने गुढीचा प्रसार महाराष्ट्रात झाला त्यादृष्टीने तत्कालीन समाजाकरीता गुढी हे महत्वाचे संवाद साधन निर्णायक आणि उपयूक्त ठरले असावे म्हणूनच महाराष्ट्राचा लोकप्रीय सांस्कृतीक वारसा ठरले असावे. गुढी हा नामाभिदान देणारे शकांना हरवणारे शालिवाहन आंध्रशी जोडलेले असू शकतात, पण ज्या पद्धतीने गुढी हे सांस्कृतीक संवाद साधन महाराष्ट्रापुरते मर्यादीत झाले त्याचा एक अर्थ असाही असू शकतो की ते शालीवाहनाच्या पदरी असलेल्या आंध्र अथवा इतर भारताशी फारसा संबंध नसलेल्या स्थानिक महाराष्ट्रीय लोकांनीच बहूपयोगी संवादी साधन गुढीची कल्पना पुढे आणली असावी असे म्हटल्या शिवाय राहवत नाही. शालिवाहन राजाने शकांवर विजय मिळवल्या नंतर त्या दिवसाच्या स्मरणार्थ सर्व सैनिकांना तलम कापड अथवा साड्या भेट देऊन घरोघरी गुढ्या उभारण्यास प्रोत्साहन दिले असेल अथवा शिपायांनीच आपल्या विजया नंतर पैठण सारख्या नगरीची आठवण म्हणून आपल्या घरच्या प्रीयजनांची आठवण म्हणून नव्या कपड्यांची खरेदी करून विजयाच्या जल्लोषात गुढ्या सजवल्या असेही काही झालेले असू शकते आणि काळाच्या ओघात असे मूळ कारण समाजाच्या विस्मरणात गेले असावे हि शक्यताही कदाचित नाकारता येणार नाही.

आता पर्यंत विचारात न घेतल्या गेलेल्या इतर संकल्पनांच्या शक्यतेचा आढावा घेणे शक्य व्हावे, तसेच सरळ गुढी शब्द संस्कृततात आढळत नाही, सरळ संबंध दाखवणाऱ्या संदर्भाचा अभाव, द्रविडी भाषेतील स्थलनामांमध्ये गुडी शब्दाचा मोठा उपयोग यामुळे, गुढी हा मुलत: ध्वजाचाच प्रकार असूनही, माझ्या उपरोक्त विश्लेषणात संस्कृत साहित्यातील ध्वज संकल्पना गृहीत धरण्याचे टाळले. अध्यात्मिक आणि धार्मीक पुटं भारतातल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीला चिटकवली जातात तशी ती गुढीला नंतरच्या कालावधी चिटकली असू शकतात अशीही एक शक्यता गृहीत धरली.

वर्तमानात घडलेल्या गोष्टीची खात्री करणे बऱ्याचदा कठीण जाते, ज्या सांस्कृतीक वारश्या करता संतकालीन साहित्यापुर्वीचा कोणताही इतर संदर्भ मिळत नाही, त्याची नेमकी खात्री आपण देऊ शकतोच असे नाही, शेवटी इतिहास हा इतिहास असतो. शेवटी त्यातून काय घ्यायच आणि काय त्याज्य करायच हे प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्ती आणि समुदाय पुन्हा पुन्हा ठरवत असतो. हि इतिहासाची मर्यादा स्पष्ट करून सुद्धा मला माझे विश्लेषण लिहिताना जाणवलेल्या इतर एक दोन समस्या म्हणजे, एका संकेतस्थळावर प्रोटो इंडो युरोपीयनच नव्हे तर जगातील सर्व भाषांच्या ऐतिहासिक स्वरूपातील शब्दांचा भाषा शास्त्रीय डाटाबेस होता आणि नेमक गुढी आणि गड या शब्दांचा शोध घेण्यापुर्वी ते चांगल संकेतस्थळ ढपल (अनुपलब्ध झाल). भारतीय शब्दांच्या व्युत्पत्ती सखोल तपासण्यासाठी भारतातील गोंडी भिल्ल इत्यादी आदीवासी बोली भाषातून शब्दांचे शोध घेण्याची गरज असते ते आंतरजालावर पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसणे हि एक नित्याची अडचण असते. त्या शिवाय आधीच दाक्षीणात्य भाषा येत नाहीत त्यात व्युत्पत्ती अभ्यासासाठी तमिळ सारख्या महत्वपूर्ण भाषेतला आंतरजालीय शोध घेणे त्यांच्या लिपीतील व्यंजन गोंधळामुळे बऱ्याचदा कठीण होते तसे या वेळीही झाले. पाडवा या शब्दाच्या व्युत्पत्तीचा विचार या धागा लेखात केलेला नाही. (पाडवा हा शब्द चपखल नाही त्या पेक्षा "गुढी उभारनी" हा शब्दच चपखल आहे याची मांडणी करण्याचा प्रयत्न बहीणाबाई चौधरींनी त्यांच्या "गुढी उभारनी" या कवितेच्या माध्यमातन केलेला आढळून येतो)

लिखाणा साठी वापरलेले इतर संदर्भ मराठी विकिस्रोत आणि खाप्रे.ऑर्ग, मोल्सवर्थ, मराठी आणि इंग्रजी विकिपीडियावरील काही लेख, मराठी विकिपीडिया आणि विक्शनरी प्रकल्पावर काम करताना केलेला काही अभ्यास.

*संत साहित्यातील गुढीचे उल्लेख सूची

**संत एकनाथ
(१५३३–१५९९)

***आत्मस्थिति - अभंग २०८१ ते २१०० श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा

२०८६

भक्त देव एके ठायीं ते आवडी । घेऊनिया गुढी जाऊं तेथें ॥१॥

पाहूं चरनकमळ वोवाळूं श्रीमुख । होईल तेणें सुख चौदेहांसी ॥२॥

संतांचे ते भार गाती नाचताती । आनंदे डुल्लती विठ्ठल वाचे ॥३॥

एका जनार्दनीं आनंदसोहळा । पाहोनि धालों डोळा डोळीयाचा ॥४॥

***चतुःश्लोकी भागवत/गुरुचें लक्षण

सेवक परचक्र विभांडी । राजा हर्षाची उभवी गुडी । शिष्य स्वानंदीं दे बुडी । तेणें सुखोर्मी गाढी सदगुरुसी ॥३॥

***चतुःश्लोकी भागवत/माझी प्राप्ति

एकीं शाद्विकशास्त्रमूढीं । ज्ञातेपणाची उभविली गुडी । पडतां कामकोधांची धाडी । स्वयें चरफडी देहलोभें ॥७१॥

***एकनाथी भागवत/अध्याय तिसरा
चाखतां निजसुखगोडी । हारपती दुःखकोडी ।
उभवूनि भक्तिसाम्राज्यगुढी । स्वानंदजोडी जोडावी ॥५८५॥

सेवकु परचक्र विभांडी । तंव राजा उभारी यशाची गुढी ।
शिष्य परमानंदीं दे बुडी । तेणें गुरूसी गाढी सुखावस्था ॥६१३॥

***एकनाथी भागवत/अध्याय चौथा
जो देवांचे बंद सोडी । नवग्रहांची बेडी तोडी ।
जेणें रामराज्याची रोकडी । उभविली गुढी तिन्ही लोकीं ॥४८॥

***एकनाथी भागवत/अध्याय पाचवा
प्रतीचीमाजीं देतां बुडी । चित्तशुद्धि जोडे रोकडी ।
भजन वाढे चढोवढी । भक्तीची गुढी वैकुंठीं उभारे ॥५५॥

***एकनाथी भागवत/अध्याय नववा
तुटली अहंकाराची बेडी । पावलों भवार्णवपरथडी ।
म्हणौनि रोमांची उभविली गुढी । जिंतिली गाढी अविद्या ॥२६॥

***एकनाथी भागवत/अध्याय अकरावा
ओढूनि धनुष्याची वोढी । त्र्यंबक मोडिलें कडाडी ।
मी राम म्हणोनि हांक फोडी । जैताची गुढी कीर्तनीं ॥३६॥

***एकनाथी भागवत/अध्याय बारावा
शत्रु जिणोनियां डाडीं । रणांगणीं उभवितां गुढी ।
शस्त्रेंसी कवच जंव न फेडी । तंव विश्रांति गाढी न पविजे ॥१॥

***एकनाथी भागवत/अध्याय पंधरावा
पांच पांच इंद्रियांची जोडी । जिणोनि शमदमपरवडी ।
उभवूनि वैराग्याची गुढी । प्राणापानवोढी जिंकिल्या ॥८१॥

***एकनाथी भागवत/अध्याय सतरावा
जेथ भावार्थे माझी आवडी । तेथ अवश्य माझी पडे उडी ।
जेणें भावार्थाची उभविली गुढी । तो जाणे गोडी मद्भ क्तीची ॥१२०॥

***एकनाथी भागवत/अध्याय विसावा

नवल कथेची आवडी । दाटती हरिखाचिया कोडी ।
हृदयीं स्वानंदाची उभवी गुढी । एवढी गोडी श्रवणार्थी ॥८०॥

***एकनाथी भागवत/अध्याय एकविसावा
चित्तचैतन्या मिळणी पाडी । कंठीं बाष्प दृढ अडी ।
लागतां स्वानंदाची गोडी । उभिली गुढी रोमांची ॥१७॥

***एकनाथी भागवत/अध्याय बाविसावा
उभवूनि सायुज्याची गुडी । परापरथडी पावले ॥७७॥

***एकनाथी भागवत/अध्याय तेविसावा
उभवूनि सायुज्याची गुडी । परापरथडी पावले ॥७७॥
त्याच्या निजधर्माची गुडी । उभारे रोकडी वैकुंठीं ॥९८॥

***भारुड - गाय
संत नाम गाय संत नाम गाय ।
संत नाम गाय कामधेनु ॥ १ ॥
सदा सर्वकाळ दुभे भक्‍तालागी ।
उणे पाहता अंगी धाव घाली ॥ २ ॥
नाम मुख स्तना लागला पान्हावे ।
अभक्‍त न पाहे धाव पाठी ॥ ३ ॥
जनी जनार्दन दुहिला आवडी ।
उभविली गुढी एकनाथे ॥ ४ ॥

**संत तुकाराम
(१६०८–१६५०)

***तुकाराम गाथा

3583
पाठवाल तेथें गर्जेन पवाडे । कायाअ देहाकडे नावलोकीं॥1॥
ह्मणउनि मागें कंठींचा सौरस । पावतील नास विघ्नें पुढें ॥ध्रु.॥
कृपेच्या कटाक्षें निभें किळकाळा । येतां येत बळाशHीपुढें ॥2॥
तुका ह्मणे गुढी आणीन पायांपें । जगा होइल सोपें नाम तुझें ॥3॥

4529
आस निरसली गोविंदाचे भेटी । संवसारा तुटी पुढिलिया ॥1॥
पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥2॥
हाका आरोिळया देउनि नाचती । एक सादाविती हरि आले ॥3॥
आरंधीं पडिलीं होतीं तयां घरीं । संकीर्ण त्या नारी नरलोक ॥4॥
लोका भूक तान नाहीं निद्रा डोळा । रूप वेळोवेळां आठविती ॥5॥
आहाकटा मग करिती गेलिया । आधीं ठावा तयां नाहीं कोणा ॥6॥
आधीं चुकी मग घडे आठवण । तुका ह्मणे जन परिचयें ॥7॥

**ज्ञानेश्वर (१२७५–१२९६)
***ज्ञानेश्वरी/अध्याय चौथा

अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं ।
सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥ ५० ॥

***ज्ञानेश्वरी/अध्याय सहावा
ऐकें संन्यासी आणि योगी । ऐसी एक्यवाक्यतेची जगीं ।
गुढी उभविली अनेगीं । शास्त्रांतरी ॥ ५२ ॥

***ज्ञानेश्वरी/अध्याय अकरावा

ऐसी काय नेणों तुझिये आवडी । जाहली प्रसन्नता आमुची वेडी ।

***ज्ञानेश्वरी/अध्याय चौदावा

माझी अवसरी ते फेडी । विजयाची सांगें गुढी ।
येरु जीवीं म्हणे सांडीं । गोठी यिया ॥ ४१० ॥

म्हणौनि गौप्याचीही गुढी । उभविली जगीं ॥ ६१३ ॥

****Khapre.org वरून
** संत नामदेव (इ.स. १२७० - जुलै ३, इ.स. १३५०) हे महाराष्ट्रातील वारकरी संतकवी होते. , उन्होंने हिन्दी भाषामेंभी सरल अभंग रचना की ।

***६४
देवा गगन गुडी बैठी मैं नाहीं तब दीठी ॥टेक॥
जब लीग आस निरास बिचारै तब लगि ताहि न पावै ॥१॥
कहिबौ सुनिबौ जबगत होइबौ तब ताहि परचौ आवे ॥२॥
गाये गये गये ते गाये अगई कूं अब गाऊं ॥३॥
प्रणवत नांमा भए निहकामा सहजि समाधि लगाऊं ॥४॥

***७५
देवा आज गुडी सहज उडी । गगन मांहि समाई ।
बोलन हारा डोरि समांनां । नहीं आवै नहीं जाई ॥टेक॥
तीन रंग डोरि जाके । सेत पीत स्याही ।
छांडि गगन वाजि पवन । सुर नर मुनि चाही ॥१॥
द्वादसतैं उपजी गुडी । जानै जन कोई ।
मनसा कौ दरस परस । गुरु थैं गम होई ।२॥
कागद थैं रहित गुडी । सहज आनंद होई ।
नांमदेव जल मेघ बूंद । मिलि रह्या ज्यूं सोई ॥३॥

***श्रीराममाहात्म्य - रामजन्म :
फोडा फोडारे भांडारें । आणवा गाईचीं खिल्लारें ॥५॥
उभवा उभवारे गुढी । सोडा वस्रांचीं गाठोडीं ॥६॥
झाडोनियां टाका खडे । घाला केशराचे सडे ॥७॥
नामा ह्मणे भूमंडळा । स्वामि माझा पहा डोळा ॥८॥

**संत जनाबाई (निर्वाण:इ.स. १३५०)
***
ऋषि अभिषेकिती रायाला । थोर मनीं आनंदाला ॥७॥
राया प्राप्‍ती जाला पट । गुडी उभवी वसिष्‍ठ ॥८॥
येथुनी हरिश्चंद्र आख्यान । नामयाची जनी म्हण ॥९॥

**चोखामेळा (चोखोबा) (अज्ञात वर्ष - इ.स. १३३८) हे यादव काळातील नामदेवांच्या संतमेळ्यातील वारकरी संतकवी होते.

टाळी वाजवावी गुढी उभारावी । वाट हे चालावी पंढरीची ॥१॥
पंढरीची हाट कऊलांची पेठ । मिळाले चतुष्‍ट वारकरी ॥२॥
पताकांचे भार मिळाले अपार । होतो जयजयकार भीमातिरीं ॥३॥

** समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा ही रचल्या
***
कांहीं बोल रे विठ्ठला । मौन वेष कां धरिला ॥१॥
काय मागतों गांठोडी । बोलसीना धरिली गुडी ॥ध्रु०॥
आशा वैभवाची नाहीं । भिऊं नको वद कांहीं ॥२॥
नलगे मज धन दारा । वेगें लोचन उघडा ॥३॥
दास म्हणे वर पाहे । कृपा करुनि भेटावें ॥४॥

**लीळाचरित्र पंडित म्हाइंभट सराळेकर रचना इ. स. १२७८.

***लीळा २०८ : देमती तुरंगम आरोहणी

गोसावी एरी दीसीं सावळदेवा बीजें करीती : ऐसें आधीलें दीसीं बाइसीं मार्तंडातें ह्मणीतलें : ‘‘ मार्तंडा तुं सावळदेवासि जाए : दाया पुढें सांघावें : ‘ बाबा एत असति : अवघी आइति करावी : आणि घोडेनिसीं बाबासि साउमेया यावें ’’ मार्तंड सावळदेवासि गेले : तेथ बाइसाचे भाचे दाएनाएकू होते : तेयापूढें सांघीतलें : मग तेंही सडासंमार्जन करवीलें : चौक रंगमाळीका भरवीलीया : गुढी उभविली : उपाहाराची आइति करविली : आपण घोडें घेउनि साउमे आले : मार्गी भेट जाली : गोसावीयांसि दंडवतें घातलीं : श्रीचरणा लागले : मग गोसावीयांतें वीनवीलें : ‘ घोडेयावरि बैसावे जी ’ : वीनती स्वीकरिली : घोडेयावरि आरोहरण केलें : पुढें भक्तिजन चालति : गोसावीयांचे घोडें वारिकें : गोसावी मागील वास पाहीली : तवं मागीली कडे देमाइसें एतें असति : ते गोसावीयां टाकौनि आली : सर्वज्ञें ह्मणीतलें : ‘ देमती या : घोडेया बैसा ’ : ह्मणौनि पासाडाचा अनुकारू दाखवीला : देमाइसीं ह्मणीतलें : ‘ हो कां : जी : तथा जालें नव्हें जी ’ : ह्मणौनि पासाडावरि हातु ठेविला : यावरि गोसावी कुबजका भवनीं बीजें केलें : ते गोष्टि सांघीतली : ‘ तैसे तुह्मीं केलें देमती : तुम्हीं एथीचे प्रवृत्ति वीखो जालीति ’ : ॥

* मराठी विकिप्रकल्पांसाठी उपरोक्त संतसाहीत्याचा अनुवाद करून हवा आहे. या धाग्यावर आपण स्वत: केलेले अनुवाद प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील. (डॉ.सुधीर देवरे यांचे लेखन प्रताधिकारीत आहे हे लक्षात घ्यावे.) प्रतिसादासाठी धन्यवाद

माहितीसंस्कृतीइतिहासवाङ्मयभाषाव्युत्पत्ती

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

5 May 2014 - 11:57 am | प्रचेतस

उत्तम लेख.

सातवाहनांनी शालिवाहन शक सुरु केला ह्यावर लेखाचा संपूर्ण डोलारा आधारीत आहे. पण बहुसंख्य विद्वांनाच्या मते सातवाहनांनी विशेषतः गौतमीपुत्र सातकर्णीने शालिवाहन शक सुरु केला ह्याला कसलाही आधार नाही. शक सुरु केला तो कुषाणवंशीय कनिश्काने. त्याचे राज्यारोहण इस. ७८ साली झाले. कुशाणांच्या अस्तानंतर त्यांचे क्षत्रप असलेल्या शकांनी (विशेषतः चष्टन क्षत्रप) हे संवत्सर प्रचलित ठेवल्यामुळेच ह्याला शक असे नाव पडले.
शकांवर मिळालेल्या विजयाप्रीत्यर्थ्य शक चालू करणे शक्यच नाही कारण गौतमीपुत्राने शकांचा पराभव केला तो साधारण इ.स. १२५ च्या आसपास येतो. इस. ७८ च्या वेळी तर गौतमीपुत्र बाळच असणार. :)

'शालिवाहन शक' असा नावानिशी उल्लेख साधारण १० /११ व्या शतकात आलेला आहे. तोपर्यंत 'शकु संवतु' हेच नाव प्रचलित होते. सातवाहनांनी जर शक सुरु केला असता तर ते त्यांचे शत्रू असलेल्या शकांचे नाव त्यांच्या संवत्सराला कशाला देतील. सातवाहन संवत असेच त्याचे नामानिधान त्यांनी केले असते. जसे विक्रमादित्याने 'विक्रम संवत' सुरु केले.

माहितगार's picture

5 May 2014 - 12:21 pm | माहितगार

सातवाहनांनी शालिवाहन शक सुरु केला ह्यावर लेखाचा संपूर्ण डोलारा आधारीत आहे.

आपण म्हणता ते बरोबर आहे. यादव आणि त्यानंतरच्या काळात गूढीचे उल्लेख अचानक येणार नाहीत, गुढी उभारण्याची परंपरा त्या पुर्वी पासून असली पाहिजे. मग पुर्वी म्हणजे केव्हा पासून तर त्या पुर्वी शालिवाहन काळापर्यंत कदाचित मागे नेता येईल असा सर्व साधारण कयास बांधला आहे. माझा भर ठाम दावा या पेक्षा कयास करण्यावर अधिक राहीला आहे. अर्थात आपण आणि इतिहासाच्या अभ्यासकांची/जाणकारांची मते निश्चीत महत्वाची असणार. त्यामुळे या विषयावर अधिका माहिती अथवा साधनांकडे लक्ष वेधणे शक्य असल्यास आपल्याकडून इतर जाणकारांकडून माहिती घेण्यास निश्चित आवडेल.

अभिप्रायासाठी धन्यवाद

यातलं बरंचसं ठाऊक नव्हतं… छानाय माहिती…

पैसा's picture

6 May 2014 - 11:02 am | पैसा

श्रीरामाने रावणावर विजय मिळवला आणि ज्या दिवशी अयोध्येत पुन्हा प्रवेश केला त्या दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला नागरिकांनी गुढ्या उभारून उत्सव साजरा केला, अशी पारंपारिक समजूत आहे. अर्थात गुढ्या उभारण्याची चाल प्राचीन असली तरी नेमकी केव्हा सुरू झाली हे सांगणे कठीण आहे.

उंच निशाण काठी पाहून तिथे पोचणे लोकांना सोपे जात असणार हे साहजिकच आहे. त्यामुळे गुढी/काठी/देवाचे निशाण ही खूण म्हणून फार पूर्वीपासून वापरात आहे/असणार. दुसरे म्हणजे गुढी-पताका असा जोडशब्द बरेचदा ऐकायला मिळतो. तोही या जुन्या काळाकडे निर्देश करत असावा.

पाडवा हा शब्द 'प्रतिपदा' यावरून आला असावा.

ततोऽभयवकिरंस तव अन्ये लाजैः पुष्पैश च सर्वतः
समुच्छ्रितपताकास तु रथ्याः पुरवरॊत्तमे ||

ततॊ हय अभ्युच्छ्रयन पौराः पताकास ते गृहे गृहे
ऐक्ष्वाकाध्युषितं रम्यम आससाद पितुर गृहम ||

हे वाल्मिकी रामायणातील श्लोक. ह्यात गुढी असे कुठेही म्हटले नसून पताका हाच शब्द वापरलेला आहे.

माहितगार's picture

6 May 2014 - 1:09 pm | माहितगार

उंच निशाण काठी पाहून तिथे पोचणे लोकांना सोपे जात असणार हे साहजिकच आहे. त्यामुळे गुढी/काठी/देवाचे निशाण ही खूण म्हणून फार पूर्वीपासून वापरात आहे/असणार. दुसरे म्हणजे गुढी-पताका असा जोडशब्द बरेचदा ऐकायला मिळतो.

गुढी-पताका हे शब्द मराठी वारकरी संप्रदाय सोबत वापरताना दिसतो पण मराठीत (कदाचित) वेगवेगळे शब्द असावेत का हे जाणकारांनी सांगावे. कन्नड भाषेत मात्र गुडीपताका शब्द एकत्र पणे ध्वज या अर्थाने येतो. कन्नड मध्ये गुडी शब्द मुख्यत्वे मंदीर या अर्थाने वापरला जात असलातरी ग्रामीण तेलगू प्रमाणे ग्रामीण कन्नडात तो लाकूड या अर्थाने येतोच पण सोबत
लाकडी नक्षीकामास गुडीकारागिर असा काही शब्द कन्नड मध्ये असावा आणि ह्या लाकडी नक्षी/कोरीव काम करणार्‍यांना कन्नड मध्ये गुडीगार म्हणतात हा गुडीगार समाज मुळचा गोवा राज्यातला असावा आणि त्यांनी पोर्तुगिजांच्या धार्मिक जाचास कंटाळून कर्नाटकात स्थानांतरही केले आणि पोर्तुगीज मिशनर्‍यांनी पाडलेल्या गुड्यांची (मंदिरांची) कर्नाटकात जाऊन पुर्नउभारणीही केली. कन्नड भाषेचे कुणी जाणकार मिपावर असतील तर त्यांनी या विषयाबद्दल शोध घेऊन अधिक माहिती दिल्यास आनंद वाटेल.

संदर्भ: कामत.कॉम आणि ऑनलाईन कन्नड-इंग्रजी शब्दकोश

माहितीपूर्ण प्रतिसादांसाठी पैसा ताई, वल्ली, बोबो आणि इस्पीकचा एक्का आपणा सर्वांना धन्यवाद.

पैसा's picture

6 May 2014 - 1:22 pm | पैसा

देवळाच्या गर्भगृहाला "गर्भकुडी" असे म्हणतात. तसेच कोंकणीमधे स्वयंपाकघराला "रांदची कूड" असा शब्दप्रयोग आहे. "कुडाची झोपडी" असा शब्दप्रयोग ऐकला आहे. त्याचा अर्थ गवत-पाल्याने, काठ्या-तुराट्याने बनवलेली, शाकारलेली झोपडी असा असावा.

माहितगार's picture

6 May 2014 - 1:43 pm | माहितगार

देवळाच्या गर्भगृहाला "गर्भकुडी" असे म्हणतात.

गूगल शोधावर रोमन लिपीत गर्भगुडी लिहिले तर कन्नड देवळांच्या गर्भगृहांबद्दल भरपूर रिझल्ट येतात. कोकणीतही काही वेळा ग चा क झाला असणे शक्य वाटते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 May 2014 - 1:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

कुडाची झोपडी म्हणजे कारवी या वनस्पतीच्या सडपातळ आणि लांब खोडांना दोरीने बांधून त्यांच्या भिंतींसारखा उपयोग करून बनवलेली झोपडी. तिचे छ्प्पर शाकारायला पेंढा अथवा गवत वापरले जाते.

पैसा's picture

6 May 2014 - 2:01 pm | पैसा

म्हणजे माहितगार यांच्या म्हणण्याप्रमाणे गुडी-कुडी लांब काठ्यांना म्हटले आहे असे दिसते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

6 May 2014 - 12:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

अत्यंत माहितीपूर्ण लेख.

गुढ्यांची परंपरा बालीतही पाळली जाते. बांबूच्या खांबांच्या बांबूच्याच पानांनी सजवलेल्या रंगीबेरंगी गुढ्या ही बालीची एक खासियत आहे...

बालिनीज पितृपक्षांत (याच्या तारीख-तिथीचा भारतातील पितृपक्षाशी काही संबंध नाही) मृत पूर्वजांचे आत्मे आपल्याला भेटायला येतात अशी तेथे समजूत आहे. त्यांच्या स्वागतासाठी या गुढ्या उभारल्या जातात. त्या गुढ्यांमध्ये पूर्वजांसाठी प्रसाद (जेवण) आणि फुले ठेवायची व्यवस्थाही असते. या काळात चढाओढीने कलाकुसर केलेल्या गुढ्यांनी सजलेल्या बालीमध्ये चक्कर मारणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो.

आपल्या छायाचित्रातील बालिनीज गुढ्या सुंदरच आहेत. एवढ्या सुंदर गुढ्यांमध्ये पुर्वजांना जेवणही मिळते म्हणजे बालिनीज पुर्वजांची खरेच मज्जाच आहे तर ! :)

अशी सुरेख माहिती वाचली की मन भरून पावल्या सारख वाटत. धन्यवाद

माहितगार's picture

6 May 2014 - 2:43 pm | माहितगार

मिपावर कुणी "गाहा सत्तसई" च्या शब्दार्थांचे जाणकार आहेत का ? खालील गाहांमधील ठळक अक्षरातील शब्दांचे अर्थ कुणाला सांगता येऊ शकतील का ? कदाचित धागा विषयाशी संबंध निघणार नाही असे होऊ शकते. पण चर्चा चालू आहे तर माहिती मिळवलेली बरी. गाहा सत्तसई विषयी वेगळा धागाही या चर्चेनंतर थोड्या दिवसांनी काढेनच.

**ओहिदिअहागमासंकिरीहि सहिआहि कुड्डलिहिआओ / गाहा२०६कख
दो तिण्णि तहिं मिअ चोरिआइ रेहा पुसिज्जंति / गाहा२०६गघ

**अज्जं गओ त्ति अज्जं गओ त्ति अज्जं गओ त्ति गणिरीए / गाहा२०८कख
पढम च्चिअ दिअहद्धे कुड्डो रेहाहि चित्तलिओ / गाहा२०८गघ

**सव्वस्सम्मि वि डड्ढे तह वि हु हिअअस्स णिव्वुइ च्चेअ / गाहा२२९कख
जं तेन गामडाहे हत्थाहत्थिं कुडो गहिओ / गाहा२२९गघ

**ते वोलिआ वअस्सा ताण कुडुंगाण खण्णुआ सेसा / गाहा२३२कख
अम्हे वि गअवआओ मूलुच्छेअं गअं पेम्मं / गाहा२३२गघ

**सच्चं भणामि मरणे ठिअ म्हि पुण्णे तडम्मि तावीए / गाहा२३९कख
अज्ज वि तत्थ कुडुंगे णिवडइ दिट्ठी तह च्चेअ / गाहा२३९गघ

२०६. प्रवासास गेलेल्या पतीच्या आगमनाची मुदत टळली असावी अशा आशंकेने सखींनी कुडावरील (कुडाच्या भिंतीवरील) रेषा वाढवल्या पण पत्नीने त्यावरील दोन, तीन रेषा पुसून टाकल्या.

२३२. कुडुंगाण = कुञ्जानां = वनातील

२३८. कुडुंगे = वनाकडे / कुंजाकडे

माहितगार's picture

8 May 2014 - 1:34 pm | माहितगार

माहितीपुर्ण प्रतिसादासाठी धन्यवाद

जगातल्या सर्व महत्वाच्या भाषा गटांच्या प्राच्य व्युत्पत्ती एकाच संकेतस्थळावर शोधावयाच्या संकेतस्थळाचा बदललेला दुवा मिळाला. हे कुणा (चांगल्या) रशियन माणसाने उभारलेले (चांगले) संकेतस्थळ आहे.

http://starling.rinet.ru/cgi-bin/main.cgi?root=config&morpho=0

सुनील's picture

8 May 2014 - 1:53 pm | सुनील

दुवा चाळला. पण त्यात इंडो-आर्यन भाषासमुहाबद्दलची माहिती दिसली नाही!

गल्ली चुकली की काय?

माहितगार's picture

8 May 2014 - 2:34 pm | माहितगार

ना ना स्वतंत्र भाषा नव्हे भाषा गटांबद्दल आहे. Indo-European etymology, Dravidian etymology, Afroasiatic etymology हे पर्याय मी सहसा तपासत असतो. या http://starling.rinet.ru/Texts/ToB_FAQ.pdf या पिडि एफ दुव्यावर साहाय्य माहिती दिसते.

माझ्या अलिकडील आंतरजालावरील वाचनावरून काठी पूजा हा प्रकार मानवी समाजात अधिक सार्वत्रिक आणि अतीप्राचीन काळापासून असावा असे वाटते. आफ्रीकन आदीवासी समूह , जपान, जर्मनी मधील जुन्या परंपरा ते इज्राएल मधील प्राचिन आशेरा पोल ते अजूनही चालू असलेल्या नाशिक , गडचिरोली, छत्तीसगढ मधील काही आदीवासी समुह वेगवेगळ्या प्रकारे काठी पूजा प्रकार आहेत असे दिसते. आदीवासी प्रथांबद्दल माहिती फारच सावकाशीने हाती लागते.

ओडीसातील काही आदीवासी समाजही काठी पूजा करत असत त्यातील एका देवीचे नाव चक्क खंबेश्वरी असे पडले कालांतराने तिची दगडी मुर्तीही पुजेत आली. ओरीसातील सोनेपूर रामपूर इत्यादी भागात बाऊंथी / खिलामुंडा अथवा भगवती देवीचे रुप समजून काठीस साडी गुंडाळली जाते ती बुधाराजाच्या मंदीरात भेटीला जाते. The Concept of the Goddess Khambhesvari in The Culture of the Orissan Tribes या Dr. Bidyut Lata Ray यांच्या प्रबंधात हि काठी पुजेची परंपरा मूळची अब्राह्मणी हिंदवेतर प्राचीन आदीम आदीवासींच्या परंपरातून येत असून काळाच्या ओघात त्याचे हिदूवीकरण झाले असल्याचा दावा केलेला दिसतो आहे.

२१ तारखेस शनिवारी गुढीपाढवा येतो आहे. आपापल्या घरच्या गुढ्यांची छायाचित्रे विकिमिडीया कॉमन्सवर चढवून मिळाल्यास आणि या धागालेखात जोडण्याची संधी मिळाल्यास आभारी राहीन.

धन्यवाद.

खालील छायाचित्र वि.का.राजवाडेंनी प्रकाशित केलेल्या १३व्या शतकाच्या आसपास अज्ञात महानुभाव कवीने रचलेल्या कडवे ९४ आणि ९५ चा अर्थ करून हवा आहे. खालील छायाचित्र अर्काईव्ह डॉट ऑर्गवर उपलब्ध प्रतितून घेतले आहे संपूर्ण संदर्भा साठी अर्काईव्ह डॉट ऑर्गवर मूळ काव्य पहावे.

Stanza 94 & 95 of a Mahanubhav Poem 13th century

छायाचित्र सौजन्य विकिमिडीया कॉमन्स

पैसा's picture

28 Aug 2015 - 4:44 pm | पैसा

कृष्ण बलराम रुक्मिणीहरणासाठी कौंडिण्यपुरला गेले त्या प्रसंगाचं वर्णन आहे. बलराम- कृष्ण यादवसैन्यासहित नदीकाठी पोचले आणि तिथून त्यांनी ब्राह्मणाला पुढे पाठवले. तो आनंदाने गुढी उभारून रुक्मिणीच्या मंदिरी गेला. रुक्मिणीने त्याच्या हातात गुढी पाहून दारातच आनंदाने त्याला वंदन केले.

माहितगार's picture

28 Aug 2015 - 5:50 pm | माहितगार

अनुवाद उपलब्ध करून देण्या बद्दल, खूप खूप धन्यवाद.

मध्यंतरात गुढी बाबत शोध घेता घेता काठी पूजा विषयक अधिक माहिती मिळाली त्यास अनुसरून काठी पूजा या विषयावर मराठी विकिपीडियावर स्वतंत्र लेख चालू केला आहे.

मध्यप्रदेशातील निमाड प्रांतात काठी मातेची पूजा आणि काठी नृत्याची परंपरा आहे. त्या विषयी कूणास काही माहिती मिळाल्यास अवश्य द्यावी.

माहितगार's picture

29 Aug 2015 - 1:26 pm | माहितगार

या दुव्यावरील केरळातील मल्याळम जाहीरातीचे छायाचित्र कॉपी राइटेड असल्यामूळे येथे देता येत नाही; या जाहीरात चित्रातील मुलीच्या हातात गुढी सदृष्य एक तर गुढीच अथवा दिव्याचा स्तंभ नेमके काय असावे असा प्रश्न पडतो आहे.

माहितगार's picture

6 Oct 2015 - 9:47 am | माहितगार

छत्तीसगढ आदिवासीमध्ये हरेली नावाचा उत्सव वेगळ्या (पेरणीच्या ?) मोसमात होतो पण दोन वैशिष्ट्य उल्लेखनीय आहेत, एक प्रत्येक झोपड्यावर अथवा घरावर आरोग्यरक्षणासाठी कडूनिंबाची पाने बांधली जातात. (संदर्भ) दुसरे वैशिष्ट्य गेडी नृत्याचे, बांबूस गेडी म्हणतात, (मारवाडी भाषेतही काठीस गेडी/गेढी शब्द प्रचलीत असावा संदर्भ

राही's picture

6 Oct 2015 - 2:52 pm | राही

वरती गुढी आणि कुडीचा संबंध दाखवला आहे. पण कुडी हा शब्द 'कुटी' या संस्कृत शब्दावरून आला आहे. कुटी म्हणजे छोटेखणी घर. निवारा. कुटीवरून कूड, कुडी हे शब्द आले. देहाला कुडी म्हणतात कारण ते आत्म्याचे घर असते. देहिन् म्हणजे देहधारी असा तो आत्मा. (अग्नीत घेतली उडी, उजळ ही कुडी, पटविले तेव्हा...) पर्णकुटी हा शब्द चांगलाच प्रचलित आहे.
कूट, कोट हे शब्द आणखीनच वेगळे आहेत.
मध्यप्रदेशातल्या काही लोकांकडून कळले की तिथेही गुढी उभारतात, पण ते तिला गुड्डी म्हणतात, कारण शीर्षस्थानी लोटा, गळ्यात माळ, खांद्यापासून नेसवलेली साडी अशी नटवलेली गुढी त्यांना गुड्डी म्हणजे बाहुली वाटते.

माहितगार's picture

6 Oct 2015 - 4:31 pm | माहितगार

मध्यप्रदेशातल्या काही लोकांकडून कळले की तिथेही गुढी उभारतात, पण ते तिला गुड्डी म्हणतात, कारण शीर्षस्थानी लोटा, गळ्यात माळ, खांद्यापासून नेसवलेली साडी अशी नटवलेली गुढी त्यांना गुड्डी म्हणजे बाहुली वाटते.

मुळचे मराठी नसलेल्या समाजात अशी परंपरा असेल तर अधिक माहिती शोधून नक्की द्यावी.

माहितगार's picture

6 Oct 2015 - 5:51 pm | माहितगार

१) माणूस उत्क्रांत होताना (ज्याने अद्यापी झोपडीपण बनवली नसेल) आधी लाकूड अथवा काडी वापरेल का कुटी आधी वापरेल ? कुटी शब्द आधी आला असावा असे का वाटते ?

२) माझ्याकडे कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचा मराठी व्युत्पत्तिकोश नाही त्यामुळे त्यानी कुटी आणि कुडी शब्दाच्या काय व्युत्पत्ती दिल्या आहेत ते कळण्यास मला मार्ग नाही. बुकगंगा डॉट कॉमवर त्यांच्या पुस्तकाची प्रस्तावना दिसते त्यात पृष्ठ क्रमांक ६ वर लाकूड हा शब्द आर्य नव्हे मूळ ऑस्ट्रीक आहे असे म्हटले आहे या बद्दल आपले काय मत आहे /

राही's picture

6 Oct 2015 - 6:34 pm | राही

मध्य भारतातील बराच भाग अठराव्या शतकाच्या मध्यापासून म्हणजे अडीजशे वर्षे मराठी संस्थानिकांच्या अंमलाखाली होता. धार, इंदौर, देवास, ग्वालियर ही मोठी संस्थाने होतीच शिवाय इंग्रजांनी सेंट्रल प्रॉविन्सेस अँड बेरार (सी.पी. अँड बेरार) असा एक नवीन प्रांत कारभाराच्या सोयीसाठी बनवला त्यात सध्याच्या महाराष्ट्रातले अनेक जिल्हे आणि संपूर्ण विदर्भ समाविष्ट होता. आणखी मागे जायचे तर इ.स.च्या दुसर्‍या शतकात गौतमीपुत्र सातकर्णीने माळवा जिंकून घेतला होता. त्यानंतर राष्ट्रकूट आणि पश्चिमी चालुक्यांच्या राजवटी होत्या. या सगळ्यामुळे मध्यप्रदेशावर मराठी संस्कृतीची गडद छाया १९५६पर्यंत होती. रतलाम, राजनांदगाव,(आता छत्तीसगढ) जबलपूर, नेमाडप्रांत (पूर्व आणि पश्चिम निमाड), सागरप्रांत अशी अनेक ठिकाणे मराठीभाषिक होती किंवा तिथे मराठी वस्ती लक्षणीय होती. १९५६च्या भाषावार राज्यपुनर्रचनेमध्ये मराठीभाषिक विदर्भ महाराष्ट्रात आला आणि काही थोडा हिंदीभाषिक प्रदेश-विन्ध्यप्रदेश आणि भोपाळ संस्थान मध्यप्रदेशात येऊन मध्यप्रदेश हे हिंदीभाषिक राज्य बनले. त्यामुळे मराठी परंपरा या इथल्या मूळच्याच. फक्त आता गेल्या साठ-सत्तर वर्षांत त्यांचा चेहरामोहरा बदलून गेला आहे इतकेच.
उगाडी किंवा युगादी हा सण आंध्रप्रदेश,तेलंगण आणि कर्नाटकाच्या काही भागात साजरा केला जातो त्याचेही कारण असेच काहीसे आहे.

माहितगार's picture

6 Oct 2015 - 7:25 pm | माहितगार

मध्यप्रदेशच्या गुढी पुजनाबद्दल आंजावर अथव पुस्तकातील काही संदर्भ मिळू शकतील का ?

कालावधी साम्य असले तरी उगादी/युगादीची सदृश्यता दिसत नाही बरे गुढी मुख्यत्वे तेलंगाणा आणि कर्नाटकात प्रचलीत शब्द आहे पण गुढी पूजन दिसत नाही

ज्ञानेश्वरीत पुढील ओव्या आल्या आहेत.

अधोर्ध्व गूढें काढी । प्राण नवांची पेंडी । बांधोनि घाली उडी । मध्यमेमाजीं ॥७३९॥
संकल्पविकल्पांचें लुगडे । सांडूनि मन उघडें । बुद्धि मागिलेकडे । उगीचि बैसे ॥७४०॥

ट्रांस लिटरल डॉट ऑर्गवरील संदर्भ

ज्ञानेश्वरीतील उपमा नावाच्या ब्लॉगवर प्राण नवांची पेंडी / प्राणु नवां पेढी चा काँटेक्स्ट दिलेला आहे.

दुसर्‍या एका ब्लॉगवर गूढें म्हणजे गुढी आणि पुढच्या ओवीत लुगडे असा उल्लेख आहे म्हणून गुढीस ज्ञानेश्वर काळापासून लुगडे गुंडाळले जात असावे असा काही निश्कर्षाचा प्रयत्न केला आहे.

गुढीस साडी किंवा लुगडे नेसवण्याचा जुन्या साहित्यात नेमका उल्लेख उपलब्ध होणे प्रथेबद्दल अधिक निश्चित माहिती देणारे असू शकते -गुढी आणि गुढीपाडव्या बद्दल सावकाशपणे अधिक संदर्भ प्रकाशात येत आहेत त्यामुळे -अगदी ओढून ताणून संबंध जोडला पाहीजे असे नाही.

इथे गूढें म्हणजे खरेच गुढी अभिप्रेत आहे का या बद्दल व्यक्तिशः मी जरासा साशंक असल्यामुळे ज्ञानेश्वरीतील या दोन्ही ओव्यांचा अर्थ लावून हवा आहे. आणि त्या ब्लॉग लेखकास वाटते तसे गूढें (गुढी)- लुगडे असा संबंध या दोन ओव्यातून सिद्ध होतो का या बद्दल मत प्रदर्शन हवे आहे.

गीतेतील मूळ श्लोक
धृत्या यया धारयते मनःप्राणेन्द्रियक्रियाः ।

योगेनाव्यभिचारिण्या धृतिः सा पार्थ सात्त्विकी ॥३३॥

हे पार्था (अर्थात पृथापुत्र अर्जुना), ज्या अव्यभिचारिणी धारणशक्तीने मनुष्य ध्यानयोगाने मन, प्राण व इंद्रिये यांच्या क्रिया धारण करीत असतो, ती धारणा सात्त्विक होय. ॥ १८-३३ ॥

संदर्भ

गामा पैलवान's picture

20 May 2017 - 4:20 pm | गामा पैलवान

लोकहो,

अतिशय माहितीपूर्ण धागा व चर्चा आहे. धन्यवाद! :-)

माझ्या समजुतीप्रमाणे गुढी हे पाठीच्या कण्याचे प्रतीक आहे, तर उपडा तांब्या शिराचे. कुडी म्हणजे देह ह्याच अर्थी समजलं जात असावं. केरळकन्येच्या चित्रात गुढीवर शिरोघट दिसतो.

आ.न.,
-गा.पै.