फास्ट लेग थिअरीचा परिणामकारक वापर करुन इंग्लंडने अॅशेस मालिका जिंकली होती!
या डावपेचाचं मुख्य टार्गेट असलेल्या डॉन ब्रॅडमनने ३९६ रन्स काढल्या असल्या तरी मेलबर्न व्यतिरिक्त एकाही टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयाच्या जवळपासही जाता आलं नव्हतं. सिडनीच्या पहिल्या टेस्टमधील स्टॅन मॅकेबची आक्रमक इनिंग्जही इंग्लंडला रोखण्यास अपुरी पडली होती.
ऑस्ट्रेलियाला जोडूनच असलेल्या न्यूझीलंडच्या दौर्यातून दुखापतीमुळे हॅरॉल्ड लारवूडने आधीच माघार घेतली होती. जार्डीनसह सर्वचण न्यूझीलंडला गेलेले असताना एसएस ऑट्रँटो बोटीवरुन इंग्लंडची वाट धरली.
अॅडलेड टेस्टनंतर उद्भवलेल्या वादंगामुळे सर्वांनाच ऑस्ट्रेलियात नेमकं काय झालं असावं हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. लारवूड इंग्लंडला परतल्यावर पत्रकार-समिक्षकांनी त्याचा बराच पाठपुरावा केला, परंतु न्यूझीलंडचा दौरा आटपून इंग्लिश संघ परतेपर्यंत पत्रकारांशी बोलण्यास एम सी सी शी असलेल्या काँट्रॅक्टमुळे लारवूडला मनाई करण्यात आली होती, त्यामुळे पत्रकारांना त्याच्याकडून कोणतीही बातमी मिळू शकत नव्हती! ६ मे १९३३ ला न्यूझीलंडच्या दौर्यावरुन इंग्लिश संघ साऊथहॅम्टनच्या बंदरात परतला!
दुसर्याच दिवशी, ७ मे च्या संडे एक्सप्रेसमध्ये लारवूडने लिहीलेला लेख झळकला!
आपल्या या लेखात लारवूडने फास्ट लेग थिअरीचं समर्थन करणार्या अनेक गोष्टी उदाहरणासह नमूद केल्या होत्या. लारवूड लिहीतो,
Richardson and McCabe played me all right, Woodfull and Bradman could not. Woodfull was too slow, and Bradman too scared!
ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांबद्दल आपल्या लेखात पुढे त्याने लिहीलं होतं,
The knew nothing of cricket. All they wanted was for Bradman to score runs!
ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीवर आणि इंग्लिश खेळाडूंना उद्देशून करण्यात आलेल्या शिवीगाळीबद्दलही लारवूडने तीव्र नापसंती व्यक्त केली.
When the Australians come here they are treated as gentlemen. When we go to Australia we have to suffer cheap wit from an unsportsmanlike gang which would not be tolerated for a moment here ... The Australians may not like my bowling. Well, I do not like their howling..
जार्डीन आणि त्याच्या सहकार्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात नमवून अॅशेस परत मिळवल्याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. विशेषतः १९३० च्या मालिके इंग्लिश बॉलिंगची धुलाई करणार्या ब्रॅडमनला निष्प्रभ करणारे डावपेच वापरल्याबद्दल जार्डीन आणि लारवूड यांच्यावर स्तुतिसुमनं उधळण्यात आली होती!
जार्डीनने लारवूडला भेट म्हणून खास चांदीपासून बनवलेला एक अॅश ट्रे आणला होता! त्या अॅशट्रेवर कोरलं होतं,
Thanks a lot Harold for the ashes - from a greatful captain.
एम सी सी च्या पदाधिकार्यांना आणि प्रेक्षकांनाही फास्ट लेग थिअरीत ऑस्ट्रेलियनांना आक्षेपार्ह वाटण्यासारखं काय आहे हे अद्यापही कळलेलं नव्हतं. त्यांच्यामते ऑस्ट्रेलियन बॅट्समन लारवूडचा मुकाबला करण्यास असमर्थ ठरल्यामुळे कोल्ह्याला द्राक्षं आंबट या न्यायाने त्यांनी लारवूड आणि जार्डीनवर अनाठायी टीका केलेली होती.
१९३४ च्या इंग्लिश मोसमात बॉडीलाईन ही नेमकी काय भानगड आहे याची चुणूक इंग्लिश प्रेक्षकांना आणि एम सी सी च्या पदाधिकार्यांना पाहण्यास मिळाली.
नॉटिंगहॅमशायरच्या संघात लारवूड आणि व्होस हे दोन फास्ट बॉलर्स होते आणि फास्ट लेग थिअरीला पूर्ण पाठींबा असलेला आर्थर कार त्यांचा कॅप्टन होता! कौंटी सामन्यात त्यांनी फास्ट लेग थिअरीचा सढळ वापर केला! पायाच्या दुखापतीमुळे लारवूड पूर्ण जोमात बॉलिंग करु शकत नव्हता, परंतु व्होस मात्रं पूर्ण तंदुरुस्त होता! नॉटिंगहॅमविरुद्धच्या सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघातील बॅट्समनपैकी अनेकांना व्होसच्या बॉडीलाईन बॉलिंगचा प्रसाद मिळाला होता! काही मॅचेसमध्ये लारवूड बॉलिंग टाकण्यास असमर्थ ठरला असला तरी प्रेक्षकांना त्याच्याबद्दल असलेलं आकर्षण लक्षात घेऊन नॉटिंगहॅमशायरने त्याची बॅट्समन म्हणून संघात निवड केली होती!
लारवूड आणि व्होसच नव्हे तर केंब्रिज युनिव्हर्सिटीचा फास्ट बॉलर केन फार्न्स यानेही युनिव्हर्सिटीच्या सामन्यात फास्ट लेग थिअरीचा सढळ वापर केला! परिणामी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या जखमी बॅट्समनची फौज प्रेक्षकांना पाहण्यास मिळाली!
फास्ट लेग थिअरीचे हे घातक परिणाम समोर आल्यावर इंग्लंडमधल जनमत हळूहळू बदलू लागलं!
१९३४ च्या मे महिन्याच्या अखेरीस लारवूडचं 'बॉडीलाईन ?' हे पुस्तक संडे डिस्पॅच या वृत्तपत्रात लेखमालिकेच्या स्वरुपात प्रसिद्ध झालं. या पुस्तकात लारवूडने ऑस्ट्रेलियातील घटनांचं तपशीलवार वर्णन केलं होतं. त्याच्या जोडीला ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या तंत्राविषयी, प्रेक्षकांच्या हुल्लडबाजीविषयी आणि फास्ट लेग थिअरीविषयी आपली मतं अधिकच सविस्तरपणे व्यक्तं केली होती!
बॉडीलाईन बॉलिंगच्या घातक परिणामांची कल्पना आल्याने एम सी सी चे पदाधिकारी एव्हाना सावध झालेले होते. लारवूडच्या या लेखमालिकेमुळे आणि त्याने फास्ट लेग थिअरी बॉलिंगच्या केलेल्या समर्थनामुळे एम सी सीच्या अधिकार्यांची काहीशी पंचाईत झालेली होती. परंतु अनेकांचा विरोध असूनही इंग्लंडच्या दौर्यावर असलेल्या वेस्ट इंडीज संघाविरुद्ध कॅप्टन म्हणून जार्डीनचीच निवड करण्यात आली!
जार्डीनच्या संघात अॅशेस मालिकेतील खेळाडूंपैकी स्वत: जार्डीन, सटक्लीफ, हॅमंड, लेलँड, वॅट, अॅमेस, व्हॅरेटी आणि अॅलन यांचा समावेश असला तरी अॅशेस मालिकेत दहशत निर्माण करणार्या लारवूड आणि व्होस यांचा समावेश करण्यात आला नव्हता! लारवूड दुखापतीमुळे खेळू शकत नसला तरी व्होसला मात्रं वगळण्यात आलं होतं ते त्याने कौंटी सामन्यात बॉडीलाईनचा सढळ वापर केल्यामुळेच!
लॉर्ड्सच्या पहिल्या टेस्टमध्ये केवळ २९६ रन्स करुनही इंग्लंडने वेस्ट इंडीजला एक इनिंग्ज आणि २७ रन्सनी पराभूत केलं. वेस्ट इंडीजच्या पहिल्या इनिंग्जमध्ये कॅप्टन जॅकी ग्रॅंटचा (२६) अपवाद वगळता कोणीच काही करु शकलं नाही! दुसर्या इनिंग्जमध्ये जॉर्ज हेडलीने फटकेबाज अर्धशतक झळकावलं परंतु त्याला इतरांची साथ मिळाली नाही.
ओल्ड ट्रॅफर्डच्या दुसर्या टेस्टमध्ये मात्रं इव्हान बॅरो (१०५) आणि जॉर्ज हेडली (१६९) यांच्या २०० रन्सच्या पार्टानरशीपच्या जोरावर वेस्ट इंडीजने पहिल्या इनिंग्जमध्ये ३७५ रन्स फटकावल्या. इंग्लंडला वॉल्टर्स आणि सटक्लीफ यांनी ६३ रन्सची सलामी करुन दिली. कोणताही धोका न पत्करता ते खेळत होते. वेस्ट इंडीजचा कॅप्टन जॅकी ग्रँट संथ विकेटमुळे वैतागला होता. शेवटचा उपाय म्हणून त्याने इंग्लंडचेच डावपेच त्यांच्याविरुद्धच वापरण्याचा निर्णय घेतला..
बॉडीलाईंन!
वेस्ट इंडीजच्या संघात लेअरी कॉन्स्टन्टाईन आणि मॅनी मार्टींडेल हे दोन फास्ट बॉलर्स होते. बर्ट सटक्लीफ रन आऊट झाल्यामुळे सलामीची जोडी नुकतीच फुटली होती. सटक्लीफनंतर आलेला हॅमंड आणि वॉल्टर्स यांच्यावर कॉन्स्टन्टाईन-मार्टींडेल यांनी लेग ट्रॅप लावून शॉर्टपीच बॉलिंगचा हल्ला चढवला!
मार्टींडेलचा वेगात उसळलेला एक बॉल हॅमंडच्या हनुवटीवर आदळला! हादरलेल्या हॅमंडला त्या धक्क्यातून सावरुन पुन्हा खेळण्यासाठी सज्ज होण्यास थोडा वेळ लागला. मार्टींडेलने वॉल्टर्सला एल बी डब्ल्यू पकडल्यावर कॉन्स्टन्टाईनच्या बॉलिंगवर हॅमंड बाद झाला. लेग ट्रॅपमध्ये मार्टींडेलनेच त्याचा कॅच घेतला!
हॅमंड बाद झाल्यावर बॅटींगला आला डग्लस जार्डीन!
आणखीन १५ रन्सची भर पडते तोच मार्टींडेलच्या बॉलिंगवर कॉन्स्टन्टाईनने वॅटचा कॅच घेतल्यावर इंग्लंडचा स्कोर झाला १३४/४! कॉन्स्टन्टाईन आणि मार्टींडेलची बॉडीलाईन बॉलिंग खेळणं लेस अॅमेसला कठीण जात होतं. जार्डीनपाशी त्याने हे बोलून दाखवताच जार्डीन म्हणाला,
"You get yourself down this end, Les. I'll take care of this bloody nonsense."
कॉन्स्टन्टाईन आणि मार्टींडेलच्या बॉडीलाईन बॉलिंगचा जार्डीनने पूर्ण आत्मविश्वासाने मुकाबला केला! तो प्रत्येक बॉल बॅकफूटवर जाऊन खेळत होता. बॉल कितीही घातक प्रकारे उडाला तरीही डेड बॅटने पायाशी तटवण्याचं तंत्र त्याने अवलंबलं! कॅच जाऊ नये आणि खेळताना चेंडूवर नियंत्रण राहवं यासाठी अनेकदा केवळ एका हाताने तो खेळत होता! एकदाही त्याचा कॅच उडाला नाही आणि त्याच्या शरिराच्या कोणत्याही भागाला बॉलचा स्पर्श झाला नाही!
ऑस्ट्रेलियन विकेट्सच्या तुलनेत ओल्ड ट्रॅफर्डची विकेट संथ असली तरी मार्टींडेलने बॉडीलाईन बॉलिंग करत ५ विकेट्स घेतल्या. कॉन्स्टन्टाईनला मात्रं केवळ एकच विकेट मिळाली.
डग्लस जार्डीनने ३०० चेंडूंचा सामना करत १२७ रन्स काढल्या!
टेस्ट क्रिकेटमधलं हे त्याचं एकमेव शतक होतं!
वेस्ट इंडी़जच्या दुसर्या इनिंग्जमध्ये इंग्लिश फास्ट बॉलर एडवर्ड 'नोबी' क्लार्कने वेस्ट इंडीजच्या बॅट्समनवर बॉडीलाईनने प्रतिहल्ला केला! क्लार्कला लेग ट्रॅपची फिल्डींग देण्यास जार्डीन एका पायावर तयार होताच! क्लार्कने २ विकेट्स घेतल्या, परंतु डावखुरा स्पिनर जेम्स लॅन्गरीजने तब्बल ७ विकेटस काढल्याने क्लार्कचं यश मर्यादितच होतं. मजेदार बाब म्हणजे ऑस्ट्रेलियात अॅशेस मालिकेतील टेस्ट्स या 'टाईमलेस' खेळल्या गेल्या होत्या तर वेस्ट इंडी़अविरुद्धच्या टेस्ट्स अवघ्या ३ दिवसांच्या होत्या!
एम सी सी च्या पदाधिकार्यांच्या आणि ब्रिटीश जनतेच्या बॉडीलाईन बॉलिंगबद्दलच्या मतात या मालिकेनंतर आमुलाग्र बदल झाला. बॉडीलाईन बॉलिंग ही बॅट्समनच्या दृष्टीने धोकादायक ठरु शकते याची सर्वांनाच कल्पना आली होती!
दरम्यान अॅशेस मालिका संपल्यावर १९३३ च्या एप्रिल महिन्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने शेफील्ड शील्ड सामन्यांत एका नियमाद्वारे बॉडीलाईन बॉलिंग बेकायदेशीर ठरवली होती. एम सी सी च्या पदाधिकार्यांनी सुरवातीला या नियमाची अशक्यप्राय म्ह्णून संभावना केली असली तरी इंग्लिश मोसमात बॉडीलाईन बॉलिंगचे प्रताप समोर आल्यावर मात्रं एम सी सी ची भूमिका हळूहळू बदलू लागली होती. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या अधिकार्यांसमवेत १९३४ सालच्या मालिकेविषयी चर्चा करताना बॉडीलाईनचा वापर केला जाणार नाही असं स्पष्टं आश्वासन देणं एम सी सी च्या अधिकार्यांनी टाळलं असलं, तरी बॅट्समनला दुखापत करण्याच्या उद्देशाने बॉलिंग करण्यास आमचा विरोधच आहे आणि तो अखिलाडूवृत्तीचं प्रदर्शन करणारा गंभीर अपराध मानण्यात येईल अशी त्यांनी भूमिका घेतली! एम सी सी च्या या भूमिकेनंतर ऑस्ट्रेलियाने १९३४ मध्ये इंग्लंडचा दौरा करण्यास होकार दिला!
इंग्लिश मोसम आटपल्यावर जार्डीनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ भारताच्या (तत्कालीन हिंदुस्थान) दौर्यावर गेला होता. ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर गेलेल्या खेळाडूंपैकी केवळ जार्डीन आणि हॅडली व्हॅरेटीचा या संघात समावेश होता! अनेक प्रमुख खेळाडूंनी या दौर्यावर येण्यास नकार दिला होता!
हिंदुस्थानच्या दुबळ्या संघाविरुद्ध दुय्यम संघ असूनही इंग्लंडने ही टेस्ट मालिका २-० अशी आरामात जिंकली. खुद्द जार्डीनने चार इनिंग्जमध्ये तीन अर्धशतकं फटकावली होती! ऑस्ट्रेलियात बॉडीलाईनचा सढळ वापर करणार्या जार्डीनने हिंदुस्थानात मात्रं हॅडली व्हॅरेटीच्या स्पिनचा चाणाक्षपणे योग्य वापर करुन घेतला! फास्ट बॉलर नोबी क्लार्क आणि स्टॅन निकोल्स यांनी काहीवेळा बॉडीलाईन बॉलिंग केली. परंतु महमद निसार आणि अमरसिंग या दोघांनी इंग्लिश बॅट्समनवर प्रतिहल्ला चढवल्यावर ते चकीतच झाले!
ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांशी उभा दावा असणार्या जार्डीनने भारतीय प्रेक्षकांबद्दल मात्रं वेळोवेळी गौरवोद्गार काढले! अर्थात आपल्या संघ सहकार्यांशी, अंपायर फ्रँक टॅरेंट आणि खुद्द व्हाईसरॉयशी जार्डीनची काही वेळा खडाजंगी उडाली असली तरी या दौर्यावर जार्डीन एकंदरीत बराच खुशीत होता! भारताबद्दल त्याला असलेलं प्रेम आणि आपुलकी त्याने अनेकदा बोलून दाखवली होती!
जार्डीनच्या भारताबद्दलच्या आकर्षणाचं आणि आपुलकीचं एक कारण म्हणजे आपल्या वडीलांकडून त्याला भारतीय लोकांचे अनेक सुखद अनुभव ऐकण्यास मिळालेले होते. परंतु दुसरं मुख्य कारण म्हणजे त्याचा जन्म तत्कालिन बिटीश साम्राज्याचा भाग असलेल्या मुंबईत झालेला होता!
जार्डीन हिंदुस्थानचा दौर्यावर असतानाच ऑस्ट्रेलियाच्या १९३४ च्या इंग्लंड दौर्याविषयी वाटाघाटी सुरु झाल्या होत्या. बहुसंख्य ऑस्ट्रेलियनांना जार्डीन कॅप्टन म्हणून असल्यास पुन्हा बॉडीलाईनचा वापर करण्याची शक्यता वाटत होती! दक्षिण ऑस्ट्रेलियाचा गव्हर्नर अलेक्झांडर होर-रुथवेनचा तर जार्डीन कॅप्टनच काय पण इंग्लिश संघात साधा खेळाडू म्हणून असण्यालाही टोकाचा विरोध होता. पेल्हॅम वॉर्नरचं मत जार्डीनने खेळाडू म्हणून संघात असावं पण त्याच्याकडे नेतृत्व सोपवू नये असं होतं! लॉर्ड हॉकसारख्यांचा मात्रं जार्डीनला वगळण्यास विरोध होता. त्याच्या मते फास्ट लेग थिअरी धोकादायक नसून ऑस्ट्रेलियन बॅट्समन खेळू शकले नाहीत याचं खापर जार्डीन वर फोडण्यात काहीच अर्थ नव्हता. स्वतः जार्डीनने बॉडीलाईनचा सामना करत वेस्ट इंडी़जविरुद्ध शतक झळकावलं होतं याकडे त्याने लक्षं वेधलं होतं!
एम सी सी च्या पदाधिकार्यांमध्ये जार्डीनची निवड करावी की न करावी याबद्दल संभ्रम होता. यातून त्यांची सुटका केली ती खुद्द जार्डीननेच! १९३४ च्या मार्चमध्ये इव्हिनींग स्टँडर्डला दिलेल्या मुलाखतीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्टमध्ये खेळण्याची आपली कोणतीही मनिषा नसल्याचं जार्डीनने जाहीर केलं!
"I have neither the intention nor the desire to play cricket against Australia this summer!"
जार्डीनने हा निर्णय घेण्यामागचं नेमकं कारण काय असावं हे जार्डीनच जाणे! एम सी सी च्या अधिकार्यांनी बॉडीलाईनचा वापर करणार नाही अशी जार्डीनकडे मागणी केली पण जार्डीनने त्याला नकार दिला असा एक मतप्रवाह आहे. दुसरी शक्यता म्हणजे एम सी सी ने त्याला वगळण्यात येणार असल्याची सूचना दिल्यावर जार्डीनने स्वत:च निवृत्तीची घोषणा केली! जार्डीन हौशी क्रिकेटपटू होता. क्रिकेट हे त्याच्या चरितार्थाचं साधन नव्हतं त्यामुळे व्यावसायिक कारणामुळे जार्डीनने हा निर्णय घेतला असावा असंही मानलं जातं.
ऑस्ट्रेलियात झालेल्या दुखापतीतून १९३४ च्या मोसमापूर्वी लारवूड पूर्णपणे तंदुरुस्त झाला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत एम सी सी च्या संघात त्याची निवड निश्चित मानली जात होती. इंग्लिश संघात लारवूडची निवड झाल्यास ऑस्ट्रेलियन संघावर मानसिक दबाव येणार होता हे उघड होतं. बॉडीलाईन बॉलिंग न करताही लारवूड तितकाच घातक बॉलर आहे याची सर्वांनाच कल्पना होती.
एम सी सी च्या पदाधिकार्यांना कोणत्याही परिस्थितीत ऑस्ट्रेलियाचा दौरा होणं आवश्यक वाटत होतं. बॉडीलाईनचा वापर टाळण्याची त्यांनी आधीच ऑस्ट्रेलियन बोर्डाच्या अधिकार्यांना ग्वाही दिलेली होती. परंतु इतक्यातच समाधान न मानत ऑस्ट्रेलियन अधिकार्यांच्या आणि खेळाडूंच्या समाधानासाठी एम सी सी च्या कमिटीतील ढुढ्ढाचार्यांनी बॉडीलाईन बॉलिंगबद्दल ऑस्ट्रेलियन खेळाडूंची माफी मागण्याचा लारवूडला आदेश दिला! लारवूडने हा माफीनामा लिहून न दिल्यास त्याची इंग्लिश संघात निवड केली जाणार नाही असंही त्याला बजावण्यास एम सी सी ने कमी केलं नाही!
बॉडीलाईनची कल्पना ज्याच्या सुपिक मेंदूतून बाहेर पडली त्या डग्लस जार्डीनकडे मात्रं अशी कोणतीही मागणी करण्यात आली नाही!
लारवूडचं माथं भडकलं!
तत्कालिन इंग्लिश क्रिकेटमधील वर्गीकरणानुसार लारवूड व्यावसायिक खेळाडू होता तर जार्डीन हौशी! व्यावसायिक खेळाडू असलेल्या लारवूडला आपल्या कॅप्टनचा आदेश मानणं बंधनकारक होतं. त्याने एम सी सी च्या अधिकार्यांसमोर नेमका हाच मुद्दा मांडला. आपल्या कॅप्टनच्या आदेशाचं पालन करणं व्यावसायिक खेळाडू असल्याने आपल्याला बंधनकारक होतं. त्याच्या आदेशावरुन आपण बॉडीलाईन बॉलिंग केली असल्यामुळे दोष असलाच तर तो आपला नाही असं त्याने एम सी सी ला ठणकावलं!
ऑस्ट्रेलियनांचा मनापासून तिरस्कार करणार्या जार्डीनला अशी सूचना करण्याची एम सी सी च्या कमिटीची हिम्मत होणं शक्यंच नव्हतं. अॅशेसमधील विजयामुळे जार्डीन प्रेक्षकांच्या दृष्टीने हिरो ठरला होता. एम सी सी ने त्यामुळे सगळा दोष लारवूडच्या माथी मारला!
अर्थात लारवूडला हे अनपेक्षीत नसावंच! संडे डिस्पॅचमध्ये लिहीलेल्या लेखात फास्ट लेग थिअरी बॉलिंगचा आपल्याला कोणताही पश्चात्ताप होत नसल्याचं लारवूडने स्पष्टपणे नमूद केलं! "पुन्हा कधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट क्रिकेट खेळण्यासाठी माझी निवड होईल अशी शक्यता मला कमीच वाटते!" आपल्या लेखात लारवूड पुढे म्हणाला!
अपेक्षेप्रमाणेच एम सी सी ने लारवूडची इंग्लंडविरुद्ध निवड केली नाही.
अॅशेस मालिका सुरु होण्यापूर्वी इंग्लंडचा कॅप्टन बॉब वॅट आणि ऑस्ट्रेलियन कॅप्टन बिल वूडफूल यांच्यात झालेल्या करारानुसार दोन्ही कॅप्टन्सनी बॉडीलाईन बॉलिंगच वापर न करण्याचं तत्वतः मान्यं केलं असलं तरी अनेक वेळा इंग्लिश बॉलर्सनी हा करार झुगारुन बॉडीलाईन बॉलिंग केली असल्याचा वूडफूलने नंतर आरोप केला. फक्तं त्यांनी लेग ट्रॅप फिल्डींग लावली नव्हती.
नॉटींगहॅमशायरविरुद्धच्या सामन्यात तर बिल व्होसने उघडपणे बॉडीलाईनचा वापर केल्यावर वूडफूलने व्होसची बॉलिंग अशीच सुरु राहिली तर ऑस्ट्रेलिया सामना सोडून देईल अशी धमकी दिली! दुसर्या दिवशी 'दुखापती'मुळे व्होस बॉलिंग आणि फिल्डींगला मैदानात उतरला नव्हता!
१९३५ च्या मोसमात बॉडीलाईनला नेस्तनाबूत करण्यासाठी एम सी सी ने आपल्या नियमात महत्वाचा बदल केला. बॅट्समनला इजा होईल अशा प्रकारे बॉलिंग करणं हे बेकायदेशीर असून अशी बॉलिंग आढळून आल्यास मनाई करण्याचा अंपायर्सना अधिकार देण्यात आला. १९५७ मध्ये करण्यात आलेल्या दुसर्या नियमानुसार लेग साईडला बॅटींग क्रीजच्या मागे दोन पेक्षा जास्तं फिल्डर्स ठेवण्यास मनाई करण्यात आली! हा नियम मुख्यतः ऑफ स्पिनर्स आणि डावखुर्या स्पिनर्सच्या नकारात्मक आणि बचावात्मक बॉलिंगवर पर्याय म्हणून बदलण्यात आला असला तरी या नियमामुळे बॉडीलाईन बॉलिंग आणि त्यासाठी आवश्यक असलेला लेग ट्रॅप पार निष्प्रभ ठरला!
एम सी सी च्या संघात निवड न झालेला लारवूड १९३७ च्या मोसमापर्यंत नॉटिंगहॅमशायरकडून कौंटी क्रिकेट खेळत होता. एम सी सी ने बॉडीलाईनचा खलनायक म्हणून लारवूडला दोष दिला असला तरी सामान्य इंग्लिश प्रेक्षकांसाठी जार्डीनप्रमाणेच लारवूडही हिरो होता! दुसर्या महायुद्धात अनेक इंग्लिश खेळाडूंप्रमाणे लारवूडही ब्रिटीश फौजेत दाखल झाला होता! महायुद्ध संपल्यावर १९४६ मध्ये लारवूडने मिठाईच दुकान थाटलं, परंतु महायुद्धाच्या खाईत होरपळलेल्या ब्रिटनमध्ये ते दुकान यशस्वीपणे चालणं कठीणच होतं.
क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यावर लारवूडने क्रिकेटशी फारसा संबंध येऊ दिला नव्हता. वैयक्तीक प्रसिद्धी टाळण्याकडेच त्याचा कल होता. परंतु १९४८ साली ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडच्या दौर्यावर असताना बर्याच विनंतीनंतर तो डॉन ब्रॅडमनच्या निरोपाच्या समारंभाला हजर राहीला! ब्रॅडमन आणि लारवूड यांच्यातील संभाषण मात्रं औपचारीक शब्दांपुढे गेलं नाही. अर्थात त्यांच्यातील शाब्दीक युद्ध त्याला कारणीभूत होतं. 'बॉडीलाईन ?' या आपल्या पुस्तकात लारवूडने ब्रॅडमन आणि वूडफूलच्या तंत्राविषयी शंका उपस्थित केली होती. त्याच्या प्रत्युत्तरादाखल ब्रॅडमनने लारवूड फेकी बॉलिंग करत असल्याचा आरोप केला होता!
ऑस्ट्रेलियन संघातील इतर अनेकजण मात्रं लारवूडशी संवाद साधण्यास उत्सुक होते. विशेषत: फास्ट बॉलर असलेला रे लिंडवॉल! बॉडीलाईन मालिकेत शाळकरी असलेल्या लिंडवॉल मॅच पाहण्यास स्टेडीयमवर हजर होता. लारवूडच्या बॉलिंगने आणि त्याच्या साईड ऑन अॅक्शनने प्रभावित झालेल्या लिंडवॉलने आपला रनअप् आणि अॅक्शन लारवूडवरच बेतली होती!
(रे लिंडवॉल आणि वेस्ट इंडीजचा मायकेल होल्डींग हे आपल्या अत्यंत स्टायलीश आणि लयीत असलेल्या रनअपसाठी ओळखले जातात!)
याच वेळी लारवूडची गाठ पडली ती जुना प्रतिस्पर्धी असलेल्या जॅक फिंगल्टनशी! फिंगल्टन पत्रकार म्हणून या दौर्यावर आला होता. लारवूडने आपल्या आर्थिक परिस्थितीविषयी चिंता व्यक्तं केल्यावर फिंगल्टनने त्याला ऑस्ट्रेलियात सेटल होण्याचा सल्ला दिला! ऑस्ट्रेलियात लारवूडला सहजपणे काम मिळेल अशी खात्री देण्यासही फिंगल्टन विसरला नाही!
फिंगल्टनचा सल्ला मानून लारवूडने १९५० साली ऑस्ट्रेलियाची वाट धरली!
१ एप्रिल १९५० या दिवशी ओराँटेस या जहाजावरुन आपली पत्नी आणि पाच मुलींसह लारवूड जेव्हा इंग्लंड सोडून ऑस्ट्रेलियाला गेला तेव्हा बंदरावर केवळ एकमेव पत्रकार हजर होता तो म्हणजे जॉन अरलॉट!
जहाजाने इंग्लंडचा किनारा सोडल्यावर लारवूडने जहाजावर चढण्यापूर्वी त्याला मिळालेली तार उघडून वाचली.
"Bon voyage! Take care of yourself. Good luck always. Skipper".
तार पाठवणारी व्यक्ती अर्थातच डग्लस जार्डीन!
ऑस्ट्रेलियात आल्यावर लारवूड लवकरच सिडनीमध्ये सेटल झाला! कोल्ड्रींक बनवणार्या एका कंपनीत काम आणि त्याच्या जोडीला क्रिकेट कॉमेंटेटर आणि अॅनालिस्ट म्हणून तो काम करु लागला.
********************************************************************************
ब्रॅडमन आणि लारवूड दोघांच्याही डोळ्यासमोरुन चाळीस वर्षांपूर्वीचा तो काळ क्षणार्धात फिरुन गेला असावा..
भानावर आल्यावर दोघांनीही आपुलकीने एकमेकाची चौकशी केली. एव्हाना पुलाखालून बरंच पाणी वाहून गेल्यामुळे दोघांमधे अजिबात कटुता उरलेली नव्हती.
"जस्ट इमॅजिन डॉन!" जुनी आठवण झाल्यावर लारवूड म्हणाला, "आज आपण इथे आरामात गप्पा मारत उभे आहोत तसं चाळीस वर्षांपूर्वी कोणी आपल्याला पाहिलं असतं तर केवढा गह्जब झाल असता?"
"खर आहे!" ब्रॅडमन मान डोलवत म्हणाला, "सिडनीच्या शेवटच्या टेस्टमध्ये आपण दोघांनी एकदमच मैदान सोडलं, पण त्यावेळी एकमेकांकडे पाहण्यासही आपण तयार नव्हतो!"
********************************************************************************
लारवूड स्टोरी या आपल्या आत्मचरित्रात नंतर लारवूडने ब्रॅडमनबद्दल गौरवोद्गार काढले. लारवूड म्हणतो,
"He was the best batsman I bowled to! When they called me a killer, they forgot that Bradman was the biggest killer amongst all. He could demoralize and kill a bowler by his batting prowess!"
ब्रॅडमननेही नंतर लारवूडवर केलेला चकिंगचा आरोप मागे घेतला.
लारवूडबद्दल ब्रॅडमनच्या मनातली कटुता कमी झाली असली तरी जार्डीनबद्द्ल मात्रं त्याच्या मनातला संताप कधीच गेला नाही. १९५८ मध्ये स्वित्झरलंडमध्ये जार्डीनचं निधन झालं तेव्हा ब्रॅडमनने श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन शब्द बोलण्यासही नकार दिला!
********************************************************************************
बॉडीलाईन मालिकेत बिल वूडफूलचं धैर्य आणि प्रामाणिकपणा उजळून निघाला होता. ऑस्ट्रेलियन प्रेक्षक, पत्रकार आणि समिक्षकांनी आणि खुद्द संघ सहकार्यांनी दडपण आणूनही जार्डीनच्या डावपेचांना प्रत्युत्तर म्हणून बॉडीलाईन बॉलिंगचा वापर करण्यास वूडफूलने ठाम नकार दिला होता. बॉडीलाईन बॉलिंगबद्दल उघडपणे त्याने एकदाही तक्रार केली नव्हती. अॅडलेड टेस्टच्या दरम्यान वूडफूल आणि पेल्हॅम वॉर्नर यांच्यातील शाब्दीक चमकीचा वॄत्तांत षटकर्णी झाल्यावरही त्याने जार्डीनच्या डावपेचांना प्रत्युत्तर देण्याचं टाळलं होतं.
वूडफूलच्या या निर्णयावर अनेकांनी टीका केली असली तरी बॉडीलाईन बॉलिंग ही क्रिकेटच्या खेळाला कलंक लावणारी घटना आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आपण यात सामील व्हायचं नाही या आपल्या मतावर वूडफूल ठाम होता! लारवूड आणि व्होसच्या बॉलिंगचा अनेकदा वेदनादायक 'प्रसाद' खाऊनही वूडफूल बधला नाही यातच त्याची खेळावर असलेली निष्ठा आणि खेळाबद्दल असलेली कळकळ दिसून येते!
१९६५ मध्ये वयाच्या ६८ व्या वर्षी वूडफूलचं निधन झालं तेव्हा अॅडलेडमध्ये लारवूडचा बॉल लागल्यामुळे झालेली अंतर्गत दुखापत त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरली होती असा त्याच्या पत्नीने आरोप केला होता!
बॉडीलाईन मालिकेच्या निमित्ताने एक कॅप्टन म्हणून डग्लस जार्डीनचंही मूल्यमापन करणं हे अपरिहार्य ठरतं. ब्रॅडममनच्या बॅटींगमध्ये असलेला एकमेव दोष हेरुन त्याच्यावर बिनतोड उपाय शोधण्याच श्रेय हे निर्विवादपणे जार्डीनचंच आहे. फास्ट लेग थिअरीचा परिणामकारक वापर लारवूड आणि व्होस यांनी केला असला तरी ही मूळ संकल्पना जार्डीनची होती हे नजरेआड करुन चालणार नाही.
कॅप्टन म्हणून जार्डीन कमालीचा चाणाक्षं होता आणि परिस्थितीनुसार डावपेचात बदल करण्यात तो माहिर होता हे बॉडीलाईन मालिकेत वेळोवेळी दिसून आलं होतं. विशेषतः लेग ट्रॅप व्यतिरिक्त त्याने फिल्डींगमध्ये केलेले बदल हे त्याच्या चाणाक्षपणाचे निदर्शक होते. बॉडीलाईन बॉलिंग करत नसूनही गबी अॅलनला मिळालेल्या २१ विकेट्सपैकी काही विकेट्सचं श्रेय खुद्द अॅलनने जार्डीनला दिलेलं आहे! अॅलन म्हणतो,
He could read a match situation so perfectly and smartly that even before you go to him and ask for a field change, he use to do that in advance!
जार्डीनची आणि बॉडीलाईनची तक्रार करणारी अनेक पत्रं ऑस्ट्रेलियातून लिहीणार्या गबी अॅलनने हे म्हणणं हे जार्डीनच्या नेतृत्वगुणांचं निदर्शकच नाही काय?
एम सी सी चा दौर्यावर असलेला मॅनेजर पेल्हॅम वॉर्नर याचाही बॉडीलाईनला विरोध असला तरी जार्डीनच्या नेतृत्वाबद्दल त्यालाही आदर होता. वॉर्नर म्हणतो,
"His expectation as a captain was extremely high. He would expect each and every player to give a world class performance in each game! He would ascertain a player before picking him in team and once he picks you in team, he would fight for you with MCC officials and even the Viceroy!"
त्याच्याही पुढे जाऊन वॉर्नर म्हणतो,
"If ever there was a cricket match between England and the rest of the world and the fate of England depended upon its result, I would pick Jardine as my England captain every time."
बॉडीलाईन मालिकेमुळे जार्डीन आणि लारवूड यांना क्रिकेट इतिहासात खलनायक म्हणूनच प्रसिद्धी मिळवून दिली असली तरीही एका गोष्टीकडे मात्रं बर्याचदा दुर्लक्षं केलं जातं ते म्हणजे क्रिकेटच्या तत्कालिन जार्डीनने वापरलेले डावपेच हे क्रिकेटच्या तत्कालीन नियमांत पूर्णपणे बसणारे होते आणि या डावपेचाला अनुरुपच लारवूडने बॉलिंग केलेली होती. अॅशेस परत मिळवण्यासाठी ब्रॅडमनला निष्प्रभ करणं आवश्यक आहे या भूमिकेतूनच बॉडीलाईनची कल्पना पुढे आलेली होती.
लारवूडची कारकिर्द अकाली संपण्यास एम सी सी च्या ढुढ्ढाचार्यांची आडमुठी भूमिकाच कारणीभूत होती. लारवूडला सोईस्करपणे बळीचा बकरा बनवण्यात आला!
इंग्लिश संघाच्या कॅप्टनने प्रतिस्पर्धी संघाशी मैदानाबाहेर सौजन्यपूर्ण आणि मैत्रीपूर्ण थोडक्यात डिप्लोमॅटीक संबंध ठेवावेत अशी एम सी सी च्या पदाधिकार्यांची अपेक्षा होती. ऑस्ट्रेलियन खेळाडू आणि प्रेक्षकांविषयी तिरस्काराची भावना मनात असलेल्या जार्डीनकडून ही अपेक्षा धरणं म्हणजे निव्वळ वेडेपणा होता. या दृष्टीने विचार करता जार्डीनची कॅप्टन म्हणून निवड ही साफ चुकीची मानावी लागेल! जार्डीनच्या मते प्रतिस्पर्ध्याशी सौजन्यपूर्ण संबंधापेक्षा अॅशेस मालिका जिंकणं महत्वाचं होतं. ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी त्यांचा तिरस्कार करावा लागला तरी बेहत्तर अशी त्याची भूमिका होती!
कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्याची जार्डीनची ही भूमिकाच पुढे ऑस्ट्रेलियन संघाने उचलली! त्यासाठी प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंचं खच्चीकरण करण्यासाठी स्लेजिंगची खास कलाही इयन चॅपलचा नेतृत्वाखाली खेळणार्या ऑस्ट्रेलियन संघाने आत्मसात करुन बेधडकपणे वापरली! अर्थात इयन, ग्रेग आणि ट्रेव्हर या चॅपल बंधूना स्लेजिंगचं बाळकडू वारसा हक्कानेच मिळालं होतं! बॉडीलाईन मालिकेत खेळलेला आणि Which of you bastards called Larwood a bastard instead of this bastard? असं जार्डीनच्या तोंडावर आपल्या सहकार्यांना विचारणारा व्हिक्टर रिचर्डसन हा चॅपल बंधूंचा आजोबा होता!
१९८४ मध्ये जॉर्ज मिलर आणि टेरी हेस यांनी ऑस्ट्रेलियन टी व्ही साठी बॉडीलाईन या पाच भागांच्या मिनीसिरीजची निर्मिती केली होती. १९३२-३३ च्या बॉडीलाईन मालिकेतील घटनांचं त्यात चित्रीकरण करण्यात आलं होतं. ह्युगो व्हिवींग (जार्डीन), गॅरी स्वीट (ब्रॅडमन), जिम हॉल्ट (लारवूड), जॉन डॉयल (वूडफूल), र्हेस मॅक्कॉन्ची (वॉर्नर) यांच्या त्यात भूमिका होत्या. ही मालिका मुख्यतः बॉडीलाईन वर आधारीत असली तरी त्यात दर्शवण्यात आलेल्या सिडनीच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी युनियन जॅक जाळण्याच्या घटनांसारख्या अनेक घटना काल्पनिक होत्या. बॉडीलाईन मालिकेत खेळलेल्या आणि त्यावेळेस हयात असलेल्या अनेक खेळाडूंनी मालिकेतील अतिरंजीत आणि काल्पनिक घटनांवर टीकेची झोड उठवली होती. ऑस्ट्रेलियात सेटल झालेल्या लारवूडला मालिकेनंतर अनेक धमकीचे फोन आणि पत्रं आली होती!
समाप्त
संदर्भ -
In Quest of the Ashes - Douglas Jardine
The Larwood Story - Harold Larwood, Kevin Perkins
Wisden Cricket Almanacks - 1930
The M. C. C. team in Australia and New Zealand, 1932-33 - Wisden
Cricket Crisis: Bodyline and Other Lines - Jack Fingleton
The Bodyline Hypocrisy: Conversations with Harold Larwood - Michael Arnold
The Bodyline Controversy - Laurence Le Quesne
The Bradman Years - Jack Pollard
On Top Down Under - Ray Robinson
Bodyline Autopsey - David Frith
इंटरनेटवरील आणि क्रिकेटविषयक मासिकांतील अनेक लेख
www.espncricinfo.com
प्रतिक्रिया
9 Jul 2015 - 2:54 pm | कैलासवासी सोन्याबापु
बॉडीलाईन मालिकेमुळे जार्डीन आणि लारवूड यांना क्रिकेट इतिहासात खलनायक म्हणूनच प्रसिद्धी मिळवून दिली असली तरीही एका गोष्टीकडे मात्रं बर्याचदा दुर्लक्षं केलं जातं ते म्हणजे क्रिकेटच्या तत्कालिन जार्डीनने वापरलेले डावपेच हे क्रिकेटच्या तत्कालीन नियमांत पूर्णपणे बसणारे होते
नियमात बसेल ती हरामखोरी करोन वर सज्जन पणाचा आव आणणे ही खदिम हरामखोरी पुर्या पृथ्वीवर अंग्रेज भाड्ये सोडुन कोण करणार!!!
9 Jul 2015 - 5:18 pm | स्वाती दिनेश
बॉडीलाइन सिरिज आवडली, छान लिहिले आहे..
(अवांतर- ह्या घटनेवर एक टीव्ही मालिकाही झाली होती ना खूप पूर्वी?)
स्वाती
10 Jul 2015 - 2:12 am | स्पार्टाकस
स्वाती,
अगदी शेवटी मी ज्या बॉडीलाईन मिनीसिरीजचा उल्लेख केला आहे तीच ही टीव्ही मालिका.
9 Jul 2015 - 5:30 pm | बोका-ए-आझम
मस्तच मालिका. कायदा हा गाढव असतो हे सिद्ध होतंच या उदाहरणांवरुन.
9 Jul 2015 - 5:44 pm | सौंदाळा
सुंदर मालिका
इंग्लंड - ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी: पहिला डाव : इंग्लंड ४३०. ऑस्ट्रेलिया २६/०
10 Jul 2015 - 2:41 am | श्रीरंग_जोशी
शेवटचा भाग म्हणजे या अप्रतिम लेखमालिकेवरचा कळस आहे.
भारतीय क्रिकेटवरही लिहावे ही विनंती.
10 Jul 2015 - 3:20 am | वॉल्टर व्हाईट
भारतीय क्रिकेटवरही लिहावे ही विनंती. पुर्ण लेखमाला आणी तुमचे लिखाणही आवडले.
12 Jul 2015 - 1:16 pm | संचित
मालिकेत असे दाखवण्यात आले होते कि लार्वूड जखमी झालेला असताना जार्डीन त्याला ओवर पूर्ण करण्यास निव्वळ बॉल जागेवरूनच फेकण्यास सांगतो. हे खरे आहे का?
14 Jul 2015 - 3:08 am | स्पार्टाकस
नाही. लारवूड जखमी झालेला असताना जार्डीनने त्याला फिल्डींग करायला लावली होती. मालिकेत दाखवल्याप्रमाणे त्याला बॉलिंग टाकायला लावणं हे एक्झॅगरेशन होत>
14 Jul 2015 - 11:57 am | संचित
वाटलच.
13 Jul 2015 - 1:40 pm | मंदार दिलीप जोशी
मस्त लेखमालिका!
वर उल्लेखलेली बरीच पुस्तके लय म्हणजे लय म्हाग आहेत राव
13 Jul 2015 - 2:39 pm | पैसा
टीव्ही सीरियल पाहिली आहे. काही प्रमाणात वाचलेही आहे. मालिका खूपच छान झाली. आताच्या क्रिकेटची सर्कस पाहण्यापेक्षा असे काही वाचणे चांगले वाटते.