राधा …....१

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जनातलं, मनातलं
13 Apr 2015 - 7:46 pm

आता फक्त आजचीच रात्र. तिनं स्वत:लाच समजावलं. पण मन तर बाभरं झालेलं. ऐकतय थोडंच. ते द्वारकेत पोचलं सुद्धा. काय करत असेल तो या वेळी ? इतक्या वर्षांनी आपण भेटणार म्हणून डोळ्यातून आनंद उतू जात असेल का? त्याचे भावुक डोळे मनातलं सगळं बोलून जात. म्हणून गोकुळात असताना तिची कधी काही खोडी करायची असेल तर तो तिच्या मागे उभा राहत असे, डोळे लपवून. कारण त्याचे डोळे तिच्यापासून काही लपवू शकत नसत. याउलट अनयचे डोळे, तिला त्याआडचं मन कधी समजतंच नसे.
अनयच्या आठवणीने तिच्या काळजात कळ आली. बिचारा! अनय म्हटलं की "बिचारा" हा शब्द तिच्या तोंडी आपसूक येत असे. प्रवासाला निघण्याआधी दोन दिवस तो तिच्याकडे बघत हसून म्हणाला होता, "किती सुंदर दिसतेस! अगदी पूर्वीसारखी " ती चपापलीच! इतक्या वर्षानंतर देखील कृष्णभेटीचा नुसता विचार आपल्यामध्ये इतका बदल घडवू शकतो?
तिच्या बहिणीचं, अमौलीकाचं लग्न होतं. घरचं शेवटचे लग्न . वृंदावनचा मुखिया ,वृषभानूच्या धाकट्या मुलीला रैवतातील मुलगा सांगून आला होता. त्यामुळे अनपेक्षितपणं राधेला तिथे जायची संधी चालून आली. रैवताहून द्वारका तशी जवळच ! जायचं का तिथे? राधेच्या मनात हळूहळू कृष्णभेट रुजू लागली. "अमौलीकाबरोबर काही दिवस राहीन म्हणते " राधा अनयाला म्हणाली. तो काहीच बोलला नाही. कृष्णाकडं जायचं तर मुलांना इथं सोडून जावं लागणार. तेसुद्धा काही महिने. आईशिवाय राहतील का ती ?राधेला फार अपराधी वाटत होतं. तिला माहित होतं, मुलांना सोडून द्वारकेला गेल्याबद्दल ती स्वत:ला कधीच माफ करू शकणार नव्हती. पण कृष्णाला भेटलं की ही खंत सुद्धा थोडी सुसह्य होईल याचा तिला विश्वास होता .
राधेला कृष्णाची तशी नेहमीच आठवण येई. पण एक दिवस पाण्यात स्वत:चं प्रतिबिंब पाहताना तिला जाणवलं, "अरे, आपलं तारुण्य आता ओसरू लागलंय." ते पूर्ण संपण्याआधी तिला एकदाच आणि कदाचित शेवटचंच कृष्णाला भेटायचं होतं. ज्या पूर्ण पुरुषावर तिनं मनोमन प्रीती केली त्याला एकदा संपूर्ण समर्पित व्हायचं होतं. कुणी बघेल, कुणी काही म्हणेल याची तमा न बाळगता एकरूपतेचा अत्युच्च कळस गाठायचा होता .
राधा आता तीन मुलांची आई होती. म्हटलं तर अनयाबरोबर संसारात रमून गेली होती. निदान अनयला तरी तसं वाटे. राधेचे अनयावर प्रेम होतेच पण… पण स्वत:च्याही नकळत राधा अनयामध्ये कृष्ण पाहत असे . तिला वाटे , रात्री अपरात्री अनयच्या मिठीत असताना चुकून कृष्णाचं नाव तोंडून निघालं तर ? अनय मोडून जाईल . कृष्णाजवळ रुक्मिणी आहे , सत्यभामा आहे, अनयजवळ मात्र मी सोडून दुसरं कोणी नाही .म्हणून राधा अनयला खूप जपत असे .…. तिला नेहमी प्रश्न पडे, "नक्की कोणाचं जास्त प्रेम आहे आपल्यावर? आपलं अन कृष्णाच नातं समजूनही आपल्याला स्विकारणाऱ्या अनयाचं की इतक्या दूर राहूनही मनानं कायम आपल्याजवळ असणाऱ्या,आपल्याला सतत साद देणाऱ्या कृष्णाचं ?
कृष्ण खरंच मनानं तिच्याजवळ होता. त्या दोघांचा संवाद तर अखंड चालू असे. सकाळी तिला आणि फक्त तिलाच दुरून वेळू वनातून कृष्णाच्या बासरीचे सूर ऐकू येत आणि तिची सकाळ सोनेरी होऊन जाई. यमुना तिरी नहाताना त्या शामजलाचा उबदार स्पर्श कृष्णाची आठवण करून देई. गोधन दोधताना, पाणी भरताना ती सतत कृष्णाशी गुजगोष्टी करीत असे. "ही शेवटची घागर रे , दमले मी कृष्णा !" " वा ग ! अशी कशी दमशील ? माझ्या लाडक्या तुळशी साठी अजून एक घागर नाही का भरणार? तुळशीला विसरलीस म्हणजे मलाही विसरलीस बघ तू " कान्हा लटक्या रागाने बोले. " हो हो, तू आहेस ना आठवण करून द्यायला, तुला नेहमी तुळशीची काळजी , माझी पाठ मोडून गेली त्याची नाही " राधा फुरंगटून बसे . त्या दोघांचे असे रुसवेफुगवे नित्याचे होते . राधेचा अबोला कृष्णाला दुरूनही जाणवत असे . मग तो काही न काही प्रयत्ने तिला हसवत असे. राधा त्याला नेहमी विचारी, "इतकी माझी काळजी करतोस, नक्की कोण लागते रे मी तुझी?" कृष्ण याचं उत्तर नेहमी टाळत असे .
लांबवर द्वारकेचा कोट दिसत होता. अजून दोनेक कोस चाललं की आलीच द्वारका. खरं तर ती आजच पोचली असती पण तिला असं दमून भागून कृष्णासमोर जायचं नव्हतं. सजून सवरून ती कृष्णाला भेटणार होती. राधा गोमतीच्या पात्रात शिरली. पाण्याच्या त्या थंड स्पर्शाने तिच्या पायातल्या भेगा ठणकून दुखू लागल्या. तिला यमुना आठवली. यमुनेचा स्पर्श फार प्रेमळ! हळुवार फुंकर घालणारा. वेदना विसरायला लावणारा! "कृष्णा , असली कसली रे तुझ्या द्वारकेची नदी ?"
" हं "
"काय हे कृष्णा मी इतकी दुरून आलेय, इतक्या वर्षांनी आपण भेटतोय अन फक्त हं ? सारे शब्द संपले होय तुझे?"
"उद्या महालात ये राधे ,तुला भेटून रुक्मिणी खूप आनंदित होईल बघ ."
"महालात? कृष्णा अरे मी तुला भेटायला आलेय. अजून कुणाला भेटायची ताकद नाही माझ्यात "
"अगं रुक्मीणीला भेटलीस ना की सारी ताकद परत येईल बघ, आल्या गेल्याचे इतकं सुंदर आदरातिथ्य करते ती, द्वारकेची राणी शोभते बघ ती "
आता हं म्हणायची पाळी राधेची होती .
"उद्या रथ पाठवतोय मी तुझ्यासाठी"
"नाही कृष्णा, मी तुला भेटायला आलीय, फक्त तुला. मी नाही येणार तिथे. द्वारकेच्या वेशीशी शिवमंदिर आहे म्हणे तिथे वाट बघेन मी तुझी कृष्णा "
"राधे महालात ये, आधी रुक्मीणीला भेट, मी तिथंच भेटीन तुला."
"नाही, निक्षून सांगते, भेटेन तर तुला. नाही तर तशीच परत जाईन बघ. राज्यकार्यात गढला असाशील तर तुझे न भेटणे समजून घेईन मी. मात्र रुक्मीणीला , सत्यभामेला भेटायला सांगू नकोस."
"का?"
"असंच "
"हं "
राधा गोमतीच्या पात्रात स्नान करू लागली. तिच्या डोळ्यात उद्याचं मीलन फुलून येत होतं. नुसत्या कल्पनेनं तिच्या अंगांगावर काटा येत होता. ग़ेल्या अनेक वर्षांचा विरह ती त्याच्या कुशीत मिटवून टाकणार होती. खूप रडणार होती. नियतीच्या नावडत्या निर्णयांना अश्रूंमध्ये भिजवून टाकणार होती.त्याच्या तोंडून तिचं नाव मन भरेस्तोवर ऐकणार होती.
आपल्या थकलेल्या शरीरावरून हात फिरवताना राधेला वाटलं, आता पूर्वीची उभारी राहिली नाही. कितीही लपवायचा प्रयत्न केला तरी वय कुठून न कुठून डोकावतंच! आपण आवडू का कृष्णाला? रुक्मिणीच्या सौंदर्याची देशविदेशात चर्चा होते, सत्यभामेला चीरतारुण्याचा वर मिळालाय. त्यांच्यापुढं मी तर तर जरठ म्हातारीच! कृष्णाला चालेल ना? मग तिला कुब्जा आठवली आणि वाटलं, "माझा कृष्ण समजून घेईल मला, तनापलीकडच्या माझ्या मनाला सुद्धा गोंजारेल तो! तिला खात्री होती की त्याला भेटून आपण अगदी नवी नवी होऊन जाऊ. तिनं द्वारकेच्या दिशेनं पाहिलं. चुकून कुठे रथ वगैरे काही दिसतोय का? लगेच तिनं आपल्या मनाला फटकारलं ," तू उद्याची वेळ दिलीस न? आत्ता कसा येईल तो? भेटेलच तो उद्या . थोडा धीर धर " .
उद्याचा विचार करता करता राधा त्या पांथस्थशाळेत झोपून गेली.

क्रमशः

कथाआस्वादअनुभव

प्रतिक्रिया

अजया's picture

13 Apr 2015 - 8:01 pm | अजया

वाचतेय.पुभाप्र.

एस's picture

13 Apr 2015 - 8:11 pm | एस

+१

बहुगुणी's picture

14 Apr 2015 - 12:51 am | बहुगुणी

'क्रमशः'ही अगदी योग्य ठिकाणी....

नेत्रेश's picture

14 Apr 2015 - 4:34 am | नेत्रेश

दिपीकाला माय चॉइस साठि का शिव्या पडतात कूणास ठाऊक.

hitesh's picture

14 Apr 2015 - 7:50 am | hitesh

.

चुकलामाकला's picture

14 Apr 2015 - 11:05 am | चुकलामाकला

:):)
नेत्रेश आणि हितेश धन्यवाद!

चुकलामाकला's picture

14 Apr 2015 - 11:03 am | चुकलामाकला

:):)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Apr 2015 - 10:51 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चुकलामाकला अनेक चुकल्या माकल्यांची ही कथा. :)

अतिशय सुंदर लिहिलंय. मला कल्पना अतिशय आवडली आणि लेखन शैलीमुळे चलचित्र डोळ्यासमोर सरकत आहे असं वाटलं. राधा आणि कृष्ण यांचं प्रेम हा अनेकांचा आवडीचा विषय आणि मला तर राधा आणि तिचं प्रेम खुप आवडतं.
तिच्या मनातली अधिरता खुप सुंदर रेखाटली आहे. आता पुढे कृष्ण तिचं कसं स्वागत करतो उत्सुकता आहेच.

लौकिकार्थाने अनेक राधा आणि अनेक कृष्णांची ही कथा, कोणाही प्रेम करणार्‍यांना आपली वाटावी अशीच. लिहित राहा. वाचतोय.

-दिलीप्ल बिरुटे

प्राची अश्विनी's picture

14 Apr 2015 - 6:44 pm | प्राची अश्विनी

+१११

चुकलामाकला's picture

14 Apr 2015 - 10:52 am | चुकलामाकला

हितेशभाऊ, तुमच्याकडुन या सहमतीची अपेक्षा होतीच!:):)

चुकलामाकला's picture

14 Apr 2015 - 11:02 am | चुकलामाकला

@ बिरुटे सर, अजया, स्वाप्स ,बहुगुणी,
धन्यवाद!

पीसी's picture

14 Apr 2015 - 1:54 pm | पीसी

सुन्दर लिहिलय...

अनय सोलापूरकर's picture

15 Apr 2015 - 11:48 am | अनय सोलापूरकर

चुकुन माकुन आम्च्या नावाचा अर्थ परत समजला

एक कुणीतरी's picture

17 Apr 2015 - 5:30 pm | एक कुणीतरी

मस्त आहे... सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा केलात..

चुकलामाकला's picture

18 Apr 2015 - 9:13 am | चुकलामाकला

धन्यवाद!

स्पंदना's picture

18 Apr 2015 - 5:27 pm | स्पंदना

हं!

भाग्यश्री कुलकर्णी's picture

19 Apr 2015 - 7:55 am | भाग्यश्री कुलकर्णी

छान रंगवलीये.