मेंदुतला माणुस- ग्रंथ परिचय

प्रकाश घाटपांडे's picture
प्रकाश घाटपांडे in जनातलं, मनातलं
17 Mar 2015 - 8:45 pm

हे पुस्तक माणसातल्या मेंदुवरच नाही तर मेंदुतल्या माणसावरच आहे. म्हणजे पुस्तकाच स्वरुप हे रोजच्या व्यवहारातल मेंदुविज्ञान अस आहे. रंजकता व सुलभीकरण हे वैज्ञानिक आशयाला बाधा आणणारे असते असा गैरसमज जो असतो तो या पुस्तकाने नक्की दूर होतो. पुस्तकाची शैली ही वाचकाभिमुख आहे. चांगले नातेसंबंध जपण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी विज्ञान हे एक साधन आहे अशी लेखकद्वयांची धारणा आहे. को॓हम्‍ हा प्रश्न अध्यात्मात जेव्हढा गहन आहे तेवढाच विज्ञानात. माझ्या जगण्याचे प्रयोजन काय? जाणीव म्हणजे काय? आकलन म्हणजे काय? याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपापल्या परीने वैज्ञानिक व तत्वज्ञ करीत आलेले आहेत. प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळतात की नाही हे माहित नाही पण पुस्तकातून दुसर्याततला माणुस पहाण्याची दृष्टी मात्र वाचकाला मिळते. पुस्तकातील माहिती ही गेल्या चार पाच वर्षातील मान्यताप्राप्त संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या प्रबंधांवर आधारित आहे. लेखक द्वयातील डॉ. आनंद जोशी हे एम.डी (मेडिसीन) असून गेली ४० वर्षे मुंबईत वैद्यकीय व्यवसाय करतात. तसेच सुबोध जावडेकर हे आय आय टीचे केमिकल इंजिनिअर असून सुप्रसिद्ध विज्ञान कथा लेखक म्हणून सर्वांना परिचित आहेत. पुस्तकाची रचना ही अशी ठेवली आहे की पुस्तक अनुक्रमे न वाचता कोठूनही सुरवात केली तरी आकलनात बाधा येत नाही. आवश्यक तिथे आकृती चित्र पुरेशी घेतली आहेत.
पुस्तकात झोपी गेलेला जाग असतो या प्रकरणात रेम झोप, स्वप्न व स्मृती या बाबत उहापोह केला आहे.बा.भ.बोरकर मेघदुताचा अनुवाद मराठीत करत होते तेव्हा नवव्या श्लोकाचा अनुवाद मनासारखा उतरेना म्हणून दोन दिवस अस्वस्थ झाले होते. तिसर्याी दिवशी एका मोठ्या फळ्यावर त्या श्लोकाचे सुभग भाषांतर सुवाच्च अक्षरात लिहून ठेवलेले त्यांना स्वप्नात दिसले. ते दिसेनासे होईल म्हणुन अंधारातच त्यांनी तो श्लोक कागदावर पटकन उतरुन काढला. प्रसिद्ध गणिती रामानुजन ला अनेक कूट गणितांची उत्तरे स्वप्नातच मिळाली. देवी ती उत्तरे सांगते अशी त्याची श्रद्धा होती. रसायन शास्त्रज्ञ कुकुले ला बेंझीन रिंगची कल्पना स्वप्नातूनच सुचली.
अनेक निर्णय प्रक्रियांमधे भावना व तर्कबुद्धी यांची रस्सीखेच होत असते.आर्थिक व्यवहार विश्वास व फसवणूक या दोन टोकांमधे झोके खात असतो. या भावना मेंदुतील दोन विशिष्ट केंद्रावर अवलंबून असतात. त्याविषयी स्वतंत्र प्रकरणात चर्चा केली आहे.
सिक्स्थ सेन्स हा शब्द अतिंद्रिय ज्ञान अशा अर्थाने आपण वापरतो पण निजदेहभान म्हणजे आपला देह आपल्या मालकीचा आहे या संवेदनेसाठी ही तो इथे वापरतात. आपण सहानुभूती हा शब्द कणव अर्थाने वापरतो पण ती प्रत्यक्षात सह-अनुभुती आहे.मानवी मेंदुला संगणकाची उपमा देतात परंतु मेंदुत साठवलेल्या स्मृती या वास,आवाज,रंगरुप,चव आणि स्पर्श यांचा पंचेद्रियांनी घेतलेला अनुभव असतो.
मेंदुतल्या यंत्रणेबद्दल जी माहिती समोर येते आहे त्या वरुन फ्री विल ही संकल्पना मोडीत जरी निघाली नसली तरी त्याच्या परिघाचा संकोच होतो आहे हे मात्र खरं! त्याचा परिणाम काय होईल हा विचार अस्वस्थ करणारा आहे. भारतीय वंशाचे पण अमेरिका स्थित आघाडीचे मेंदुशास्त्रज्ञ डॉ. विलयनूर रामचंद्रन म्हणतात आपल्या जाणीवेमध्ये मुक्त इच्छा जरी नसली तरी मुक्त अनिच्छा मात्र असते. पुस्तकात असंख्य वैज्ञानिक किस्से मनोरंजक पद्धतीने मांडले आहेत. पुस्तकातील प्रकरणांची नावेच पहा ना! उत्क्रांतीतील गांधीगिरी, स्वर आले स्मृतीतूनी, नवीन आज भावना, मनूची स्मृती, आभासी अंगातून वेदनेकडे, जाणीव नेणीवेचा खेळ, निवेदनाची उर्मी अशी आकर्षक व अर्थपूर्ण घेतली आहेत.
प्रास्ताविक व उपसंहार हा प्रकार पुस्तक वाचण्यापुर्वी व पुस्तक वाचल्यानंतर अशा दोन प्रकरणात घेतल आहे. पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या मेंदुतील काही पेशींच्या जुळण्या झाल्या तर काही जुळण्या तुटल्या असतील. सूक्षस्तरावर का होईना तुमच्या वर्तनात, विचारात बदल होईल. तो कदाचित तुम्हाला जाणवेल कदाचित नाही.
पुस्तक वाचल्यानंतर पुस्तकाच्या लेखनशैली व अंतरंगा बाबत लेखकद्वयांचे आपापसातील मतभिन्नतेमुळे काही प्रश्न निर्माण झाले तर नसतील ना? हा विचार मनात येवून गेला. पण त्याचे ही उत्तर ६ जून २०१४ च्या दिव्य मराठी तील पुस्तक लेखनातील पार्टनरशिप या सुबोध जावडेकरांच्या लेखात मिळाले. त्या लेखाची लिंक http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-subodh-jawdekar-article-abou...
मेंदुतला माणुस
लेखक- डॉ. आनंद जोशी व सुबोध जावडेकर
राजहंस प्रकाशन
पृष्ठे २३३ मूल्य २२५/-

विज्ञानसमीक्षामाहिती

प्रतिक्रिया

अर्धवटराव's picture

17 Mar 2015 - 9:17 pm | अर्धवटराव

पुस्तक वाचलं पाहिजे.
धन्यवाद.

अत्रुप्त आत्मा's picture

17 Mar 2015 - 9:29 pm | अत्रुप्त आत्मा

नक्कीच घेणार पुस्तक.

या निमित्ताने आज डॉ.प्रदीप पाटील..यांच्या, डोकं कसं चालतं?,या पुस्तकाची आठवण झाली.

शशिकांत ओक's picture

18 Mar 2015 - 12:22 am | शशिकांत ओक

भारतीय वंशाचे पण अमेरिका स्थित आघाडीचे मेंदुशास्त्रज्ञ डॉ. विलयनूर रामचंद्रन म्हणतात आपल्या जाणीवेमध्ये मुक्त इच्छा जरी नसली तरी मुक्त अनिच्छा मात्र असते.

वरील वाक्याला स्पष्टीकरणाची गरज वाटते.

मेंदुतल्या यंत्रणेबद्दल जी माहिती समोर येते आहे त्या वरुन फ्री विल ही संकल्पना मोडीत जरी निघाली नसली तरी त्याच्या परिघाचा संकोच होतो आहे हे मात्र खरं! त्याचा परिणाम काय होईल हा विचार अस्वस्थ करणारा आहे.

हा विचार बुद्धिवाद्यांना अस्वस्थ करणारा आहे असे पकाकांना सुचवायचे आहे काय? मानवाचे फ्री विल हे सत्यार्थाने खरे नसून ते ही महत विश्वाच्या इच्छेचाच एक भाग असते असे अनेक विचारकांना वाटते असे प्रा गळतगे यांनी खूप आधीच त्यांच्या पुस्तकात म्हटल्याचे आठवते.

रामपुरी's picture

18 Mar 2015 - 12:50 am | रामपुरी

कोण गळतगे?

शशिकांत ओक's picture

18 Mar 2015 - 1:00 am | शशिकांत ओक

रामाची सीता कोण हे पुरी रामायण कथा ऐकून न समजल्याचे म्हणणे...
विज्ञान आणि चमत्कार पुस्तकावरून झडलेल्या व डोळ्यातून खडे येणाऱ्या भानामतीच्या केसेसमधे अंनिसची पोल खोलणारे प्रा. अद्वयानंदांचा आपणास विसर पडलेला दिसतो.

प्रकाश घाटपांडे's picture

19 Mar 2015 - 2:10 pm | प्रकाश घाटपांडे

हा विचार बुद्धिवाद्यांना अस्वस्थ करणारा आहे असे पकाकांना सुचवायचे आहे काय

होय. लेखकाला तसे सुचवायचे आहे व मला ही
विलयनूर रामचंद्रन हे भारतीय नाव असल्याने बर वाटल होत. त्यांचे स्पष्टीकरण देण्या पेक्षा पुस्तकात वाचलेल बरं! त्यांनी एक मिरर थेरपी शोधून काढली आहे. आभासी अंगातून शरीराच्या प्रतिमेकडे या प्रकरणात त्याचा उल्लेख आहे.

पका काकांनी सुचवलेल्या लिंक वाचल्यावर सुबोध जावडेकरजींना संत वाङ्मयातील अनेक उद्धरणे लेखांच्या सुरवातीला चपखल बसतील असे वाटूनही ती प्रकर्षाने गाळली असे म्हटले आहे.
खऱ्या विज्ञानवाद्याला हे नको व ते हवे असे वाटणे म्हणजे त्याच्या वैचारिकतेतील फ्री विल किंवा मुक्त अनिच्छे?ला ते मारक ठरवल्याचा शिक्का बसतो, असे वाटायची शक्यता आहे.

प्रकाश घाटपांडे's picture

19 Mar 2015 - 2:16 pm | प्रकाश घाटपांडे

खर आहे. जर संत साहित्यातील उदाहरणे चपखल बसतील से वाटले तर द्यायला काही हरकत नव्हती. संतसाहित्य नसते तर अंनिसला काम करण फार अवघड झाल असते.

विकास's picture

18 Mar 2015 - 1:07 am | विकास

पुस्तक परीचयाबद्दल धन्यवाद! पुढच्या भेटीत नक्कीच विकत घेऊन वाचेन! :)

शशिकांत ओक's picture

19 Mar 2015 - 7:14 pm | शशिकांत ओक

आपणास असे सुचवायचे आहे काय की संत साहित्य आहे म्हणून अंनिसला समाजाच्या अंधश्रद्धा दूर करायला फार सोपे झालेले आहे?
सत्यता तर विपरीत वाटते. संत साहित्यलेखन हे अस्तिकवादी आहे. अंनिसचा पाया नास्तिकतेचा आहे. कर्म, ज्ञान व भक्ती मार्ग कथन करताना आत्मा, परमात्मा, पुनर्जन्म, आदि संकल्पनांवरच संत साहित्याच्या वैचारिकतेचा पाया आहे. त्यात काही कारणांनी जर असामाजिक तत्वांनी कुठे कुठे मुख्य ब्रह्मविद्या शास्त्राला बाधा येत असेल तर तेथे त्यांच्या खोटे पणावर टीका-टिप्पणी केलेली आढळते. पण म्हणून संत हेच अंनिसचे कार्य ठोकभावात करत होते म्हणणे हा वस्तुस्थितीचा विपर्यास वाटतो. जर नवसाने पोरे होत असती तर मग लग्नाची काय गरज वगैरे अंनिसची कड घेणाऱ्या तुरळक वक्तव्यांच्या फांदीला लटकून पहा संत ही आम्ही म्हणतो तेच म्हणाले... असा प्रचार करणे सवंगता दर्शवते.

प्रकाश घाटपांडे's picture

21 Mar 2015 - 10:08 am | प्रकाश घाटपांडे

आपणास असे सुचवायचे आहे काय की संत साहित्य आहे म्हणून अंनिसला समाजाच्या अंधश्रद्धा दूर करायला फार सोपे झालेले आहे?

होय.

सत्यता तर विपरीत वाटते. संत साहित्यलेखन हे अस्तिकवादी आहे

मला सत्यता विपरीत वाटत नाही. संत अस्तिक असूनही अंधश्रद्धेवर कोरड ओढतात असे त्यांच्या साहित्यात आढळते व ते अंनिसला सोयीचे आहे.म्हणजे अंधश्रद्धा या धार्मिकतेपासून वेगळ्या आहेत असे सांगता येते.

अंनिसचा पाया नास्तिकतेचा आहे

तसा समज होतो हे मात्र खर आहे. कारण अंनिसतले बहुसंख्य हे नास्तिकतेच्या विचाराकडे झुकलेले आहे. देवाधर्माला आमचा विरोध नाही व अंनिसचे काम करण्यासाठी नास्तिक असणे जरुरी नाही. अशी अधिकृत पणे सांगितले जाते.
आणि हो! नास्तिक व अस्तिक असे वॉटर टाईट कंपार्टमेंट नसते असे मी मानतो. तो एक बँड आहे.

शशिकांत ओक's picture

21 Mar 2015 - 1:21 pm | शशिकांत ओक

अधिकृत पणे दाभोळकर यांची संघटना नास्तिकांची होती. नंतर त्यांनी अंनिस नामक झूल पांघरली. शाम मानवांच्या संघटनेत मधे फूट पाडायचे कारण ही नास्तिकता हेच होते असे मानव भाषणातून सांगतात असे ऐकतो. असो

अंनिसतले बहुसंख्य हे नास्तिकतेच्या विचाराकडे झुकलेले आहे.

मग

अंनिसचे काम करण्यासाठी नास्तिक असणे जरुरी नाही. अशी अधिकृत पणे सांगितले जाते.

असे 'अधिकृत' पणे नास्तिक बहुसंख्यांना म्हणावे लागते यातच त्यांच्या सचोटी व खरेपणाची महती समजून येते.... असो...

सतिश गावडे's picture

22 Mar 2015 - 11:48 am | सतिश गावडे

शाम मानवांच्या संघटनेत मधे फूट पाडायचे कारण ही नास्तिकता हेच होते असे मानव भाषणातून सांगतात असे ऐकतो. असो

ओककाका, गैरसमज आहे हा तुमचा. तुम्ही काय ऐकले यावर विसंबून राहत जाऊ नका. फर्स्ट हँड माहिती घेत चला. शाम मानवांचे लेखन वाचलेत तरीही चालेल.

शशिकांत ओक's picture

22 Mar 2015 - 12:14 pm | शशिकांत ओक

मानवांचे नक्की काय स्पष्टीकरण आहे ते सांगितले तर ज्ञानात भर पडेल...

सतिश गावडे's picture

22 Mar 2015 - 12:40 pm | सतिश गावडे

सांगोवांगी नको..

तेच तर म्हणतोय. मानवांची मते तुम्ही स्वतःच वाचा. :)

किती स्टार देताल या पुस्तकाला? समजा पाचपैकी/दहापैकी?

प्रकाश घाटपांडे's picture

21 Mar 2015 - 10:09 am | प्रकाश घाटपांडे

सापेक्ष आहे. मी तरी पाच पैकी चार देईन.

नगरीनिरंजन's picture

20 Mar 2015 - 9:18 pm | नगरीनिरंजन

ओळख आवडली. पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी झाला आहात.

तिमा's picture

21 Mar 2015 - 5:16 pm | तिमा

हे पुस्तक वाचल्यापासून माझा, सभोवतीच्या माणसांच्या वागण्याकडे पहाण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलला आहे. आता समोरच्या माणसांच्या आततायी वागण्याचा पटकन राग येत नाही. हा असा का वागला असेल, असे विचारचक्र मनांत सुरु होते.

सतिश गावडे's picture

22 Mar 2015 - 11:50 am | सतिश गावडे

हे पुस्तक मी दोनेक वर्षांपूर्वी वाचले आहे.

आधुनिक मेंदुविज्ञानात काय शोध लागले आहे किंवा काय शोध चालू आहेत तसेच "मन म्हणजे काय?" यावर खुप साध्या सोप्या भाषेत लिहिले आहे.