शांततेनंतरचं वादळ - Thunder down under

Primary tabs

जे.पी.मॉर्गन's picture
जे.पी.मॉर्गन in जनातलं, मनातलं
4 Dec 2014 - 11:56 am

"We must dig in and get through to tea. And we must play on." भावुक झालेला ऑझी कर्णधार मायकेल क्लार्क आपल्या धाकट्या भावासारख्या सहकार्‍याला श्रद्धांजली वाहत होता. तेव्हा फक्त मॅक्सविलच्या शाळेत उपस्थित ऑझी पंतप्रधान, आजी-माजी क्रिकेटपटू, ह्यूज कुटुंबीय आणि चाहत्यांचेच नाही तर क्रिकेट आवडणार्‍या / नावडणार्‍या जगभरातल्या कुठल्याही सहृदय माणसाचे डोळे पाणावले असतील.

२५ नोव्हेंबरपासून सगळं क्रिकेटविश्व हादरलंच होतं. कारणही तसच आक्रीत. आत्तापर्यंत असे शेकडो बाऊन्सर्स टोलवलेला आणि झेललेला फिल ह्यूज सिडनीच्या मैदानावरच एका विचित्र अपघाताने कोसळला. २ दिवस सगळ्याच क्रिकेटप्रेमींनी आपापले देव पाण्यात घातले. फिलच्या मृत्यूची बातमी आली आणि सार्‍या क्रीडाजगतावर अपार दु:खाची छाया पसरली. घटनाच तशी चटका लावणारी होती.

Put Out Your Bats

सिडनीच्या पॉल टेलर ह्या आयटी कर्मचार्‍यानं आपली बॅट आणि टोपी फिलच्या सन्मानार्थ घराबाहेर ठेवली, तिचं एक छायाचित्र ट्वीट केलं आणि #putoutyourbats नं अवघ्या काही तासांत सगळ्या क्रिकेटविश्वाला अविश्वसनीयपणे एकत्र आणलं. बार्बाडोस ते ब्रिस्बेनपर्यंत क्रिकेट खेळलेला / न खेळलेला प्रत्येक जण आपल्या लाडक्या खेळासाठी आणि त्या खेळाच्या एका उमद्या पाइकासाठी पुढे आला. त्या दिवशी - एका दुर्दैवी आघाताचा सामना करताना आपलं क्रिकेट जिंकलं!

फिल ह्यूज कायम स्मरणात राहीलंच पण त्याच्या कर्णधाराचे त्याला शेवटचा निरोप देतानाचे शब्दच खेळाचा दुर्दम्य आशावाद आणि प्रचंड धक्क्यातून देखील पुन्हा सावरण्याची जिद्द दाखवतात. Phillip’s spirit, which is now part of our game forever, will act as a custodian of the sport we all love. We must listen to it. We must cherish it. We must learn from it. We must dig in and get through to tea. And we must play on.

थोडा वेळ लागेल - पण क्रिकेट ह्यातून सावरेल. त्याचा थोडा परिणाम होऊ घातलेल्या ऑस्ट्रेलिया भारत मालिकेवर देखील होईल. पण जर तुम्ही म्हणत असाल की ऑस्ट्रेलिया दौर्‍यात नेहेमी बघायला मिळणारी आक्रमकता ह्या वेळी दिसणार नाही तर ladies and gentlemen you are thankfully mistaken! वाघानी नखं काढून ठेवली तरी तो शिकार करणं सोडत नाही. तुम्ही एखाद्या ऑझी बोलरला एकवेळ आया बहिणींवरून शिव्या दिल्यात तरी तो कदाचित "not giving this a flying F**k mate" म्हणत तुमच्याकडे दुर्लक्षही करेल. अशी शिविगाळ तो डायपर भिजवत असल्यापासून ऐकत असतो. पण त्याला पुलचे दोन चौकार मारा आणि नाही त्याने नागासारखा फणा काढला तर सांगा. बस्स.... धवन किंवा विजयचे दोन चौकार बसायचा अवकाश... खात्री आहे की मिचेल जॉन्सन निम्म्या पिचपुढे येईल आणि म्हणेल "डू दॅट अगायन अँड आयल नॉक योर हेड ऑफ माएट"!

चार श्वास रोखून धरायला लावू शकणारे कसोटी सामने देण्याची जबाबदारी भारतीय संघावरच आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ कागदावर कितीही अननुभवी वाटो त्यांच्या मैदानांवर त्यांना हरवंणं म्हणजे सिंहाच्या गुहेत घुसून त्याची शिकार करण्यासारखं आहे. ह्यापूर्वीसुद्धा तगड्यातले तगडे भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये सपशेल शरणागती पत्करून आलेले आहेत. गेल्या काही वर्षांत इंग्लंड आणि आफ्रिकेनी जरी ऑझी बुरूज भेदलेले असले तरी भारतीय संघाला ती करामत साधण्यासाठी निकराचा लढा द्यावा लागेल. वॉट्सन, क्लार्क, स्टीव्ह स्मिथ मोठ्या खेळ्या करू शकतात आणि जॉन्सन, हॅरिस, सिडल आपल्या फलंदाजांना सुखाने जगू देणार नाहीत. प्रत्येक सामन्याचं प्रत्येक सेशन जिंकण्याच्याच इराद्यानी खेळलं तरच त्यांच्यापुढे टिकाव लागणार आहे. आजतागयत ऑस्ट्रेलियात ४० पैकी ५ सामने जिंकणार्‍या संघाला मालिका जिंकायला आपलं सर्वोत्तम क्रिकेट खेळायला लागेल.

Ind V Aus

अजून काहीच दिवसांत क्रिकेट विश्व डोळ्यांच्या कडा पुसेल... आकाशाकडे बघून एक मोठ्ठा श्वास गेईल..... आपल्या बुटांनी मार्क करेल आणि पंचांच्या इशार्‍याची वाट बघेल - Gentlemen - let's play. आणि पुन्हा एकदा दिसेल तोच रोमांच..... तोच थरार.... तीच उत्कंठा..... तीच जिद्द...... तीच चिकाटी जी क्रिकेटला क्रिकेट बनवते! तेव्हा देवियों और सज्जनों..... तयार रहा..... आपली निराशा, आपली दु:ख विसरून तयार रहा..... कोहली आणि जॉन्सन, पुजारा आणि सिडलची द्वंद्व पाहण्यासाठी...तयार रहा बॅगी ग्रीनचा माज बघण्यासाठी..... तयार रहा क्लार्क अन धोनीमधला बुद्धिबळाचा डाव बघण्यासाठी.... "जीतेगा भई जीतेगा" आणि "गो ऑझी" चे नारे ऐकण्यासाठी... हातापायाची बोटं मोडणार्‍या बाउन्सर्स आणि यॉर्कर्ससाठी.......स्लिप्समधे घेतल्या जाणार्‍या अप्रतीम झेलांसाठी...... स्टम्प माइकमधून ऐकू येणार्‍या स्लेजिंगसाठी.....तयार रहा भर थंडीत घाम फोडणार्‍या आक्रमक क्रिकेटसाठी.

कारण क्लार्क ह्यूजला निरोप देताना रडत रडत देखील काय म्हणाला आठवतंय ना? I’ll see you out in the middle.

क्रीडाविचारलेख

प्रतिक्रिया

अनुप कोहळे's picture

4 Dec 2014 - 12:40 pm | अनुप कोहळे

हि मालिका उत्कंठावर्धक होणार ह्यात काडीचीही शंका नाही. मोर्गन साहेब, तुमचे दिवसागणिक विश्लेषण वाच्ण्यास उत्सूक आहे.

बहुगुणी's picture

4 Dec 2014 - 6:06 pm | बहुगुणी

मॉर्गन: तुमचे दिवसागणिक विश्लेषण वाच्ण्यास उत्सूक आहे. +१.

खास मॉर्गनी-शैलीत असं विश्लेषण आलं तर बहार येईल!

प्रभो's picture

5 Dec 2014 - 9:56 am | प्रभो

प्रतिक्षेत!

सौंदाळा's picture

4 Dec 2014 - 1:47 pm | सौंदाळा

मालिका रंगतदार होईल अशी अपेक्षा
२०१५ ची विश्ववषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात होत असल्याने या मालिकेचा पुरेपुर फायदा भारतीय संघाला होईल.

बोका-ए-आझम's picture

4 Dec 2014 - 1:59 pm | बोका-ए-आझम

भारत वि. आॅस्ट्रेलिया सामने गेल्या विश्वचषकापासून चुरशीचे होऊ लागले आहेत. त्यांच्यात आता एकतर्फी असं काही राहिलेलं नाही. भारतीय संघ प्रथमच तेंडुलकरशिवाय आॅस्ट्रेलियात खेळतोय आणि आॅस्ट्रेलियन संघही एवढा अनुभवी नाही. तरीपण दोन्हीही संघ आता तरूण रक्ताने सळसळणारे असल्यामुळे घमासान होणार हे नक्कीच!

सिरुसेरि's picture

4 Dec 2014 - 2:22 pm | सिरुसेरि

इंग्लंड दौर्‍याची पुनरावुर्ती होउ नये ही अपेक्षा .

त्यामुळे, पंचांची भुमिका महत्वाची.

शिवाय मुरलीला जशी अर्जूनाची साथ मिळाली, तशी साथ आपला धोनी देईल का?

स्पंदना's picture

5 Dec 2014 - 3:06 am | स्पंदना

सुरेख लिहिलयं.
त्याला पिचवर कोसळताना पाह्यल्यावरच ठोका चुकला होता. हे काही खर नाही अस वाटल.
रिवाजांची सारी घडी मोडुन सगळ ऑस्ट्रेलिया डोळे पुसताना पाह्यलं.

लेख लिहिता लिहिता शोकातून शौर्याकडे जाण्याची पद्धनत आवडली.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Dec 2014 - 10:14 am | अत्रुप्त आत्मा

@लेख लिहिता लिहिता शोकातून शौर्याकडे जाण्याची पद्धनत आवडली. >>> +++१११

लेखही अप्रतिम जमला आहे.

देशपांडे विनायक's picture

5 Dec 2014 - 10:51 am | देशपांडे विनायक

बाळकडू

१९५७ /५८ साली एका मराठी मासिकात माधव मंत्री यांचा लेख वाचला

ऑस्ट्रेलियात क्रिकेट म्याच पहात असतानाचा अनुभव होता त्यांचा

त्यांच्या बाजूला बसलेली एक स्त्री आपल्या सात आठ वर्षाच्या मुलाला गोलंदाजीत बदल का केला

हे समजावून सांगत होती. ते पाहून मंत्री [खालील प्रमाणे काहीसे ] लिहिते झाले '

सामान्य प्रेक्षक जर इतका knowledgeable असेल तर खेळाडू '' तयार '' असणारच . त्याला बाळकडूच तसे

मिळाले आहे

जे.पी.मॉर्गन's picture

5 Dec 2014 - 2:00 pm | जे.पी.मॉर्गन

ऑस्ट्रेलियाचं खेळांचं वेड सर्वश्रुत आहे. मुळात मुबलक जमीन आणि मनुष्यबळाची कमी ह्यामुळे ऑस्ट्रेलियन्स (स्त्रिया देखील) निसर्गतःच मजबूत बांध्याचे असतात. त्यात उत्तम आर्थिक परिस्थितीमुळे sports culture रुजलं ह्यात काहीच नवं नाही. पोट सुटलेले ऑझी लोकं दिसणं विरळाच. पावला पावलावर मैदानं, टेनिस कोर्ट्स.....अश्या सांस्क्रुतिक संपन्नतेचा हेवा वाटतो ना?

जे.पी.

सिरुसेरि's picture

5 Dec 2014 - 11:20 am | सिरुसेरि

भारताने UDRS (Umpire Decision Review System) ला विरोध करणे सोडून द्यावे . बरेचदा भारतीय खेळाडू खुपदा चूकीच्या Umpire Decision चे बळी ठरले आहेत ( विषेश करून तेंडूलकर ). तसेच २०११ चा world cup जिंकण्यात भारताला UDRS चा ही खूप ऊपयोग झाला . तेव्हा UDRS (Umpire Decision Review System) चा परत वापर करणे योग्य ठरेल .

श्रीगुरुजी's picture

5 Dec 2014 - 2:41 pm | श्रीगुरुजी

छान लिहिलंय. कांगारू माजोरडे असले तरी त्यांच्या संघाविषयी एक वेगळेच आकर्षण आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत हार न मानण्याची त्यांची लढाऊ वृत्ती आवडते. त्यांच्या सध्याच्या संघातील स्टीव्हन स्मिथ हा माझा आवडता खेळाडू आहे. ९ सप्टेंबरपासून कसोटी मालिका सुरू होत आहे. या मालिकेवर मी एक लेख लिहिला आहे. १-२ दिवसातच लेख प्रसिद्ध करेन.

प्यारे१'s picture

5 Dec 2014 - 3:31 pm | प्यारे१

जे पी मॉर्गन ह्यांचा लेख म्हणजे पर्वणी.
बाकी मृत्यू कुणाला कधी कुठल्या रुपात भेटेल हे सांगता येत नाही हेच खरं.
मृत्यू कुणालाच आवडत नाही. २५ व्या वर्षी तर कुठल्याही कारणानं नाहीच्च.

पहाटे उठून थंडीत पांघरूण घेऊन म्याच बघायची मजा काही औरच !! ९२ चा world cup अजून आठवतो आणि त्यात रिची बेनो ची commentry !!

मुक्त विहारि's picture

6 Dec 2014 - 6:48 am | मुक्त विहारि

८५-८६ मध्ये झालेला बेन्सन अँड हेजेस कप जास्त लक्षांत राहिला तो सदानंद विश्वनाथ (लेग अंपायर पाशी धावत जावून अपील करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक) आणि पहिल्यापासूनच आक्रमण करायचे असते, हा नविन धडा देणार्‍या श्रीकांत मुळे.

कितीही मॅचेस बघीतल्या तरी ह्या ८५-८६ची सर नाही.

विशेषतः पाकिस्तान बरोबरच्या फायनल मॅचची. (http://www.youtube.com/watch?v=q0EfZEpd9J8&ytsession=lWI0_vAerJ_LTjkMfNc...)

देवाने जर कधी मौका दिलाच तर हीच सीरीज बघायचा हट्ट धरीन.

आमची लेखणी ह्या सीरीजचा न्याय देवू शकत नाही.कधी जमलेच तर ह्या सीरीजचा आनंद जरूर घ्या.

फारएन्ड's picture

6 Dec 2014 - 5:55 am | फारएन्ड

छान लिहीले आहे. आता क्रिकेट सुरू होईल तसे अजून तुमच्याकडून वाचायला उत्सुक आहे.