चाफा बोलेना, चाफा चालेना...

आदित's picture
आदित in जनातलं, मनातलं
28 Nov 2014 - 9:42 pm

'चाफा बोलेना, चाफा चालेना' हे गाणं कितीदा ऐकलंय.
लतादिदींचा स्वर अाणि टिपिकल भावगीताचं संगीत...
र्याचदा असं वाटलं की प्रेमगीत अाहे.
पण कधी गाणं पूर्ण कळलं नाही.
काहीतरी मिस होतंय असं वाटंत राहिलं.
पूर्ण कविता मिळवून वाचली तर गुंता अजूनच वाढला.
मग कवीबद्दल शोध घेतला.
ही कविता 'नारायण मुरलीधर गुप्ते (१८७२-१९४७)' यांची अाहे. ते 'बी' या टोपणनावानं लिहायचे.

मग गाणं ऐकताना कधीतरी हे सुचलं -

मला वाटतं या कवितेत 'बी'यांनी अापल्या काव्यनिर्मीतीची प्रक्रिया सांगितली अाहे.
'चाफा' हे कवीच्या कवितेचं, काव्यप्रतिभेचं प्रतीक अाहे. ही कविता समजण्याासाठी या कवितेचा फॉर्म समजणं हेही महत्वाचं अाहे.
ही कविता म्हणजे त्यांच्या कविमनाचं त्यांच्या कवितेशी असलेलं हितगुज अाहे.
कविता सुचण्यामागची काव्यप्रेरणा, सृजनाची प्रक्रिया कशी अाहे हे या कवितेतून समजतं. कवी यातून अापल्या कवितेचा शोध घेतो.

"चाफा बोलेना, चाफा चालेना चाफा खंत करी, काही केल्या फुलेना", इथं न बोलणारा, न चालणारा, खंतावलेला 'चाफा' म्हणजे रुद्ध झालेली काव्यप्रतिभाच!

पहिल्या दोन कडव्यात -
"गेले अांब्याच्या वनी, म्हटली मैनसवे गाणी, आम्ही गळ्यात गळे मिळवून,
गेले केतकीच्या बनी, गंध दर्वळला वनी, नागासवे गळाले देहभान"
हे म्हणताना कवीचं मन काव्यप्रतिभेला साद घालतं. काव्यनिर्मितीसाठी लागणारी प्रेरणा इथं व्यक्त होते. या कडव्यातले 'अाम्ही' कोण तर ते अाहेत - कवीमन अाणि त्याची काव्यप्रतिभा! हे दोघे कवितेचा बहर यावा यासाठी वेगवेगळ्या प्रेरणांचा शोध घेतायंत अशी कल्पना इथे अाहे. मूळ कवितेतली यापुढंची चार-पाच कडवी वाचली हा काव्यप्रेरणेच्या शोधाचा प्रवास दिसू लागतो.

कवीमन पुढं म्हणतं - 'हे विश्वाचे आंगण, आम्हा दिले आहे आंदण, उणे करूं आपण दोघेजण'.
अर्थात, या विश्वात, या जगरहाटीत अशा अनंत प्रेरणा अाहेत ज्या कविता फुलवू शकतात.

पण पुढच्या कडव्यात कवी त्याच्या कवितेचं ध्येय, प्रेरणा काय अाहे हे व्यक्त करतो. तो म्हणतो -
'जन विषयाचे किडे, ह्यांची धाव बाह्याकडे आपण करु शुद्ध रसपान रे'.
कवी म्हणतो की मानवी मन विश्वाच्या बाह्यरुपाकडं, भौतिकतेकडं, वैषयिकतेकडं सहज अाकर्षित होतं. पण 'शुद्ध रसपान' हवं असेल तर भौतिकतेला सोडून परमात्म्याचा वेध घेण्याचा ध्यास मनानं घ्यायला हवा. कवीला असं वाटतंय की त्यासाठी त्याच्या काव्यप्रतिभेनं परमात्म्याचा ध्यास घ्यावा. हे ध्येय जितकं उच्च तितकंच दैवी!!!
पण यापुढं कवी जे म्हणतो ती खरी कवीकल्पना - 'दिठी दीठ जातां मिळून, गात्रे गेली पांगळून, अंगी रोमांच आले थरथरून'
यांत 'दिठी' म्हणजे दृष्टी! कवी म्हणतो, माझी दृष्टी, माझं मन जेंव्हा परमात्यात विलिन होईल तेंव्हा ही लौकिक जगाची 'गात्रं' गळून पडतील अाणि मग माझ्या कवितेचं जे अंतिम ध्येय अाहे ते साध्य होईल.
इथं कवितेचं शेवटचं कडवं - "चाफा फुली आला फुलून, तेजी दिशा गेल्या आटून, कोण मी - चाफा! कोठे दोघेजण?"
कवी म्हणतो, माझी काव्यप्रतिभा अशी फुलून यावी की तिच्या जोरावर मुक्तिचं ज्ञान मला मिळावं. त्या ज्ञानाच्या तेजानं सगळया दिशा अशा उजळून जातील की मी-माझं काव्य असे अाम्ही दोघे वेगळे राहणारंच नाही, हा 'मी'पणाचा भेद संपून जाईल अाणि माझं काव्य परमात्यात विलिन होईल, वैश्विक होईल.

कविताविचारआस्वाद

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

28 Nov 2014 - 11:22 pm | कवितानागेश

चांगला प्रयत्न

सूड's picture

29 Nov 2014 - 10:09 pm | सूड

+१

स्पार्टाकस's picture

28 Nov 2014 - 11:39 pm | स्पार्टाकस

साहित्यसम्राट आचार्य अत्रे यांनी या कवितेचं केलेलं रसग्रहण मिळालं तर जरुर वाचा!

मुक्त विहारि's picture

29 Nov 2014 - 6:25 am | मुक्त विहारि

अत्र्यांचा पंखा...

मीही वाचले नाही. शक्य असल्यास आणि प्रताधिकारमुक्त असल्यास इथं जरूर द्यावं ही विनंती.
आदित यांनी केलेलं रसग्रहण आवडलं - अजून थोडं खुलवलं असतं तर... असं वाटणारा लेख.
अवांतरः फोन आला की माझ्या मोबाईलवर हे गाणं मला ऐकू येतं आणि इतक्या वर्षांत मी ते एकदाही ते बदललं नाही. :-)

मुक्त विहारि's picture

29 Nov 2014 - 6:24 am | मुक्त विहारि

केले आहे.

देशपांडे अमोल's picture

29 Nov 2014 - 7:11 am | देशपांडे अमोल

मी कुठे तरी हे वाचल होतं. मला वाटत लोकसत्ता च्या रविवार पूरवणी मध्ये, ही ज्ञानेश्वरांवरील कविता आहे.

प्यारे१'s picture

3 Dec 2014 - 10:12 pm | प्यारे१

+११११
लोकरंग (रविवार लोकसत्ता) मध्ये वाचलेलं आहे.

शरद's picture

29 Nov 2014 - 7:39 am | शरद

रसग्रहण छान झाले आहे.
शरद

sanju's picture

29 Nov 2014 - 11:14 am | sanju

Surekh,far avadle

आदित's picture

29 Nov 2014 - 9:43 pm | आदित

सर्वांचे धन्यवाद...

@स्पार्टाकस - अाचार्य अत्र्यांचे रसग्रहण कधी वाचले नाही. अापल्याकडे असल्यास जरुर शेअर करावे, कमीतकमी गोषवारा तरी...
@देशपांडे अमोल - लोकसत्तेतला तो लेख मीही वाचलाय. कवितेचा अर्थ प्रवाही असतो. कधी प्रासंगीक तर कधी सापेक्ष. कविता समजायला यामुळे मदतच होते.

पैसा's picture

29 Nov 2014 - 10:28 pm | पैसा

अजून लिहायला हवं होतं असं वाटणारं.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Nov 2014 - 5:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

आवडत्या कवितेचं सुंदर रसग्रहण !

प्रदीप's picture

30 Nov 2014 - 7:50 pm | प्रदीप

आवडले.

बोका-ए-आझम's picture

3 Dec 2014 - 9:50 pm | बोका-ए-आझम

आवडेश. अनेक कवींनी आपल्या काव्यप्रतिभेबद्दल लिहिलं आहे. मला वाटतं खानोलकरांच्या ' गेले द्यायचे राहुनी ' आणि कुसुमाग्रजांच्या ' समिधाच सख्या या ' अशीच उदाहरणं आहेत. यावर एक अजून छान लेख होईल. तो कोणीतरी लिहावा आणि वाचकांना बौद्धिक मेजवानी द्यावी अशी विनंती!

ते एक साधं पण सुरेख प्रेमगीत आहे. प्रयोग नावांच्या एका व्यक्तीनं मायबोलीवर कवितेचा (असा संदर्भासहित आणि योग्य) अर्थ उलगडला आहे :

चाफा ही कविता आम्हाला अभ्यासाला असताना त्याखालची तळटीप या कवितेचा गाभा सुस्पष्ट करणारी होती. ती अर्थातच कवीला अभिप्रेत असलेल्या अर्थानुसार आणि या काव्यनिर्मितीची प्रक्रिया उलगडून सांगणारी होती.
चाफा हे एक रूपक काव्य आहे. यातील चाफा म्हणजे प्रियकर. ही कथा राजा उदयन आणि त्याची प्रेयसी रत्नावली यांच्यातील आहे. उद्यानात विहार करताना उदयन गप्प गप्प आहे. त्याला बोलते करण्याचा प्रयत्न रत्नावली करते आहे आणि त्यातून तिच्या मनातल्या भावना उमटत आहेत.
चाफा बोलेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना, यात प्रेयसीने आपल्या प्रियकराला चाफा संबोधले आहे. उदयनाने गंभीरपणा सोडून प्रेमालापाला प्रतिसाद द्यावा म्हणून ती विनवणी करत आहे. प्रारंभी ती उदयनाला खुलवण्यासाठी आपण काय काय केले ते सूचित करत आहे.

गेले आंब्याच्या वनी,
म्हटली मैनासवे गाणी
आम्ही गळ्यात गळे मिळवून रे....
गेले केतकीच्या बनी,
गंध दरवळला मनी
नागासवे गळाले देहभान रे
चल ये रे, ये रे गड्या
नाचु, उडू घालु फुगड्या
खेळु झिम्मा झिम्‌ पोरी झिम्‌ पोरी झिम्‌

अनेक प्रकारे समजाउनही उदयन गप्पच आहे. तो आपल्या अनुनयाला थिल्लरपणा समजतोय, की लोकलाजेस्तव संकोचतोय, या विचारात पडलेली रत्नावली त्याला अखेर प्रेमाचा खरा अर्थ समजाऊन सांगते. आणि शेवटच्या कडव्यातील याच ओळींनी या वरवर साध्या वाटणार्‍या काव्याला एक जबरदस्त उंची गाठून दिली आहे. रत्नावली म्हणते,

हे विश्वाचे आंगण आम्हा दिले आहे आंदण रे
उणे करू आपण दोघेजण रे
जन विषयाचे कीडे, त्यांची धाव बाह्याकडे
आपण करू शुद्ध रसपान रे

(उदात्त प्रेमाचे हे विश्व आपल्याला ज्या प्रभूने दिले आहे त्याच्या इच्छेनुसार आपण असीम प्रेम करूया आणि लोक काय म्हणतील असे जर तुला वाटत असेल तर त्यांचा विचार करू नकोस कारण असे लोक हे विषय वासनेत बुडालेले किडे असतात आणि त्यांची धाव शारीरिक आकर्षणाच्या पलिकडे जात नाही. आपण असे किडे नाही आहोत तर फुलांमधील मकरंद टिपणारे रसिक आहोत म्हणून ये आपण प्रेमाचा तो शुद्ध रस चाखू या.)

चाफा ही अत्यंत श्रेष्ठ दर्जाच्या कवितांमधली एक आहे.

शेवटच्या ओळी (ज्या वरच्या रसग्रहणात आलेल्या नाहीत) त्या सर्वश्रुत आहेत :

चाफा फुली आला फुलून
तेजी दिशा गेल्या आटुन
कोण मी - चाफा? कोठे दोघे जण रे?

आणि त्यांचा अर्थ सरळ आहे.

प्रियकराचा राग विरलायं आणि त्या आनंदात वातावरण दिशाहिन झालंय (म्हणजे आपण कुठे आहोत हे भान हरपलंय). त्या अनुरागाच्या परिसीमेत, (गाणारी) सखी प्रियकराशी एकरुप झालीये, त्यामुळे : कोण मी - चाफा? कोठे दोघे जण रे? असं म्हटलंय.

थोडक्यात, आपण दोघं आता वेगळे राहिलेलो नाही, त्यामुळे चाफा (प्रियकर) कोण आणि (त्याच्यासाठी) गाणारी मी कोण असा सुरेख विभ्रम झाला आहे.

संजय क्षीरसागर's picture

3 Dec 2014 - 11:33 pm | संजय क्षीरसागर

तिथेच खाली वाचतांना, वरच्या लेखात लावलेला अर्थ कुणी पेशवा नांवाच्या व्यक्तीनं २०१० साली लावला आहे असं दिसतं. आणि वरच्या लेखातल्या या ओळी : 'दिठी दीठ जातां मिळून, गात्रे गेली पांगळून, अंगी रोमांच आले थरथरून' ..., तिथे (अगोदरच) उधृत केल्या आहेत. अर्थात, पेशवा यांनी अयोग्य अर्थ लावला असला तरी ओरिजिनल मेहनत घेतलेली दिसतेयं.