शिकार

कल्पतरू's picture
कल्पतरू in जनातलं, मनातलं
20 Sep 2014 - 3:43 pm

कधीतरी असाच एक योग येतो चार चौघांची चांडाळ चौकडी जमा होते आणि शिकारीला जायचा बेत ठरतो. आता कोकणात शिकारीला फार महत्व. जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी शिकारीला गेलंच पाहिजे हा इथला अलिखित नियम. लहानाचा मोठा झालो तो या गोष्टी ऐकतच. अगदी मला आठवतंय म्हणजे पहिली दुसरीत असताना दर आठवड्याला शिकारीच्या गोष्टी हमखास कानी पडायच्या. कधी तर सशाच्या, तर कधी लांडोर तर कधी भेकर , रानडुकराची शिकार म्हणजे सगळ्यात मोठी शिकार. याची शिकार जो करायचा तो आठवडाभर गावात त्याची छाती चार इंच फुगवून चालायचा. घोरपडीची पण शिकार व्हायची पण ती खूप चपळ आणि सहजासहजी हातात न येणारी त्यामुळे शक्यतो आदिवासी लोकंच तिच्या वाट्याला जायचे. हीच गोष्ट साळिंदराच्या बाबतीत एकदा याचे काटे एका शेजारच्या माणसाला लागले होते बिचारा आठवडाभर तळमळत होता. आमच्या गावात एका माणसाचा लहानसा पुतळा उभारलाय. रानडुकराची शिकार करायला गेला आणि स्वतःलाच गोळी लागली. तो रानडुक्कर म्हणजे पिंपळाच्या झाडावरचा वेताळ होता. पण त्या माणसाने आपलं रक्त अजिबात खाली पडू दिलं नाही. नाहीतर त्या रक्ताचा माग काढत तो वेताळ गावापर्यंत आला असता. आता ही भाकड कथा आहे हे माहित असूनसुद्धा अशा गोष्टी शांतपणे ऐकून घ्यायच्या असतात. आपलं शहरीकरण आणि विज्ञान यांचं बोट त्यांना लावायचं नसतं. आणि त्यातच खरी मजा असते.

असाच मागे गावी गेलो तेव्हा शिकारीला जायचा योग आला. आम्ही चार जण होतो. पहिला म्हणजे मी. आता माझा आणि शिकारीचा संबंध जास्त नव्हता. कधी तरी खेळताना एखाद्या कोंबडीला दगड मारणे आणि अगदी पुढची पायरी म्हणजे बेचकी घेऊन चिमणी कावळ्यावर नेम धरणे बस एव्हडाच काय तो अनुभव माझ्या गाठीशी होता. दुसरा माझा मित्र, तो मी जे करायचो ते तर करायचाच पण याला एक खूप विचित्र सवय होती. एखादं गाढव गावात शिरलं की हा गावातले पोरं जमा करायचा आणि त्या गाढवाच्या पाठीमागे पळायचा. मग त्या गाढवाच्या शेपटीला पत्र्याचा डबा बांधून वाजवायचा काय, त्याच्या पाठीवर उड्या काय मार आणि दिवाळीत जर चुकून गाढव आलंच तर त्या बिचाऱ्याची शंभरी भरलीच म्हणून समजा. अर्ध्यापेक्षा जास्त फटाके गाढवाच्या पाठीवरच वाजायचे. त्याचे सर शाळेत सारखे त्याला गाढव म्हणायचे आणि हा राग तो या गाढवांवर काढायचा असं मला समजलं होतं. बाकीचे दोन होते ते आमच्यापेक्षा थोडे वयाने मोठे होते. त्यातल्या एकाकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेली कुऱ्हाड होती आणि या कुऱ्हाडीची खासियत म्हणजे एकदा का ती उचलली की तिचा वार करावाच लागतो. न वार करता तशीच परत खाली आणली की काहीतर संकट ओढवतं अशी त्याची समजूत होती. एकदा चुकून याने ती वार करण्यासाठी उचलली आणि शेवटी नाईलाजाने स्वतःच्या पायावर वार करावा लागला होता. अजून एक होते त्यांचाकडे छऱ्यांची बंदूक होती आणि त्यातले छर्रे ते सारखे तोंडात ठेवत असत. त्यांच्या आजोबांची आणि वाघाची एकदा जुंपली होती तर यांच्या आजोबांनी पायाच्या अंगठ्याने वाघाची बेंबी फाडून वाघ मारला होता. आता किती खरं किती खोटं देवच जाणे.

असे आम्ही चार चौघे निघालो. आता आम्ही दिवसा ढवळ्या जात होतो, त्यामुळे शिकारीतला श ही आम्हाला मिळणार नव्हता दिसलाच तर एखादा ससा पण ती शक्यता सुद्धा कमीच होती. तरीसुद्धा मी आपला एक बरचा सोबत ठेवला होता. दोन तास जंगलात भटकलो आणि अपेक्षेप्रमाणे काहीच मिळालं नाही. शेवटी दमून नदीजवळ आलो. नदीला लागुनच १०-१२ झोपड्या दिमाखात उभ्या होत्या. बांबूची भिंत आणि वरती सुकलेला गवताचा भारा. मधूनच एखाद दुसरं माणूस दिसत होतं. माझी पावलं नकळत तिकडे वळली जशा जशा त्या झोपड्या जवळ येत होत्या मनात प्रश्नांची वादळ उठत होती. कोण असतील हे? कुठून आले असतील? यांचं राहणीमान कस असेल? किती असतील हे? यांच्या आयुष्यात सुद्धा अडचणी असतील का? शहरीकरणाची झळ यांना सुद्धा लागली असेल का? जवळ गेलो तोच एक म्हातारी आशेने पुढे आली. आणि काही काम आहे का विचारू लागली. साधारण ५०-५५ च्या आसपास असावी वयानी. हिरवी साडी नेसलेली कपाळवर भलं मोठं गंध सुकलेला, सुरकुत्या पडलेला तो कष्टाळू आणि राकट चेहरा माझ्याकडे अपेक्षेने पाहत होता. ती एक आदिवासी जमात होती. गावात काही शेतीची कामं आली की यांना मागणी असते. दिवसाला १०० रुपये घेऊन हे लोकं शेतीची कामं करतात. माझा तसला काही उद्देश नसल्याचं कळल्यावर ती जरा हिरमुसली. मी सहज उत्सुकता म्हणून तिला प्रश्न विचारू लागलो. सुरवातीला जरा संकोचत उत्तरं देत होती पण नंतर एकदम व्यवस्थित संभाषण झालं. तिला चार मुलं होती. आणि याच झोपड्यांमध्ये तिने त्यांना लहानाचं मोठं केलं होतं. शेतीची कामं जेव्हा येतात तेव्हा तर यांचं निभवून जात पण एरवी काय? हा प्रश्न त्यांच्यापुढे सताड आ वासून उभा असतो. प्रार्थमिक गरजा भागवण्यासाठी मग हे मासेमारी करतात कधी कधी जंगलातली लाकडं तोडून त्याची मोळी बाजारात विकतात पण ते ही आता कमी झालं. प्रत्येकाकडे सिलिंडर आले ना. चूल तर केव्हाच हद्दपार झाले.गावात कधी कधी एका दिवसाचं कामं मिळतं पण त्यातून मिळणारा मोबदला गरजा पूर्ण करण्यासाठी फारच तोकडा पडतो. तरीसुद्धा हे मजेत असतात नदीची हे लोकं पूजा करतात कारण यावरच यांचं पोट चालतं. हे सगळे आपल्या शहराच्या गजबजलेल्या जीवनापासून दूर होते. ना लोकल पकडायचं टेन्शन, ना प्रमोशन, ना पगारवाढ कसलंच टेन्शन नव्हता यांना. फक्त आलेला दिवस पुढे ढकलायचा हाच इथला साधा सरळ नियम. अज्ञानात सुख असतं म्हणतात ते हेच. माणूस जेवढा ज्ञानी तेवढ्या त्याच्या गरजा पण जास्त. त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली होती असं तरी कसं म्हणू मी. आर्थिक परिस्थिती खालावणे म्हणजे तरी काय?????? आहे त्याच्यापेक्षा जास्त असण्याची हावं धरणे. त्यांना कशाचीच हाव नव्हती. महागाई किती वाढली, सेन्सेक्स किती अंशावर आहे, या सगळ्या गोष्टींपासून हे खूप दूर होते.

तिच्या बोलण्यातला शब्द अन शब्द मनातल्या विचारांचे पैलू पाडत होता. परतत असताना मन नकळत आपल्या सुख सोयीनी भरलेल्या आयुष्याची तुलना तिच्या आयुष्याशी करू पाहत होतं. ते म्हणतात न चतुर्मिती तलावर आपल्याला समांतर असं विश्व आहे ते हेच. परत येताना मात्र एक रानडुक्कर दिसलं एक मादी होती आणि सोबत ३ लहान पिल्लं. पुन्हा ती आदिवासी बाई डोळ्यासमोर उभी राहिली. छऱ्यांची बंदूक तशीच शांत खाली मान घालून उभी होती, पिढ्यानपिढ्या चालत आलेली कुऱ्हाड पात्याचं तोंड दुसरीकडे करू पाहत होती, आणि बरचा पण .........

समाजलेख

प्रतिक्रिया

वा. एक वेगळ्या मार्गाने जाणरी गोष्ट.
आदिवासी खरेतर आपल्यापेक्षा खूप सुखी असतात.
रोजच्या जगण्यासाठी आवश्यक वस्तूपेक्षा त्याना आधीक काही नको अस्ते.
ते आपल्यापेक्षा खूप मजेत जगत असतात.

सं तुम्हाला वाटते.. ग्रास इझ आलवेझ ग्रीन ऑन द अदर साईड.

काउबॉय's picture

20 Sep 2014 - 5:14 pm | काउबॉय

निसर्ग Intact रहावाच. मानवी लुडबुड थांबाविच. पण मानव विकासापासून वंचितही नको. शेवटी गरजा कमी आहेत म्हणून आजार/दुःख/अन्याय होत नसतात असे थोडच आहे ? गाठिला पैसा हवाच.... मी तरी गरीबीत कोणी शांत सुखी पाहिलेला नाही.

एस's picture

20 Sep 2014 - 8:41 pm | एस

शिकार करण्यात कोणता पुरुषार्थ असतो? आयुष्यात एकतरी झाड लावून ते जगवलंय का? शिकार करतो असं फुशारकीने सांगणार्‍यांचा जाम राग येतो.

माफ करा, पण तुमच्यासारखे निसर्गाचे गुन्हेगार पाहिले की संतापाची तिडीक जाते मस्तकात.

कल्पतरू's picture

20 Sep 2014 - 10:06 pm | कल्पतरू

व्वा छान माझा लेख वाचून तुमच्या संतापाची तिडीक मस्तकात गेली. मी वर कुठेही निसर्गाला धक्का लागेल असं वर्तन केलेलं नाही सांगितल्यात त्या फक्त गोष्टी आणि अनुभव एवढ्या साध्या गोष्टीवरून तुमच्यात भूतदया जागृत झाली. गोहत्या होते, खाटिक सर्रास बोकडांची कत्तल करतो, कोंबडीवाला कोंबड्यांचे गळे कापतो या गोष्टीवर कधी विचार केलाय का???? कधी कुठल्या खटकाकडे जाऊन त्याला विरोध करायची हिम्मत केलीय का? नाही ना? का तर पार्श्वभागावर ओल्या बांबूचे फटके पडतील म्हणून???????? जे समाजमान्य आहे ते तुम्हाला चालतं, त्यात अन्याय नाही दिसणार तुम्हाला. कोंबडीवाला 1000 कोंबड्या कापतो ते तुमच्या दृष्टीने ठीक आणि आमच्या सारख्या माणसांनी जंगलात जाऊन १ कोंबडी मारली तर तर तुमच्या निसर्गाला धक्का लागला. व्वा रे तुमचा पुरुषार्थ.
(संपादित)

दशानन's picture

20 Sep 2014 - 10:16 pm | दशानन

+१
लेखकाला लेखन स्वातंत्र्य नक्कीच दिले पाहिजे.
हा मुद्दा महत्वाचा आहे.

+१
व लेखाचा शेवट सकारात्मक आहे.
लेखाच्या सुरवातीच्या आशयाबद्दल जर लेखकाची निंदा करायची असेल तर लेखाच्या शेवटाबद्दल लेखकाचे कौतुकही करायला हवे.!

एस's picture

21 Sep 2014 - 4:56 pm | एस

याबाबत सहमतच आहे. लेखाचे साहित्यिकमूल्य चांगलेच आहे. तसेच लेखकावर व्यक्तिशः आक्षेप नसून भर शिकार करणार्‍यांच्या प्रवृत्तीला झोडपण्यावर होता.

असो.

टवाळ कार्टा's picture

21 Sep 2014 - 12:09 am | टवाळ कार्टा

जंगलात शिकार केल्याने निसर्गाचा समतोल ढळतो... "वाघ" हे त्याचे उत्तम उदाहरण आहे...आणि कोंबड्या / बोकड यांची खाण्यासाठी वेगळी पैदास केली जाते

१०+ माणसे आणि दंबूक घेउन १ जनावर मारणे यात कोणतेही शौर्य नाही

टवाळ कार्टा's picture

21 Sep 2014 - 4:45 pm | टवाळ कार्टा

आता कोकणात शिकारीला फार महत्व. जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी शिकारीला गेलंच पाहिजे हा इथला अलिखित नियम.

ही परिस्थिती बदलली पाहिजे असे तुम्हाला जाणवलेले या लेखात तरी दिसले नाही

आता ही भाकड कथा आहे हे माहित असूनसुद्धा अशा गोष्टी शांतपणे ऐकून घ्यायच्या असतात. आपलं शहरीकरण आणि विज्ञान यांचं बोट त्यांना लावायचं नसतं. आणि त्यातच खरी मजा असते.

यातून आहे ती परिस्थिती बदलण्यात तुम्हाला रस नाहीये हे दिसते

असाच मागे गावी गेलो तेव्हा शिकारीला जायचा योग आला. आम्ही चार जण होतो. पहिला म्हणजे मी. आता माझा आणि शिकारीचा संबंध जास्त नव्हता

आता तुम्हीच पहिले म्हणजे तो "योग" नव्हता तर तुम्हालाच शिकारीला जायची हुक्की आलेली

कधी तरी खेळताना एखाद्या कोंबडीला दगड मारणे आणि अगदी पुढची पायरी म्हणजे बेचकी घेऊन चिमणी कावळ्यावर नेम धरणे बस एव्हडाच काय तो अनुभव माझ्या गाठीशी होता.

दुसरा माझा मित्र, तो मी जे करायचो ते तर करायचाच पण याला एक खूप विचित्र सवय होती. एखादं गाढव गावात शिरलं की हा गावातले पोरं जमा करायचा आणि त्या गाढवाच्या पाठीमागे पळायचा. मग त्या गाढवाच्या शेपटीला पत्र्याचा डबा बांधून वाजवायचा काय, त्याच्या पाठीवर उड्या काय मार आणि दिवाळीत जर चुकून गाढव आलंच तर त्या बिचाऱ्याची शंभरी भरलीच म्हणून समजा. अर्ध्यापेक्षा जास्त फटाके गाढवाच्या पाठीवरच वाजायचे

याला साध्या भाषेत उगाचच मुक्या प्राण्यांना त्रास देणे म्हणतात...

त्यातल्या एकाकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेली कुऱ्हाड होती आणि या कुऱ्हाडीची खासियत म्हणजे एकदा का ती उचलली की तिचा वार करावाच लागतो. न वार करता तशीच परत खाली आणली की काहीतर संकट ओढवतं अशी त्याची समजूत होती. एकदा चुकून याने ती वार करण्यासाठी उचलली आणि शेवटी नाईलाजाने स्वतःच्या पायावर वार करावा लागला होता.

कोणत्या गोष्टींवर किती "श्रध्धा/अंधश्रध्धा" ठेवायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण त्यासाठी स्वताच्या पायावर कुर्हाड कुर्‍हाड घालणे हा शुध्ध "चू*"पणा आहे

परत येताना मात्र एक रानडुक्कर दिसलं एक मादी होती आणि सोबत ३ लहान पिल्लं. पुन्हा ती आदिवासी बाई डोळ्यासमोर उभी राहिली. छऱ्यांची बंदूक तशीच शांत खाली मान घालून उभी होती, पिढ्यानपिढ्या चालत आलेली कुऱ्हाड पात्याचं तोंड दुसरीकडे करू पाहत होती

यांना काहीही केले नाहीत याबद्दल मात्र तुमचे कौतुक :)

एस's picture

21 Sep 2014 - 4:58 pm | एस

प्रश्नांच्या उत्तरांच्या अपेक्षेत. पाहूयात.

टवाळ कार्टा's picture

21 Sep 2014 - 5:16 pm | टवाळ कार्टा

ह्या ह्या ह्या...मिपाचा इतिहास गवाह हय

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Sep 2014 - 1:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

ज्या जनावरांनी आपल्याला काहीच त्रास दिला नाही अश्यांची आपण जंगलात जाऊन शिकार करतो यात जर काहीच वाईट नाही तर ज्यांच्या भूमीवर (जंगलावर) आक्रमण करून आपण घरे-झोपड्या बांधतो आणि त्यांचे जिणे कठीण करतो अश्या रानातील प्राण्यांनी माणसांवर हल्ला केला तर तेही वाईट नाही ! हो की नाही ?

येथे मात्र थंडीच्या आधी हरणे मारायची खास परमिट्स दिली जातात. मला आधी वाटायचे किती क्रूरपणा. पण नंतर बायकोकडून कळले बर्‍याच ठिकाणी हरणांच्या नैसर्गिक भक्षकांची आधीच कत्तल झाल्याने त्यांची संख्या भरमसाठ वाढून अन्नसाखळीचा समतोल ढळतो. इतक्या हरणांना खाण्यासाठी थंडीत पुरेसे अन्न उपलब्ध नसल्याने थंडीत ती भूकेने तडफडून मरतात.

अर्थात हे केवळ location specific उदाहरण झाले. थोडक्यात शिकार नेहमीच क्रौर्य आहे असे नाही.

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Sep 2014 - 7:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

बर्‍याच ठिकाणी हरणांच्या नैसर्गिक भक्षकांची आधीच कत्तल झाल्याने त्यांची संख्या भरमसाठ वाढून अन्नसाखळीचा समतोल ढळतो. यातील "नैसर्गिक भक्षकांची आधीच कत्तल" करणारे माहीत झाले तर...

शिकार नेहमीच क्रौर्य आहे असे नाही. की आहे. ह्याचाही निकाल लागेल.

म्हणतात ना कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ;)

छर्याच्या बंदुकीने ससा मरेल पण रानडुक्कर?

बाकी रानडुक्कर मारुन कसला समतोल ढळणार? तेवढीच शेतीची नासाडी वाचल.

टवाळ कार्टा's picture

21 Sep 2014 - 1:42 pm | टवाळ कार्टा

बाकी रानडुक्कर मारुन कसला समतोल ढळणार? तेवढीच शेतीची नासाडी वाचल.

अभ्यास वाढवा

एस's picture

21 Sep 2014 - 5:13 pm | एस

ह्यामध्ये मानव-निसर्ग संघर्ष असा एक फार व्यापक आणि गुंतागुंतीचा पदर आहे. रानडुकरे आणि हरणे शेतीचे नुकसान करतात.बरोबर. पण ही शेती कुठली असते? ते आपल्या भागात येताहेत की आपण त्यांच्या अधिवासावर अतिक्रमण करतोय? ह्या प्राण्यांच्या नैसर्गिक भक्षकांचे अस्तित्व आपणच संपवले. उदा. भिमाशंकरच्या परिसरात एकेकाळी वाघ भरपूर होते. आता तिथे बिबटेही दुर्मिळ झाले आहेत.

त्याचबरोबर काही मानवांच्या लोभापायी जास्त विस्तृत आणि निर्दोष लोकसंख्येला कशी किंमत मोजावी लागते ह्याचेही हे चांगले उदाहरण आहे. दुसरे उदाहरण म्हणजे मुंबईच्या आरे कॉलनी परिसरात नरभक्षक बिबट्यांनी लहान मुले उचलून नेण्याचे प्रमाण मध्यंतरी वाढले होते. प्रत्यक्षात अतिक्रमण करणारे बिल्डर लोक होते. झळ कुणाला बसली तर तिथल्या गरीब वस्त्यांना.

पैसा's picture

21 Sep 2014 - 7:41 pm | पैसा

आता कोकणात शिकारीला फार महत्व. जन्माला आलेल्या प्रत्येकाने एकदा तरी शिकारीला गेलंच पाहिजे हा इथला अलिखित नियम.

मात्र हे काय पटलं नाय भाऊ! मी पक्की कोकणी आहे. पण मी किंवा माझे कोणी नातेवाईक, फार काय गावातले ओळखीचे लोकही शिकारीला कधी गेलेले नाहीत. मला वाटते छर्‍याच्या बंदुकीसाठीही परवाने लागत असावेत आणि ते सगळ्यांकडे नसतात. सबंध गावातल्या एखाद दुसर्‍या घरात बंदूक असायची आणि त्या घरातले लोक सटीसामाशी रानडुक्कर मारायला जायचे. याहून मोठी शिकार कोणी कधी केलेली ऐकली नाही. फार काय, कोकणी माणूस प्राण्यांच्या बाबत बराच सहिष्णु असतो. साप, भेकरं, कुत्रे वाघ इ. मंडळी लोकांबरोबरच सुखेनैव नांदतात!

कल्पतरू's picture

21 Sep 2014 - 7:51 pm | कल्पतरू

पण आपल्याकडे भूतांचा विषय सांगतात त्याच्यासोबत हा विषय पण थोड्या बहुत प्रमाणात असतो. आणि डुकरांची शिकार होते या बाबतीत तर मी १०० % सहमत आहे. आपल्या गावात १-२ कडे ती नळीची बंदूक असतेच. आता शिकार म्हणजे ती होते अडून मधून जरी तरी प्रस्थ नसलं तरी शक्यता नाकारता येत नाही.

कोकणात म्हणजे कुठल्या गावी? मी ही जन्मापासून पुढची बावीस वर्ष कोकणातच होतो. शिकार हा प्रकार कधी पाहीला नाही. नाही म्हणायला रानात आदीवासी लोक सशांच्या पाणवठयावर जायच्या वाटेवर फासकी लावायचे. मात्र गावातील कुणाच्या दिसण्यात ती फासकी आली आवर्जून काढून टाकली जायची. मी गुरांकडे गेल्यावर हे काम अगदी ईमानईतबारे करत असे. :)

सनी स्॓आस's picture

22 Sep 2014 - 8:51 pm | सनी स्॓आस

छान लेख आहे आवडला. सुरवात ते शेवट अगदी घट्ट पकडून ठेवतो लेख. मस्त. पुलेशु