अशीच एक फँटसी..(१)
अशीच एक फँटसी..(२)
अशीच एक फँटसी..(३)
रविवारी सकाळी तो अन उर्मी श्री श्री गुरुदेवांच्या प्रशस्त हॉलमध्ये बसून भक्तजनांची गर्दी कमी होण्याची वाट पहात होते. श्रीश्रींची एकांत भेट मिळण्यासाठी त्यांना दीड तास थांबावे लागले. अखेर एकदाची भेट मिळाली अन अर्णवने आपली नवीन समस्या सविस्तरपणे गुरुदेवांच्या कानावर घातली.
त्याचे बोलणे संपेपर्यंत गुरुदेव शांतपणे डोळे मिटून ऐकत होते. त्यानंतरही पाचेक मिनिटे त्यांनी डोळे उघडले नाहीत. अर्णवला वाटले त्यांची निद्रा-समाधी लागली की काय ? पण नाही ! सहाव्या मिनिटाला त्यांनी डोळे उघडून बोलायला सुरुवात केली.
'अच्छा, असं आहे काय ? बरं अर्णव, तू मला सांग, तुम्ही मागच्या वेळी माझ्याकडे येण्याच्या आदल्या दिवशी तू काय काय केले होतेस ? बारीक तपशीलही न गाळता सांग.'
अर्णव अन उर्मी दोघांनीही आठवून आठवून शनिवारचा सर्व कार्यक्रम कथन केला.
'मी तुला एक औषध दिले होते त्याचे काय केले ?' गुरुदेवांनी विचारले.
'अरे हो ! ' अर्णव अपराधी स्वरात म्हणाला, 'ते ना, मी विसरलो होतो प्यायला. मग रात्री लक्षात आल्यावर सगळे एकदम पिऊन टाकले !'
'तरीच !' गुरुदेव उद्गारले.
'..?' अर्णव अन उर्मी दोघांचीही अवस्था लोणी खाताना पाठीत सोटा बसलेल्या बोक्यासारखी झाली !
मग श्री श्रीं त्यांच्या अज्ञानाच्या घोर तिमिरात ज्ञानप्रकाशाचा एक एक किरण सोडू लागले.
'मी याआधीच तुम्हाला सांगितलं होतं की स्मृती ही भौतिक वस्तू नसून एक तरल प्रक्रिया आहे. जड द्रव्य अवतरण्याच्याही आधीपासून ती अस्तित्वात आहे. असे म्हणतात की जीवित वस्तूच्या पेशी पेशीवर तिचा अनंत कालपासूनचा इतिहास लिहिलेला असतो अन त्याआधारेच प्रत्येक जीवाचा पुढचा प्रवास चाललेला असतो. आकाशातून पडलेला प्रत्येक पाण्याचा थेंब अखेरीस सागरास मिळतो पण तरीही प्रत्येक थेंबाचा प्रवास वेगवेगळ्या मार्गाने होतो. तसेच सर्व जीव अखेर मोक्षाप्रत जात असले तरी प्रत्येकाचा मार्ग वेगळा असतो. हा मार्ग पूर्वगतीच्या आधाराने निश्चित होतो. ही पूर्व गती कुठून येते ? तर तो त्या जीवाच अनंत जन्मांचा प्रवास ठरवतो.
प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम हे स्मृतींचे तीन प्रकार. समोर दिसणाऱ्या दृश्याचा सरळ अन्वयार्थ म्हणजे प्रत्यक्ष. समोर दिसणाऱ्या घटनेवरून तर्काने जाणलेली गोष्ट म्हणजे अनुमान. उदा. आंबा पाहिल्यावर तो गोड आहे हे जाणणे.
...पण यापेक्षाही एक वेगळी स्मृती प्रत्येक जीवाच्या पेशीपेशीमध्ये रेखित असते. पोटाच्या पेशी अन्न पचनाचे काम करत्तात अन हृदयाच्या पेशी रक्ताभिसरणाचे . असे कसे ? त्यांचे कार्य उलटसुलट का होत नाही ? जन्माला आलेले मूल आधार सुटला तर हाताला लागलेली कापडाची कडसुद्धा जीवाच्या भीतीने मुठीत घट्ट पकडते. त्याला मरण म्हणजे काय अन भीती म्हणजे काय हे कोण सांगते ? या स्मृतीला आगम असे नाव आहे. त्याच स्मृतीच्या आधारे जीव आपला पुढचा मार्ग शोधत राहतो.
आत्मा सर्वव्यापी आहे. अन म्हणून त्याला सर्व जीवांच्या एकूणएक स्मृती अवगत आहेत.
एका उच्चतम पातळीवरती सर्व जीव एकमेकांना जोडलेले आहेत. तिथे या स्मृती कॉमन आहेत. जसे की एखाद्या सुपरकॉम्प्यूटरला जगातील सर्व इतर कॉम्प्यूटर अवगत असत्तात.
मी जेव्हा अर्णवला हिप्नोटाईज केले अन त्याच्या स्मृतीचे सेटिंग बदलले, तेव्हा त्या औषधामुळे त्याच्या बाह्य मनाची संवेदनक्षमता काहीशी वाढलेली होती. म्हणजे त्याच्या एकदम सगळे औषध खाण्यामुळे प्रमाणापेक्षा जास्तच वाढली होती. '
'अशीही औषधे आहेत ?' अर्णव
'का नाही ? मानसोपचाराच्या काही औषधांमुळे मनाची संवेदनक्षमता कमी होते. मन बधीर होते. जाणिवांची व्याप्ती कमी होते अन मनोरुग्ण शांत होतो. हे औषध त्याच्या उलट आहे.
मनाच्या गाभ्यामध्ये पोचण्याचे अनेक मार्ग आहेत. नजर, गंध, स्पर्श इ. पंचेंद्रियांच्या माध्यमातून मनावर ताबा मिळवता येतो. उदा. हिप्नॉटिझम . तसेच रसायनांच्या माध्यमातूनही मनाची अवस्था बदलता येते. दारू प्याल्यावर मनुष्य चटकन भावनावश होतो.
..तर मग ते औषध प्याल्यावर मनाची तरलता वाढते अन काही वेगळ्या मिती त्याला खुल्या होतात. ....तूर्त इतकेच पुरे.
तर, अशा या उद्दीपित तरल मनाला एक आज्ञा देऊन त्याच्याकडून, एरवी अशक्य वाटणारी कामे सहज करवून घेता येतात. तुम्ही संमोहनाचे प्रयोग पाहिले असतीलच !
मी असेच अर्णवच्या मनाला एक आज्ञा दिली. पण त्याच्या तरलतेची पातळी माझ्या अंदाजापेक्षा जास्त उच्च झाली असल्याने मनाचे विस्थापन त्याला एका वेगळ्या मितीत घेऊन गेले. ..अन त्या सुपरकॉम्प्यूटरची किल्ली त्याच्या आवाक्यात आली.
अर्णव खरोखर तुला कल्पनाही नाही तुला काय मिळाले आहे ! जगातल्या कोणत्याही, अगदी कोणत्याही जिवंत प्राण्याची, यात वनस्पतीसुद्धा आल्या, कोणत्याही काळातली स्मृती तुला उपलब्ध झाली आहे ! संपूर्ण विश्वाचा इतिहास तू मनात आणलंस तर घडाघडा वाचू शकशील ! मानवाच्या इतिहासात फारच थोड्या मानवांना ही किल्ली अवगत झाली आहे. ज्यांना गवसली त्यापैकी काही द्रष्टे झाले, काही संत ठरले , तर काही ठार वेडे झाले ! '
अर्णव अन उर्मी थक्क होण्याच्याही पलीकडे गेले होते.
'पण गुरुदेव, मला मनात येईल तेव्हा हवे ते आठवता का येत नाही ?' अर्णव म्हणाला.
'समजा तू अश्मयुगातला माणूस आहेस अन तुला एक मोबाईल सेट मिळाला. एकदम तुला त्याची सर्व फंक्शन्स वापरता येतील का ?'
'नाही !'
'तुला एक प्रशिक्षित कुत्रा सापडला. पण तो काय काय करू शकतो हे तुला एका दमात समजेल का ? तसेच या नव्या शक्तीच्या वापराचे मार्ग तुला हळूहळू समजत जातील, तसतसे तुला त्यावर प्रभुत्व येईल.'
'गुरुदेव, माझ्याप्रमाणे तुम्हालाही हे अवगत आहे का ?' अर्णवची रास्त शंका.
गुरुदेव दोन सेकंद स्तब्ध झाले. मग हसून म्हणाले,
'नाही ! खरोखर मला अजून तरी हे अवगत नाही. '
'पण तुमची दीर्घ साधना...?'
'माझ्या साधनेचे उद्दिष्ट हे नाही ! अन माझ्या मनाचे क्षेत्रही वेगळे आहे. प्रयत्न केला तर ते होईलही. पण सिद्धी मला कधी मोह घालू शकल्या नाहीत, अन मीही त्यांच्यापासून हातभर दूरच असतो.
असो, पण तो विषय वेगळा आहे. आता प्रश्न हं आहे की तू काय करणार आहेस ?'
'अं ?' अर्णवला हं प्रश्न अगदी अनपेक्षित होता.
'मी काय करणार ? तुम्हीच काहीतरी करा, अन या चमत्कारिक सिद्धीपासून मला सोडवा !'
'अर्णव तुला फार फार वेगळी गोष्ट सापडली आहे. तू स्वत:च्या उन्नतीसाठी याचा अचूक उपयोग करून घेऊ शकतोस ! एक राष्ट्रसुद्धा तू मुठीत आणू शकतोस !'
'राष्ट्र ?' अर्णव अन उर्मीने एकमेकांकडे एकदमच पाहिले.
..अन दोघांच्याही नजरेत एकच निश्चय होता !
'ही सिद्धी आम्हाला नको !' दोघे एकदमच म्हणाले.
'पहा बरं, पुन्हा एकदा विचार करा !' गुरुदेव मिस्कीलपणे हसले.
'गुरुदेव, या असंख्य स्मृतींचा गुंता माझ्या मेंदूला जखडून टाकतो आहे हो ! साधे आयुष्य जगणे कठीण झाले आहे. मला नाही पेलवत हे ! या स्मृती अशाच येत जात राहिल्या तर मी वेडा होऊन जाईन. नाही नाही, विस्मरण हे खरोखर वरदान आहे. अन्यथा या अनंत जन्मांच्या स्मृतींनी जीवनातल्या एका एका गोष्टीचा आनंद नाश करून टाकला असता ! कोणताच अनुभव निखळ, पूर्वग्रह-विरहित पणे घेणे अशक्य करून टाकले असते !
..नाही, गुरुदेव, मला माझी पूर्वीची विस्मृती हवी आहे !'
'..तसेच होईल. अरे, आपण मर्त्य आहोत, म्हणून नवीन आयुष्याची मजा आहे. अमरतेचे दु:ख एखादा अश्वत्थामाच जाणे !
...तर मग चल, हो तयार ! डोळे मिट.'
अर्णवने डोळे मिटताच श्री श्री गुरुदेवांनी क्षणभर स्वत:ही डोळे मिटून गळ्यातल्या रुद्राक्षमाळेला स्पर्श केला. मग डोळे उघडून ते अर्णवपाशी आले. त्याच्या मस्तकावर हात ठेवून उभे राहिले. मग एक दीर्घ उसासा सोडून त्यांनी हात काढला अन अर्णवच्या कानशिलावर एक टिचकी मारली अन मानेची शीर दाबली. अर्णव काहीसा कण्हला.
एक मिनिटाने गुरुदेवांनी त्याला डोळे उघडायला सांगितले.
किंचित हसून ते म्हणाले,
'इट'स ऑल ओके नाऊ ! जा तुम्ही. सगळे ठीक होईल. '
...आणि पुन्हा एकदा अर्णवची सखी विस्मरणशक्ती त्याची अनुगामिनी झाली!
(समाप्त)
प्रतिक्रिया
12 May 2014 - 9:39 pm | पैसा
विस्मरण हे खरेच वरदान असते अनेकदा!
12 May 2014 - 9:55 pm | विजुभाऊ
पैसा तै बरोबर आहे.
विस्मरन हे वरदान आहे.
माझ्या पहाण्यात अशी एक केस आहे. त्या व्यक्तीला विस्मरण शिकण्यासाठी मेडीटेशन ची मदत घ्यावी लागली..
13 May 2014 - 12:20 am | आत्मशून्य
Not as clever as it tried to be. However not an exactly bad attempt either. My best for further writting.
13 May 2014 - 12:32 am | दिपक.कुवेत
चला अर्णव बरोबर आम्हिहि सुटलो. कथा अतीशय आवडली. परत येउदै अशीच एखादि फँन्टसी
13 May 2014 - 9:55 am | प्रचेतस
फॅण्टसी अतिशय आवडली.
14 May 2014 - 10:03 pm | सखी
फॅण्टसी अतिशय आवडली. लिहीत रहा.
13 May 2014 - 10:37 am | स्पंदना
आता खाईल परत शिव्या बायकोच्या हे विसरल अन ते विसरल म्हणुन.
काय एव्हढ सोन्यासारख घबाड गवसल होतं, पण म्हणतात ना देव आला द्यायला अन कर्म ...
मस्त हो स्नेहांकिता. छान झाली ही कथा मालिका.
13 May 2014 - 10:50 am | ज्ञानोबाचे पैजार
मस्त खिळवून ठेवणारी गोष्ट आणि शेवट विषेश आवडला.
13 May 2014 - 1:25 pm | पिलीयन रायडर
छान लिहीलयंस गं! आवडलं..
13 May 2014 - 2:39 pm | प्यारे१
>>> अरे, आपण मर्त्य आहोत, म्हणून नवीन आयुष्याची मजा आहे. अमरतेचे दु:ख एखादा अश्वत्थामाच जाणे !
बेष्टच.
अॅनालिसिस ओझरतं वाचलं. गरजच नाहीये त्याची!
काळ हेच औषध म्हणताना आपण विस्मरण हाच आधार त्यामागं धरत असतो. विस्मरण झालंच नाही तर काय उपयोग ना.
'ए, माझा चष्मा कुठं ठेवलाय गं??????????'
13 May 2014 - 3:24 pm | आत्मशून्य
४ बोतल बैद्यनाथ शंखपुष्पी एका दमात पिउ गेलो ना... आता मला अतिशय दिव्य अनुभवाला सामोरे जावे लागत आहे. बघुया डॉक्टर केंव्हा डिस्चार्ज देतात ते.
13 May 2014 - 3:27 pm | कवितानागेश
धत्तेरेकी!! घाबरला का शेवटी?! ;)
13 May 2014 - 9:35 pm | सस्नेह
अंहं ! शहाणा झाला ! *smile*
14 May 2014 - 12:35 am | आयुर्हित
खुप छान प्रकारे सउदाहरण "प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम हे स्मृतींचे तीन प्रकार" सान्गितले आहेत.
मै तो फिदा हो गया आपके स्टाइलपे. कीप इट अप!
असे ज्ञानवर्धक लेख अजुन येवु द्यावेत, ही अपेक्शा.
अवान्तरः स्मृती वाढविण्यासाठी, मेन्दुचा सुयोग्य वापर होण्यासाठी नवीन सन्शोधन हाती आले आहे.
लहान मुलान्ना अभ्यासात लक्श केन्द्रीत होण्यासाठी, डोके शान्त करण्यासाठी,ह्स्ताक्शर सुधरविण्यासाठी याचा खुप चान्गला उपयोग होतो.
14 May 2014 - 11:11 pm | तुमचा अभिषेक
छान आहे कथा, एका दमात सगळे भाग वाचले.
17 May 2014 - 2:50 pm | सस्नेह
च्या सर्व वाचक आणि प्रतिसादकांना धन्यवाद !
फँटसी (मराठी शब्द ?) या प्रकारावर मराठीत फार कमी लेखन उपल्ब्ध आहे, तथापि, हा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा आवडीचा विषय. विशेषतः विज्ञान कथा.
या विषयावर लिहिण्याचे फार दिवसांपासून मनात घोळत होते. पण असा विषय हाताळणे जमेल का ही शंका होती. यापूर्वी 'मनरक्षिता' मध्ये असा प्रयत्न केलाही होता.
अर्थात प्रत्यक्ष व्याप्ती रेखित करणे मला शंभर टक्के जमले आहे असे अजुनी वाटत नाही.
'लिहित रहा' या संदेशातून पुढे लिहिण्याची उमेद आली आहे.
पुन्हा एकदा धन्यवाद.
17 May 2014 - 3:23 pm | आत्मशून्य
आत्ताच वाचुन काढली. लेखीका म्हणून तगडे पॉटेन्शीअल आहे तुमच्या कडे. म्हणून एक टीप देतो.
सध्याच्या मनोरंजन क्षेत्राचा "एलेमेंट ऑफ सप्राइज" हा किवर्ड आहे. (जसे शारुख तरुण असताना "कॅच देम यंग" किवर्ड होता.) थोडक्यात कथानकात सातत्याने धक्का देत रहायचे. वाचक आहेत याच अर्थच वाचन करणारे आहे. म्हणूनच अनुभवातुन अचुक ठोकताळे बांधण्यात ते निष्णात आहेत म्हणुनच त्यानी अंदाज केले आहेत ते सतत चुकवत न्हेत. कथा पुढे ढकलायची (रंजकता न गमावता).
जसे इथे शेवट काय आहे सगळ्यांना माहित आहे की अर्णवला सुपर पॉवर नकोत. पण नेमका हाच गेस चुकवुन शेवट लिहता आला तर (रंजकता न गमावता) ? आहेत अनेक ऑप्शन आहेत, जस्ट इग्नोर दी ओब्वीअस. लेखीका म्हणून कथाकथानावर आपले सुरेख प्रभुत्व आहे यात शंकाच नाही पण थोडे अशा गोश्टींकडे लक्ष दिले तर आपली प्रतिभा द्रुश्ट लागावी इतकी उंचावु शकते असा विश्वास वाटतो ज्यात पुन्हा वाचकांचाच आनंद सामावलेला आहे.