अशीच एक फँटसी..(१)

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
21 Mar 2014 - 10:49 pm

शॉपिंग मॉलचा मधला जिना चढताना अर्णवने आधी शर्टचा अन मग पँटचे दोन असे तीनही खिसे नीट तपासले. तिथे ती यादी नसल्याचे लक्षात आल्यावर त्याने आपले डोके तीन वेळा झटकले. मग त्याच्या (म्हणजे डोक्याच्या) मागच्या भागावर पालथ्या मुठीने तीन खारका मारल्या.
..इतके करून झाल्यावर त्याला पक्के कळून चुकले की सामानाची यादी खिशातून अन उर्मीने आणायला सांगितलेली तेरावी ( की सतरावी ?)वस्तू त्याच्या आठवणीतून, नेहमीप्रमाणे, हद्दपार झाली आहे. बास्केटमधल्या इतर सगळ्या वस्तूंचे बिल चुकते करून तो मॉलच्या बाहेर पडला तेव्हा 'हे राम..!' हे उद्गार त्याच्या तोंडून बाहेर पडले, आणि घरी जाईपर्यंत रामाच्या जागी 'दुर्गे दुर्घट भारी...' सुरु झाले होते.
अपार्टमेंटचे दार उघडताना त्याच्या चेहेऱ्यावर पुरते बारा वाजलेले पाहून उर्मि समजायचे ते समजली.
'हं, आज काय विसरलास ?'
'अगं, तुझी लिस्ट...'
'म्हणजे लिस्टच विसरून मार्केटात गेलास ? ..गुरुदेव , ..! '
'आता इथे तुझे कृष्णदेव स्वामी काय करणारेत ? मला कानात सांगणारैत का, तेरावी वस्तू कोणती ते ? आणि हो, इतका काही मी हा नाहीये ..बारा वस्तू आणल्याहेत बरं ! पण नंतर ती साली यादीच कुठे विसरली...'
लक्ष्मी अन अवदसा जोडीने याव्या, तशा चतुरस्र बुद्धी अन विस्मृती या दोघी अर्णवच्या बालपणापासूनच्या सख्या . ही विस्मरणशक्ती अशी अजब , की अभ्यासाच्या पुस्तकात लिहिलेल्या किचकट शब्दपंक्ती, सूत्रे अन प्रमेये त्याच्या डोक्यात फेविकॉल लावल्यासारखी घट्ट बसत, पण व्यवहारातल्या गोष्टी मात्र, सतरा ठिकाणी गळती लागलेल्या , नगरपालिकेच्या पाईपलाईनमधील पाण्यासारख्या गळून जात.
डिग्री परिक्षेत ब्याण्णव टक्के मार्क पडले त्यापूर्वी एके दिवशी पार्टनरने आपला शर्ट घातला आहे, हे लक्षात न येऊन अर्णवने त्याला 'वॉव, काय क्लास शर्ट आहे, कुठे मिळाला ?' असे विचारून गार केले होते. आणि, दोन वेळा वधू-वर परिक्षा होऊन प्रकरण एंगेजमेंटच्या पायरीवर असताना , एकदा अचानक घरी आलेल्या उर्मिला, 'कोण पाहिजे ?' असे विचारून त्याने गरम केले होते. आणखी एकदा, वाहतूक पोलिसाने विचारल्यावर त्याला आपल्या कारचा नंबर खाली उतरून पाहावा लागला होता.
यथावकाश लग्न वगैरे पार पडल्यावर त्याच्या बौद्धिक अन व्यावहारिक स्मरणशक्तींमधला फरक वाढतच गेला. ऑफिसात मोबाईल, कम्प्यूटरचा पासवर्ड, घरी पाकीट, कपाटाच्या अन कारच्या किल्ल्या, बॉसच्या केबिनमध्ये जाताना त्याला हवी असलेली फाईल, अशा बारीकसारीक वस्तू नेहमी विसरता विसरता एक दिवशी तो जेव्हा बाजारातून येताना, बाईकच्या मागच्या सीटवर बसलेल्या अन भाजी घ्यायला खाली उतरलेल्या उर्मिलाच विसरला, तेव्हा मात्र त्या दक्ष गृहिणीने त्याची स्मृती सुधारण्याचे भक्कमपणे मनावर घेतले.

उर्मिचे गुरु श्री श्री श्री स्वामी कृष्णदेव बाबा यांच्या अध्यात्मिक अधिकाराचा देशभरच नव्हे, तर परदेशातही बोलबाला होता. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अन वक्तव्याचा समोरच्या दर्शनार्थींवर लांबरुंद अन खोल परिणाम होत असे, हे अर्णवने अनेकदा दूरदर्शन वाहिन्या अन वर्तमानपत्रातल्या कात्रणातून पाहिले अन वाचले होते. अनेकदा तो उर्मिसोबत तिच्या आग्रहास्तव त्यांच्या दर्शनाला गेला होता, तेव्हा चक्षुर्वैसत्यम पाहिलेही होते. उर्मिचे दिवसाचे किमान चार तास योग, चित्तशुद्धी, प्राणायाम, गुरुपूजा, इ. खटापटीत खर्च होत असत. (याला 'साधना' असे हुच्च नाव आहे, असे लग्नानंतर उर्मीच्या दीर्घकाळाच्या सहवासाने त्याला समजले होते. ) पण गुरुदेवांच्या कृपादृष्टीखालून तीन वेळा जाऊनही त्यांच्या अध्यात्मिक वजनाने अर्णवच्या रजोगुणाचा काटा मात्र अजुनी मुमुक्षुते कडे ढळला नव्हता.
'योग' अन 'रोगचिकित्सा', 'देहशुद्धी' अन 'परमार्थबुद्धी' , 'ब्रम्ह', 'माया' अन 'आत्मा' या विषयांवरचे गुरुदेवांचे प्रभुत्व त्यांच्या वाणीतून पाझरताना भले भले गुंग होऊन बोटे तोंडात घालीत असत.
...त्यांना आत्मदर्शन झाले आहे, इतकेच नव्हे तर 'स्व' ही गवसला आहे, अशी बोलवा होती !
कोणत्याही समस्येचे उत्तर शोधण्याची उर्मिची पेटंट किल्ली म्हणजे गुरुदेव कृष्णदेवस्वामी ! तिने लागलीच गुरूदेवांची रीतसर अपॉइंट्मेंट घेतली अन रविवारच्या सुप्रभाती ती पतीदेवास घेऊन गुरुदेवांच्या अत्याधुनिक व्हिलात हजर झाली तेव्हा श्री श्री श्री स्वामी कृष्णदेव, 'गुरुदेव' समाजातील लेटेस्ट फॅशन प्रमाणे डार्क ब्ल्यू जीन्स अन व्हाईट टी शर्ट घालून सस्मित मुद्रेने बंगल्यासमोरच्या हिरवळीवर इझी चेअर वर बसून भक्तांवर कृपा करण्याचे सत्कार्य करीत होते.
पतिदेवाचे बोचके गुरुदेवांच्या पायावर घालून तिने समस्या मांडली.
'स्वामीजी, याचा इलाज आपल्याशिवाय दुसरं कुणीच करू शकणार नाही ! कृपा करावी..'
अर्णवची विचित्र समस्या ऐकून गुरुदेव जरा गंभीर झाले. त्यांनी अर्णवला जवळ बोलावले. तो गुडघे टेकून त्यांच्यासमोर बसल्यावर त्यांनी प्रथम त्याच्या दोन्ही कानशिलांवर बोटे ठेवून तपासले. मग भ्रूमध्यावर तर्जनी टेकली अन नंतर दोन्ही अंगठ्यांनी मानेवर मज्जारज्जुच्या दोन बाजूना दाब दिला. मग अर्णवला खुर्चीवर बसायला सांगून त्यांनी डोळे मिटले. बरोब्बर दोन मिनिटांनी त्यांनी डोळे उघडले तेव्हा त्यांची मुद्रा पूर्ववत सस्मित झालेली होती.
'होईल...तुझी स्मरणशक्ती दुरुस्त होईल !' ते म्हणाले,
'पण मी सांगेन तसे अचूक करायला हवे. आहे तयारी ?'
'आहे, म्हणजे काय, आहेच..!!' अर्णव काही बोलायच्या आधीच घाईघाईने उर्मि म्हणाली.
अर्णवने जरा वैतागूनच तिच्याकडे पाहिले. च्यायला, कसलीतरी अचाट 'साधना' तर नाही ना गळ्यात पडणार ?
'अं, म्हणजे नक्की काय करायचे ?' त्याने जरा साशंकतेने विचारले.
'तुझ्या स्मरणकेंद्राचे 'सेटिंग' जरा सरकले आहे , तुझ्या जन्मापासूनच. ते अ‍ॅडजस्ट करावे लागेल. स्मरणकेंद्र अन एकूणच मेंदूतील सर्व केंद्रांचा तोल अतिशय नाजूक असल्याने हे काम करताना अ‍ॅक्युरसी राखणे आवश्यक आहे. नाहीतर वेगळीच समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. ..'
'बापरे !' अर्णवची साशंकता चार डिग्रीने वाढली अन त्यात सुमारे दहा ग्रॅम भीतीची भर पडली.
'घाबरू नको. ते काम मी मोहिनीद्वारे व्यवस्थित करेन. पण ते करण्यापूर्वी तुझ्या आज्ञाचक्र अन सहस्रारचक्राची शुद्धी करावी लागेल. ..'
'हां, हां.. मग करा ना.' अर्णवला जरा हुश्श झाले.
'नाही, शुद्धी तूच करायची आहेस. मी फक्त सेटिंग करून देणार.' गुरुदेव.
'..??'
'हे बघ, तुला फार काही नाही करावे लागणार. एक आठवडा रोज सकाळी पाच मिनिटे शीर्षासन करायचे अन त्यानंतर तीन मिनिटे अनुलोम-विलोम. आणि या काळात नॉनव्हेज, ड्रिंक्स आणि सेक्स एकदम बंद ! अन मग रविवारी माझ्याकडे येण्यापूर्वी शनिवारी मी देतो तो काढा सकाळी, दुपारी अन संध्याकाळी असा तीन वेळा अर्धा अर्धा कप घ्यायचा. बस्स !'
'इतकेच ?'
'इतकेच !' गुरुदेव सस्मित.
'मग सोपेय की ! ' अर्णव खुशाल झाला.
काढ्याची बाटली घेऊन बाहेर पडताना उर्मिच्याही चेहेऱ्यावर समाधान झळकत होते. स्वामीजींच्या 'पॉवर'वर तिचा जबरदस्त विश्वास होता. अर्णवच्या समस्येवर अक्सीर इलाज शोधल्याबद्दल तिने स्वत:ची पाठ अर्णवकडून थोपटून घेतली.
****
यानंतर एक आठवडा उर्मिने अर्णवला शीर्षासन अन अनुलोम विलोम याबद्दल सूचना देऊन देऊन बेजार करून सोडले. त्या सगळ्या दिव्यातून सहीसलामत पार पडल्यावर अर्णव स्वत:वर इतका खुश झाला की शनिवारी हे यश प्रथम 'ला पारीसा'मध्ये अन नंतर बेडरूममध्ये सेलिब्रेट करण्याचा त्याने ठराव मांडला. त्यावर उर्मिने त्याला वेडावत गुरुदेवांच्या 'शर्तीं'ची आठवण करून दिल्यानंतर त्याचा फुगा फट्ट झाला. अन तो नाक फुगवून दिवसभर टीव्हीसमोर बसला. त्यामुळे आपल्याला तीन वेळा अर्धा अर्धा कप काढा घ्यायचा आहे, ही गोष्ट सवयीनुसार तो पार विसरला. इतकेच नव्हे, तर त्याचा कसा पोपट झाला या आनंदात चक्क उर्मिसुद्धा काढ्याबद्दल विसरून गेली.
रात्री अर्णव अंथरुणावर आडवा झाला अन कपाटावर ठेवलेली काढ्याची बाटली त्याच्या नजरेस पडली. त्यासरशी तो तसाच ताडकन उठला. मग काही मिनिटे उर्मि अन अर्णव दोघांच्या जीभा अन कान एकमेकांवर केलेल्या आरोपांचे क्रॉसकनेक्शन्स सोडवण्यात व्यस्त झाले. मग तिरिमिरी आल्यासारखा अर्णव पुन्हा एकदा ताडकन उठला अन त्याने काढ्याची बाटली तोंडाला लावली, ती बॉटम अप करूनच खाली ठेवली !
उर्मि 'आ' वासून त्याच्याकडे पहातच राहिली !
***
दुसऱ्या दिवशी सकाळी नवाच्या ठोक्याला दोघे श्री श्रींच्या समोर होते. सस्मित मुद्रेने गुरुदेवांनी त्यांना सोफ्यावर बसण्यास सांगितले.
'यू नो, माय डिअर गाईज, आपल्या मेंदूचे कार्य अत्यंत गूढ आहे. अजूनही शास्त्रज्ञाना ते पूर्णपणे समजले नाही. त्यातही 'स्मरण' ही अतिशय सूक्ष्म अन गुंतागुंतीची कार्यशृंखला आहे. असे म्हणतात, की इवल्याशा मेंदूमध्ये माहितीचा अतिप्रचंड साठा असतो. तो सर्वांच्या बाबतीत सारखाच असतो. फरक असतो, तो अ‍ॅक्सेस करण्यात !कुणाला तो चटकन सापडतो, कुणाला मुळीच सापडत नाही, तर कुणी त्यातून 'ज्ञान' संकलित करण्यात अपयशी ठरतात.
उदाहरणार्थ, अर्णव तू आता कोणत्या रस्त्याने आलास, येताना तुला आजूबाजूला काय दृश्ये दिसली, रस्त्यावर कोण कोण व्यक्ती होत्या, त्यांचे पोशाख काय होते, इ. सर्व माहिती आत्ता तुझ्या मेंदूत हजर आहे, पण तू प्रयत्न करूनही तुला ते आठवणार नाही. पण मी तुला संमोहनात नेले तर ते तुला सहज सांगता येईल.
तर ही माहिती अ‍ॅक्सेस करण्याची एक ठराविक 'कळ' 'key' प्रत्येकाच्या मेंदुमध्येच आहे. साधनेने कुणीही व्यक्ती ती शोधून काढू शकते. योग्यांना ते सहजसाध्य आहे. ऋतंभरा प्रज्ञा जागृत झाल्यावर ही माहितीपटले व्यक्तीच्या इच्छेनुसार आपोआप उलगडत जातात. पण त्यासाठी साधनाही जबरदस्त लागते.
असो. सध्या तुझ्या बाबतीत आपण एवढेच करणार आहोत की ती कळ शोधून तिचे सेटिंग थोडेसे वाढवणार आहोत, ज्यामुळे व्यवहारातल्या साध्या साध्या गोष्टी विस्मरणात जाणे बंद होईल. खरं म्हणजे हे तुझे तूच करणार आहेस. मी फक्त तुला कळ शोधायला मदत करणार आहे..अर्थात संमोहनात नेऊन.
गेल्या सात दिवसातल्या योग अन इतर शुद्धीमुळे तुझ्या चित्तवृत्ती काहीशा धारदार झाल्या असल्याने ती कळ शोधणे तुझ्या अंतर्मनाला सहज शक्य होईल.'
इथे अर्णवला एकाच वेळी घेतलेल्या औषधाच्या तीन डोसची आठवण झाली. तो घाईघाईने त्याबद्दल स्वामीजींना सांगणार होता. इतक्यात उर्मिने त्याला डोळ्यांच्या इशाऱ्याने गप्प राहण्याबद्दल खुणावले.
मग स्वामीजींनी आपले प्रास्ताविक आटोपते घेतले अन उठून अर्णवच्या खुर्ची जवळ आले.
गळ्यातले स्फटिकाचे पदक काढून त्याच्या समोर धरले अन त्यावर नजर स्थिर करण्यास सांगितले. काही मिनिटांनी त्याने डोळे मिटले, तसे पदक पुन्हा गळ्यात घालून स्वामीजींनी एक हात अर्णवच्या टाळूवर ठेवला अन काही सेकंद शांत उभे राहिले. मग हात काढून दोन्ही हाताचे अंगठे अर्णवच्या कपाळावर ठेवून हलकेच दाब दिला. अन अखेर दोन्ही हातांनी त्याच्या खांद्यावर हळूच थोपटले. त्यासरशी अर्णवने एकदम डोळे उघडले.
'yes, it's quite OK now ! आता तुझी स्मरणशक्ती तुला दगा नाही देणार !' गुरुदेव सस्मित मुद्रेने वदले.
'झाले ?' अर्णव अन उर्मि दोघेही एकदमच अविश्वासाने म्हणाले.
'हो.'
अर्णवला तर काहीच फरक वाटेना.
गुरूदेवांची पाच हजाराची भक्कम गुरुदक्षिणा चुकती करून दोघे बाहेर पडले तेव्हा उर्मि काहीशी हिरमुसलेली अन अर्णव तिची खरडपट्टी काढण्याच्या मनस्थितीत होता. बाकी, काही झाले न झाले तरी श्री श्रींच्या वाक-चातुर्याबद्दल मात्र अर्णव एकदम नि:शंक झाला.
दुपारच्या जेवणानंतर मात्र उर्मिची अन त्याची दिलजमाई झाली अन मग सकाळचे सगळे मनापासून विसरून दोघांनी उरलेला रविवार मस्त एन्जॉय केला !
***
(क्रमश: )

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

21 Mar 2014 - 10:56 pm | मुक्त विहारि

झक्कास....

क्रमशः कशाला?

सखी's picture

21 Mar 2014 - 11:16 pm | सखी

खुसखुशीत झालीये फॅन्टसी, तीनदा श्री श्री श्री बघुन वेड्यासारखी हसत होते हाफीसात....लवकर येऊ देत पुढचे भाग स्नेहांकिता!

आयुर्हित's picture

21 Mar 2014 - 11:30 pm | आयुर्हित

बहुतेक पुरुषांना अर्णवचीच सवय असते, अगदी सामानाची यादी कोठे ठेवली आहे हे देखील विसरतात!
इतकी perfect(हुच्च)निरीक्षणे,इतक्या सक्षम शब्दांत मांडता येणे आपला एक strong point आहे हे मानायलाच हवे!

हा लेख वाचतांना एका वेगळ्याच दुनियेत(फँटसीत) फिरत होतो.म्हणजे हा या लेखाचा व लेखिकेचा विजय आहे.
अभिनंदन!

आत्मशून्य's picture

21 Mar 2014 - 11:32 pm | आत्मशून्य

उर्मिची अन
त्याची दिलजमाई झाली अन मग सकाळचे सगळे
मनापासून विसरून दोघांनी उरलेला रविवार मस्त एन्जॉय
केला !

यप...! साउण्ड्स इंटरेस्टिंग. मस्त सुरवात. आणि सुरुवातिचाच शेवट न केल्याबद्दल कोटि कोटि आभार्स. पुभाप्र.

आदूबाळ's picture

21 Mar 2014 - 11:36 pm | आदूबाळ

भारीच! पुढचा भाग लवकर लिहा.

-
हा पारबल्येम थोडा माझाही आहे. मलाही श्री श्री श्री स्वामी कृष्णदेव बाबा यांचा पत्ता द्या ;)

अर्धवटराव's picture

22 Mar 2014 - 1:20 am | अर्धवटराव

उन्हाळ्याच्या दिवसांत मस्त संध्याकाळी रमतगम फिरायला जावे व फस्क्लास बटरस्कॉच आईस्क्रीमचे स्कूप रिचवावे असं काहिसं वाटलं एकदम सुगंधी, गोडगोड आणि गारेगार. :) विनोदाच्या चारोळ्यांनी चवीत भर घातली.
पु.भा.प्र.

प्रचेतस's picture

22 Mar 2014 - 8:58 am | प्रचेतस

मजा आली वाचून.
पुभाप्र.

ज्ञानोबाचे पैजार's picture

22 Mar 2014 - 9:19 am | ज्ञानोबाचे पैजार

ओके,गुड,
आता पुढे काय होणार ते लवकर टाका

खटपट्या's picture

22 Mar 2014 - 12:38 pm | खटपट्या

आवडला

विजुभाऊ's picture

22 Mar 2014 - 2:47 pm | विजुभाऊ

नस्त लिहीलय.
झकास
पुढील भागाच्या प्रतीक्षेत

मधुरा देशपांडे's picture

22 Mar 2014 - 5:31 pm | मधुरा देशपांडे

मस्त. पुभाप्र

अनन्न्या's picture

22 Mar 2014 - 6:11 pm | अनन्न्या

पुढचा भाग लवकर टाक.

रेवती's picture

22 Mar 2014 - 8:33 pm | रेवती

ही ही ही. मनोरंजक लेखन.

स्पंदना's picture

23 Mar 2014 - 3:37 am | स्पंदना

आणि घरी जाईपर्यंत रामाच्या जागी 'दुर्गे दुर्घट भारी...' सुरु झाले होते.

येथुन जे हसायला सुरवात झाली ते काही थांबेना.
शब्द संपत्ती अतिशय समृद्ध आहे स्नेहांकिता. येउ दे,

प्यारे१'s picture

24 Mar 2014 - 3:22 am | प्यारे१

खुसखुशीत.

पु भा प्र

सुहास..'s picture

24 Mar 2014 - 8:18 am | सुहास..

कल्लास !!

मजेशीर

मृत्युन्जय's picture

24 Mar 2014 - 12:39 pm | मृत्युन्जय

मस्तच. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत. पुढचा भाग पहिला जिथे संपला तिथुनच पुढे सुरु होणार ना की थोडे आधीपासुन? ....

पैसा's picture

28 Mar 2014 - 5:39 pm | पैसा

मजा आली वाचताना!

किसन शिंदे's picture

28 Mar 2014 - 7:52 pm | किसन शिंदे

खुसखूशीत लेखन!

मनीषा's picture

28 Mar 2014 - 10:04 pm | मनीषा

तर ही माहिती अ‍ॅक्सेस करण्याची एक ठराविक 'कळ' 'key' प्रत्येकाच्या मेंदुमध्येच आहे. साधनेने कुणीही व्यक्ती ती शोधून काढू शकते. योग्यांना ते सहजसाध्य आहे. ऋतंभरा प्रज्ञा जागृत झाल्यावर ही माहितीपटले व्यक्तीच्या इच्छेनुसार आपोआप उलगडत जातात. पण त्यासाठी साधनाही जबरदस्त लागते.

अस्सं..!?

गेल्या सात दिवसातल्या योग अन इतर शुद्धीमुळे तुझ्या चित्तवृत्ती काहीशा धारदार झाल्या असल्याने ती कळ शोधणे तुझ्या अंतर्मनाला सहज शक्य होईल.'

भारी...

फॅट्सी (२) च्या प्रतिक्षेत.

नाखु's picture

29 Mar 2014 - 9:26 am | नाखु

दिलजमाई...पु.भा.प्र.