शिव: मूर्तीशास्त्र

Primary tabs

प्रचेतस's picture
प्रचेतस in जनातलं, मनातलं
19 Jan 2014 - 6:04 pm

भारतात जे दैवत सर्वाधिक पुजले जाते ते म्हणजे शिव. शिव हा दोन्ही प्रकारे पुजला जातो. लिंग स्वरूपात आणि मूर्त स्वरूपात.

लिंग पूजा ही पार सिंधू संस्कृतीपासून पाहण्यात येते. अर्थात त्याकाळी लिंग पूजा ही शिव अथवा रूद्र देवतेची नसून ती होती प्रजनन शक्तीची. निसर्गाच्या पुनरुत्पादनाच्या चमत्काराचे प्रतिक म्हणून स्त्रीशक्तीची उपासना योनीपूजेच्या स्वरूपात तर पुरुष शक्तीची उपासना लिंग स्वरूपात करण्यास प्रारंभ झाला असे म्हणता यावे. पुढे वैदिक आर्यांनी ह्या दोन्ही पूजांना आपल्यात सामावून घेत शिव व शक्ती यांच्या उपासनेच्या प्रथा रूढ केल्या.

वेदांमध्ये शिवलिंगाचे वर्णन कुठे येत असल्याचे मला ठाऊक नाही पण रूद्राचे वर्णन मात्र येते. हा रूद्र मूळचा अनार्य. वैदिकांनी तो आपल्यात सामावून घेतला पण आजही कुठेतरी त्याचे मूळचे अनार्य स्वरूप आपल्याला भैरव, वीरभद्र आदी रूपांमध्ये दिसून येते. ह्या रूद्रालाच नंतर शिव समजले जाऊ लागले.

ऋग्वेदात रूद्राचे वर्णन पुढीलप्रमाणे येते.

ऋग्वेद मंडळ १, सूक्त ४३

गाथपतिं मेधपतिं रुद्रं जलाषभेषजम |
तच्छंयोः सुम्नमीमहे ||
यः शुक्र: इव सूर्य: हिरण्यमिव रोचते |
श्रेष्ठ: देवानां वसुः ||
शं नः करत्यर्वते सुगं मेषाय मेष्ये |
नर्भ्यो नारिभ्यो गवे ||

सर्व स्तुतींचा नाथ, सर्व यागांचा स्वामी, व जलौषधींचा प्रभु असा जो रुद्र त्याचेजवळ स्वकल्याणेच्छु भक्त जे धन मागतो, त्याच धनाची आम्ही याचना करतो.
हा देवांचे श्रेष्ठ वैभव असून, ह्याचें तेज देदीप्यमान सूर्याप्रमाणें व कांति सुवर्णाप्रमाणें आहे.
हा आमचा अश्व, आमचा मेंढा, मेंढी, आमचे नोकर, दासी व धेनु ह्यांना उत्तम रीतीने आनंदांत राहतां येईल असे करतो

ऋग्वेद मंडळ २, सूक्त ३३

स्थिरेभिरङगैः पुरुरूप उग्रो बभ्रुः शुक्रेभिः पिपिशेहिरण्यैः |
ईशानादस्य भुवनस्य भूरेर्न वा उ योषद्रु॒द्रादसु॒र्यम् ॥
अर्हन् बिभर्षि सायकानि धन्व अर्हन् निष्कं यजतं विश्व:रूपं ॥
अर्हन् इदं दयसे विश्वं अभ्वं न वै ओजीयः रुद्र त्वत् अस्ति ॥

नानाप्रकारची रूपें धारण करणारा, उग्र व जगाचा आधार अशा भगवान् रुद्राची अंगयष्टि अत्यंत सुदृढ असून त्या आपल्या शुभ्रतेजस व सुवर्ण स्वरुपानेंच तो फार शोभिवंत दिसतो. सर्व भुवनांची समृद्धि, आणि सर्व भुवनांचा प्रभु अशा ह्या भगवान् रुद्रापासून त्याचे ईश्वरी सामर्थ्य दूर झालें असें कधींही होत नाहीं.
तूं हातांत धनुष्यबाण घेतले आहेस ते तुलाच शोभतात, तर्‍हेतर्‍हेचे स्वच्छ आणि पवित्र पुष्पहार तू घातलेले आहेस तेही तुलाच शोभतात. हें विश्व येवढें अवाढव्य व भयंकर पण त्याच्यावरही तूं दया करतोस ही थोरवी तुझीच. कारण हे रुद्रा, तेजस्वीपणांत तुझ्यापेक्षां वरचढ असा कोणी आढळणारच नाही.

ऋग्वेद मंडळ ७ सूक्त ४६

मा नः वधीः रुद्र मा परा दाः मा ते भूम प्रऽसितौ हीळितस्य
आ नः भज बर्हिषि जीव:शंसे यूयं पात स्वस्तिऽभिः सदा नः ॥

आम्हाला मारू नको आणि दूर टाकून किंवा परक्यांच्या हातांतही देऊन टाकू नकोस. अथवा आमचा पराभव करू नकोस. तुझ्या क्रोधरूपाच्या पापरूपी बंधनांत आम्ही बद्ध न होऊं. हविचा स्वीकार कर. तुम्ही सदा सुवचनांनी आमचा प्रतिपाळ करा.

नमुन्यादाखल दिलेल्या वरील सूक्तांमध्ये रूद्राचे मूळचे अनार्य स्वरूप त्याच्या क्रोधरूपाने प्रकट होत्सेते दिसते.

रूद्राचे जसे भयानक म्हणून वर्णन आले आहे त्याच प्रमाणे तो भयनाशक अथवा कल्याणकारक असल्याचेही वर्णन ऋग्वेदांत आलेले आहे. जलाषभेषज अथवा जलौषधींचा प्रभू असे रूद्राला मानले गेले आहे. रूद्राला शिवाचे स्वरूप कधी आले ते नेमके सांगता येत नाही मात्र हा बदल वेदोत्तर काळात घडला आणि गुप्तकाळापासून (इ.स.३५०-५००) शिवाला आजचे स्वरूप प्राप्त व्हायला सुरुवात झाली असे म्हणावयास हरकत नाही.

अर्थात हा लिंग,, रूद्र, शिव हा बराच मोठा विषय असून ह्याच्या फारश्या खोलात न जाता आपण आता शिवलिंगे आणि शिवमूर्तींचे मूर्तीशास्त्राच्या दृष्टीने काही प्रकार बघूयात.

शिवलिंगे

शिवलिंगाची रचना सर्वसामान्यपणे शाळुंका अथवा योनी व त्यामध्ये लिंग अशा प्रकारची असते. ह्यालाच सयोनीज शिवलिंग असे म्हणतात. हे आपल्या नेहमीच्या माहितीतले शिवलिंग.

पिंपरी दुमाला येथील यादवकालीन मंदिरातील सयोनीज शिवलिंग.
a

आता आपण यातील काही भन्नाट प्रकार पाहूयात. यातील काही प्रकार पूर्वीच माझ्या पाटेश्वर मंदिरावरील लेखात आलेलेच होते.

१. एकमुखलिंग

यामध्ये शिवलिंगावर एक मुख कोरलेले असते.

पाटेश्वर येथे अशा प्रकारचे एक शिवलिंग आहे. ह्या एकमुखलिंगाभोवती लहान लहान अयोनीज लिंगांनी फेर धरलेला आहे.

पाटेश्वर येथील एकमुखलिंग
a

२. चतुर्मुखलिंग

यातील शिवलिंगावर चार मुखे कोरलेली असतात. सर्वसाधारणपणे ही चार मुखे म्हणजे शिवाची चार रूपे असतात. अघोर, उष्णीषिन्. योगी आणि स्त्री.
महाभारतातल्या अनुशासनपर्वातील उमामाहेश्वर संवादानुसार तिलोत्तमा नावाच्या अत्यंत सुंदर अप्सरेला आपल्या भोवती फिरताना पाहून तिच्या फिरण्याच्या दिशेप्रमाणे शंकराला चार मुखे उत्पन्न झाली. तसेच त्यात शंकर पुढे म्हणतो की पूर्वेकडील मुखाने मी इंद्रपद भोगतो, उत्तरेकडील मुखाने मी तुझ्याशी रतीक्रिडा करतो, पश्चिमेकडील मुखाने मी सर्व प्राण्यांना सुख देतो तर दक्षिणेकडील मुखाने मी रौद्र असून त्याद्वारे मी संहार करीत असतो.

तर काही संशोधकांच्या मते ही चार मुखे म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि सूर्य ह्यांची प्रतिके असतात.

पाटेश्वर येतीलच चतुर्मुखलिंग.

a

३. दिक्पालरूपी शिवलिंग.

हे ही शिवलिंग पाटेश्वर येथीलच आहे. यात शाळुंकेवरील शिवलिंगाभोवती चक्र, चांदणी, बदाम यांच्या आकृत्या आहेत. एकूण दहा चिन्हे यावर कोरलेली आहेत. यातील आठ चिन्हे म्हणजे अष्टदिक्पालांचे प्रतिक असावे तर उरलेली दोन सूर्य आणि विष्णूची प्रतिके असावीत.

a

४. अष्टोत्तरशत लिंग.

अष्टोत्तरशतलिंगामध्ये सर्वसाधारणपणे मुख्य लिंगावर लहान लहान अशी १०८ अयोनीज शिवलिंगे कोरलेली असतात.

पाटेश्वर येथील अष्टोत्तरशत लिंग
a

५. सहस्त्रलिंग

सहत्रलिंगांमध्ये सर्वसाधारणपणे मुख्य लिंगावर लहान लहान अशी १००० अयोनीज शिवलिंगे कोरलेली असतात.

पाटेश्वर येथीलच अजून एक सहस्त्रलिंग

a

६. कोटीलिंग

हा प्रकार पण सहस्त्रलिंगासारखाच पण यातील अयोनीज लिंगांची संख्या हजारापेक्षाही अधिक असते तेव्हा त्याला कोटीलिंग म्हणतात.

पाटेश्वर येथील कोटीलिंग
a

शिवलिंगांचे ढोबळमानाने काही प्रमुख प्रकार आपण बघितलेच. पाटेश्वरला यापेक्षाही अधिक प्रकारची लिंगे आहेत पण ती याधीही लेखात येऊन गेलेलीच आहेत आणि त्यातील बरीचशी तांत्रिक पंथाशी संबंधित आहेत म्हणूनच आता यावर अधिक काही न लिहिता आपण शिवमूर्तींकडे वळूयात.
यातील बहुतेक शिवमूर्ती वेरूळ येथील लेण्यांत आढळतात. वेरूळ लेण्यांविषयीच्या अधिक माहितीविषयी माझी वेरूळ लेणींविषयीची लेखमाला पाहावी.

शिवमूर्ती

सर्वसाधारणपणे शिवमूर्तींची मांडणी म्हणजे चार हात, हाती डमरू, त्रिशुळ, कमंडलु, अक्षमाला, गळ्यात नाग, वाहन नंदी अशी. पण शिवमूर्तींचेही अनेक प्रकार आहेत त्यातील काही मोजके प्रकार आता येथे बघू.

यातील पहिलीच मूर्ती पाहूयात ती लिंगोद्भव शिवाची.
ही मूर्ती लिंग आणि मूर्ती अशा दोन्ही प्रकारांत गणली जाते.

१. लिंगोद्भव शिव.

एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांत श्रेष्ठत्वावरून वाद निर्माण झाला. तेव्हा एक दैदिप्यमान अग्निस्तंभ प्रकट झाला. याचा आदी आणि अंत जो शोधून काढेल तो श्रेष्ठ असे ठरले. विष्णू वराहाचे रूप घेऊन पाताळ शोधायला गेला तर ब्रह्माने हंसरूप घेऊन आकाशात मुसंडी मारली. जेव्हा कुणालाही कसलाही थांग लागेना तेव्हा ते दोघेही शिवाला शरण गेले तेव्हा दोघेही आपापल्या परीने श्रेष्ठ आहेत असे सांगून शिवाने लिंगोद्भव स्वरूपात आपले रूप प्रकट केले.

वेरूळ कैलास लेण्यातील लिंगद्भव शिवप्रतिमा
a

पुण्यातील त्रिशुंड गणेश मंदिरातील लिंगोद्भव प्रतिमा. a

२. लिंगिन शिवमूर्ती

हा एक शिवमूर्तीचा आगळावेगळा प्रकार. सर्वसाधारणपणे ही मूर्ती उमामाहेश्वर प्रकारात दिसते. यात शिवाने शिवलिंग धारण केलेले दिसते. यालाच लिंगायत मूर्ती असेही काहीजण म्हणतात. आजही लिंगायत लोक आपल्याकडे सतत शिवलिंग धारण करत असतात.
उमामाहेश्वर प्रकार (म्हणजे शिव पार्वती यांच्या एकत्रित मूर्ती) यातच अंतर्भूत असल्याने त्याचे वेगळे वर्णन करीत नाही.

वेरूळच्या कैलास लेणीच्या मुख्य प्रवेशद्वारावरील गोपुरावर असणारा हा लिंगिन शिव

a

वेरूळ कैलास लेणीच्याच प्रदक्षिणापथावर असलेला हा लिंगिन शिव
a

प्रदक्षिणापथावरच असलेली लिंगिन शिवाची अजून एक प्रतिमा.
ह्याने आपल्या उजव्या हातातील बोटांमध्ये शिवलिंग धारण केले आहे.

a

३. त्रिमुखी शिव.

ह्याला तीन मुखे असतात. त्रिमुखी शिवाची सर्वात प्रसिद्ध प्रतिमा म्हणजे घारापुरी येथील ब्रह्मा-विष्णू-महेश अशी मानली गेलेली शिवप्रतिमा. वास्तविक ही प्रतिमा ब्रह्मा-विष्णू-महेश अशी नसून शंकराच्याच सदाशिव रूपाची आहे.

वेरूळ येथील त्रिमुखी शिव
a

४. चतुर्मुख शिव.

ह्याच्या नावाप्रमाणेच ह्याला चार मुखे आहेत. काही संशोधक ह्यालाच सदाशिव (पंचमुखी शिव) असे मानतात ह्याचे पाचवे मुख हे दाखवले नसते व ते आकाशाच्या दिशेने असे मानले जाते.

पाटेश्वर येथील चतुर्मुख शिव

a

५. लकुलीश शिव

इसवीसनाच्या पहिल्या शतकानंतर व गुप्तकाळाच्या आधी लकुलीश नावाच्या मुनीने पाशुपतमताची स्थापना केली. हे मत ळूहळू मान्य होत जाऊन लकुलीश हा शिवाचेच प्रतिक झाला. ह्याची मुख्य लक्षणे म्हणजे ह्याच्या हातात सोटा अथवा लगूड असते आणि हा उर्ध्वरेता असतो. ह्याचा एक हात नेहमी वरदमुद्रेत असतो. लकुलीश शिवाची मूर्ती पद्मासनी अथवा उभ्या अशा दोन्ही प्रकारांत सापडते.

वेरूळ लेणी क्र. २९ मधील पद्मासनस्थ लकुलीश शिवाची मूर्ती

a

वेरूळ कैलास लेणीतील (लेणी. क्र. १६) उभ्या अवस्थेतील उर्ध्वरेता लकुलीश
a

६. अजएकपाद शिव

हा शंकराच्या मूर्तीचा एक अतिशय दुमिळ प्रकार. महाभारतात वर्णिल्याप्रमाणे हा रूद्र कुबेराबरोबरच धनाचे रक्षण करत असतो. याचे तोड बकर्‍याचे असल्याने हा अग्नीशी समान मानला जातो तर ह्याने आपले संतुलन एकाच पायांवर खुबीने साधलेले असते.

पाटेश्वर येथील अजएकपादाची दुर्मिळ प्रतिमा

a

७. नटराज शिव अथवा नृत्य मूर्ती

हा एक सर्वपरिचीत प्रकार. नटराज प्रकारात शिव हा नृत्यमुद्रेत दिसतो. शिवाने १०८ प्रकारे नृत्य केले अशी मान्यता आहे. तांडवनृत्यसुद्धा ह्या नटराज प्रकारातच येते.
नटराज शक्यतो चारापेक्षा अधिक हातांचा दर्शवला जातो. ८, १०, १६ हातांचेही नटराज आहेत. हातांमध्ये त्याने खङग, शक्ती, दंड, त्रिशुल, नाग, ज्वाला इत्यादी आयुधे धारण केलेली असतात.

वेरूळ लेणी क्र. २१ रामेश्वर येथील कटीसमनृत्यमुद्रेत असलेली शिवप्रतिमा
a

वेरूळ लेणी क्र. १६ येथील शिवतांडव प्रतिमा
a

८. कल्याणसुंदर मूर्ती

शिवपार्वती विवाहाचे अंकन दाखवणार्‍या मूर्तीस कल्याणसुंदर मूर्ती म्हणतात. ह्या मूर्तींमध्ये शिवाने पार्वतीचा हात आपल्या हाती घेतलेला असतो. ब्रह्मदेव हा भटाचे काम करत असतो तर दिक्पाल, विष्णू आदी देव शिवाच्या विवाहाप्रित्यर्थ आलेले असतात.

वेरूळ लेणी क्र. २९ मधली कल्याणसुंदर मूर्ती
a

वेरूळ लेणी क्र. २१ मधली कल्याणसुंदर मूर्ती
a

९. सोमास्कंदमूर्ती

या मूर्तीमध्ये शिव आणि पार्वती यांचे मध्ये लहानसा स्कंद अथवा कार्तिकेय असतो.. अर्थात स उमा स्कंद (उमेसहित स्कंद) तो उभा, बसलेला किंवा आईच्या किंवा बाबांच्या मांडीवरही दाखवला जातो.

वेरूळ कैलास लेणीमंदिराच्या अंतराळात सोमास्कंद मूर्ती कोरलेली आहे.
a

आतापर्यंत आपण उमामाहेश्वर आणि केवल शिव प्रकारच्या मूर्ती पाहिल्या आता शिवाच्या मूर्तींचे अजून काही प्रकार बघू.

यात येतात ते अनुग्रह आणि संहारमूर्ती

सुरुवातीस अनुग्रहमूर्ती पाहूयात.

१०. अनुग्रहमूर्ती

अनुग्रहमूर्ती म्हणजे शंकराच्या वरप्रदानास अथवा अनुग्रहास प्राप्त झालेल्या व्यक्तिची कथा.
ह्यात रावणानुग्रह आणि मार्केंडेयानुग्रह असे दोन उपप्रकार येतात.

१०.१ रावणानुग्रहशिवमूर्ती

कुबेराचा पराभव करून त्याचे पुष्पक विमान पळवून रावण कैलासपर्वतावर शंकराचे दर्शन घेण्यास येतो. शिवपार्वतीची क्रिडा चालू असल्याने द्वारपालांनी हाकलून दिलेला गर्वोन्मत्त रावण कैलास पर्वतच उचलण्याचा बेत करतो. आपल्या सर्व हातांनी कैलास पर्वत तळापासून उचलायला लागतो. तर शंकर मात्र भयभीत पार्वतीला आणि भेदरलेल्या शिवगणांना धीर देऊन आपल्या पायाच्या अंगठ्याने कैलासास दाबून धरतो. कैलासाच्या ओझ्याखाली चिरडत चाललेला रावण प्राणांची भीक मागून शिवस्तुती गाऊन शंकराचा अनुग्रह प्राप्त करून घेतो अशी याची थोडक्यात कथा.

वेरूळच्या कैलास लेणीत रावणानुग्रहाचे अतिशय अप्रतिम शिल्प आहे.

शिल्पपटात कैलास पर्वत उठावात कोरलेला आहे तर त्याच्या खालच्या भागात खोबणी करून त्यात रावणाचे शिल्प कोरलेले आहे. रावणाची मस्तके सुटी आहेत. कैलास उचलताना रावणाने एक पाय गुडघ्यात मुडपून दुसरा पाय जमिनीवर घट्ट रोविला आहे. आपल्या वीस हातांनी सर्व शक्ती पणास लावून त्याने कैलास अर्धवट उचललेला आहे. इतकी प्रचंड ताकत पणास लावताना साहजिकच रावणाची मान तिरकी झालेली असून कानातले एक कुंडल खांद्यावर टेकलेले आहे तर दुसरे कुंडल हवेत झुलत आहे. कैलास पर्वतावरील घनदाट वनराजी त्यावर झाडे आणि त्यावरील भयभीत मर्कटे कोरून दाखवली आहे. वृक्षराजीच्या वर भयभीत शिवगण तर शेजारी दोन द्वारपाल कोरलेले आहेत. पार्वतीच्या शेजारी असलेली एक दासी पाठमोरी होऊन पळून जात आहे. तर भयभीत पार्वतीला निर्विकार शंकर धीर देत असून एका पायाने कैलास दाबून धरत आहे. आकाशात अष्टदिक्पाल रावणाचे हे गर्वहरण पाहावयास जमले आहेत.

a

वेरूळ लेणी क्र २९ मधील रावणानुग्रहशिवमूर्ती
a

वेरूळ लेणी क्र. २१ (रामेश्वर) येथील रावणानुग्रहशिवमूर्ती. लक्ष्यपूर्वक पाहिल्यास रावणाचे दहावे मुख हे गर्दभाचे असल्याचे दिसेल.

a

a

गोंदेश्वर मंदिर, सिन्नर येथील बाह्यभिंतीवर कोरलेली रावणानुग्रहशिवमूर्ती
a

१०.२ रावणानुग्रहशिवमूर्ती प्रकार दुसरा

रावणानुग्रहशिवमूर्तीचा अजून एक प्रकार वेरूळ येथील कैलास लेणीच्या प्रदक्षिणापथावर पाहावयास मिळतो. या कथेप्रमाणे वरप्राप्तीसाठी रावण दहा हजार वर्षे तप करतो प्रत्येक सहस्त्र वर्षानंतर आपले एकेक मस्तक कापून शंकराला अर्पण करतो जेव्हा शेवटी आपले शेवटचे मस्तक कापून देण्यास सिद्ध होतो तेव्हा भगवान शंकर प्रकट होऊन त्याला वर प्रदान करतात.

अर्थात यातील गंमत म्हणजे ही कथा आहे मूळची ब्रह्मदेवासंदर्भात. वाल्मिकी रामायणाप्रमाणे रावण हा ब्रह्मदेवाला मस्तके अर्पण करून वरप्राप्ती करून घेतो. तर येथे मात्र शिवाची कथा कोरलेली आहे. एकंदरीतच वैदिक देवता विस्मृतीत जात असताना शैव, वैष्णव पंथांचे प्राबल्य कसे वाढायला लागले होते याचा हा एकप्रकारे पुरावाच.

मूळ वाल्मिकीरामायणातील श्लोक पहा.

दशवर्षसहस्रं तु निराहारो दशाननः ।
पूर्णे वर्षसहस्रे तु शिरश्चाग्नौ जुहाव सः ||

एवं वर्षसहस्राणि नव तस्यातिचक्रमुः ।
शिरांसि नव चाप्यस्य प्रविष्टानि हुताशनम् ॥

अथ वर्षसहस्रे तु दशमे दशमं शिरः ।
छेत्तुकामे दशग्रीवे प्राप्तस्तत्र पितामहः ॥

पितामहस्तु सुप्रीतः सार्धं देवैरुपस्थितः ।
तव तावद् दशग्रीव प्रीतोऽस्मीत्यभ्यभाषत ॥

शीघ्रं वरय धर्मज्ञ वरो यस्तेऽभिकाङ्‌क्षितः ।
कं ते कामं करोम्यद्य न वृथा ते परिश्रमः ॥

कथेचा थोडक्यात आशय वर दिलाच असल्याने आता याचे परत भाषांतर करीत नाही.

वेरूळ येथील कैलास लेणीतील प्रदक्षिणापथावरील रावणानुग्रहशिवमूर्ती

a

१०.३ मार्कंडेयानुग्रहमूर्ती

अनुग्रहमूर्तीचाच पुढचा प्रकार म्हणजे मार्कंडेयानुग्रहशिवमूर्ती. अर्थात हीच मूर्ती शिवाच्या संहारमूर्तीमध्येही गणली जात असल्याने हिच्याबद्दल अधिक उहापोह मी पुढील संहारमूर्ती प्रकरणात करतो.

११. संहारमूर्ती.

ह्या मूर्तीचे शिवाचे संहाररूप अथवा रौद्ररूप दाखवतात. सज्जनांच्या रक्षणासाठी, असुरांच्या नाशासाठी शिवाने रौद्ररूप धारण करून त्यांचा संहार केला. ह्या सर्व कथा संहारमूर्तींमध्ये कोरलेल्या असतात. संहारमूर्तींमध्येच भैरवाचाही समावेश आहे पण आपण भैरवमूर्ती नंतर एका स्वतंत्र प्रकरणात पाहूयात.

संहारमूर्तीमध्ये पहिली मूर्ती घेऊ ती म्हणजे कालारी शिव अथवा मार्कंडेयानुग्रहमूर्ती

११.१ कालारी शिव अथवा मार्कंडेयानुग्रहशिवमूर्ती.

ह्या मूर्तीचा समावेश एकाचवेळी अनुग्रह आणि संहार अशा दोन्ही प्रकारांमध्ये होतो याचे कारण म्हणजे मार्कंडेयावर अनुग्रह करून शिव साक्षात कालरूपी यमाचे पारिपत्य करीत आहे.

याची थोडक्यात कथा अशी.

पुराणकथेप्रमाणे निपुत्रिक असलेल्या मर्कंड ऋषींच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न होऊन शंकर त्यांना अतिशय विद्वान पुत्र होईल असा आशिर्वाद देतो. मर्कंडाचा हा अल्पायुषी पुत्र शिवाच्या उपासनेत गढून जातो. मार्कंडेय १६ वर्षाचा होतो तेव्हा त्याचे प्राण हरण करायला खुद्द यम तिथे येतो. प्रार्थनेत गढलेल्या मार्कंडेयाच्या गळ्यात यम आपला यमपाश आवळतो. मार्कंडेयासारख्या भक्ताला यम ओढून नेत आहे हे शिवाला सहन न होऊन तो पिंडीतून प्रकट होऊन साक्षात यमधर्मावर क्रोधाने लत्ताप्रहार करून त्याला दूर ढकलून देतो. भयभीत यम शंकराची प्रार्थना करून त्याजकडे अभयदान मागत आहे. यमधर्मरूपी साक्षात कालाचे पारिपत्य करून मार्कंडेयाला जीवदान दिल्याने शिवाच्या ह्या रूपाला कालारी शिव अथवा कालांतक शिव असेही म्हटले जाते.

वेरूळ येथील कैलास लेणीच्या प्रदक्षिणापथावर असलेली कालारी शिव प्रतिमा
a

वेरूळ येथील कैलास लेणीमधील कालारी शिवप्रतिमा
a

११.२ व ११.३ गजासुरसंहारमूर्ती आणि अधकासुरवधमूर्ती

ह्या दोन्ही मूर्तीबाबत एकच कथा आहे.

अंधक नावाच्या असुराला ब्रह्मदेवाच्या वराने आपल्या जमिनीवर पडणार्‍या रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून एकेक असुर निर्माण होईल अशी शक्ती प्राप्त होते. अंधकासुराच्या प्रभावाने हैराण झालेले देव शंकराकडे अभय मागण्यासाठी जातात त्याच वेळी नीलासुर नावाचा राक्षस हत्तीचे रूप धारण करून शंकराचे पूजन करणार्‍या ऋषींना त्रास देतो. शंकर आधी गजासुराचा वध करून त्याच एक दात उपटतो आणि त्यानंतर त्याचे गजचर्म अंगाभोवती गुंडाळून एका हाती वाडगा धरून त्रिशुळाने अंधकासुराचा वध करतो. आपल्या त्रिशुळावर उचलून धरलेल्या अंधकाचे रक्त वाडग्यात गोळा करतो तसेच वाडग्याबाहेर पडणारे रक्ताचे चुकार थेंब त्वरेने शोषून घेण्यासाठी आपल्या योगसामर्थ्याने मातृकेची (चामुंडेची) उत्पत्ती करतो.

वेरूळच्या कैलास लेणीतील गजासुरवधाची ही मूर्ती

a

वेरूळच्या लेणी क्र. २९ मधील अंधकासुरवधाचे हे अतिशय प्रत्ययकारी शिल्प. पहा शिवाचे डोळे कसे भयानक क्रोधाने खोबणीतून पार बाहेर आलेले आहेत.

a

कैलास लेणीतील प्रदक्षिणापथावरील अंधकासुरवधाचे अजून एक शिल्प

a

११.४ त्रिपुरांतकशिवमूर्ती

तारकासुराचे तीन मुले विद्युन्माली, तारकाक्ष आणि कमलाक्ष यांनी ब्रह्मदेवाची आराधना करून आकाशगामी असलेली अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि लोहमय अशी तीन फिरती पुरे प्राप्त करून घेतली. ही तिन्ही पुरे एकाच रेषेत असतांनाच एकाच बाणाने ह्यांचा विध्वंस करू शकणाराच त्रिपुराचा वध करू शकेल असा वर त्यांनी मिळविला. तीन फिरत्या पुरांमुळे अतिशय बलवान झाएल्या ह्या तीन्ही असुरांचा शंकराने विष्णूरूपी बाण करून त्यांचा नाश केला अशी ही थोडक्यात कथा.

वेरूळ येथील प्रदक्षिणापथावरील त्रिपुरांतक शिवमूर्ती.

a

आता संहारमूर्तीपैकीच एक असलेल्या शिवाच्या भैरवरूपाबाबत आपण पाहू.

१२. भैरव

भैरव हे शंकराचे पूर्ण रूप होय. तो सर्व जगाचे भरण करतो आणि रूपाने भीषण आहे म्हणूनच ह्या रूपाला भैरवरूप असे म्हणतात. भैरवमूर्ती महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आढळतात. साक्षात यमरूपी काळही त्याला घाबरून असतो म्हणून त्याला काळभैरव असेही संबोधले जाते.
बटबटीत डोळे, ओठांतून बाहेर पडणारे दात, गळ्यात नरमुंडमाला, त्रिशुळावर किंवा हातात नरमुंड लटकावलेले, नरमुंडातील गळणारे रक्त चाटणारे एक किंवा अधिक कुत्रे (भैरवाचे वाहन्ही कुत्राच आहे), सर्परूपी दागिने ही भैरवाची प्रमुख वैशिष्ट्ये. भैरवमूर्ती बरेचदा नग्नावस्थेतही दाखवलेल्या असतात.

भैरवाबाबतची कथा अशी-
ब्रह्मदेवाने रूद्र उत्पन्न केला आणि त्याला कपालि या नावाने संबोधून पृथ्वीचे रक्षण कराण्यास सांगितले. या नावामुळे स्वतःचा अपमान झाल्याचे वाटून रूद्राने आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्याच्या नखाने ब्रह्माचे पाचवे मस्तक तोडून त्याला चतुर्मख केला. तथापि ते मस्तक त्याच्या हाताला चिकटून राहिले. ह्यापासून मुक्त होण्यासाठी ब्रह्मदेवाने त्याला १० वर्षे कापालिक व्रत करण्यास सांगितले. रूद्राने केसाचे जानवे आणि अस्थींचा हार घातला. जटामुकुटावर नरमुंड ठेवले व हातात रक्ताने भरलेले कपाल घेऊन तीर्थाटन केले व काशीस त्याच्या अंगठ्यास चिकटलेले मस्तक गळून तो मुक्त झाला.
शंकराच्या ह्या रूपालाच भैरवरूप म्हटले जाते.

भैरवमूर्तींचे असंख्य प्रकार आहेत. कोकणात आढळणार्‍या वेताळ मूर्ती म्हणजे असितांग भैरवाचाच एक प्रकार.
सामान्य, क्षेत्रपाल, चंड, स्वच्छंद, स्वणाकर्षण, आसितांग्, बटुक, कापाल, भीषण, घोर असे भैरवाचे विविध प्रकार.

वेरूळ येथील लेणी क्र. २१ येथील असितांग भैरव.
a

खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराच्या बाह्यभिंतीवर कोरलेली भैरवमूर्ती.
a

खिद्रापूर येथीलच गजारूढ भैरव
a

गोंदेश्वर मंदिर, सिन्नर येथील भैरवमूर्ती
a

भुलेश्वर मंदिर, पुणे येथील उजवीकडील दोन भैरवमूर्ती

a

पूरच्या कुकडेश्वर मंदिरावरील भैरव प्रतिमा

a

रांजणगावाजवळील पिंपरी दुमाला येथील दुर्लक्षित मंदिराच्या बाह्यभागावरील ही भैरव प्रतिमा

a

पेडगाव येथील अप्रतिम शिल्पकेलेने समृद्ध असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाह्यभिंतीवरील भैरव मूर्ती
a

भैरव प्रतिमा पाहून झाल्यावर मी आता इशाण प्रतिमांकडे वळून लेखाचा समारोप करतो.

१३. इशण

हा अष्टदिक्पालांपैकी एक. इंद्र, अग्नी, वायु, वरूण, कुबेर, यम, निऋती आणि इशान्य दिशेचा पालन करणारा हा लोकपाल म्हणजे इशण अथवा इषान. हे शिवाचेच एक रूप. ह्याची लक्षणे सर्वसामान्यपणे शंकराचीच असतात. म्हणजे त्रिशुळ, डमरू वगैरे.

पेडगाव येथील अप्रतिम शिल्पकेलेने समृद्ध असलेल्या लक्ष्मीनारायण मंदिराच्या बाह्यभिंतीवरील ही इशण मूर्ती
a

टोके गाव, प्रवरासंगम येथील सिद्धेश्वर मंदिरातील विष्णू उपमंदिरावरील ही इशण मूर्ती
a

आतापर्यंत आपण काही प्रकारची शिवलिंगे तर बर्‍याच प्रकारच्या शिवप्रतिमा पाहिल्या. यातले बरेचसे प्रकार उदा. दक्षिणामूर्ती, भिक्षाटनमूर्ती, चंद्रशेखरमूर्ती, गंगाधरमूर्ती, वीरभद्र आदिंची छायाचित्रे माझ्याजवळ नसल्याने इथे द्यायच्या राहून गेल्यात. जर कुणाजवळ तशा मूर्तीची छायाचित्रे अथवा वर्णन असेल तर ते येथे अवश्य द्यावेत.

पुढेमागे क्वचित विष्णू, दिक्पाल, मातृका यांवरही लिहिण्याचा विचार आहे. बघू कधी आणि कसे जमते ते.

कलाधर्मइतिहासकथाछायाचित्रणमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

19 Jan 2014 - 6:26 pm | मुक्त विहारि

शांतपणे वाचीन म्हणतो.

"वाचनखूण साठवली आहे."

पुढेमागे क्वचित विष्णू, दिक्पाल, मातृका यांवरही लिहिण्याचा विचार आहे.

बघू कधी आणि कसे जमते ते.

एक विनंती,

जमेल तसा वेळ काढून लिहाच.

ह्या अशा सुंदर केशरी जिलब्या मला तरी आवडतात.

घट्ट पाकातल्या, बिन केशरी आणि लोण्यात माखलेल्या जिलब्यांकडे, मी बघत पण नाही.

दिपक.कुवेत's picture

22 Jan 2014 - 5:17 pm | दिपक.कुवेत

निवांतपणे वाचीन. पण तुझ्या अभ्यासपुर्ण लेखाला/व्यासंगाला सलाम. आता असं एखाद शीवलींग पाहिलं कि तुझा लेख नक्कि आठवेल.

प्यारे१'s picture

19 Jan 2014 - 6:28 pm | प्यारे१

___/\___

व्यासंगाला स ला म!
नेहमीप्रमाणं अभ्यासू लेख. वेगळे शब्द कुणीतरी आणा रे ह्या वल्ल्याच्या दांडग्या अभ्यासासाठी!

मृगनयनी's picture

19 Jan 2014 - 9:34 pm | मृगनयनी

वल्ली'जी.... खूप सुन्दर आणि अभ्यासपूर्ण माहिती... अप्रतिम छायाचित्रे!!!!!!......खरोखर.....नि:शब्द.....

|| ओम नमः शिवाय ||

अस्वस्थामा's picture

19 Jan 2014 - 7:16 pm | अस्वस्थामा

अद्वितीय लेख वल्लीशेठ.!!
अशा लेखांसाठी धन्यवाद.
__/\__

मूकवाचक's picture

22 Jan 2014 - 2:50 am | मूकवाचक

+१

चौकटराजा's picture

19 Jan 2014 - 7:28 pm | चौकटराजा

लेख व्यासंगाने ओतप्रोत भरलेला आहे. भैरव राग माहितीत होता पण भैरवाचे शिवरूप मूर्त स्वरूपात प्रथमच पहातोय.खंडोबा
हे दर्वत शिवरूपच आहे ना ?
बाकी शेवटच्या चित्रात हातात लाडू सारखे काय आहे ?
आता विष्णू वरील लेख यावा .

प्रचेतस's picture

19 Jan 2014 - 9:08 pm | प्रचेतस

धन्यवाद काका.

तुही तर बेलुर, हळेबीड, हंपी, बदामी, खजुराहो सर्वच बघितलंय तरी भैरवाचे शिवरूप मूर्त स्वरूपात प्रथमच बघितलंय म्हणता. ;)

खंडोबाची मूर्ती हाही शिवमूर्तीचाच एक प्रकार. ह्या प्रकाराला मल्लारी मूर्ती असे म्हणतात.

इषणाची टोके येथील तशी अलीकडची आहे, म्हणजे पेशवेकाळातील. इतह्ल्या सर्वच दिक्पालांच्या मूर्तीच्या हातात असा लाडूसारखा पदार्थ दिसतो.

चौकटराजा's picture

19 Jan 2014 - 10:01 pm | चौकटराजा

ही तर बेलुर, हळेबीड, हंपी, बदामी, खजुराहो सर्वच बघितलंय तरी भैरवाचे शिवरूप मूर्त स्वरूपात प्रथमच बघितलंय म्हणता. Wink
आम्ही तिथं त्या कमनीय नायिका पाहात होतो. वराह, गरूड, अश्व ,गज शिल्पाकडे काहीसं लक्ष गेलंही असेल. पण आता परत गेलो तर वल्ली नजरेने पाहू. म्हणजे भैरव, काल भैरव सगळे उमगून येतील.

मदनबाण's picture

21 Jan 2014 - 10:32 am | मदनबाण

खंडोबाची मूर्ती हाही शिवमूर्तीचाच एक प्रकार. ह्या प्रकाराला मल्लारी मूर्ती असे म्हणतात.
माझ्या माहिती नुसार म्हलारी मार्तंड असे या मूर्ती चे नाव आहे. { याची शहानिशा मी परत करीन} होळकर घराण्यात म्हलारी मार्तंडाची उपासना केली जात असे. बाकी पाटेश्वराचे फोटो पाहुन ५० फक्त यांचा पाटेश्वर - अजुन एक शाक्तपंथीय देवस्थान हा लेख आठवला.त्यात मी माझ्या प्रतिसादात २०११ मधील लोकसत्ते मधे आलेला कातळकला : पाटेश्वरचे ‘शिव’लेणे हा अभिजित बेल्हेकर यांनी लिहलेल्या लेखाचा दुवा दिला आहे. वाचकांसाठी पुन्हा तो इथे परत देतो :- http://alturl.com/q4p6b
माझा त्या धाग्या वरील प्रतिसाद :- http://www.misalpav.com/comment/337464#comment-337464

प्रचेतस's picture

21 Jan 2014 - 12:20 pm | प्रचेतस

धन्स रे बाणा.

मल्लारि, मल्हारि अशा वेगवेगळ्या नावांनी खंडोबाद संबोधतात. मूळ शब्द मल्लारि हाच असून पुढे त्याचा मल्हारि असा अपभ्रंष झालेला दिसतो. मणि आणि मल्ल दैत्याचा वध करणारा तो मल्लारि. हा पांढर्‍या घोड्यावर आपल्या बायकोसहित बसलेला आढळतो.

ही बघा अजणूज गावातील खंडोबाची मूर्ती

मदनबाण's picture

21 Jan 2014 - 12:38 pm | मदनबाण

ओह्ह... अस हाय काय ! ठांकु.

पैसा's picture

21 Jan 2014 - 2:20 pm | पैसा

खंडोबा हा स्कंद शब्दाचा अपभ्रंश असल्याचे रा. चिं. ढेरे म्हणतात. दक्षिण भारतात स्कंदाच्या (मुरुगन/कार्तिकेय) देवळात वारूळ आणि नाग असतात यावरून तोही प्रजननाशी संबंधित आदिम देवतांपैकी असल्याचे ते म्हणतात.

यशोधरा's picture

22 Jan 2014 - 7:09 pm | यशोधरा

सुरेख मूर्ती!

घाटावरचे भट's picture

21 Jan 2014 - 7:24 am | घाटावरचे भट

अप्रतिम लेख!!! मंदिरे आणि मूर्ती पाहण्याची नेहेमीची पद्धत बदलून अधिक तपशिलात निरीक्षण करावे लागेल आता.

बाकी,

गंगाधरः शशिकलातिलकस्त्रिनेत्रः सर्पैर्विभूषिततनु: गजकृत्तिवासः|
भास्व: त्रिशूलकर एष नृमुंडधारी शुभ्रांबरो जयति भैरव आदिरागः||

(आठवलं तसं लिहिलं आहे, खचितच संस्कृत शुद्धलेखन गंडलं असण्याची शक्यता आहे. विशेषतः संधी, समास वगैरे)

असे भैरव रागाचे ध्यान सांगितले आहे. बरेचसे इथल्या मूर्तींच्या वर्णनाशी जुळणारे वाटते. अर्थात भैरवाची संकल्पना आधी आणि नंतर राग असे आले असावे असे वाटते. अर्थ तसा सोपा आहे -

गंगा आणि चंद्र धारण करणारा, तिलकाच्या जागी तृतीय नेत्र असलेला, सर्पांनी विभूषित अंग असलेला, (गजकृत्तिवासः म्हणजे काय?), तेजस्वी आणि हाती त्रिशूल धारण करणारा, नररुंडमाला धारण करणारा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेला असा हा प्रथम राग भैरव विजयी होवो (होतो?)

बाकी अवघड शब्दांचे अर्थ आणि चुका जाणकार सांगतीलच.

प्रचेतस's picture

21 Jan 2014 - 8:34 am | प्रचेतस

गजकृत्तिवासः म्हणजे गजचर्म धारण करणारा.
गजासुराचा वध करून शंकराने त्याचे कातडे आपल्या अंगावर गुंडाळून घेतले अशी ही कथा.

चावटमेला's picture

19 Jan 2014 - 7:45 pm | चावटमेला

वा!! कशाला दाद द्यावी तेच कळत नाहीये. तुमच्याकडील माहितीच्या भांडाराला की, त्याचे इतके उत्तम संकलन करून इथे केलेल्या मांडणीला की सूक्ष्म फोटोग्राफीला. असेच अजून लेख येवू देत.

balasaheb's picture

19 Jan 2014 - 8:04 pm | balasaheb

खुप मस्त

चित्रगुप्त's picture

19 Jan 2014 - 8:05 pm | चित्रगुप्त

जबरदस्त फोटो आणि लेख. एका बैठकीत वाचून समजून घेणे शक्य नाही, पुन्हा वाचावा लागेल.
मागे कोणत्यातरी लेखात 'भारतात फार पूर्वी घोडे नव्हते' (याला कोणते पुरावे दिले जातात?) अशी काही चर्चा झाली होती. तुम्ही दिलेल्या ऋग्वेदातील सूक्तात घोडा आहे, त्या अर्थी त्याकाळी इकडे घोडा होता म्हणायचा. (सुगं म्हणजे घोडा का?) तसेच इकडले मूळ रहिवासी हे 'अनार्य' असून 'आर्य' बाहेरून आले, याबद्दल उलट सुलट मतप्रवाह आहेत, त्याविषयी काय म्हणता?

सुगं म्हणजे आनंदात राहो. इथे अश्वाचा असा डायरेक्ट उल्लेख नाही. पण इथे आलेला उल्लेख हा पाळीव प्राण्यांबाबत आहे. बर्‍याच ठिकाणी ह्या श्लोकाच्या अर्थात अश्व असा उल्लेख आलेला आहे.

चंद्रशेखर यांनी अक्षरधूळ ह्या त्यांच्या ब्लॉग मधील सुरकोटलाचा अश्व ह्या लेखात अतिशय उत्तम माहिती दिली आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jan 2014 - 8:10 pm | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम हा शब्द या लेखाबाबतीत अत्यंत तोकडा आहे.

अतिशय अभ्यासपूर्ण लेख. अशी माहिती प्रथमच वाचतोय. हे आणि तुमचे इतर लिखाण खरंच छापील आवृत्तीत आले पाहिजे.

पुढेमागे क्वचित विष्णू, दिक्पाल, मातृका यांवरही लिहिण्याचा विचार आहे.

वेळ काढून नक्की लिहा ही आग्रहाची विनंती.

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jan 2014 - 2:05 am | अत्रुप्त आत्मा

@. हे आणि तुमचे इतर लिखाण खरंच छापील आवृत्तीत आले पाहिजे.>>>> +++++१११११ हेच आणी हेच बोलतो मी नेहमी! :)

यशोधरा's picture

19 Jan 2014 - 8:13 pm | यशोधरा

अ फा ट! वाचनखूण साठवली आहे.

अनुप ढेरे's picture

19 Jan 2014 - 8:29 pm | अनुप ढेरे

भारी...

अत्रन्गि पाउस's picture

19 Jan 2014 - 9:00 pm | अत्रन्गि पाउस

आपल्या व्यासंगाला दंडवत...

धन्या's picture

19 Jan 2014 - 9:37 pm | धन्या

अप्रतिम !!!

पैसा's picture

19 Jan 2014 - 10:03 pm | पैसा

नेहमीप्रमाणेच अप्रतिम लेख!

आताचे शिवाचे स्वरूप हे आर्यांचा रुद्र आणि द्रविडांचा लिंगरूप शिव यांचे एकत्रिकरण असावे असेच दिसते. त्यामुळेच शिवाची उपासना सर्वात व्यापक प्रदेशात होते. नेपाळातील पशुपतीनाथापासून ते थेट रामेश्वरपर्यंत.

सिंधु संस्कृतीच्या उत्खननात सापडलेल्या महत्त्वाच्या गोष्टींमधे पशुपतीस्वरूप त्रिमुखी देवतेचे शिल्प आणि लिंगसदृश शिल्प आहे.

http://www.hindunet.org/hindu_history/sarasvati/html/Trefoil1.htm

http://en.wikipedia.org/wiki/Indus_Valley_Civilization

https://sites.google.com/site/kalyan972/culturallegacy

http://lafinefleurduyoga.over-blog.com/article-16057840.html

इथे त्यांची छायाचित्रे पाहता येतील. अर्थात हा आताच्या स्वरूपातील शिव नाही तर अगदी प्राथमिक काळातील शिवसदृश देवता (पशुपती) आणि आदिम रहिवाशांची लिंगपूजा असावी.

शिवमूर्तींबाबत पं महादेवशास्त्री जोशी यांच्या 'भारताची मूर्तीकला' या पुस्तकात रुद्र हा अग्नितत्त्वापासून उत्पन्न झाला असे वेदातील उल्लेख आणि सिंधुसंस्कृतीतील पशुपती आणि लिंग या शिल्पांबद्दल उल्लेख देऊन पुढे या दोन्हीचे एकत्रित रूप म्हणजे आजचे शिवाचे स्वरूप यबद्दल विस्ताराने लिहिले आहे. या पुस्तकात शिवाच्या मूर्तीबद्दल पं. जोशी म्हणतात, " शाळुंका ही पार्वतीस्वरूप तर शिवलिंग हा महेश्वर. शाळुंकेसहित लिंगाची पूजा केल्याने दोन्हीची पूजा केल्यासारखे होते. शाळुंका कशी निर्माण करावी? शाळुंकेच्या घेराचे ३ प्रकारे आहेत. लिंगाच्या घेराच्या तिप्पट तो अधम, दीडपट तो मध्यम तर चौपट तो उत्तम. शाळुंकेची उंची विष्णुभागाइतकी असावी, तिचा आकार चतुष्कोण, द्वादशकोण, षोडषकोण किंवा गोल असावा. अभिषेक हा शिवलिंगाचा मुख्य उपचार असल्याने शाळुंकेला पन्हळ ठेवणे आवश्यक आहे. शिवलिंग शाळुंकेत स्थापन करताना त्याचे ब्रह्मभाग व विष्णुभाग हे भूमीत जायला हवेत. रुद्रभाग तेवढाच वर असावा."

मूर्तींच्या प्रकारात पं जोशी दक्षिणामूर्ती असा एक प्रकार देतात. तो बुद्धी देणारा आणि सामान्य मानवरूपात दाखवला जातो. आणखी एक प्रकार म्हणजे अर्धनारीश्वर. मूळ लिंग आणि शाळुंका या स्वरूपातील शिवाची मूर्ती बनवायला सुरुवात झाली तेव्हाचे रूप म्हणजे एकाच मूर्तीत सामावलेले शिव आणि पार्वेती.

"नंदी, गणेश, स्कंद, भैरव, पार्वती (दुर्गा) हे शिवाच्या परिवारातील देव आणि त्यांच्या मूर्ती शिवाच्या मूर्तीबरोबर किंवा वेगळ्या बघायला मिळतात."

गोवा आणि कोकणात शिवगणांमधे वेताळ आणि अन्य स्थानिक राखणदार समजले गेलेल्या देवांचा समावेश होतो.

betal

हा लोलये येथील बेताळ.

ling1

ling2

ling3

ही हरवळे (साखळी) येथील गुहांतील वैशिष्ट्यपूर्ण आकाराची शिवलिंगे. यांच्याबद्दल जास्त माहिती मिळू शकली नाही पण कदाचित ती तांत्रिक पूजेशी संबंधित असू शकतील असे वाटते.

सविस्तर प्रतिसाद आणि त्यातील दुवे आणि छायाचित्रांबद्दल धन्स.

गुहेतील शिवलिंगे अगदी आदिम काळातील म्हणजे दिसतात. ह्यांचा काळ नक्की कोणता ते माहित करून घ्यायला आवडेल. पण तांत्रिक पंथातील वाटत नाही. ही शिवलिंगांच्या प्राथमिक अवस्थेतील दिसतात. पुरुष शिश्नाचा आकार असलेली. बहुधा २००० वर्षे जुनी.

पं. महादेवशास्त्री जोशी यांचे भारताची मूर्तीकला हे पुस्तक नक्कीच विकत घेईन.

मुक्त विहारि's picture

20 Jan 2014 - 12:21 am | मुक्त विहारि

वल्लींचा लेख आणि पैसाताईंचा प्रतिसाद....

सॉलीड....

मिपावर यायचे सार्थक झाले.

पैसा's picture

20 Jan 2014 - 1:24 pm | पैसा

एकाच्या म्हणण्याप्रमाणे बहुतेक चौथ्या शतकातल्या मानवनिर्मित गुहा असाव्यात. हे फार जुने ठिकाण आहे. इथे एक जुनी जैन बस्ती आहे तसंच एक बुद्धप्रतिमाही सापडली होती.

साधारण अशा आकाराची लिंगे घारापुरी बेटावर आणि ख्मेर अंगकोरवट इथे मिळाल्याचे उल्लेख सापडले. तर खरोखरच तिथे तशा अकाराची चित्रं पहायला मिळाली.

http://blogs.bootsnall.com/theglobaltrip/updates/005873.shtml

http://en.wikipedia.org/wiki/Khmer_architecture

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jan 2014 - 7:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

शिवप्रभाव मुर्ती, लिंग, नाणी आणि लोककथा यांच्या रुपांत पामिरचे पठार (आत्ताचे ताजिकिस्तान, किर्घिजिस्तान, अफगाणिस्तान आणि हिंदुकुश पर्वतराजी आणि तिच्या आजूबाजूचा प्रदेश), भारत, ब्रम्हदेश ते इंडोनेशियासह दक्षिणपूर्व आशियात अगदी व्हिएतनामपर्यंत सापडतो.

अजया's picture

19 Jan 2014 - 10:34 pm | अजया

ही रानी की वाव ,गुजरात येथिल भैरव मूर्ती.

प्रचेतस's picture

20 Jan 2014 - 9:13 am | प्रचेतस

अफाट सुंदर मूर्ती आहे.
एप्रिल मध्ये रानी की वाव, मोढेराचे सूर्यमंदिर, लोथल आणि कच्छचे रण असा बेत करायचा आहेच.

रानी की वाव हे मूर्तीकलेतले नितांत सुंदर काव्य आहे.तुमच्यासारखे जाणकार तिथे जाऊन आल्यावर जे लिहाल त्याची वाट आत्तापासूनच पहिली पाहिजे!

प्यारे१'s picture

20 Jan 2014 - 7:16 pm | प्यारे१

>>> तिथे जाऊन आल्यावर जे लिहाल त्याची

हे बाकी खरं बरंका.
हा माणूस बरोबर फिरत असताना 'इस्स कान की खबर उस्स कान' ला लागू देत नाही.

@ अर्धवटराव आणि इस्पिकचा एक्का राव,
तुम्ही वल्ल्याला किडनॅप करण्याचा पिलान केला असला तरी का ही ही उपयोग होणार नाही असं भाकीत वर्तवतो.
भटकाल तुम्ही खरं पण काय बगिटलं ते कळणारच नाही लेख आल्याशिवाय.

यशोधरा's picture

20 Jan 2014 - 10:06 am | यशोधरा

सुंदर शिल्प!

डॉ सुहास म्हात्रे's picture

20 Jan 2014 - 12:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

अफाट कोरीवकाम ! मूर्ती प्रचंड आवडली.

प्यारे१'s picture

20 Jan 2014 - 12:57 pm | प्यारे१

सुंदरच.

समोरुन आणखी स्पष्ट दिसली असती का?

बाकी पैसा ह्यांचा(देखील) मूर्तींचा इतिहास (देखील) चोख आहे सातत्यानं जाणवतं.

परिंदा's picture

20 Jan 2014 - 7:18 pm | परिंदा

भैरव मूर्तीच्या उजवीकडे स्त्री ने एका माणसाची दाढी धरल्याचे शिल्प आहे, त्याचा अर्थ काय असावा?

प्रचेतस's picture

20 Jan 2014 - 7:29 pm | प्रचेतस

ती सुरसुंदरी अभिसारिका.
नटून थटून ती आपल्या प्रियकराला भेटायला चालली आहे तर तिचा सेवक उगा तिला छळत आहे. म्हणून एका हाताने त्याची दाढी धरून दुसर्या हाताने ती त्याला चापट मारते आहे. मर्कटलीलांची अशी शिल्पे तर सर्रास सापडतात.

पहाटवारा's picture

21 Jan 2014 - 12:02 am | पहाटवारा

सुरेख लेख अन वेगवेगळ्या ठिकाणांची हि अशी संकलीत माहिती खरच दुर्मीळ आहे.
खाली स्पा'ने म्हंटल्यानुसार .. खरच ही अशी माहिती असेल तर शिकायला खरेच मजा येईल. किमानपक्षी जिथे अशा मूर्ती आहेत, तिथे तरी अशा माहिती ऊपलब्ध व्ह्यायला हवी.
ऊत्तम लेख..
-पहाटवारा

परिंदा's picture

21 Jan 2014 - 12:26 pm | परिंदा

वल्लीसर,

तुमच्या ज्ञानास आणि व्यासंगास __/\__

नेहा_ग's picture

20 Jan 2014 - 12:25 am | नेहा_ग

सुरेख माहिति

स्पा's picture

20 Jan 2014 - 7:31 am | स्पा

अफाट माहीती आणि खतरा संकलन
असा इतिहास शाळेत का शिकवला गेला नाही हा नेहमी प्रश्न पडतो

मारकुटे's picture

20 Jan 2014 - 9:58 am | मारकुटे

असा इतिहास शिकवणे हे इतिहासाचे भगवीकरण असते त्यामुळे.

मारकुटे's picture

20 Jan 2014 - 9:58 am | मारकुटे

सुरेख लेख

सुहास..'s picture

20 Jan 2014 - 10:43 am | सुहास..

विलक्षण अभ्यासु लेख !!

आम्हाला फक्त दिसलं की हात जोडायची सवय ;)

जेपी's picture

20 Jan 2014 - 10:48 am | जेपी

*clapping* *BRAVO* :BRAVO: :bravo: :clapping:

अनिल तापकीर's picture

20 Jan 2014 - 11:42 am | अनिल तापकीर

अप्रतिम ..........

यसवायजी's picture

20 Jan 2014 - 11:44 am | यसवायजी

__/\__

अनन्न्या's picture

20 Jan 2014 - 12:11 pm | अनन्न्या

अशी माहिती घेऊन एखादे ठिकाण पाहिल्यास अजून आनंद मिळतो.

विटेकर's picture

20 Jan 2014 - 12:43 pm | विटेकर

--------/\-------------

अनिरुद्ध प's picture

20 Jan 2014 - 5:45 pm | अनिरुद्ध प

अभ्यास्पूर्ण लेखन पु ले शु,एक प्रष्ण आहे की शिवलिंगाचे श्रुंग हे उत्तर दिशा दर्शवते किंवा उत्तरेकडे असते हे खरे आहे का?

होय, शाळुंकेची वहाण उत्तरेकडे असावी अश्या तर्‍हेने शिवलिंग स्थापलेले असते.

प्रचेतस's picture

20 Jan 2014 - 6:43 pm | प्रचेतस

दिशेबद्दल माहिती नाही.
पण शिवलिंगाची पन्हळ (शाळुंकेचा लांबट भाग) हा साधकाच्या उजवीकडे असावा असा संकेत आहे.

पाटेश्वरची शाक्तपंथीय शिवलिंगे ह्या संकेताला छेद देतात.

a--a

अनिरुद्ध प's picture

20 Jan 2014 - 6:53 pm | अनिरुद्ध प

पण कदाचित श्रुन्ग हे उत्तर दिशेला ठेव्ण्याच्या पद्धती साठी सुद्धा असु शकेल? हे दिशादर्शकाचा वापर करुन ठरवता येवु शकेल.

पिलीयन रायडर's picture

20 Jan 2014 - 6:09 pm | पिलीयन रायडर

बापरे.. किती ती माहिती..!!!
ज ब र द स्त !!!!

____/\_____

त्र्यंबकेश्वराचे शिवलिंग हे ही एक वेगळ्या प्रकारचे शिवलिंग आहे. इथे लिंग शाळुंकेच्या वर नसुन, शाळुंकेत लिंगाच्या जागी एक खड्डा आहे. त्यात शिव, विष्णु आणि ब्रम्हा अशी ३ छोटी छोटी लिंगे आहेत.

अनिरुद्ध प's picture

20 Jan 2014 - 6:48 pm | अनिरुद्ध प

तसेच बहुतेक ज्योतिर्लिन्ग हे वेगवेगळ्या मांडणीचे आहे असे वाटते.

राजेंद्र मेहेंदळे's picture

20 Jan 2014 - 8:01 pm | राजेंद्र मेहेंदळे

वल्ली यांचे लेख नेहमीच उत्तम वाचनाचा अनुभव देणारे असतात. या लेखाचेही तेच.
या लेखांचे संकलन करुन एक पुस्तक व्हावे हीच ईच्छा

मार्कस ऑरेलियस's picture

20 Jan 2014 - 8:06 pm | मार्कस ऑरेलियस

काय सुंदर शिल्प आहेत !!
इतकं गुळगुळीत पॉलीश कसं करायचे हे लोक ? आश्चर्यच आहे !!

अवांतर : स्त्रियांची शिल्पे करीत असताना सगळ्याच कलाकारांच्या मनात विशेषकरुन बंगाली स्त्रिया असाव्यात असे वारंवार वाटत रहाते ... ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Jan 2014 - 8:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ग्रेट वल्लीचा आणखी एक माहितीपूर्ण लेख. च्यायला, आता पुन्हा सिद्धेश्वर मंदिरातील इशण मूर्ती शोधणे आले.

-दिलीप बिरुटे

राघव's picture

20 Jan 2014 - 8:58 pm | राघव

अप्रतीम लेख. कितितरी वेळ आ वासून वाचत बसलो होतो. वाचनखूण साठवलेली आहेच.

अवांतर:
आपले चरणकमलांचे फोटू लवकरात लवकर डकवणे. दर्शन घ्यावे म्हणतो! ;)

अप्रतीम लेख. कितितरी वेळ आ वासून वाचत बसलो होतो.

+११११

वल्लीदा.. तुस्सी ग्रेट हो.. तुमची निरिक्षणं.. त्याचा अभ्यास.. अचुकता.. सगळंच कसं "अहाहा.." अन "व्वाह!!"

स्वच्छंदी_मनोज's picture

20 Jan 2014 - 11:00 pm | स्वच्छंदी_मनोज

वल्ली साहेब जबराच... अफाट व्यासंगाचा प्रत्यय...

माझ्या अल्पमती प्रमाणे एक शंका.. बहुतेक वेळा शिवमंदीरात जाताना शिवपिंडीचे दर्शन घ्यायला पायर्‍या उतरून खाली जावे का लागत असावे? कोकणातील बिमलेश्वर सारख्या मंदिराचे एखाद दुसरा अपवाद वगळता हेच सगळीकडे दिसून येते..

पुढच्या ट्रेकला जाताना अधिक डोळसपणे शिवमंदीरे पाहीन..

बाकी काही म्हणा ह्या वल्लीने मंदीरे कशी पहावी हे शिकवले. नाहीतर आम्ही म्हणजे मंदीरात गेल्यावर आपल्या चपला चोरील्या गेल्या नाहीतना हे बघायला देवाला हात जोडून लगेच बाहेर यायचे..

प्रचेतस's picture

21 Jan 2014 - 12:47 pm | प्रचेतस

सर्वसाधारणपणे शिवपिंडीचे खालच्या पातळीत दिसत असली तरी तो तसा नियम नाही. बर्‍याच प्राचीन शिवमंदिरांमधील शिवपिंडी ह्या सभामंडपाच्या पातळीतच आहेत. उदा. वेरूळ, खिद्रापूर,, पिंपरी दुमाला, पेडगावचे बाळेश्वर.

पैसा's picture

21 Jan 2014 - 1:35 pm | पैसा

प्रॅक्टिकल शक्यता अशी की शिवलिंगावर अभिषेक सतत सुरू असतो. त्यातील इकडे तिकडे उडालेले पाणी गाभार्‍यातच रहावे आणि त्या पाण्याने सगळे देऊळ ओले/निसरडे होऊ नये यासाठी कदाचित अशी रचना करत असावेत.

तसेच एक अजुन पाहिले आहे की शिव मंदीराला लागुनच पाण्याचा स्त्रोत किंवा तलाव असतो...पूर्वीच्या काळी ओलेत्यानेच महादेवाची पुजा / दर्शन करावे असा प्रघात असावा असे मला वाटते. { हा माझा फक्त अंदाज आहे.}

शिवमंदिरांमधील शिवपिंडी ह्या सभामंडपाच्या पातळीतच आहेत.
कोल्हापुरच्या अंबाबाईच्या मंदिरातील शिवमंदीर हे तर एक माळा वर आहे.

पुण्यात नूमविशेजारी आनंदाश्रम संस्थेत एक शिवमंदिर आहे तेही फर्स्ट फ्लोअरवर आहे.

एस's picture

20 Jan 2014 - 11:39 pm | एस

पैसाताईंचा प्रतिसाद खासच. लिंग-रुद्र-शिव इत्यादी उपासना ही प्रजननाचा गौरव करण्याच्या मूळ पॅगन पद्धतीच्या परंपरेतून विकसित झाली असावी.

बाकी मलातरी मूर्त्यांमधले फरक पटकन समजत नाहीत. त्यातील कलासौंदर्यापलिकडे जाऊन विचार करणे मला जमत नाही, पण वल्लींचे लेख वाचून हातातल्या कॅमेर्‍याला थोडं खाली ठेऊन मूर्त्या पाहत जाईन इथून पुढे. :)

पैसा's picture

21 Jan 2014 - 9:12 am | पैसा

लिंग-रुद्र-शिव इत्यादी उपासना ही प्रजननाचा गौरव करण्याच्या मूळ पॅगन पद्धतीच्या परंपरेतून विकसित झाली असावी.

नक्कीच! कारण मातृदेवता स्वरूपात भूमीची पूजा करणे आणि लिंगपूजा हे वर इस्पीकचा एक्का यांनी म्हटल्याप्रमाणे संस्कृतीच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून सगळ्या जगभर दिसून येते.

पण वल्लींचे लेख वाचून हातातल्या कॅमेर्‍याला थोडं खाली ठेऊन मूर्त्या पाहत जाईन इथून पुढे.

आपण कुठेही फिरायला म्हणून जातो आणि खर्‍या अर्थाने तिथे काही न बघता कॅमेर्‍यात जमेल तेवढं साठवायचा प्रयत्न करतो. एखाद्या ठिकाणी कॅमेरा न नेता नुसत्या डोळ्यांनी पाहण्याचा प्रयत्न केला पाहिजे! ते वल्लीला जमलं आहे!!

प्रचेतस's picture

21 Jan 2014 - 12:22 pm | प्रचेतस

हाहाहा.
मी पण बरेचवेळा आधी साध्या डोळ्यांनी आणि मग लगेच क्यामेर्‍याच्या डोळ्यांनी पाहतो. हल्ली मात्र एकदा झालेल्या ठिकाणी परत कॅमेरा नेणं जवळपास बंद केलंय. :)

एस's picture

21 Jan 2014 - 11:17 pm | एस

मातृदेवता स्वरूपात भूमीची पूजा करणे आणि लिंगपूजा हे वर इस्पीकचा एक्का यांनी म्हटल्याप्रमाणे संस्कृतीच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून सगळ्या जगभर दिसून येते.

ह्यातील काही प्रथा त्यांच्या साधारणतः मूळ स्वरूपात आजही कुठेकुठे टिकाव धरून असल्याचे दिसते. उदा. शेतात लावणीच्या वेळच्या काही प्रथा.

आपण कुठेही फिरायला म्हणून जातो आणि खर्‍या अर्थाने तिथे काही न बघता कॅमेर्‍यात जमेल तेवढं साठवायचा प्रयत्न करतो.

याच विषयावर नुकतीच एका संशोधनाची बातमी वाचल्याचं आठवतंय. त्यात शास्त्रज्ञांनी लोकांचे दोन गट केले आणि एका गटाकडे कॅमेरे देऊन तर दुसर्‍या गटाला नुसतेच विविध कार्यक्रमांना पाठवले. जे छायाचित्रे काढण्यात गुंतले होते त्यांना त्या समारंभांतल्या छोट्या छोट्या गोष्टी नीटशा सांगता येत नव्हत्या. दुसरा गट मात्र सर्व तपशील व्यवस्थित सांगू शकला. पण या प्रश्नाला दोन बाजू आहेत. आपण ज्या आठवणी छायाचित्रांच्या स्वरूपात जतन करू शकलो नाही त्याबद्दलही हळहळतो आणि छायाचित्रांच्या नादात मुख्य हेतू बाजूलाच राहिला असेही म्हणतो.

एक छायाचित्रकार म्हणून मी माझ्यापुरतीतरी एक भूमिका निवडतो आणि त्यात पूर्णपणे गुंतून जातो. उदा. मी आणि वल्ली एकत्र एकाच ठिकाणी गेलो तर एकाच मूर्तीकडे पाहताना वल्लींना त्या मूर्तीच्या वैशिष्ट्यांकडे लक्ष द्यावेसे वाटेल तर मला त्या मूर्तीचे चांगले छायाचित्र कसे टिपता येईल, त्यासाठी तिच्यावर प्रकाश कुठून आला पाहिजे, कुठल्या कोनातून प्रतिमा घ्यावी असे प्रश्न पडतील. मग ती मूर्ती शिवाची आहे की पार्वतीची हा मुद्दा माझ्यासाठी थोडा गौण असेल. वल्ली त्यांच्या माहितीसंग्रहावर खूष असतील आणि मी कॅमेर्‍यातल्या प्रतिमेच्या पूर्वदृश्यावर. :)

(अर्थात याला एक प्रकार अपवाद आहे आणि तो म्हणजे वन्यजीव व पक्षीछायाचित्रण. येथे ते जीव आणि त्यांचे जीवन सर्वात महत्त्वाचे. अगदी तुम्ही वन्यजीवछायाचित्रकार असाल आणि छायाचित्रणासाठीच तिथे गेला असाल आणि कितीही दुर्मिळ क्षण टिपायची तुमची कदाचित एकमेव संधी समोर असेल, तरी आणि तरीही त्या परिस्थितीत छायाचित्रण ही सर्वात शेवटची महत्त्वाची गोष्ट असेल. यावरती सविस्तर पुन्हा कधीतरी त्या विषयावरील धाग्यात... )

प्रचेतस's picture

22 Jan 2014 - 9:00 am | प्रचेतस

अगदी अगदी.

मूर्ती पाहून झाल्यावर नुसते फोटो घेणे हे माझे काम. फोटोच्या सौंदर्याकडे फारसे लक्ष दिले जात नाहीच.

पैसा's picture

22 Jan 2014 - 10:46 am | पैसा

मस्त प्रतिसाद! वन्यप्राणी निरीक्षण आणि छायाचित्रण यावर जरूर एखादा लेख येऊ दे!

रामपुरी's picture

21 Jan 2014 - 3:53 am | रामपुरी

नेहेमीप्रमाणेच माहितीने ओतप्रोत भरलेला सुंदर लेख.
एवढी माहिती तुम्हाला मिळते कुठून याचे जबरदस्त कुतूहल आहे. :)
पु भा प्र

नाखु's picture

21 Jan 2014 - 12:53 pm | नाखु

इतका तपशीलवार लेख निवांत (चवी-चवीने) वाचला तरच समजेल वल्लीं बरोबर आपण काय पाहीलय तें

शिवलिंग आणि मूर्ती यांच्याकडे पाहण्याची 'दृष्टी' देणारा अभ्यासपूर्ण लेख.
अतिशय आवडला.

कंजूस's picture

22 Jan 2014 - 6:10 am | कंजूस

लेख आवडला .

सर्व मूर्ती सहाव्या शतकांनतरच्या आहेत . आठव्या शतकांनतरच्या मूर्ती फार आखीव रेखीव होऊ लागल्या (=सुबक ?)आणि भाव लोप पावले .

गंडकी नदीतल्या काळ्या शाळीग्रामाचा वापर थोडा नंतर सुरू झाल्यावर काही ठिकाणची लिंगे नंतर बदलण्यात आली असावीत .

परकी आक्रमणांत लिंगे फोडली गेल्यावर तेथे नवीन न बसवता "गुप्तलिंग " म्हणू लागले असावेत .(भिमाशंकर ?)

प्रचेतस's picture

22 Jan 2014 - 8:58 am | प्रचेतस

परकी आक्रमणांत लिंगे फोडली गेल्यावर तेथे नवीन न बसवता "गुप्तलिंग " म्हणू लागले असावेत .(भिमाशंकर ?)

सहमत. आज जिथे लिंग दिसत नाही ती बहुतांश मूर्तीभञ्जकांनी भग्न केलेली आहेत. काही मोरीच्या वाटेवर तर काही विहिरीतून पाणी शेंदताना उभे राहण्याच्या जागी बसवली गेलेली.

असेच एक सासवडच्या चांगावटेश्वर मंदिरातील भग्न शिवलिंग. धडधडीतपणे फोडून काढल्याचे दिसत असूनही हे शिवलिंग गुप्त आहे असे तिथल्याच एका फलकावर लिहिलेले आहे.

a

जयंत कुलकर्णी's picture

22 Jan 2014 - 9:12 am | जयंत कुलकर्णी

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
वर हत्तेचे शेपूट दिसत आहे तर फाडलेल्या हत्तेचे तोंड खाली. कापलेला असल्यामुळे चार बाजूला चार पाय व हाताने त्याचे कातडे सावरलेले दिसत आहे....

प्रचेतस's picture

22 Jan 2014 - 11:32 am | प्रचेतस

मस्त.
काय सुरेख कला आहे ही होयसाळांची.

डॉ सुहास म्हात्रे's picture

22 Jan 2014 - 12:15 pm | डॉ सुहास म्हात्रे

फारच सुंदर शिल्प ! भारतात अशी कला किती ठिकाणी दुर्लक्षित पडलेली आहे कोण जाणे. अनेक परकिय कलावस्तूंची तारिफ करताना आपल्याला अश्या भारतिय कलाकृतींची धड माहितीही नसते :(

मुर्तीशास्त्रावर आणखी जबरदस्त लेख वाचायला मिळालाय तुझ्याकडून.:) परवा महाबळेश्वराच्या मंदिरातही शिवलिंगाचा नवीन प्रकार मिळाला.

शेखरमोघे's picture

22 Jan 2014 - 9:33 am | शेखरमोघे

"मिपा" कराना चर्चेकरिता आवडेल असा एक "भैरव" अनेक वर्षापूर्वी नेपाळमध्ये पाहिला होता. या भैरवाला अल्कोहोलचा नैवेद्य आवडतो. माझ्याकडील स्थिरचित्रात याचे चित्र आहे ते जोडत आहे "नैवेद्य" मूर्तिवर दिसत असलेल्या छिद्रात टाकायचा असतो असे आठवते.

bhairav
पण योग्य चित्र निवडल्याची खात्री नसल्याने पट्कन सापडलेला एक दुवा देखील जोडत आहे.

http://brookstonbeerbulletin.com/beer-in-art-45-the-hindu-god-shiva-as-b...

भाग्यश्री कुलकर्णी's picture

22 Jan 2014 - 10:15 am | भाग्यश्री कुलकर्णी

उज्जैन जवळही एक भेरवनाथाचे मंदीर आहे.त्यालाही दारुचाच "भोग" चढवतात.आमचे कुलदैवत असलेल्या कर्‍हाडजवळील भैरोबाला पुर्वी गांजाची चिलीम भरुन नेवैद्य दाखवायचे असे आमचे सासरकडच्या वडीलधार्‍यांनी सांगीतलेले पुसटसे स्मरते आहे.

योगेश आलेकरी's picture

10 Dec 2015 - 2:20 pm | योगेश आलेकरी

कुडाळ मधिल मुर्तींना अजुनही गांजाचा नैवद्य लागतो माहितेय पण कराडमधील कोणतं मंदिर कळेल का ???

बदामिच्या गुंफेंत आणि परिसरां त छान लिंगे आणि साडेसहाफुटी पूर्ण शिवमूर्ती अखंड आहेत .

ऐहोळे गावातील मंदिरातल्या पिंडीवर पाणी टाकले की त्यात नंदीचे प्रतिबिंब दिसते (मोटरच्या आरशात दिसते तसे)