Kundalinee -- Made easy

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
6 Jan 2014 - 10:00 am

कुंडलिनी ही भानगडच एकंदरीत अवघड असल्याने त्या वरील लेख अनाकलनीय असल्यास आश्चर्य वाटावयाचे कारण नाही. परंतु शरद सरांच्या क्लासमध्ये यावरील सुलभीकरण करणारे एक चिटोरे (leaflet) सापडले. कुंडलिनीबद्दल प्रत्यक्षाप्रत्यक्ष ज्ञान असणारे महाभाग सोडून इतरांकरिता अशा लीफलेट्सचा उपयोग मोठा असतो. तुम्हाला कुंडलिनी बद्दल ओ की ठो कळ्त नसले तरी मित्रमंडळात छाप पाडावयास, आपण कसे बहुश्रुत आहोत हे दाखवावयास, यांचा फार उपयोग होतो.

Kundalinee -- Made easy

(१) ध्येय ...आपले कोणतेही काम करून घ्यावयाचे असले तर आपली फाईल निरनिराळ्या टेबलांवरून हेड ऑफिस मधील साहेबांपर्यंत पोचवावी लागते तसे आपले "मन/ प्राण" तुम्हाला सहस्रारचक्रातील (हेड ऑफिसचे संस्कृतीकरण) शिव/ईश्वर या नावाच्या साहेबाकडे,(big boss) नेऊन पोचवायाचे आहे.

(२) आर.टी.ऒ.तल्या कामाकरता जसा "एजन्ट" नावाचा प्राणी ,ज्याच्या शिवाय तुमचे काम इन्चभरही पुढे सरकू शकत नाही, लागतो तसे वरील कामाकरिता तुम्हाला "गुरू" नावाच्या महापुरुषाची गरज लागते. तो भेटला नाही तर इकडॆ फिरकूच नका. प्रत्येक स्थानाचर काय काय सरकावयाचे, "टीप्स" द्याव्या लागतात याबद्दच्या टीप्स हाच तुम्हाला देतो.

(३) कुंडलिनी ... एक महामाया ,(ही लई पावरफुल, नगिणीसारखी असल्याने तिला शक्ती असेही म्हणतात.) खरे म्हणजे ही शिव या बिग बॉसची सखीच. पण बॉसजवळ राहण्याऐवजी खालच्या लो डिविजन केबिनमध्ये (मूलाधारचक्र) ती .ऒफिसमधील क्लर्कसारखी नेहमी झोपलेली असते. दोघांपैकी कोणाला जागृत करणे जास्त अवघड याचा शोध अजून लागलेला नाही. स्थान ... रेशन दुकानातील धान्य वा एम.एस.ई.बी. मधला कंप्लेंट घेणारा क्लर्क नक्की कुठे असतो हे सांगणे जसे कुणालाच ठाउक नसते तसे हिचे आहे.
कुंडलिनीला जागे करण्यासाठी जे फ़िल्डिंग लावावे लागते ते असे :
(अ) आसने शिकण्य़करिता एखादा क्लास धरावा. मुख्य कामाशिवाय आरोग्य सुधारू शकते म्हणून थोडा वेळ गेला तर कुरकुर करू नये. ( पुण्यात असाल तर अयंगार नावाच्या महायोग्याकडॆ फिरकूही नका. त्यांची ख्याती अशी की ते नवागताचे तंगडे त्याच्याच गळ्यात असे काही अडकावून देतात की ते सोडावयास दोन पहीलवान लागतात !) मित्रात सांगतांना "मी शेवटी शवासन करतो" असे बिन्धास्त सांगावे. शेवटी म्हणजे टीव्ही वरचा सिनेमानंतर असा असला तरी तरी त्यांना इतर आसनांनतर असे वाटेल.
(ब) प्राणायाम म्हणजे नेहमीचा श्वासोच्छ्वासच पण जरा निराळ्या पद्धतीने केलेला. श्वास घ्या (पूरक) , थांबा (कुंभक) व सोडा (रेचक) प्राणायामावर बोलतांना हे तीन शब्द फिरवावे लागतात. जरा जास्तच इम्प मारावयाचे असेल तर केवलकुंभक हा शेवटच्या स्टेजमध्ये अत्यावष्यक हे सांगण्यास विसरू नये.
(क) बंध तीन बंधांची नावे पाठ करावित. जालंधर, उड्डियान व मूलाधार. तोंड भेसूर करून हनुवटी गळ्यावर दाबली की जालंधर बंध होतो. पाठ ताठ ठेवून पोट (शक्य तेवढे) आत नेले की उड्डियान बंध होतो. हे दोन केव्हाही करून दाखवता येतात. तिसरा फक्त बोलण्यात. बंध योग्य प्रकारे करावयास शिकण्यात फार वेळ गेला हे अवष्य नमूद करावे.
(4) नाडी याचा शिंपल अर्थ मार्ग. खालच्या मजल्यावरील टेबलावरून वरच्या मजल्यावर जाण्याचा मार्ग. इडा पिंगला हे सामान्य, "आम" लोकांचे मार्ग. यांनी काम पुढे सरकतच नाही. आपण फ़िल्डिंग लावून कुंडलिनी बाईसहेबांना जागे केले असल्याने तिकडे लक्ष न देता या महामाया जा मार्गाने जातात (सुषुम्ना) त्याच मार्गाने त्यांच्या मागून सटकावयाचे. सामान्य हपिसात लो.डि. क्लर्क, अ.डि. क्लर्क, सेक्शन हपिसर, दिव्हिजनल हपिसर यांची टेबले/ कॅबिन्स लागतात. तशी येथे (षटचक्रे). गुरूने पढविल्या प्रमाणे वागून त्यांचा क्लीअरन्स घेतल्याशिवाय कुंडलिनी पुढे सरकत नाही. शेवटी सहस्रारचक्रात बिग बॉसची भेट झाली की "आनंदीआनंदच"

आता बर्‍याच जणांना वरील फ़िल्डिन्ग लावणे जमत नाही किंवा तितका त्रास घेण्याची इच्छा नसते. त्यांच्या करिता आणखी एक मार्ग आहे. कुंडलिनीची "भक्ती" नावाची एक साधीसुधी,खेडेगावातील म्हणालात तरी चालेल, मैत्रीण आहे. तिला बरोबर घेऊन जर तुम्ही कुंडलिनीला भेटाल तर तुमचे काम झालेच असे समजा. एकदम जंक्शन काम.

तर वरील लहानसा पाठ पाठ करून तुम्ही इम्प्रेशनचे काम १००% करू शकाल. एखादी खवट मैत्रीण "तुला काय अनुभव आहे ?" असे हमखास विचारेल. त्याची तयारी आधीच केली पाहिजे. "सुरवात्र चांगली झाली होती, पण महाराज म्हणाले, तुला वेळ नसतो ना, ठीक आहे, हठयोगाऐवजी तू सहजयोग सुरू कर
. पण मी त्यांच्या परवांगीशिवाय तुम्हाला काहीच सांगू शकत नाही. त्यांचे नाव देखील."
<strong>Imp. (१) ठळक शब्द तोंडपाठ करा.
(२) बंधांची प्रक्टिस करा.
(३)षटचक्रांची नावे पाठ करणे अवघड असल्याने फक्त षटचक्रे एवढेच घोकत रहावे.
(४) सद्गुरू भेटणे ही नशिबाची गोष्ट आहे हे जाता जाता दोनदा तरी सांगावे.

आपल्या क्लासची कोठेही शाखा नाही.
अध्यात्माबरोबर, ज्ञानेश्वरी, अमृतानुभव यांमधील कठीण शब्दांचे/ओव्यांचे अर्थ, फोटोग्राफीतील रॉ फ़ाईल्स,,तंजाऊर येथील मर्‍हाटी साहित्य इ. असल्या (किचकट) विषयांवरील नोट्स मिळतील.

शरद

(केवळ मनोरंजनाकरितां

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

इन्दुसुता's picture

6 Jan 2014 - 10:12 am | इन्दुसुता

आवडले :)

राही's picture

6 Jan 2014 - 12:18 pm | राही

अध्यात्म मनोरंजक 'श्टाइल'ने पेश करण्याची ही श्टाइल आवडली.

विअर्ड विक्स's picture

7 Jan 2014 - 11:55 am | विअर्ड विक्स

निषेध...

अय्यंगार यांचे योग या विषयातील कार्य महान आहे.

आपण पुणेकर असाल तर सकाळमधील योगविषयक सदर जरूर वाचावे......

आनन्दा's picture

7 Jan 2014 - 1:36 pm | आनन्दा

अहो ते उपरोधिक आहे..