फुकटची समाजसेवा -पुढे

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
23 Jun 2013 - 8:54 pm

मी मुम्बैच्या अश्विनी रुग्णालयात इंटर्नशिप करीत असतानाची (१९८८) गोष्ट आहे. एके दिवशी रात्री साधारण साडे आठ वाजता एका नौदलाच्या अधिकारी(लेफ्टनंट कमांडर यादव) एका पोस्टाच्या कर्मचार्याला घेऊन आला. त्या अधिकार्याने स्कूटर चालवत असताना या कर्मचार्याला धक्का दिला होता. त्यानंतर झालेल्या वादात तो त्याला नौदलाच्या रुग्णालयात घेउन आला होता. मी त्या कर्मचार्याची तपासणी करू लागलो तेवढ्या वेळात तो नौदल अधिकारी तेथून पसार झाला. मी त्याची तपासणी केल्यावर माझ्या असे लक्षात आले कि त्याच्या घोट्याला वाईट फ़्रैक्चर आहे आणि त्याची शल्यक्रिया करणे आवश्यक आहे. आता हा कर्मचारी नौदलाचा नव्हता तेंव्हा त्याची शल्यक्रिया आश्विनीत होणे शक्य नव्हते. मुळात पोस्टाच्या कर्मचार्यांबद्दल मला थोडी सहानुभूती आहे. अत्यावश्यक सेवा असल्याने संपावर जाता येत नाही, सत्ता, उपद्रवमूल्य आणि अधिकार नसल्याने सरकार दरबारी कुत्र विचारात नाही अशी परिस्थिती आहे. यामुळे मी त्या कर्मचार्याला सांगितले कि आपल्याला शल्यक्रिया करणे आवश्यक आहे तेंव्हा तुम्ही के ई एम रुग्णालयात जाल का?मी तुम्हाला चिट्ठी देतो तेथे माझा मित्र अस्थि व्यंगोपचार विभागात आहे तो आपली सर्व काळजी घेईल. यावर त्याने होकार दिला. मी माझ्या मित्राला ( डॉ अभिजित भाटे) के ई एम रुग्णालयात फोन केला आणि सर्व परीस्थिती सांगितली. नंतर त्या कर्मचार्याला टैक्सी बोलावून त्यात बसवून दिले. हि हकीकत मी नौदलाच्या पोलिसांनासुद्धा कळवली आणि शांत झोपलो.डॉ अभिजित ने दुसर्या दिवशी मला फोन करून कळवले कि तो माणूस वेळेत आला त्याची एक रक्तवाहिनि चेपली गेली होती आणि हाडांचा आत चुरा झाला होता पण आता शल्यक्रियेनंतर दीड एक महिन्यांनी हा माणूस व्यवस्थित चालू शकेल. हे ऐकून मला समाधान वाटले
दुसर्या दिवशी संध्याकाळी त्या कर्मचार्याचा मुलगा मला भेटायला आला आणि म्हणू लागला कि के ई एम रुग्णालयात याची पोलिसकेस झाली आणि त्यांनी (लेफ्टनंट कमांडर यादव) यांचा पत्ता मागितला आहे. मी त्याला सांगितले कि मी लेफ्टनंट कमांडर यादव हा काळा कि गोरा ते पाहिलेले नाही आणि हि गोष्ट मी नौदल पोलिसांना कळवलेली आहे. तेंव्हा तुम्ही त्यांचाशी संपर्क साधा. यावर तो माणूस मला धमकी द्यायला लागला कि तुम्ही पोलिसांना कळवले पाहिजे होते आणि आता तुम्ही त्या अधिकार्याची पाठराखण करीत आहात हे बरोबर नाही. मी हे प्रकरण वरपर्यंत नेईन. मी त्याला म्हटले तुम्हाला काय करायचे ते करा मी काही तुमच्या वडिलांना ठोकलेले नाही.या नंतर तो मुलगा तेथून निघून गेला
हे ऐकून तेथील एक वरिष्ठ नौदल अधिकारी मला म्हणाला कि तू अशा लफड्यात पडायला नको होतेस त्याला के इ एम ला पाठवायला नको होतेस. तुझी इंटर्नशिप चालू आहे हे प्रकरण तुझ्या उमेदवारीच्या काळात तू घडू द्यायला नको होतेस.
हे ऐकून मला पण टेन्शन आले म्हणून मी ताबडतोब माझ्या वडिलांना फोन केला. ते शांतपणे म्हणाले. तू काहीही गुन्हा केलेला नाहीस उलट तू त्याला सरकारी रुग्णालयात पाठवून त्याची मदत केली आहेस तुझ्या इंटर्नशिप मध्ये कोणताही व्यत्यय येणार नाही. तेंव्हा डोके थंड ठेव आणि झोप. हे ऐकून मला पूर्ण धीर आला. आणि मी थंडपणे झोपलो.दुसर्या दिवशी सकाळी त्या कर्मचार्याच्या मुलाचा मला फोन आला कि मी आमच्या नगरसेवकाशी सल्ला मसलत केली त्यांचे म्हणणे असे पडले कि हे डॉक्टर खरे त्या यादवला संरक्षण देत आहेत आणि हि गोष्ट चांगली नाही. याचे परिणाम बरे होणार नाहीत.
यावर मी आवाज चढवून त्याला ऐकवले कि तुम्ही नगरसेवकच का मुख्य मंत्र्यांना जरी घेऊन आलात तरी तुम्हाला माझ्या केसाला धक्का लावता येणार नाही. तुमचा बाप त्या यादव बरोबर तीन तास होता त्यात त्याने यादव चा पत्ता का घेतला नाही हे तुम्ही तुमच्या बापाला का विचारत नाही? मी तुमच्या बापाला मदत केली हि माझी घोड चूक झाली. पुन्हा अशी चूक मी आयुष्यात करणार नाही. लेफ्ट कमांडर यादव यांना नौदल पोलिसांनी नोटीस पाठविली आहे तेंव्हा त्याचे काय ते ते पाहून घेतील राहिली गोष्ट तुमची. मला तुम्ही परत कुलाब्याच्या आसपास दिसलात तर तुमचे तंगडे मोडून मी तुमच्या हातात ठेवीन.
बापाचा हात मुलाच्या पाठीवर असल्याचा परिणाम काय असतो हे सांगून कळणारे नाही.

दुसरी गोष्ट १९९९ सालची आहे मी विशाखापट्टणम ला कोस्टगार्डच्या वज्र या जहाजावर होतो. शिवाय मी तेथील कल्याणी या रुग्णालयात क्ष किरण तज्ञ म्हणून काम करीत होतो. एकदा मी कल्याणी मधून संध्याकाळी पाच वाजता मोटर सायकल वर निघालो. मला साडे पाच वाजता कोस्टगार्डच्या एका महत्त्वाच्या मिटिंग ला जायचे होते. मी पूर्ण गणवेशात होतो आणि हा रस्ता विशाखापट्टणम डॉकयार्ड च्या बाहेरून जातो. या रस्त्याने जाताना डॉकयार्डची सुट्टी झाल्याने तेथील कर्मचारी गेटातून मोठ्या संख्येने बाहेर पडत होते. थोडे पुढे गेल्यावर मला रस्त्याच्या कडेला थोडी गर्दी दिसली आणि त्या गर्दीपासून थोड्या अंतरावर एक माणूस मिरगी (अपस्माराचा) झटका आल्यामुळे झटके देत होता. रस्त्याच्या उजवीकडे डॉकयार्ड आणि डावीकडे रस्त्याच्या कडेला हा माणूस आकडी आलेला. मी साधारण तीस वेगाने जात होतो. घड्य्लात पहिले तर माझ्याजवळ मिटींगला पोचायला दहा मिनिटे होती म्हणून मी त्याच्या कडे पहात पाहत पुढे गेलो. एवढ्या वेळात (एक ते दोन मिनिटात) त्याचे झटके देणे होते तेंव्हा माझ्या लक्षात आले कि हे प्रकरण साधे नाही. माझ्या डोक्यात हे पण आले कि जर रस्त्यावर एखादा माणूस झटके देत आहे आणि मी त्याला मदत करू शकलो नाही तर मला स्वतःला डॉक्टर म्हणण्याचा काय अधिकार आहे? या विचाराने मी जवळजवळ अर्धा किमी पुढे आलेला मागे फ़िरलो . मिटिंग गेली खड्यात जे होईल ते उद्या पाहू म्हणून मी या माणसा जवळ आलो याला अजुनहि झटके येतच होते. माझ्या लक्षात एके कि हि केस (status epilepticus) ची आहे महा मिरगी आणि याला वेळेत उपचार झाले नाहीत तर हा माणूस शिण किंवा क्लांती(exhaustion) ने मरेल.हा माणूस येथे एकटा पडलेला फिट्स देत होता आणि सर्व लोक बघ्या सारखे उभे होते. डॉकयार्ड मध्ये पाच हजार कर्मचारी आहेत पण एकही माणूस त्याला ओळखायला व मदत करायला पुढे आला नाही
एवढ्यात मला एक नौदलाचा पोलिस मोटर सायकलने उलटा जाताना दिसला मी त्याला थांबवून सांगितले कि डॉकयार्ड डिस्पेन्सरित जा आणि ताबडतोब रुग्णवाहिका पाठवून दे. यावेळेपर्यंत मी त्या माणसाला उपडा वळवला होता. जीभ चावू नये म्हणून तेथे असलेले एक लाकूड त्याच्या दातात घातले होते आणि त्याच्या श्वसनावर आणि नाडी वर हात ठेवून होतो. अशी अजून पाच मिनिटे गेली दहा मिनिटे गेली तरी रुग्णवाहिका काही येईना शेवटी मी त्या माणसाला तसाच उपडा ठेवून उठलो मोटर सायकल उचलून जवळच असलेल्या(१ किमी) डॉकयार्ड डिस्पेन्सरित गेलो तेथे रागाने विचारले कि अजून रुग्णवाहिका का पाठवली नाही त्यावर तेथील वैद्यकीय सहाय्यक म्हणाला कि सर रुग्णवाहिका पाणबुडी केंद्रात गेली आहे आली कि लगेच पाठवतोच. मी त्याला रुग्णवाहिका ताबडतोब पाठविण्याचे आदेश दिले. आतमध्ये गेलो दोन डायझेपम ची इंजेक्शने सिरींज स्पिरीट लावलेला कापूस असे एका डबीत घेऊन लगेच मोटर सायकल उचलून त्या माणसा जवळ आलो. तो अजूनही झटके देत होता. माझ्या हातात इंजेक्शन पाहून दोन माणसे पुढे आली मी त्यांना त्याचा हात धरायला सांगितले. आणि तशा हलत्या अवस्थेत त्याला शिरेतून १० मी ग्रॅम डायझेपम चे इंजेक्शन दिले पुढच्या दोन मिनिटात कमीकमी होत त्याचे झटके बंद झाले आणि तो शांत झाला. आता एकदम बरेच लोक पुढे आले. त्यातील दोन लोक त्याच्या विभागातील होते. हा डॉकयार्डच्या पाईपिंग विभागात काम करणारा कर्मचारी होता आणि याचे नाव अप्पा राव असे होते वय ५१ वर्षे. मी त्या लोकांना रागाने विचारले कि तुम्ही एवढा वेळ काय करीत होतात त्यावर लोकांनी मला सुरस आणि चमत्कारिक अशी उत्तरे दिली कि आम्हाला वाटले तो दारू प्यायला आहे पासून तो आता मरणार आहे तर लफड्यात का पडा? जे दोन लोक पुढे आले होते ते म्हणाले कि साहेब आम्ही आत्ताच आलो आणि तुम्ही इंजेक्शन घेऊन आलात म्हणून तूमहाला मदत करण्यासाठी पुढे आलो. एक दीड शहाणा मला म्हणाला कि सर याला असे ५ वाजल्यापासून होत आहे.( तेंव्हा पाच चाळीस झाले होते) मी रागाने विचारले कि मग तू काय गोट्या खेळत होतास. त्यावर तो फक्त हसला. हि दोन माणसे फक्त म्हणाली साहेब आम्ही त्याला ओळखतो आणि आम्ही त्याला घरी घेऊन जातो. मी त्यांना निक्षून सांगितले त्याला(अप्पा राव) ला घरी नेऊ नका त्याला KGH (किंग जॉर्ज हॉस्पिटल आपल्या के इ एम सारखे वैद्यकीय रुग्णालय असलेले)ला घेऊन जा कारण या इंजेक्शन चा प्रभाव संपला कि त्याला परत फिट्स येण्याची शक्यता आहे. त्याच्या घरीजरूर कळवा पण KGH लाच घेऊन जा. तेवढ्यात डॉकयार्डची रुग्णवाहिका आली. तिच्या ड्रायव्हर ला मी KGH ला जाण्याची सूचना दिली. त्याच्या कर्तव्य पुस्तिकेतील(DUTY REGISTER) मधील एक पान फाडून KGH च्या मेंन्दुविकार तज्ञाला चिट्ठी लिहिली आणी त्याला रवाना केला. या वेळे पर्यंत सव्वा सहा वाजले होते आणी मिटिंग ला भरपूर उशीर झाला होता. म्हणून मी शांतपणे डॉकयार्ड कैन्टीन मध्ये एक चहा प्यायलो आणी कमान्डींग ऑफिसरला तोंड द्यायला सिद्ध झालो. मी पोहोचे पर्यंत मिटिंग संपली होती आणी कमान्डींग ऑफिसर आपल्या खोलीत परतला होता. त्याने मला बोलावले आणी थोड्या रागाने विचारले कि मिटिंग ला का आला नाहीस? मी शांतपणे झालेला किस्सा सांगितला. त्यावर तो म्हणाला कि मला वाटलेच कि डॉक्टर कुठल्यातरी केस मध्ये अडकला असेल. मग एकदम तो उत्साहाने मला म्हणाला कि हा सगळा किस्सा मला नीट लिहून दे मी हा कोस्ट गार्ड च्या पूर्व प्रभागाच्या प्रमुखाला पाठवून तुला प्रशंसा पत्र मिळवून देतो. मी त्यांना शांत पणे सांगितले कि सर मी हि गोष्ट कोणत्याही प्रशंसेसाठी केलेली नाही. त्यावर ते म्हणाले कि ते मलाही माहित आहे पण आता तू केले आहेस तर लिहून द्यायला काय हरकत आहे. परंतू कसेही असले तरी मला काही ते लिहून द्यावे असे वाटले नाही आणि मी लिहूनहि दिले नाही.
दुसर्या दिवशी डॉकयार्ड मध्ये नौदलाच्या डॉक्टरने एका कर्मचार्याला रस्त्यावर इलाज केला हि बातमी पसरली होती पण ते कोणी केले ते शेवटपर्यंत समजले नाही. तीन दिवसांनी पाईपिंग विभागात काम करणाऱ्या एका इंजीनियरने( हा माझा मित्र होता) मला सांगितले कि KGH मध्ये त्याचा सीटी स्कॅन झाला. अप्पा राव च्या मेंदूत एक ट्युमर( meningioma) होता आणि त्यामुळे त्याला हा अपस्माराचा झटका आला होता. त्याची शल्यक्रिया झाली आणी त्याची परिस्थिती आता स्थिर आहे.
केलेल्या कामाचे समाधान आणी त्यामुळे येणारी शांत झोप हे कोणत्याही शाबासकी पेक्षा जास्त महत्त्वाचे आहे

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

सचिन कुलकर्णी's picture

23 Jun 2013 - 9:27 pm | सचिन कुलकर्णी

केलेल्या कामाचे समाधान आणी त्यामुळे येणारी शांत झोप हे कोणत्याही शाबासकी पेक्षा जास्त महत्त्वाचे आहे

क्या बात है.. Hats off to you Sir!!

पैसा's picture

23 Jun 2013 - 9:45 pm | पैसा

दोन्ही वेगळे अनुभव. म्हणजे वेळीच उपाय झाल्यामुळे दोघांचेही मोठे नुकसान टळले होते. पण एकाची प्रतिक्रिया अगदी कृतघ्नपणाची तर दुसर्‍या वेळी निदान तुमच्या वरिष्ठांना चांगल्या कृत्याची कौतुक करावे अशी इच्छा झाली हे फार मोठे! मात्र तुम्ही त्याचे क्रेडिट घेतले नाहीत. एवढे निर्लेप रहाणे फार थोड्यांनाच जमते!

पाषाणभेद's picture

23 Jun 2013 - 10:07 pm | पाषाणभेद

आम्ही तुम्हाला शाबासकी देतो.
तरी पण संग्रहणी म्हणजे काय? की पुढल्या वेळी सांगणार?

सुबोध खरे's picture

23 Jun 2013 - 11:23 pm | सुबोध खरे

संग्रहणी (म्हणजे मला जे समजले ते असे) कि अगोदर काही दिवस बद्धकोष्ठ होते आणि त्यानंतर काही काळ पातळ शौचास होणे. हा अर्थ बरोबर आहे काय हे मला पण नक्की माहित नाही( कोणी आयुर्वेदाचार्य असतील तर ते याबद्दल आपला बहुमुल्य सल्ला देऊ शकतील) परंतु कुलकर्णी साहेबाना वरील लक्षणे होती. मी आमच्या पोटविकार तज्ञ सरांनी आपल्या अनुभवाने काही रुग्णांना कसे उपचार केले होते ते पाहिले होते. कुलकर्णी साहेबांनि पिंपळे निलख का गुरव येथे एक छोटासा बंगला बांधला होता आणि त्यांच्याकडे बोअरचे पाणी होते त्या पाण्याने त्यांचे पोट बिघडून गेले होते आणि त्यांना वरील लक्षणे झाली होती. त्यांची सोनोग्राफी केल्यावर त्यांच्या आतड्याला सूज आलेली आढळली होती. त्यांना मी प्रथम पाणी उकळून घेण्यास सांगितले त्यानंतर त्यांना घरचा फिल्टर झिरो बी या जंतुनाशक वापरून भरायला सांगितले. त्याच वेळेस त्यांना चांगल्या कंपनीचे कुटजारीष्ट ३० मिली दिवसात तीन वेळा कोमट पाण्यातून जेवणा अगोदर अर्धा तास घेण्यास सांगितले. असे पंधरा दिवस करून पहा असे सांगितले होते आणि जर गुण आला तर पुढे तीन महिने घ्या नाही आला तर सोडून द्या.
सुदैवाने कुलकर्णी साहेबाना चांगलाच गुण आला त्यामुळे ते माझे चांगले मित्र झाले.
कुटजारिष्ट मध्ये कुडची या झाडाच्या सालीचा अर्क असतो आणि हा सौम्य अमिबा नाशक आहे आणि पोटाच्या स्नायूचे शक्तिवर्धक (TONING) करते. आयुर्वेदात याचा काय उपयोग आहे हे मला माहित नाही पण वरील तर्हेने मी बरेच रुग्णांना यशस्वीरीत्या उपचार केले आहेत.

श्रीगुरुजी's picture

16 Jun 2015 - 12:50 pm | श्रीगुरुजी

संग्रहणी म्हणजेच अल्सरेटिव्ह कोलायटीस का? याचेच दुसरे नाव आय बी डी (इरिटेबल बॉवेल सिंड्रोम) असेही आहे का?

आय बी डी (इरिटेबल बॉवेल सिंड्रोम) मला झाला होता. Mebaspa ने आजार गेला.

सुबोध खरे's picture

16 Jun 2015 - 8:25 pm | सुबोध खरे

अल्सरेटिव्ह कोलायटीस हा फार गंभीर आजार आहे आणि यात मोठ्या आतड्याला आतल्या बाजूने व्रण(अल्सर) पडतात आणी आतड्याला मोठ्या प्रमाणावर सूज आलेली असते.(हे सर्व बेरियम एक्स रे वर किंवा एण्डोस्कोपीमध्ये स्पष्ट दिसते.) त्यामुळे रुग्णाला रक्ताची आव पडते. मी पाहिलेला पहिला रुग्ण (१९८५) याला दिवसात ४०-५० वेळेस अशी पातळ रक्ताळलेली हगवण लागलेली होती आणि त्यामुळे त्याचे २ महिन्यात २० किलोने वजन कमी झाले. अशी लक्षणे बहुतांश रुग्णात दिसतात. आता आधुनिक औषधांनी हा आजार बर्याच प्रमाणात आटोक्यात येऊ शकतो.
या विरुद्ध IBS (इरीटेबल बॉवेल सिंड्रोम) हा आजार मानसिक तणावातून उद्भवणारा आहे. मानसिक तणावाचा शरीरावर होणारा परिणाम म्हणून रुग्णाला बद्धकोष्ठ पासून हगवण पर्यंत होते आणी त्यात पोटात जोरात मुरडा होऊन दुखते. जेंव्हा जेंव्हा मानसिक तणाव वाढतो तेंव्हा हा आजार परत उपटू शकतो. याच्या त सर्व तर्हेच्या शरीराच्या आणी पोटाच्या चाचण्या पूर्ण नॉर्मल येतात.
संग्रहणी मध्ये वरील दोन्ही तर्हेची लक्षणे दिसत नाहीत. पण सतत पोट बिघडलेले राहणे. भूक न लागणे. अगोदर हगवण आणी नंतर बद्धकोष्ठ (किंवा उलटे) अशा तर्हेची लक्षणे दिसतात. आणी त्यात रुग्णाची तब्येत तेवढी बिघडलेली नसते.

रुस्तम's picture

16 Jun 2015 - 9:11 pm | रुस्तम

सोनोग्राफी रिपोर्ट नॉर्मल बाकी तपासण्या नॉर्मल. शेवटी IBS वर उपचार सुरु केले अणि फरक पडला.

श्रीगुरुजी's picture

16 Jun 2015 - 10:27 pm | श्रीगुरुजी

डॉक्टरसाहेब,

माहितीबद्दल धन्यवाद!

आपले प्रेरणादायी लेखन असेच चालु ठेवा. :)

मदनबाण's picture

16 Jun 2015 - 12:37 pm | मदनबाण

कुटजारिष्ट मध्ये कुडची या झाडाच्या सालीचा अर्क असतो आणि हा सौम्य अमिबा नाशक आहे आणि पोटाच्या स्नायूचे शक्तिवर्धक (TONING) करते. आयुर्वेदात याचा काय उपयोग आहे हे मला माहित नाही पण वरील तर्हेने मी बरेच रुग्णांना यशस्वीरीत्या उपचार केले आहेत.
कुटजारिष्ट याचा अनुभव हल्लीच घेतला आहे,माझे आणि माझ्या तिर्थरुपांचे एकाच दिवशी पोट बिघडले होते तेव्हा तिर्थरुपांनी स्वतः घेतले आणि मला देखील याचा डोस दिला शिवाय या बरोबरच बिल्वादि चूर्ण देखील घेतले. एका दिवसात आराम पडला.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- में गोरी चिट्टी छमिया... ;)

शिल्पा ब's picture

24 Jun 2013 - 8:47 am | शिल्पा ब

दोन्ही केसेस मधे चांगलं काम केलंत अन मुद्दाम प्रशंसापत्र मिळवण्यासाठी ते लिहुन दिलं नाहीत हे वाचुन पण बरं वाटलं. नाहीतर लोकं जरा काही केलं की लगेच पब्लिसिटी करतात.

तुमचे लेखन आणि केलेले कार्य दोन्ही प्रेरणादायी आहे.

कवितानागेश's picture

7 Jul 2013 - 11:47 pm | कवितानागेश

पुढे?

सुबोध खरे's picture

8 Jul 2013 - 10:15 am | सुबोध खरे

लिखाणात एकसुरीपणा /तोच तो पणा ( monotony) येत आहे असे वाटल्यामुळे थांबलो.
क्षमा करा

डॉक्टरसाहेब.. मी एक सुचवू का..?

ऑपरेशनच्या वेळी पाळायच्या प्रोटोकॉलबद्दल लिहा.

लाल दिवा लागल्यानंतर दुधी काचेचा दरवाजा बंद झाल्यानंतर आत नक्की काय काय होते ते जाणून घ्यायची उत्सुकता आहे.

उदा - ऑपरेशन करणार्‍या डॉक्टरला प्रि-ऑपरेशन वॉश घेवून तयार होण्यास अर्धातास वगैरे लागतो किंवा हत्यारांची जागा व त्यांच्या बोटांच्या / हातांच्या हालचालींशी ठरलेल्या खुणा.. असे काहीतरी येवूद्यात!!

बायपास ऑपरेशनच्या दरम्यान डॉ. नीतू मांडकेंनी सुरू केलेले (बहुदा जगन्मान्य झालेले) काही प्रोटोकॉल आहेत का..?

प्रभाकर पेठकर's picture

8 Jul 2013 - 2:35 am | प्रभाकर पेठकर

सेवाभावी वृत्ती आणि सारासार विचार ह्या गुणांची कोणी कदर केली नाही तरी आत्मिक समाधान कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळवून देते.

ब़जरबट्टू's picture

8 Jul 2013 - 1:09 pm | ब़जरबट्टू

छान किस्से आहेत . फक्त :"फुकटची समाजसेवा" शिर्षक खटकले.. 'फुकट' शब्द खुपदा 'अपेक्षित' होते पण भेटले नाही या अर्थाने वापरतात.

सुबोध खरे's picture

8 Jul 2013 - 7:58 pm | सुबोध खरे

फुकटची म्हणजे खिशाला कोणतीही तोशीस न लागता केलेली किंवा कोणतेही शारीरिक कष्ट न करता अशा अर्थाने आहे.
सोसल तेवढी सोशल सर्व्हिस.

मुक्त विहारि's picture

8 Jul 2013 - 8:08 pm | मुक्त विहारि

आवडला..

रुपी's picture

16 Jun 2015 - 3:43 am | रुपी

आवडले.

पहिल्या प्रसंगात तुम्ही चांगला धीर दाखवलात.

अमृत's picture

16 Jun 2015 - 8:03 am | अमृत

फोडिले भंडार धन्याचा तो मालं, मी तो हमालं भार वाही - संत तुकाराम, या उक्तीचा प्रत्यय आला. तुम्हाला शुभेछा.

चिनार's picture

16 Jun 2015 - 12:51 pm | चिनार

आवडले.

पद्मावति's picture

16 Jun 2015 - 7:48 pm | पद्मावति

दोन्ही वेळेस तुम्ही स्वत:च्या भल्या-बुर्याचा विचार न करता जे लोकांसाठी केलंय त्याची प्रशंसा करावी तितकी कमी आहे.

केलेल्या कामाचे समाधान आणी त्यामुळे येणारी शांत झोप हे कोणत्याही शाबासकी पेक्षा जास्त महत्त्वाचे आहे > सहमत.

तुमचे सर्वच अनुभव कथन वाचले आहेत. लिहीत रहा.

मनोज श्रीनिवास जोशी's picture

16 Jun 2015 - 8:36 pm | मनोज श्रीनिवास जोशी

डॉ. तुमच्या लेखनात एक छान 'करकरीत' पणा असतो त्यावर एकदम लट्टू !

योगी९००'s picture

16 Jun 2015 - 10:55 pm | योगी९००

डॉ. साहेब तुमचे अनुभव आम्हाला नक्कीच आवडतात..जगात अशीही माणसे आहेत त्यामुळे दुर्दैवाने माझ्यावर काही प्रसंग आला तर मदत करणारे कोणीतरी असतीलच असे वाटले.

"फुकटची" हा शब्द नावात योग्य वाटत नाही......