फुकटची समाजसेवा

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
23 Jun 2013 - 3:36 pm

तसा माझा मूळ पिंड समाजसेवेचा नाहीच. इतर लोकांच्या सारखी सोसल तेवढी सोशल सर्व्हिस मी पण करतो . पण वैद्यकीय व्यवसायात फारसे कष्ट न करता समाजसेवा करता येते त्याचा हा एक वृत्तांत.
पुण्याच्या कमांड हॉस्पिटल मध्ये काम करीत असताना ची गोष्ट आहे. तेथे दहा रुपयाचे कार्ड काढले कि कोणतीही सेवा ( औषधासकट) फुकट मिळवता येत असे यात फक्त कर्करोगाची औषधे अंतर्भूत नव्हती ( कारण कर्करोगाचे उपचार तेथे सिव्हिलियन साठी नव्हते )
मी तेथे क्ष किरण विभागात कामाला होतो आणि आर्मीच्या हिरवट खाकी(OLIVE GREEN) गणवेशात मी एकटा नौदलाच्या पांढऱ्या वेशातील बगळा होतो. त्यामुळे रुग्णांना मला ओळखणे फार सोपे होते.
एके दिवशी एक पस्तीस चाळीशीची मुसलमान बाई (काळ्या बुरख्यातील) आली आणी माझ्या पाया पडू लागली. क्ष किरण विभागाच्या व्हरांड्यात सर्वांच्या समोर एखादी बाई तुमच्या पाया पडते आहे हे पाहून मला कानकोंड्यासारखे झाले होते. मी तिला ओळखत नव्हतो. मी तिला विचारले कि बाई तुम्हाला काय हवे आहे? मी तुम्हाला ओळखले नाही. त्यावर ती बाई म्हणू लागली कि अल्ला तुम्हाला दीर्घायुष्य देवो तुमचे कल्याण होवो. मला कळेना हि कोण आहे . त्यावर तिने सांगितले कि तुम्हाला शमीम महम्मद आठवतो का? मी तिला ओशाळून सांगितले कि नाही. तुम्ही नाही का त्याची दारू सोडवली? आता मला त्याचा संदर्भ लागला. हा शमीम माझ्याकडे पोटात दुखते म्हणून सोनोग्राफी साठी आला होता वय साधारण चाळीस असेल. त्याची सोनोग्राफी करताना मला असे जाणवले कि त्याच्या लिव्हर मध्ये चरबी जमा झाली होती(fatty infiltration) मी त्याला सहज विचारले कि दारू किती पितोस? तर तो म्हणाला जास्त नाही. माझ्या लक्षात आले कि कुठे तरी पाणी मुरते आहे. मी त्याला विचारले कि तुला मुले किती तर तो म्हणाला ४ . सर्वात मोठ्या मुलाचे वय काय ?तो म्हणाला १४ वर्षे मी त्याला म्हटले कि तो अठरा वर्षाचा होईस्तोवर कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकेल काय? त्यावर तो म्हणाला साहेब तो तर आत्ता शिकतो आहे. पण तुम्ही असे का विचारता? मी त्याला म्हटले कि दारू मुळे तुझे लिव्हर खराब झाले आहे. तेंव्हा तू तीन ते चार वर्षात मरशील तर कुटुंबाची जबाबदारी त्यालाच उचलायला लागेल. यावर तो म्हणाला साहेब याला उपाय काय. मी विचारले कि तू खरं सांग दारू किती पितोस? तो म्हणाला कि साहेब १ किंवा २ क्वार्टर. मी त्याला म्हटले कि जर तू आजपासून दारू सोडली नाहीस तर तुझ्याकडे ३ ते ४ वर्षे आहेत. तेंव्हा या चार वर्षात कुटुंबाची तजवीज करून ठेव. यावर तो भयभीत होऊन म्हणाला साहेब माझ्या जवळ पैसे कुठे आहेत? मी लक्ष्मि रोड वर टॉवेल विकतो. मी त्याला विचारले जर तुझ्या कडे पैसे नाहीत तर रोज दारूला कुठून आणतोस? तो मान खाली घालून म्हणाला कि मिळतात त्यातीलच पैशाची पितो. आता प्रश्न हा होता कि हा काय मिळवत होता आणि घरी काय देत होता?नंगा नहायेगा क्या और निचोडेगा क्या? घरी खाणारी आणखी पाच तोंडे. माझे डोके भणाणले. मी त्याला कडक शब्दात परत सांगितले कि जर तू आजपासून दारू सोडली नाहीस तर तुझे काही खरे नाही. तो म्हणाला मी दारू सोडायचा प्रयत्न करतो आहे पण सुटत नाहीमी माझ्या मित्राला ( सर्जन कमांडर अहमद हा पण नौदलात होता आणि माझा वर्ग मित्र होता) मनोविकार विभागात फोन केला कि शमीम म्हणून एकाला पाठवतो आहे त्याला दारू सोडण्यात तुझी मदत हवी आहे त्याला सगळी पार्श्वभूमी सांगितली आणि हेही सांगितले कि त्याला लिव्हरचा आजार असा काही पुढे गेलेला नाही पण त्याला मी थोडी दहशत घातली आहे. पुढचे काम त्यानेच केले होते. पण आज काही महिन्यांनी त्याची बायको येउन मला सांगत होती कि साहेब तुम्ही त्याची दारू सोड्वलीत आणि तो आता सुधारला आहे. मी विचारले कि शमीम स्वतः का आला नाही? त्यावर ती हसून म्हणाली कि त्यांना लाज वाटते आहे तुम्हाला तोंड दाखवायची.
असाच एक अजून माणूस मी मनोविकार विभागात पाठवला होता जो मला परत येउन सांगून गेला होता कि त्याने पण दारू सोडली. हा माणूस गंज पेठेत रिक्षाचे रेग्झीनचे फाटलेले कव्हर शिवायचे काम करीत असे.असेच मी इतरहि काही माणसाना पाठवले होते त्यांचे काय झाले याचा मी हिशेब काही ठेवला नव्हता
मला एक प्रश्न पडत असे कि हि माणसे जेमतेम पोटापुरते मिळवतात आणि त्यातच दारू पिउन आपले आयुष्य असे वाया का घालवतात?
आमच्या कमांड रुग्णालयात विद्युत विभागात काम करणारे तंत्रज्ञ (वायरमन) होते. क्ष किरण विभागात सर्व काम विजेचे असल्याने आम्हाला त्यांची गरज सतत पडत असे. मराठी असल्याने माझी त्या तंत्रज्ञाबरोबर चांगली ओळख होती. तेथे दोन पवार म्हणून वायरमन होते. एक लहानखुरा होता म्हणून छोटा पवार आणि दुसरा तगडा होता म्हणून मोठा पवार म्हणून ओळखले जात. त्यांचा सुपर वायझर म्हणून एक कुलकर्णी साहेब होते. एक दिवस हा मोठा पवार तेथे इतरांना आपली राम कहाणी सांगत होता. त्याची मुलगी हुशार होती नेहेमी पहिली येत असे. पण गेले काही महिने तिचा अभ्यास मागे पडतो आहे ती लक्ष देत नाही. आता चौथीत गेली आहे पण वर्गात मागे बसते आणि सारखी सारखी पुढे येउन फळ्याकडे पाहते आणि परत जाते. घरी सुद्धा निट अभ्यास करीत नाही. हे ऐकत असताना माझ्या डोक्यात एक कल्पना आली आणि मी मोठ्या पवार ला विचारले कि तू कुठे राहतोस/ तर तो म्हणाला भवानी पेठेत. मी त्याला म्हटले कि तू मुलीला डोळ्याच्या डॉक्टर ला दाखवलेस काय? तर तो म्हणाला तिला तसा काही त्रास नाही. डोळे लाल होतात किंवा दुखतात असे ती म्हणाली नाही.तिला वाचताना काही त्रास होत नाही. मी विचारले टीव्ही पहाताना त्रास होतो का? त्यावर तो म्हणाला कि तसे काही नाही पण ती टीव्ही जवळ बसून बघते. मी त्याला म्हटले कि उद्या तिला घेऊन ये आणि माझ्या मित्रालाडोळ्याच्या डॉक्टरला एकदा दाखवून तर घे (कमांड हॉस्पिटल मध्येच) दाखव. तर तो म्हणाला साहेब मुलगी आत्ता इथेच आहे मी तिला शाळेतून घेऊन आलो आहे आणि आता माझ्याबरोबरच ती घरी जाईल. मी त्याला म्हटले तू तिला आत्ताच घेऊन जा आणि मी तिथेच माझ्या मित्राला ( कर्नल मग्गोन नेत्ररोग तज्ञ ) यांना फोन केला आणि तिला दाखवायला सांगितले. आणि मला जी शंका होती ती खरी निघाली. त्या मुलीला एका डोळ्यात ३ आणि एका डोळ्यात ४ नंबर होता आणि थोडासा सिलिंडर पण होता त्यामुळे तिला फळ्या वरचे स्पष्ट दिसत नव्हते ( उंची चागली असल्यामुळे तिला बाई मागच्या बाकावर बसवले होते त्यामुळे ती सारखी पुढे येत असे आणि वर्गात बाईंचा ओरडा खात असे. यामुळे त्या मुलीचा अभ्यासात रस कमी झाला होता. काही दिवसांनी एकदा परत तेथे गेल्यावर मोठ्या पवारने उत्साहात मला सांगितले कि साहेब मुलीला चष्मा लावल्यावर तिचा अभ्यास सुधारला आहे आणि आता तिचा नंबरही वर आला आहे.
कुलकर्णी साहेबांचा संग्रहणी हा आजार सुद्धा मी असाच बरा केला होता ते पुढील भागात
या नंतर कमांड हॉस्पिटल मध्ये विद्युत विभागात आमच्या डिपार्टर्मेंटची कामे अग्रक्रमाने होत असत.
क्रमशः

मुक्तकविचार

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

23 Jun 2013 - 4:31 pm | प्रकाश घाटपांडे

मस्त किस्से. दारु सुटण्यात तुम्ही घातलेल्या भीतीचा प्रभाव जास्त होता कि कौन्सिलिंगचा? कि दोन्ही?

पैसा's picture

23 Jun 2013 - 5:37 pm | पैसा

डॉक्टर लोक सहजच स्वार्थाबरोबर परमार्थ साधू शकतात. त्यामुळे हा सर्वात समाजोपयोगी व्यवसाय असावा.

पाषाणभेद's picture

23 Jun 2013 - 7:43 pm | पाषाणभेद

छान समाजसेवा आहे तुमची.
संग्रहणी म्हणजे काय?