एकलम खाजा, धोबी राजा.. :)

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
30 Apr 2013 - 1:59 pm

हल्ली च्यामारी गोटे कुठेच मिळत नाहीत..

आमच्या लहानपणी गोटे मिळायचे.. गोट्या नव्हेत..

गोटे.

छानसे सिमेन्टने बनवलेले गोल, गु़ळगुळीत गोटे..त्यांना 'ढप' असेही म्हणत..आम्ही सताठ जण मग रोज गोटे खेळायचो..

मातीतच गोट्याच्या आकाराची आणि तेवढीच खोल अशी लहानशी गोलाकार खळी खणायची. त्याला गल किंवा गली म्हणत..

मग सर्वांनी एका ठराविक अंतरावरून त्या गलीच्या दिशेने चकायचं.. ज्याचा गोटा गलीच्या जास्ती जवळ जाईल त्याची पहिली पाळी..

सुरवातीची एकलम खाजाची गल कंपलसरी.. एकलम करण्यापूर्वी वीतेला परवानगी नाही..एकलम झाल्यानंतर मग वीत घेऊन गोटा मारायला परवानगी.. त्यातदेखील वीत ढापणं हा प्रकार असे. हळूच, सगळ्यांच्या नकळत करंगळीच्या पुढे आंगठा टाकायचा आणि वीत वाढवायची..त्याला वीत ढापणं असं म्हणत.. मग 'ए..वीत ढापतो का रे..? या वरून भांडणं..

एकदा एकलम झाला की मग दोन नंबर पासून ते दहा नंबरापर्यंत म्हणजे धोबीराजा पासून दस्सी गुलामापर्यंत दुस-यांचे गोटे मारायचे.. गल भरून देखील नंबर वाढवत येत असे..

मग अकरा नंबर म्हणजे अक्कल खराटाला गल कंपलसरी.. तिथे चुकून जर कुणाच्या गोट्याला टोला मारला तर पुन्हा पनिशमेन्ट म्हणून एकलमपासून खेळायचं. अक्क्लची गल जशी कंपलसरी तसं बाराचा म्हणजे बक्कल किंवा बाल मराठाचा टोला कंपलसरी..तिथे जर चुकून गोटा गल्लीत गेला तरी पुन्हा एकलमची पनिशमेन्ट..

एकलमच्या गलीआधीपासून ते एकलम झाल्यापसून ते बक्कलपर्यंत केव्हाही जर दुस-याच्या गोट्याला टोला मारून आपला गोटा जर गल्लीत गेला तर कॉम्प्लीमेन्टरी सुटका..!

या खेळातल्या १ ते १२ आकड्यांची नावंही मजेदार होती. मला आज ती इतक्या वर्षांनीही जशीच्या तशी आठवतात..

एकलम खाजा
धोबी राजा
तिराण बोके
चारी चौकटे
पंचल पांडव
सैय्या दांडव
सप्तक टोले
अष्ठक नल्ले
नवे नवे किल्ले
दस्सी गुलामा
अक्क्ल खराटा
बाल मराठा..

अशी छान यमकबिमक असलेली नावं होती..शिवाय साईड सबकुछ, नो कुछ, हलचूल..असे काही खास परावलीचे शब्दही होते..

सर्वात शेवटी जो उरेल त्याच्यावर पिदी.. त्याने शिक्षा म्हणून धावत जाऊन तीन लांब उड्या मारायच्या. तिसरी उडी जिथे पडेल तिथे त्याने आपला गोटा ठेवायचा. इतरांनी मग त्याच्या गोट्याच्या जास्तीत जास्त जवळ जाईल असं चकायचं आणि त्याचा गोटा मारायचा..पुन्हा मग पिदी सुरू.. एखाद्याला पिदवणे..त्यावरून पिदी हा शब्द पडला असावा.. जेव्हा कुणाचाच गोटा लागणार नाही तेव्हाच त्याची पिदीची शिक्षा पूर्ण व्हायची आणि मग पुन्हा सगळ्यांनी चकून नवा डाव सुरू करायचा..एखाद्याची एकलमची गलदेखील भरली गेली नसेल तर त्याच्यावर डबल पिदी..पिदीचा गोटा ठेवल्यावर जर चकताना कुणाचा डायरेक्ट नेम लागला तर ६ उड्यांची पिदी..!

काय साली मजा यायची हे गोटे खेळताना..! कुठल्याही वाण्याकडे हे गोटे अगदी सहज मिळत.. मला ती हे सिमेन्टचे गोटे भरलेली वाण्याकडची काचेची बरणी आजही आठवते, डोळ्यासमोर दिसते..!

टणट्णीत सिमेन्टच्या गोट्याने दुस-या गोट्याला नेम मारताना जाम मजा यायची.. कडक मस्त असा आवाज यायचा.. उकिडवं बसून डावा हाताचा आंगठा जमिनीवर टेकून डाव्या हाताच्या मधल्या बोटात उजव्या हाताने गोटा धरून कडक नेम मारायचा..

तेव्हा आम्हाला आता मिळतात तसे मोठमोठ्या मॉलमधून घेतलेले महागडे छान छान रंगीत कपडे नव्हते.. साधी हाफ प्यॅन्ट आणि गंजीफ्रास..खेळता खेळता अगदी भरपूर मळून जायचे हे कपडे..कारण घामेजलेले मातीचे हात हाफप्यॅन्टीला किंवा गंजिफ्रासालाच पुसायची साधीसोपी रीत होती तेव्हा.. स्वच्छतेच्या अतिरेकाच्या वगैरे भयानक कल्पना नव्हत्या....

"तंदुरुस्ती की रक्षा करता है लाईफबॉय, लाईफबॉय है जहा तंदुरुस्ती है वहा.." हे छानसं गाणं म्हणत अतिशय साधीसुधी अशी लाईफ बॉयची अंघोळ करायची पद्धत होती...

आज मला कुठेच कुणी मुलं हे गोटे खेळताना दिसत नाही याचं दु:ख होतं खूप. वाईट वाटतं..

स्वतःच्या घरी छान छान एसीमध्ये बसून अत्यंत कृत्रीम असे संगणकीय व्हिडियो गेम की कुठलेसे खेळ खेळायची पद्धत आहे आता..

चालायचंच.. कालय तस्मै नमः..

काळाच्या ओघात आमचे एकलम खाजा, धोबीराजा कधी, कुठे नाहिसे झाले, कुठे हरवले ते कळलंच नाही..!

-- डब्बल पिदितला तात्या.

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

30 Apr 2013 - 2:03 pm | पिलीयन रायडर

माझ्या मुलाला शिकवाल का हे? अजुन थोडा लहान आहे तो.. पण ३-४ वर्षात शिकवता येईल कदाचित..!!
हे असं काहीतरि लिहा ना.. छान वाटत वाचुन...

स्पा's picture

30 Apr 2013 - 2:28 pm | स्पा

हे असं काहीतरि लिहा ना..

असेच बोलतो

चाणक्य's picture

30 Apr 2013 - 2:20 pm | चाणक्य

आम्ही या खेळाला एक्कया- टोक्कया म्हणायचो. नियम हेच सगळे...तसंच राजाराणी हा पण खेळ असायचा..त्यात पिदी नसायची त्यामुळे पेदरट पोरांना तो आवडायचा. अजुन एक खेळ म्हणजे जिंकाजिंकी. दुस-याच्या गोट्या जिंकल्या की जग जिंकल्याचा आनंद व्हायचा....कुठल्याही खेळाची नविन सुरुवात करताना जो 'सबलास्ट' असं सगळ्यात आधी म्हणेल त्याला त्याची गोटी सगळ्यात शेवटी टाकता यायची. रोज संध्याकाळी गोट्या खेळतो म्हणून घरचे बोंबलायचे, त्यावर आम्ही गोट्या खेळताना ऊठबस होत असल्याने पायांचा चांगला व्यायाम होतो असं सांगायचो.
मजा यायची एकंदरीत

अभ्या..'s picture

30 Apr 2013 - 2:25 pm | अभ्या..

तात्या थोडीशी ही बघा वेगळी वर्शन
.
एकलम खाजा
दुर्री बाजा
तिरान बोजे
चार चौकटी
पच्चाला पांडव
सैह्या दांडव
सात पुतुळे
अष्टीक नल्ले
नौ नौ किल्ले
दश्शा गोंडा
अक्कल कैची
बारा मैची
:)
बाकी नियम सगळे शेम टू शेम.
ढीस अन मासा ज्यादा फेमस होते पण.
बॅट्या सांगतोय बघा मासा कसा असतोय त्यो. ;)

विसोबा खेचर's picture

30 Apr 2013 - 2:28 pm | विसोबा खेचर

येस्स.. ही नावं पण मस्तच आहेत..
जियो..!

बॅटमॅन's picture

30 Apr 2013 - 2:28 pm | बॅटमॅन

मासा माहिती नै बे अभ्या....गोट्या कधी फारशा खेळ्ळो नै. :(

स्पा's picture

30 Apr 2013 - 2:32 pm | स्पा

अरेरे जिंदगी व्यर्थ आहे

एखाद्या काडीने मातीवर मासा काढायचा , त्यात रांगेने ७/८ गोट्या ठेवायच्या.
आणि टपाटप एक एक उडवत जायची. माशाच्या आत आपली गोटी गेली, तर आपल्याकडून एक गोटी आत .

फुल धमाल यायची .

सही रे स्पांडू. मस्त प्रकार आहे, पण मी अंमळ वयस्कर आहे हे खेळायला आता ;)

अभ्या..'s picture

30 Apr 2013 - 2:39 pm | अभ्या..

=)) =)) =))
खरंच बॅट्या त्या मराठी अन संस्क्रूत भाषेच्या पायी पार वाया गेला राव तू. ;)
स्पावड्या बग कसा सर्व्गुण्संपन्न हाय.
आणि माशाच्या शेपटातली गोटी ऊडवली तर माशातल्या सगळ्या गोट्या नीट उचलून खिशात घालायच्या हे राहीलं.
ह्यो बग ग्राफीकल मासा.
masa

अगदी सहमत आहे बग ;) कुणी मुलगी-मित्र नै तेही दु:ख आहेच बघ.

स्पांडू तर आल-रौंडर आहेच, तूपण काही कमी नाहीस :)

मालोजीराव's picture

30 Apr 2013 - 3:24 pm | मालोजीराव

अरेरेरे…आधीच बॅटमॅन त्यात विदाऊट मैत्रीण...दुष्काळात तेरावा म्हयना संस्कृतपंडित का काय ते पण हायेस,
तुझ्यासाठी ज्ञानाची 'नवी' दालनं 'खुली' करण्याची गरज आहे

बॅटमॅन's picture

30 Apr 2013 - 3:26 pm | बॅटमॅन

एक खुलासा: मैत्रिणी आहेत, गर्लफ्रेंड नाही :)

पण ज्ञानाच्या नव्या दालनांत जाण्यासाठी उत्सुक आहे हेवेसांनल ;)

अभ्या..'s picture

30 Apr 2013 - 3:33 pm | अभ्या..

गोट्या दालनात नै बे अंगणात नायतर रस्त्यात खेळतेत. ;)
आता काय उपेग न्हाय. तुला तसे बसता पण येणार नै.

(जेजेच्या अंगणात हायक्लास पोरांबरोबर एकलम खाजा खेळलेला)
मीच

बॅटमॅन's picture

30 Apr 2013 - 3:41 pm | बॅटमॅन

हात लेका, शिकवून शिकवून गोट्या खेळायला शिकवणार असशील तर नगो ;) दुसरं गुह्यतम शास्त्र काही असेल तर सांग ;)

स्पा's picture

30 Apr 2013 - 2:42 pm | स्पा

माझा सर्वात आवडता ग्येम

मोठ वर्तुळ काढायचं , प्रत्येक प्ल्येर ने ठरवून प्रत्येकी आत गोट्या ठेवायच्या
एका ठराविक अंतरावरून आपल्या गोटीने वर्तुळातली एकच कुठलीही गोटी उडवायची
एका पेक्षा जास्त उडल्या तर आपण एक गोटी दंड म्हणून आत ठेवायची.

एकच उडली (देव दयेने) तर आतला सगळा माल आपला :)
सॉलिड ज्याक्पोट लागायचा लागला तर, हरलो तर एकदम बराच लॉस व्हायचा..

लोटीया_पठाण's picture

30 Apr 2013 - 2:44 pm | लोटीया_पठाण

गोटे आणि टबबू एकच ना ?

गणपा's picture

30 Apr 2013 - 2:50 pm | गणपा

स्मरणरंजन लेख आवडला. :)
हाफचड्डी, गंजीफ्रॉक (तोच तो बनीयन)/सुतीकफनी तंतोतंत.
बाकी मुंबईत हे कधी खेळलो नाही, मुंबईचे सगळे दोस्त साले हायक्लास.
सागर गोटे,गोट्या, विटीदांडू, डब्बा आईस्पाईस, पत्ते हे सगळे खेळ मे महिन्यात गावाला दोस्तां बरोबर.
(ही दोस्त मंड्ळी म्हणजे माझ्या वयाचे चुलत मामा मंडळी, गुराखी पोरं, शेतातल्या मजुरांची शेंबडी पोरं)

आताशा मिळत नाहीत म्हणून व्हाईट एम-सीलची हाताने मळून तशीच गोटी बनवली होती. नीट वाळवल्यावर हुबेहूब सिमेंट गोटीसारखीच बनते.

लहानपणी काचेची गोटी आणि सिमेंट गोटी यातला फरक MRI च्या रबर बॉल आणि "सीदन" (सीझन) बॉलसारखा होता.

"बंटा" हा शब्द कोंकण सोडून अन्य भागात या गोटीसाठी ऐकल्याचं आठवतं पण कुठे ते आठवत नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

30 Apr 2013 - 2:59 pm | परिकथेतील राजकुमार

"बंटा" हा शब्द कोंकण सोडून अन्य भागात या गोटीसाठी ऐकल्याचं आठवतं पण कुठे ते आठवत नाही.

आम्ही बंटाच म्हणायचो. आणि एक अजून शब्द म्हणजे हंटर.

अवांतर :- थोड मोठे झाल्यावरती भांगेच्या गोळीला पण बंटाच म्हणतात हे कळाले.

गवि's picture

30 Apr 2013 - 3:04 pm | गवि

हो.. हंटर.

माझ्या मते सर्वच बंट्यांना हंटर म्हणत नसावेत. त्यातला एखादाच जबरी मोठा बंटा असेल त्याला हंटर म्हणत असावेत.

योगी९००'s picture

30 Apr 2013 - 4:02 pm | योगी९००

आम्ही कोल्हापुरला मोठ्या गोटीला टबूल म्हणायचो.

बाकी लेख मस्त हो तात्या. मजा आली वाचून. लहानपण आठवले.

किसन शिंदे's picture

30 Apr 2013 - 5:47 pm | किसन शिंदे

बंटा आणि हंटरबरोबरच खास मुंबैय्या भाषेत त्याला मार्टप पण म्हणायचे.

चिगो's picture

1 May 2013 - 12:47 pm | चिगो

आमच्याकडे "टेंबा / टेंभा" हा शब्द होता मोठ्या गोटीसाठी..

नि३सोलपुरकर's picture

30 Apr 2013 - 2:57 pm | नि३सोलपुरकर

करेक्ट स्पावड्या,
एकच उडली (देव दयेने) तर आतला सगळा माल आपला आणी गोटी चुकुन इतर (एकाहून अधिक) गोटयास लागली तर त्याचा बल्ल्या व्हायचा म्ह्ण्जे तो गडी बाद.
तात्या ने सांगितलेला खेळ आमच्या कडे "राजाराणी" ह्या नावाने मासा हा गेम "बाम्बे" ह्या नावाने खेळतात (आजही)

अग्निकोल्हा's picture

30 Apr 2013 - 3:03 pm | अग्निकोल्हा

मज्या आलि.

रुमानी's picture

30 Apr 2013 - 3:13 pm | रुमानी

लहानपणी खुप आवडीने खेळायचे मी पण.
बरी आठवण केलित आता मुलांना शिकवता येईल सुट्टीत... :)

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

30 Apr 2013 - 3:15 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

माझ्याकडे एक डालडाचा ५ किलोचा डब्बा होता, फुल्ल भरलेला असायचा गोट्यांनी सुट्ट्या संपायला आल्यावर.
मग शाळा सुरु झाल्यावर आमचे बाबा नित्यनेमाने गटारात रिकामा करायचे तो, त्याशिवाय कार्टा अभ्यास करणारच नाही यावर त्यांचा ठाम विश्वास ;) शेवटी आम्ही करायचे तेच करायचो, मग मी एक गुप्त जागा शोधून काढली होती, गोट्या लपवायला, च्यायला दरवर्षी ते गुपित ठेवायला लै कष्ट घ्यायला लागायचे.
बाकी परत एकदा मला माझीच 'ती खोली' आठवली.

पिवळा डांबिस's picture

30 Apr 2013 - 10:36 pm | पिवळा डांबिस

माझ्याकडे एक डालडाचा ५ किलोचा डब्बा होता, फुल्ल भरलेला असायचा गोट्यांनी सुट्ट्या संपायला आल्यावर. मग शाळा सुरु झाल्यावर आमचे बाबा नित्यनेमाने गटारात रिकामा करायचे तो, त्याशिवाय कार्टा अभ्यास करणारच नाही यावर त्यांचा ठाम विश्वास

च्यामारी! अगदी डिट्टो!!
काय त्याकाळचे बाबा लोकं एकत्र येऊन मिटींग घेऊन ही धोरणं ठरवायचे की काय देव जाणे!!!
आमच्या घरीही हाच प्रकार!! वर कपडे किती खराब केलेत/ फाडलेत यावर वेळप्रसंगी फटकेही!!!
तरीही दर वर्षाला जूनमध्ये नवीन डब्बा भरायचाच!!! :)
आता तोच माणूस आपल्या दोन्ही नातवंडाना स्वतः गोट्या विकत घेऊन देतांना मी पाह्यलाय!!!
म्हातारपणी पापक्षालनाचा प्रयत्न, दुसरं काय!! ;)

गोट्यांमध्ये बुलबुल हा प्रकार असायचा. साध्या गोट्या एरवी कलरलेस पण त्यात काही भाग हिरवा/ निळा/ ब्राऊन असलेल्या असायच्या पण बुलबुल हा संपूर्ण गडद रंगाचा (बहुदा हिरवा किंवा निळा) असायचा. कुणाचा बुलबुल जिंकला ही हात स्वर्गाला पोचल्याचा आनंद व्हायचा!!! :)

"बुलचोक" हा असाच एक शब्द! नक्की अर्थ काय होता ते माहिती नाही पण खेळता-खेळता मध्येच बुलचोक असं ओरडायची पद्धत होती!!!
:)

'बुलचोक' हा बहुदा 'भुल चुक माफ' याचा अपभ्रंश असावा.
कधी कधी खेळताना चुकुन शेजारच्या गोटीला हाताने स्पर्श झाला तर डाव बाद व्हायचा अश्यावेळी आधी आम्ही मोठ्याने ओरडायचो 'बुलचोक' म्हणजे मग चुकुन शेजारची गोटी जरी हलली तरी डाव बाद होत नसे. :)

साला फार दिवसांनी हा शब्द ऐकला आज. :)

उपास's picture

1 May 2013 - 1:47 am | उपास

य्यस्स..
आणि डब्बल्-टिप्पल असंही असायचं, म्हणजे एका वेळी दोन गोट्यांना लागलं तरी माफ.
राजा-राणी खेळताना कच्चा राजा असा एक प्रकार असायचा.
बुलबुल पांढरेही असायचे.. गोट्या विकत घेतलेल्या कधी आठवतच नाहीत..!

तुमचा अभिषेक's picture

3 May 2013 - 10:04 am | तुमचा अभिषेक

फक्त तो गोट्यांचे साधेसुधे गेम खेळून भरला नाही माझा कधी..
जेव्हा तीन पत्त्यांवर गोट्या लाऊन खेळायला लागलो तेव्हा .. पण तेव्हा गोट्या खेळायची मजा कमी झाली हे ही खरे.. अन मग एक दिवस गोट्यांच्या जागी पैसे लाऊन खेळायला लागलो.. आणि मग गोट्याच आयुष्यातून गेल्या..

मन१'s picture

30 Apr 2013 - 3:41 pm | मन१

बालपणाची सफर....

ह्या निमीत्ताने कोयबा,शिगरुपी, काठी पाणी, दगड का माती?, विषाम्रुत, व्हाट कलर? टायर चे गाडे(त्या वर खडुने जावा,यझदी ई. लिहीलेले असे) ई. खेळ आठवले.
अवांतर= चाळीतली ईतर मुले मासा,रिंगण किंवा कोयबा खेळ असताना आमची गोल्डन गँग एका पडक्या घरात शांत पणे तीन पत्त्यांनी गोट्या खेळायचो. एकदा आम्च्या सगळ्या घरच्यांनी धाड टाकली आणि सगळा मुद्देमाल / ऐवज सरळ गटारात ओतुन आमाची गठडी आवळली. तेंव्हा पासुन मग नंतर बरीच वर्शे आम्ही.............................................................................................................................................................................................................................................. सतत ठिकांण बदत खेळत असु ;-)

सहज's picture

30 Apr 2013 - 4:00 pm | सहज

>काळाच्या ओघात आमचे एकलम खाजा, धोबीराजा कधी, कुठे नाहिसे झाले, कुठे हरवले ते कळलंच नाही..!

कपाळात पाहिले का?
- हंटर

बॅटमॅन's picture

30 Apr 2013 - 4:07 pm | बॅटमॅन

=)) =)) =)) =))

सहजच कपाळात घातल्या की हो =)) =)) =)) =)) =)) =)) =))

कपिलमुनी's picture

30 Apr 2013 - 4:24 pm | कपिलमुनी

पांचट प्रतिसाद

हॅहॅहॅ... सहजराव हेच मिपाचे खरे ख्रिस गेल ! ;)

काय तात्स्...आज गोटी-गोटी का ?
एक धागा लपा-छुपी वर पण काढा ! ;)

(कब्बडी प्रेमी) ;)

किसन शिंदे's picture

30 Apr 2013 - 5:50 pm | किसन शिंदे

छान स्मरणरंजन!!

सावत्या's picture

30 Apr 2013 - 5:55 pm | सावत्या

लहानपणि बिल्डींगच्या गच्चीवर आम्हीपण हा खेळ खेळायचो पण १ ते १२ ऐवजी १ ते १० असायचे. पण पीदि संपली की पीदीच्या मार्गक्रमणावर लंगडी घालायची आणि सगळी मूल मागून ओरडायची " लंगडी माझी बायको... लंगडी माझी बायको" आणि त्यावेळी जर का "आपली लाइन" गच्चीवर असेल तर शरमेने मेल्यासारखे व्हायचे!!!! :-)

सावत्या!!!!

विसोबा खेचर's picture

30 Apr 2013 - 6:06 pm | विसोबा खेचर

आणि त्यावेळी जर का "आपली लाइन" गच्चीवर असेल तर शरमेने मेल्यासारखे व्हायचे!!!!

मस्त..-: )

असो..

आमची पण लाईन होती त्या काळात.. मंजू.
साला, लै जीव होता आपला मंजूवर. खूप छान दिसायची रे मंजू...

जाऊ द्या...

रौशनी आणि टकल्या बापटानंतर मंजूची ष्टोरी सांगेन.. - : )

उपास's picture

30 Apr 2013 - 7:21 pm | उपास

गिरगावातले दिवस ते.. वाड्यावाड्यातून खेळायचो.. भोवरे, गोट्या. वाळवण असायची तापलेल्या रस्त्यावर आणि आम्ही मुलं. पोपो, घड्याळ, इल्लम असं बरच काही खेळायचो. खूप जण असली की पिदीला मजा यायची. दिवसच्या दिवस पिदवायचो असं आठवतय. गोट्यांच्या बरण्या भरलेल्या असत. तसं ते तासनतास उकीडव बसून गोट्या खेळणं असल्यामुळे पोट सुटणे वगैरे प्रकार कधीच नसायचे लहान मुलांत, आणि हे कमी म्हणून की काय, वाडीत छान खेळता यावं म्हणून घराच्या कोपर्‍यात रात्र रात्र गोट्यांच्या नेमाची प्रॅक्टीस करत बसत असे.. पण सॉलिड हात बसला होता :)
डफ्फर, गठ्ठे, गोट्या असं बरच काही साठवलं होतं वर्षानुवर्ष.. पुढे त्याचं काय केलं आठवत नाही..
अवांतरः मध्ये गिरगावात गल्लीत गेलो तर प्रचंड प्रमाणात मोटारसायकली, इतक्या की चालायला जागा नाही. एक काळ असा होता की सगळं मोकळं असायचं आणि डांबरी रस्त्यात बसून घामटलेल्या अंगाने दिवस दिवस खेळत असू. आता मुलांना खेळायला जागाच कुठे राहिलेय? मग व्हिडीयो गेमचे सायबर कॅफे भरून वाहाणारच!

फारा दिवसांनी हे शब्द ऐकले. पोराला घेऊन खेळायला पाहिजे.. फक्त आता उकिडवं बसता येइल का हे पहायला हवं!

कंजूस's picture

30 Apr 2013 - 8:45 pm | कंजूस

छान
! 'तेरा' साठी विसरलो पण शेवटी चौदा हात लंगोटा होते . डफ किंवा ढप अजूनही
मुंब्रा अथवा भिवंडीला कधीतरी मिळतात . गोटी ज्या गोटी-सोडयाच्या बाटलीत
असते तो सोडाही पेण ,रेवदंडाकडे मिळतो .

चौकटराजा's picture

1 May 2013 - 8:50 am | चौकटराजा

माणूस या भूतलावर काही सहस्त्र वर्षे आहे. गेल्या ५० /६० वर्षात सारेच फार बदलले. मला वाटते गेले ते दिन गेले म्हणत उसासे टाकण्याचे रेकॉर्ड आमच्या पिढीने केले आहे इतका बदल सार्‍या गोष्टीत झालाय. त्यात मग असे खेळही आले. त्याचा एक मोट्ठा धागाच होउन जाईल इथे.

आम्ही हाडकी गोट्या म्हणायचो तो हाच प्रकार आहे का...?]
बाकी बंटेलपाणी किंवा चिपरीपाणीच त्यात कावड हा प्रकार
खेळलो आहे. ज्याच्यावर राज्य आले आहे त्याला पार गावातून घुमवत घुमवत न्यायचे येताना गल्ली पर्यंत लंगडी घालत यायला लावायचे व एक अत्यंत घाण अशी ओळ सर्वानी तोंडाने म्हणत त्या " राज्य" वाल्याला पार मेल्याहून मेल्या सारखे करायचे. सगळ्यात करमणूक व्हायची खर्च अजिबात नाही. तसेच सॉडावाटरच्या बाटल्यांचे बिल्ल्ले सिगरेटची पाकिटे, अगपेट्यांचे बॉक्स यांचा " चलन" म्हणून वापर ही व्हायचा. बाबा " कोळसा" म्हणजे काय असा प्रश्न काहे वर्षापूर्वी माक्ष्या मुलीने मला विचारला होता. कदाचित आणखी १०० वर्षानंतर चच्या बाबाना सी एन जी म्हणजे काय " असाही प्रश्न विचारला जाउ शकतो.

श्रीरंग_जोशी's picture

1 May 2013 - 8:58 am | श्रीरंग_जोशी

पहिलम पेढा
दुध मोगरा

असेही एक गाणे म्हंटले जायचे. पुढ्च्या ओळी आठवत नाही.

त्याखेरीज,
काळा कागद फिक्की शाई
अजून डाव आला नाही

हे पण एक होते.

कंचे अन गोट्या फारसे खेळलो नसलो तरी जुजबी माहिती ठेवायचो. गोट्या खेळताना ढोपर वापरून काहींचे ढोपर फुटायचे सुद्धा.

इरसाल's picture

1 May 2013 - 9:22 am | इरसाल

पाँडस्चे पत्र्याचे डबे गोट्यांनी भरुन लाकुड्फाटा भरलेल्या खोलीत लपवुन ठेवायला लागायचे पण कधी कधी तो खजिना वडिलांच्या हातात पडायचा.
असो. असच एकदा कोळश्याची इस्त्री तापायला ठेवली होती वडिलांच्या शर्टाला इस्त्री करण्यासाठी आणी लागलो गोट्या खेळायला, थोड्या वेळाने वडिलांनी हाक मारली मी तसाच इस्त्री उचलुन गेलो आणी ठेवली शर्टवर बरोब्बर इस्त्रीच्या आकाराचा शर्ट्ला आणी चादरीला छापा पडला आणी मग माझ्यावर......

ढंप्या's picture

1 May 2013 - 10:54 am | ढंप्या

आमच्याकडे या खेळाला आक्या बोक्या ठोक्या म्हणायचो. नियम हेच सगळे...तसंच चकताना कोणाच्या गोटीला उडवले तर कॉम्प्लीमेंटरी डाव संपला....... मग डायरेक्ट पिदी घ्यायला एलिजिबल.....

राजाराणी हा पण खेळ असायचा.....

जिंकाजिंकीला आम्ही हारुस पुरुस म्हणायचो..... याच्यात जिंकलेल्या गोट्यांनी माझ्याकडचा भोपळा भरुन गेला होता......

जाम मजा यायची...........

जुन्या आठवणींनी दिवस सार्थकी लागल्यासारखा झाला.... धन्यवाद तात्या...

तिमा's picture

1 May 2013 - 12:43 pm | तिमा

गोटी, गोट्या खेळणे, सिगरेटची रिकामी पाकिटे जमवणे, पावसाळ्यात रुतवणी खेळणे ........! लहानपणची आठवण प्रकर्षाने करुन दिलीत तात्या. पण लहानपणी हॉकी,फुटबॉल खेळण्याची फार इच्छा होती ती अपुरी राहिली कारण जवळपास कोणी क्रिकेट शिवाय दुसरा खेळ खेळतच नसत.

हुप्प्या's picture

1 May 2013 - 11:15 pm | हुप्प्या

मी लहानपणी खुप गोट्या खेळायचो. एक विशेष जाणवलेली गोष्ट म्हणजे ह्या क्षेत्रातील परिभाषा. गोटीला काय म्हणायचे इथपासून ते खेळातील विविध गोष्टींकरता असणारी विचित्र वाटणारी पण नंतर आपलीशी वाटणारी नावे. अगदी पुण्यात आणि मुंबईत देखील ह्यातील परिभाषा इतकी वेगळी होती की खरे वाटणार नाही. चकणे, पिदी, थड (म्हणजे गोटी कुणाच्या पायावर आपटली तर ती कानात ठेवून दूर भिरकावणे. ह्याला थड का म्हणातात माहित नाही). कोच्चा नावाचा काहीतरी प्रकार होता आता तो आठवत नाही. दुसर्‍याची गोटी खूप लांब असेल तर गुडघ्याने मोजपाम घेऊन काहीतरी करायची पद्धत होती ते आता नीट आठवत नाही.
पण एखादा भाषाशास्त्री ह्या परिभाषेचा अभ्यास करुन जवळपास बोललया जाणार्या भाषातील शब्दांची देवाणघेवाण ह्या विषयावर प्रबंध लिहू शकेल इतका ऐवज ह्या परिभाषेत आहे.
दुसरे असे की मुली ह्या खेळात जवळपास नाहीतच. खरे तर हा इतका दांडगाईचा खेळ नाही. गोट्यांचाच एक भाऊ सागरगोटे हा मुलींनी स्वीकारला पण अगदी मुली मुली मिळून गोट्या खेळत आहेत असे फार दिसत नाही. असे का? कुणाला माहित आहे का? (म्हणून कदाचित ह्यातील परिभाषा थोडी चावट बनली असावी.)
गोटीच्या आत फुलाच्या पाकळीसारखे काहीतरी डिझाईन असायचे ते फूल बाहेर काढण्याकरता अनेक गोट्या फोडल्या आहेत पण काचांच्या तुकड्याखेरीज हाती काही आले नाही! खूप नंतर कधीतरी काच कशी बनवतात, ती रंगीत कशी बनते वगैरे शिकायला मिळाले.

माझ्या आणि माझ्या मित्रांच्या बहिणीसुद्धा गोट्या खेळायला यायच्या त्यामुळे हा मुलींचा आणि तो मुलांचा खेळ असं कधी जाणवलं नाही. थोडं वय वाढल्यानंतर मग नकळतच मुलींचा वेगळा ग्रूप बनून त्यांचे खेळ्/गप्पा वेगळ्या झाल्या.
आमच्या गल्लीत दर थोड्या दिवसांनी वेगवेगळ्या खेळांच्या साथी यायच्या. कधी गोट्या, कधी चोरपोलिस/विषामृत्/दगड-माती/विटी-दांडू. पण नंतर कधी तरी (साधारण सातवी-आठवी नंतर क्रिकेट एके क्रिकेट)

आम्ही तर कोल्हापूरात एक्कया म्हणायचो.
बाकी लहानपणात परतून जाण्याचा मुड सर्वांचाच झालेला दिसतो आहे.. छान!

तात्या थोडीशी अजुन वेगळी १ ते २o ही बघा नावे :)

एकलम खाजा
दुर्री बाजा
तिरान बोजे
चार चौकटी
पाचिक पांडव
छमक छेन्डो
सातांक सुती
आठक गाटी
नमपर नलीया
दसे गुलाल्या
अकरम कैच
बारम बैच
तेरस काली
चौदस माली
पंधेरी पालखान
सोलेरे रावण
सतेरी भिरभिर
अठेरी नाल
उन्निस -बिन्नीस
बीसका टोला
ढोपर सोला ….

विसोबा खेचर's picture

2 May 2013 - 12:07 pm | विसोबा खेचर

मजेशीरच नावं आहेत... - : )

मीही बैदूल खेळलीये भरपूर आणि विटी दांडूही! साधारण सहावीत असताना प्रचंड वेड लावलं होतं या खेळांनी!

अद्द्या's picture

3 May 2013 - 9:37 am | अद्द्या

आमच्या कडे असायचा / असतो "त्रेंगोल"
एका त्रिकोणात प्रत्येकाने गोट्या ठेवायच्या . बाकी नियम तेच .

"पहिली कंट " दुसरी कंट वागेरा ठरवायचो . (म्हणजे . त्रिकोणातली कमीत कमी एक / दोन गोट्या काढल्या शिवाय दुसर्याच्या "ड्याम्बो "- तोच तो . तुमचा हंटर . - ला मारता नाही येत . )

गोट्या तर जिंकल्याच . हजाराने जिंकल्या . पण एक डबा सगळ्यांच्या ड्याम्बो ने पण भरलेला होता . माझ्या कडे सिमेंट चा मोठा होता . त्याने अक्षरशः फोडायचो दुसर्यांचे ड्याम्बो . .

संध्याकाळी लाईट जायची रोज . तेव्हा लपंडाव .
५ -६ गल्ल्यांचा परीघ ठरवायचा . तेवढ्यात कुठे हि लपा .

सगळं गेलं च्या मारी आता . .
"मोठे " झाले सगळे

श्रावण मोडक's picture

3 May 2013 - 11:29 am | श्रावण मोडक

बेळगाव का? डँबो हा तिथला(ही) शब्द!

यसवायजी's picture

13 Dec 2014 - 10:03 am | यसवायजी

निपाणीत हेन्न (स्त्री) आणी गंड ( पुरूष) हे शब्द वापरायचो. गलीत 'रोब'गेला की तो गंड समजला जाई. मग हेन्न रोबला मारून दूर ढकलायची पावर मिळत असे. (हेन्न गोटीला गलीपर्यन्त पोहचू न देणे)

तुमचा अभिषेक's picture

3 May 2013 - 9:52 am | तुमचा अभिषेक

ते शंभर.... अशी साधी सोपी नावे होती..
बाकी सगळे नियम , गल वगैरे नावे सारे सेम..
ढप च्या जागी मोठ्या गोटीला आम्ही ढप्पर बोलायचो..

एकंदरीत हा खेळ लहान मुलांचा कारण यात गोट्यांची हारजीत नसायची तर हरेल त्यावर राज्य म्हणजेच भोवर्‍याच्या खेळासारखी लंगडीची शिक्षा असा साधा सोपा हिसाब असायचा.

इतर खेळात वीत-वीत आणि ट्रँगल हे आमच्याइथे जास्त खेळले जायचे..

च्यायला गेले ते दिवस... शाळेतून घरी पोचल्यापोचल्या हातपाय धुवायच्या आधी बॅग फेकून खिश्यात जेवढ्या राहतील त्याच्या निम्म्या गोट्या कोंबून खेळायला पळायचो.. तासाभराच्या खेळात शंभर वेळा उठकबैठकचा व्यायाम व्हायचा.. पण आईला मात्र हात घाणीत लोळसवले जातात याचेच भारी टेंशन...

तुमचा अभिषेक's picture

3 May 2013 - 9:58 am | तुमचा अभिषेक

पगाम
चकने
तानसे - नो तानसे
साईड वाईड सबकुछ
घोडा (समोरच्याची गोटी पायरीवर असल्यास आणि आपली खाली तर जमिनीच्या जागी मांडीवरून मारणे)

आता भोवर्‍यांवर येऊ दे लेख
आम्ही गोट्या नै खेळलो फारसे मात्र भोवरे ज्याम फिरवलेत :)

भिंगरी's picture

14 Dec 2014 - 11:08 am | भिंगरी

भोवरा मला जास्त फिरवता येत नसे.(लग्नानंतर नवर्‍याचा पण नाही करता आला)पण काही जण वेगवेगळ्या पद्धतीने फिरवत असत.
वरून टाकणे,खालून टाकणे,हवेत फिरवून हातावर फिरवणे....(एक दुजे के लिये मध्ये रतीच्या बेंबीवर फिरवलेला दिसला होता.)
कोणत्यातरी पद्धतीला बायकोडी असे म्हणत.

नन्दादीप's picture

3 May 2013 - 11:14 am | नन्दादीप

मस्त... आम्ही पण लहानपणी खूप खेळलोय हा खेळ... एकाला अख्खा गावभर पिदवल्याचे आठवतय....
शेवटी तो रडकुंडीला आल्यावर खेळ थांबला....

आदूबाळ's picture

3 May 2013 - 11:26 am | आदूबाळ

प्रकाश नारायण संतांच्या लंपनकथांतल्या "परचक्र" नावाच्या कथेत गोट्या खेळण्याचं सुंदर वर्णन आहे...

जेपी's picture

13 Dec 2014 - 9:43 am | जेपी

हा धागा वर काढत आहे.

भिंगरी's picture

13 Dec 2014 - 12:29 pm | भिंगरी

हा धागा वर काढणार्‍याला खुप खुप धन्यवाद.
कारण हे वाचून मी पार ४५ वर्ष मागे गेले .
हे एकलम खाजा तर पार विसरूनच गेले होते.
आम्ही मुली सुद्धा भावंडांबरोबर गोट्या,विटीदांडू,आट्यापाट्या,चिघोडा,दहीहंडी या सार्‍यात भाग घ्यायचो.त्यावेळी आम्हाला
कोणीही अडवत नव्हते. आता हे वाचल्यावर सार्‍या आठवणी जाग्या झाल्या.

भिंगरी's picture

13 Dec 2014 - 12:53 pm | भिंगरी

या सिमेंटच्या गोट्यांना 'टमण'म्हणायचो.
ज्याच्याकडे असे टमण असायचे तो जास्त भाव खायचा.

...कुणी हा शब्द वापरतो आहे का हेच शोधत होतो. टम्मण गोटा.

हाडक्या's picture

16 Dec 2014 - 9:42 pm | हाडक्या

आणि या गोट्यांना आम्ही "हाडक्या" गोट्या म्हणायचो.. ;)

(इति अस्माकम नामरहस्य: )

अत्रुप्त आत्मा's picture

13 Dec 2014 - 12:56 pm | अत्रुप्त आत्मा

सिमेंट्च्या गोट्याला - ढप हे नाव ऐकून होतो..पण पुण्याकडे त्याला हाडकि म्हणतात..हाडासारखी दिसते ही आणि तितकिच टणक असतेही..म्हणून हाडकि..
दुपारचा कस्ला झोपतो..? ए....... चले..हाडक्या खेळायला....चल! अशीच हाळि दिली जायची आमच्या दोस्तात.

एस's picture

13 Dec 2014 - 3:19 pm | एस

हेच म्हणायला आलो होतो. 'हाडक्या'. खेळलोही खूप आणि सिमेंटपासून बनवण्याचा खटाटोपही खूप केला.

ऋतुराज चित्रे's picture

13 Dec 2014 - 1:26 pm | ऋतुराज चित्रे

मोठ्या गोटिला आम्ही टम्मन म्हणायचो. खडिचा चुणा (पूर्वी बांधकामात वापरायचे) रगडून त्यास गोटिचा आकार देऊन वाळ्वून टम्मन बनत असे. सिमेंटपासुन बनवायचा बराचवेळा प्रयत्न केला होता परंतू ना तो कधी टनक बनला ना त्याला सफेद रंग व गुळगुळितपणा आला.

शिगरुपी पावसाळ्यात खेळायला मजा यायची.

कानढोपरी हा गोट्यांचा खेळही धमाल होता.

अत्रुप्त आत्मा's picture

13 Dec 2014 - 1:31 pm | अत्रुप्त आत्मा

आम्मी खेळायचो,, ते धा/वीस आणि आक्या/टोक्या/बोक्या

त्याच धर्तीवर नविन खेळ काढावासा वाटतो.. आगोबा/ढगोबा/हत्ती =))

हाडक्या's picture

16 Dec 2014 - 9:45 pm | हाडक्या

बुवा.. किती ते पिडयचं हो एखाद्याला.. *diablo*

पुढच्या खेपेस तुम्हाला एखाद्या लेण्यांच्या गुहेत डांबून ठेवण्यात येईल बरं का. जपून.. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

18 Dec 2014 - 11:58 pm | अत्रुप्त आत्मा

कित्ती उलट विधान ते!!!!!!!!!!!? :p

भिंगरी's picture

13 Dec 2014 - 1:32 pm | भिंगरी

कानढोपरी खेळून सोलवटलेले कोपर घरात दाखवायची सोय नव्हती,कारण खेळणच बंद झालं असतं
शिगरूपीत मात्र मी जरा ढ होते,माझी शीग कधीतरीच उभी रहायची,तेही चिखल जास्त असला की घसरून आडवीच व्हायची.

भिंगरी's picture

14 Dec 2014 - 11:17 am | भिंगरी

खांब खांब खांबोळी,हा खेळ आम्ही भरपूर खेळलो आहे.
महापालिकेचे कार्यालय घराच्या बाजूलाच होते. ब्रिटीशकालीन बैठे,कौलारू उतरत्या छपराचे असल्याने,त्याला सागाचे भक्कम ६/७ खांब होते.आम्हाला संध्याकळी ५ ला कार्यालय बंद झाल्यावर खेळायला मोकळे मिळायचे.

आयुर्हित's picture

14 Dec 2014 - 11:19 am | आयुर्हित

एक जुनी गोष्ट आठवली!

बबन ताम्बे's picture

15 Dec 2014 - 1:11 pm | बबन ताम्बे

हाही एक गोट्यांचा खेळ होता. दोन किंवा चार भिडूंत खेळला जायचा. एक, दोन, तीन आणि + (म्हणजे चार) अशा रेषा चारी बाजूला आखत. एक म्हणजे नक्का, चार म्हणजे पुर्रा. दोन ला दुर्रा आणि तीनला तिर्रा म्हणत. चार किंवा दोन जन एकमेकांसमोर बसत. ज्याची पहीली खेळी असे (ते पण आदूली मादूली ढम्माय ढूस.. असे कायतरी म्हणत नंबर काढत ), तो बंद मुठीत काही गोट्या घेऊन मधे हात ठेवत असे. बाकीचे प्लेयर जेव्ह्ढी रिस्क घ्यायची तेव्ह्ढ्या गोट्या पाहीजे त्या नंबरावर ठेवत. म्हणजे नक्का, दुर्रा, पुर्र्यावर चार चार गोट्या ठेवल्या तर खोल तिर्रा असे ओरडायचे. मग ज्याने मुठीत गोट्या धरल्या होत्या त्याने चार चार च्या सेटने गोट्या ठेवायच्या. शेवटी जर तीन गोट्या उरल्या तर तो जिंकला आणि बाकी प्लेअर्सनी लावलेल्या सर्व गोट्या त्याने जिंकल्या. समजा दोनच गोट्या शेवटी राहील्या तर दुर्र्यावर ज्याने गोट्या लावल्या होत्या, त्याला ज्याने मुठ खोलली त्याने तेव्ह्ढ्या गोट्या द्यायच्या.
ह्यात पण रडी खेळायची टेक्नीक होती आणि सापडला की मारामा-या, भांडणे हमखास होत.
काही उडाण टप्पू मुले गोट्यांच्या जागी पैसे लावत.

सूरपाट्या बद्दल कोणी कसे नाही बोलले अजून ते ?

भिंगरी's picture

16 Dec 2014 - 11:16 pm | भिंगरी

कि सुरपारंब्या?

सूरपाट्याच हो.. सूर-पारंब्या वेगळ्या.. त्याबद्दल पण खरंतर कोणीच बोललेलं नाही तसं.

मला सूरपारंब्या आणि आट्यापाट्या माहीत आहे.

भिंगरी's picture

16 May 2019 - 12:32 am | भिंगरी

आज एकलम। खाजाची आठवण आली

गामा पैलवान's picture

20 May 2019 - 1:46 am | गामा पैलवान

च्यायला, सर्वात महत्त्वाची कडिक राहिली. :-)

एक वीतेची असायची. मारणारा गोटा आणि मार खाल्लेला गोटा जर एकवीत अंतरापेक्षा जवळ असतील तर मार खाणाऱ्यास कडिकचा लाभ मिळायचा. त्यानुसार तो आपला गोटा उचलून इतरत्र कुठेही ठेवू शकायचा. पुढील मार चुकवायला वा एखाद्या व्यूहात्म ठिकाणी आयतं जाण्यासाठी कडिकचा फार उपयोग व्हायचा. क्वचित प्रसंगी ३ वीतांची कडिक सुद्धा असायची. ती मारणाऱ्यास भारी पडायची, पण मार खाणाऱ्याची चांदी व्हायची.

-गा.पै.