✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एकलम खाजा, धोबी राजा.. :)

व
विसोबा खेचर यांनी
Tue, 04/30/2013 - 13:59  ·  लेख
लेख
हल्ली च्यामारी गोटे कुठेच मिळत नाहीत.. आमच्या लहानपणी गोटे मिळायचे.. गोट्या नव्हेत.. गोटे. छानसे सिमेन्टने बनवलेले गोल, गु़ळगुळीत गोटे..त्यांना 'ढप' असेही म्हणत..आम्ही सताठ जण मग रोज गोटे खेळायचो.. मातीतच गोट्याच्या आकाराची आणि तेवढीच खोल अशी लहानशी गोलाकार खळी खणायची. त्याला गल किंवा गली म्हणत.. मग सर्वांनी एका ठराविक अंतरावरून त्या गलीच्या दिशेने चकायचं.. ज्याचा गोटा गलीच्या जास्ती जवळ जाईल त्याची पहिली पाळी.. सुरवातीची एकलम खाजाची गल कंपलसरी.. एकलम करण्यापूर्वी वीतेला परवानगी नाही..एकलम झाल्यानंतर मग वीत घेऊन गोटा मारायला परवानगी.. त्यातदेखील वीत ढापणं हा प्रकार असे. हळूच, सगळ्यांच्या नकळत करंगळीच्या पुढे आंगठा टाकायचा आणि वीत वाढवायची..त्याला वीत ढापणं असं म्हणत.. मग 'ए..वीत ढापतो का रे..? या वरून भांडणं.. एकदा एकलम झाला की मग दोन नंबर पासून ते दहा नंबरापर्यंत म्हणजे धोबीराजा पासून दस्सी गुलामापर्यंत दुस-यांचे गोटे मारायचे.. गल भरून देखील नंबर वाढवत येत असे.. मग अकरा नंबर म्हणजे अक्कल खराटाला गल कंपलसरी.. तिथे चुकून जर कुणाच्या गोट्याला टोला मारला तर पुन्हा पनिशमेन्ट म्हणून एकलमपासून खेळायचं. अक्क्लची गल जशी कंपलसरी तसं बाराचा म्हणजे बक्कल किंवा बाल मराठाचा टोला कंपलसरी..तिथे जर चुकून गोटा गल्लीत गेला तरी पुन्हा एकलमची पनिशमेन्ट.. एकलमच्या गलीआधीपासून ते एकलम झाल्यापसून ते बक्कलपर्यंत केव्हाही जर दुस-याच्या गोट्याला टोला मारून आपला गोटा जर गल्लीत गेला तर कॉम्प्लीमेन्टरी सुटका..! या खेळातल्या १ ते १२ आकड्यांची नावंही मजेदार होती. मला आज ती इतक्या वर्षांनीही जशीच्या तशी आठवतात.. एकलम खाजा धोबी राजा तिराण बोके चारी चौकटे पंचल पांडव सैय्या दांडव सप्तक टोले अष्ठक नल्ले नवे नवे किल्ले दस्सी गुलामा अक्क्ल खराटा बाल मराठा.. अशी छान यमकबिमक असलेली नावं होती..शिवाय साईड सबकुछ, नो कुछ, हलचूल..असे काही खास परावलीचे शब्दही होते.. सर्वात शेवटी जो उरेल त्याच्यावर पिदी.. त्याने शिक्षा म्हणून धावत जाऊन तीन लांब उड्या मारायच्या. तिसरी उडी जिथे पडेल तिथे त्याने आपला गोटा ठेवायचा. इतरांनी मग त्याच्या गोट्याच्या जास्तीत जास्त जवळ जाईल असं चकायचं आणि त्याचा गोटा मारायचा..पुन्हा मग पिदी सुरू.. एखाद्याला पिदवणे..त्यावरून पिदी हा शब्द पडला असावा.. जेव्हा कुणाचाच गोटा लागणार नाही तेव्हाच त्याची पिदीची शिक्षा पूर्ण व्हायची आणि मग पुन्हा सगळ्यांनी चकून नवा डाव सुरू करायचा..एखाद्याची एकलमची गलदेखील भरली गेली नसेल तर त्याच्यावर डबल पिदी..पिदीचा गोटा ठेवल्यावर जर चकताना कुणाचा डायरेक्ट नेम लागला तर ६ उड्यांची पिदी..! काय साली मजा यायची हे गोटे खेळताना..! कुठल्याही वाण्याकडे हे गोटे अगदी सहज मिळत.. मला ती हे सिमेन्टचे गोटे भरलेली वाण्याकडची काचेची बरणी आजही आठवते, डोळ्यासमोर दिसते..! टणट्णीत सिमेन्टच्या गोट्याने दुस-या गोट्याला नेम मारताना जाम मजा यायची.. कडक मस्त असा आवाज यायचा.. उकिडवं बसून डावा हाताचा आंगठा जमिनीवर टेकून डाव्या हाताच्या मधल्या बोटात उजव्या हाताने गोटा धरून कडक नेम मारायचा.. तेव्हा आम्हाला आता मिळतात तसे मोठमोठ्या मॉलमधून घेतलेले महागडे छान छान रंगीत कपडे नव्हते.. साधी हाफ प्यॅन्ट आणि गंजीफ्रास..खेळता खेळता अगदी भरपूर मळून जायचे हे कपडे..कारण घामेजलेले मातीचे हात हाफप्यॅन्टीला किंवा गंजिफ्रासालाच पुसायची साधीसोपी रीत होती तेव्हा.. स्वच्छतेच्या अतिरेकाच्या वगैरे भयानक कल्पना नव्हत्या.... "तंदुरुस्ती की रक्षा करता है लाईफबॉय, लाईफबॉय है जहा तंदुरुस्ती है वहा.." हे छानसं गाणं म्हणत अतिशय साधीसुधी अशी लाईफ बॉयची अंघोळ करायची पद्धत होती... आज मला कुठेच कुणी मुलं हे गोटे खेळताना दिसत नाही याचं दु:ख होतं खूप. वाईट वाटतं.. स्वतःच्या घरी छान छान एसीमध्ये बसून अत्यंत कृत्रीम असे संगणकीय व्हिडियो गेम की कुठलेसे खेळ खेळायची पद्धत आहे आता.. चालायचंच.. कालय तस्मै नमः.. काळाच्या ओघात आमचे एकलम खाजा, धोबीराजा कधी, कुठे नाहिसे झाले, कुठे हरवले ते कळलंच नाही..! -- डब्बल पिदितला तात्या.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
47449 वाचन

💬 प्रतिसाद (86)

प्रतिक्रिया

माझ्या मुलाला शिकवाल का हे?

पिलीयन रायडर
Tue, 04/30/2013 - 14:03 नवीन
माझ्या मुलाला शिकवाल का हे? अजुन थोडा लहान आहे तो.. पण ३-४ वर्षात शिकवता येईल कदाचित..!! हे असं काहीतरि लिहा ना.. छान वाटत वाचुन...
  • Log in or register to post comments

+१

स्पा
Tue, 04/30/2013 - 14:28 नवीन
हे असं काहीतरि लिहा ना..
असेच बोलतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

वा

चाणक्य
Tue, 04/30/2013 - 14:20 नवीन
आम्ही या खेळाला एक्कया- टोक्कया म्हणायचो. नियम हेच सगळे...तसंच राजाराणी हा पण खेळ असायचा..त्यात पिदी नसायची त्यामुळे पेदरट पोरांना तो आवडायचा. अजुन एक खेळ म्हणजे जिंकाजिंकी. दुस-याच्या गोट्या जिंकल्या की जग जिंकल्याचा आनंद व्हायचा....कुठल्याही खेळाची नविन सुरुवात करताना जो 'सबलास्ट' असं सगळ्यात आधी म्हणेल त्याला त्याची गोटी सगळ्यात शेवटी टाकता यायची. रोज संध्याकाळी गोट्या खेळतो म्हणून घरचे बोंबलायचे, त्यावर आम्ही गोट्या खेळताना ऊठबस होत असल्याने पायांचा चांगला व्यायाम होतो असं सांगायचो. मजा यायची एकंदरीत
  • Log in or register to post comments

वेगळी वर्शन

अभ्या..
Tue, 04/30/2013 - 14:25 नवीन
तात्या थोडीशी ही बघा वेगळी वर्शन . एकलम खाजा दुर्री बाजा तिरान बोजे चार चौकटी पच्चाला पांडव सैह्या दांडव सात पुतुळे अष्टीक नल्ले नौ नौ किल्ले दश्शा गोंडा अक्कल कैची बारा मैची :) बाकी नियम सगळे शेम टू शेम. ढीस अन मासा ज्यादा फेमस होते पण. बॅट्या सांगतोय बघा मासा कसा असतोय त्यो. ;)
  • Log in or register to post comments

येस्स.. ही नावं पण मस्तच आहेत

विसोबा खेचर
Tue, 04/30/2013 - 14:28 नवीन
येस्स.. ही नावं पण मस्तच आहेत.. जियो..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मासा माहिती नै बे अभ्या...

बॅटमॅन
Tue, 04/30/2013 - 14:28 नवीन
मासा माहिती नै बे अभ्या....गोट्या कधी फारशा खेळ्ळो नै. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मासा माहित नाही?

स्पा
Tue, 04/30/2013 - 14:32 नवीन
अरेरे जिंदगी व्यर्थ आहे एखाद्या काडीने मातीवर मासा काढायचा , त्यात रांगेने ७/८ गोट्या ठेवायच्या. आणि टपाटप एक एक उडवत जायची. माशाच्या आत आपली गोटी गेली, तर आपल्याकडून एक गोटी आत . फुल धमाल यायची .
  • Log in or register to post comments

सही रे स्पांडू. मस्त प्रकार

बॅटमॅन
Tue, 04/30/2013 - 14:36 नवीन
सही रे स्पांडू. मस्त प्रकार आहे, पण मी अंमळ वयस्कर आहे हे खेळायला आता ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

ह्यो बग बे बॅट्या

अभ्या..
Tue, 04/30/2013 - 14:39 नवीन
=)) =)) =)) खरंच बॅट्या त्या मराठी अन संस्क्रूत भाषेच्या पायी पार वाया गेला राव तू. ;) स्पावड्या बग कसा सर्व्गुण्संपन्न हाय. आणि माशाच्या शेपटातली गोटी ऊडवली तर माशातल्या सगळ्या गोट्या नीट उचलून खिशात घालायच्या हे राहीलं. ह्यो बग ग्राफीकल मासा. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अगदी सहमत आहे बग कुणी मुलगी

बॅटमॅन
Tue, 04/30/2013 - 14:49 नवीन
अगदी सहमत आहे बग ;) कुणी मुलगी-मित्र नै तेही दु:ख आहेच बघ. स्पांडू तर आल-रौंडर आहेच, तूपण काही कमी नाहीस :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अरेरेरे…आधीच बॅटमॅन त्यात

मालोजीराव
Tue, 04/30/2013 - 15:24 नवीन
अरेरेरे…आधीच बॅटमॅन त्यात विदाऊट मैत्रीण...दुष्काळात तेरावा म्हयना संस्कृतपंडित का काय ते पण हायेस, तुझ्यासाठी ज्ञानाची 'नवी' दालनं 'खुली' करण्याची गरज आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

+/-

बॅटमॅन
Tue, 04/30/2013 - 15:26 नवीन
एक खुलासा: मैत्रिणी आहेत, गर्लफ्रेंड नाही :) पण ज्ञानाच्या नव्या दालनांत जाण्यासाठी उत्सुक आहे हेवेसांनल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मालोजीराव

आता कशाला?

अभ्या..
Tue, 04/30/2013 - 15:33 नवीन
गोट्या दालनात नै बे अंगणात नायतर रस्त्यात खेळतेत. ;) आता काय उपेग न्हाय. तुला तसे बसता पण येणार नै. (जेजेच्या अंगणात हायक्लास पोरांबरोबर एकलम खाजा खेळलेला) मीच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हात लेका, शिकवून शिकवून

बॅटमॅन
Tue, 04/30/2013 - 15:41 नवीन
हात लेका, शिकवून शिकवून गोट्या खेळायला शिकवणार असशील तर नगो ;) दुसरं गुह्यतम शास्त्र काही असेल तर सांग ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अलंकट

स्पा
Tue, 04/30/2013 - 14:42 नवीन
माझा सर्वात आवडता ग्येम मोठ वर्तुळ काढायचं , प्रत्येक प्ल्येर ने ठरवून प्रत्येकी आत गोट्या ठेवायच्या एका ठराविक अंतरावरून आपल्या गोटीने वर्तुळातली एकच कुठलीही गोटी उडवायची एका पेक्षा जास्त उडल्या तर आपण एक गोटी दंड म्हणून आत ठेवायची. एकच उडली (देव दयेने) तर आतला सगळा माल आपला :) सॉलिड ज्याक्पोट लागायचा लागला तर, हरलो तर एकदम बराच लॉस व्हायचा..
  • Log in or register to post comments

गोटे आणि टबबू एकच ना ?

लोटीया_पठाण
Tue, 04/30/2013 - 14:44 नवीन
गोटे आणि टबबू एकच ना ?
  • Log in or register to post comments

स्मरणरंजन लेख आवडला.

गणपा
Tue, 04/30/2013 - 14:50 नवीन
स्मरणरंजन लेख आवडला. :) हाफचड्डी, गंजीफ्रॉक (तोच तो बनीयन)/सुतीकफनी तंतोतंत. बाकी मुंबईत हे कधी खेळलो नाही, मुंबईचे सगळे दोस्त साले हायक्लास. सागर गोटे,गोट्या, विटीदांडू, डब्बा आईस्पाईस, पत्ते हे सगळे खेळ मे महिन्यात गावाला दोस्तां बरोबर. (ही दोस्त मंड्ळी म्हणजे माझ्या वयाचे चुलत मामा मंडळी, गुराखी पोरं, शेतातल्या मजुरांची शेंबडी पोरं)
  • Log in or register to post comments

आताशा मिळत नाहीत म्हणून

गवि
Tue, 04/30/2013 - 14:50 नवीन
आताशा मिळत नाहीत म्हणून व्हाईट एम-सीलची हाताने मळून तशीच गोटी बनवली होती. नीट वाळवल्यावर हुबेहूब सिमेंट गोटीसारखीच बनते. लहानपणी काचेची गोटी आणि सिमेंट गोटी यातला फरक MRI च्या रबर बॉल आणि "सीदन" (सीझन) बॉलसारखा होता. "बंटा" हा शब्द कोंकण सोडून अन्य भागात या गोटीसाठी ऐकल्याचं आठवतं पण कुठे ते आठवत नाही.
  • Log in or register to post comments

यस !

परिकथेतील राजकुमार
Tue, 04/30/2013 - 14:59 नवीन
"बंटा" हा शब्द कोंकण सोडून अन्य भागात या गोटीसाठी ऐकल्याचं आठवतं पण कुठे ते आठवत नाही.
आम्ही बंटाच म्हणायचो. आणि एक अजून शब्द म्हणजे हंटर. अवांतर :- थोड मोठे झाल्यावरती भांगेच्या गोळीला पण बंटाच म्हणतात हे कळाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हो.. हंटर.

गवि
Tue, 04/30/2013 - 15:04 नवीन
हो.. हंटर. माझ्या मते सर्वच बंट्यांना हंटर म्हणत नसावेत. त्यातला एखादाच जबरी मोठा बंटा असेल त्याला हंटर म्हणत असावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

टबूल

योगी९००
Tue, 04/30/2013 - 16:02 नवीन
आम्ही कोल्हापुरला मोठ्या गोटीला टबूल म्हणायचो. बाकी लेख मस्त हो तात्या. मजा आली वाचून. लहानपण आठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

बंटा आणि हंटरबरोबरच खास

किसन शिंदे
Tue, 04/30/2013 - 17:47 नवीन
बंटा आणि हंटरबरोबरच खास मुंबैय्या भाषेत त्याला मार्टप पण म्हणायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

टेंबा/ टेंभा..

चिगो
Wed, 05/01/2013 - 12:47 नवीन
आमच्याकडे "टेंबा / टेंभा" हा शब्द होता मोठ्या गोटीसाठी..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

बल्ल्या..

नि३सोलपुरकर
Tue, 04/30/2013 - 14:57 नवीन
करेक्ट स्पावड्या, एकच उडली (देव दयेने) तर आतला सगळा माल आपला आणी गोटी चुकुन इतर (एकाहून अधिक) गोटयास लागली तर त्याचा बल्ल्या व्हायचा म्ह्ण्जे तो गडी बाद. तात्या ने सांगितलेला खेळ आमच्या कडे "राजाराणी" ह्या नावाने मासा हा गेम "बाम्बे" ह्या नावाने खेळतात (आजही)
  • Log in or register to post comments

बल्या केल्या राव हा लेख टाकुन....

अग्निकोल्हा
Tue, 04/30/2013 - 15:03 नवीन
मज्या आलि.
  • Log in or register to post comments

मस्त हो तात्या !

रुमानी
Tue, 04/30/2013 - 15:13 नवीन
लहानपणी खुप आवडीने खेळायचे मी पण. बरी आठवण केलित आता मुलांना शिकवता येईल सुट्टीत... :)
  • Log in or register to post comments

भारीए राव

मिसळलेला काव्यप्रेमी
Tue, 04/30/2013 - 15:15 नवीन
माझ्याकडे एक डालडाचा ५ किलोचा डब्बा होता, फुल्ल भरलेला असायचा गोट्यांनी सुट्ट्या संपायला आल्यावर. मग शाळा सुरु झाल्यावर आमचे बाबा नित्यनेमाने गटारात रिकामा करायचे तो, त्याशिवाय कार्टा अभ्यास करणारच नाही यावर त्यांचा ठाम विश्वास ;) शेवटी आम्ही करायचे तेच करायचो, मग मी एक गुप्त जागा शोधून काढली होती, गोट्या लपवायला, च्यायला दरवर्षी ते गुपित ठेवायला लै कष्ट घ्यायला लागायचे. बाकी परत एकदा मला माझीच 'ती खोली' आठवली.
  • Log in or register to post comments

बुलचोक!!!

पिवळा डांबिस
Tue, 04/30/2013 - 22:36 नवीन
माझ्याकडे एक डालडाचा ५ किलोचा डब्बा होता, फुल्ल भरलेला असायचा गोट्यांनी सुट्ट्या संपायला आल्यावर. मग शाळा सुरु झाल्यावर आमचे बाबा नित्यनेमाने गटारात रिकामा करायचे तो, त्याशिवाय कार्टा अभ्यास करणारच नाही यावर त्यांचा ठाम विश्वास
च्यामारी! अगदी डिट्टो!! काय त्याकाळचे बाबा लोकं एकत्र येऊन मिटींग घेऊन ही धोरणं ठरवायचे की काय देव जाणे!!! आमच्या घरीही हाच प्रकार!! वर कपडे किती खराब केलेत/ फाडलेत यावर वेळप्रसंगी फटकेही!!! तरीही दर वर्षाला जूनमध्ये नवीन डब्बा भरायचाच!!! :) आता तोच माणूस आपल्या दोन्ही नातवंडाना स्वतः गोट्या विकत घेऊन देतांना मी पाह्यलाय!!! म्हातारपणी पापक्षालनाचा प्रयत्न, दुसरं काय!! ;) गोट्यांमध्ये बुलबुल हा प्रकार असायचा. साध्या गोट्या एरवी कलरलेस पण त्यात काही भाग हिरवा/ निळा/ ब्राऊन असलेल्या असायच्या पण बुलबुल हा संपूर्ण गडद रंगाचा (बहुदा हिरवा किंवा निळा) असायचा. कुणाचा बुलबुल जिंकला ही हात स्वर्गाला पोचल्याचा आनंद व्हायचा!!! :) "बुलचोक" हा असाच एक शब्द! नक्की अर्थ काय होता ते माहिती नाही पण खेळता-खेळता मध्येच बुलचोक असं ओरडायची पद्धत होती!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

'बुलचोक' हा बहुदा 'भुल चुक

गणपा
Wed, 05/01/2013 - 00:58 नवीन
'बुलचोक' हा बहुदा 'भुल चुक माफ' याचा अपभ्रंश असावा. कधी कधी खेळताना चुकुन शेजारच्या गोटीला हाताने स्पर्श झाला तर डाव बाद व्हायचा अश्यावेळी आधी आम्ही मोठ्याने ओरडायचो 'बुलचोक' म्हणजे मग चुकुन शेजारची गोटी जरी हलली तरी डाव बाद होत नसे. :) साला फार दिवसांनी हा शब्द ऐकला आज. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

बुलचोक..

उपास
Wed, 05/01/2013 - 01:47 नवीन
य्यस्स.. आणि डब्बल्-टिप्पल असंही असायचं, म्हणजे एका वेळी दोन गोट्यांना लागलं तरी माफ. राजा-राणी खेळताना कच्चा राजा असा एक प्रकार असायचा. बुलबुल पांढरेही असायचे.. गोट्या विकत घेतलेल्या कधी आठवतच नाहीत..!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

डालड्याचा डब्बा.. सेम सेम..

तुमचा अभिषेक
Fri, 05/03/2013 - 10:04 नवीन
फक्त तो गोट्यांचे साधेसुधे गेम खेळून भरला नाही माझा कधी.. जेव्हा तीन पत्त्यांवर गोट्या लाऊन खेळायला लागलो तेव्हा .. पण तेव्हा गोट्या खेळायची मजा कमी झाली हे ही खरे.. अन मग एक दिवस गोट्यांच्या जागी पैसे लाऊन खेळायला लागलो.. आणि मग गोट्याच आयुष्यातून गेल्या..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

झकास....

मन१
Tue, 04/30/2013 - 15:41 नवीन
बालपणाची सफर....
  • Log in or register to post comments

तात्या मस्त स्मरण रंजन

jaypal
Tue, 04/30/2013 - 15:42 नवीन
ह्या निमीत्ताने कोयबा,शिगरुपी, काठी पाणी, दगड का माती?, विषाम्रुत, व्हाट कलर? टायर चे गाडे(त्या वर खडुने जावा,यझदी ई. लिहीलेले असे) ई. खेळ आठवले. अवांतर= चाळीतली ईतर मुले मासा,रिंगण किंवा कोयबा खेळ असताना आमची गोल्डन गँग एका पडक्या घरात शांत पणे तीन पत्त्यांनी गोट्या खेळायचो. एकदा आम्च्या सगळ्या घरच्यांनी धाड टाकली आणि सगळा मुद्देमाल / ऐवज सरळ गटारात ओतुन आमाची गठडी आवळली. तेंव्हा पासुन मग नंतर बरीच वर्शे आम्ही.............................................................................................................................................................................................................................................. सतत ठिकांण बदत खेळत असु ;-)
  • Log in or register to post comments

शोधा म्हणजे सापडेल

सहज
Tue, 04/30/2013 - 16:00 नवीन
>काळाच्या ओघात आमचे एकलम खाजा, धोबीराजा कधी, कुठे नाहिसे झाले, कुठे हरवले ते कळलंच नाही..! कपाळात पाहिले का? - हंटर
  • Log in or register to post comments

सहजच कपाळात घातल्या की हो

बॅटमॅन
Tue, 04/30/2013 - 16:07 नवीन
=)) =)) =)) =)) सहजच कपाळात घातल्या की हो =)) =)) =)) =)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

पांचट

कपिलमुनी
Tue, 04/30/2013 - 16:24 नवीन
पांचट प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

हॅहॅहॅ... सहजराव हेच मिपाचे

मदनबाण
Tue, 04/30/2013 - 17:45 नवीन
हॅहॅहॅ... सहजराव हेच मिपाचे खरे ख्रिस गेल ! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

काय तात्स्...आज गोटी-गोटी का

मदनबाण
Tue, 04/30/2013 - 17:32 नवीन
काय तात्स्...आज गोटी-गोटी का ? एक धागा लपा-छुपी वर पण काढा ! ;) (कब्बडी प्रेमी) ;)
  • Log in or register to post comments

छान स्मरणरंजन!!

किसन शिंदे
Tue, 04/30/2013 - 17:50 नवीन
छान स्मरणरंजन!!
  • Log in or register to post comments

एकलम खाजा, धोबी राजा..

सावत्या
Tue, 04/30/2013 - 17:55 नवीन
लहानपणि बिल्डींगच्या गच्चीवर आम्हीपण हा खेळ खेळायचो पण १ ते १२ ऐवजी १ ते १० असायचे. पण पीदि संपली की पीदीच्या मार्गक्रमणावर लंगडी घालायची आणि सगळी मूल मागून ओरडायची " लंगडी माझी बायको... लंगडी माझी बायको" आणि त्यावेळी जर का "आपली लाइन" गच्चीवर असेल तर शरमेने मेल्यासारखे व्हायचे!!!! :-) सावत्या!!!!
  • Log in or register to post comments

आणि त्यावेळी जर का "आपली लाइन

विसोबा खेचर
Tue, 04/30/2013 - 18:06 नवीन
आणि त्यावेळी जर का "आपली लाइन" गच्चीवर असेल तर शरमेने मेल्यासारखे व्हायचे!!!!
मस्त..-: ) असो.. आमची पण लाईन होती त्या काळात.. मंजू. साला, लै जीव होता आपला मंजूवर. खूप छान दिसायची रे मंजू... जाऊ द्या... रौशनी आणि टकल्या बापटानंतर मंजूची ष्टोरी सांगेन.. - : )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सावत्या

हे मात्र झक्कास..

उपास
Tue, 04/30/2013 - 19:21 नवीन
गिरगावातले दिवस ते.. वाड्यावाड्यातून खेळायचो.. भोवरे, गोट्या. वाळवण असायची तापलेल्या रस्त्यावर आणि आम्ही मुलं. पोपो, घड्याळ, इल्लम असं बरच काही खेळायचो. खूप जण असली की पिदीला मजा यायची. दिवसच्या दिवस पिदवायचो असं आठवतय. गोट्यांच्या बरण्या भरलेल्या असत. तसं ते तासनतास उकीडव बसून गोट्या खेळणं असल्यामुळे पोट सुटणे वगैरे प्रकार कधीच नसायचे लहान मुलांत, आणि हे कमी म्हणून की काय, वाडीत छान खेळता यावं म्हणून घराच्या कोपर्‍यात रात्र रात्र गोट्यांच्या नेमाची प्रॅक्टीस करत बसत असे.. पण सॉलिड हात बसला होता :) डफ्फर, गठ्ठे, गोट्या असं बरच काही साठवलं होतं वर्षानुवर्ष.. पुढे त्याचं काय केलं आठवत नाही.. अवांतरः मध्ये गिरगावात गल्लीत गेलो तर प्रचंड प्रमाणात मोटारसायकली, इतक्या की चालायला जागा नाही. एक काळ असा होता की सगळं मोकळं असायचं आणि डांबरी रस्त्यात बसून घामटलेल्या अंगाने दिवस दिवस खेळत असू. आता मुलांना खेळायला जागाच कुठे राहिलेय? मग व्हिडीयो गेमचे सायबर कॅफे भरून वाहाणारच!
  • Log in or register to post comments

फारा दिवसांनी हे शब्द ऐकले.

मराठे
Tue, 04/30/2013 - 19:23 नवीन
फारा दिवसांनी हे शब्द ऐकले. पोराला घेऊन खेळायला पाहिजे.. फक्त आता उकिडवं बसता येइल का हे पहायला हवं!
  • Log in or register to post comments

छान

कंजूस
Tue, 04/30/2013 - 20:45 नवीन
छान ! 'तेरा' साठी विसरलो पण शेवटी चौदा हात लंगोटा होते . डफ किंवा ढप अजूनही मुंब्रा अथवा भिवंडीला कधीतरी मिळतात . गोटी ज्या गोटी-सोडयाच्या बाटलीत असते तो सोडाही पेण ,रेवदंडाकडे मिळतो .
  • Log in or register to post comments

गेले ते दिन गेले...

चौकटराजा
Wed, 05/01/2013 - 08:50 नवीन
माणूस या भूतलावर काही सहस्त्र वर्षे आहे. गेल्या ५० /६० वर्षात सारेच फार बदलले. मला वाटते गेले ते दिन गेले म्हणत उसासे टाकण्याचे रेकॉर्ड आमच्या पिढीने केले आहे इतका बदल सार्‍या गोष्टीत झालाय. त्यात मग असे खेळही आले. त्याचा एक मोट्ठा धागाच होउन जाईल इथे. आम्ही हाडकी गोट्या म्हणायचो तो हाच प्रकार आहे का...?] बाकी बंटेलपाणी किंवा चिपरीपाणीच त्यात कावड हा प्रकार खेळलो आहे. ज्याच्यावर राज्य आले आहे त्याला पार गावातून घुमवत घुमवत न्यायचे येताना गल्ली पर्यंत लंगडी घालत यायला लावायचे व एक अत्यंत घाण अशी ओळ सर्वानी तोंडाने म्हणत त्या " राज्य" वाल्याला पार मेल्याहून मेल्या सारखे करायचे. सगळ्यात करमणूक व्हायची खर्च अजिबात नाही. तसेच सॉडावाटरच्या बाटल्यांचे बिल्ल्ले सिगरेटची पाकिटे, अगपेट्यांचे बॉक्स यांचा " चलन" म्हणून वापर ही व्हायचा. बाबा " कोळसा" म्हणजे काय असा प्रश्न काहे वर्षापूर्वी माक्ष्या मुलीने मला विचारला होता. कदाचित आणखी १०० वर्षानंतर चच्या बाबाना सी एन जी म्हणजे काय " असाही प्रश्न विचारला जाउ शकतो.
  • Log in or register to post comments

रोचक आठवणी

श्रीरंग_जोशी
Wed, 05/01/2013 - 08:58 नवीन
पहिलम पेढा दुध मोगरा असेही एक गाणे म्हंटले जायचे. पुढ्च्या ओळी आठवत नाही. त्याखेरीज, काळा कागद फिक्की शाई अजून डाव आला नाही हे पण एक होते. कंचे अन गोट्या फारसे खेळलो नसलो तरी जुजबी माहिती ठेवायचो. गोट्या खेळताना ढोपर वापरून काहींचे ढोपर फुटायचे सुद्धा.
  • Log in or register to post comments

घरात येणारे

इरसाल
Wed, 05/01/2013 - 09:22 नवीन
पाँडस्चे पत्र्याचे डबे गोट्यांनी भरुन लाकुड्फाटा भरलेल्या खोलीत लपवुन ठेवायला लागायचे पण कधी कधी तो खजिना वडिलांच्या हातात पडायचा. असो. असच एकदा कोळश्याची इस्त्री तापायला ठेवली होती वडिलांच्या शर्टाला इस्त्री करण्यासाठी आणी लागलो गोट्या खेळायला, थोड्या वेळाने वडिलांनी हाक मारली मी तसाच इस्त्री उचलुन गेलो आणी ठेवली शर्टवर बरोब्बर इस्त्रीच्या आकाराचा शर्ट्ला आणी चादरीला छापा पडला आणी मग माझ्यावर......
  • Log in or register to post comments

सही........

ढंप्या
Wed, 05/01/2013 - 10:54 नवीन
आमच्याकडे या खेळाला आक्या बोक्या ठोक्या म्हणायचो. नियम हेच सगळे...तसंच चकताना कोणाच्या गोटीला उडवले तर कॉम्प्लीमेंटरी डाव संपला....... मग डायरेक्ट पिदी घ्यायला एलिजिबल..... राजाराणी हा पण खेळ असायचा..... जिंकाजिंकीला आम्ही हारुस पुरुस म्हणायचो..... याच्यात जिंकलेल्या गोट्यांनी माझ्याकडचा भोपळा भरुन गेला होता...... जाम मजा यायची........... जुन्या आठवणींनी दिवस सार्थकी लागल्यासारखा झाला.... धन्यवाद तात्या...
  • Log in or register to post comments

सुट्टीचे दिवस

तिमा
Wed, 05/01/2013 - 12:43 नवीन
गोटी, गोट्या खेळणे, सिगरेटची रिकामी पाकिटे जमवणे, पावसाळ्यात रुतवणी खेळणे ........! लहानपणची आठवण प्रकर्षाने करुन दिलीत तात्या. पण लहानपणी हॉकी,फुटबॉल खेळण्याची फार इच्छा होती ती अपुरी राहिली कारण जवळपास कोणी क्रिकेट शिवाय दुसरा खेळ खेळतच नसत.
  • Log in or register to post comments

माझी भर

हुप्प्या
Wed, 05/01/2013 - 23:15 नवीन
मी लहानपणी खुप गोट्या खेळायचो. एक विशेष जाणवलेली गोष्ट म्हणजे ह्या क्षेत्रातील परिभाषा. गोटीला काय म्हणायचे इथपासून ते खेळातील विविध गोष्टींकरता असणारी विचित्र वाटणारी पण नंतर आपलीशी वाटणारी नावे. अगदी पुण्यात आणि मुंबईत देखील ह्यातील परिभाषा इतकी वेगळी होती की खरे वाटणार नाही. चकणे, पिदी, थड (म्हणजे गोटी कुणाच्या पायावर आपटली तर ती कानात ठेवून दूर भिरकावणे. ह्याला थड का म्हणातात माहित नाही). कोच्चा नावाचा काहीतरी प्रकार होता आता तो आठवत नाही. दुसर्‍याची गोटी खूप लांब असेल तर गुडघ्याने मोजपाम घेऊन काहीतरी करायची पद्धत होती ते आता नीट आठवत नाही. पण एखादा भाषाशास्त्री ह्या परिभाषेचा अभ्यास करुन जवळपास बोललया जाणार्या भाषातील शब्दांची देवाणघेवाण ह्या विषयावर प्रबंध लिहू शकेल इतका ऐवज ह्या परिभाषेत आहे. दुसरे असे की मुली ह्या खेळात जवळपास नाहीतच. खरे तर हा इतका दांडगाईचा खेळ नाही. गोट्यांचाच एक भाऊ सागरगोटे हा मुलींनी स्वीकारला पण अगदी मुली मुली मिळून गोट्या खेळत आहेत असे फार दिसत नाही. असे का? कुणाला माहित आहे का? (म्हणून कदाचित ह्यातील परिभाषा थोडी चावट बनली असावी.) गोटीच्या आत फुलाच्या पाकळीसारखे काहीतरी डिझाईन असायचे ते फूल बाहेर काढण्याकरता अनेक गोट्या फोडल्या आहेत पण काचांच्या तुकड्याखेरीज हाती काही आले नाही! खूप नंतर कधीतरी काच कशी बनवतात, ती रंगीत कशी बनते वगैरे शिकायला मिळाले.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा