✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एकलम खाजा, धोबी राजा.. :)

व
विसोबा खेचर यांनी
Tue, 04/30/2013 - 13:59  ·  लेख
लेख
हल्ली च्यामारी गोटे कुठेच मिळत नाहीत.. आमच्या लहानपणी गोटे मिळायचे.. गोट्या नव्हेत.. गोटे. छानसे सिमेन्टने बनवलेले गोल, गु़ळगुळीत गोटे..त्यांना 'ढप' असेही म्हणत..आम्ही सताठ जण मग रोज गोटे खेळायचो.. मातीतच गोट्याच्या आकाराची आणि तेवढीच खोल अशी लहानशी गोलाकार खळी खणायची. त्याला गल किंवा गली म्हणत.. मग सर्वांनी एका ठराविक अंतरावरून त्या गलीच्या दिशेने चकायचं.. ज्याचा गोटा गलीच्या जास्ती जवळ जाईल त्याची पहिली पाळी.. सुरवातीची एकलम खाजाची गल कंपलसरी.. एकलम करण्यापूर्वी वीतेला परवानगी नाही..एकलम झाल्यानंतर मग वीत घेऊन गोटा मारायला परवानगी.. त्यातदेखील वीत ढापणं हा प्रकार असे. हळूच, सगळ्यांच्या नकळत करंगळीच्या पुढे आंगठा टाकायचा आणि वीत वाढवायची..त्याला वीत ढापणं असं म्हणत.. मग 'ए..वीत ढापतो का रे..? या वरून भांडणं.. एकदा एकलम झाला की मग दोन नंबर पासून ते दहा नंबरापर्यंत म्हणजे धोबीराजा पासून दस्सी गुलामापर्यंत दुस-यांचे गोटे मारायचे.. गल भरून देखील नंबर वाढवत येत असे.. मग अकरा नंबर म्हणजे अक्कल खराटाला गल कंपलसरी.. तिथे चुकून जर कुणाच्या गोट्याला टोला मारला तर पुन्हा पनिशमेन्ट म्हणून एकलमपासून खेळायचं. अक्क्लची गल जशी कंपलसरी तसं बाराचा म्हणजे बक्कल किंवा बाल मराठाचा टोला कंपलसरी..तिथे जर चुकून गोटा गल्लीत गेला तरी पुन्हा एकलमची पनिशमेन्ट.. एकलमच्या गलीआधीपासून ते एकलम झाल्यापसून ते बक्कलपर्यंत केव्हाही जर दुस-याच्या गोट्याला टोला मारून आपला गोटा जर गल्लीत गेला तर कॉम्प्लीमेन्टरी सुटका..! या खेळातल्या १ ते १२ आकड्यांची नावंही मजेदार होती. मला आज ती इतक्या वर्षांनीही जशीच्या तशी आठवतात.. एकलम खाजा धोबी राजा तिराण बोके चारी चौकटे पंचल पांडव सैय्या दांडव सप्तक टोले अष्ठक नल्ले नवे नवे किल्ले दस्सी गुलामा अक्क्ल खराटा बाल मराठा.. अशी छान यमकबिमक असलेली नावं होती..शिवाय साईड सबकुछ, नो कुछ, हलचूल..असे काही खास परावलीचे शब्दही होते.. सर्वात शेवटी जो उरेल त्याच्यावर पिदी.. त्याने शिक्षा म्हणून धावत जाऊन तीन लांब उड्या मारायच्या. तिसरी उडी जिथे पडेल तिथे त्याने आपला गोटा ठेवायचा. इतरांनी मग त्याच्या गोट्याच्या जास्तीत जास्त जवळ जाईल असं चकायचं आणि त्याचा गोटा मारायचा..पुन्हा मग पिदी सुरू.. एखाद्याला पिदवणे..त्यावरून पिदी हा शब्द पडला असावा.. जेव्हा कुणाचाच गोटा लागणार नाही तेव्हाच त्याची पिदीची शिक्षा पूर्ण व्हायची आणि मग पुन्हा सगळ्यांनी चकून नवा डाव सुरू करायचा..एखाद्याची एकलमची गलदेखील भरली गेली नसेल तर त्याच्यावर डबल पिदी..पिदीचा गोटा ठेवल्यावर जर चकताना कुणाचा डायरेक्ट नेम लागला तर ६ उड्यांची पिदी..! काय साली मजा यायची हे गोटे खेळताना..! कुठल्याही वाण्याकडे हे गोटे अगदी सहज मिळत.. मला ती हे सिमेन्टचे गोटे भरलेली वाण्याकडची काचेची बरणी आजही आठवते, डोळ्यासमोर दिसते..! टणट्णीत सिमेन्टच्या गोट्याने दुस-या गोट्याला नेम मारताना जाम मजा यायची.. कडक मस्त असा आवाज यायचा.. उकिडवं बसून डावा हाताचा आंगठा जमिनीवर टेकून डाव्या हाताच्या मधल्या बोटात उजव्या हाताने गोटा धरून कडक नेम मारायचा.. तेव्हा आम्हाला आता मिळतात तसे मोठमोठ्या मॉलमधून घेतलेले महागडे छान छान रंगीत कपडे नव्हते.. साधी हाफ प्यॅन्ट आणि गंजीफ्रास..खेळता खेळता अगदी भरपूर मळून जायचे हे कपडे..कारण घामेजलेले मातीचे हात हाफप्यॅन्टीला किंवा गंजिफ्रासालाच पुसायची साधीसोपी रीत होती तेव्हा.. स्वच्छतेच्या अतिरेकाच्या वगैरे भयानक कल्पना नव्हत्या.... "तंदुरुस्ती की रक्षा करता है लाईफबॉय, लाईफबॉय है जहा तंदुरुस्ती है वहा.." हे छानसं गाणं म्हणत अतिशय साधीसुधी अशी लाईफ बॉयची अंघोळ करायची पद्धत होती... आज मला कुठेच कुणी मुलं हे गोटे खेळताना दिसत नाही याचं दु:ख होतं खूप. वाईट वाटतं.. स्वतःच्या घरी छान छान एसीमध्ये बसून अत्यंत कृत्रीम असे संगणकीय व्हिडियो गेम की कुठलेसे खेळ खेळायची पद्धत आहे आता.. चालायचंच.. कालय तस्मै नमः.. काळाच्या ओघात आमचे एकलम खाजा, धोबीराजा कधी, कुठे नाहिसे झाले, कुठे हरवले ते कळलंच नाही..! -- डब्बल पिदितला तात्या.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
47449 वाचन

💬 प्रतिसाद (86)

प्रतिक्रिया

माझ्या आणि माझ्या मित्रांच्या

मराठे
गुरुवार, 05/02/2013 - 00:01 नवीन
माझ्या आणि माझ्या मित्रांच्या बहिणीसुद्धा गोट्या खेळायला यायच्या त्यामुळे हा मुलींचा आणि तो मुलांचा खेळ असं कधी जाणवलं नाही. थोडं वय वाढल्यानंतर मग नकळतच मुलींचा वेगळा ग्रूप बनून त्यांचे खेळ्/गप्पा वेगळ्या झाल्या. आमच्या गल्लीत दर थोड्या दिवसांनी वेगवेगळ्या खेळांच्या साथी यायच्या. कधी गोट्या, कधी चोरपोलिस/विषामृत्/दगड-माती/विटी-दांडू. पण नंतर कधी तरी (साधारण सातवी-आठवी नंतर क्रिकेट एके क्रिकेट)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुप्प्या

आम्ही तर कोल्हापूरात एक्कया

दशानन
Wed, 05/01/2013 - 23:21 नवीन
आम्ही तर कोल्हापूरात एक्कया म्हणायचो. बाकी लहानपणात परतून जाण्याचा मुड सर्वांचाच झालेला दिसतो आहे.. छान!
  • Log in or register to post comments

तात्या थोडीशी अजुन वेगळी १

रुमानी
गुरुवार, 05/02/2013 - 11:54 नवीन
तात्या थोडीशी अजुन वेगळी १ ते २o ही बघा नावे :) एकलम खाजा दुर्री बाजा तिरान बोजे चार चौकटी पाचिक पांडव छमक छेन्डो सातांक सुती आठक गाटी नमपर नलीया दसे गुलाल्या अकरम कैच बारम बैच तेरस काली चौदस माली पंधेरी पालखान सोलेरे रावण सतेरी भिरभिर अठेरी नाल उन्निस -बिन्नीस बीसका टोला ढोपर सोला ….
  • Log in or register to post comments

मजेशीरच नावं आहेत... - : )

विसोबा खेचर
गुरुवार, 05/02/2013 - 12:07 नवीन
मजेशीरच नावं आहेत... - : )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रुमानी

मीही बैदूल खेळलीये भरपूर आणि

रेवती
Fri, 05/03/2013 - 07:29 नवीन
मीही बैदूल खेळलीये भरपूर आणि विटी दांडूही! साधारण सहावीत असताना प्रचंड वेड लावलं होतं या खेळांनी!
  • Log in or register to post comments

आमच्या कडे असायचा / असतो

अद्द्या
Fri, 05/03/2013 - 09:37 नवीन
आमच्या कडे असायचा / असतो "त्रेंगोल" एका त्रिकोणात प्रत्येकाने गोट्या ठेवायच्या . बाकी नियम तेच . "पहिली कंट " दुसरी कंट वागेरा ठरवायचो . (म्हणजे . त्रिकोणातली कमीत कमी एक / दोन गोट्या काढल्या शिवाय दुसर्याच्या "ड्याम्बो "- तोच तो . तुमचा हंटर . - ला मारता नाही येत . ) गोट्या तर जिंकल्याच . हजाराने जिंकल्या . पण एक डबा सगळ्यांच्या ड्याम्बो ने पण भरलेला होता . माझ्या कडे सिमेंट चा मोठा होता . त्याने अक्षरशः फोडायचो दुसर्यांचे ड्याम्बो . . संध्याकाळी लाईट जायची रोज . तेव्हा लपंडाव . ५ -६ गल्ल्यांचा परीघ ठरवायचा . तेवढ्यात कुठे हि लपा . सगळं गेलं च्या मारी आता . . "मोठे " झाले सगळे
  • Log in or register to post comments

बेळगाव?

श्रावण मोडक
Fri, 05/03/2013 - 11:29 नवीन
बेळगाव का? डँबो हा तिथला(ही) शब्द!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अद्द्या

निपाणीत हेन्न (स्त्री) आणी

यसवायजी
Sat, 12/13/2014 - 10:03 नवीन
निपाणीत हेन्न (स्त्री) आणी गंड ( पुरूष) हे शब्द वापरायचो. गलीत 'रोब'गेला की तो गंड समजला जाई. मग हेन्न रोबला मारून दूर ढकलायची पावर मिळत असे. (हेन्न गोटीला गलीपर्यन्त पोहचू न देणे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रावण मोडक

वो कागज कि कश्ती वो बारीश का पानी

सुबोध खरे
Fri, 05/03/2013 - 09:40 नवीन
http://www.youtube.com/watch?v=c3Wq4q7Yygg
  • Log in or register to post comments

आमच्याकडे दहा वीस

तुमचा अभिषेक
Fri, 05/03/2013 - 09:52 नवीन
ते शंभर.... अशी साधी सोपी नावे होती.. बाकी सगळे नियम , गल वगैरे नावे सारे सेम.. ढप च्या जागी मोठ्या गोटीला आम्ही ढप्पर बोलायचो.. एकंदरीत हा खेळ लहान मुलांचा कारण यात गोट्यांची हारजीत नसायची तर हरेल त्यावर राज्य म्हणजेच भोवर्‍याच्या खेळासारखी लंगडीची शिक्षा असा साधा सोपा हिसाब असायचा. इतर खेळात वीत-वीत आणि ट्रँगल हे आमच्याइथे जास्त खेळले जायचे.. च्यायला गेले ते दिवस... शाळेतून घरी पोचल्यापोचल्या हातपाय धुवायच्या आधी बॅग फेकून खिश्यात जेवढ्या राहतील त्याच्या निम्म्या गोट्या कोंबून खेळायला पळायचो.. तासाभराच्या खेळात शंभर वेळा उठकबैठकचा व्यायाम व्हायचा.. पण आईला मात्र हात घाणीत लोळसवले जातात याचेच भारी टेंशन...
  • Log in or register to post comments

काही इतर संज्ञा

तुमचा अभिषेक
Fri, 05/03/2013 - 09:58 नवीन
पगाम चकने तानसे - नो तानसे साईड वाईड सबकुछ घोडा (समोरच्याची गोटी पायरीवर असल्यास आणि आपली खाली तर जमिनीच्या जागी मांडीवरून मारणे)
  • Log in or register to post comments

आता भोवर्‍यांवर येऊ दे लेख

ऋषिकेश
Fri, 05/03/2013 - 11:02 नवीन
आता भोवर्‍यांवर येऊ दे लेख आम्ही गोट्या नै खेळलो फारसे मात्र भोवरे ज्याम फिरवलेत :)
  • Log in or register to post comments

भोवरा मला

भिंगरी
Sun, 12/14/2014 - 11:08 नवीन
भोवरा मला जास्त फिरवता येत नसे.(लग्नानंतर नवर्‍याचा पण नाही करता आला)पण काही जण वेगवेगळ्या पद्धतीने फिरवत असत. वरून टाकणे,खालून टाकणे,हवेत फिरवून हातावर फिरवणे....(एक दुजे के लिये मध्ये रतीच्या बेंबीवर फिरवलेला दिसला होता.) कोणत्यातरी पद्धतीला बायकोडी असे म्हणत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

मस्त...

नन्दादीप
Fri, 05/03/2013 - 11:14 नवीन
मस्त... आम्ही पण लहानपणी खूप खेळलोय हा खेळ... एकाला अख्खा गावभर पिदवल्याचे आठवतय.... शेवटी तो रडकुंडीला आल्यावर खेळ थांबला....
  • Log in or register to post comments

प्रकाश नारायण संतांच्या

आदूबाळ
Fri, 05/03/2013 - 11:26 नवीन
प्रकाश नारायण संतांच्या लंपनकथांतल्या "परचक्र" नावाच्या कथेत गोट्या खेळण्याचं सुंदर वर्णन आहे...
  • Log in or register to post comments

हा धागा वर काढत आहे.

जेपी
Sat, 12/13/2014 - 09:43 नवीन
हा धागा वर काढत आहे.
  • Log in or register to post comments

अरे बापरे!!!!!

भिंगरी
Sat, 12/13/2014 - 12:29 नवीन
हा धागा वर काढणार्‍याला खुप खुप धन्यवाद. कारण हे वाचून मी पार ४५ वर्ष मागे गेले . हे एकलम खाजा तर पार विसरूनच गेले होते. आम्ही मुली सुद्धा भावंडांबरोबर गोट्या,विटीदांडू,आट्यापाट्या,चिघोडा,दहीहंडी या सार्‍यात भाग घ्यायचो.त्यावेळी आम्हाला कोणीही अडवत नव्हते. आता हे वाचल्यावर सार्‍या आठवणी जाग्या झाल्या.
  • Log in or register to post comments

आणि हो

भिंगरी
Sat, 12/13/2014 - 12:53 नवीन
या सिमेंटच्या गोट्यांना 'टमण'म्हणायचो. ज्याच्याकडे असे टमण असायचे तो जास्त भाव खायचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिंगरी

...कुणी हा शब्द वापरतो आहे का

असंका
Mon, 12/15/2014 - 12:47 नवीन
...कुणी हा शब्द वापरतो आहे का हेच शोधत होतो. टम्मण गोटा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिंगरी

आणि या गोट्यांना आम्ही

हाडक्या
Tue, 12/16/2014 - 21:42 नवीन
आणि या गोट्यांना आम्ही "हाडक्या" गोट्या म्हणायचो.. ;) (इति अस्माकम नामरहस्य: )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

सिमेंट्च्या गोट्याला - ढप हे

अत्रुप्त आत्मा
Sat, 12/13/2014 - 12:56 नवीन
सिमेंट्च्या गोट्याला - ढप हे नाव ऐकून होतो..पण पुण्याकडे त्याला हाडकि म्हणतात..हाडासारखी दिसते ही आणि तितकिच टणक असतेही..म्हणून हाडकि.. दुपारचा कस्ला झोपतो..? ए....... चले..हाडक्या खेळायला....चल! अशीच हाळि दिली जायची आमच्या दोस्तात.
  • Log in or register to post comments

+१

एस
Sat, 12/13/2014 - 15:19 नवीन
हेच म्हणायला आलो होतो. 'हाडक्या'. खेळलोही खूप आणि सिमेंटपासून बनवण्याचा खटाटोपही खूप केला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मोठ्या गोटिला

ऋतुराज चित्रे
Sat, 12/13/2014 - 13:26 नवीन
मोठ्या गोटिला आम्ही टम्मन म्हणायचो. खडिचा चुणा (पूर्वी बांधकामात वापरायचे) रगडून त्यास गोटिचा आकार देऊन वाळ्वून टम्मन बनत असे. सिमेंटपासुन बनवायचा बराचवेळा प्रयत्न केला होता परंतू ना तो कधी टनक बनला ना त्याला सफेद रंग व गुळगुळितपणा आला. शिगरुपी पावसाळ्यात खेळायला मजा यायची. कानढोपरी हा गोट्यांचा खेळही धमाल होता.
  • Log in or register to post comments

आम्मी खेळायचो,, ते धा/वीस आणि

अत्रुप्त आत्मा
Sat, 12/13/2014 - 13:31 नवीन
आम्मी खेळायचो,, ते धा/वीस आणि आक्या/टोक्या/बोक्या त्याच धर्तीवर नविन खेळ काढावासा वाटतो.. आगोबा/ढगोबा/हत्ती =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे

बुवा.. किती ते पिडयचं हो

हाडक्या
Tue, 12/16/2014 - 21:45 नवीन
बुवा.. किती ते पिडयचं हो एखाद्याला.. *diablo* पुढच्या खेपेस तुम्हाला एखाद्या लेण्यांच्या गुहेत डांबून ठेवण्यात येईल बरं का. जपून.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

कित्ती उलट विधान ते!!!!!!!!!!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/18/2014 - 23:58 नवीन
कित्ती उलट विधान ते!!!!!!!!!!!? :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

कानढोपरी खेळून

भिंगरी
Sat, 12/13/2014 - 13:32 नवीन
कानढोपरी खेळून सोलवटलेले कोपर घरात दाखवायची सोय नव्हती,कारण खेळणच बंद झालं असतं शिगरूपीत मात्र मी जरा ढ होते,माझी शीग कधीतरीच उभी रहायची,तेही चिखल जास्त असला की घसरून आडवीच व्हायची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे

खांब खांब खांबोळी

भिंगरी
Sun, 12/14/2014 - 11:17 नवीन
खांब खांब खांबोळी,हा खेळ आम्ही भरपूर खेळलो आहे. महापालिकेचे कार्यालय घराच्या बाजूलाच होते. ब्रिटीशकालीन बैठे,कौलारू उतरत्या छपराचे असल्याने,त्याला सागाचे भक्कम ६/७ खांब होते.आम्हाला संध्याकळी ५ ला कार्यालय बंद झाल्यावर खेळायला मोकळे मिळायचे.
  • Log in or register to post comments

हम्म.....

आयुर्हित
Sun, 12/14/2014 - 11:19 नवीन
एक जुनी गोष्ट आठवली!
  • Log in or register to post comments

नक्का - पुर्रा ...

बबन ताम्बे
Mon, 12/15/2014 - 13:11 नवीन
हाही एक गोट्यांचा खेळ होता. दोन किंवा चार भिडूंत खेळला जायचा. एक, दोन, तीन आणि + (म्हणजे चार) अशा रेषा चारी बाजूला आखत. एक म्हणजे नक्का, चार म्हणजे पुर्रा. दोन ला दुर्रा आणि तीनला तिर्रा म्हणत. चार किंवा दोन जन एकमेकांसमोर बसत. ज्याची पहीली खेळी असे (ते पण आदूली मादूली ढम्माय ढूस.. असे कायतरी म्हणत नंबर काढत ), तो बंद मुठीत काही गोट्या घेऊन मधे हात ठेवत असे. बाकीचे प्लेयर जेव्ह्ढी रिस्क घ्यायची तेव्ह्ढ्या गोट्या पाहीजे त्या नंबरावर ठेवत. म्हणजे नक्का, दुर्रा, पुर्र्यावर चार चार गोट्या ठेवल्या तर खोल तिर्रा असे ओरडायचे. मग ज्याने मुठीत गोट्या धरल्या होत्या त्याने चार चार च्या सेटने गोट्या ठेवायच्या. शेवटी जर तीन गोट्या उरल्या तर तो जिंकला आणि बाकी प्लेअर्सनी लावलेल्या सर्व गोट्या त्याने जिंकल्या. समजा दोनच गोट्या शेवटी राहील्या तर दुर्र्यावर ज्याने गोट्या लावल्या होत्या, त्याला ज्याने मुठ खोलली त्याने तेव्ह्ढ्या गोट्या द्यायच्या. ह्यात पण रडी खेळायची टेक्नीक होती आणि सापडला की मारामा-या, भांडणे हमखास होत. काही उडाण टप्पू मुले गोट्यांच्या जागी पैसे लावत.
  • Log in or register to post comments

सूरपाट्या बद्दल कोणी कसे नाही

हाडक्या
Tue, 12/16/2014 - 21:47 नवीन
सूरपाट्या बद्दल कोणी कसे नाही बोलले अजून ते ?
  • Log in or register to post comments

सूरपाट्या?

भिंगरी
Tue, 12/16/2014 - 23:16 नवीन
कि सुरपारंब्या?
  • Log in or register to post comments

सूरपाट्याच हो.. सूर-पारंब्या

हाडक्या
गुरुवार, 12/18/2014 - 22:52 नवीन
सूरपाट्याच हो.. सूर-पारंब्या वेगळ्या.. त्याबद्दल पण खरंतर कोणीच बोललेलं नाही तसं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिंगरी

सुर्पाट्या हा खेळ कसा असतो?

भिंगरी
गुरुवार, 12/18/2014 - 23:40 नवीन
मला सूरपारंब्या आणि आट्यापाट्या माहीत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हाडक्या

आज एकलम। खाजाची आठवण आली

भिंगरी
गुरुवार, 05/16/2019 - 00:32 नवीन
आज एकलम। खाजाची आठवण आली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भिंगरी

सर्वात महत्त्वाची ....

गामा पैलवान
Mon, 05/20/2019 - 01:46 नवीन
च्यायला, सर्वात महत्त्वाची कडिक राहिली. :-) एक वीतेची असायची. मारणारा गोटा आणि मार खाल्लेला गोटा जर एकवीत अंतरापेक्षा जवळ असतील तर मार खाणाऱ्यास कडिकचा लाभ मिळायचा. त्यानुसार तो आपला गोटा उचलून इतरत्र कुठेही ठेवू शकायचा. पुढील मार चुकवायला वा एखाद्या व्यूहात्म ठिकाणी आयतं जाण्यासाठी कडिकचा फार उपयोग व्हायचा. क्वचित प्रसंगी ३ वीतांची कडिक सुद्धा असायची. ती मारणाऱ्यास भारी पडायची, पण मार खाणाऱ्याची चांदी व्हायची. -गा.पै.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा