एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) भाग तिसरा : संघर्ष,लय,संवाद,जॉनर

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
1 Jul 2008 - 3:46 pm

एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग पहिला. प्रिमाईस
एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) ... भाग दुसरा : प्रमुख व्यक्तिरेखा
एका गोष्टीची गोष्ट...( नाट्यलेखनतंत्राबद्दल थोडंसं) भाग तिसरा : संघर्ष

आता एक गोष्ट बघू...
एक मुलगा सकाळी उठून शाळेत जातो , त्याचा रिझल्ट कळतो, त्याला शाळेत पहिला आल्याबद्दल बक्षीस मिळतं आणि तो आनंदानं घरी येतो.

ओके..गोष्ट बरी आहे, पण मला त्यातून का मजा येत नाही?
त्यात अजिबात संघर्ष नाही...
शाळेत पहिला आला नाही तर काय होईल ते कळत नाही...
व्हॉट इज ऍट स्टेक? काय पणाला लागलंय?

एका दुसर्‍या मुलाने खूप स्पर्धा निर्माण केली आहे आणि पहिला नंबर येणार्‍या मुलाला दिल्लीला विज्ञान प्रदर्शनात थेट जायला मिळणार आहे...
किंवा त्याला वडिलांनी कबूल केलं आहे की पहिला आलास तर या वर्षी सगळे सिंगापूरला जाऊ.
किंवा तो नेहमी पहिला येतो पण या परीक्षेच्या वेळी त्याचे वडील खूप आजारी होते आणि त्याने पहिलं यावं अशी त्यांची शेवटची इच्छा होती...ते त्याला पूर्ण करायलाच हवी..
ही झाली प्रेरणा...ध्येय म्हणजे नातेसंबंध टिकवणे,स्वाभिमान जपणे ...अडचणी म्हणजे तीव्र स्पर्धा, वडील आजारी, पेपर अवघड निघणे वगैरे...पहिला नंबर आणणे ही झाली कृती...
______________________

कोणत्याही गोष्टीसाठी सर्वात महत्त्वाचा भाग... संघर्ष नसला तर कोणतीही गोष्ट रटाळ, कंटाळवाणी होणार..
उदा.
i] एखादं पात्र गरज नसताना, कोणीही विचारलं नसताना त्याच्या आयुष्याबद्दल माहिती देत राहतं..
ii]स्थलकाल, इतिहास, निसर्ग याबद्दल अति माहिती देणं.. लेखकाचं जास्त संशोधन झालं असलं की त्याला ते सारं गोष्टीत आणावंसं वाटतं.
iii]गरज नसताना नवनवीन पात्रं फ़क्त विनोदनिर्मितीसाठी आणली जातात, अशाचा जाम कंटाळा येतो.

या चुका कशा सुधाराव्यात?
i]पात्रांची माहितीसुद्धा संघर्षातूनच मिळावी. ( उदा.एखादं पात्र आरोप करतंय, प्रश्न विचारतंय आणि दुसरं पात्र काहीतरी लपवालपवी करतंय, त्यातून होणार्या संघर्षातून पात्रांची माहिती मिळावी)..
ii]वाचकाला किंवा प्रेक्षकाला समोर घडणार्या घटनांसंदर्भातच रिलेव्हंट माहिती अपेक्षित असते, उगाच ऐतिहासिक , नसर्गिक गोष्टींच्या खोलात शिरण्याची गरज नाही.
iii]पात्रांची संख्या मर्यादित असूद्या., एखाद्या प्रसंगामुळे / दृश्यामुळे / व्यक्तिरेखांमुळे मुख्य पात्रांच्या नातेसंबंधांमध्ये काहीही बदल होत नसेल, तर मुख्य थीमशी संबंधित नसलेले अनावश्यक प्रसंग सरळ निर्दयपणे कापून टाकलेले उत्तम.

संघर्षाचे काही प्रकार

आंतरिक संघर्ष : इच्छा, हक्क आणि कर्तव्य यासंदर्भात
मनातलाच बर्यावाईटाचा संघर्ष
बर्याचदा हा संस्कारासंदर्भात असतो.
बाह्य संघर्ष : व्यक्ती आणि नातेसंबंधातला संघर्ष
पठडीतला हीरो आणि व्हिलन यांच्यातला संघर्ष

समाजामधले इतर संघर्ष : व्यावसायिक / राजकीय / जातीय / धार्मिक
___________________________________________________
आणखी एक वेगळ्या प्रकारचे वर्गीकरण मी ऐकले ..त्यावरून माझ्या आवडत्या सिनेमामधली थेट उदाहरणेच देतो..

१. शक्ती... ..दिलिपकुमार आणि अमिताभ यांच्यात आंतरिक संघर्ष ...वडील आणि मुलगा दोघे प्रोटॆगनिस्टच पण त्यांच्यातला संघर्ष अधिक गडद. आणि बाह्य संघर्ष तो (अमिताभ + दिलिपकुमार) आणि अमरीश पुरी यांच्यात. इथे अमरीश ऎंटागनिस्ट...साधारणपणे ऎंटागनिस्ट बाह्य संघर्षाचे कारण असतो..आणि अमिताभच्या मनातले द्वंद्व म्हणजे अंतर्गत आंतरिक संघर्ष...!!?

. सरफ़रोश : पोलीस ऒफ़िसर आणि आतिरेकी यांच्यातला बाह्य संघर्ष पण अजय राठोड आणि सलीम यांच्यातला आंतरिक संघर्ष
...आणि या आतिरेकी कटाचा सूत्रधार अजय राठोडच्या ओळखीचा पाकिस्तानी गायक असणं, ही वाढती गुंतागुंत आणि शेवटी याला मारू की नको असा अजय राठोडचा अंतर्गत आंतरिक संघर्ष !!!?

३. मला अजिबात न आवडलेला सिनेमा ... मैं प्रेम की दीवानी हूं... ( हाहाहाहाहा) .....
राजश्री फ़िल्म्स च्या साधारणपणे सगळ्याच फ़िल्म्समध्ये संघर्षच आधी खूप कमी... सगळं गोग्गोड... बरं असलाच तर कोणीतरी आजारी पडतं, अपघात होतो,पत्र उशीरा मिळतं आणि गैरसमज होतो असला नियतीवर आधारलेला योगायोगी बाह्य संघर्ष... त्यात अगदीच दम नसतो असं माझं वैयक्तिक मत.

४. काही आंतरधर्मीय विवाहाचे सिनेमे... यात पोरांचे आई-बाप अगदी ऎंटागनिस्ट दाखवले जातात बर्‍याचदा... मग त्यामुळे तेच बाह्य संघर्ष आहेत असे वाटायला लागते, मग शेवटी ते यांना माफ़ वगैरे करतात हे पचनी पडत नाही... त्यासाठी आधीच आईबापांचा विरोध हा आंतरिक संघर्ष मानला पाहिजे , आणि सामाजिक परिस्थितीचा त्यांच्यावरचा दबाव हा बाह्य संघर्ष..

संघर्ष कसा वाढवावा?

नुसतंच टोमणे मारणं, किरकिर करत भांडणं म्हणजे संघर्ष नव्हे..त्यातून काहीही बदल घडत नाही. प्रोटॆगोनिस्टच्या अडचणी व संकटं वाढवत नेणारा, त्याला अधिकाधिक संकटात पाडणारा संघर्ष हवा.त्यासाठी व्यक्तिरेखांवर दबाव वाढत जायला हवा..

काय पणाला लागलंय? ध्येय गाठलं नाही तर काय संकट येणार आहे हे ठरणं महत्त्वाचं..

आयुष्य, प्रेम, संपत्ती, आरोग्य, स्वाभिमान जेव्हा यावरच संकट कोसळतं तेव्हा मग मुख्य पात्र निकराने झगडतं... आपलं ( प्रेमाईसनं ठरवलेलं ) ध्येय गाठण्यासाठी अविश्रांत मेहनत करतं...
आणि या संघर्षातूनच त्याच्यात मोठा बदल घडतो आणि त्यातूनच ते पात्र धडा शिकतं... ( हेच ते तात्पर्य / कथाबीज)

हीरोला अधिकाधिक अडचणीत आणण्यासाठी मुख्य गोष्टीमध्ये काही उपकथानकं ( सबप्लॊट्स) तयार करता येतात.
परंतु ही उपकथानकं मुख्य गोष्टीला विरोध करणारी किंवा पाठिंबा देणारी किंवा त्यासाठी वाचकाला तयार करणारी म्हणजेच संबंधित हवीत.. उदा. खूनी शोधायच्या कथेत डिटेक्टिव्ह हीरो खुनी स्त्रीच्या प्रेमात पडला की गुंतागुंत झालीच.

संघर्ष वाढवण्यासाठी आवश्यक असलेले प्लॊट मोटिव्हेटर्स.
सूड, संकट,पाठलाग, द्वेष,प्रेम,दु:ख, वियोग, बंडखोरी, फ़सवणूक,स्वार्थत्याग, छळ, स्पर्धा, संशोधन,महत्त्वाकांक्षा, सर्व्हायव्हल.

प्रेरणा ध्येय अडचणी कृती

संघर्ष गडद करण्यासाठी प्रेरणा ध्येय अडचणी कृती या गोष्टी सतत चढत्या भाजणीने घडाव्या लागतात.

आता हे एक वाक्य बघू... (सुनील शेट्टी / सनी देओल यांच्या सिनेमात नेहमी असणारी परिस्थिती)
आपल्या वडिलांवरील चोरीचा आळ घालवण्यासाठी अर्जुनला एका साक्षीदाराला घेऊन न्यायालयात वेळेवर पोचणं आवश्यक आहे, हे माहित असल्याने राणाठाकूर आपल्या गुंडांना अर्जुनला अडवायला पाठवतो, अर्जुनला हे आधीच कळल्याने तो त्यातल्या काहींना गुंगारा देतो आणि न्यायालयाबाहेर उरलेल्यांशी तुफ़ान हाणामारी करून साक्षीदाराला न्यायालयात वेळेत पोचवतो आणि वडिलांना वाचवतो... .

आता या वाक्याचे तुकडे पाडू...

प्रेरणा : वडिलांवरील चोरीचा आळ घालवण्यासाठी
ध्येय : साक्षीदाराला घेऊन न्यायालयात वेळेवर पोचणं आवश्यक
अडचणी : गुंडांना अर्जुनला अडवायला पाठवतो
कृती : गुंगारा आणि हाणामारी

motivation goal obstacles action या गोष्टी योग्य क्रमाने घडत राहिल्या की व्यक्तिरेखासुद्धा फ़ुलतात, संघर्ष उत्कर्षबिंदूला पोचतो...

नाट्यसाहित्यिकतंत्रशिक्षणचित्रपटप्रकटनविचारलेखमाहितीप्रतिभा

प्रतिक्रिया

मनिष's picture

1 Jul 2008 - 3:51 pm | मनिष

उदाहरणांमुळे जास्त मजा येते आहे.
अवांतर - नुकत्याच पाहिलेल्या 'आमीर' मधला क्लायमॅक्स ला प्रोटॆगनिस्टचा अंतर्गत संघर्ष आवडला.

भडकमकर मास्तर's picture

2 Jul 2008 - 9:59 am | भडकमकर मास्तर

मे अमीर पाहिलेला नाहीये...
'आमीर' मधला क्लायमॅक्स ला प्रोटॆगनिस्टचा अंतर्गत संघर्ष
याबद्दल अजून माहिती द्या...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

वरदा's picture

1 Jul 2008 - 8:15 pm | वरदा

हा भाग जास्त छान समजला...उदाहरणं जास्त किंवा सोपी असल्याने असेल कदाचित...
माझी अशी एच आर इंटर्व्यु साठी तयारी झाली होती ते आठवलं कुठल्याही प्रश्नाला...माझ्यापुढचा प्रॉब्लेम, माझी थॉट प्रोसेस, माझं सोल्युशन आणि त्याचा रिझल्ट असं उत्तर द्यावं लागायचं...एक्दम तस्संच वाटलं मला...
पु ले शु...

"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

मेघना भुस्कुटे's picture

2 Jul 2008 - 6:48 am | मेघना भुस्कुटे

हा भाग झकास झाला आहे. लगे रहो...

धनंजय's picture

2 Jul 2008 - 7:37 am | धनंजय

उदाहरणे छानच आहेत.

विसोबा खेचर's picture

2 Jul 2008 - 8:17 am | विसोबा खेचर

हा लेख पण लै भारी वाटला! मास्तर, तुमचा या विषयातला व्यासंग पाहून अंमळ थक्क व्हायला होतं!

आपला,
(नाट्यप्रेमी) तात्या.

भडकमकर मास्तर's picture

2 Jul 2008 - 8:58 am | भडकमकर मास्तर

आमच्या काही आवडत्या वेबसाईट्स.....
१.playwriting seminars
खूप मोठी साईट आहे ही....
http://www.vcu.edu/arts/playwriting/seminar.html
२.होतकरू पटकथालेखकांसाठी
http://www.toronto-filmmaking.com/screenwriting.html
३.पटकथालेखनासाठी काही टिप्स .by Billy Wilder
http://www.writingclasses.com/InformationPages/index.php/PageID/270
४.Emotional plots and suspense plots...भावकथा आणि गूढकथा (?) जोडीनं येतात इथे....
http://www.vcu.edu/arts/playwriting/plot.html
५.नाट्यलेखनाची मूलभूत तत्त्वे...by Charles Deemer
http://www.geocities.com/cdeemer/Play.htm
६. आणि सबसे बढिया... लायोस ( की लाजोस) एग्रि भाऊचे पुस्तक...सर्जनशील लेखनाची कला.
हे पुस्तक एफ्टीआयाय मध्ये लेखक मंडळी पाठ्यपुस्तकासारखे वापरतात, असे ऐकले.
मला संपूर्ण इ बुक नाही सापडले पण या नोट्स सापडल्या..... भन्नाट प्रकार आहे...
Lajos egri's book art of creative writing...
http://www.darkcloudpress.com/%5Cblog_files%5Cegri_notes.pdf

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मेघना भुस्कुटे's picture

2 Jul 2008 - 9:05 am | मेघना भुस्कुटे

वा! हे झकास काम झाले.

भडकमकर मास्तर's picture

2 Jul 2008 - 9:39 am | भडकमकर मास्तर

लय (rhythm)

गोष्टीला किंवा नाटकाला एक लय असते.प्रत्येक गोष्टीला लय असते. आपल्या आयुष्यात सुद्धा काही दिवस सावकाश जाणारे, कंटाळवाणे असतात तर काही घटनांनी भरलेले वेगवान असतात...
लय सगळीकडेच असते. ..., गाण्यांमध्ये / संगीतात / नृत्यनाट्यात तर असतेच पण संवादांमध्ये , नेपथ्य आणि पात्रांच्या हालचालीमध्ये सुद्धा असते...रेसमध्ये धावणार्‍या घोड्याला स्वत:ची लय असते आणि सर्व धावणार्‍या घोड्यांची मिळून एक लय असते.... तेंडुलकर म्हणतात," अननुभवी लेखक लयीसाठी दिग्दर्शकावर अवलंबून असतो"...विशेषत: कादंबरीचे नाट्यरूपांतर किंवा सिनेरूपांतर करताना ती लय टिकवणं मुश्किल..... किंवा "वाडा चिरेबंदी त्रिनाट्याचे एकच नाटक करायचा एक प्रयत्न झाला, त्यात लय सांभाळणे अवघड जाते "

मला स्वत:ला खूप पूर्वी वाचलेली आनंदाचं झाड कादंबरी आवडलेली होती पण चित्रपट अगदीच सुमार वाटला.

घटनांसंदर्भात बोलायचं तर ही लयच वेगवान घटना आणि व्यक्तिरेखांची खोली यामधला तोल सांभाळणार असते.

हॊरिझॊंटल ऎक्शन
गोष्ट पुढे नेते.
घटना घडवते.
व्हर्टिकल ऎक्शन
वेग कमी करते.
व्यक्तिरेखांमधलं मानसिक चिंतन दर्शवते. ( आंतरिक अंतर्गत संघर्ष)
गोष्टीतले अनेक पदर उलगडून दाखवते.

या दोन्ही ऎक्शन आणि त्यातला तोल साधणं गोष्टीसाठी आवश्यक ...
मारधाडपटात जास्त हॊरिझॊंटल ऎक्शन असते.
चेकॊव्हच्या नाटकात व्हर्टिकल ऎक्शन जास्त असते.
_____________________--
त्यामुळे उत्तम पटकथेत भांडण / मारामारीच्या सीननंतर लगेचच पुन्हा मारामारी नसते.... मग शांतता...प्रेमाचे दृश्य / किंवा फ्लॅशबॅक जुन्या आठवणी / गाणी / मानसिक चिंतन वगैरे...
हा सारा लयीचा भाग आहे.

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

2 Jul 2008 - 9:45 am | भडकमकर मास्तर

संवादलेखन
१. व्यक्तिरेखेच्या मनातलं जसंच्या तसं लिहू नये.. आपण रोजच्या आयुष्यात तरी कुठे अगदी खरं मनातलं बोलत असतो ?
त्यांना उपरोधाने बोलूदेत, कधी खोटंसुद्धा बोलूदेत..कधी अडखळत, थट्टा करत,कधी कॊमेंट पास करत , टोमणे मारत संवाद पुढे सरकायला हवा.
पात्राच्या मनात काय आहे हे अप्रत्यक्षपणे समजलं तर संवाद बरा चाललाय असं समजावं...

२. कधीकधी काही अस्वस्थ हालचाली , वागण्याच्या पद्धती असतात ज्या पात्राच्या मनात काय चाललंय ते दर्शवतात.अशा छोट्याछोट्या हालचाली शोधून काढून त्यात्या प्रसंगात पात्रांना चिकटवाव्या लागतात. ( पात्रांची शारीरिक जडणघडण इथे उपयोगी पडते)

३. आपण स्वत:सुद्धा बर्‍याचदा मनातल्या मनात संवाद तयार करत असतो. पार्टीत किंवा गप्पा मारताना आपल्याला कधी मस्त कॊमेंट सुचते आणि बोलायची राहून जाते, मग आपण संवाद तयार करत राहतो की तो जर असं बोलला असता तर मी मग असं बोललो असतो वगैरे...

४.विशेषत: एकांकिकांसाठी संवाद छोटे हवेत.वेगवान हवेत. छोटे म्हणजे किती छोटे ? एका भाषणात एकच कल्पना. (one idea per speech)

५. संवाद लिहिताना संवाद सतत वाचत राहा आणि आता या वाक्यानंतर रंगमंचावर हजर पात्रांपैकी कोण यात व्यत्यय आणणार याचा अंदाज घेत घेत पुढे जा.

६. "दाखवा...सांगू नका." हे सर्वात महत्त्वाचं..
उदा. ती हुशार मुलगी आहे असं कोणी सांगण्यापेक्षा ते प्रसंगातून दिसूद्या.

७. कथेच्या रूपांतरामध्ये सूत्रधार गोष्ट सांगतो अशा युक्त्या शक्यतो वापरू नयेत. ( ती एक पळवाट आहे असं माझं वैयक्तिक मत)

८. बर्‍याचदा दोन ( विरुद्ध स्वभावाच्या सुद्धा) पात्रांच्या तोंडून लेखक स्वतःच बोलतो आहे असा भास होतो...
कौशल्याचा भाग हाच की पात्रे जीवंत होण्यासाठी संवाद त्यांचे स्वतःचे वाटले पाहिजेत... त्याच व्यक्तिरेखा बोलताहेत असं वाटलं पाहिजे....

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मेघना भुस्कुटे's picture

2 Jul 2008 - 10:38 am | मेघना भुस्कुटे

हा माझा सध्याचा आवडता सिनेमा. गंमत म्हणजे ही सगळी सूत्रं त्याला चपखल लावून दाखवता येतात.
पूर्वपक्ष? जशास तसे! हे सूत्र सगळ्या सिनेमात कुठेही उच्चारलं जात नाही. उलट चिरोंजीलाल अमेरिकेत निघून जाण्याच्या प्रयत्नात आहे. त्याला या प्रकरणात अज्याबात गुंतायचं नाही आहे, मग सूड-बिड तर दूरच राहिला. ते सभ्यपणे पोलिसांकडेही जाऊन पाहतात, पण तिथेही काही डाळ शिजत नाही. मग नाईलाज म्हणून म्हणा, योगायोगानं तो दलाल भेटतो म्हणून म्हणा, थोडी खुमखुमी असल्यामुळे म्हणा - मंडळी या अचाट प्लॅनमधे सामील होतात आणि बघता बघता गोष्ट वेग घेते.
प्रमुख व्यक्तिरेखा - यातली सगळ्यांत लोभसवाणी आणि खरी महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे ती अनुपम खेरची. फसवणूक त्याची झालीय. या सगळ्या अव्यापारेषु व्यापारातून त्याला पैसे आणि घर तर मिळतंच. पण त्याचं हातून निसटणारं कुटुंबही अनपेक्षितपणे परत मिळून जातं. या प्रवासातून दिसणारा-घडणारा टिपिकल मध्यमवर्गीय, पापभीरू, कुटुंबवत्सल, नेक बाप अक्षरशः लाजवाब आहे. तो असतो पार्श्वभूमीला. सतत मोडता घालत, चिडत-वैतागत-खंतावत. पण ही गोष्ट त्याचीच. पोरगा मोठ्या कंपनीत आहे असं अभिमानानं कुणालाही सांगणं काय, किंवा 'इसके साथ कुछ चटनी वगैरा है क्या?' असं पिझ्झा पाहून वैतागानं विचारणं काय! त्याला त्याचा इतिहास-भूगोल आहे आणि तो नेमका दिसत राहतो. हेच इथल्या सगळ्या व्यक्तिरेखांना लागू होतं. भलेही चार फ्रेमकरता का पात्र पडद्यावर येईना, ते सकाळी चहा पीत असेल, की कॉफी हे अचूक सांगता येईल, इतकी स्पष्ट माणसं आहेत ही. त्यांच्या कपडे घालण्याच्या, खाण्या-पिण्याच्या पद्धती (बोमन इराणीचं नि:संकोचपणे आपल्याच घराच्या आवारात जरा लांब जाऊन लघवी करणं!), त्यांची भाषा (मेघनाच्या मैत्रिणीनं 'बास्टर्ड' अशी शिवी हासडणं!), त्यांचे मॅनरिझम्स (सतत घायकुतीला आलेला काहीसा नर्व्हस असा बापूंचा सेक्रेटरी)... आहाहा!
संघर्ष - खोसला कुटुंब आणि बोमन इराणीचं पात्र (नाव विसरले!) यांच्यातला हा संघर्ष असं ढोबळ मानानं म्हणता येईल. पण तो बाह्य संघर्ष झाला. खरा संघर्ष अनुपम खेरचा. कुटुंबाशी, नव्या मूल्यव्यवस्थेशी आणि स्वत:शी. अशी फसवाफसवी करून पैसे परत मिळवावेत की न मिळवावेत, या त्याच्या 'भवति न भवति'मधून तो अचूक दिसत राहतो. तो पोरांवर चिडल्यासारखं करतो, पण पोटातून मात्र सुखावलेला. काळजी आणि कौतुक करणारा. तरी चिरोंजीलाल पैसे घेऊन आल्यावर त्याला पुरेसा आणि निर्भेळ आनंदही होत नाही. मासिक वाचल्याचं नाटक करत तो आपला व्हरांड्यातच. आपली प्रतिक्रिया नक्की काय असली पाहिजे, या संभ्रमात. हाच तो मास्तर म्हणत असलेला अंतर्गत संघर्ष असेल का?
संवाद - 'हम आपके' मधे सुरुवातीला आलोकनाथ आणि कुणाचातरी एक संवाद आहे. कसला विनोदी आहे तो! तुम्ही भाऊ वारल्यावर पुतण्यांना कसं सांभाळलंत आणि त्यासाठी लग्न टाळलंत, तुम्ही किती थोर, असं आलोकनाथलाच सांगण्यात येतं! अरे, त्याला माहीत नाही का हे? ही कुठली निर्बुद्ध पद्धत पात्राची पार्श्वभूमी सांगायची? असो. असले आचरट संवाद 'खोसला..'मधे नाहीत. त्यातली सगळी माणसं आपापली, आपल्या वयाला-पेशाला-संस्कारांना साजेशी भाषा बोलतात. बिनदिक्कत (आणि गरज पडेल - नाईलाज होईल तेव्हाच!) शिव्या देतात. उगीचच्या उगीच भाषणं न झोडता एखाद्याच लुकनं आपलं म्हणणं स्पष्ट करतात. (चिरोंजीची बहीण अनुपम खेरला कसले खतरनाक लुक्स देत असते सतत! 'बाबा म्हणजे ना... ' असं कौतुक कम वैताग सरळ वाचता येतो त्यात.)
लय - आधी काहीशी संथ आहे गोष्ट. सगळ्या माणसांशी पुरेशी ओळख होते आपली. सगळ्यांची गोची - स्वभाव - अडचणी - एकात एक गुंतलेल्या तंगड्या... सगळं स्पष्ट होतं. आणि मग सुरुवातीला मंद हुंकार देणार्‍या बाईनं हळूहळू अंगात येऊन जोरदार भीतीप्रद घुमायला सुरुवात करावी, तशी गोष्ट वेग घेत जाते! पेहेलवान, पोलीस, नाटक मंडळी, फिशरी जमिनीवरचं नाटक... अशा चढत्या क्रमानं गोष्टी घडत जातात. ही मास्तरांची हॉरिझॉण्टल लय असावी बहुधा. पण पार्श्वभूमीला त्याला आडवा छेद देत, अनुपम खेरची चलबिचल सदसद्विवेकबुद्धी असतेच. ती खरी गंमत!

मास्तर, बरोबर आहे का हो?

मनिष's picture

2 Jul 2008 - 11:00 am | मनिष

'खोसला का घोसला' खरच छान आहे. ते व्हर्टिकल/हॉरिझॉण्टल माहित नाही. पण व्यक्तिरेखा फारच सुरेख लिहिल्यात आणि अभिनेत्यांनी त्याला मस्तच न्याय दिलाय. अनुपम खेर -- केवळ अशक्य!! अभिनयाचा वस्तुपाठ म्हणा ना...ते दारू घेऊन येतांना त्याचे चालणे? वा!!!

भडकमकर मास्तर's picture

2 Jul 2008 - 1:54 pm | भडकमकर मास्तर

जशास तसे! हे सूत्र सगळ्या सिनेमात कुठेही उच्चारलं जात नाही.
परफेक्ट...पूर्वपक्ष डायरेक्ट न सांगता आपोआप कळायला हवा... ते इथे एकदम जमतेच...
ते सकाळी चहा पीत असेल, की कॉफी हे अचूक सांगता येईल, इतकी स्पष्ट माणसं आहेत ही.
...........आपली प्रतिक्रिया नक्की काय असली पाहिजे, या संभ्रमात. हाच तो मास्तर म्हणत असलेला अंतर्गत संघर्ष असेल का?

एकदम सहमत.
त्यातली सगळी माणसं आपापली, आपल्या वयाला-पेशाला-संस्कारांना साजेशी भाषा बोलतात
आणि बापूचे ते पैसे पाहून घाबरून परत येणं, आणि अनुपमला सॉरी म्हणणं...आणि इतर सगळे बापूवर वैतागलेले असताना अनुपमने येऊन सांत्वन करणं.हा एक अप्रतिम सीन आहे...
मग सुरुवातीला मंद हुंकार देणार्‍या बाईनं हळूहळू अंगात येऊन जोरदार भीतीप्रद घुमायला सुरुवात करावी, तशी गोष्ट वेग घेत जाते
हे एकदम मस्त ..
अनुपम खेरची चलबिचल सदसद्विवेकबुद्धी असतेच. ती खरी गंमत!...
एकदम पटले.... ही व्हर्टिकल ऍक्शन..

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

वरदा's picture

2 Jul 2008 - 8:36 pm | वरदा

सॉलीड अभ्यास केलायस गं....माझा पण हा सगळ्यात लाडका सिनेमा....
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

संदीप चित्रे's picture

2 Jul 2008 - 9:16 pm | संदीप चित्रे

मेघना ... मस्त अभ्यालयस :)

--------------------------
www.atakmatak.blogspot.com
--------------------------

महेश हतोळकर's picture

2 Jul 2008 - 11:31 pm | महेश हतोळकर

मेघना म्हणाल्या ते मनापासून पटले. उगीच संवाद बोलून पात्राच्या आडून प्रेक्षकांना त्याच पात्राची ओळख करून देण्याचा हा प्रयत्न अगदीच हास्यास्पद होता. मास्तरांच्याच शिकवणीवरून वरील प्रसंग बदलण्याचा प्रयत्न. बघा कसा वाटतो ते.

(अलोकनाथ व अजीत वाच्छानी अलोकनाथच्या दिवाणखान्यात बसले आहेत. अलोकनाथच्या मागे भिंतीवर त्याच्या भाऊ-भावजयीचा फोटो टांगला आहे.)
अजीत वाच्छानी: भाईसहाब अब राजेश की शादी का दिल पे ले ही लिजीये|
अलोकनाथ: हां भाईसहाब, (फोटोकडे निर्देश करून) भय्या भाभी की अशिर्वादसे राजेश बिजीनेसको अच्छी तरहसे संभाल रहा है| अब प्रेम भी MBA खत्म करके उसके साथ जुड जायेगा| आपकी नजरमे कोई लडकी हो तो बताईये|
(एवढ्यात प्रेम येतो. तो खूप आनंदात आहे.)
प्रेमः (दोघांच्या पाया पडून). प्रणाम चाचाजी| प्रणाम मामाजी|
अजीत वाच्छानी: भाईसहाब लगता है प्रेम का Result उम्मीद के मुताबिक निकला है| क्यों बेटा?
प्रेमः हा मामाजी! मै अव्वल आया|
अजीत वाच्छानी: भई व्वा!

कृपया हिंदी कडे थोडे दुर्लक्ष करा. खूप चिंध्या केल्या आहेत

भडकमकर मास्तर's picture

3 Jul 2008 - 12:03 am | भडकमकर मास्तर

...मस्त रे "मी "
खूप छान प्रयत्न...
...
किंवा "शो डोंन्ट टेल "...पद्धतीने हे सारे अत्यंत कमी किंवा शून्य संवादात दाखवताही आले असते....
....
(आलोकनाथ मोहनीश बहलसाठी स्थळं पाहायला म्हणून हातात मुलींचे फोटो, पत्रिका आणि माहिती वगैरे घेऊन बसला आहे, त्याचे समोरच्या भाऊ आणि भावजयीच्या फोटोकडे लक्ष जाते ....फोटोवर क्लोज मग आलोकनाथवर क्लोज्...त्याला आठवतं, त्याच्या भावाच्या मृत्यूसमयी दोन घाबरलेली लहान मुलं काकाला बिलगतात आणि हा त्यांना डोळ्यातलं पाणी थोपवत शांत करतो,थोपटतो...पुन्हा आलोकनाथचा चेहरा दिसतो, त्याच्या डोळ्यात अश्रू पण चेहर्‍यावर समाधान...( भावाला दिलेलं त्या पोरांना नीट सांभाळायचं वचन पूर्ण केल्याचं वगैरे समाधान) . शेजारी स्थानिक वर्तमानपत्रात मोहनीशचा यंग बिझिनेसमन ऑफ द इयर वगैरे पुरस्कार स्वीकारतानाचा फोटो आहे, त्या फोटोकडं तो अभिमानानं पाहतो आणि साधारण पसंत असलेल्या मुलीचा फोटो त्याच्याशेजारी धरतो, नापसंत करतो, असं दोन तीन वेळा होतानाच प्रेम आलेला आहे...)....

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

वरदा's picture

3 Jul 2008 - 12:32 am | वरदा

मस्तच आहे मास्तर्....मला आवडली ही आयडीया एक्दम्....
"मी" ची पण आयडीया आवडली...
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

विसुनाना's picture

2 Jul 2008 - 2:12 pm | विसुनाना

नाट्यरसिक आणि नाट्यलेखक - दोघांसाठीही उपयुक्त आहे.
पुढचे भाग लवकर येवोत.
आभार!

जीएस's picture

2 Jul 2008 - 2:39 pm | जीएस

आवडला. मास्तर तुम्ही पुण्यात असाल तर तुमच्यासोबत नाटक बघायला आवडेल...

संदीप चित्रे's picture

2 Jul 2008 - 9:15 pm | संदीप चित्रे

तुमच्या नाट्यलेखन तंत्राचे सगळे दुवे एकमेकांना जोडाल का?
उदा. भाग २ च्या लेखाखाली भाग १ आणि भाग ३ चे दुवे !

तुमच्या नाट्यलेखन तंत्राचे सगळे दुवे एकमेकांना जोडाल का?

आता तसे केले आहे. -- जनरल डायर.

--------------------------
www.atakmatak.blogspot.com
--------------------------

भडकमकर मास्तर's picture

3 Jul 2008 - 2:23 am | भडकमकर मास्तर

भाग एक
http://www.misalpav.com/node/2344
भाग दोन..
http://www.misalpav.com/node/2347

आता तसे केले आहे. -- जनरल डायर.
धन्यवाद डायरसाहेब...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

भडकमकर मास्तर's picture

3 Jul 2008 - 2:43 am | भडकमकर मास्तर

दामिनी...

कथासार : दामिनी (मीनाक्षी शेषाद्री) या गरीब मुलीचे ऋषी कपूरच्या श्रीमंत घरात लग्न होते, तिथल्या तरूण मोलकरणीवरती बलात्कार करताना आपल्या दिराला आणि त्याच्या काही मित्रांना दामिनी पाहते आणि कोर्टात सत्य बोलून गुन्हेगारांविरुद्ध साक्ष देते,( यात ती तिचा पती आणि सासरच्यांचा रोष ओढवून घेते) मात्र तिला कोर्टात वेडं ठरवलं जातं, घरातून हाकलून वेड्यांच्या इस्पितळात पाठवलं जातं.. तरीही ती तिथून पळून जाऊन सनी देओल या एका हुषार वकिलाच्या मदतीनं त्या मोलकरणीला न्याय मिळवून देते...

पूर्वपक्ष जे सत्य आहे, ते कोणत्याही अडचणींशी लढून विजय मिळवतंच...
प्रिमाईस मध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी आल्या पाहिजेत.
१.भावना (character) : सत्य
२.संघर्ष (conflict ) : संकटं , अडचणी
३.निराकरण / गोष्टीचे ध्येय. (goal / resolution) विजय मिळवतं..

म्हणजे काय तर दामिनी सनी मिळून सत्यासाठी अमरीष आणि सासरा यांनी उभ्या केलेल्या संकटावर मात करून न्याय मिळवतात.

प्रमुख व्यक्तिरेखा
१. दामिनी. (प्रोटॆगनिस्ट )सरळमार्गी, संस्कारी मोठ्या श्रीमंत घरात अचानक येऊन पडल्यावर मोलकरणीवरचा अत्याचार पाहते...खरं बोलण्यासाठी नवर्याचेही मन वळवू पाहते...पण कितीही संकटं आली तरी सत्याचीच बाजू घेते.
२. ऋषी कपूर : द्विधा मनस्थितीत, न्याय आणि सत्य महत्त्वाचं की कुटुंब...?

३.अमरीष पुरी (ऎंटागनिस्ट): आरोपीचा महापाताळयंत्री वकील, याच्याकडे सर्व संकटांवरचे कायदेशीर (आणि इतरही) उपाय असतात.

४.सनी देओल : सर्वात भावखाऊ रोल.... पत्नीला न्याय मिळवून न देऊ शकलेला एक वैफ़ल्यग्रस्त, व्यसनी वकील पण दामिनीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रचंड प्रयत्न, ( हुशारी आणि मारामार्या दोन्हीही) करतो.
( बाकी मंडळीसुद्धा उत्तम ... सासू सासरे, ती सुटेल अशा समजुतीने खोटी साक्ष द्यायला तयार झालेले तिचे अगतिक वडील, परेश रावल,इन्स्पेक्टर कदम, तिच्या बहिणीचा मिमिक्रीवाला नवरा मस्त)...

संघर्ष
कोअर कॊन्फ़्लिक्ट सांगायचा तर सत्य विरुद्ध असत्य असा सनातन संघर्ष...
बाह्य संघर्ष : दामिनीचं सत्य आणि तिच्या सासरकडचे लोक + अमरीष यांचं असत्य यांचा संघर्ष.
शिवाय सनी आणि अमरीष यांचा संघर्ष

आंतरिक संघर्ष : तिचं आणि तिच्या पतीचं नातं ... तो तिला " जाउदे ,विसरून जा" असं सांगतोय आणि ती सत्य आणि न्याय पकडून बसलीय.

आणि या दोघांचाही अंतर्गत आंतरिक संघर्ष असा की नातं महत्त्वाचं की न्याय ?

संघर्ष वाढवण्यासाठी आवश्यक असलेले प्लॊट मोटिव्हेटर्स.
सूड : ऋषी कपूरशी आपल्या मुलीचे लग्न लावू इच्छिणारा एक उयोगपती सूड घेण्याच्या इच्छेने ( आणि ती वेडी झाली की आपल्या मुलीचे पुन्हा ऋषीशी लग्न करून देण्याच्या इच्छेने) दामिनीविरुद्ध अमरीषला मदत करतो.
संकट : दामिनीविरुद्ध अनेक संकटे
पाठलाग : तिच्या मागे पळणारे गुंड.
प्रेम : पतीकडून पूर्वी मिळालेले प्रेम.
फ़सवणूक : तिच्या भोळ्या बापाला खोटं सांगून तिच्याविरुद्ध खोटी साक्ष वदवून घेतात.
छळ :वेड्यांच्या इस्पितळात तिला शॊक देतात.

वाढता संघर्ष :
सुरुवातीला तिला धमक्या, मग कोर्टात तिला वेडं ठरवून इस्पितळात, तिथे शॊक देतात... ती पळून सनीच्या आश्रयाला जाते... मग अटक करायला पोलीस पाठवतात ( सनीने अटकपूर्व जामीन घेतलेला असतो),गुंड पाठवतात ( सनी तुफ़ान मारामारी करतो)... अगदी शेवटी कोर्टात पोचायच्या वेळी तिच्यावर खुनी हल्ला होतो... तेव्हा पळतापळता एके क्षणी एका इमारतीच्या बांधकामाजवळ येऊन पोचते, ती हातात टिकाव घेऊन उलटी फ़िरते आणि गुंडानाच आव्हान देते... हे पाहून इमारतीतील बांधकामावरचे मजूर दगडाविटांच्या मार्याने गुंडांना पळवून लावतात..( हे दृश्य अप्रतिम आहे)... इकडे सनी अमरीषच्या वकिली डावपेचांना "तारीख पे तारीख .."चं भाषण करून वेळ काढतोय... :) .. मग ती नाट्यमयरित्या पोचते आणि साक्ष देते...( आरोपीच्या वकिलाला लै बोल लावते)..हा उत्कर्षबिंदू...पुढे फ़ॊलिंग ऎक्शन ... मग तिचा नवराही येऊन तिच्या बाजूने साक्ष देतो...कोर्टाचा निकाल... ती खुश...नवरा परत तिच्याबाजूने मिळाला..

या प्रत्येक रायजिंग कॊन्फ़्लिक्ट ( वाढत्या संघर्षा) च्या मुद्द्याला प्रेरणा ध्येय अडचणी आणि कृती यांचा संदर्भ देता येतो...

संवाद
पात्रे आपापले संवाद बोलतात.... अत्यंत स्टाईलाईज्ड अमरीष आणि सनी.. मजा येते.
दामिनी आणि तिचे वडील साधं बोलतात.... ऋषीचं पात्र दोन्ही बाजू समजून घेत मध्यम बोलत राहतं...

अमरीष अणि विशेषत: सनीचे संवाद अप्रतिम / अजरामर वगैरे :) ...
"ये ढाई किलोका हाथ जब पडता है तो आदमी उठता नही उठ जाता है" किंवा इन्स्पेक्टरला " एक कागजका टुकडा मेरे पास भी है" " कदम संभलकर चल कदम" किंवा शेवटचा " तारीख पे तारीख.." संवाद.

लय
सुरुवातीला व्यक्तिरेखा कळेपर्यंत सावकाश.. गाणी ( बिन साजन झूला झूलूं, जबसे तुमको देखा है सनम)..वगैरे... ऋषीचं तिला मागणी घालणं , प्रेम...पण एकदा लग्नानंतर ती सासरी आल्यावर होळीच्या त्या दिवसानंतर घटना वेगात घडतात...हॊरिझोंटल ऎक्शन...
त्यात तिचं आणि ऋषीचं मानसिक द्वंद्व.. तिथे व्हर्टिकल ऎक्शन..

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मनिष's picture

3 Jul 2008 - 12:29 pm | मनिष

मला पटकथा, प्रिमाईस आवडले तरी प्रत्यक्ष सिनेमा फार भडक/लाऊड वाटला होता.... सनीचा रोल तर फारच...नंतर एकदा चॅनेल सर्फ करतांना एका साऊथ च्या सिनेमात (नाव माहित नाही) तस्सच हात करून बोलणार वकिल पाहिला...फारच विनोदी वाटलं ते सगळ.

त्यापेक्षा ऋषी कपूर चा अभिनय आवडला (ह्याला खरं तर कोणी नीट वापरला नाही, बराच चांगला अभिनेता अहे, फक्त फार फालतू रोल मधे अडकला)...त्याने त्याचे ते "दु:ख तो इस बात का है दामिनी, की तुम्हारे लिये मुझस, हम दोनोसे जरुरी कुछ और हे" अशा अर्थाच्या संवादाच्यावेळी द्विधा होणे किंवा व्याकूळ होणे खूपच चांगले दाखवले ...

एकूणात मला "व्हर्टिकल ऍक्शन", "हॉरिझाँटल ऍक्शन" पेक्षा जास्त आवडते असे वाटते!

- ( "व्हर्टिकल ऍक्शन" प्रेमी) मनिष

मेघना भुस्कुटे's picture

3 Jul 2008 - 12:43 pm | मेघना भुस्कुटे

सनी देओल इतका परिणामकारक वाटलाय तो निव्वळ त्या स्क्रिप्ट आणि संवादांमुळे. एरवी तो कसला!
ऋषी कपूर मलापण फार आवडतो यातला.
त्याच्या ऑफीसातला एक सीन आहे ना, त्याचा कुणीतरी एम्प्लॉयी काहीतरी क्षुल्लक खोटं सांगतो त्याला, आणि ऋषी कपूर वेडावाकडा भडकतो. 'हम झूठ क्यों बोलते हैं यार?' हा त्याचा सवाल स्वतःलाच. कसला हताश वाटतो तो तेव्हा. तसाच त्याचा संताप. अमरिश पुरीची कॉलर धरून त्याला मधे न पडण्याबद्दल बजावताना काय बोललीय त्याची नजर. सनीला 'ए गोविंद..' म्हणून धमकावतानाचा त्याचा उफाळून आलेला संताप. काय चूक काय बरोबर, हे कळतं आहे खरं तर. पण चौकटीबाहेर जाऊन कुटुंबाला विरोध करण्याचा धीर नाहीय. ही तगमग आणि त्या पार्श्वभूमीवर दामिनीवरचं नितांत प्रेम.
सनी त्याच्या पासंगालाही पुरायचा नाही.

भडकमकर मास्तर's picture

3 Jul 2008 - 2:24 pm | भडकमकर मास्तर

हो, कोर्टात तिला वेडं ठरवताना तर सिनेमा एकदम मद्रासी टाईपचा भडक होतो...
(९४ साली एका फॅमिली गेदरिंगला कोणती व्हिडीओ कॅसेट बघायला आणावी , या विचारात असताना सर्व लहानांनी मोठ्यांच्या मनावर भडक सिनेमामुळे वाईट परिणाम नकोत म्हणून हा सिनेमा आणायचे कॅन्सल केले होते...) :)
.. आणि ऋषीचं काम फार छान आहे सिनेमात फक्त त्याला टाळ्या शिट्यांचे संवाद नाहीत इतकेच...( सनी फक्त स्क्रिप्ट + संवादावर मारून नेतो गोष्टी)... ते तारीख पे तारीख असं म्हणत जजवर ओरडणं मला अंमळ विनोदी वाटलं होतं...
आणि ऋषीशी सनीची काही तुलनाच नाही हेही खरेच... :) असतात काही माणसं नशीबवान...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

१. आपल्या सर्व व्यक्तिरेखा नीट समजून घ्या... त्यांची सारी पार्श्वभूमी आणि विशिष्ट वागण्याची कारणमीमांसा ,प्रेरणा तयार असूद्या.

२.नायक आणि खलनायक त्या सार्या व्यक्तिरेखामध्ये न तुटणारं एक नातं तयार होऊद्यात.का?
अन्ब्रेकेबल बाँड का? तर ही विरुद्ध स्वभावाची मंडळी गोष्टीत एकमेकांशिवाय राहू शकायला नाही पाहिजेत. ... इंट्रेस्ट गुंतले नाहीत तर लोक सोडून जातील ना एकमेकांना....

३. आपल्या गोष्टीची थीम ठरवा, मुख्य पात्राचं ध्येय काय ते ठरवा.... तुम्हाला काय सांगायचंय ? प्रीमाईस

४. मुख्य व्यक्तिरेखेकडे असा एखादा गुण किंवा एखादा विशिष्ट स्वभावविशेष हवा... विशिष्ट बाबतीत थोडासा चक्रम वाटणारा,शंभर टक्के अतिरेकी टोकाचा विचार हवा..( १०० % कंपल्सिव्ह ट्रेट).. आता दामिनीच्या उदाहरणात बघा... ती सत्य आणि न्यायासाठी इतकी टोकाला जाते, नवर्‍यापासून सगळ्यांशी लढते...आता एवढं काय गरज होती का करायची? पण नाही... चक्रमपणा असलेली माणसं काहीतरी करून दाखवतात...म्हणून उत्तम गोष्टीतलं पात्र विशिष्ट् बाबतीत चक्रम असतं...

५.आणि त्याच्या त्या विशिष्ट चक्रमपणामुळंच तो काही प्रसंगात संकटात अडकलाय.. इथे संघर्ष सुरू.

६.त्याच्या अशा स्वभाववैशिष्ट्यामुळं तो अधिकाधिक संकटात , अडचणीत सापडतो.... आणि अस्तित्त्वासाठी, जगण्यासाठी संघर्षात पडावंच लागतं..
अधिकाधिक गुंतत जावं लागतं...अधिकाधिक नाट्यमय घटना...व्यक्तिरेखा अधिकाधिक संकटात...

७. त्यातून बाहेर पडत पडत उत्कर्षबिंदू...आता माघार नाही...

८.उत्कर्ष निराकरण...त्यातूनच प्रेमाईस ची सत्यता व्यक्तिरेखांना आणि प्रेक्षकांना कळते...(काय धडा घेतला... काय शिकवण मिळाली??)

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मेघना भुस्कुटे's picture

3 Jul 2008 - 6:47 am | मेघना भुस्कुटे

थिअरीबिअरी सगळं ठीकाय, पण उदाहरणाला पर्याय नाही! मस्त. :)

नंदन's picture

3 Jul 2008 - 4:39 pm | नंदन

लेख आणि त्याबरोबरच त्यावरचे स्पष्टीकरणात्मक, खुलासेवार प्रतिसाद अगदी उत्तम.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सहज's picture

3 Jul 2008 - 5:55 pm | सहज

मास्तर तीनही भाग, उदाहरणे, प्रतिसाद अतिशय वाचनीय.

मुक्तसुनीत's picture

4 Jul 2008 - 1:55 am | मुक्तसुनीत

आताच तीन्ही भाग वाचले. प्रचंड आवडले !! भुस्कुटे , मनिष आणि इतरांचे प्रतिसाद खूप एंजॉय केले !

भडकमकर, तुमच्याबरोबर एखादे नाटक पहायला आवडेल बुवा ! :-)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jul 2008 - 8:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आताच तीन्ही भाग वाचले. प्रचंड आवडले !! भुस्कुटे , मनिष आणि इतरांचे प्रतिसाद खूप एंजॉय केले !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भडकमकर मास्तर's picture

4 Jul 2008 - 9:50 am | भडकमकर मास्तर

genre याचा उच्चार बरेच जण जॉनर / जॉन्रा / जॅनर असा करताना ऐकले आहेत..मी सध्या जॉनर म्हणतो...ते काही फ़ारसे महत्त्वाचे नाही ...
मी याला लेखनप्रकार , लेखन शैली म्हणेन... (अधिक चांगला प्रतिशब्द कोणीतरी देइलच..)
उदा. सामाजिक, थरार, गूढ, फ़ॆंटसी, कॊमेडी, प्रेमकथा वगैरे वगैरे...

आता थेट उदाहरणे घेऊ...

समजा घटना हीच आहे ... एक मनुष्य त्याच्या मित्राच्या घरात येतो तेव्हा तो मित्र मेलेला आढळतो...
आता याच घटनेचे जॊनरप्रमाणे पुढे कथानकाच्या ट्रीटमेंटमध्ये बदल होतात...

उदाहरणार्थ...

१.सामाजिक नाट्य : या मृत्यूला कोणती सामाजिक कारणं आहेत,जर समजा चोरी साठी हा खून झाला असेल तर गरीबी, बेरोजगारी.. किंवा हार्ट ऎटॆकने गेला असेल तर वेळेत वैद्यकीय सेवा न मिळणे... वगैरे वगैरे... यावर चर्चा... आसवं गाळत स्वगत वगैरे...

२.सस्पेन्स.. ( गूढ उकलणे)...मित्र घरात इकडे तिकडे पाहतो, तर त्याला सिगरेटचे थोटूक , कोटचं तुटलेले बटन आणि लायटर सापडतो.. ( मित्र सिगरेट न ओढणारा वगैरे).

३.थरार... ( थ्रिलर).. घड्याळात बाराचे टोले पडतात..बाहेर काहीतरी आवाज होतो आणि खिडकीतून एक काळी आकृती जाताना दिसते...

४.फ़ॆंटसी :यमदूत मेलेल्या मित्राच्या आत्म्याला म्हणतो, " अरेरे, खरंतर या दुसया मित्रालाच मारायचं होतं...चूक झाली... आता काय करायचं?"

५. कॊमेडी.. : तेवढ्यात बेल वाजते,...मित्र घाबरून ते प्रेत लपवायच्या प्रयत्नाला लागतो... त्यातून गोंधळ उडतो...

६. रोमॆंटिक : मित्राच्या निराधार बहिणीला तो भावनिक आधार देतो आणि त्यातून त्यांचं प्रेम फ़ुलतं वगैरे...

आता साधारणपणे एकच एक जॆनर नसतो तर त्याची मिश्रणे असतात...
उदाहरणार्थ रोमेंटिक कॊमेडी.., सस्पेन्स थ्रिलर... सगळं तसं एकमेकांच्यात गुंतलेलंच असतं... फ़ार वेगळं काढून दाखवता येत नाही असं मला वाटतं... जॊनर हा प्रकार फ़क्त एकूण लेखकाला लिहायला सुरुवात करण्यापूर्वी एक मार्गदर्शक म्हणून असावा, की बाबा आपल्याला काय शैलीत लिहायचंय... एकूण त्या बाबतीत गोंधळ माज्ला की अवघड जातं.. ....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मुक्तसुनीत's picture

4 Jul 2008 - 12:03 pm | मुक्तसुनीत

भडकमकरांची ही सगळी लेखमाला मला आवडली हे आधीच सांगितले आहे.

असे म्हणतात की मोठ्या कलाकृतींमधे बर्‍याचदा , त्या त्या कलेच्या क्षेत्रातील नियम , संकेत मोडल्याचे दिसून येते. विशेषतः चित्रकलेमधे असे वारंवार घडले. (इम्प्रेशनिझम हे एक ठळक उदाहरण.) युलिसिस ही कादंबरी म्हणे प्रसिद्ध झाली तेव्हा "संज्ञाप्रवाही कादंबरी" हा प्रकार जन्माला आला. आपल्याकडील नेमाडे, मर्ढेकर यांची अशी "क्रांतिकारकाची" उदाहरणे आहेतच.

माझी भडकमकरना अशी विनंती आहे की त्यानी जे नियम समजावून दिलेत त्याना छेद देणार्‍या नाट्य किंवा सिनेकृतींचाही उल्लेख उदाहरणांसकट करावा. नियम असतात ते मोडण्याकरता , हे चांगल्या अर्थाने खरे करणार्‍या , एकूण कलाप्रकाराची कक्षा वाढवणारे त्यांनी काही पाहिले काय ? असल्यास काय ते जाणून घ्यायला उत्सुक आहे.

मेघना भुस्कुटे's picture

4 Jul 2008 - 1:44 pm | मेघना भुस्कुटे

अगदी मनातलं बोललात.

परंपरेच्या विरोधात केलेली अर्थपूर्ण आणि अपरिहार्य बंडखोरी परंपरेला अधिक सशक्त करत जाते - बंडखोरीच्या अशा अनेक कड्यांची मिळून समृद्ध परंपरा तयार होत असते... अशा अर्थाचं एक विधान तेंडुलकरांनी कुठेतरी केलेलं आहे, त्याची आठवण झाली.

नुकतंच वाचलेलं मनस्विनी लता रवींद्रचं 'सिगारेट्स' आठवतं आहे.
या नाटकाला रूढार्थानं कथा नाही. प्रमुख पात्र असंही नक्की नाही. सगळेच आपापल्या परीनं चक्रम आणि चाकोरीतलेही असलेले तरुण. नायक नाही आणि खलनायकही. आपल्या लैंगिक - शारीरिक आणि मानसिकही - गरजांना हे सगळे जण रिऍक्ट होत राहतात. त्यांचे प्रश्न प्रामाणिक आहेत आणि उत्तरं शोधण्याचे प्रयत्न धीट. त्यात कसलाही अभिनिवेश नाही. सोवळेपणाचा आव वा दुटप्पीपणाही नाही.
निव्वळ आयुष्याचा एक तुकडा. जिवंत. त्यांच्या प्रश्नांना उत्तरं मिळतात की नाही, त्यांच्या शोधात-लढ्यात ते यशस्वी होतात की नाही, ते सुखी होतात की दु:खी यांतल्या कसल्याही प्रश्नांची आयती उत्तरं मिळत नाहीत. जिथून नाटक सुरू होतं तिथे आणि जिथे संपतं तिथे - बाह्य परिस्थितीत काहीच फरक नाही. पण सगळ्यांच्या शरीरा-मनात काहीतरी घडून गेलं आहे - जे उत्तरं मागणार आहे. कुणी त्याला सामोरं जाईल, कुणी तोंड लपवून पळ काढील... आपापल्या वकुबानुसार.
नाटक फक्त आपल्या आयुष्याचा हा एक अस्पर्श भाग आपल्या पुढ्यात आणून टाकतं. जिवंत. कसल्याही रूढ नियमांखेरीज.

हे तर प्रायोगिक - त्यामुळे काहीश्या आडबाजूच्या - नाटकाचं उदाहरण झालं. पण मुख्य धारेत राहून 'दिल चाहता है'नं असे कितीतरी नियम मोडले. त्यालाही गोष्ट अशी नव्हतीच. फार तर ओढून ताणून तिला नायकांच्या 'ग्रोइंग अप्'चीही कथा म्हणता आलं असतं. पण त्यातही नायक नव्हताच, खलनायकही. एक आयुष्याचा रसरशीत तुकडा. काही घटना. काही प्रश्न. बस.

काही म्हणा, नियम मोडायलाच मज्जा येते! :)