तुझी आठवण येते....

रसप's picture
रसप in जे न देखे रवी...
12 Apr 2012 - 12:48 pm

"मराठी कविता समूहा"च्या "लिहा ओळीवरून कविता - भाग ९०" मधील माझा सहभाग -

भिजऱ्या पाउलवाटा आणिक टपटप गळती पाने
दरवळ मृद्गंधाचा पाणी खळखळ झुळझुळवाणे
हळवी रिमझिम अंगणवेडी ठाव मनाचा घेते
धुंद लाघवी संध्याकाळी तुझी आठवण येते

मोत्यांनी चमचम करणारी हरिततृणांची पाती
सप्तसुरांची रंगसंगती तरळे क्षितिजावरती
गंधभारली झुळुक अनाहुत कानाशी गुणगुणते
नवी पालवी बघुन कोवळी तुझी आठवण येते

ओली वाळू फसफस लाटा अनवाणी पाऊले
भुरभुर पाऊस नकळत भिजवे थेंब-थेंब ओघळे
डबडबल्या डोळ्यातुन कविता गालावरून झरते
लोभसवाण्या कातरवेळी तुझी आठवण येते

चिंब चिंब तू चिंब चिंब मी आसमंत भिजलेला
गोजिरवाणा शब्द मनाचा ओठांवर थिजलेला
दोघांमधले अंतर क्षुल्लक तरी न सरले होते
असताना तू माझ्या जवळी.. तुझी आठवण येते....

....रसप....
१२ एप्रिल २०१२
http://www.ranjeetparadkar.com/2012/04/blog-post_12.html

करुणकविता

प्रतिक्रिया

चौकटराजा's picture

12 Apr 2012 - 6:10 pm | चौकटराजा

सप्तसुरांची रंगसंगती तरळे क्षितिजावरती
गंधभारली झुळुक अनाहुत कानाशी गुणगुणते

सूर हे अमूर्त आहेत तर रंग नाही. सात सुरांची सूरसंगति होईल ते कानानी स्वीकारायचे माध्यम आहे तर क्षितिजावरचे रंग हे नजरेने टिपायचे माध्यम आहे.
आता एक ओळ कवि शंकर वैद्य यांची
काल राउळात तुझी सय आली
आणि तळहातात तिर्थाची मदिरा झाली.

अशी तिच्या आठवणीने तुमची अवस्था झाली असेल तर सप्तसूर अमूर्त असूनही केवळ तुझ्या आठवणीची जादू म्हणून ते आपला अमूर्तपणा सोडून रंगांच्या स्वरूपात क्षितिजावर अवतरले .अशाच अर्थाने आपण लिहिले असेल तर मग आपला हा घोळ बरोबर आहे.
गंधभारली झुळूक जर गंध घेऊन आली असेल तर ती नाकाशी यावयास हवी ना ? की कानाचे निमंत्रण नसतानाही ती कानापाशी अनाहूत पणे आली आहे? आत तिच्या आठवणीच्या मादकपणाचा परिणाम गंधित झुळकेवर होऊन ती संभमित होऊन कानापाशी गेली. असे जर आपणास
म्हणावयाचे असेल तर हा ही आपला घोळ बरोबर आहे. अन्यथा प्रतिभेच्या झटक्याच्या भारात लिहिताना गडबड झाली आहे असे मी म्हणेन.
याला जे मिपाकर पोस्टमारटेम म्हणतात त्यांची अगोदरच क्षमा मागतो.

रसप's picture

13 Apr 2012 - 10:32 pm | रसप

माझे 'घोळ' आपणांस बरोबर उमगलेत!
धन्यवाद!

पैसा's picture

13 Apr 2012 - 12:02 am | पैसा

अतिशय हळूवार आणि नादमय! छान आहे!

रुमानी's picture

13 Apr 2012 - 10:49 am | रुमानी

कविता छान आहे !