एका स्कूल सायकॉलॉजिस्टची डायरी

मितान's picture
मितान in जनातलं, मनातलं
3 Mar 2012 - 8:17 pm

१२ एप्रिल २०११

आज एका प्रसिद्ध शाळेत बायोडेटा घेऊन गेले. एका मोठया कंपनीची ही शाळा. इंग्रजी-मराठी अशा दोन्ही माध्यमात मिळून जवळजवळ दोन हजार विद्यार्थी संख्या. शाळेची ओळख परिसरात चांगली. निकाल पण दरवर्षी ठीकठाक लागतो. हे सगळं पाहून वाटलं इथे मला शालेय मानसतज्ञ म्हणून काम करायला मिळावे...

मुख्याध्यापकांची वाट बघत बसले होते. "सरांच्या येण्याची काही निश्चित वेळ नसते..!" असे गुळमुळीत उत्तर मिळाल्याने किती वेळ वाट बघायची आहे हे कळत नव्हते. शेवटी सर आले ! माझ्या आधीपासून एक पालक येऊन बसल्या होत्या त्यांना डावलून मला आधी बोलावण्यात आले.

सरः बोला मॅडम
मी: मी अमुक तमुक
स्कूल सायकॉलॉजिस्ट आहे.
आपल्या शाळेत काम करण्याची इच्छा आहे.

सर : ह्म्म.. ( हातातला बायोडेटा वाचल्यासारखा करत) किती पैशे घेता तुम्ही ?

कामाबद्दल काहीही जाणून न घेता येवढ्या जबाबदार पदावर काम करणारा माणूस पहिला प्रश्न हा विचारत होता.
मग कामाचे स्वरूप सांगून झाले. उपमुख्याध्यापिकाही आल्या. सरांनी ओळख करून दिली.

बाई : म्हणजे तुम्ही औषधं वगैरे देत असाल नं...

मी : नाही. औषधं देणारे सायकिअअ‍ॅट्रिस्ट असतात. मी सायकॉलॉजिस्ट आहे. आम्ही वेगवेगळ्या काउन्सेलिंग थेरपी वापरतो. त्यासाठी आवश्यक असेल तेथे मानसशास्त्रीय चाचण्यांचा आधार घेतो.

सर : ओ: काउन्सेलिंग ! माझा आवडता विषय.. तुम्हाला सांगतो मॅडम, मला इथे एवढं काउन्सेलिंग करावं लागतं की कधीकधी डोकंच आउट होतं बघा !!!

मी : ( जरा चाचरत..) नाही सर, आमची समूपदेशन पद्धत वेगळी असते. मुलांच्या वर्तन विषयक समस्या, भावनिक समस्या, गटात मिसळण्यासंबंधी समस्या या आम्ही हाताळतो. त्याचप्रमाणे मुलांच्या क्षमता, बुद्ध्यांक, कल इ. समजून घेऊन त्यांना अभ्यासात आणि खेळात उत्तम यश मिळण्यासाठी आम्ही मदत करतो.

बाई : हां... म्हणजे सर, तो दहावीच्या वर्गातला तारे यांच्याकडे पाठवला पाहिजे. अहो मॅडम, एवढा दांडगटपणा करतो तो...आणि आठवीतली ती जोडी.. फेमस कपल आहे ! नववीच्या वर्गात साठपैकी ४० मुलं टारगट आहेत...

सर : त्या तारेला माझ्याकडे पाठवत जा बाई ! दोन मिनिटात सरळ होईल. आजकाल ना पालकच मुलांना फार डोक्यावर बसवतात...

मी : सर, बरेचदा नं, पालकांना मुलांना कसं वागवावं ते सुचत नाही हो... बरेचदा आपल्या वागण्यामुळे मुलांवर काय परिणाम होतात ते ही लक्षात येत नाही. त्यातून पालक आणि मुलांमध्ये बराच गुंता तयार होतो.. त्यातून बाहेर पडायला आम्ही मदत करतो.

सर : अभ्यासात मदत म्हणजे काय करता ?

मी : बरेचदा मुलांचा बुद्ध्यांक खूप चांगला असतो पण अभ्यास करण्याची पद्धत न समजल्याने ती अभ्यासात मागे असतात. त्यांना अभ्यास करायचा म्हणजे काय ते सांगावं लागतं. प्रत्येक विद्यार्थी वाचन,लेखन,पाठांतर या पद्धतीने अभ्यास नाही करू शकत. त्यांना रुचणारी अभ्यासाची पद्धत आम्ही सुचवतो. स्मरण, लेखन, वाचन हे 'कौशल्य' म्हणून कसे विकसित करायचे याची तंत्र आम्ही शिकवतो. मग मुलांना अभ्यास करणं आवडायला लागतं.

सरांना बहुतेक कंटाळा आला असावा. त्यांच्या दॄष्टीने हा विषय महत्त्वाचा नाही हे स्पष्ट दिसत होते. त्यांनी पुन्हा पैशांचा विषय काढला. मी किमान अपेक्षा सांगितल्यावर 'हे काउन्सेलिंग प्रकरण भलतंच महाग आहे हो...' असा माझ्या तोंडावर शेराही मारला. आणि संचालक समितीच्या बैठकीत विषय मांडतो म्हणून मला निरोप दिला.

शर्टाच्या वरच्या गुंड्या उघड्या, हातात आठ अंगठ्या, गळ्यात जाड साखळी, तोंड रंगलेलं अशा या 'सरांकडे' बघताना राहून राहून मनात काही प्रश्न पडतायत.

चाळीस वर्षे जुनी असणार्‍या शाळेत मुख्याध्यापक असे का ?
मुलांचे मानसशास्त्र हा विषय त्यांना एवढा अनावश्यक का वाटला ?
मी विनामूल्य काम करेन असे सांगितले असते तर त्यांनी मला काम दिले असते का ?

ह्म्म... उद्या दुसर्‍या शाळेत जायचंय.

क्रमशः

समाजजीवनमानशिक्षणप्रकटनलेखअनुभव

प्रतिक्रिया

मन१'s picture

3 Mar 2012 - 9:11 pm | मन१

समुपदेशनाबद्दल अधिक माहिती नाही.
पुढील प्रवासास शुभेच्छा.
ह्यापूर्वी ज्या केसेस हाताळल्यात, त्यातील काही रोचक्,उद्बोधक किंवा स्मरणीय असं काही असेल, तर तेही किश्श्यांच्या रुपानं द्या की इथेच.

आत्मशून्य's picture

3 Mar 2012 - 9:55 pm | आत्मशून्य

चाळीस वर्षे जुनी असणार्‍या शाळेत मुख्याध्यापक असे का ?

जुनं ते सोनं समजत रहायची हौस.. दुसरं काय ;)

मुलांचे मानसशास्त्र हा विषय त्यांना एवढा अनावश्यक का वाटला ?

जी गोश्ट त्यांच्या व त्यांच्या बाप जाद्यांच्या(क्षमा असावी या शब्दा बद्दल) डोस्क्यात अन वाट्याला कधी आली नाही ती इंप्लीमेंट करुन काही फायदा होइल ही त्यांच्या सपशेल आकलना पलीकडील गोश्ट आहे.

मी विनामूल्य काम करेन असे सांगितले असते तर त्यांनी मला काम दिले असते का ?

कामाला किंमत दिली असती का हा प्रश्न जास्त योग्य ठरेल.

बरेचदा मुलांचा बुद्ध्यांक खूप चांगला असतो पण अभ्यास करण्याची पद्धत न समजल्याने ती अभ्यासात मागे असतात. त्यांना अभ्यास करायचा म्हणजे काय ते सांगावं लागतं. प्रत्येक विद्यार्थी वाचन,लेखन,पाठांतर या पद्धतीने अभ्यास नाही करू शकत. त्यांना रुचणारी अभ्यासाची पद्धत आम्ही सुचवतो. स्मरण, लेखन, वाचन हे 'कौशल्य' म्हणून कसे विकसित करायचे याची तंत्र आम्ही शिकवतो. मग मुलांना अभ्यास करणं आवडायला लागतं.

सुरेख! कोणतीही गोश्ट करताना घडताना ते आवडीने घडलं तरच त्यात अर्थ आहे असंच नेहमी वाटत आलं आहे. आणी इथे तर चक्क अभ्यासाचा व परीणामी पाल्याच्या भावी आयुष्याचा प्रश्न आहे, अभ्यासात आवड व परीणामी कौशल्य निर्माण होणे केव्हांही अत्यावश्यकच. कोणत्याही पाल्याच्या द्रुष्टीने हा खरोखर सुखद आणी अल्हाददायक अनुभव ठरेल व त्याच्या भावी मानसीक विकासाला एक अत्यंत पुरक अशी गोश्टही. आपल्याला काम कोठेही मिळो, तुमच्या कार्यास मनापासुन कोटी कोटी शुभेच्छा. :)

कवितानागेश's picture

3 Mar 2012 - 9:49 pm | कवितानागेश

मुलांना ताण वगरे असतो हे कुणी सांगितले?
मुलांना ठोकून काढून वठणीवर आणायचे असते.
आपले दु:ख कुणासमोरतरी बोलून हलके करण्याची खरी गरज शिक्षकांना आणि पालकांना आहे.
यापुढे त्यांना तसेच सांगत जा.
'मी तुमच्यावर येणारा ताण दूर करण्यासाठी मार्गदर्शन करेन! ' :)
.... मग बघून घेता येइल त्यांना काय काय सुचवायचे ;) ते!

रेवती's picture

3 Mar 2012 - 10:45 pm | रेवती

खी खी खी
आजकाल काय गम्मत गम्मत वाचायला मिळतिये.;)
तुझ्याबद्दल आदर आहे माऊतै.:)

मुलांना ताण वगरे असतो हे कुणी सांगितले?
मुलांना ठोकून काढून वठणीवर आणायचे असते.

Smiley
ख्यॅ..ख्यॅ...ख्यॅ..ख्यॅ... Smiley
प्रत्येक वाक्यावर पोट धरुन हसतोय! असा उपाय अख्या आयुष्यात पहील्यांदाच ऐकतोय.

बाकी तुंम्ही हागिमारुच्या टीचरच का? Smiley

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Mar 2012 - 9:58 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपल्या वेळेस कुठं होतं हे समुपदेशन ? असं काही म्हणायचं नाही. पण आता शाळेतच मास्तर विविध अध्ययन पद्धतीद्वारे मुलांना शिकवत असतांना किती शाळा अशा समुपदेशकात तज्ञ असलेल्या मास्तराला घेण्यास उत्सुक असतील कोणास ठाऊक. आणि किती मुलांना एक मास्तर काय हवं आणि काय नको शिकवणार ? खासगी शाळांसाठी उगाच अनाठायी खर्च आहे, असा विचार करणारे मुख्याध्यापक असतील आणि भरपूर पैसे मिळत असलेल्या शाळांमधे असा एक प्रयोग राबवुन बघायला काही हरकत नाही, असा विचार करणारेही असतील. तेव्हा, शिक्षकांचा विचार कितीही दुरदृष्टीचा असला तरी अशा शिक्षकांच्या नेमणुका सहजा-सहजी होत असतील का ? याबाबत माझ्या मनात जरा शंकाच आहे.

असो, आत्ता आपण कुठे तरी शाळेत काम करत असालच असे गृहित धरुन विद्यार्थ्यांच्या आणि आपल्या संवादाविषयी, अनुभवविश्वाविषयी वाचायला आवडेल. :)

-दिलीप बिरुटे

अत्रुप्त आत्मा's picture

3 Mar 2012 - 10:38 pm | अत्रुप्त आत्मा

चाळीस वर्षे जुनी असणार्‍या शाळेत मुख्याध्यापक असे का ?
मुलांचे मानसशास्त्र हा विषय त्यांना एवढा अनावश्यक का वाटला ?>>> कारण ते स्वतःच गंभीर अजारी असावेत...म्हणुन. ;-)

अमितसांगली's picture

3 Mar 2012 - 10:43 pm | अमितसांगली

आजकाल शुभंकरोती, गायत्री मंत्र, राज सकाळी पालकांच्या पाया पडून आशीर्वाद घेण अशा अनेक सवयी बंद झाल्या आहेत. त्यामुळे मुलांची मनोवृत्ती बिघडत आहे. यासाठी किमान समुपदेशांची फार गरज आहे.

शर्टाच्या वरच्या गुंड्या उघड्या, हातात आठ अंगठ्या, गळ्यात जाड साखळी, तोंड रंगलेलं
हे हे हे
चालायचच.
तुझे आणखीही अनुभव वाचायला आवडतील.

कठीण आहे. मुलांना युनिफॉर्मची सक्ती आणि मुख्याध्यापक अशा अवतारात!

माझ्या मते हे सुद्धा एक फॅड आहे, तथाकथित पुढारलेल्या देशातुन आपल्याकडं आलेलं, विद्यार्थी आणि शिक्षक आणि शिक्षण व्यवस्था , सर्वासाठीच आपली अपयशं जस्टिफाय करण्यासाठी आपलेलं नविन पॅकेज आहे, बाकी काही नाही.

बाकी, लिमाउतैचा प्रतिसाद अतिशय उपयुक्त आंणि योग्य.

कुठल्या पाड्या वरच्या शा़ळेत गेल्तासा ?

अगदि शहरातल्या प्रसिध्द शाळेतहि हेच अनुभव येतिल.जर दिलिच नोकरि तर वर्श सहा महिन्यन्ची असेल.

विनायक प्रभू's picture

4 Mar 2012 - 2:11 pm | विनायक प्रभू

कुठले गाव म्हणे?
मुंबै च्या आसपास काम हवे असेल तर कळवा.
मी फुक्ट करतो.{आपापला कंड}
तुमची फी कळवा.

शर्टाच्या वरच्या गुंड्या उघड्या, हातात आठ अंगठ्या, गळ्यात जाड साखळी, तोंड रंगलेलं >>.

काय नग असतात एक-एक !!

:)

धन्यवाद !

डायरीच्या पुढच्या पानात सगळी उत्तरे मिळतीलच..

नगरीनिरंजन's picture

5 Mar 2012 - 3:10 pm | नगरीनिरंजन

पुढील भागाची वाट पाहत आहे.

चाळीस वर्षे जुनी असणार्‍या शाळेत मुख्याध्यापक असे का ?
मुलांचे मानसशास्त्र हा विषय त्यांना एवढा अनावश्यक का वाटला ?
मी विनामूल्य काम करेन असे सांगितले असते तर त्यांनी मला काम दिले असते का ?

ह्म्म... उद्या दुसर्‍या शाळेत जायचंय.


शिक्षक त्यातही मुख्याध्यापक लोक तसे फार विचित्र. ते त्यांच्या भूमिकेतून बाहेर येण्यास कधी तयार नसतातच.
तुम्हे त्यांच्याशी कधीही बोला एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून एखादे मुख्याध्यापक लोकांशी बोलण्यास तयार नसतातच.
( अर्थात नियमाला अपवाद असतात पण ते अपवादच) शाळा जितकी जास्त जुनी तितकी ही प्रवृत्ती जास्त कठोर असते.
नव्या शाळेतील मुख्याध्यापक त्यामानाने प्रयोगशील असतात.
प्रत्येक शिक्षकाने आयुश्यात एकदातरी " तोत्तोचान " हे पुस्तक वाचावे.
बहुतेकांच्या मते दहावी फ/ किंवा तारे जमीं पर हे चित्रपट लहान मुलांसाठी असतात.

चाळीस वर्षे जुनी असणार्‍या शाळेत मुख्याध्यापक असे का ?
मुलांचे मानसशास्त्र हा विषय त्यांना एवढा अनावश्यक का वाटला ?
मी विनामूल्य काम करेन असे सांगितले असते तर त्यांनी मला काम दिले असते का ?

ह्म्म... उद्या दुसर्‍या शाळेत जायचंय.


शिक्षक त्यातही मुख्याध्यापक लोक तसे फार विचित्र. ते त्यांच्या भूमिकेतून बाहेर येण्यास कधी तयार नसतातच.
तुम्हे त्यांच्याशी कधीही बोला एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून एखादे मुख्याध्यापक लोकांशी बोलण्यास तयार नसतातच.
( अर्थात नियमाला अपवाद असतात पण ते अपवादच) शाळा जितकी जास्त जुनी तितकी ही प्रवृत्ती जास्त कठोर असते.
नव्या शाळेतील मुख्याध्यापक त्यामानाने प्रयोगशील असतात.
प्रत्येक शिक्षकाने आयुश्यात एकदातरी " तोत्तोचान " हे पुस्तक वाचावे.
बहुतेकांच्या मते दहावी फ/ किंवा तारे जमीं पर हे चित्रपट लहान मुलांसाठी असतात.

पैसा's picture

5 Mar 2012 - 9:11 pm | पैसा

डायरीत आणखी काय काय जमा करून ठेवलंयस वाचायला आवडेल!